राहुल देशपांडे

Submitted by भावना on 29 April, 2006 - 19:28

- तुम्हाला आजोबांचा सहवास किती लाभला? काही आठवणी असतील तर ऐकायला आवडतील.

राहुल देशपांडे: मी साडेतीन वर्षाचा असताना आजोबा गेले, पण मला आठवणी म्हणजे काही अंधूक आठवणी आहेत. आई, बाबा, आज़ी सगळे सांगतात त्याच्यामुळे आहेत. एकदा मी खेळण्यातल्या घोडागाडीवर बसलो होतो. मला किशोरी आमोणकरांची 'सहेला रे' ही भूपची रेकॉर्ड खूप आवडायची, मी ती लावायला सांगायचो वडिलांना. तर ती रेकॉर्ड लागली की मला झोप लागायची, मग माझे बाबा ती बंद करायचे. ती बंद झाली की मी लगेच उठायचो आणि परत लावायला सांगायचो. ते आजोबांनी बघितलं आणि ते म्हणाले, "बापू, (माझ्या वडिलांना बापू म्हणतात) तू ते बंद करू नकोस, त्याला झोप लागत नाहीये, त्याला तंद्री लागतीये सुरांची. किशोरीसारखा एवढा सच्चा आणि चांगला सूर आहे, त्याची त्याला तंद्री लागते आहे याचा अर्थ हा पुढे जाऊन माझी गादी चालवणार." ती एक आठवण आहे. त्यांना खूप इच्छा होती, खूप आत्मविश्वास होता की मी नक्की गाईन. एवढीच एक आठवण आहे.

RahulDeshpande.jpg- हे तुम्हाला आईवडिलांनी सांगितलेले. पण असं काही तुम्हाला आठवतय का, की तुम्ही आजोबांच्या मांडीवर बसला आहात, बोलता आहात?

राहूल देशपांडे: मला आठवतं. काही काही गोष्टी आठवतात. आमच्याकडे दादा, म्हणजे विजय कोपरकर, जे आता खूप मोठे गायक झाले आहेत, ते शिकायला यायचे. ते शिकायला आले की मी आधी जाऊन पेटी वाजवायचो आणि गायचो. ते झालं की आजोबा म्हणायचे, "आता तू आत जा, आता मी दादाला शिकवतो."

- आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की तुम्हाला आजोबा खूप कमी मिळाले, पण तरीही तुमचं गाणं त्यांच्यासारखे खूप आहे, ते कसे काय?

राहूल देशपांडे: आजोबांसारखं माझं गाणं कसं आहे ते मला थोडं विस्तृतपणे सांगावं लागेल. त्याचा पण एक छोटा किस्सा आहे. सहा वर्षाचा होतो तेव्हा मी गाणं शिकायला लागलो. आजोबांनी सांगितलं होतं की राहूलला पिंपळखरे बुवांकडे पाठवा, म्हणुन माझे वडील मला घेऊन गेले त्यांच्याकडे. पण मला अजिबात गाण्याची आवड नव्हती. मला तबला खूप आवडायचा अगदी लहानपणापासून. मी तेव्हा तबल्याच्या क्लासलाही जायचो. पण झालं असं की, आमच्या स्कूलमधे क्लासटीचर होत्या, त्यांनी आई वडिलांना बोलावून सांगितलं की हा शाळेमधे वर्गात बाकावर तबला वाजवत बसतो, सगळी मुलं त्याच्या भोवती गोळा होतात. क्लासला खूप डिस्टर्ब होतं, तर तुम्ही याचा तबला सोडून द्या, डिसकंटिन्यु करा. म्हणून माझा तबला सुटला. पण माझे वडील मला नेटाने गाण्याच्या क्लासला न्यायचे. मी तिथे गायला बसायचो. मी बघत बसायचो पाच मिनिटं झाली, दहा मिनिटं झाली, इतकी आवड नव्हती मला. एक दोन वर्षं गाणं सुटलं माझं. कुमारकाका, कुमार गंधर्व १९९२ साली गेले. ते गेल्यानंतर त्यांच्या भजनाची, निर्गुणी भजनाची कसेट आणली होती. आमच्या घरचे सगळे माझ्या आजोबांसकट कुमारमय कुमारभक्त. त्यांचं गाणं ऐकून मी जे काय वेडा झालो, की ती सगळी भजनं मी दिवसरात्र बसून ऐकली, ऐकून ऐकून ती बसवली. कुमारजींच्या पहिल्या पुण्यतिथीला गायलो. तिथे माझं पहिलं गाणं झालं. तेव्हा भाईकाका म्हणजे पु.ल. देशपांडे, आमच्या घरी यायचे. कुठे कुठपर्यंत आलाय असं बघायला यायचे. तर तसे ते एकदा आले होते, आणि मी सगळ्या कुमारजींच्या चीजा म्हणल्या. त्यांना भयंकर आवडल्या. माझी आई म्हणली, "काका, हा कुमारकाकांसारखा गातो, ठीक आहे, आम्हाला आवडतं. पण मला असं वाटतं याने बाबांसारखं गायला पाहिजे." माझ्या आईला बाबांचं खूप होतं. भाईकाका हसले आणि म्हणाले, "तो आत्ता गातोय कुमार, तू दोन वर्षं थांब त्याचा आवाज फुटू दे, तो बरोबर वसंताकडे येईल." आणि माझा आवाज फुटल्यानंतर सगळ्यांना ते जाणवतं की माझा आवाज आजोबांच्या जवळ गेला. त्याच्यामुळे मी काहीही गायलं तरी वसंतराव गातात असंच वाटतं.

