अंतिम सत्य!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

नुकतेच श्री सत्य साई बाबा यांचे निधन झाले. देव त्यांना सद्गती देवो!

अनेक वाहिन्यांवरून त्याबद्दल आणि एकंदरीत त्यांच्या कारभार, आयुष्याबदल अनेक गोष्टी पुन्हा दाखवल्या गेल्या. त्यांचे अनेक भक्त आहेत देश, विदेशात, अनेक क्षेत्रातील अन अनेक सामाजिक स्तरात देखील. बाबांचे कार्य मोठे आहे, समाजाकरिता त्यांनी खूप काही केले आहे हे प्रत्त्यक्षात पुट्टपर्थीला जाऊन आलेले सांगतात /मानतात. लहानपणापासून बाबांच्या चमत्कार /जादू इ.च्या कथा ऐकून आहे. बु.प्रा. वाद आणि श्रद्धावाद या दोन गटांत यांवरून कायम वाद आहेच. प्रत्येकाची आपापाली कारणे, स्पष्टीकरणे. त्यापासून मी मुळातच दूर आहे- माझा वैयक्तिक स्वभाव म्हणा. पण चमत्कार, गंडे, दोरे, विभूती इ. सर्व मला वैयक्तिक कधीही अपिल झालेले नाही. "जो काही अनुभव आहे" तो वैयक्तिक असतो अन तो स्वतःला पटल्याशी मतलब, हे मी मान्य करतो. "तसा" काही अनुभव सत्यसाईबाबांच्या बाबतीत मला नसल्याने त्याबद्दल कुठलेच भाषण करणे योग्य नाही. एक आहे- लाखो लोकांच्या सेवा, शिक्षण, आरोग्य यासाठी सुविधा अन पैसा ऊपलब्ध करून देणार्‍या बाबांचे "देवपण" व्यावहारिक अर्थाने निश्चित मान्य केले तरी मग ते सिद्ध करायला कुठल्याही चमत्कार/जादू इ. ची गरज खुद्द बाबांनाही उरत नाही. तसे करण्यामागे त्यांचा हेतू काय होता या एका साशंकतेमुळेदेखील मी "त्या" वाटेला गेलो नाही असे मला वाटते. अर्थात यात "अनुभवाविण ज्ञान व्यर्थ आहे" याचा दोष माझा आहे.

पण क्रिकेटचा देव आणि आमचा सर्वांचा लाडका सचिनदेखील बाबांच्या अंतिम दर्शनाला उपस्थित राहिला आणि त्याने त्याचा वैयक्तिक शोक/दु:ख प्रकट केले ही एक बाब कायम स्मरणात राहील. सचिनदेखील शोकमग्न झाला हे पुरेसे आहे. (अर्थात तोही माणूस आहे, त्याला भावना आहेत). एरवी एखाद्या बाबा, बुवा, वा महाराजांनी दिलेली बॅट वापरली म्हणून मी आजवर यशस्वी होत आलो, असे म्हणणारा सचिन नाही. दगडाला लाथ मारून पाणी काढण्याची क्षमता अन प्रयत्न/जिद्द त्याच्याकडे आहे हे त्याने सिद्ध केले आहे. पण असा कर्म/ कर्तृत्व/ प्रयत्न यांवर विश्वास ठेवणारा आजच्या पिढीचा आदर्शदेखील जेव्हा अशा प्रकारे काही वैयक्तिक गोष्टी उघड करतो तेव्हा आयुष्यात "श्रद्धा" याचे स्थान मह्त्वाचे आहे हे मान्य करावे लागते. सचिन प्रमाणेच इतरही प्रथितयश, सुशिक्षीत वगैरे अनेक लोक सत्य साई बाबांचे आशीर्वाद घेत असत हेही ऐकून आहे. तेव्हा थोडक्यात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे.

माझ्यापुरते बोलायचे तर श्री सत्यसाई बाबांनादेखील जीवन-मरणाच्या शेवटच्या संघर्षात, आय.सी.यू. मध्ये ठेवून तज्ञ डॉक्टरांचे ऊपचार घ्यावे लागले हे एक अंतिम सत्य आहे! जन्म घेतलेल्या प्रत्येक प्राणीमात्राला मृत्यू अटळ आहे, व्यावहारीक संघर्ष सर्वांना अटळ आहे, मग ही एक बाब स्वीकारून मनाने या व्यावहारीक चक्रातून मुक्त झालेला मनुष्य अधिक समाधानाचे, परीपूर्ण, आनंददायी असे आयुष्य जगत असेल काय? प्रयत्न, श्रद्धा, दैव, देव, वगैरे अनेक संकल्पनांचे चवितचर्वण केल्यावर शिल्लक काय रहाते- आयुष्य कसे जगलो, आणि मृत्यूनंतर मागे काय शिल्लक राहिले? कुठे जन्म घेऊ आणि कधी मरण येणार हे माहीत नाही- अंतिम सत्य जर इतके स्वच्छ आणि कटू असेल तर निदान एका आयुष्यात आपल्या बरोबर इतर चार जणांचे कल्याण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले तर ते आयुष्य "सार्थकी" लागले! त्या अर्थाने आपले चांगले कर्म हेच आपल्या हयातीत अन आपल्या पश्चात असलेली आपली लाईफ इंश्युरंस पॉलिसी आहे असे म्हणावे लागेल. सोन्याची तुला, सिंहासने, इत्यादी रत्नजडीत श्रद्धांचा सोन्याचा बाजार मांडणारे आपण "सोन्यासारखी" माणसे कधी होणार आणि मिळवणार? सत्य साई बाबांच्या जीवन आलेखातून हा संदेश प्रामुख्याने पुढे आला तरी समाधान होईल.

