नाविन्यपुर्ण उत्पादनांच्या कल्पना

Submitted by सावली on 9 April, 2011 - 05:38

नेहेमीच मला नविन कुठल्यातरी उपयोगी उत्पादनांबद्दल सुचत असते. बहुतेक सगळे विचार नवर्‍याच्या कानापर्यंत पोचुन विरले जातात. मी "अरे, ऐक ना मला काहीतरी सुचलय.." असं म्हणाल्यावर तो प्रचंड वैतागत असणार. पण माझ्याकडे दुसरा श्रोता नसल्याने वैतागलेला श्रोताही चालवुन घेते. पुर्वी मी कुठल्यातरी मित्रमैत्रिणींना पकडुन माझ्या कल्पना ऐकवायचे.

फार पुर्वी माझी एक कल्पना होती की बिना ड्रायव्हरची गाडी असावी. तीला रस्ता फिड केला कि ती योग्य ठिकाणी आपोआप जावी वगैरे. नंतर काही वर्षांनी किमान प्रायोगिक तत्वांवर तरी अशी गाडी तयार झाली.

अजुन एक जुनी कल्पना होती त्यात थ्रीडी प्रोजेक्शन वापरुन व्यक्तीचा हॉलोग्राम कुठेही प्रोजेक्ट करता यावा. म्हणजे मग मिटिंग वगैरे साठी प्रत्यक्ष न जाताही समोरासमोर बोलण्याचा फायदा मिळेल. (व्हि.कॉ. पेक्षा चांगल्या प्रकारे) तेव्हा खरतर थ्रीडी वगरे इतके जोरात नव्हते. पण काही वर्षांपुर्वी हाही प्रयोग सफल झालाय.

अशा अनेक कल्पना असतात. त्यांना ठराविक एक विषय असा नसतो, या कल्पना सत्यात उतरण्यासाठी जे ज्ञान, भांडवल, स्किल लागेल ते माझ्याकडे नाही याची पुर्ण जाणीव असल्याने मी पुढे काहीच करत नाही. अशा कल्पना तुमच्याकडेही असतील. इथे या धाग्यावर त्या मांडाव्या असा माझा विचार आहे.
अशाच प्रकारची काही उत्पादने असतील आणि आपल्यालाच ती माहीत नसतील तर इतरांकडुन त्याचीही माहीती मिळेल. शिवाय कधी कुणी अशा उत्नादनांसाठी खरच प्रयत्न करुन बघितले तर अगदीच उत्तम.

या माझ्या काही कल्पना -
१.
मला लहान असताना असे वाटायचे की पाणबुडे पाण्यात जाताना ऑक्सिजन सिलिंडर
घेऊन जातात. त्याऐवजी पाण्यातलाच ऑक्सिजन काढुन घेत का नाहीत. यामुळे अमर्यादित सप्लाय मिळेल. आता असे काही उपलब्ध आहे की नाही माहीत नाही.
शिवाय आता अशा विघटनाला लागणारी उर्जा वगरे बर्‍याच गोष्टी मधे आहेत. पण प्रयोग करायला वाव आहे असे मला वाटते Happy

२.
वॉशिंग मशिन जी मन्युअल आणि ऑटोमॅटीक दोन्ही मोड मधे चालते. म्हणजे पाणि नसेल तेव्हा मॅन्युअल मोड मधे चालवायची. एरवी ऑटो मधे. (अशी असल्यास प्लिज सांगा)

३.
लहान मुलांचे कपडे वाळत घालायचे स्टँड मिळतात त्याला असंख्य चिमटे असतात. कपडे वाळल्यावर एक एक चिमटा काढायचा खुप कंटाळा येतो. एकाच बटनात सगळे चिमटे उघडले तर?

४.
अशा काचा ज्या पारदर्शक असतील पण सोलार पॅनेल सारख्या काम करु शकतील. याचे तर असंख्य उपयोग आहेत.

५. अशा काचा ज्या हवा फिल्टर करुन आत पाठवतील. म्हणजे धुळ येणार नाही पण हवा येईल.

६.
घराची फरशी धुण्यासाठी एक मशिन. बाहेर मिळते ते ऑफिस योग्य मोठ्ठ्या आकाराचे असते. घरासाठी छोटे सोपे हवे. अजुन एक मिळते ते भारतातल्या धुळीत चालणारे नाही असे वाटते. भारतीय वापरासाठी एक बनले पाहीजे.

