|| राजा रवि वर्मा ||

Submitted by आशूडी on 15 April, 2011 - 02:26

शाळेतून बाहेर पडल्यानंतर बर्‍याच काळानंतर श्री.रणजित देसाईंचं पुस्तक हातात आलं. त्यावेळी अशी ऐतिहासिक पुस्तके वाचून भारावलेल्या दिवसांची आठवण आली आणि या निमित्ताने भारतीय चित्रकलेला नवीन परिमाण देणार्‍या राजा रवि वर्म्याशी ओळख तरी होईल या हेतूने वाचायला घेतले.
इतर कोणत्याही ऐतिहासिक कादंबरीप्रमाणे यातही स्थलकालाच्या खुणा, वैशिष्ट्ये पुरेपूर उमटली आहेत. संस्थानिकाच्या वाड्यात गेलेले रवि वर्म्याचे बालपण,त्यामुळे उपजतच आलेला राजेशाही रुबाब, त्याचा निग्रही स्वभावाची चुणूक, त्याच्या चित्रकलेची सुरुवात इथपासून कादंबरी उलगडत जाते. प्रस्तावनेत देसाईंनी या विषयाचा पाच वर्ष अभ्यास करुन, जाणकारांशी चर्चा करुन ही कादंबरी लिहायला घेतल्याचे नमूद केले आहे. पण प्रत्यक्षात अपेक्षित तपशीलांमध्ये वाचकाची काही अंशी निराशाच होते. याला उपलब्ध असलेली माहिती हा मूळ मुद्दा विचारात घेतला तरी -
"पण जेव्हा एखाद्या कलावंताचे चरित्र आपण लिहायला घेतो, तेव्हा नुसत्या सत्याचाच आधार घेऊन चालत नाही. तेथे कलावंताच्या कल्पकतेचाही आधारा घ्यावा लागतो हे माझ्या ध्यानी आले. त्यामुळे या कादंबरीत सत्याबरोबरच कल्पकतेचा आधार मला शोधावा लागला. सार्‍याच व्यक्तिरेखा वास्तवातल्या नाहीत. काही कल्पनेतून साकारलेल्या आहेत. याची नोंद वाचकांनी घ्यावी." असे प्रस्तावनेत कबूल करणार्‍या देसाईंकडून काही प्रसंग, पात्र, घटना अधिक खुलवता आल्या असत्या अशी वाचकांनी अपेक्षा केली तर ती अवाजवी ठरु नये. उदाहरणच द्यायचे झाले तर बालपणीच्या काळात चित्रकलेचे धडे गिरवताना जे जे शिक्षक लाभले ते ते आत्मप्रौढी मिरवणारे, आपले संपूर्ण ज्ञान, कला विद्यार्थ्याला देण्याची इच्छा नसणारे असे दाखवताना रवि वर्म्याने एकलव्याप्रमाणे आपले चित्रकलेचे कसब कसे वाढीस नेले,त्यात तो निष्णात कसा झाला हे दाखवायचे राहून गेले असे वाटते. चित्रकलेचे अंग मूळतः असले तरी काही तांत्रिक बाबी जशा की रंगवणे, रेषाकार या शिकूनच घ्याव्या लागतात त्या रवि वर्म्याने कशा आत्मसात केल्या हे ही चितारले असते तर एका कलाकाराचा विद्याभ्यास, जिज्ञासा यांचेही रंग उमटले असते. पण एक दोन प्रसंगांखेरीज याविषयी कादंबरीत काहीच नाही. तसेच, पुराणकालातील प्रसंग चितारण्यासाठी त्यांनी जे देशाटन केले, अनेक धर्मस्थळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या ज्यातून त्यांची जाण, अनुभवविश्व खचितच समृध्द झाले असे पुढे प्रत्ययास आले; त्या प्रवासाबाबत, अनुभवांबाबत दोन वाक्यांशिवाय कादंबरीत काहीच सापडणार नाही.