"जन पळभर म्हणतील हाय हाय.. मी जाता राहील कार्य काय..."

रच्याकने: श्री सत्त्य साई बाबा यांचे मूळ नाव काय आणि त्यांना ही उपाधी/पदवी कशी मिळाली यावर कुणी प्रकाश टाकू शकेल काय?

(शुध्दलेखन सहाय्यः शैलजा)

विषय: 
प्रकार: 

गेलेल्यांविषयी काय बोलणार , देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो ( नाहीतर परत जन्म घ्यायचे).
अंतिम सत्य काय तर , "खेळ कुणाला दैवाचा कळला".

माझ्यापुरते बोलायचे तर श्री सत्य साई बाबांना देखिल जीवन-मरणाच्या शेवटच्या संघर्षात, आय.सि.यु. मध्ये ठेवून तज्ञ डॉक्टरांचे ऊपचार घ्यावे लागले हे एक अंतिम सत्य आहे! जन्म घेतलेल्या प्रत्त्येक प्राणीमात्राला मृत्त्यू अटळ आहे, व्यावहारीक संघर्ष सर्वांना अटळ आहे,<< हेच अंतिम सत्य योग
माझ्या बाबांचे काही मित्र अं.नि.स.चे कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितलेली फॅक्ट पूर्वी सत्य साईबाबा (अजून फारसे नाव नव्हते झाले त्यांचे) hmt ची घड्याळे काढत हातातून !! त्यावर माझ्या बाबांच्या मित्रांनी आम्हाला hmt नको swiss companyचे घड्याळ द्या ना हो बाबा म्हणत त्यांच्या पायावर लोळण घेतले तर त्यांच्या अनुयायांनी मित्रांना ओढत बाहेर नेले..
थोडेसे अवांतर :- आपल्याकडे तथाकथित हिंदु संघटना ख्रिश्चन मिशनरीज ना "सामाजिक काम करतात पण गरीबांना ख्रिस्ती धर्म स्वीकारायला लावतात " अशी बोंबाबोंब करताना दिसतात मग या बाबांनी काय केले? लोकांना चमत्कार दाखवून त्यांच्याकडून पैसा मिळवला ना? निदान मिशनरीज सेवा तरी मोफत करतात उअलटे पैसे मागत नाहीत ...हेही एक अंतिम सत्यच !!!
रच्याकने सत्य साईबाबांनी ते २०२२ साली मरणार असल्याचे सांगितले होते आणि २०३४ साली ते पुन्हा जन्म (अवतार) घेणार आहेत असेही सांगितले होते ...त्यावेळी तुम्ही कुणाच्या पोटी जन्म घेणार आहात तेही सांगून टाका असे कुणीतरी विचारायला हवे होते .;) Wink

दुसरीतिसरीत असेन तेव्हा सत्य साई बाबांचं नाव पहिल्यांदा ऐकलं. अकोल्याला आमच्या परिचयातल्या एका कुटुंबाच्या घरी ते आले होते. अख्खं गाव त्यांच्या दर्शनाला लोटलं होतं. ज्यांच्या घरी ते आले होते, ते डॉक्टर कुटुंब अतिश्रीमंत होतं. भरपूर जमीन होती. बाबा येऊन गेले आणि काही दिवसांतच त्या डॉक्टरांच्या पत्नीनं आत्महत्या केली. मग हे डॉक्टरही अकोला सोडून पुट्टपर्थीला गेले. तिथला दवाखाना सुरू करण्यात त्यांचा सहभाग होता. तोपर्यंत अकोल्याला त्यांचा भक्तपरिवार बराच वाढला होत. दर रविवारी अनेक लोक एकत्र जमून सत्यसाइ अष्टोत्तरशतनामावलीचं पठण करणं, त्यांची आरती करणं असे प्रकार करत.