- तुम्हाला आजोबांची गाणी लोकं गायला सांगतात, त्यामुळे जास्त लोकांना ते वाटत राहतं, का तुम्ही इतर कोणाची गाणी गायलीत तरी तसेच वाटेल? आजोबा सर्वांना एवढे माहीत आहेत, त्यामुळे लोक तुम्हाला त्यांची गाणी म्हणायला सांगतात. आणि मग आम्ही तुमच्याकडे त्याच नजरेने बघतो, असं होतं का?

राहूल देशपांडे: तसं जास्त होतं. तसं जरी असलं तरी माझ्या आवाजाची जात अगदी आजोबांसारखी आहे. त्यांचा जरा जास्त नाकात होता आवाज.माझा तेवढा नाहीये. पण खूप आजोबांसारखा आहे. कुमारजींचं वगैरे गायलो तर त्यांची छाप दिसते माझ्या गाण्यावर. आणि मी मुकुलकाकाकडे (कुमारकाकांचा मुलगा) शिकतो त्याच्यामुळे अजून जास्त दिसते. पण ते असतानाही कुठेतरी असं वाटतं की मी वसंतराव आहे म्हणून.

- तुम्ही कधी ठरवलं की गाणं हाच व्यवसाय करायचा?

राहूल देशपांडे: लहानपणापासून मला इच्छा होती की सी. ए. व्हायचं, म्हणून कॉमर्सला गेलो. बारावी झाल्यानंतर आमच्या इथे फ़ाऊंडेशनची परीक्षा असते ती दिली, त्याच्यानंतर एक वर्षं ऑफ़िसला गेलो, आर्टिकलशीप केली. हे सगळं चालू असतानाही भाईकाका अतिशय महत्वाचे होते या सगळ्या प्रवासामधे. त्यांची ऐंशी वर्षे झाली तेव्हा पुलोत्सव केला होता. त्यांचा जन्म आठ नोव्हेंबरचा आणि सात नोव्हेंबरला माझं पुलोत्सवला गाणं होतं. त्या दिवशी माझे सी. ए. चे पेपर होते. तो पेपर संपवून मी ते गाणं केलं. दुसर्‍या दिवशी आठ नोव्हेंबरला भाईकाकांचा वाढदिवस म्हणून आम्ही सगळेजण काकांच्या घरी गेलो होतो अभिनंदन करायला. ते खूप थकले होते. ते मला म्हणाले, "तू एवढा बारीक का झाला आहेस? असा ओढल्यासारखा, असा रोड का दिसतो आहेस?" मी म्हणालो, "मी सी. ए. करतोय, मला अभ्यास करायला लागतो. सकाळी सहाला क्लास असतो, मग ऑफ़िस असतं, मग परत संध्याकाळी क्लास असतो. मग गाण्याचा रियाज कमी होतो, होतच नाही." ते म्हणाले, "अरे तू स्टेशनवरून घरी येतोस तेव्हा तुला सी. ए., वकील, आर्किटेक्ट, डॉक्टर अशा किती पाट्या दिसतात?" मी म्हणालो, "बर्‍याच दिसतात." तर ते म्हणले, "गवयाच्या किती दिसल्या?" मी म्हणालो, "नाही गवयाच्या कसल्या, काय बोलताय काका?" ते म्हणाले, "तुला तुझ्या घराच्या बाहेर गवयाची पाटी लावायची आहे. तुला गाणं करायचं आहे." तर ते माझ्या फार डोक्यामधे बसलं. माझे वडील आणि आई दोघेही होते माझ्याबरोबर. मला सुनिताकाकू म्हणाली, "तु कानात काहीतरी गा भाईच्या." मी म्हणालो, "काय गाऊ?" ती म्हणाली, "काल जे काही गायला असशील, वसंताचं काहीतरी गा." मी 'बिंदिया ले गई' ही आजोबांची ठुमरी काकांच्या कानात थोडी गुणगुणली. आणि काका ढसाढसा रडायला लागले. सुनिताकाकूला त्यांनी सांगितलं, "एक कागद घेऊन ये." ती घेऊन आली, ते म्हणाले, "तू मला तुझी सही करून दे." मी म्हणालो, "काय काका?" ते म्हणाले, "तू मला इथे तुझी सही करून दे."

- तर तो टर्निंग पॉईंट ठरला?

