पुरी

Submitted by क्ष... on 28 April, 2011 - 17:16

पुर्‍या मऊ होतात, कडक होतात, तेलकट होतात, फुगत नाहीत इत्यादी चर्चा इथे करू.

पाणीपुरी, दही-बटाटा-शेव-पुरी वगैरे सगळ्या पुर्‍या इथेच!!

जुन्या मायबोलीवरची पुर्‍यांची चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93035.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची | 7 March, 2009 - 20:04

वा मस्त बाफ आहे हा. आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी आईला फोन करायची गरज नाही. स्मित
तर माझा प्रश्न असा आहे की, गेल्या दोन वेळेला माझ्या पुर्‍या बिघडल्या. तेलकट्ट झाल्या. काही वेळा कडक पापड झाल्या. काय चुकले असेल? पुर्‍या किंवा इतर तळणीच्या पदार्थांसाठी तेल कितपत गरम करावे? आणि आंच मंद ठेवावी की मध्यम? आणि पुर्‍या लाटताना जाड लाटाव्यात की पोळीसारख्या पातळ?

मनःस्विनी | 7 March, 2009 - 22:16

पुर्‍याचे पिठ कधी पण घट्ट भिजवावे. तेल घालू नये त्यात भिजवताना. नुसत्या कणकेच्या केल्या तरी तेलकट होत नाहीत पुर्‍या. हवा असेल तर मैदा नाहीतर रवा घालावा एक वेगळी चव असते रवा घतलेल्या पुर्‍यात. १ वाटी कणीक + चार चमचे रवा + मीठ +साखर असे किंवा १ वाटी कणीक + पाव वाटी मैदा + २ लहान चमचे कच्चे तेल + मीठ + एक चिमटी साखर्(सीक्रेट आहे ते माझे स्मित). मैदा जर घातलाच तर तेल घालावे.
रवा घातला तर नीट मळून घ्यावे. पातळ खूप लाटल्या तर पापड होतात. तेल एकदम कडक नाही पण एखादी छोटीशी गोळी टाकून पहावी जर अंदाजे मिनीटाच्या आत वर आली तर तेल योग्य आहे. पुरी टाकताना आच आधी जरा मोठी करावी मग कमी ठेवावी. पुरीची एक बाजू फुलली की पलटावी. लहान कढईत ज्यास्त पुर्‍या नी कमी तापलेले तेल ह्यानेपण पुर्‍या तेलकट होतात. स्मित

हूश्श! निबंध लिवलाय मी इथं 'पुरीवर' स्मित

मानुषी | 7 March, 2009 - 22:11

प्राची
नीट सांगते पहिल्यापासून.
कणकेत थोडं तेल,मीठ घाल. पाणी घालून अगदी घट्ट मळून घे. (फूड प्रोसेसरमधील कणकेच्या पुर्‍या फारच उत्तम होतात. ) या घट्ट कणकेच्या छोट्या गोळ्या कर. त्या मध्यम आकाराच्या लाट .....खरं म्हणजे तो गोळा कडेकडेने लाटायचा. म्हणजे ती पुरी मध्ये किंचित जाड व कडेने पातळ होते. मग ती हमखस फुगते. तर आता तेल तापवायला ठेव. तेल चांगले कडकडीत तापले म्हणजे पुरी तेलात सोड. थोडा झार्‍याने मध्यभागी दाब दे...जेणेकरून पुरी तेलात पूर्ण बुडेल. मग ती लगेच फुगेल. फुगल्यावर अर्ध्या सेकंदानंतर ती उलटव. उलटवल्यावर मात्र एक/दोन सेकंद तेलात राहू द्यावी. म्हणजे खालून चांगली तळली जाईल. (हे टायमिंग.. करून करून अंदाजानेच जमते) . नंतर झार्‍याने हळूच बाहेर काढावी. पुरी एकदा तेलात टाकल्यावर एकदाच उलटावी. म्हणजे ती खालून छान खर्पूस व वरून मऊ रहाते. आपला स्पीड खूप असेल तर गॅस बारीक करण्याची गरज नाही. कारण जर आच कमी पडली तर पुर्‍या फुगणार नाहीत. पण जर लाटण्याचा स्पीड कमी पडत असेल तर अधून मधून गॅस बारीक करावा. पण अगदी ऐन पुरी तेलात सोडण्याच्या वेळी आच भरपूर आहे ही खात्री करून घ्यावी. जर पुर्‍या करताना मदतीला कुणी नसेल तर सगळे गोळे आधीच करून घ्यावे. मगच लाटायला घ्यावे.
करून पहा...............!