तारुण्यातील राजा रवि वर्मा. लग्न झाल्यावर मातृकुल पध्दतीनुसार पत्नीगृही जाऊन वास्तव्य करणारा. तेथे राजकन्या असलेल्या पत्नी पुरुतार्थीचा अहंकारी स्वभाव सहन न होऊन आश्रिताचे जिणे नाकारुन तो पुन्हा स्वगृही येतो. पुढे कालांतराने पती पत्नी सामोरे येतात तेव्हा तो तिला आपल्या घरी येऊन राहशील तर मी आनंदाने संसार करेन, असेही सांगतो. परंतु, तत्कालिन संस्कृतीला, समाजाच्या संकल्पनांना छेद देऊन पतीच्या घरी जाणे ती कुलसंपन्न राजकन्या नाकारते. व आयुष्यभर मुलांना आपल्या घरीच सांभाळते. आता या घटनेचा विचार केला, तर त्या काळानुसार पुरुतार्थी योग्यच वागली नाही का? आज जेव्हा एखादी पत्नी आपल्या पतीला, अशी अट घालेल तर कोण बरे त्या पतीला 'अहंमन्य' व पत्नीला 'स्वाभिमानी' म्हणेल? पण आपला नायक हा मातीचा बनलेला नसून, त्याला कोणतेही मोह,पाश, राग लोभ नाहीतच हे वारंवार दाखवून देऊन त्याला उदात्त करण्याचा चंगच बांधलेला असल्याने वाचक हतबल होतो. या उदात्तीकरणाच्या भावनेच्या भरात अनेक वेळा दोषही गुण म्हणून दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न डोळसपणे पाहिला तर असफल ठरतो. हा प्रसंग सांगताना लेखकाने, काळाचे मापदंडच बदलून, या विचारसरणीबद्दल राजा रवि वर्म्याच्या पाठीवर शाबासकीची थाप चक्क त्याच्या संस्थानिक मामांनी, आईनेही दिलेली दाखविली आहे. या निर्णयाच त्यांना काहीही चूक वाटत नाही. पित्याच्या प्रेमापासून मुले पारखी होत आहेत हे ही नाही. पण जर नायकाचा एखादा भावनिक कोपरा हळवा, दुखरा ठेऊन दुसर्‍या त्याला समजून घेणार्‍या नायिकेचा प्रवेश अपेक्षित असेल तर त्याचे समर्थन करण्यासाठी पुरुतार्थीला करडा रंग द्यायला हवाच होता. अन्यथा, पत्नी मुलांपासून दूर राहून, तत्कालिन समाजरुढींचे बंधन झुगारुन एका तरुण विधवेवर प्रेम, प्रणय करणारा नायक आपल्या बाळबोध वाचकांना रुचेल? आणि मग आजच्या काळाचा मापदंड लावायचा तर पतीगृही राहणार्‍या आजच्या युगातल्या स्त्रिया आश्रित? का? वाचक भेलकांडतो.
आणखी एक, जर रवि वर्मा एक उच्च चित्रकार होता, तर त्याला कल्पनाशक्तीची काय वानवा? पुराणातील स्त्रिया सीता, दमयंती, उर्वशी या चितारण्यासाठी त्याला सुगंधासारखी देखणी स्त्रीच का हवी होती डोळ्यांसमोर?उर्वशी पुरुरव्याचे अर्धनग्न अवस्थेतील चित्र काढण्यासाठी, योग्य ते भाव रेखाटण्यासाठी, सुगंधेला दोन दिवस रंगशाळेत विवस्त्र फिरवत ठेवण्याचे काहीच प्रयोजन समजत नाही. तिचा संकोच (!) घालवण्यासाठी दोन दिवस. ज्याने नुसती चित्रे पाहून एवढे चित्रकौशल्य संपादन केले त्याला तिची रुपरेषा चितारायला एक दृष्टिक्षेप पुरेसा नव्हता? वास्तविक, ज्या घरात स्त्रिया धोतराव्यतिरिक्त काहीच वस्त्र घालीत नाहीत, (असा उल्लेख बालपणीच्या काळचे वर्णन करताना आला आहे) शिवाय ज्याचे लग्नही झाले आहे (सांगण्याचा उद्देश एवढाच की - नग्न स्त्रीच्या दर्शनापासून अजिबात वंचित नसलेला असा तो) अशा रवि वर्म्याला ही गरज का भासावी? याचाच दुसरा अर्थ, त्याची कल्पनाशक्ती थिटी होती असा वाचकांनी घेतला तर तो चुकीचा ठरेल का? मला चित्रकलेचा गंध नाही; पण केवळ, प्रेमाचे, प्रणयाचे, रंजित, कामुक वर्णनांचे रंग भरण्यासाठी रेखाटलेल्या या प्रसंगातून नायकावर फार मोठा अन्याय झाला असे वाटते.