आम्ही कोडाईला गेलो तेव्हा सत्य साईबाबांचा मुक्काम तिथे होता. दर उन्हाळ्यात ते तिथे यायचे. मग आम्हीही कुतुहल म्हणून त्यांचा आश्रम पाहायला गेलो. फार गर्दी नव्हती. पाचशे लोक असतील. बाबा समोरून गेले तसं लोकांनी त्यांच्या पायावर लोटांगण वगैरे घातलं. पण आजही लख्ख आठवते ती त्यांची अलिशान बस. त्या बसमधून तेव्हा ते प्रवास करायचे. त्यातला लाल गालिचा, सोफा आणि बाथटब बघून मी चकित झालो होतो. बसमध्ये हे असं काही असू शकतं हे माहीतच नव्हतं.

मग एकदोन वर्षांनी अकोल्यातलं एक कुटुंब त्यांच्या दर्शनाला गेलं असताना बाबांनी त्या कुटुंबताल्या मुलाला एक घड्याळ हवेतून काढून दिलं. ते घड्याळ बघण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली होती. नंतर एकदा ते आमच्या घरी आले तेव्हा त्या मुलाच्या हातात ते घड्याळ होतं. त्यावर एचएमटीचा शिक्का होता.

पुट्टपर्थीला गेलेले ते डॉक्टर 'बाबांच्या आदेशावरून' पाचसहा वर्षांपूर्वी परत आले. मुलानं संबंध तोडले होते. कोट्यवधींची जमीन त्यांनी बाबांच्या नावे करून दिली. आता ते एकटेच नाशिकला एका लहान घरात राहतात. तो प्रचंड मोठा वाडा, त्या बागा सगळं ओसाड झालं आहे. एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं.

योग
आपल्या म्हणन्याशी असहमत असण्याचा प्रश्नच येत नाही. माझी मतं मी नक्कीच निर्भीडपणे ठेवू शकेन..फक्त आत्ता नको इतकंच.. असो. Happy

>>एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं

हम्म्म्म्म व्यावहारीक दृष्ट्या निश्चीत! पण त्या डॉक्टरांचा अनुभव ऐकायला मिळायला हवा.. अर्थात, त्यांनी बर्‍याच गोष्टी जवळून पाहिल्या असतील असे गृहीत धरले तर!

>>माझी मतं मी नक्कीच निर्भीडपणे ठेवू शकेन
जरूर! स्वागत आहे...

अशुद्धलेखन वगळता लेख आवडला. फक्त सचिनविषयी लिहिलेले आवडले नाही. त्याने खाजगी आयुष्यात काय करावे आणि काय नाही याविषयी आपण मतप्रदर्शन करणे योग्य नाही. आणि त्याने स्वत:हून कधीही त्याच्या कुठल्याच भावनांचा, कृतीचा गवगवा केलेला नाही.

दोन दिवसांपासून नवर्‍याशी घरात वाद रंगले आहेत. तो सत्यसाईबाबांच्या गुरूकुलमध्ये शिकला आहे. त्यामुळे लग्न झाल्यापासून त्याला माझे टोमणे ऐकावे लागत आहेत.:फिदी: काश नवर्‍याने प्राथमिक शिक्षण कुठे घ्यावं हेसुद्धा बायकोला ठरवता आलं असतं तर.....
<<मी माझ्या श्रद्धा / अश्रद्धा कुणावर लादणार नाही, कुणाला पटवून द्यायचाही प्रयत्न करणार नाही. आणि कुणाच्या श्रद्धेला धारेवर देखील धरणार नाही.>> अशी माझी कायम इच्छा असते, पण स्पेशली स.सा.बां.च्या बाबतीत माझा हा निश्चय गळून पडायचा / पडतो.
माझा मुख्य आक्षेप त्यांच्या चमत्कारांवर असतो.
मी--" हातातून अंगारा, शिवलिंग काढायची गरज काय ?"

नवरा--" लोकांना आकर्षित करून घ्यायला."

मी--" त्यासाठी हे प्रकार कशाला हवेत ? त्याने अंधश्रद्धा वाढणार."

नवरा--" ज्ञानेश्वरांनी भिंत का चालवली ? पाठीवर मांडे का भाजले ? रेड्याच्या तोंडातून वेद का म्हणवून घेतले ?"

मी--"त्यांना तेव्हाची समाजव्यवस्था बदलायची होती. चांगदेवांचा गर्व उतरवायचा होता. शिवाय समाजप्रबोधन करायला आधी समाज गोळा करायचा होता."

नवरा--" एक्झॅक्टली....स.सा.बां.ना सुद्धा समाज गोळा करून त्यांना चांगली शिकवण द्यायची होती."

मी--" मग एवढ्या ऐषारामात रहायची काय गरज ?"

नवरा--" तिरूपती, दगडूशेठ, शिर्डिसाईबाबा ह्यांना इतकं प्रचंड सोनं,पैसा का देता ? त्यांना काय गरज्?स.सा.बां.ची हॉस्पिटल्स ,शाळा बघितली आहेत का?"

मी--" लोकांकडूनच घेऊन लोकांना देतात. त्यात काय ?"

