ऊर्जेचे अंतरंग-०४: रासायनिक ऊर्जा

Submitted by नरेंद्र गोळे on 21 April, 2011 - 01:21

पदभ्रामकांना अंधार पडताच काळजी लागते ती सरपणाची. कारण जिथे रात्र काढायची तिथे उजेड पाहिजे, इंधन पाहिजे. ती गरज भागते सरपणाने. खेड्यातल्या लोकांचा अर्धा वेळ पाणी आणि सरपण गोळा करण्यातच खर्च होतो. सर्व प्रकारच्या सरपणांमध्ये ज्या प्रकारची ऊर्जा असते तिला 'रासायनिक' ऊर्जा म्हणतात. कारण हे, की पदार्थांच्या रासायनिक स्थित्यंतरांतून त्या ऊर्जेचे विमोचन होत असते.

पालापाचोळा, काटेकुटे, झाडझाडोरा, लाकूडफाटा, शेण्या-गोवर्‍या इत्यादी सर्व प्रकारच्या जंगलातून मिळणार्‍या सरपणास जाळल्यावर विस्तव मिळतो ज्याचा उपयोग उजेडासाठी, उष्णतेसाठी करता येतो. खाली उरते राख आणि हवेत जाते ते कर्व-द्वि-प्राणिलाचे वायूप्रदूषण.

जळाऊ लाकडाचे अर्धज्वलन करून तयार होतो लाकडी कोळसा. कोळशाच्या खाणींतून मिळतो दगडी कोळसा. तेल विहिरींतून मिळते मातीचे तेल (पेट्रोलियम). समुद्रातून नैसर्गिक वायूही मिळत असतो. अनेक वनस्पतींपासून वनस्पती तेलही मिळते. हे सारे पदार्थ अथवा कापरासारखे घन पदार्थ जाळूनही ऊर्जा प्राप्त करता येते. ही सारीच ऊर्जा 'रासायनिक' असते. मात्र फरक असतो तो प्रत्येक इंधनाच्या ऊर्जाघनतेत, उपलब्धतेत, आनुषंगिक प्रदूषण प्रकारांत आणि त्यासाठी वेचाव्या लागणार्‍या खर्चातही.

सगळ्या इंधनांमध्ये सर्वात ऊर्जासघन इंधन म्हणजे उद्‌जनवायू (हायड्रोजन). अर्थात तो सगळ्यांत महागही असतो. मात्र तो जळल्यावर उरते ते फक्त पाणी. जे वाफ होऊन उडून जाते. आणि वाफेला प्रदूषण मानण्याची प्रथा नाही. वस्तुतः: हवेतील वाफेचे प्रमाण, जे सापेक्ष आर्द्रतेमध्ये मोजले जाते, ते जास्त असल्यास घाम खूप येतो, चिकट वाटते म्हणून अतिरिक्त वाफेसही प्रदूषण मानावे ह्या मताचा मी आहे. असो. उद्जनऊर्जाही 'रासायनिक' च म्हणायला हवी.

ऊर्जेसाठी वापरल्या जाणार्‍या पदार्थांचे इतर वापरही असतात. उदाहरणार्थ मातीच्या तेलाचा उपयोग सोडियम धातूच्या साठवणासाठी होतो. चमचम चमकता सोडियम धातू पाण्यावर तरंगतो. पण पाण्यावर अथवा पाण्यासोबत किंवा आर्द्र हवेसोबतही अतिशय झपाट्याने अभिक्रिया करतो. त्या अभिक्रियेतून खूप ऊर्जा बाहेर पडते. त्यामुळे साध्या हवेतही आर्द्रतेशी आवेगाने संयुक्त होऊन फुलझडीसारखा पेटू शकतो. म्हणून त्याला मातीच्या तेलात ठेवतात. अर्थात ह्या उपयोगासाठी फारशी मागणी असत नाही.

लाकडाचे वासे, फाटे, तुळया, स्तंभ, ओलत्या, दारे, खिडक्या, शिड्या, पहाड इत्यादी इमारतीसाठीचे; मेज, चौपाया, खुर्च्या, बाकडी, दिवाण, बाजा, खाटा, कपाटे, फडताळे, हडपे, मोढे, पाट, चौरंग, घडवंच्या, मांडण्या, पलंग इत्यादी बैठकीच्या सामानासाठीचे; रव्या, पोळपाट-लाटणी, धुपाटणी, काठ्या इत्यादी घरकामाचे; धनुष्यबाण, भाले, तिरकमठे युद्धाकरताचे; तसेच बैलगाड्या, छकडे, रेंग्या, धमण्या प्रवासाचे; आणि नांगर, वखर, औत, रहाट इत्यादी शेतकी उपयोग; जळणाच्या उपयोगापेक्षा लाकडाला जास्त भाव देतात.

उद्‌जनवायूसुद्धा मोठ्या वाफचक्क्यांच्या फिरत्या भागांना निववण्यासाठी वापरल्या जातो. तसाच तो रासायनिकदृष्ट्या उत्तम क्षपणक (रिड्यूसिंग एजंट) असल्याने प्रयोगशाळांतूनही वापरल्या जातो. हे उपयोगही तुल्यबल भाव देतात. नैसर्गिक वायू; दुचाकी, चारचाकी वाहनचालनासाठीचे महत्त्वाचे, मितप्रदूषक इंधन; म्हणूनही वापरला जातो आणि तोच वापर जास्त मूल्यप्रभावी (सक्षमखर्ची-कॉस्ट इफेक्टीव्ह) ठरतो.

ह्यावरून हे लक्षात आलेच असेल की सरपण/इंधन पदार्थांचे इतर उपयोग ऊर्जावापराशी स्पर्धा करतात आणि ऊर्जावापरासाठी मूल्यप्रभावी ठरणारी इंधनेच काय ती ऊर्जेचा स्त्रोत म्हणून पुढे राहतात. इथे हे लक्षात ठेवायला हवे की दगडी कोळसा, मातीचे तेल, नैसर्गिक वायू हे ऊर्जास्त्रोत पुनर्नविनिकरणक्षम नाहीत तर लाकूड निरंतर येणार्‍या प्रारण ऊर्जेवर अवलंबून असल्याने पुनर्नविनिकरणक्षम आहे.

उद्‌जनवायू पृथ्वीच्या निर्मितीसोबत जेवढा काही घडलेला आहे त्यात फारसे फेरफार करणे शक्य नसते.
.
http://urjasval.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users