वाढदिवसाची भेट

Submitted by प्रज्ञा९ on 29 April, 2011 - 16:24

सखी,

तुझा वाढदिवस जवळ आलाय. खरंतर वाढदिवस म्हणून काही विशेष सेलिब्रेशन केल्याचं नाहीच आठवत. माझ्या वाढदिवशी तू माझ्या घरी यायचं, तोवर मी नवीन ड्रेस घालून तयार रहायचं, मग आपण दोघी आजोबांकडे जाऊन त्यांना नमस्कार करून तसंच पुढे समुद्रावर जायचं. तिथे भेळ घ्यायची, आणि जरा वेगळं काही म्हणून एखादं आइस्क्रीम! झाला वाढदिवस!

आणि तुझा वाढदिवस तर बरेचदा पुण्यातच व्हायचा. म्हणजे तू पुण्यनगरीत, नि मी रत्नागिरीत. मी पेपर झाले म्हणून सुटीच्या उद्योगात, तर तू एक मोठी परीक्षा संपली तरी टि.म.वि. च्या संस्कृतच्या परीक्षेत गर्क!
दरवर्षी एप्रिल-मे मधे तू कॉलजच्या परीक्षेतून सुटायचीस नि मी अडकायचे. मग जून महिन्यात मी मोकळी नि तू अडकलेली. पण ते असो.

त्यामुळेच असेल, तुला प्रत्यक्ष तुझ्या वाढदिवशी भेटणं बहुतेक झालंच नाही, भेटवस्तू (?!) देणं दूरच. पण आज म्हटलं, द्यावंच काहीतरी. अगदी युनिक असं..

नि मग आठवलं, की या जगात "माणूस" हे एकच फीचर फक्त युनिक आहे. बाकी सगळं छापाचं...असं आपणच एकदा गप्पांच्या मैफिलीत ठरवून टाकलं होतं! मग त्यातल्यात्यात काय द्यायचं...तर काही आठवणींचा खजिना आहे माझ्याकडे, तोच तुला द्यावा म्हणून हा लेखनप्रपंच!

आपण भेटून १-२ नाही, तब्बल ११ वर्षं झाली गेल्या महिन्यात. विश्वासच नाही बसत माझा. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्द्ल ११ वर्षांचा संदर्भ स्वतः द्यावा इतके मोठे आपण कधी झालो हेच नाही गं समजलं. ही ११ वर्षं म्हणजे कॅलेंडरची नुसती ११*३६५ अशी मोजणी नक्कीच नव्हती.

मी १२वीच्या अगोदरच्या सुटीत सगळं पुस्तक शिकून पुरं करायचं म्हणून आजोबांकडे येत होते. आणि तू, शाळेत कधी हा विषय शिकलेली नसूनही थेट BA च्या पहिल्या वर्षी, अचानक आजोबांकडे पहिल्यांदाच येऊन, "मला याच विषयात BA करायचंय" हा हट्ट करत होतीस! आजोबांची प्रेमळ काळजी. मला म्हणत नव्हते का, "अज्ञ, अगो समजाव हिला. सोपं नाहिये हा विषय असा अचानक शिकणं. म्हणावं, ऑक्टोबरातल्या पहिल्याच परीक्षेत काय करशील? ६ महिने आहेत हातात...कालिदास, भास, भवभूती...कमी का आहे हे! अगो पाहिजे तर गीता शिक. सुभाषितं शिक...पण हे काय! अगो हिचं शिकणं मला नको असायास काय झालं! मी शिकवेनच! पण हे काय अगोचरपण!" असं त्यांचं म्हणणं. मी कात्रीत. पण तू जिंकलीस. नियती कौल देत असते. माझ्याचबरोबर, त्याच दिवशी तुझीपण शिकवणी सुरु झाली. "नास्ति धीमताम् असाध्यं नाम" हा माझ्या पुस्तकातला धडा पूर्ण झाला तेव्हा नियती मला न कळत्या आवाजात कुजबुजली असेल, "खरंच आहे हे. ही बुद्धिमान मुलगी आहे, हिला असाध्य काही नाही".

पुढे तुझ्या असामान्य बुद्धीने आजोबा स्तिमित झाले. "कार्टी अगदी कुशाग्र बुद्धीची आहे. गेल्या ५० वर्षात असं पोर नाही आलं माझ्याकडे शिकायला" म्हणाले होते मला पत्रात. ८५ वर्षांचं ते ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, तुझा बुद्धीने चकित झालं होतं.