नवरा--" देतात ना? दाबून तर नाही ठेवत."

मी--" पण तरी ते अंगारा, घड्याळं वगैरे काही पटत नाही."............मी परत पहिल्या मुद्द्यावर. Proud परत-परत तीच चर्चा....निष्फळ !

असाम्या,
शुध्दलेखन सुधारून पुन्हा पोस्ट केला आहे..
अनेक आभारः शैलजा

(पुढील खेपेस शुध्दलेखनाकडे लक्ष देवून लिहीन म्हणतो) Happy

शिर्डिचे साईबाबा,गाडगेबाबा,गजानन महाराज त्यांच्या हयातित कधिही सोन्या-चांदिच्या महालात राहिलेले नाहित.

मी आधीही हे लिहिले होते, परत लिहितो. नायजेरियात लागोसमधे त्यांचा एक मठ आहे. तिथे मला माझा एक मित्र घेऊन गेला. घरातल्या सगळ्या फोटोतून उदी बाहेर पडत होती. म्हणजे प्रत्येक फोटोच्या काचेवर उदीचे थर. (त्यातच म्हणे गणपति, शिवलिंग वगैरे दिसतात.) तीच उदी पुडीत बांधून आम्हाला प्रत्येकाला दिली..

बाहेर आल्यावर माझ्या मित्राची तरुण मुलगी मला म्हणाली. अंकल क्या करे इसका ? शक्कर होती तो खा लेती. बाबाको चमत्कारही करना था, तो घी, शक्कर, चावल, आटा तो निकालते..

दिनेशदा, शेवटच्या वाक्याला जोरदार अनुमोदन.

थोडं अवांतरः
पुलंच्या एका लेखात(एक शून्य मी पुस्तकात, त्याच नावाच्या लेखात) आहे असंच एक वाक्य. तो संपूर्ण लेखच आठवत राहिला मला हे सगळं वरचं वाचताना.

एक उदाहरण देते त्यातलं.
नोबिना देवीला (का अशाच कोणत्यातरी दैवताला) आपल्याला ज्या अवयवाचं दुखणं असेल त्याची प्रतिकृती अर्पण करायची, म्हणजे दुखणं नाहिसं होतं! मग पुल म्हणतात, की "ज्याला मूळव्याध आहे त्याने काय अर्पण करायचं? आणि समजा सगळ्यांनी आपल्या मेंदूची प्रतिकृती अर्पण केली तर सगळ्यांचीच डोकी ठिकाणावर येतील. मग देव-देवस्कीचा धंदाच बंद पडेल की!"
शब्द असेच नसतील त्यात, पण उपरोधाने किती नेमक्या गोष्टीवर बोट ठेवलंय त्यांनी!

नविन येणार्‍या साई-बाबाच्या आवतारा समोर खुप मोठे आव्हान असेल,
आधी त्याला तशीच जादु शिकावी लागेल लिंग, अंगारा, घड्याळं, झालच तर आयपॉड वगैरे काढण्याची. मग ती लोकांसमोर सफाईने सादर करावी लागेल. परत थोडंफार आध्यात्मपण शिकावं लागेल. पाहु कोण पेलतं हे "सांई धनुष्य".

रच्याकाने, "प.पू." स्वामी नित्यांनंद पण उपस्थीत होते म्हणे तेथे.

साईबाबांनी आचार्य धीरेंद्र ब्रह्मचारी, तांत्रिक चंद्रास्वामी यांच्याप्रमाणे आपल्या पोझिशनचा गैरवापर केलाय असं दिसून आलेलं नाही.

ससाबांच्या आश्रमात सहा तरुणांचा ससाबांच्याच उपस्थितीत खून झाला. त्यातल्या चौघांना पोलिसांनी मारले होते. तात्कालीन गृहमंत्री च ससाबांचे भक्त असल्याने हे प्रकरण दाबून टाकण्यात आले.

> फक्त सचिनविषयी लिहिलेले आवडले नाही. त्याने खाजगी आयुष्यात काय करावे आणि काय नाही याविषयी आपण मतप्रदर्शन करणे योग्य नाही.

मंजुडी, त्याने खाजगीत काही केले असते तर तुम्हाआम्हाला न कळते. प्रत्येक पब्लीक फीगर ला स्वतःची प्रतीमा लोकांखातर लोकांच्या दृष्टीने जपायला हवी. म्हणुनच तर पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याकडेही पाहीले जाते. लोकल लेव्हल वर सुद्धा हे खरे असते. काही दिवसांपुर्वी अजयने काही लिहिले तर लगेच त्यावरही प्रतीक्रीया होत्याच ना? सचीनच्या वागण्यामुळे - ते क्रिकेट संबंधी नसले तरी अनेक लोक प्रभावीत होणार, म्हणुन तो जे काही करेल ते सांभाळुन करायला हवे. हा दोष त्याचा नाही, त्याला फॉलॉ करणार्यांचा आहे, समाजाचा आहे. (पुढील भाग जनरल आहे, तुम्हाला उद्देशुन नाही).