राहूल देशपांडे: तो टर्निंग पॉईंट ठरला. मलाही असं वाटायला लागलं की दोन्हीला इन्जस्टिस होतो आहे, अभ्यास पण आणि गाणं पण. मी आई वडिलांना, आजीला सांगितलं, मी दोन्ही करू शकतो. मी तुमच्यावर सोडतो काय करायचं ते, सी. ए. का गाणं. आई वडिलांनी लगेच सांगितलं की आमचीही इच्छा आहे, काकांचीही इच्छा आहे, आजोबांचीही इच्छा होती की तू गावंस, तर तू गाणंच कर.

- शाळा, कॉलेज सांभाळुन गाण्याच रियाज़ सांभाळण्याची कसरत कशी केली?

राहूल देशपांडे: मी तसा गाण्याचा रियाज फार असा नाही केला. दोन तास रोज करायचो. तेवढा वेळ मिळतो. बाकी खेळाला पण वेळ होता तेव्हा. मित्रांशी गप्पा मारायला पण चिक्कार वेळ होता.

- तुम्हाला आजोबांच्या नावाचा दबाव वाटतो का? आपली सारखी आजोबांशी तुलना करतात असं वाटतं का?

राहूल देशपांडे: दोन गोष्टी होतात. मला एक आनंद होतो की वसंतरावांनंतर त्यांच्यासारखा गाणारा कोणी नाहीये. त्यांची गायकी गाणारे खूप कमी लोक आहेत. पण माझं गाणं ऐकून जर लोकांना वसंतरावांची आठवण होत असेल तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या थ्रू हे होतंय. माझ्यासाठी पर्सनली, माझं गाणं झालं की लोक येतात, गाणं छान झालं, क्या बात है, असं सांगतात. त्यांना एक शॉक बसलेला जाणवतो. माझ्याकडे बघून असं वाटत नाही. धिस हॅपनस ऑल द टाईम! माझ्याकडे बघितल्यानंतर, आय ऍम अंडरएस्टीमेटेड अ लॉट ऑफ टाईम्स. खरंच होतं असं. हे सगळे लोक स्तुती करतात वगैरे ठीक आहे. पण हे सगळं संपून जेव्हा मी घरी जातो आणि आजोबांचं गाणं ऐकतो, तेव्हा परत जमिनीवर येतो. ते माझं फार होतं, काकांचं आणि आजोबांचं गाणं ऐकल्यानंतर लगेच जाणवतं, की राहूल, आपल्याला काहीही येत नाहीये. आपल्याला खूप काही शिकायचंय.

- आजोबा खूप मोठे कलाकार होते हे सर्वांकडुन खूपदा ऐकले आहे, पण अशी कुठली चीज, बंदिश, गाण्याचा प्रकार आहे का, की ते ऐकल्यावर त्यांचा थोरपणा तुम्हाला गायक म्हणून जास्त प्रकर्षाने जाणवतो?

राहूल देशपांडे: असं वाटतं की नाट्यसंगीतासाठी सगळ्यांनी त्यांना मानलं, कारण कट्यार काळजात घुसली खूप प्रसिद्ध झालं. त्याच्यापेक्षा ते खूप मोठे शास्त्रीय संगीताचे गायक होते. हे लोकांच्या पुढे फारसं आलं नाही. तर ते लोकांमधे खूप उशीरा आले. पण काही अगदी थोडी लोकं होती, ज्याच्यामधे आमचे भाई काका होते, ज्यांनी त्यांना खूप आधी ओळखलं. अप्रतिम शास्त्रीय गायचे ते, गझल गायचे. इतकं की बेगम अख्तरसारख्या इतक्या महान कलाकारही आजोबांना 'गुरुजी' म्हणायच्या. आजोबांचे खूपसे पैलू लोकांसमोर आलेच नाहीत.

- मग ते तुम्ही आता पुढे आणायचा प्रयत्न करणार आहात?

राहूल देशपांडे: निश्चित.

- आजोबांच्या गाण्यातला कुठला असा विशेष प्रकार आहे की जो तुम्हाला दाखवायचा आहे, लोकांसमोर आणायचाच आहे?

राहूल देशपांडे: सध्या गझलचे खूप कार्यक्रम इथे आल्यावर करायला लागलो. म्हणजे झालं असं, थोडं विषयांतर होईल पण सांगतो. आत्ता इथे आल्यानंतर काही पाकिस्तानी लोकं आहेत डॅलसला. त्यांना माझी सीडी ऐकायली दिली होती. त्यांचं म्हणणं पडलं की शब्दावर अजून काम करायला पाहिजे. मला वाटतं ती ३-४ वर्षांपूर्वीची सीडी होती. तर मी त्यांच्यासाठी एक कार्यक्रम केला. फक्त चारच लोक होते. माझी गझल ऐकल्यावर त्यांना खूप आवडली ती. ते म्हणाले की अशी गझल खूप वर्षांनी ऐकली आम्ही. आता तेच लोक खटपट करून डॅलसला माझा गझलचा कार्यक्रम करताहेत. तर हे गझल काय, ठुमरी काय, दादरा काय, आजोबांचं प्रचंड प्रभुत्व होतं या सगळ्यांवरती.

