गानभुली - आज अंतर्यामी भेटे

Submitted by दाद on 24 March, 2011 - 17:43

गाण्यांचं कसं... ती भेटतात... कधी हलकीच, कधी कडकडून...
हे गाणं फार पूर्वी भेटल्याचं आठवतय मला... म्हणजे उराउरी नाही. आपण रस्त्याच्या ह्या बाजूला आणि ते गाणं त्या बाजूला असं... नुसतीच नजरभेटीने घेतलेली दखल, तर कधी हात हलवून दाखवलेलं अगत्यं... पण इतकच हं. पण त्यानंतर हरवलं ते हरवलच.

तो काळ माझ्या शाळेतला, म्हणजे खूप जुना. शाळेत जायची, दुपारची वेळ झालीये....
दप्तर भरण्याची घाई. जो काय चाललाय तो धंदा कितीही मस्तं असला तरी, बंद करून आधी दप्तर भरायला हवं. दप्तर भरेपर्यंत, कूकर उघडून वरणाचा दरवळ, आणि आईची हाक एकदमच येतात. अन त्यापाठोपाठ येतो अकराच्या गाण्यांचा ’कामगार सभेचा’ गाव.....

रेडिओ थोऽऽडा मोठा करीत पानावर येऊन बसायचं. पण मनाचं बोट धरून गाण्यांनी कधीच त्या गाण्यांच्या गावी नेलेलं असायचं नाही? अशाच काही सफरीत भेटलेलं हे गाणं.
आजकालचं माहीत नाही पण त्या काळी, गाणं कुणी गायलय, चाल कुणी दिलीये आणि कोण गातय, ते सगळं सांगितलं जायचं. पण ती एक निव्वळ ’माहिती’ असल्याने, कान देऊन ऐकण्यासारखं त्यात काही आहे, असं वाटण्याचे दिवसही नव्हते ते. उलट त्या वेळेत ’अजून पोळी?’ सारख्या प्रश्नाला उत्तर किंवा ’तूपाची लोटी?’ सारखा प्रश्नं विचारायची सोय असायची.

आज विचार करतेय की, असं काय आहे ह्या गाण्यात?
काहीतरी जोरदार झिंच्याक झिंच्याक रिदम, गाणार्‍याचा किंवा गाणारीचा सणसणीत आवाज, पाश्चात्य संगीतावर आधारीत चाल, वगैरे वगैरेत वाहून जाण्याचं वय. शब्दं-बिब्दं म्हणायला सोप्पे असावेत इतकीही अपेक्षा नसायची कारण आपल्याला सगळीच गाणी ’ला ला ला ला’ करत गाता यायची, चाल ’टा ट्ट ड्डा ड्डा डाऽऽऽ’ वगैरेत छानच जमते ह्याची खात्री होती. भेंड्या-बिंड्यात संपूर्ण गाणं म्हणायचा आग्रह करणारी माणसं एकतर खूप मोठी असतात किंवा नुकतीच लहानपण सोडून मोठी व्हायच्या गतीला आलेली असतात किंवा मग नक्कीच ’जाम बोअर’ तरी असतात... असं तेव्हा माझ्या वयाच्या बहुतेकांचं मत.

मग? असं काय आहे ह्या गाण्यात, की त्या वयातही कानांनी वेचलय आणि एक छानसा ओळखीचा चेहरा म्हणून का होईना पण आठवणींच्या कुपीत जपून ठेवलय?
त्याला शब्द आत्ता सुचला- वेधक! हे गाणं विलक्षण वेधक आहे. त्या वयातल्या त्या तसल्या मॅड चाळण्यांतूनही झिरपलय मनात.

मधल्या काळात मोठी झाले. गाणी ऐकण्याचा प्रवास, रेडिओव्यतिरिक्तही गावं घेऊ लागला. ते अकराच्या गाण्यांचं गाव मनातच राहिलं अन त्याबरोबर अगदी कधी कधीच का होईना पण दिसणारं हे एक गाणं, कुठेतरी गुल झाल्यासारखं झालं. गप्पांच्या, मित्र-मैत्रिणींच्या मैफिलीत अनेक जुन्या-नव्या गाण्यांची उजळणी व्हायची. कुठेतरी हे गाणं बुजर्‍या मुलीसारखं दरवाज्याआडून, कुंपणाच्या फाटकाशी ओठंगून असं आमच्या मैफिलींच्या अंगणात डोकावत राहिलं. पण इतर गाण्यांसारखं हातात हात घालून बागडलं नाही.

परवा श्रीनिवास खळ्यांच्या गाण्यांच्या सीडीजचा एक संच हाती आला. हपापून विकत घेतला. सगळीच्या सगळी गाणी एमपी३ प्लेयरवर घेतली... ’आजची’ बनून ’कालची’ गाणी ऐकत बाजारात निघाले. तशीही मी जरा ध्यानच दिसत्ये.. पण गाणं ऐकताना मी म्हणजे एक ’भान विसरलेलं ध्यान’, म्हणजे अगदीच काय म्हणतात ते.... कारण माणसं थबकुन, वळून बघत होती... असो.