पुढे मी रत्नागिरीत परत आल्यावर अगदी मस्त जमली आपले मैत्री. नुसता एक फोन करायचा नि मग पुढच्या १५-२० मिनिटांत आपण समुद्रावर असायचो!
तुला आठवतं का ग, एकदा शेजारच्या दुकानातल्या काकूंनी सहज विचारलं होतं, की तुमची ओळख कशी गं झाली मुलींनो? तू फिरकी घ्यायच्या मुडात (हा शब्द तुझाच) होतीस.."काय करणार हो! गेल्या जन्मीचं पाप नडतंय आता! दोघींची ग्रहदशा..दुसरं काय!" म्हणालीस नि बिचार्‍या काकू सामान बांधायचं विसरल्या होत्या..

तशा आपल्या आठवणी म्हणजे एकाचा दुसर्‍याला संबंध नसलेल्या विचित्र गोष्टींची मालिकाच आहे नै! तुझ्या जुन्या घरात मी पहिल्यांदा रागमालिका ऐकली होती. अभिषेकीबुवांची. कट्यारीतली. नि मग सगळ्या कॅसेटी (आपला शब्द..आठवतोय ना गं?) नकलून घेतल्या होत्या. कुठल्याश्या वर्षीच्या नाट्यदर्पण रजनीच्या होत्या त्या. त्याच्या थोडेच दिवस आधी काकूला भेटले होते. "ही माझी आईस." अशी दणक्यात ओळख करून दिली होतीस. तिला मी अगोदर शिस्तीत "अहो काकू" म्हणत होते. पण ऐकेल तर काकू कसली! असं काही वागली माझ्याशी, की शेवटी "मला तुम्हाला अहो-जहो करायला जमायचं नाही. मी तुला अगं काकूच म्हणेन" म्हटल्यावर "बघितलंस गोळ्या! मी सांगितलं असतं तर स्वतःच नको म्हणाली असती..अगो मला माझी लेक नि तू काय वेगळ्या नव्हेत!" अशी तिची टिप्पणी! लाडात तुला ती गोळ्या म्हणते हे मला लागलेला शोध.

बघ, पुन्हा रस्ता भरकटले.. हे असंच होतं! तुला नेहेमी कळतं मला काय म्हणायचं असतं ते. आणि मला कळतं तू काय म्हणतेस ते. पण तरी तू ते सगळं शब्दांतही सांगू शकतेस...मला नाही जमत. वेळीच का गं सवय नाही लावलीस मनातलं शब्दांत अचूक सांगायची! तुला कळत असल्यामुळे मी कधी ते मनावरच नाही घेतलं... नि मग खूप त्रास झाला!

पण आपण मात्र काहीही त्रास झाला की समुद्रावरच जायचो थेट. तो आपला जिवाभावाचा सखा झाला होता. सगळं बिचारा ऐकून घेत असे. एकदा मी तुला म्हटलं, "याला कळत असेल का आपण काय सांगतोय ते?" तेव्हा तू म्हणाली होतीस, "त्याच्या लाटा येतायत ना आपल्या पायाशी..त्या कुरवाळून समजावतायत आपल्याला. कोणीही कितीही त्रास दिला तरी तो मनाच्या तळाशी ढकलून द्यायचा असतो असं सांगतायत त्या." आणि मग तू असं काही बोलायचीस. मी ऐकत बसायचे. त्यात कधी शाकुंतलातला दाखला द्यायचीस, कधी शंकराचार्यांची चर्पटपंजरीका असायची. कधी काकूच्या खजिन्यातल्या ज्ञानेश्वरीतलं काही असायचं..विषयाला धरबंध नसेच मुळी कधी.

आणि आठवतं तुला? आपण नवीन वर्षाची पार्टी करणार होतो, दोघीच. पावभाजी करायला मी येते म्हटलं होतं तुला, पण ओट्याचं काम करायला माणसं येणार आहेत असं सांगून मी यायच्या आत तुझी भाजी तयार होती. पहिल्यांदाच करत होतीस तू. त्यातपण स्वतःची भर घातली होतीसच, नि मी वैतागले होते! मसाला चमचाभर कमी पडला तर तेवढा तू चक्क साम्बारमसाला ढकलून मोकळी झालीस! वर मलाच "नशीब समज, आयशीला नाही इथे ढवळाढवळ करायला दिली मी. मला मदत म्हणून सुकं खोबरं वगैरे घालून वाटण करून देऊ काय म्हणून विचारत होती...कसली पावभाजी मिळाली असती तुला!" वगैरे सांगून थंड केलं होतंस. अणि मग ती अफाट भाजी खात आपण "तरूण तुर्क म्हातारे अर्क" बघितलं होतं...

