ओढ
विमान क्रूजिंग अल्टिट्यूडला पोचलं असावं. डोळे किलकिले केले तेव्हा केबिन क्रू खाण्या-पिण्याच्या गाड्या घेऊन फिरताना दिसला. शेजारच्या सीटेवर एक बर्याच वयस्कर बाई बसल्या होत्या. एअर होस्टेस आमच्या रांगेजवळ आली होती.
"मिस थाँम्सन, कॉफी हवीय का आणखी?"
नावाने प्रवाशाला बोलवून विचारणं झालं म्हणजे ओळखीची किंवा प्रसिध्द व्यक्ती असली पाहिजे. मी मनातल्या मनात.
"तुम्ही काय पिणार?" बाईंच्या कपात कॉफी ओतून, तिनं मला विचारलं. मी तोवर पुन्हा डोळे मिटले होते.
"थकलेला दिस्तोय. झोपू दे." माझ्या वतीनं बाईंनी सांगून टाकलं, सुंदरी पुढे गेली. मी पुन्हा मनातल्यामनात त्यांचे आभार मानले.
खरंच खूप थकलो होतो. मनानं, शरिरानं. आता झोप लागत नव्हती आणि चित्रविचित्र रंगाच्या धाग्यांचे भेंडोळे जमिनीवर गडगडंत, धागे सोडत जावे तसे विचार पुन्हा सुरू झाले. परवा भारतातून आलो. आईच्या वर्षश्राध्दाला गेलो होतो. जाताना आईच्या, तुषारच्या, माझ्या लहानपणच्या आठवणी आठवत गेलो. 'आता सगळे धागे तुटले. परत भारतात जाण्याचं काही प्रयोजन नाही' असा मन कळकट करणारा विचार घेऊन परतलो. अण्णांच्या माघारी आईने मला आणि तुषारला मोठं केलं. तो तिकडे भारतात स्थायिक झाला. मी अमेरिकेत. त्यांचं ऑटिस्टिक पोर, त्यामुळे होणारी ओढाताण, वहिनीची वेळीअवेळी हॉस्पिटलात धाव घ्यायला लावणारी नोकरी आणि आईच्या ढासळत्या तब्बेतीमुळे तिचं शुश्रुषा केंद्रात असणं सगळं बघत होतो. थोडीफार पैशाची मदत आणि शक्य तितक्या भारतभेटी याउपर काही जमलं नाही. की जमवलं नाही? माहिती नाही. इथे जेनिशी लग्न झालं. भारतात सगळ्यांना मी दुरावल्याची भावना त्यामुळे जास्त प्रकर्षानं व्हायला लागली असेल का? कधी कळलं नाही. विचारलं नाही.
गेल्या खेपेला देखिल एकटाच गेलो होतो. तेव्हा आईची भेट होऊ शकली याचं खूप बरं वाटलं होतं. वाचा गेली होती. पण स्पर्शातून 'तू आलास, बरं वाटलं' सांगितल्याचं जाणवलं. की 'मला एकटीला सोडून गेलास, आठवणीनं व्याकूळ झाले रे' सांगत असावी? आता विचार करून फायदा नाही. या खेपेला गेलो तेव्हा तुषार मात्र माझ्याशी काही बोलला नाही. गेल्या वेळी देखिल तुटकच होता. वहिनी नवर्याबद्दल 'सध्या फार स्ट्रेसमधे आहे तो.' एवढंच म्हणाली. तुषारला विचारल्यावर ४० वर्षांचं साचलेलं त्याच्या मनातलं बाहेर पडलं. 'आई गेली. आता तुझी इथे यायची गरज संपली' म्हणाला. मी वैताग समजू शकत होतो आणि काही वेळा नव्हतोही. विचार केला, त्रासलेला असेल. जरा शांत झाला की होईल सुरळीत. आणखी आठवडाभर थांबलो होतो. जाताना मात्र मला अगदी शांतपणे, "मी खरं बोलतोय, अगदी मनापासून. माझी तुझ्याशी संबंध ठेवायची इच्छा नाही. आई असेपर्यंत बोललो नाही. आता सांगतो." म्हणाला. मी नुस्ताच गप्प बसलो होतो. काही बोलण्यासारखं उरलं नाही असं वाटलं. त्या रात्री मात्र त्याच्या घरातून हॉटेलात रहायला गेलो. दुसर्या दिवशी तिथूनच विमानतळावर. कुठल्याही नातेवाईकाला फोन करावासा वाटला नाही. निरोप न घेता निघालो. खरंच आता भारतात जाण्यासारखं काही उरलं नव्हतं.
