रंगसंगती

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

"आल्या आल्या चित्रे बाई आल्या!!!"
शारदा ओरडली आणि अख्खा वर्ग चिडीचुप्प झाला. मग आमचं सगळ्यांचं एकमेकींकडे बघून गालातल्या गालात हसणं सुरु झालं.
"बबे, ओळख आज बाईंनी कुठल्या रंगाची साडी, ब्लाउज आणि परकर घातला असेल!" शारदानी हळूच विचारलं. पण बबीच्या उत्तरा आधीच बाई वर्गात आल्या आणि आमचं नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या अत्यंत विसंगत रंगसंगतीकडे निरखून बघणं सुरु झालं.
चित्रे बाई आम्हाला ईंग्रजी शिकवायच्या. कायम हसत असायच्या. बरंच गमतीदार बोलायच्या आणि दर तासाच्या शेवटी, "काय पण दात काढता गं तुम्ही.. अचरट कार्ट्या!!!" असं काहीसं बोलून वर्गाबाहेर पडायच्या.
शाळेच्या सगळ्या शिक्षकांमधे बाई आपल्या अखंड हसण्यानी, मुख्य म्हणजे अगम्य रंगसंगतीच्या कपड्यांनी आणि एकूणच पेहेरावातल्या बेंगरूळपणानी उठून दिसायच्या. देखण्या असल्या तरी रहायच्या अगदी गबाळग्रंथी! पातळ केसांची अगदी शेवटच्या टोकापर्यंत गुंफलेली वेणी, नेहमी तिरकं लागलेलं कुंकु, बारक्या देहावर एक ढगळं ब्लाऊज, साडी फिकी हिरवी असली की परकर गडद जांभळा, तोही साडीखाली चार इंच तरी दिसायचा. ब्लाउज अशावेळी निळ्या रंगाचं. पायात हवाई चप्पल आणि पर्स कधीच नाही, हातात कायम एक शबनम बॅग. अशा थाटात येणार्‍या बाईंची बहुतेक इतर शिक्षकही थट्टा करायचे पण चित्रे बाईंनी कधी रागावून उत्तर दिल्याचं बघीतलं नाही. त्या छान शिकवंत असाव्यात. पण आम्हा कार्ट्यांचं सगळं लक्ष त्यांचं हातवारे करत बोलणं, त्यांची साडी, अघळपघळ ब्लाऊज आणि रंगपंचमीच्या रंगांसारखे कपडे बघण्यातच असायचं. एकूण काय तर बाई अगदी अजागळ आहेत यावर आमचं एकमत!