- तुम्ही 'नक्षत्राचे देणे' या कार्यक्रमात म्हणलेली गझल मी ऐकली होती. फार सुंदर म्हणली होती.

राहूल देशपांडे: हो. 'सच सच बताना'.

- लहान असताना सर्वात प्रथम जेव्हा स्टेजवर गाणं म्हणाला होता तेव्हा आजींची प्रतिक्रिया काय होती? जरी लहानपणी आजोबांनी म्हणलं असेल की पुढे गाणार, मोठा होणार, तरी ते प्रत्यक्ष पाहिल्यावर त्यांच्या मनात काय आलं, त्या असं बोलल्या का नंतर कधी?

राहूल देशपांडे: ती सारखीच बोलते. ती म्हणते की, "तू तुझ्या आजोबांपेक्षा मोठा हो, अशी मी रोज देवाला प्रार्थना करते. ते आज हे पाहायला पहिजे होते." तिला फार आनंद होतो मला गाताना पाहून.

- तुम्ही म्हणता त्यापैकी आई-बाबांचा सर्वात आवडीचा गाण्याचा प्रकार कुठला?

राहूल देशपांडे: शास्त्रीय. वडिलांना शास्त्रीय आवडतं, आईला गझला आणि नाट्यगीतं आवडतात, निर्गुणी भजनं आवडतात.

- तुमच्या एखाद्या कार्यक्रमाला आई बाबा येणार असले, तर आई किंवा बाबा असं सांगतात का, की हे गाणं म्हण मला आवडतं, हे म्हणतोस ते लोकांना नक्की खूप आवडतं?

राहूल देशपांडे: आधी आधी व्हायचं माझे वडील सांगायचे मला हे गा, नाट्यगीत तरी म्हण, भजन तरी म्हण, नाहीतर ठुमरी म्हण असं. निर्गुणी भजन मला म्हणायला सांगायचे जास्त. पण आता नाही सांगत. सारखी निर्गुणी भजनंच म्हणायचो, नाट्यगीतं अजीबात म्हणायचो नाही. सुरुवातीला मला नाट्यगीत येत नव्हतं म्हणा, येत नसेल, म्हणुन नाही म्हणायचो मी.

- समवयस्क लोक, कॉलेज, शाळेतले मित्र यांचा तुम्ही शास्त्रीय संगीत गाता हे ऐकुन काय प्रतिसाद असतो?

राहूल देशपांडे: माझे जवळचे जे सगळे मित्र आहेत त्यांच्यापैकी कुणालाच आवडत नाही शास्त्रीय संगीत. त्यामुळे असं असतं, "काय गायलास तू, झालं ना तुझं गाणं, मग आपण काय बोलत होतो तर?" असं असतं. मला आवडतं ते खूप. मला जास्त स्तुती केलेली आवडत नाही. त्यामुळे हे असले मित्र मला जास्त आवडतात. माझ्यासाठी येतात बिचारे गाणं ऐकायला. पण त्यांना कळत नाही, पेशन्स नाही असं वाटतं मला.

- सध्याच्या नवीन पिढीचा शास्त्रीय संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे असे तुम्हाला जाणवते?

राहूल देशपांडे: खूप जागरूकता आलेली आहे. अजूनही मला लोक विचारतात, तुम्हीही मला विचारलंत, तुम्ही गाता पण बाकी काय करता. आता मला अशा प्रश्नांची सवय झाली आहे, पण सुरुवातीला मला असे प्रश्न खूप इंसल्टिंग वाटायचे. तुम्ही पाच वाजता घरी येता कामावरून आणि यु आर डन. आमचं असं नसतं. इट्स अ २४ अवर जॉब फ़ॉर अस. मी असं नाही म्हणत की हा जॉब आहे, वुई लव वॉट वुई डु. मला स्वतःला खूप आनंद त्याच्यामधे मिळतो. मला तो आनंद मिळतो, तेव्हा तो दुसर्‍याला मिळतो. तुम्ही सवाई गंधर्वला गेलात, तर खूप नवीन पिढीचे लोक दिसतात. मी आत्ता सॅन्फ़्रासिस्कोला गेलो होतो, तिथे पाच सहा वर्षांची छोटी मुलं येऊन मला सांगत होती, 'वाटेवर काटे गा,' 'बगळ्यांची माळ फुले गा'. तर हे एवढ्या लहान मुलांकडनं येणं मला फार कौतुकास्पद वाटलं.

- असा कुठला प्रसंग आहे का की जेव्हा त्या ठिकाणी, त्या व्यक्तीकडून दाद मिळाल्यावर आपण काहीतरी मिळवलं असं वाटलं?