हाच समाज हातचलाखी करणार्यांच्याही नादी लागतो.
का? कारण अंतीम सत्य हे मृत्यु नाही तर तथाकथीत मोक्षा आधी असलेल्या तथाकथीत योनी/जन्म, किंवा याच आयुष्यातील चढउतार. ते कुणालाच चुकले नाहीत, ससाबांसारख्या ससाण्याला पण (कोटीबद्दल क्षमस्व, मोह टाळता आला नाही - मोह भल्याभल्यांना टाळता येत नाही, माझी काय कथा?). म्हणुन मग GOD (= GOD Over Djinn (= GOD Over Djinn Over Djinn (=...))) या अमर्याद पायर्या असलेल्या देवरुपी शिडीवर आपल्या वर जो कोणी आहे असे वाटेल त्याच्या पायांवर लोक लोटांगण घालतात. खरे पाहता ती व्यक्ती पण देवापासुन तितकीच दूर असते (कारण पायर्या अनंत आहेत व अनंत उणे एक बरोबर अनंत).

खरा बोध घ्यायला हवा तो म्हणजे आपल्यापेक्षा कोणीही त्या परमेश्वराच्या जास्त जवळ असु शकत नाही हा. काही लोक चांगली कार्ये करतात. त्या करता त्यांना धर्माचा/अध्यात्माचा आधार घ्यावा(च) लागत असेल तर ती आपली समाज म्हणुन हार आहे. ती मानसिकता कशी बदलता येईल हे पहायला हवे. प्रत्येकाने स्वतःपासुन सुरुवात केली तर बरेच काही साध्य होईल.

सचीनच्या वागण्यामुळे - ते क्रिकेट संबंधी नसले तरी अनेक लोक प्रभावीत होणार, म्हणुन तो जे काही करेल ते सांभाळुन करायला हवे. हा दोष त्याचा नाही, त्याला फॉलॉ करणार्यांचा आहे, समाजाचा आहे.>>>

हे पटतंय... पब्लिक फिगर बनल्यावर खाजगीपणावर बंधनं येतात हे खरं.

ज्या ज्या व्यक्तीला असुरक्षितता आणि अनिश्चिततेच्या वातावरणात आपला उदरनिर्वाह करावा लागतो त्यातलेच बरेचसे लोक बाबा / महाराज आदिंच्या मागे लागतात. सुरूवातीला संशय असतो. पण कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं त्यांना काही चांगले अनुभव येतात आणि मग असेच अनुभव येत रहावेत म्हणून मग बाबांना कंटीन्यू केलं जातं..

हळूहळू संपर्क वाढत जातो आणि मग माणूस "आपला" वाटतो, पुढे तो गुरू होतो आणि मग कुणी काही बोललेले ऐकून घेण्याइतपत मजल जाते.

श्रद्धा, धार्मिक भावना यापेक्षा भयगंडातून आलेला मानसशास्त्रीय भागच जास्त असावा असं वाटतं..

>>ज्या ज्या व्यक्तीला असुरक्षितता आणि अनिश्चिततेच्या वातावरणात आपला उदरनिर्वाह करावा लागतो त्यातलेच बरेचसे लोक बाबा / महाराज आदिंच्या मागे लागतात.
>>श्रद्धा, धार्मिक भावना यापेक्षा भयगंडातून आलेला मानसशास्त्रीय भागच जास्त असावा असं वाटतं..

मुळात एखाद्या बाबा बुवा कडे लोक का जातात/आकर्षीत होतात हा एक वेगळाच चर्चेचा विषय होईल आणि त्यातून एकही ठोस कारण/उत्तर सापडणार नाही याची खात्री आहे. यात अगदी सगळे आले पंतप्रधानांपासून ते कारकूनापर्यंत- सर्वांच्याच बाबतीत सारखी परिस्थिती आहे असे थोडेच आहे?

गम्मत अशी आहे की बहुतांशी लोक हे काहीतरी अडलेले काम व्हावे वा वैयक्तीक स्वार्थ/हेतू (आता पंतप्रधानांचे पण काही काम "अडले" असे कुणी म्हणत असेल तर मोठा विनोद होईल!) म्हणून जातात असे गृहित धरले तर मग एकंदरीत या "बाजाराचा" दोष दोघांनाही लागतो. थोडक्यात चिरीमिरी घेवून सरकारी कार्यालयात तुमचे काम करून देणारा व दक्षिणा, पैसा, ई. च्या मोबदल्यात (ट्रस्ट स्थापन करणे हे त्या मोबदल्याचे कायदेशीर "पांढरे" स्वरूप आहे एव्हडच, त्या पलिकडे काही नाही.) तुमच्या काही अडी अडचणींची वासलात लावणारे बाबा, बुवा, ई. मला सारखेच वाटतात. आणि आपल्याकडे एकदा "नाव" झाले की त्याचा "ब्रँड" व्हायला वेळ लागत नाही. पुढे मग पब्लिक फिगर म्हणून असणारे लोकही त्यात सामिल झाले की ब्रँड इक्विटी जोरात वाढते.