या कामुक, स्त्री सौंदर्याची रसभरीत वर्णने लिहीण्यासाठी केलेली शब्दयोजना म्हणजे निव्वळ विनोद! वानगीदाखल आपण काही वाक्ये, शब्दसमूह पाहू -
- तिची वक्राकार शरीरयष्टी. इथे मला विकारामुळे अष्टावक्र झालेला पुरुष आठवला. कमनीय शरीराकृती म्हणायचेय का?
- कधी वस्त्र सावरत असताना तिला तिच्या धमन्यांतून वाढणारा रक्तदाब जाणवे.
वय काय बाई सुगंधा तुझं?
-लांब केस हिमप्रदेशावरुन कृष्ण प्रवाहाच्या असंख्य धारा कोसळाव्यात तसे
कल्पनेतही हिमालयातून खळाळत येणार्‍या नद्यांचे पाणी काळे पाहू शकत नाही आम्ही वाचक! का नवनवीन उपमा द्यायच्या अट्टाहासापायी त्या हिमालयाला काळे फासता?
-त्या शरीराच्या आकाररेषा केवढ्या प्रमाणबध्द! शिशिरऋतूत निष्पर्ण वृक्षशाखा दिसाव्यात तशा! इथे मला हाडाची काडे झालेली जख्खड म्हातारी आठवली तर तो माझ्या बुध्दीचा दोष.

विरोधाभास तर अनेक ठिकाणी केवळ हास्यास्पद. पान क्र. २५३ वर अंजनीबाईंना ज्या राजा रवि वर्म्याची नजर वासनारहित वाटली तोच राजा पान क्र. २५५ वर एकांतात खालील विचार करत असतो.
विड्याच्या पिवळ्या पानाच्या दुसर्‍या बाजूला टपोर्‍या शिरा उमटल्या होत्या. अंजनीबाईच्या लांबसडक पालथ्या पंजावर पिवळसर रेषा अशाच उठून दिसत होत्या. (!!)
...
एका आतुरलेल्या जीवाचा स्वीकार करायला काय हरकत होती?

अजून पुढे बरेच आहे ते प्रत्यक्ष वाचण्यातच मजा. पण एक प्रथितयश लेखक म्हणून देसाईंच्या काही त्रुटी राहिलेल्या एखाद्या वाचकाला खुपल्या असतील तर त्यात गैर नसावे अशी माझी समजूत. याशिवाय 'मेहता पब्लिशिंग हाऊस' सारख्या नावाचा दबदबा असलेल्या प्रकाशनाकडून 'विणावादन', 'निश्चिल' (असा शब्द आहे? )मध्येच 'कुंचल्या'चा 'ब्रश', 'चित्रसोपाना'चा 'कॅनव्हास' होणे , हे अजिबातच अपेक्षित नाही!
तर हे सारे असे असूनही, राजा रवि वर्म्याबद्दल फारसे साहित्य उपल्ब्ध नसताना जी तोंडओळख झाली त्यात समाधान, धन्यवाद मानायचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या सुगंधा बद्दल 'चिन्ह' मासिकात शर्मिला फडक्यांनी फार छान लेख लिहीला आहे. ही सुगंधा मुळगावकर क्रिएटेड आहे असे तिथे लिहीले आहे. आणि बर्र्याच देवींच्या चित्रांमध्ये अंजनीबाई मालपेकरांचा चेहरा आहे असे त्या लिहीतात. मस्त आहे तो लेख. ही बघ लिंक.
http://www.chinha.in/images/archives/2009/Raja%20Ravi%20Verma%20Story%20...

यातल्या काही उपमा / प्रतिमा संस्कृत साहित्यातून उचललेल्या वाटतात. अतिबोजड भाषा दिसतेय !

पण राजा रविवर्माची चित्रे, खास करुन सरस्वतीचे चित्र मात्र मनात लहानपणापासून ठसलेय.