राहूल देशपांडे: एकदा माझं गाणं झालं होतं भारत गायन समाजमधे. श्रीराम लागू आले होते. गाणं झाल्यावर त्यांनी येऊन माझं इतकं कौतुक केलं, फुलं दिली. त्यांना खूप आवडलं गाणं आणि त्यांना मुकुलची आठवण झाली.

- गाण्यात काही नवीन प्रयोग करावं असं वाटतं का, चाकोरीबाहेर जाऊन?

राहूल देशपांडे: मी खूप विचार करतोय सध्या त्याच्यावर.

- कुठलाही साथीदार नसताना कधी कार्यक्रम करायची वेळ आली आहे का?

राहूल देशपांडे: पेटीशिवाय मी कार्यक्रम केले आहेत. तबला आणि पेटी दोन्हीशिवाय कार्यक्रम असे नाही केले, नुसतं बसू आपण गायला असं केलंय.

- ज्यांच्या बरोबर कार्यक्रम करताना वेगळीच मजा येते असे काही साथीदार आहेत का?

राहूल देशपांडे: आत्ता मी ज्यांच्या बरोबर आलोय, निखिल फाटक आणि राजीव परांजपे. खूप कार्यक्रम केले आहेत मी त्यांच्या बरोबर. अजून एक आहेत, चैतन्य कुंटे म्हणुन.

- अभिनयाच्या क्षेत्रात उतरला आहात का?

राहूल देशपांडे: मी लहानपणी 'कट्यार काळजात घुसली' मधेच काम करायचो. त्याचे मी साधारण १० वर्षाचा असताना ५० प्रयोग केले. मी दौर्‍यावर गेलो होतो नागपूर, अमरावती, विदर्भाच्या. जेव्हा मी परत आलो अणि माझी जी काही भाषा झाली होती, सगळ्यांना पहिल्या नावाने हाक मारायचो, नाव मोडुन हाक मारायचो. ते आजीनं पहिलं आणि तिनं सांगितलं, "आजपासून नाटक बंद." तेव्हापासून मी नाटकात काम केलं नाही. लोक मला हा प्रश्न नेहेमी विचारतात, "आता आम्हाला परत कट्यार कधी बघायला मिळणार?" अभिनयासाठी मला एकदोन सिरिअलसाठीही विचारलं होतं. पण मला स्वतःला असं वाटतं की मी या गाण्यामधे आत्त्ता कुठे थोडा एस्टॅब्लिश होतो आहे अणि दुसरी गोष्ट म्हणजे नाटक म्हणजे दौरे आले, सगळं शेड्युल वेडंवाकडं असतं. मला त्याची एवढी आवड नाहीये.

- तबला शिकत असताना कधी पुढचा प्रवास तबल्यातच करावा असं वाटून गेलं होतं का?

राहूल देशपांडे: लहानपणापासून तसंच वाटायचं. लहानपणी आधी तबला शिकलो, मग गाणं शिकलो, पण परत तबला नाही शिकलो. मधनंच जर मला हुक्की आली तर तबल्याचा रियाज करायला बसतो.

- पाश्चात्य संगीताबद्दल काय वाटतं?

राहूल देशपांडे: मला जर तुम्ही विचारलंत की तुझ्याकडे कलेक्शन कसलं आहे, तर माझ्याकडे भारतीय शास्त्रीय संगीतापेक्षा पाश्चात्य संगीताचे कलेक्शन जास्त आहे. मला लहानपणापासून ते फार आवडतं. मला लहानपणी मायकल जॅक्सन आवडायचा. मला वेस्टर्न क्लासिकल आवडतं, पण मला पॉप पण खूप आवडतं. आता मुम्बईमधे ब्रायन अडम्स वगैरे आला होता, मी कधीही चुकवत नाही त्याचा शो.

- तुम्ही संगीत दिग्दर्शन करता का?

राहूल देशपांडे: मी डब्ल्यु डब्ल्यु एफ साठी, लहान मुलांसाठी एन्व्हायर्न्मेंट अवेअरनेसबद्दल एक कॅसेट केली होती. शाळांना, शिक्षकांना देण्यासाठी केली होती ती. त्यात मी गायलो होतो आणि संगीत दिग्दर्शनही केले होते.

-तुमचा सर्वात आवडीचा कलाकार कोणता?

राहूल देशपांडे: कुमारजी आणि माझे आजोबा. भीमसेनजी, मल्लिकार्जुन मन्सूर.

-तुमचा आवडीचा राग कोणता?

राहूल देशपांडे: आवडीचा राग असा मला सांगता नाही येत. मला असं वाटतं प्रत्येक स्टेजला आपल्याला एकेक राग आवडतो. आता मी जास्त सध्या काय गातो? दुपारचं असेल तर मधुवंती गातो. रात्रीचं असेल तर सध्या बागेश्री गातो, थोड्या दिवसांपूर्वी मारुबिहाग गायचो. अशा स्टेजेस असतात. पण असा फ़ेवरिट सांगणं खूप अवघड आहे.

- शाळेत आवडीचा विषय कुठला होता?