सिंडरेला | 7 March, 2009 - 22:13

हो, पुर्‍याची कणीक घट्ट भिजवावी. तसेच भिजवताना पाव चमचा साखर घालावी असे मला आईने सांगितले होते. कारण आठवत नाही. तेल चांगले तापले असेल तर पुरी तेलात सोडल्याक्षणी टम्म फुगुन वर येते. कधी कधी तर कडा कच्च्या राहतात की काय असे वाटते. फार जाड नाही आणि फार पातळ नाही अशी एकसरखी पारी लाटावी. आणि हो, पुरीवर झार्‍याने तेल टाक, १० वेळा उलटुन बघ वगैरे खेळत बसायचे नाही फिदीफिदी

मेधा | 7 March, 2009 - 22:14

पुरीचे पीठ भिजवताना कणकेत थोडा बारीक (गव्हाचा रवा) घालून, त्यावर थोडे कडकडीत तेल ओतावे व थंड पाण्याने पीठ घट्ट भिजवावे. भिजवलेले पीठ थोडावेळ तसेच ठेवून परत एकदा चांगले मळून घ्यावे.
पुर्‍या लाटताना पिठी किंवा कणीक लावू नये. पोळपाटाला थोडे थोडे तेल लावून पुर्‍या लाटाव्यात.
पुरी तेलात टाकल्यावर त्यावर झार्‍यानेच थोडे तेल घालावे व पुरी हलकेच तेलात बुडेल असे करावे. मग उलटून दुसर्‍या बाजूने पण तळून घ्यावी. पहिल्यांदा तेलात टाकल्यावर जी खालची बाजू असेल ती मऊ व जाडसर अन वरची बाजू पातळ पण कुरकुरीत व्हायला पाहिजे.

me_surabhee | 8 March, 2009 - 01:01

थॅन्क्यू दिनेश. हे सोप्पे वाटत आहे, शिवाय वाया जाणार नाही. नक्की करुन बघीन.

पुरी लाटायला 'पुरी प्रेस मशीन' एकदम बेस्ट... भराभर होतात, कुणी मदतीला नसेल तरी चालत.

श्रुती | 8 March, 2009 - 03:42

लालु झक्कास बाफ! पन्ना मी पण हिरव्या चटणीचे क्युबस् ठेवते. खोबर्‍याबद्दल अश्विनी म्हणते तसंच मीपण करते, फक्त डब्यात खोबरं ठेवतांना छोटे छोटे भाग थोड्या अंतरावर ठेवते. त्यामुळे काढुन वापरायला सोपं जातं. वापरण्याआधी बाहेर काढुन ठेवायला क्वचित विसरले तर चक्क २० सेकंद (हाय) माइक्रोवेवमध्ये ठेवते.

दिनेशदा | 8 March, 2009 - 03:47

पूर्‍या लाटायला एखादा मदतीचा हात असेल तर जास्त चांगले. मोठी चपाती लाटून वाटीने त्याच्या पुर्‍या कापायची जुनी पद्धत होती, पण त्याने पुर्‍या नीट होत नसत. पुरी नीट होण्यासाठी मधे किंचीत जाड व कडेने पातळ असावी. पण हा जरा वरचा टप्पा झाला. उत्तर भारतात बहुतांशी मैद्याच्याच पुर्‍या असतात, तसेच त्याना त्या थोड्या तेलकटच आवडतात.
मस्कतमधे स्थानिक लोकांची पुर्‍या करायची वेगळीच रित आहे. तेलावर मोठी पोळी लाटुन त्याचे ते चार त्रिकोणी तूकडे कापतात. आणि ते तसेच तळतात. या पुर्‍या त्रिकोणी होत असल्या तरी भराभर होतात. खमंग लागतात.