हरे राम! ते नाटक बघताना घरातल्या हॉलच्या या कोपर्‍यापासून त्या कोपर्‍यापर्यंत नुसत्या लोळत होतो आपण आणि हसून हसून पोट दुखायला लागलं होतं आपलं. आपलं खिदळणं ऐकून मधे दचकून बिचारी काकूपण येऊन गेली, नक्की पोरीना झालं काय ते बघायला!

पण मग हे दिवस फार काळ टिकलेच नाहीत. माझं उष्टं कुठेतरी दूर नाशकात सांडायचं होतं...मी अ‍ॅडमिशन मिळाल्यावर गेलेच तिकडे. आणि मग पत्रांतून गप्पा. कधीतरीच.

मधल्या काळात खूपसे भले-बुरे अनुभव घेऊन दोघी आपापल्या परीने सावरत होतो. नव्याने खेळ मांडत होतो. नाशकात जेव्हा पहिला पाऊस अनुभवला तेव्हा तो डोळ्यात कधी उतरला समजलंच नव्हतं मला. हॉस्टेलच्या गॅलरीतून न भिजता रूममधे आलेली मी, मनाने मात्र पूर्ण भिजले होते. जीव तुझ्यासाठी अर्धा अर्धा होत होता.

सारखं वाटे, तू जाणारच नाहीस आता समुद्रावर..गेलीस तर तो विचारेल तुला, की एकटीच? तिला नाही आणलंस?
तू एकटीने भेळ, पावभाजी, रगडा पॅटिस...काही खाणार नाहीस. कॉफी तर आणायचीच नाहीस मी येईतो!
आणि नवीन गूळ आणला की काकूला माझी आठवण येणारच...खात्री होती मला. पावसाची झड लागली की नुसतीच बसशील तुझ्या खोलीच्या गॅलरीत. कॅसेटी लावयचं नाहीच सुचणार तुला..आणि गाण्याच्या कार्यक्रमालाही जायची नाहीस. संगीत नाटकं कोणाबरोबर बघशील? कंटाळा आला तर खास टिवल्याबावल्या करण्याच्या कॅटेगरीतले सिनेमे बघशील का?
आणि तुझं ते अद्भुत यंत्र बिघडलं तर काहीही करणार नाहीस. "प्रज्ञा, तो डबा सुरु होतो का बघ गं... मी त्या उंदरावर क्लिक केलं की तो भलतीकडेच काहीतरी उचापत करतो" हे तू कोणाला सांगशील म्हणून मी हैराण झाले होते. त्याबाबतीत मात्र तुला शब्द मिळत नसत, नि मला मात्र नेमकं कळे तुला काय म्हणायचंय ते!

नाशकात गेल्यावर हा थोडा त्रास झाला, पण मग तू नसायची सवय केली मीच. "मी तुझ्यापेक्षा जास्त प्रॅक्टिकल विचार करते" हा माझाच माज. न सावरून सांगते कुणाला!

पुढे मग सुटीत भेटणं वगैरे...एव्हाना तुझं MA सुद्धा होत आलं होतं! मधेच तुला एखादं "स्थळ" आलं की मी अस्वस्थ होई. थोडी पझेसिव्ह झाले होतेच मी. पण मग तोही वेडेपणा गेलाच माझा.

कधीकधी वाटे, कशाला वागायचं शहाण्यासारखं! जरा वेडपट असलेलं बरं असतं... उगीच कोणी भलभलत्या "वेव्हारिक" वगैरे अपेक्षा ठेवत नाही मग आपल्याकडून. आपण वेड्या होतो म्हणूनच तर जमलं नै आपलं!

अख्खाच्या अख्खा ग्रंथच वहीच उतरवून घ्यायचा झाला तर..वि. वा. शंकर अभ्यंकरांचे भक्तिकोश कधी मुखोद्ग्त करता आले तर.."कर्मण्येवाधिकारस्ते.." हा श्लोक पर्त्यक्षात(मुदामच हाच शब्द वापरायचा) कधी आणता येईल..
'आर्यांचे मूलस्थान' या पुस्तकात 'आर्य' नि 'द्रविड' हेच दोन मुख्य प्रकार दिसतात, मग कब्रा, कोब्रा नि देब्रा आले कसे हा पडलेला मजेदार प्रश्न! दिवाळीला देवदर्शन आपण एकत्र न जाता आपापलं करायचो, नि आल्यावर, "बाळे, फुगा आणलास का स्वतःसाठी" अस तुझा मला फोन...