"आर यू ओके सन?"
डोळे उघडले. न जुमानता गळत होते.
"हो हो. अगदी ठीक. थँक्यू." मी जरासं हसून खोटं बोललो. पण ते फारसं कन्व्हिन्सिंग वाटलं नसावं.
"काही खावसं वाटतंय? काही पिणार?" बाईंनी विचारलं. बर्याच म्हातार्या होत्या. डोक्यावरचा केसन् केस रुपेरी झालेला. सुरकुतलेला गोरापान चेहरा, लुकलुकणारे डोळे. प्रेमळ वाटल्या.
"हो. मागतो काहीतरी प्यायला." माझं वाक्य संपताच त्यांनी बटण दाबून हवाईसुंदरीला बोलवलं.
माझ्यासाठी प्यायला आणायला ती निघून गेली आणि बाईंनी स्वतःची ओळख करून दिली.
"मी आयरीन थॉम्सन."
मी माझं नाव सांगितलं. इकडच्या तिकड्च्या गप्पा सुरू झाल्या. प्रवासात म्हातारे लोक शेजारी बसले की मला एक प्रकारची धाकधूक असते. खूप बोलतात. नातवंडांचे फोटो बघावे लागतात. त्यांचं कौतूक ऐकावं आणि करावही लागतं. पण बाईंनी यातलं काही केलं नाही. भारताबद्दल खूप उत्सुकता दिसली. बरेच प्रश्न विचारले. तिकडे घरी कोण कोण असतं या प्रश्नावर अडखळलो. का कुणास ठाऊक, 'ही माझी भारताची शेवटची ट्रिप होती. यानंतर जाणं होणार नाही.' ही माहिती आणि कारण मी गरज नसताना सांगितलं. का सांगितलं त्याचा विचार करत बसलो. त्या मंदसं हसल्या.
"ज्यो देखिल असंच म्हणायचा."
"ज्यो, माझा नवरा." माझा प्रश्नार्थक चेहरा बघून लागलीच सांगितलं.
"न्यू यॉर्कात रहायचो, अपस्टेट, साराटोगाला. ज्योचं आणि भावंडांचं पटलं नाही. त्याचे आईवडील लवकर गेले. तिथे राहण्यात गोडी वाटेना. मग फ्लोरिडात आलो. अख्खा जन्म फ्लोरिडात काढला. नवं कुटुंब, जिवाभावाचे मित्र सगळं तिथे मिळालं. ज्यो घरच्यांना फार शिव्या घालायचा. मेले सगळे मला म्हणायचा. पण खरं सांगू का, ज्योच्या मनातली साराटोग्याची ओढ कधी संपलीच नसावी."
मी कसंनुसं हसलो. बाई इथून अप्रत्यक्ष उपदेश करायला लागतात की काय? 'नसावी' असं म्हणताहेत. म्हणजे निव्वळ आडाखे? जाऊ दे. पण त्या ज्योबद्दल भरभरून बोलत राहिल्या. 'फार अढी बसते मनात. आपल्याच लोकांची, आपल्याच जागेची. पुन्हा फिरकावसं वाटत नाही. तुमच्या ज्योसारखाच कडू झालोय मी या बाबतीत. आता कसली ओढ अन् कसलं काय.' मनात आलं, पण बोललो नाही.