राहूल देशपांडे: इतिहास आणि गणित आवडायचं मला शाळेत.

- शाळा कुठली? कॉलेज कुठलं?

राहूल देशपांडे: पुण्यातले कर्नाटक हायस्कूल आणि बी. एम. सी. सी. कॉलेज.

- गाणं सोडुन इतर काही छंद आहेत तुमचे?

राहूल देशपांडे: लहानपणी खूप कही करायचो मी. एखादी गोष्ट मी पाहिली तर मला तीच आवडते. पुणे फ़ेस्टिवलमधे शिल्पकलेची कॉंपिटिशन होती. माझं नाव कोणीतरी घातलं त्याच्यामधे. मी गणपती बनवला. मला बक्षीस मिळालं त्याच्यामधे. चित्रकलेच्या परीक्षा दिल्या, मला खूप आवडायचं ड्रॉईंग करायला. अकरावी, बारावी पर्यंत खूप स्केचिंग वगैरे करायचो, आता नाही होत. नंतर माझ्या तंबोर्‍याच्या खोळी खूप ख्रराब झाल्या होत्या, आजोबांच्या वेळच्या होत्या त्या. खूप घट्ट झाल्या होत्या. त्या बसायच्याच नाहीत. मग मी दोन खोळी शिवल्या. स्वैपाक पण खूप केला. केक करण्याचं पुस्तक आणलं होतं, त्याच्यातले सगळे केक करून पाहिले. आजीकडून मोदक करायला शिकलो, मोदक करतो. सगळं करायला फार आवडतं.

- मराठी जेवणातला आवडीचा पदार्थ कुठला?

राहूल देशपांडे: पोळी, वरण भात.

- दौर्‍यावर जाता तेव्हा सगळ्यात जास्त कसली आठवण होते?

राहूल देशपांडे: पुण्यामधे माझं रूटीन फार सेट आहे. सकाळी टेनिस, मग रूपालीचा अड्डा, संध्याकाळी टेकडी. त्यामुळे सगळ्यात जास्त टेनिस आणि रूपाली खूप मिस करतो. इथे काहीच नाही करता येत. माझा ग्रुप पण नाही. इथे बाहेर गेलं की मधेच थंड होतं काय, त्या अर्थानी फार बोरिंग आहे हे.

- मायबोली बद्दल कधी ऐकले होते का?

राहुल देशपांडे: नाही

- खूप खूप धन्यवाद गप्पा मारल्याबद्दल!

Taxonomy upgrade extras: 

Psg

Friday, April 28, 2006 - 1:44 am:

भावना, छान घेतली आहेस मुलाखत. त्यांन्नी पण मनमोकळी उत्तरं दिली आहेत. तुझा काय अनुभव मुलाखतीच्यावेळचा? प्रत्यक्ष गाणं ऐकताना कस वाटल?

Gajanandesai

Friday, April 28, 2006 - 1:51 am:

फारच छान! आवडल्या गप्पा. त्यांचा एखादा फोटो देता येईल का इथे?

Milindaa

Friday, April 28, 2006 - 5:02 am:

छान झाली आहे मुलाखत. अगदी मनमोकळी.

Moodi

Friday, April 28, 2006 - 5:11 am:

खुपच छान झालीय मुलाखत. आता प्रत्यक्ष कार्यक्रमाचा लाभ घ्यायचाय पुण्यात. गजाननला अनुमोदन.

Maitreyee

Friday, April 28, 2006 - 9:10 am:

छान झाली मुलाखत! असं वाटलं, केवढा लकी आहे हा मनुष्य!इतका समृद्ध वारसा आणि एकाहून एक दिग्गजांच्या सहवासात वाढण्याचं भाग्य मिळालं! अर्थात त्यांच्या स्वतच्या गुणवत्तेबद्दल वाद नाहीच.

Ninavi

Friday, April 28, 2006 - 9:31 am:

वा. छान घेतलीस गं मुलाखत भावना. किती चौफेर व्यक्तिमत्व आहे.

Tulip

Friday, April 28, 2006 - 9:36 am:

खूप छान झालीय मुलाखत. अगदी दिलखुलास. आवडली.

Bhavana

Friday, April 28, 2006 - 10:45 am:

मुलाखतीचा अनुभव माझा फारच सुंदर होता. मी हे प्रथमच करत होते. पण त्यांच्या बरोबर बोलताना असे दडपण वाटले नाही. अगदी आपल्या एखाद्या पुण्याहून आलेल्या भावंडासारखं वाटलं. एकदम मोकळा हसरा स्वभाव, जितकं गाण्याने जिंकलं त्यांनी मला, तितकंच गप्पांनी. परत लवकर त्यांचे गाणे ऐकण्याची संधी मिळावी अशी मनापासून इच्छा आहे.

Rachana_barve

Friday, April 28, 2006 - 10:46 am:

भावना मस्तच झाली आहे मुलाखत. ...