मी मागे एकदा लिहिला होता, तरी परत एका मराठी सिनेमातला शरद तळवलकर आणि रत्नमाला ( या म्हणजे दादा कोंडके यांच्या आये, त्या प्रत्यक्षात फार सुगरण होत्या. भाकर्‍या फार उत्तम करत असे दुर्गाबाईनी लिहून ठेवले आहे ) यांचा प्रसंग लिहितोय.
बाई पुर्‍या करत असतात आणि शरद खात असतात. बाई म्हणतात, कधीच्या पुर्‍या करतेय, तर ताटात फक्त चारच पुर्‍या. ते म्हणतात, चव बघत होतो. त्या म्हणतात, आता प्रत्येक पुरीची चव वेगळी का असणार आहे, तर ते म्हणतात, तेच तर बघत होतो.

मृण्मयी | 8 March, 2009 - 08:10

'पुर्‍या तेलकट होऊ नयेत म्हणून मोठ्या आचेवर, कढत तेलात तळणं हा एकमेव उपाय' इती सुगरण आजी.

प्राची | 9 March, 2009 - 05:04

धन्यवाद. मृण, आईने पण हेच सांगितले.
भजी, वडे, करंज्या तळताना आंच कमी ठेवायची ना? आमच्याकडे तळण खूप कमी होते, त्यामुळे करायची वेळ आली की मी गडबडते.स्मित

श्रुती | 9 March, 2009 - 05:21

चकल्या, शंकरपाळयांसाठी पण आच कमी ठेवायची. पहिल्यांदा करत होते. पहिला घाणा शंकरपाळ्याचा पाहता पाहता तपकिरी आणि सगळे शंकरपाळे कढईतुन काढेपर्यंत आणखी ढुस्स काळा रंग झाला होता.

दिनेशदा | 9 March, 2009 - 15:00

पदार्थ तळताना, पदार्थातील पाण्याचे प्रमाण किती आहे, यावर उष्णता किती द्यायची ते ठरवायचे असते. गुलाबजाममधे पाणी जवळपास नसतेच, त्यामूळे ते मंद आचेवर तळायचे. शंकरपाळे, करंज्याचे पण तसेच. पण बटाटावडा वा भजी यासारख्या पदार्थ तळताना, उष्णता जास्त लागते. कारण त्यात पाणी जास्त असते.
ज्या पिठात साखर असते, त्या पदार्थाना सोनेरी रंग येण्यासाठी पण आच मंद असावी लागते.
ओले पदार्थ तेलात टाकले कि तेलाचे तपमान एकदम कमी होते, म्हणून त्याचा घाणा पण कढईच्या मानानेच ठरवायचा.

लाजो | 9 March, 2009 - 18:03

पूरी पूराणात अजुन भर..

पूरी थोड्या गार पाण्यातच भिजवावी. मी अर्ध फ्रिज मधल गार पाणी आणि रूमटेंप्रेचरचं पाणी घालुन पीठ भिजवते.

भिजवलेलं पीठं थोडा तेलाचा हात लावून १५ मिनीटं झाकुन ठेवावं.

टम्म फुगलेली पूरी तळून बाहेर काढल्यावर वरच्या पातळ पापुद्र्याला हलहेच छोटं छिद्र पाडायचं (टूथपीक/उदबत्तीची काडी), त्यामुळे आतली वाफ बाहेर पडून पुरी छान लुसलुशीत रहाते. रवा घातलेली पूरी असेल तर त्याचा फुगीरपणा ही टिकुन रहातो.

भान | 12 October, 2009 - 08:25

पाणिपूरीची पूरी मऊ पडते.
मी रवा आणि मैदा एकत्र करुन पूरी करते.काय चुकलं असेल? आणि सोडा घालायचा का?

अमृता | 13 October, 2009 - 10:08

मी पाणीपुरीच्या पुर्‍या फक्त रव्याच्या करते. मागे एकदा एका गुजराथी काकुंनी शिकवलेल्या.
रवा कणिक भिजवतो तसा मीठ टाकुन भिजवायचा नंतर ओल्या रुमालात बांधुन २ तास ठेउन द्यायचा. २ तासांनंतर खुप घट्ट झाल असेल तर थोड पाणी लाउन परत मळुन घ्यायच आणि छोटे गोळे करुन अगदी पाटळ लाटुन पुर्‍या तळायच्या. मस्त फुगतात आणि कुरकुरीत होतात. मैदा, सोडा काही झंझट नाहि.

भान | 13 October, 2009 - 12:16

मी पहिल्यांदा केलेल्या फक्त रवा वापरुन्,मस्त झालेल्या.पण दुसरयांदा करायला गेले तर मऊ पडल्या.मग त्यात मैदा मिसळला तरीपण मऊच झाल्या अरेरे
पुन्हा हयावेळि अम्रुताने सांगितल्याप्रमाणे करेन.