(आता लिहायला गेले तर अजुन काही नीट आठवेना. जसे आठवेल , सुचेल तसे इथे टाकत जाईन)

माझा हा गुण लेकीमधेही ट्रान्सफर झालाय असे वाटतेय कारण तीही तीच्या एक एक कल्पना मला सांगत असते. त्याही खाली लिहिते. (बिचारे तीचे बाबा Wink )

१.
मागे एक मॅग्नेटीक ब्लॉक्स वापरुन ट्रेन सदृश्य काहीतरी केलं आणि मला येऊन म्हणाली हा व्हॅक्युम क्लिनर आहे. तो घरभर स्वतःच फिरतो आणि कचरा काढतो. भरला की कचर्‍याच्या डब्यात टाकतो आणि बॅटरी संपली की चार्ज होतो. ( असा मार्केट मधे आहे हे तीला माहीत नाही अजुन)

२.
एक बोट सदृश्य काहीतरी केल आणि म्हणाली ही पाणबुडी आहे ती पाण्यात बुडते, पाण्यावर तरंगते आणि मग हवे असेल तेव्हा उडते पण. Happy ऑल इन वन. Wink

३.
अजुन एक बोट बनलीये, जी बोट त्सुनामी आली तरीसुद्धा बुडत नाही. त्यावर तरंगते.

तुमच्याही कल्पना इथे येऊद्यात. न जाणो कुणाला प्रयोगासाठी, कुणाला नविन उद्योग सुरु करण्यासाठी उपयोगी येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) वॉशिन्ग मशीनच्या वरील सपाट चौकोनी भागास एक्स्टेंशन लावून त्याचा इस्त्री स्टँड जो इतर वेळी फोल्ड करायचा साइडला. वेगळे इस्त्री स्टँड घेणे मुंबईसारख्या ठिकाणी जड जाते. जागेच्या प्रश्नामुळे.

२) एक रिमाइंडर मशीन रिमोट सारखे. आपण घरातून हपिस्/शाळा/ प्रवासाला जायला निघतो तेव्हा कय काय विसरू शकतो त्याची लिस्ट मशीनला फीड करायची. व जाण्याची वेळ फीड करायची. अलार्म वाजला की सर्व चेक करायचे व घराला कुलूप लावायचे. छोटी गोष्ट आहे पण खूप मनस्ताप वाचेल. सध्या हे मोबाइल मधून करता येतेच. पण एक वेगळे गॅजेट घरात जिथे किल्ल्या वगैरे लावतो तिथे हे मशीन लावायचे. ह्यात रोजचे जॉब्ज पण लिहीता येतील. मुलांच्या शाळे साठी काय आणायचे. घरात काय हवे आहे इत्यादी. म्हणजे एका ट्रिप मध्ये खूप कामे होतील.

वॉशिंग मशिन जी मन्युअल आणि ऑटोमॅटीक दोन्ही मोड मधे चालते. म्हणजे पाणि नसेल तेव्हा मॅन्युअल मोड मधे चालवायची. एरवी ऑटो मधे. >>>> म्हणजे नक्की काय कल्पना आहे ती मला कळली नाही. आमच्या घरी पाणी गेलं की आम्ही मशीनमधे बादलीने पाणी ओततो, अश्या अनेक बादल्या ओतल्या, हात मरणाचे दुखायला लागले, म्युन्सिपालटीच्या नावाने मनात शिव्या चालू झाल्या की एका क्षणी मशीन फिरायला लागते. (म्हणजे पाण्याने आवश्यक ती लेव्हल गाठल्यावर)

एकाच बटनात सगळे चिमटे उघडले तर?>>>> सगळे कपडे धाडकन खाली पडतील. Lol

पण खरंच, तू म्हणत्येस तश्या खिडक्यांच्या काचा निघाल्या तर फार बरं होईल.

अ.मा मस्त कल्पना.
मंजूडी :हाहा:,
तुमची मशिन चालु होते का? आमच्या इथे चालुच होत नाही पण माझा अनुभव भारतातल्या मशिन्सचा नाहीये. आणि पाणी गेलं मधेच तर काय होते? थांबुन पाणी आल्यावर चालु होते का?
सगळे कपडे धाडकन खाली पडतील Lol वाळल्यावर तेच तर हवे आहे Wink

आणि पाणी गेलं मधेच तर काय होते? थांबुन पाणी आल्यावर चालु होते का?>>>> होय होय... पाणी गेलेल्या क्षणाला पॉज होते, आणि पाणी आल्यावर त्या क्षणापासून चालू होते. फक्त पाणी गेले तरी स्विच 'ऑन' ठेवणे आवश्यक आहे. Wink
मशीन एल जी चे आहे. फुली ऑटोमॅटीक घेतलं म्हणून ज्येष्ठ नागरीकांनी भारीच कुरकुर केली होती पण आता त्याची उपयुक्तता कळतेय.