>>फक्त सचिनविषयी लिहिलेले आवडले नाही. त्याने खाजगी आयुष्यात काय करावे आणि काय नाही याविषयी आपण मतप्रदर्शन करणे योग्य नाही.
>>म्हणुन तो जे काही करेल ते सांभाळुन करायला हवे. हा दोष त्याचा नाही, त्याला फॉलॉ करणार्यांचा आहे, समाजाचा आहे.

मुद्दा बरोबर आहे. पण माझ्या लेखात सचिन चा उल्लेख वैयक्तीक कारणाने वा त्याला फॉलो करण्याच्या दृष्टीने केलेला नाही. नीट वाचलेत तर लक्षात येईल की आयुष्यातील "श्रध्दा" याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी तो उल्लेख केला आहे. सचिन हा माझ्या दृष्टीने कर्मयोगी तत्वज्ञानाचा मोठा जिवंत आदर्श आहे. त्याच्याही आयुष्यात ससाबा सारख्या व्यक्तींना मोठे/महत्वाचे स्थान आहे हे पाहून आश्चर्य नाही वाटत तर "श्रध्दा" कुणाला चुकली नाही या विचारावर शिक्कामोर्तब होते. मला वाईट वाटलेच तर एकाच गोष्टीचे वाटेल की त्या साठी तो क्रिकेटचा सामना देखिल रद्द करून जावू शकतो. कारण सचिन हा "खेळातील" देव आहे आणि त्या कर्मभूमीशी तो कधीच प्रतारणा करत नाही (अगदी विश्वचषक मालिके दरम्यान वडीलांचा म्रुत्त्यू झाला तरीही) यावर माझा ठाम विश्वास आहे. खेरीज ससाबां ईतके नसले तरी प्रचंड प्रमाणावर सचिन चे सामाजिक कार्य आहे याची मला पुरेपूर माहिती आहे. त्याची श्रध्दा अन भावना त्याने कधी कुठे कश्या व्यक्त कराव्यात याचा त्याला पुरेपूर अधिकार आहे आणि त्या भावनांचा आदर ठेवणे हे मला महत्वाचे वाटते.

तेव्हा, सचिन चा उल्लेख हा वैयक्तीक नसून एकंदर श्रध्देच्या अनुशंगाने आपल्या मानसिकतेचे प्रतिबींब आहे असे समजावे.

>>शेवटी कोणीही आपल्या कर्माने ओळखल्या जातो.....
श्यामराव, तसं म्हटलं तर सगळे यच्चयावत रॉबीनहूड हे "देवमाणूस" ठरतील. Happy

सामान्यांनी सामांन्यांच्याच चौकटीत राहूनच "असामान्य" कार्य केले (आमटे, सपकाळ, बंग, सचिन, कामटे, करकरे, आणि ईतर कितीतरी) तर ते "देवत्व"म्हणून कौतुकास पात्र होण्यास पुरेसे असावे असे मला वाटते. त्यासाठी ऊदी, चंदन, घड्याळे, ईत्यादी शुल्लक चीजवस्तूंची अन समाधी, मोक्ष, पुनर्जन्म, ईच्छामरण ईत्यादी मायाबाजार थाटण्याची गरज नाही. मग भले त्या मायाबाजाराचा कुणी ट्रस्ट स्थापला तरी ज्या ट्रस्ट मध्ये ट्रस्ट नाही तो काय कामाचा? Happy
**इती लेखनसीमा***