भेळीचा कागद वाचताना एखादं सुभाषित असेल तर त्यावर तुझं काहीतरी म्हणणं...मग गाडी ट्रॅक सोडून भलतीकडेच जाणार. हल्ली खल्वायनवाले कोणालाही बोलावतात गाणं गायला पाडव्याला इथपासून आजोबांच्या घराचा केअरटेकर सध्या गावी गेलाय इथपर्यंत काहीही असे त्यात!

चुकुनमाकून माझ्या अभ्यासाचा विषय निघालाच, तर "काय ते नीट करत्येस ना! मला काय, रेडिओ नीट चालल्याशी कारण..." (कारण मी electronics and telecom वाली, आणि तुला तेवढंच लक्षात ठेवायचं होतं मुद्दाम!) एवढं बोलून तू मला दुसर्‍या विषयाकडे वळवायचीस.
मग, संत तुकाराम सिनेमात खरी भाव खाते ती आवली. आपण रडतो ते तिच्यासाठी, हे तत्त्वज्ञान तू मला सांगणं, नि ते चक्क मला पटणं! सुधीर फडक्यांची गाणी दुसर्‍या कोणी गायली की तुझ्या चेहर्‍यावरची ठळक आठी. मंगूअण्णांचं (आपले पाडगावकर गं..माझा शब्द म्हणून विसरली नाहीस ना?) "नक्षत्रांचे देणे" काकूने आणलं तेव्हा त्या अद्भुत यंत्रात (हेच नाव जास्त योग्य आहे त्या संगणकाला) तिला ती सीडी घालून देणं..."आई, मला यायला जरा वेळ लागेल." असा मी तुझ्या घरातून निघायच्या वेळी फोन करणं...मग दाराशी चालणारी आपली स्टँडींग मीटिंग..
तू कधी मला सोडायला दाराच्या पुढे यायची नाहीस, नि एकदा तुझा धाकटा लाडोबा आला तेव्हा खालपर्यंत आली होतीस...मग मी वैतागणं नि तू आणि त्याने माझी चेष्टा करणं..

तू मला एकदा पत्रातून "बटाट्याचा रावसाहेब" ही भन्नाट रेसिपी दिली होतीस. मी हॉस्टेलात आहे ही माहिती असूनही रेसिपी का दिलीस ते मला कळत नव्हतं. मी पत्र वाचून फक्त घडी करून ठेवून दिलं. कहर म्हणजे तू ते बेबी प्रिंट्च्या कागदावर लिहिलं होतंस, "तू छोटी ना, म्हनून चित्लं चित्लं अशलेला कागद" हे अस्संच बोबडं लिहिलं होतंस त्यात! मग ती रेसिपी देताना तुझी हीच अक्कल कुठे गेली होती हा प्रश्न मी पत्रातच घडी करून ठेवला होता. माझं ५ महिन्यांनी असलेलं धाकटेपण मात्र मी खूप मिरवलं!

यथावकाश आपली शिक्षणं उरकत होती. तुझ्या लग्नात मीच करवली! दागिने घेताना काकांनी मला फोन करून बोलावलं होतं तेही भारीच होतं.
जिजू जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा ती भेट पहिली न वाटावी एवढे ते छान मिक्स झाले होते आपल्या सगळ्यांमधे. अजूनही ते आपल्या या मैत्रीवरून चकित होतात का गं?

"यथा काष्ठं च काष्ठं च..." हे अगदी पटतं मला. नाहीतर आज एवढी आठवण कशाला आली असती मला तुझी! थोड्या वेळापूर्वी कणीस खात होते भाजून आणि कळ उठली मनात...वाटलं लिहावं हे सगळं. भेटावं तुला. निदान पत्रातून तरी. तुला वाटेल, शेवटी मी पत्र गुंडाळलंय. पण काय करू! सगळं शब्दांत मांडता यायला मी म्हणजे तू नव्हेस ना!

असो! ही भेट आवडली का नक्की कळव.
तुझ्या उत्तराची वाट बघू ना?

-प्रज्ञा.
*****************************************************

तळटीपः माझ्या सखीला स्वतःचं नाव आहे, पण ते इथे मुद्दाम दिलं नाहिये. ती माझ्यासाठी "सखी"च आहे. त्यामुळे अर्थातच वर लिहिलेलं काहीही काल्पनिक नाही. Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान लिहिलं आहेस. मैत्रिणीला वाढदिवसाची भेट म्हणून एकत्र घालवलेल्या क्षणांच्या आठवांचा खजिना ही कल्पना पण मस्त.

Pages