अमा, थोड्याच दिवसात भारतीय घरातल्या कपडे वाळत घालायच्या दांड्या गायब होणार आहेत हे नक्की. १००% ड्रायर्समुळे कपडे मशीनीत टाकले की धुवून, सुकून निघणार. मशीन झालं की त्यातले कपडे बाहेर काढून घड्या घालून ठेवायचे फक्त. त्यातच इस्त्रीची अ‍ॅटॅचमेंटही निघेल काही वर्षात.

हां मग चांगलेय मंजुडी.
१००% ड्रायर्स जिथे सुर्यप्रकाश आणि वारा नसतो अशा ठिकाणी चांगले आहेत गं. त्यांना खुप पॉवर लागते. आणि शिवाय नायलॉन वगरे सारखे कपडे सारखे त्यात टाकले कि गरम हवे मुळे खराब होतात.

सावली,

हे वाचा - http://www.earthtechling.com/2010/07/spray-on-solar-glass-a-coming-reality/

हवा शुद्ध करणार्‍या काचा शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहेत. युरोपात चर्चांमध्ये रंगीत काचा असत. या काचा रंगवण्यासाठी नॅनोकण वापरले जात. लाल/गुलाबी/निळा रंग हवा असेल तर सोन्याचे कण वापरत, पिवळ्या रंगासाठी चांदीचे कण. हे कण हवा शुद्ध करत असत.

मशीन झालं की त्यातले कपडे बाहेर काढून घड्या घालून ठेवायचे फक्त. >>> घड्याही घातल्या जातील असं मशिन हवं Happy

नॅनो वरून आठवले. नॅनोटेकची दोन अ‍ॅप्लिकेशन्स. हे अस्तित्वात असेलही.

१) असे नॅनो मॉलिक्युल्स जे रक्तात ईंजेक्ट केल्यावर त्यातील प्लाक खातील व मग लहान आतड्यात येऊन शरीरातून बाहेर फेकले जातील. यामुळे हार्ट अ‍ॅटेक चे एक कारण कमी होईल. मी हे व्हिजुअल नेहमी डोक्यात बघते. लाल रक्त त्यात असलेले हे मन्युवरेबल नॅनो मॉलिक्यूल्स व त्यातील औषधे. रक्त वाहिन्यांमधून जोरात जात आहेत व जाता जाता प्लाक घासून स्वतःबरोबर घेउन जात आहेत. ( जाहिरात क्षेत्रात काम केल्यामुळे असे कायकाय फिक्षनल व्हिडिओ कायम दिसत राह्तात.

२) अश्याच टाईपाचॅ नॅनो डिटर्जंट जे वॉशिन्ग मशीन मध्ये कपड्यांच्या मधे मध्ये जाऊन मळ खाऊन टाकेल. अनेक डीटर्जंट चे वास घेउन घेउन असे काहीतरी सुचते. Happy

माझी कल्पना कधी अस्तित्वात आली तर मी नक्की हे मशीन विकत घेईन.
मॅग्नेट जसे सगळ्या लोखंडाच्या वस्तू झटक्यात स्वतःकडे ओढून घेते तसे केसांसाठी काहीतरी हवे. घरभर नुसते केस सापडतात, वैताग नुसता. कितीही झाडले तरी हलके असल्याने इकडे तिकडे उडून जात असतात आणि परत कुठेना कुठे केस राहतातच. तेचजर वॅक्युम/झाडू असे काही यंत्र मिळाले की घरात फिरवले की सगळे केस त्याच्याकडे (जमीनीवर पडलेले डोक्यावरचे नाही :)) ओढले जातील तर मज्जा येईल. ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत त्यांना पण याचा खूप फायदा होईल.

सावली,मस्त धागा आहे.
मामी, थोडं फार असंच काम करणारं हे मशिन बघा
http://www.solutions.com/jump.jsp?itemID=11057&itemType=PRODUCT

मशीन झालं की त्यातले कपडे बाहेर काढून घड्या घालून ठेवायचे फक्त. >>> घड्याही घातल्या जातील असं मशिन हवं स्मित>>> ह्याची मी फार वाट बघते आहे.