गॅदरिंगचे दिवस होते. शाळेचं तीन अंकी नाटक नेहमीप्रमाणे बसलेलं. प्रॉपर्टीला लागणार्‍या सगळ्या वस्तु चित्र्यांच्या घरून यायच्या. कारण बाईंच घर शाळेमागेच. नाटक आटोपून संध्याकाळी सगळं सामान परत करायला आम्ही मुली त्यांच्या घरी गेलो. टेबल लँप्स, खुर्च्या, उश्या असल्या सगळ्या वस्तु आत ठेवायला सांगितल्या होत्या म्हणून आम्ही १५-२० जणींचा घोळका घरात शिरलो आणि समोरचं दृष्य बघून जागीच थांबलो! आतून एक म्हातार्‍या बाई अंगावर एक कपडा नाही अश्या अवस्थेत बाहेर पडायच्या प्रयत्नात होत्या!!! मागून चित्रे बाई हातात एक गाऊन धरून "आई थांबा!! थांबा म्हणतेय ना!" असं किंचाळत बाहेर आल्या. म्हातार्‍या आजी आमच्यासमोर येऊन जोरात ओरडल्या,
"कोण आहात गं तुम्ही? नालायक पोर्ट्या माझ्या घरात गर्दी करताय. बाहेर व्हा नाही तर काठी हाणीन एकेकीच्या टाळक्यात! सुशे, बघतेस काय, हाकल यांना. तुही काही कामाची नाहीस म्हणा! फुकटाचा पगार खाते माझ्या लेकाकडून!!" आम्ही घाबरून सामान तिथेच टाकून काढता पाय घेणार तेव्हड्यात बाईंनी आजींच्या अंगावर कसाबसा गाऊन चढवला. आपल्या मुलाला हाक मारली. नातु आजीला घेऊन बाहेर गेला.
"बसा मुलींनो. मी सरबत केलय सगळ्यांसाठी. चिवडा पण आहे खाऊन जा. दमल्या असाल ग! खूप मेहेनत केलीत आज!" आम्ही सगळ्या निमूटपणे मिळेल त्या खुर्चीवर बसलो. बाईंनी आतून सरबताचे पेले, चिवड्याच्या बश्या आणल्या. आमची बडबड पूर्णत: थांबली होती. खिडकीतून बाहेर बघीतलं तर आजी आता फाटकाशी खुर्ची टाकून शांतपणे बसल्या होत्या. परत पोटात गोळा. आता फाटकातून जाताना काय बोललतील या?
"खा गं!" बाई म्हणाल्या.
"घाबरू नका आजींना. काही करणार नाहीत त्या. त्या आहेत माझ्या सासुबाई." बाई सांगत होत्या. आमच्याशी बोलताना हातात मोगरीच्या फुलांचा अर्धवट गजरा आणि त्यात आणखी फुलं ओवायचं काम सुरु होतं.
"तुम्ही बघीतलच आत्ता. डोक्यावर बराच परिणाम झालाय. तुम्ही लहान आहात अजून तेव्हा काय झालय ते सांगु शकत नाही. पण त्यांनी खूप खूप सहन केलय आयुष्यात. त्यात मोठ्ठा आघात म्हणजे माझे सासरे अपघातात गेले. तरुण वयात. त्यानंतर त्या बर्‍या होऊच शकल्या नाहीत! कश्याकश्याची शुध्द नसते. चित्रे साहेब इथे नसतात. त्यांची नोकरी फिरतीची आणि सध्या बदली पण झालीय दिल्लीला.. घरी मदतीला कुणी नसतं. आमच्या आई कुणाला टिकु देत नाहीत.त्या मलाच घरातली मोलकरीण समजतात!" त्या हसत म्हणाल्या.
"मला मुलींची हौस! पण दोन्ही मुलगेच. आता उरलेली हौस आईंवर पुरवून घेते."
अंगावर काटा आला हे ऐकून आमच्या!
"कठीण आहे ग मुलींनो आयुष्य! त्यांनी तरी हे वेडेपण मागीतलं का? रोज संध्याकाळी अजूनही बाबांची म्हणजे माझ्या सासर्‍यांची वाट बघतात त्या फाटकाजवळ, तिन्हीसांजा झाल्या की. रोज नीट तयार होतात. आणि एक गजरा पण लागतो डोक्यावर माळायला!" पुन्हा एक शहारा आला.
"बरं चला पटापट आटपा आणि निघा. घरी पोचा व्यवस्थीत!!"
आम्हाला फाटकाशी सोडून त्या मागे वळल्या. आम्ही पण पुन्हा मागे बघीतलं. चित्रे बाई सासूबाईंच्या डोक्यात गजरा माळून देत होत्या.

गॅदरिंगच्या धामधुमीनंतर वर्ग सुरु झाले. आज चित्रे बाईंचा तास झाला. त्यांनी शिकवलेली Miller of The Dee आजही लक्षात राहिली. कारण सोपं आहे. त्या दिवशी त्यांच्या रंगगसंगतीकडे लक्षच गेलं नाही.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

छान लिहिलय...
एखाद्याला बाहेरच्या रूपावरून, वेषभूषेवरून नावं ठेवणे किंवा थट्टामस्करी करणे हे तर शाळा कॉलेजच्या वयात भारी चालतं. पण त्या व्यक्तीचाच दुसरा चेहरा समोर आला की थट्टेतला पोकळपणा अंगावर आदळतो.>>> खरचं

Sad Sad

अंजली१२,
छान... मला माझ्या गरवारे कॉलेजमधल्या साने मॅडम आठवल्या. अतिसाधी राहणी पण प्रचंड हुशार. कोणी म्हणत त्यांच्या घरी लाईट पण नाहीत खरे खोटे काय माहित?
>> ते खरं आहे. मी गेले होते त्यांच्या घरी Happy

मॄ, खुप छान.. आई एक आठवण सांगते. तिच्या एक बाई कुंकू लावलं नसेल तर कपाळाला चिमटा काढायच्या. या मुलींना अजिबात आवडायच्या नाहीत. थोडं मोठं झाल्यावर मग कारण कळंलं की त्या बालविधवा होत्या आणि कधीच कुंकू लावू शकल्या नाहित. म्हणुन मग हा कुंकवाचा अट्टहास.. सगळ्या मुली मग त्यांच्या खुप जवळ गेल्या, कायम संपर्कात राहिल्या..

छानच मृण्मयी.लहान मुलं तशी थोडीशी जंगलीच असतात म्हणजे विनोद्बुद्धीच्या बाबतीत,असं कधीकधी शाळेतल्या धमाली आता आठवताना वाटतं.तुमचा जगड्व्याळ खुर्चीचा रंगीतसंगीत फोटो न लेखही आवडला :))

Pages