आर्च | 13 October, 2009 - 12:21

पाणिपुरीचं पीठ प्यायच्या सोड्यात भिजवायचं.

अमया | 13 October, 2009 - 13:37

अमृता, तु रवा भिजवतांना तेल घातलेस का? आपण जसे कणकेत घालतो तसे..? की तेल न घालताच भिजवतेस रवा?

आर्च सोडा वॉटर मधे रवा फक्त की रवा +कणीक / मैदा घालायचा?

मनःस्विनी | 13 October, 2009 - 14:28

खरे तर कमर्शियल पुरी बनवताना सोडा वॉटर घालून पिठ दाबून मारून ठेवायचे असते. आई सुद्धा अशीच करायची पुर्वी(पण तळणी बंद तेव्हा होत नाही आता).
नुसता रवाच घ्यायचा असतो. मिठ तरी टाकायची नाही. कणीकेने नरम पडतात.

रवा घे धूवून, त्यात एक चिमुट साखर टाक, हवे असेल तर टाक मिठ काहि वाईट नाही. मग सोडा बाटली फोडली रे फोडली की ओत त्यात सोडा व रवा दाब. मग झाकून ठेव.

अमृता | 14 October, 2009 - 07:17

amayach, तेल नाही घालत अजिबात. मिठ घालते फक्त आणि पाणी. त्या काकु मिठ घालत नसत त्यांना वाटयच पुर्‍या मउ होतिल. मी पण पहिल्यांदा मिठ न घालता केल्या पण नुसत्या खायला मजा येत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी मिठ घातल. छान कुरकुरित होतात.
पुर्‍या पातळ लाटणे आवश्यक आहे. जाड लाटल्या गेल्या तर मउ पडतात.
prady | 30 May, 2010 - 23:03

मला जरा पुर्‍यांबद्दल फारच बेसिक प्रश्न पडलाय. मी एकतर तळण म्हणून पुर्‍यांच्या वाटेला जात नाही. पण आज काहीतरी वेगळं म्हणून श्रीखंड पूरीचा बेत केला. थोडक्यात काय तर सवय नाहीये. माझ्या पुर्‍या छान फुगल्या होत्या पण व्यवस्थीत निथळून पण तेलकट वाटत होत्या. काय कारण असावं? मी पीठ भिजवताना मीठ, साखर आणी गार तेलाचं मोहन घातलं होतं. मोहन घालायला नको होतं का? की गरम तेलाचं मोहन घालावं ? की अजून काही वेगळं कारण असावं?

दिनेशदा | 31 May, 2010 - 04:14

पुर्‍यात थोडे मोहन लागतेच, पण तेलकट होण्याचे ते कारण नाही. पूर्‍या टोपलीत पेपर टाकून त्यावर काढत असत. किचन टॉवेलवर पण काढतात. याने थोडा तेलकटपणा कमी होतो. पण पूर्णपणे जात नाही.
उत्तर भारतात अश्याच पुर्‍या आवडिने खाल्ल्या जातात.
गोव्यात मात्र पुर्‍या चक्क नॅपकीनमधे पिळून खाताना मी बघितले आहे.
राजगिर्‍याच्या पिठाच्या पुर्‍या जरा कमी तेलकट होतात.
श्रीखंडाबरोबर, गवसण्या किंवा पिठपोळ्या हा कमी तेलकट पर्याय आहे.

मंजूडी | 31 May, 2010 - 04:33

प्राडी, मोहन जास्त झालं कणकेत आणि कणिक सैल भिजवली गेली असल्याची शक्यता आहेच.
पु-यांसाठी कणिक अगदी घट्ट भिजवावी लागते आणि मोहन अगदी धूर येईपर्यंत गरम करायचं आणि पिठात घालायचं.

भरत मयेकर | 31 May, 2010 - 05:13

पुर्‍या तळण्यापूर्वी १०-१५ मिनिटे फ्रीज मधे ठेवल्या तर तेल कमी पितात असे वाचले होते. माझा तळण्याशी संबंध नाही, त्यामुळे स्वानुभव नाही.

prady | 31 May, 2010 - 19:46

धन्यवाद सगळ्यांना. पीठ छान घट्ट भिजवलं होतं. कदाचित गार तेलाचं मोहन हेच कारण असावं. पुढच्या वेळी गरम तेल घालून बघेन. फ्रीजचा प्रयोग करायला पण हरकत नाही.