माझ्यापण डोक्यात एक कल्पना आहे.
जीममध्ये आपण व्यायाम करताना जी ऊर्जा निर्माण होते जसे कि शरीराचे तापमान वगैरे ते वापरुन जीमचे दिवे,पंखे,ए.सी वगैरे उपकरणे चालवायची Proud

चिनूक्स,
spray-on-solar-glass-a-coming-reality >> यासाठी धन्यवाद. मार्केट मधेही लगेच उपलब्ध होऊ देत Happy

त्या हवा शुद्ध करणार्‍या काचा मला माहीत नव्हत्या. पण त्या हवा शुद्ध करतात म्हणजे फिल्टर करुन आत पाठवतात की बाहेरचीच हवा शुद्ध करतात?

अश्विनी मामी, २) मधे लिहिलेले डीटर्जंट आहे असे मला वाटते. ते नॅनो टेक वगरे आहे की नाही माहीत नाही पण असाच मधला मळ खाऊन कपडे स्वच्छ करते. इथे कुठेतरी बघितलेले.

रुनी ,
रुम्बा घे. हे बघ http://store.irobot.com/category/index.jsp?categoryId=3334619&cp=2804605...

शिवाय मला याच वेब साईट वर एक नविन प्रॉडक्ट सापडलय
http://store.irobot.com/product/index.jsp?productId=11033986

सावली
तू नवीन म्हणतेयस ते रुंबा वायरलेस ऑटोमॅटीक व्हॅक्युम क्लिनर मी बर्‍याच लोकांकडे बघीतले आहे.

गेल्या वर्षी काकानी युएसहून रुम्बा पाठवले होते.. युएसमध्ये नक्कीच चांगले आहे भारतात तेव्हढे नाही.. आपल्याकडे प्रचंड धूळ असते... आणि रुम्बा प्रत्येक धुळीचा कण गोळा करायचा प्रयत्न करते त्यामुळे प्रचंड वेळ खाते.. म्हणून आम्ही ते परत पाठवून दिले.. पण प्रॉडक्ट चांगले आहे....

हिरकु, धन्यवाद. तुम्ही परत पाठवले त्याचे कारण सविस्तर लिहाल का प्लिज?

अजुन एक सुचलेली कल्पना फारच बेसिक लेव्हल वर सुचली आहे.

सुर्यप्रकाशाचे विघटन करुन उर्जा निर्माण करणे हे वनस्पतींचे मुख्य कार्य आहे. आणि वनस्पती आजवर सर्वात एफिशिएंटली उर्जा निर्माण करु शकतात (मानव निर्मित सोलर पॅनल वगरे पेक्षा) तर वनस्पती जी विघटनाची प्रक्रिया वापरतात ती / तशिच प्रक्रिया करुन मिळणारी उर्जा साठवुन ठेवता/ वापरता येईल का?
सगळ्यात सोपं उदाहरण घेतलं तर आता कसे सोलर पॅनल बसवलेले लँम्प वगरे मिळतात तसे एखाद्या कुंडीत लावलेले एक झाड. त्याला लावलेले इलेक्ट्रोड्स वगरे मिनिमम साहित्य आणि त्या झाडापासुन चालणारा एखादा लॅम्प वापरता येईल.

म्हणजे सोलार पॅनल बनवण्यासाठीचा खर्च आणि लागणारे रॉ मटेरियल नंतर कदाचित प्लॅस्टीक मुळे निर्माण होणारे प्रश्न यापासुन सुटका होईल. (होईल का?)

चितळे व पॉप्युलर बुक प्रकाशन च्या शोरूमस चे मर्जर करून एक कल्चर मॉल बनवायचा. वर फूड कोर्ट, - पारंपारिक मराठी जेवण. एम बी कॅफे. मग मराठी पुस्तके, सीडीज वगैरे व सर्व मराठी संस्क्रूतीशी रिलेटेड सामान. - जसे पेणच्या गणेश मूर्ती, पूजासामग्रीचे एक पॅकेट, फोल्डिंगचे आकाशकंदील, रांगोळी पणत्या पॅकेट, जिवतीचे कागद गौरीचे मुखवटे, हरितालिका मूर्ती, दिवाळीच्या किल्ल्याची सजावट, बाळंतपणी लागणारे खास मराठी पदार्थ, व वस्तू, मुंडावळ्या, रुखवताच्या भावल्या इत्यादी- जे एनाराय लोकांना नीट उचलून नेता येइल. विमानप्रवासात तगून धरेल असे मस्त पॅकेजिंग उपलब्ध करून द्यायचे. तळमजल्यावर २४ * ७ बाकरवडी आंबाबर्फी व इतर लोकप्रिय खाऊ. उत्तम पार्किंगची सोय. ऑर्डर घेतल्यास खरेदी केलेला माल पत्त्यावर घरपोच मिळण्याची सुविधा म्हणजे थोड्या वेळासाठी भारतात आलेल्या लोकांना ते खरेदीचे लोढणे घेऊन हिंडावे लागणार नाही व ते घरी पोहोचले कि सामान मिळेल. शक्य आहे करणे पण तशी दॄष्टी नाही.