१) सत्यसाईबाबांनी नुसत्या चमत्कारांनीच लाखो लोकांच्या मनावर पकड मिळवली असेल का? वेगळ्या शब्दांत, त्यांच्या व्यक्तिमत्वात, वागण्यात, सांगण्यात या लोकांना प्रभावित करणारे काही नसेलच का? (कदाचित उच्च पातळीचे हिप्नॉटिझम?)
२) असे चमत्कार करणार्‍या सत्यसाईबाबांनी मग अद्यावत इस्पितळे कशासाठी उभारली असतील? सगळ्या रुग्णांना त्यांनी चमत्कारांनीच का नाही बरे केले? स्वतःही वैद्यकीय उपचार घेतलेच.
३)साईबाबांच्या राहणीशी सत्यसाईबाबांच्या राहणीची तुलना केली गेली आहे. साईबाबांबद्दलच्या आठवणी/गोष्टी म्हणजे त्यांनी केलेल्या चमत्कारांच्या कथाच नाहीत का?
४) सचिन तेंडुलकरने किंवा सोनिया/मनमोहन सिंग/अडवाणी यांच्यासारख्या लोकांनी सत्यसाईबाबांचे अंतिम दर्शन घेऊन लोकांसमोर चुकीचा पायंडा पाडला असे म्हणले गेलेय. भारतात काय अजून तरी जगात कुठेही 'आध्यात्मिक गुरूच्या समोर लीन होणे' ही चुकीची गोष्ट मानली जात नाही.(कोणत्याही विवादांच्या पलीकडला आध्यात्मिक गुरु दिसत नाही हेही खरेच) सचिन तेंडुलकरला 'तो क्षण' खाजगी ठेवणे शक्य होते का? स्वतःच्या खाजगी आयुष्यात त्याने कसे वागावे या अपेक्षा त्याच्यावर लादणे योग्य का?
आपल्या आयुष्यातल्या प्रश्नांना भिडण्यासाठी लागणार्‍या मनःसामर्थ्याचे अनेक बरेवाईट स्त्रोत उपलब्ध आहेत. (प्रत्येकालाच एकाच गोष्टीतून असे सामर्थ्य मिळेलच असे नाही, एका कुणाला सबल करणारी गोष्ट दुसर्‍या कुणाला दुर्बळ करू शकेल). प्रत्येक जण आपल्याला हवा तो स्त्रोत निवडतो. काहींना असा स्त्रोत स्वतःमध्येच गवसतो. पण असे लोक किती?

पण ह्यात बाबांना बोल लावण्यात काय शहाणपणा? त्यांच्या प्रभावापुढे आपणच आपल्या अकलेचे दिवाळे काढल्याचे शाबित होईल.
बाबांनी नुसत्या शेळपट बिनडोक जनतेला फालतू चमत्कार दाखवून फसवलं म्हणावं तर तसही नाही, पट्टीचे राजकारणी, शास्त्रज्ञ, शेषन सारखी हार्वर्ड शिकलेली लोकं, देशाचे चालक, पालक आणि मालक सगळेच झापडं लाऊन नतमस्तक उभे मग बाकीच्या करंट्यांनी ह्यांच्या कानीकपाळी 'भोंदू-फेक-बुवाबाजी' ओरडून ऐकणार कोण?

पण आपल्याला बुवा फार नवल वाटतं जे आडातंच नाही ते पोहर्‍यात आहे हे धादांत दाखवायचं आणि तेही
करोडो बुद्धीजीवी लोकांना इतपत पटवून द्यायचं की त्यांचा मेंदू वाळवीने पोखरला तरी वाळवीची रांग बाबा म्हणत पुन्हा नतमस्तक? हे असे जमवणे खायचे काम नोहे बाजीराव.
मला तर खरंच अतिशय कौतुक वाटतं बाबांचं ह्या गोष्टीसाठी. आपल्या सारख्या क्षूद्र लोकांना चार नातेसंबंध नीट सांभाळता येत नाही आणि हा माणूस करोडो लोकांना हवेत बोटं फिरवून नाचायला लावतो.

अध्यात्मिक गुरू म्हणे!! भारतातल्या बहुतांशी लोकांना अजून नीट मूल्यशिक्षण , नागरिक म्हणून असणारी कर्तव्ये , कुटुंबाच्या उद्याच्या पालनपोषणासाठी सरल मार्गाने पण बुद्धी वापरून द्रव्यार्जन कसे करावे, व्यसनं करू नयेत ह्या साध्या गोष्टींचं ज्ञान नाही आणि तरी ह्यांची नेमकी अध्यात्मिक ज्ञानाचीच भूक भागत नाही. कमाल आहे आपल्याला तर काही कळत नाही.

जाऊद्या आपण म्हणायचं प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात त्याच्या लायकीप्रमाणेच (ह्याला नशीबही म्हणतात बहूधा) सगळं मिळतं..

सकाळमध्ये हे वाचलं.

आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथील प्रशांती नीलयम आश्रमात आध्यात्मिक गुरू सत्यसाईबाबांचा भव्य संगमरवरी पुतळा उभारण्याचा खर्च मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उचलणार आहे. या कामासाठी त्याने आश्रमाला तीस लाख रुपये देऊ केले आहेत. बाबांच्या पुतळ्याला सोन्याचा मुलामाही तो चढवून देणार आहे.