सहीच लिहिलेस. Happy 'तारुण्यातील राजा रवि वर्मा....' हा संपूर्णच परिच्छेद आवडला.
'वक्राकार शरीरयष्टी' महान आहे. 'वक्राकार' हे एखाद्या व्यंगासाठी आणि 'शरीरयष्टी' एखाद्या पहिलवानासाठी वापरले जात असावे, असे उगाचच वाटत होते आजवर. Proud धमन्यांतून वाढणारा रक्तदाब आणि हिमप्रदेशावरुन कृष्ण प्रवाहाच्या असंख्य धारा हे पण महानच. सुगंधाचा चेहेरा अचानक भूतागत होऊन पांढराफटक पडल्यागत दिसला की काय रविवर्म्याला? आणि 'वय काय बाई सुगंधा तुझं?' 'हिमालयाला काळे' 'जख्खड म्हातारी आठवली' हे तुझे महान! Lol

रणजित देसाईंच्या इतर काही पुस्तकांतलीही शैली आणि संवाद मला भंपक वाटतात. असे काहीतरी दाताखाली खडे आल्यागत वाचावे लागले, की मग ते वाचू 'आनंदे' राहत नाही, हेच खरे.

खूप छान पोस्ट लिहिलं आहेस आशू. भंपक ऐतिहासिक काल्पनिक कादंबरीचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही कादंबरी. त्यात इतिहासाची किंवा चित्रकलेची कसलीच ऑथेंटिसिटी नाही. रवि वर्माच्या चित्रकारितेचा केवळ अपमान आहे ही कादंबरी.

पाच वर्ष अभ्यास, जाणकारांशी चर्चा ??? > वाचकांची फक्त दिशाभूल केलेली आहे. अशा चुकीच्या कल्पनाविलासामुळे इतिहासाचे किती नुकसान आपण करुन ठेवत आहोत हे अशा थो र (!) साहित्यिकांच्या लक्षातही येऊ नये हे खरे दुरदैव.

लिन्कबद्दल धन्यवाद स्वाती! जरुर वाचाच हा लेख :-

http://www.chinha.in/images/archives/2009/Raja%20Ravi%20Verma%20Story%20...

- तिची वक्राकार शरीरयष्टी. इथे मला विकारामुळे अष्टावक्र झालेला पुरुष आठवला. कमनीय शरीराकृती म्हणायचेय का?
- कधी वस्त्र सावरत असताना तिला तिच्या धमन्यांतून वाढणारा रक्तदाब जाणवे.
वय काय बाई सुगंधा तुझं?
-लांब केस हिमप्रदेशावरुन कृष्ण प्रवाहाच्या असंख्य धारा कोसळाव्यात तसे
कल्पनेतही हिमालयातून खळाळत येणार्‍या नद्यांचे पाणी काळे पाहू शकत नाही आम्ही वाचक! का नवनवीन उपमा द्यायच्या अट्टाहासापायी त्या हिमालयाला काळे फासता?
-त्या शरीराच्या आकाररेषा केवढ्या प्रमाणबध्द! शिशिरऋतूत निष्पर्ण वृक्षशाखा दिसाव्यात तशा! इथे मला हाडाची काडे झालेली जख्खड म्हातारी आठवली तर तो माझ्या बुध्दीचा दोष.

हसून हसून पुरेवाट झालि!! :-ड

एकूण लेख वाचून पुस्तक वाचू नये असेच मत बनले आहे!

पुस्तक वाचलं तेव्हा इतकं काही कळत नव्हतं. पण याच पुस्तकामुळे राजा रविवर्म्याशी लहानपणी ओळख झाली होती. आता पुन्हा वाचायला पाहीजे.
परिक्षणाबद्दल धन्यवाद. छान लिहीलय..