अ.मा. असाच एक शॉपिंग प्लाझा मी जपान मधे जपानी कल्चर आणि वस्तुंसाठी माझ्या प्रोजेक्ट मधे डिझाईन केला होता.
तिथेही फॉरेनर्स आणि तरुण जपानी पिढी असे टारगेट ठेवले होते Happy
प्रोजेक्ट अर्थातच फक्त कागदावर डिझाईन करायचा होता Wink

नविन कल्पना!!
आवाज, दृश्य याप्रमाणे गंधही रेकॉर्ड करता यावा.
म्हणजे फुलाचा फोटो काढला किंवा व्हिडीयो काढला तर तो बघताना गंधही अनुभवता यावा.
याचे कमर्शियल फायदे सगळ्यात जास्त टिव्हि मधे होतील. जाहिरातीं मधे त्या त्या डिओचे, खाद्यपदार्थाचे घरबसल्या गंध अनुभवता येतील.
महत्वाचे- त्यासाठी एक म्युट सारखे बटनही हवे

महत्वाचे- त्यासाठी एक म्युट सारखे बटनही हवे
हे मात्र हवं गं सायले नाहीतर नेमकं टीवी पाहत जेवताना हार्पिक ची जाहिरात लागायची. तेव्हा जर म्युट नसेल तर अवस्था बिकट होईल. Happy

आजचा टाईम्स ऑफ इंडीया हातात घेतल्यावर मस्त कॉफीचा दरवळ आला. एकदम कॅफे लाट्टे हातात आहे का काय असं वाटलं. मला आधी वाटलं कि आपल्या मनाचे खेळ.. पण पहिल्या पानावर खालच्या भागात जाहिरात आहे पारलेची त्यात 'तुम्हाला कॉफीचा वास आला असेल तर येस असा समस करा' असे लिहिले आहे. म्हणजे हा वास जाहिरात. गोईंग टू न्यु फॉर्म ऑफ अ‍ॅडव्हर्टाईझिंग !!! आता टिव्हीतून असे वास यायचे राहिलेत. Wink

आता टिव्हीतून असे वास यायचे राहिलेत. >> त्यावरही संशोधन सुरु आहे. पण ते ईंटरनेट टिव्हीलाच शक्य होईल. सुवास येईल तोवरठीक.... Happy

भ्रमर, जाहीराती असल्या आणि आपले प्रॉडक्ट लोकांनी घ्यावे असे वाटत असेल तर सुवासच असतील ना? तरिही म्युट बटन हवे असे मी म्हणालेय वरती. Wink

सावली, मस्त धागा.
मलापण असे सुचते अधूनमधून. विशेषतः जेव्हा एखादे काम करताना प्रमाणाबाहेर रटाळपणा जाणवतो तेव्हा किंवा आपल्या किंवा इतरांच्या शारिरीक वेदना असह्य होतात तेव्हा. आता इथे लिहीत जाईन.

सावली, गजानन तुम्ही या कल्पनांचा पाठपुरावा पण करा नां. खरंच काहितरी आगळं-वेगळं जन्माला येऊ शकेल की. Happy

गजानन, नक्की लिहा इथे. मजा येईल वाचायला
भ्रमर, घरातुन बहुतेक आ व रा असे म्हणतील मग Wink विनोद बाजुला ठेवला तरी वर मी म्हणाले तसे यातल्या बहुतेक कल्पना सत्यात उतरण्यासाठी जे ज्ञान, भांडवल, स्किल लागेल ते माझ्याकडे नाही.

रच्याकने, सकाळचा तो पेपर फारच टेम्प्टिंग आहे पण. वाचायला घेतला कि मस्त कॉफी प्याविशी वाटतेय !

नाहीतर धाग्यावर फक्त प्रत्यक्षात न उतरणार्‍या कल्पनाविलासापुरत्या कल्पना लिहून वाचल्या जातील.

Pages