आश्रमातील साई कुलवंत सभागृहात बाबा ज्या ठिकाणी हजारो भाविकांना नियमित दर्शन देत, त्याच जागेवर हा पुतळा उभारला जाणार आहे. ही जागा बाबांच्या समाधीस्थळाला लागूनच आहे. सत्यसाईभक्त सचिनने देऊ केलेली देणगी स्वीकारण्याबाबतचा निर्णय "सत्यसाई सेंट्रल ट्रस्ट' लवकरच घेणार आहे. एका अनिवासी भारतीयानेही आश्रमात बाबांचा सोन्याचा पुतळा उभारण्याची तयारी दाखविली आहे. >>

ज्या देशात मुलं भुकेली झोपत आहेत. लोकांना खायला अन्न, रहायला घर, आणि अंगावर कपडे नाहीत त्या देशात पुतळे उभारणं आणि सोन्याचे पुतळे उभारणं म्हणजे लाजिरवाणं, तिडिस येणार वाटत. Sad

>>आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथील प्रशांती नीलयम आश्रमात आध्यात्मिक गुरू सत्यसाईबाबांचा भव्य संगमरवरी पुतळा उभारण्याचा खर्च मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उचलणार आहे. या कामासाठी त्याने आश्रमाला तीस लाख रुपये देऊ केले आहेत. बाबांच्या पुतळ्याला सोन्याचा मुलामाही तो चढवून देणार आहे.
दुर्दैवी.......... Sad

(४०० करोडोची मालमत्ता असलेल्या ट्रस्ट ला या मदतीची गरज नक्कीच नाही. सचिन ने वैयक्तीक भावना/आदर पोटी दिले असतील हरकत नाही. व्यवहार त्या दोघांच्यात आहे. हरकत नाही.. पण या मागचा ऊद्देश आणि यातून दिला जाणारा संदेश काय आहे? लोकमांन्यांनी गणेश स्थापने नंतर शेवटी "विसर्जन"का ठेवले? गणेशोत्सव नेमका ईथेच वेगळा वाटतो. "विसर्जन" यातून आपण काहीच शिकत नाही का? )

ही बातमी खरी असेल तर पुन्हा सचिन विरुध्ध ऊगाच नव्या वादाला तोंड फुटेल असे वाटते....

>>>ज्या देशात मुलं भुकेली झोपत आहेत. लोकांना खायला अन्न, रहायला घर, आणि अंगावर कपडे नाहीत त्या देशात पुतळे उभारणं आणि सोन्याचे पुतळे उभारणं म्हणजे लाजिरवाणं, तिडिस येणार वा>>><<

१००% अनुमोदन.

आधीच भारतात बुवाबाजी, बाबागिरी प्रकार चालतात. आता आणखी प्रभावित होवून गरीब जनता कोणा दुसर्‍या भोंदू बाबाला बळी पडू शकतात व बाबागिरीचे स्तोम वाढू शकते.

व्यक्तिगत जीवनात 'हिरो' ने काय करावे/नाही करावे ह्याचा हक्क कुणाला नसला तरी हिरोला आपण अनुसरण करतोच कुठेतरी.

आर्च ला अनुमोदन !
आणि त्या यशस्वी 'भारतरत्न' बीबी वर जी काही चर्चा चालु होती , ती दोन्ही कडून बन्द होयला हे पुरेसं होतं.
अता पुढे मागे स्पोर्ट्स कॅटॅगरी झालीच तरीही सचिन च्या अशा प्रकारच्या इमेज मुळे भारतरत्न म्हणून विचार होउ नये असं माझं मत.

मला पडलेला प्रश्णः

हिंदू फिलॉसॉफीप्रमाणे माणसाला जेंव्हा मोक्ष मिळतो तेंव्हा तो जन्म मरणाच्या फेर्‍यातून बाहेर पडतो.

मग सत्यसाईबाबा हे साईबाबांचा अवतार आहेत असं जे म्हणतात त्यांच्यामते साईबाबांना मोक्ष मिळाला नाही का?

तसच वरती कोणीतरी लिहिलं आहे की सत्यसाईबाबा ६ वर्षांनी परत येणार आहेत मग त्यांनापण मोक्ष मिळाला नाही असं म्हणायच आहे का?

चमन, अनुमोदन.
मलाही खुप आश्चर्य वाटतं की इतके शिकलेले लोकं कसे काय हे सगळं मान्य करुन पाया पडायला जातात. दुर्दैवाने चांगलं शिक्षण घेऊन लोकांच्या देव, धर्माविषयीच्या कल्पना फारशा बदलत नाहीत किंवा सुधारत नाहीत असच म्हणावं लागेल.
घेतील ना जन्म, घेतील काय घेतला असेल सुद्धा. एकदा खुप चांगले कम्युनिकेशन स्किल्स आणि भरपूर luck असलेल्या मुलाला हा मार्ग सापडला की लगेच सत्य साई बाबा जन्म घेतील.

"sai baba on ventilator " ही बातमीच एकदम वीचीत्र वाटली वाचायला. Happy

जगण्याची एवढी धडपड / मोह, संत पणाचे लक्षण नव्हे. बाकी त्यांनी केलेले लोकपयोगी काम नक्कीच उत्तम आहे.

पण मग इतर गोष्टींचा आश्रय का घ्यावा लागला त्यांना, हे कोडे काही उलगडत नाही. तिथे जाउन आलेली लोक एकदम भारवुन वगैरे जातात असे बघितले आहे. माझा काही अजुन योग आला नाही.

Pages