छान लिहिलेस आशूडी. इयत्ता दहावी अगोदरच्या उन्हाळी सुट्टीत आम्ही काही वात्रट कार्ट्यांनी एकसमयावच्छेदे करून देसाईंच्या इतर काही पुस्तकांचीही (राधेय, स्वामी इ. इ.) मनसोक्त चिरफाड केली होती, पुस्तकांतील अशी अचंबित करणारी वाक्येच्या वाक्ये अवतरणांत उतरवून त्यांची एकत्र गुंफण करून एक वेगळीच साहित्यनिर्मिती केली होती ते स्मरले!! Proud

धन्यवाद सर्वांना. Happy
वरती लिहायचे राहून गेलेले आणखी काही नमुने -
-ओठांचं रुप जेवढं सुकुमार, तेवढंच दाहक. त्यांच्या एका स्पर्शानं जीवनाचा सारा दाह विझून जावा.'दाहक' चा अर्थ काय आहे नक्की?
कादंबरीच्या शेवटी, अंतःकाळात रवि वर्म्याला अचानक वैफल्य का येतं तेही समजत नाही. आप्तांच्या वियोगामुळे असेल; पण ज्या पौराणिक चित्रांनी त्याला एवढी प्रसिध्दी दिली, आजवर जे कुणी केलं नाही ते त्याने करुन दाखवलं यासाठी साक्षात विवेकानंदांनी प्रत्यक्ष येऊन आशीर्वाद दिले ती चित्रं त्याला पराजयासमान का वाटावीत?
दिनेश, ऐतिहासिक कादंबरी म्हटल्यावर जड भाषा येतेच.
साजिरा, शर्मिला, अनुमोदन! ऐतिहासिक कादंबरी लिहायची म्हणजे संस्कृतीची, एखाद्या घडून गेलेल्या आयुष्याची, कालखंडाची केवढी मोठी जबाबदारी आपण पेलू पाहत आहोत याचे भान ठेवायलाच हवे. मुळात जे घडून गेले आहे त्यावर फक्त प्रकाश टाकण्याची कामगिरी आपण करीत असून जे घडले तेच वाचकाला दिसावे याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. अशा गल्लेभरु वर्णनांमुळे मूळ व्यक्तिरेखेच्या गुणदोषांवरच जर प्रश्नचिन्ह उमटत असेल तर अभ्यास नक्कीच कमी पडला किंवा व्यक्तीरेखा उभी करण्याचे लेखकाचे सामर्थ्य.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मला रवि वर्मा हा दुटप्पी वागणारा होता वगैरे अजिबात वाटत नाही. तो तसा नसावा नक्कीच. पण नायकाला उदात्त करण्याच्या वेड्या हट्टापायी आणि वाचकांना आवडेल असा रंजक मजकूर लिहीण्याच्या नादात एखाद्या होऊ घातलेल्या उच्च कलाकृतीचे कसे भजे होऊन जाते याचे हे उदाहरण! ही कादंबरी पूर्णपणे काल्पनिक असती तर प्रश्नच नव्हता पण ही एका ऐतिहासिक, भारतीय चित्रकलेच्या सर्वोच्च शिखरावर असणार्‍या महत्त्वाच्या व्यक्तिरेखेबद्दल असल्याने असे सहज सोडून देता येत नाही इतकेच. Happy

Lol देसाईंना काय सिरीयसली घ्यायचे... Proud
बाकी एका विशिष्ट वयात त्यांची Love in the times of TB कादंब्री रोमँटिक वाटायची हे कबूल करायला मला अनंत यातना होतायेत. Sad Happy

थँक्स स्वाती. शर्मिलाच्या लेखाच्या दुव्याबद्दल.

खूप पुर्वी कधीतरी वाचली होती ही कादंबरी. देसाईंच्या पुस्तकांच्या प्रेमातून बाहेर आल्यानंतर (४ ते ८ वी मृत्युंजयची पारायणं केली होती. त्यातली चित्रं बघून तशीच स्केचेस पण काढून झाली होती. Proud ) हि कादंबरी वाचण्यात आल्याने लगेचच डोक्यातून निघूनही गेली. आज इथे वाचल्यावर आठवलं.

शर्मिला, छान लेख. Happy

लिहिताना स्वामी आणि मृत्युंजय दोन्ही एकत्र केलं मी. :). रैना थँक्स चुक दाखवून दिलिस.

मी अजून पूर्ण लेख नाही वाचलाय, पण राजा रविवर्म्यावर एक छान पुस्तक वाचलं होतं. आता लेखक कोण ते नाही आठवत. आठवलं की देईन इथे.