Shonoo

Friday, April 28, 2006 - 10:56 am:

भावना
एकदम 'बेष्टच' वाटली मुलाखत. येव्ह्ढ्या लहान वयात संगीता बद्दल फ़ार विचार करून बोलले आहेत असं वाटतं. Idol किंवा करोडपती वाल्यांसारखी उथळ, उठवळ उत्तरे नाहीयेत याचा फार आनंद वाटला.
धन्यवाद

A_b_h_i

Friday, April 28, 2006 - 11:17 am:

छान आणि मनमोकळी मुलाखत भावना!!

Dineshvs

Friday, April 28, 2006 - 11:40 am:

भावना खरेच छान मुलाखत, अर्थात समोरची व्यक्ति पण तितक्याच तोलामोलाची होती.
सी. ए. करण्यासाठी खरेच फार त्याग करावा लागतो. आपल्याकडे असे कल ओळखुन मार्गदर्शन करणारे, भेटणे जरा दुर्मिळच आहेत.

Arch

Friday, April 28, 2006 - 12:05 pm:

भावना, मस्त. तुझे प्रश्ण मला फ़ार आवडले. वारसा असला तरी आजोबांचा सहवास जास्त मिळाला नसताना, तू प्रश्ण फ़ार नेमके विचारलेस. त्यांच व्यक्तिमत्वपण दिलखुलास वाटल बोलण्यावरून.

Hawa_hawai

Friday, April 28, 2006 - 12:45 pm:

छान झाली आहे मुलाखत.

दोन प्रश्न

trivia ठेवण्या मागचा उद्देश नक्की काय आहे?

ही मुलाखत पुब्लिश झाली की त्याची लिन्क ज्यांची मुलाखत घेतली त्यांना पाठवली जाते का?

Lalu

Friday, April 28, 2006 - 2:16 pm:

भावना, छानच झाली आहे मुलाखत. पुढच्याच वीकएन्डला त्यान्चे गाणे प्रत्यक्ष ऐकण्याची संधी आहे.

हवाई, प्रथम trivia ठेवण्यामागे मायबोलीकराना असा काही उपक्रम चालू होतो आहे याबद्दल माहिती देणे आणि त्यांच्यात उत्सुकता निर्माण करणे ( थोडक्यात जाहिरातबाजी ) हा होता. आताही तसाच आहे. व्यक्ती फारशी फेमस नसेल तर त्यांच्याबद्दल लोकानी अगोदरच काही माहिती काढावी ज्यामुळे मुलाखत वाचावीशी वाटेल आणि समजून घेताना बरे पडेल हा अजून एक.

त्याना लिन्क पाठवली जाते. मागची मी पाठवली होती. दांडेकरांनी fund-raiser कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकाना नन्तर पाठवलेल्या पत्रात media events मधे इथले लोकल tv channel आणि maayboli.com चा उल्लेख आहे.

Svsameer

Friday, April 28, 2006 - 2:27 pm:

भावना
संवाद छान झालाय. राहुलने उत्तरं देखील विस्तृतपणे दिली आहेत. लहान वयात एवढं यश मिळवुन देखील अजून बरीच उंची गाठायची आहे याचि त्याला समज आहे हे पाहुन बरं वाटलं.
राहुल देशपांडे, राहुल शर्मा, राकेश चौरसिया, संजीव अभ्यंकर, सावनी शेंडे अशी बरीच तरुण मंडळी या क्षेत्रात यश मिळवताना पाहुन भारतीय अभिजात संगीत आजच्या पाॅप रिमिक्स जमान्यात देखिल लोकाना तेवढच आवडेल याची खात्री वाटते.

Chinnu

Friday, April 28, 2006 - 3:42 pm:

भावना, मुलाखत आवडली ग.

Storvi

Friday, April 28, 2006 - 5:18 pm:

मस्त झाली मुलाखत. मोकळेपणाने बोलले ते.

Ashwini

Saturday, April 29, 2006 - 12:27 am:

भावना, छान झाली मुलाखत. दुसरी कधी येते आहे?

Sakheepriya

Saturday, April 29, 2006 - 3:06 am:

छानच आहे मुलाखत. नेमके प्रश्न आणि मनमोकळी उत्तरं!
लालूने टाकला होता तसा एखादा फोटो टाक ना त्यांचा!

Kandapohe

Saturday, April 29, 2006 - 9:52 pm:

हे सगळे लोक स्तुती करतात वगैरे ठीक आहे. पण हे सगळं संपून जेव्हा मी घरी जातो आणि आजोबांचं गाणं ऐकतो, तेव्हा परत जमिनीवर येतो. >>>>
छानच झाली आहे मुलाखत! लहान वयात एवढी प्रसिद्धी मिळून सुध्दा अजून जमिनीवरच आहे. मस्त वाटले.

Komalrishabh

Sunday, April 30, 2006 - 4:47 pm:

क्या बात है ! मस्त दिलखुलास झाल्यात गप्पा

Upas

Sunday, April 30, 2006 - 10:09 pm:

मुलाखत आवडली.. छान प्रश्न आणि मनमोकळी उत्तरं..
आणि हा एकंदर उपक्रम आवडला.