सायो | 31 May, 2010 - 19:49

मोहन हा शब्द फक्त गरम तेलाकरताच वापरतात ना? (गार तेलाकरता नाही माझ्यामते) अ ओ, आता काय करायचं

पियापेटी | 27 April, 2011 - 02:11

पुरी खुपच तेलकट होत असेल तर काय करु????

दिनेशदा | 27 April, 2011 - 05:17

पियापेटी, पुरी नीट तळली जात नाहि बहुतेक. पुरी टम्म फुगून तरंगायला लागली आणि बुडबुड्यांचे प्रमाण कमी झाले म्हणजे त्यातले बहुतेक तेल बाहेर पडले असे समजायचे. मग ती झार्‍यावर घेऊन जरा वेळ तेलाबाहेर काढून खालीवर करायची. (आमच्याकडे दुसर्‍या पुर्‍या तेलात सोडेपर्यंत, तो झारा कढईवरच ठेवतात ) मग एखाद्या स्वच्छ कागदावर काढतात आणि मग ताटात.
पण तरी पुरी थंड झाली कि जरा तेलकटच होते. उत्तर प्रदेशात जरा तेलकटच पुर्‍या आवडीने खाल्ल्या जातात.
पुरीचे पिठ घट्ट भिजवावे लागते. ते सैल झाले तरी पुर्‍या तेलकट होतील.

आर्च | 27 April, 2011 - 05:45

कणीक तेल न घालता भिजवली तर पुर्‍या तेलकट होत नाहीत.

प्राजक्ता | 27 April, 2011 - 06:00

तेल नीट तापले नसेल तरी पुर्‍या तेलकट होतात आणि घट्ट कणीक भिजवणे मस्ट.

सिंडरेला | 27 April, 2011 - 07:56

कडकडीत मोहन घालून घट्ट कणिक भिजवायची आणि तेल चांगले तापवून पुर्‍या तळायच्या (असे सल्ले ह्यापूर्वी येऊन गेले आहेत).

अवल | 27 April, 2011 - 21:44

पुर्‍यांची कणिक घट्ट भिजवताना त्यात २/४ चमचे बेसन घालावे, १ चमचा साखर घालावी. पुर्‍यांना रंगही छान चकचकीत सोनेरी येतो अन त्या तेलकटही होत नाहीत. तेल छान तापलेकीच पुरी तेलात सोडावी .

केनयात, सेल्फ रेझिंग फ्लोअरच्या पुर्‍या करायची पद्धत आहे. या थोड्या जाड लाटाव्या लागतात (भिजवताना थोडी कोथिंबीर घालतात.) जाड लाटल्यामुळे कमी खाल्ल्या जातात (म्हणजे तळणार्‍या व्यक्तीला थोडा त्रास कमी. ) या साधारण छोल्याबरोबर किंवा आमरसा सोबत खातात. आणि तेलकट होत नाहीत.

हे काम बाकी मस्त झाले. तेच तेच प्रश्न आणि तिच ती उत्तरे लिहिण्यापेक्षा लोकांना इथे पाठवलेले बरे. मुख्य बीबी (पाकृ पाहिजे) च्या डोक्यावर दुवे चिकटवले तर बरे होईल.

साध्या पुर्‍यांची कणिक भिजवताना जशी घट्ट भिजवणे आवश्यक आहे तसे त्यात थोडे (१/२ कि.पिठाच्या पुर्‍या करायच्या असतील तर त्यात १०० मिली - अर्धे पाणी प्यायचे भांडे) दूध घालावे म्हणजे पुर्‍या जास्त तेलकट होत नाहीत शिवाय खुसखुशीत होतात आणि छान फुगतात.

टाईमपास, फटाफट भटूरे : पिल्सबरीचे आयते मिळणारे बिस्किटांचे गोळे आणावे. एकेक गोळा लाटून कढत तेलात तळावा.

रवा घे धूवून, त्यात एक चिमुट साखर टाक, हवे असेल तर टाक मिठ काहि वाईट नाही. मग सोडा बाटली फोडली रे फोडली की ओत त्यात सोडा व रवा दाब. मग झाकून ठेव.>>>>>>>>>>>रवा कसा धुवायचा?