मला आधी वाटलं त्याच पुस्तकाबद्दल असेल..पण वरची उदाहरणं मात्र वाचली आणि हसून हसून वाट! Lol

भंपक ऐतिहासिक काल्पनिक कादंबरीचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही कादंबरी. >>>> शर्मिला Happy

आशु, पुस्तक वाचताना काय वाटले ते भारी लिहिले आहेस. देसाई एकुणातच प्रेम आणि रिलेटेड प्रसंग बळंच लिहितात असं वाटतं.

आशुडी , ती उदाहरणे खरच फनी आहेत. Happy
कॉलेजमध्ये असताना वाचलेली. पण कादंबरी म्हणुन मला ती आवडल्याचे आठवते. राजा रविवर्मांच्या कार्याबद्दल वाचुन ते समजण्याइतपत अक्कल तेव्हा नव्हती(आता आहे अस म्हणायच नाही.)पण कादंबरी रंजक वाटलेली एवढ नक्की.

गेले कित्येक दिवस हि कादंबरी समोर दिसते. पण घ्यायला गेलो की दूसर्या पूस्तकाकडे लक्श जाते आणि हि कादंबरी वाचायची राहून जाते. आता आणायलाच हवी.

भंपक ऐतिहासिक काल्पनिक कादंबरीचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही कादंबरी. >> Happy ह्या कादंबरी नंतर मी रणजीत देसाईंचे लिखाण वाचणे थांबवले ते आठवले. स्वामी वाचल्यानंतरच का नाहि थांबवले ?

आशूडी, मस्तच लिहीलं आहे. उदाहरणं तर खासंच Happy

चला रणजित देसाईं च्या पुस्तकांशी, कुठलेच नाते जुळले नाही याचे कारण कळले.
"स्वामी" थोडीफार रेंगाळली होती ती ही हातात ...

हायला मस्तच लिहले आहेस!!! पण खरे सांगु मि हे पुस्तक वाचले तेंव्हा मला हे काहीच जाणवले नाही , कदाचीत या सर्व ऐतीहासीक व्यक्तींबद्दल मनात असलेला आदर पुस्तक वाचताना या चुका नजरेआड करत असेल.. आज तुझा लेख वाचुन कळाले की समिक्षकाची दृष्टी कशी असते.. Happy

भारी चिरफाड केली आहे.

चला रणजित देसाईं च्या पुस्तकांशी, कुठलेच नाते जुळले नाही याचे कारण कळले.
"स्वामी" थोडीफार रेंगाळली होती ती ही हातात ...>>> अगदी सोला आणे सच! Proud

बाकी रैनातै,
बाकी एका विशिष्ट वयात त्यांची Love in the times of TB कादंब्री रोमँटिक वाटायची हे कबूल करायला मला अनंत यातना होतायेत.>>> माझ्याकडं तर अशी बरीच उदाहरणं आहेत. पण इथं नको फुकट्या गदारोळ व्हायचा! Proud

ऐतिहासिक कादंबरीतली ऐतिहासिक भाषा, कुणी शोधून काढली कुणास ठाऊक ? ती त्याकाळातल्या पत्रव्यवहारातून ढापल्यासारखी वाटते. छत्रपति शिवाजी महाराज, आपल्या सवंगड्यांशी अशा भाषेत बोलले असतील, असे मला वाटत नाही.

भारी! Happy अचूक समीक्षा.

Actually I feel bad Sad ह्यांच्या पुस्तकांनी अनेक उन्हाळ्याच्या सुट्ट्या भारावलेल्या वगैरे गेल्या आहेत. आज कळते झाल्यावर आपल्याला आवडणारे लेखक असे सामान्य लिहितात/ लिहित होते आणि आपण त्याचे निस्सीम चाहते होतो, ते जाणवून कसंतरीच वाटतं. त्या वेळेच्या भाबड्या निरागसपणावर ओरखडा उमटल्यासारखा वाटतो. असो Happy