विमान उतरायची तयारी सुरू झाली. "एका प्रवाशाला आधी उतरणं आवश्यक आहे. त्या विमानातून उतरेपर्यंत कृपया इतरांनी थांबावं." अनाउंन्समेंट झाली. विमान गेटजवळ येऊन थांबलं. सगळी निमूटपणे जागेवर बसून होती..... आणि आमच्या रांगेशी स्वतः विमानाचा कॅप्टन अवतीर्ण झाला.
"मिसेस थाँम्सन, इफ यु विल प्लीज.."
बाई उठल्या,
"नाइस टॉकिंग टु यू सन. रागवू नकोस आपल्या लोकांवर. हॅव अ गुड लाइफ." माझ्याकडे वळून म्हणाल्या.
"बाय द वे, ज्यो खरंच कधीही साराटोग्याला विसरला नाही." हे सांगण्याचं प्रयोजन कळलं नाही..! बाकी प्रवासी खोळंबले होते.
"आज ज्योला त्याच्या गावी घेऊन चाललेय, जवळपास ६० वर्षांनी." ज्यो काही दिसला नाही.
"मिसेस थाँम्सन, एजंट्स तुम्हाला इथल्या आमच्या ऑफिसात घेऊन जातील. कॉफिन बाहेर काढल्याचं कळवलंय ग्राउंड क्रूने. वन्स अगेन, व्हेरी सॉरी फॉर योर लॉस..." कॅप्टन म्हणाला.
मी अजूनही नुस्ताच सुन्न होऊन बसलोय!!
आवडली.
आवडली.
मृण्मयी, थोडक्या शब्दांत
मृण्मयी, थोडक्या शब्दांत अतिशय परीणामकारक कथा लिहिलियेस. आवडली
पग्याला अनुमोदन, जास्त लिहित जा
आवडली. आजीबाई ज्योबद्दल
आवडली. आजीबाई ज्योबद्दल बोलल्या तेव्हाच मनात पाल चुकचुकली. शेवट वाचताना डोळे पाणावले. तुमची शैली खूप आवडते.
शेवट चटका लावणारा. आवडली कथा.
शेवट चटका लावणारा. आवडली कथा.
आवडलं.
आवडलं.
मस्त म्रु. छान मांडली आहेस
मस्त म्रु. छान मांडली आहेस सगळी आंदोलने.
प्रतिसादांबद्दल आणि 'लिहीत
प्रतिसादांबद्दल आणि 'लिहीत रहा' या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
वा.मस्त लिहिली आहेस. वरती
वा.मस्त लिहिली आहेस. वरती कुणीतरी लिहिलय तस अगदी कमी शब्दात खुप परिणामकारक वाटली.
एकदम छोटेखानी आणि परिणामकारक
एकदम छोटेखानी आणि परिणामकारक लिहीलयस. आवडले.
खूप छान लिहीलं आहे !!!
खूप छान लिहीलं आहे !!!
थोडक्यात पण परिणामकारक .
थोडक्यात पण परिणामकारक . नायकाच्या मनातली उलघाल वरवरच दाखवलीय, पूर्ण त़ळ गाठता आला नाही असं वाटतंय.
छान लिहिली आहेस कथा मृ. आवडली
छान लिहिली आहेस कथा मृ. आवडली
धन्यवाद मंडळी. >>नायकाच्या
धन्यवाद मंडळी.
>>नायकाच्या मनातली उलघाल वरवरच दाखवलीय, पूर्ण त़ळ गाठता आला नाही असं वाटतंय.
देशी, तृटी असणं अगदी शक्य आहे. पण ललित लिहिताना, नायकाच्या मनातली उलाघाल फार खोलात लिहिणं तेवढं महत्त्वाचं वाटलं नाही, किंवा मी त्यावेळी आणखी काही वेगळा विचार करून लिहीत गेले असल्यामुळे तुम्ही म्हणताय तसं तळ गाठण्याइतपत डीटेल्स लिहिल्या गेले नाहीत. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
छान लिहिले आहे. वाचले नव्हते
छान लिहिले आहे. वाचले नव्हते आधी!