Aasavaribhave

Friday, May 05, 2006 - 2:19 pm:

Bhavana,
Mulakhat sundar zali ahe..Rahul Deshpande hyancha mukkam ithe kiti ahe ajun..kahi kalpana ahe ka..Atlanta cha program miss zala..ajun east coast la kuthehi asel tari jayala awadel..mazyakade vasantro hyanche nakshatranche dene ahe tyat Rahul la aikale...pan maifil aikayachich ahe..

Bhramar_vihar

Tuesday, May 09, 2006 - 12:45 am:

भावना,एक छान अनुभव आमच्यापर्यंत पोचवल्या बद्दल आभार.

Limbutimbu

Tuesday, May 09, 2006 - 1:11 am:

वाऽऽ! क्या बात है!
मुलाखत छान, व्यक्ती छान, क्षेत्रही छान!
हा नवा उपक्रमही छान!
कदाचित मायबोलीकरता हा उपक्रम म्हणजे एक "माईल स्टोन" ठरेल!

Shonoo

Tuesday, May 09, 2006 - 8:11 am:

रविवारी फिलाडेल्फिया मधे मोहन आणि समिता रानडे ( नीलम ऑडिओ व्हिडिओ फ़ेम) यांच्या घरी राहुल देशपांडेंची मैफ़िल होती.
कुमारांच्या मधुवंती रागामधील बन्दिशी ने सुरुवात केली. त्या नंतर भीमपलासी.( आम्ही पाचवी सहावीत 'भीम पलासी सबको सुनाऊं' म्हणत असू गाण्याच्या तासाला. त्याबद्दल स्वत्:ला काहीतरी कडक शिक्षा करून घेतली पाहिजे.) त्यानी उभा केलेला भीम पलासी वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत.

मग पूरिया धनाश्री आणि नंतर श्रोत्यांची फ़र्माईष. गाण्याची आतषबाजी नुसती. मृगनयना म्हटल्यावर टाळ्या वाजवायचे देखील क्षणभर विसरले सगळे जण. गुलजार नार ही मधे 'तनुलते वर गेंद फुलांचे' या ओळींमधून वीजेसारखी तळपणारी, लतेसारखीच कमनीय ( वेल हो, नाहीतर लता कोण असा भा प्र नको) सुन्दरी डोळयांपुढे उभी केली.

या भवनातील गीत हे गाणे तिथे आलेल्या प्रत्येकाने वसंतरावांच्या आवाजात प्रत्यक्ष एकदातरी आणि रेकॉर्ड स्वरूपात अनेकदा ऐकले असेल. पण राहुलनी त्या गाण्याचं सम्पूर्ण नवं दर्शन घडवलं.

जर मी रामूभैय्या दाते असते तर हातातले सोन्याचे कडे वगैरे त्यांना दिले असते. जर मी गोविन्द बल्लाळ देवल असते तर लगेच एका नवीन संगीत नाटकाची घोषणा केली असती. छ्या! mediocrity किती limiting आहे ते अश्या प्रसंगांनी आणखीन तीव्रपणे जाणवते. मायबोलीकर आणि इतर आप्तेष्टांना कार्यक्रमाचं वर्णन माझ्या परिने भरभरून सांगण्यापेक्षा मी काय करणार?

या शुक्रवारी संध्याकाळी New Brunswick भागात कार्यक्रम आहे. पुढचे वेळापत्रक मला माहीत नाही. कोणाला माहिती असल्यास इथे पोस्ट करावे ही विनंती.

Bhavana

Tuesday, May 09, 2006 - 5:27 pm:

Rahul Deshpande would be singing in New York on this friday, New Jersey on Saturday. Sunday at Seattle.
20 and 21st Orlando, FLorida
Will let you know the rest as and when I have information.

Aasavaribhave

Wednesday, May 10, 2006 - 3:40 pm:

Thanks Bhavana.
I am attending his programme in Orlando.

Shonoo

Thursday, May 11, 2006 - 8:08 am:

It's at the home of Vijay & Vidula Kale in New Brunswick , Friday evening at 8:00 pm

RSVP phone is 201-282-4106. I am not sure I should post his address and directions etc here without his permission.

Ninavi

Thursday, May 11, 2006 - 10:27 am:

धन्यवाद, शोनू, कलंदर. कलंदर, तू येणार आहेस का?

Kalandar77

Thursday, May 11, 2006 - 12:36 pm:

यावेसे वाटत आहे पण बरोबर कोण दर्दी असेल तर बरे... म्हणजे चुकीच्या ठिकाणी दाद जाणार नाही!

बाकी NJ BB वर ठरवु.. वरना मिलिंदा आ जायेगा!

Ninavi

Thursday, May 11, 2006 - 12:49 pm:

मग? तिथे तो येणार नाही असं वाटलं की काय तुला?

Sandyg15