दिनेश, Lol

<< ऐतिहासिक कादंबरीतली ऐतिहासिक भाषा, कुणी शोधून काढली कुणास ठाऊक ? >> दिनेशदा, आणि त्यावरच बेतलेला कृत्रिम अभिनय व शब्दोच्चार नाटक- सिनेमा - व आतां टीव्ही. मालिकांमधूनही - ऐतिहासिक काळात सहजसुंदर बोलणं-वागणं असं नव्हतंच, हें घसा फोडून पिढ्यानपिढ्या सगळ्याना पटवत असतात ! Wink
मी रणजीत देसाईंचं पुस्तक वाचलेलं नाही [आणि आता वाचण्याची शक्यता कमीच !] ; पण 'राजा रवि वर्मा'वर अनेक अप्रतिम संकेतस्थळं आहेत. मला खालील संकेतस्थळ authenticityसाठी उल्लेखनीय वाटतं -
http://www.cyberkerala.com/rajaravivarma/

भाऊ, त्या साईटवरची रविवर्मांची पेंटिंग्ज पुन्हा एकदा पाहिली. शर्मिलाचा लेख वाचल्यानंतर त्यांच्याकडे एका नव्या दृष्टीने पाहिले. धन्यवाद.

आशू, कसलं अचूक निरीक्षण आहे तुझं. हे पुस्तक खरंच 'वाचू आनंदे' दिसतंय. आता मुद्दाम मिळवून वाचेन मी.

बाकी, हाडाची काडे, हिमालय आणि काळे पाणी वगैरे वाचून Lol

'वय काय बाई सुगंधा तुझं?' 'हिमालयाला काळे' 'जख्खड म्हातारी आठवली'<<< Lol

कादंबरी वाचली होती कधी काळी. देसाईंच्या इतर सगळ्याच कादंबर्‍यांप्रमाणे भंपक वाटलीच होती.
मृत्यूंजय वाचलं होतं कधीतरी ८-९ वी दरम्यान. १० वी च्या सुट्टीत आजोबांच्या जुन्या पुस्तकांचा फडशा पाडला त्यात युगान्त होतं इरावतीबाईंचं. ते वाचल्यावर मृत्यूंजय ही केवढी फसवणूक ते चांगलंच कळून चुकलं होतं.
काय गरज असते आपल्याला अजूनही सगळं जुनं ते रोमॅन्टिसाइझ्ड (रोमँटिक म्हणायचं नाहीये) करायची कुणास ठाउक!

शर्मिलाचा लेखही गेल्या वर्षी अधाश्यासारखा वाचला होता. तो फारच पटला होता.

मृत्यूंजय <<< मृत्युंजय कुणाची?

मलापण हे वाचून वाईट वाटलं (आणखी एकदा).

रणजीत देसायांची मी दोन पुस्तकं वाचली. 'श्रीमान योगी' आणि 'स्वामी'. दोन्ही शाळेत असताना बक्षीस मिळालेली आणि मित्रांकडून अदलाबदल करून वाचलेली. तेव्हा असं वाटलं की - व्वा! पुस्तक असावं तर असं. वाचावं तर असं काही. लेखक असावा तर असा असायला पाहिजे. ती पुस्तकं वाचल्यावर किती महिने ती मनात घुमत राहिली असतील! त्यानंतर त्यांचे एकही पुस्तक वाचणे झाले नाही. दरम्यान इतरांकडून त्यांच्या लेखनाबद्दल वेडेवाकडे ऐकले तेव्हा अक्षरशः फटके बसल्यासारखे वाटले. पण चक्क 'ही व्यक्ती' उगीचच काहीही कसे बोलेल? अशा प्रकारचं... त्यानंतर मी त्यांचं काहीच वाचलं नसल्यामुळे मी त्यावेळी जे वाचून जे वाटलं ते अजून मनात तसंच आहे. दुसरे काही वाचण्यापूर्वी हीच दोन पुस्तके पुन्हा वाचायचे ठरवले आहे. अगदी चिरफाड करून वाचायचे असे ठरवले आहे. तेव्हाच्या आणि आताच्यात वेगळं वाटलं तर तेव्हा ते इतकं का आवडलं हे पण माहीत करून घ्यायचे आहे. वाचल्यावर काय वाटले ते लिहिणारच आहे. Happy

मृत्युंजयबद्दल (शिवाजी सावंतांच्या) बर्‍याच जणांकडून ऐकून ती वाचायला घेतली होती. पण पुढे आता घेतली आहे तर संपवूया असे मला वाटले होते.

Pages