>>>थोडीफार पैशाची मदत आणि
>>>थोडीफार पैशाची मदत आणि शक्य तितक्या भारतभेटी याउपर काही जमलं नाही. की जमवलं नाही? माहिती नाही>>><<
हे कुठेतरी टोचलं... विचार करायला लावणारं..
मृण्मयी, छान लिहीले आहेस.
मृण्मयी, छान लिहीले आहेस. मलाही मेधाचाच प्रश्न पडला आहे, हे असं भावंडापासून इतक्या टोकाचं
तुटणं होतं कसं?
नक्कीच लिहीत रहा.
इतक्या हजार वर्शान्नी लिहिलत्
इतक्या हजार वर्शान्नी लिहिलत् (!) , धन्यवाद! लेखणी चालती ठेवा..
खुपच सुंदर...!!! एक विचारायचं
खुपच सुंदर...!!!
एक विचारायचं होतं.. नाव सिमिलर वाटलं म्हणून की तुम्ही लोकसत्ताच्या "व्हिवा" पुरवणीमधून लिहिता त्याच मृण्मयी आहात का? तुमच्या प्रोफाईलवर मला पूर्ण माहिती शोधता आली नाही म्हणून विचारलं.. धन्यवाद
.
.
(No subject)
एकदम मस्त... एकदम जम्याहै....
एकदम मस्त... एकदम जम्याहै....
हे असं भावंडापासून इतक्या टोकाचं तुटणं होतं कसं? >>> शहरात असो वा गावात जवळपास सगळ्या घरांतुन अशीच परिस्थिती आहे... इव्हन आई वडील असताना सुद्धा भावंडांमध्ये पराकोटीचा द्वेष बघायला मिळतो. ते वेगळे राहतात. फक्त लग्न आणि मृत्यु अशा कार्यक्रमाला फक्त उपस्थिती लावत्तात. शेवट म्हणजे वेगळे झाल्यावर आई वडील कोण ठेवुन घ्यायचे यावर वाद होतात. याला कारण बहुतांशी भावंडामधील उत्पन्नातील फरक. एक नोकरी आणि एक शेती असेल तर हमखास... (विषयांतर बद्दल माफी)
जबरदस्त लिहिलयस!
जबरदस्त लिहिलयस!
दोन्ही कॅरॅक्टर्स छान उभे
दोन्ही कॅरॅक्टर्स छान उभे केले आहेस - अगदी पटण्यासारखे!
मेधा, एका भावानेच जर सगळी जबाबदारी उचललेली असेल तर कडवट्पणा येण्याची शक्यता आहे.
ओ एम जी
ओ एम जी
सुन्न व्हायला झालं...
सुन्न व्हायला झालं...
सुन्न,
सुन्न, सुन्न..........
लेखनशैलीला सलाम........
मृण्मयी तुमच्या लिहिण्यात
मृण्मयी तुमच्या लिहिण्यात सहजता आहे. लेखन अतिशय परिणामकारक झालंय. खरंच मन सुन्न झालं.
मी नक्की काय शोधता शोधता हे
मी नक्की काय शोधता शोधता हे वाचल माहीत नाही पण हे वाचलं आणि थबकलेच...
कदाचीत तुम्ही हे खरं किंवा कल्पीत लिहिलं असेल पण फार स्पर्शुन गेलं...किती मोजक्या शब्दात आणि तरीही वाचताना खिळवून ठेवणारं..
आणखी लेख वाचायला नक्की आवडतील.....
तुम्हा सगळ्यांच्या
तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद!
माफ करा, हे पान आजच बघितल्यामुळे १० एप्रिलनंतरच्या प्रतिक्रियांना उत्तर दिलं नाही.
मस्त तरी कस म्हणू?? पण मनात
मस्त तरी कस म्हणू??
पण मनात खोलवर पोहचलं
Pages