तितक्यात भेटलं बेटं! प्लेयरच्या रॅंडम मोडमध्ये मध्येच कुठेतरी. माझं आठवड्याचं सामान घेऊन गाडीकडे जाताना.... म्हणजे अगदिच रॅंडम. हे म्हणजे कसं? तर एका एस्कलेटरवरून आपण खाली जाताना पलिकडल्या वर जाणार्‍या एस्कलेटरवर जाताना दिसावं ना, तसं दिसलं ते गाणं.... म्हणजे परत एकदा लांबूनच. भरलेली सामानची ट्रॉली ढकलताना असली गाणीच काय पण अगदी हातात वीणा-बीणा घेऊन खुद्दं नारद मुनी दिसले आणि त्यांनी हात हलवला तरी ओशाळे होऊन मान हलवत ती जडशीळ तिडबिड्या चाकांची ट्रॉलीच ढकलणार आपण.... अशी अवस्था, तिथे गाण्यांचं काय घेऊन बसलेय!

रात्री सारं आवरून झोपले.
http://www.esnips.com/doc/8efe895f-f2cd-46aa-84bd-ba19e3c7627d/Aaj-Aanta...

गडद्द झोपेची वेळा उलटल्यावर माझ्याही आधी हे गाणं जागं झालं असावं.... इतक्या मोठ्याने गाणं चालू असताना झोपणं शक्यच नाही... डोक्यात चालू असलं म्हणून काय झालं? बाल्कनीत येऊन उभी राहिले...... गाणं, मी सोडून इतर कुणाच्याच डोक्यात चालू नसल्याने बाकी सगळे सगळे झोपले होते.

दुधाच्या धारांनी चांदणं शिंपडलं होतं. अजून थोडा हात पुढे केला तर चांदण्याच्या पागोळ्यात भिजेल असं वाटलं. शांततेला आपल्या मनाचा आवाज असतो म्हणतात ते अगदी सत्य आहे. कारण ते गाणं सोडल्यास अगदी रातकिड्यांचाही आवाज नाही अशी सुरेल शांतता होती!

तेव्हा... तेव्हा भेटलं ते गाणं... अगदी कडकडून. वाटलं की अनेकानेक वर्षांचं ओळखीचं, जुन्या शेजारातलं कुणी... अनोळखी देशात भेटलं.
ते तसं, त्या अकराच्या गाण्यांच्या गावात, चुकत-माकत, कुठल्यातरी वळणावर वळताना... असं नाही.
तर भागल्या डोळ्यांनी आणि शिणल्या पायांनी न संपणार्‍या वाटचालीत एखाद्या देऊळाची घुमटी दिसली की त्या गाभार्‍यासमोर उभं राहून घेतलेल्या, देवाच्या धूळ-भेटी सारखं.
किती सहज तरी ओढाळ, बरचसं निर्हेतुक तरी हवहवसं अन असलच सहेतुक तरी निर्मोही!

अगदी जीवा-भावाचं असं कुणी अवचित भेटलं की कसं आजूबाजूचं जग रहातच नाही, ना....तस्सं.
शब्द-सूर सारं एक-आकार होऊन भेटू आलं. एक निखळ ’खळ्यांचं’ गाणं. हार्मोनियम, व्हायोलीन, तबला असल्या साध्या सोज्वळ पेहरावात सजून आलेले, मंगेश पाडगावकरांचे, उषा मंगेशकरांच्या आवाजाने प्राण फुंकले घरंदाज, शालीन शब्दं.

पदराचा आडोसा धरून एखादी कुलीन गृहिणी हाती मिणमिणती पणती घेऊन अंधारल्या पडवीत केवळ पाऊल टाकते तेव्हा नुस्ती ती जागा प्रकाशत नाही... तर तिथल्या प्रत्येकाच्या मनाचा प्रत्येक अंधारला कोनाडा उजळते.
हे फक्तं त्या दिवलीचं सामर्थ्य नाही. ती पणती धरले हात, ज्योतीची लवलव जपणारा पदर, ज्योतीवर एकलक्ष्य ठेवून उचललेलं एक एक पाऊल.... हे सारं सारं त्याला कारणीभूत आहे. तसच काहीसं ह्या गाण्याचं आहे.

आजं अंतर्यामी भेटे
कान्हो वनमाळी
अमृताचा चंद्रमा भाळी उगवला हो॥ आज...

फुलाचे केसरा घडे चांदण्याचा संग
आज अवघे अंतरंग ओसंडले हो ॥ आज....

मिटूनही डोळे, दिसू लागले आकाश
आज सारा अवकाश देऊळ झाला हो ॥ अंतर्यामी....

काही न बोलता आता सांगता ये सारे
आतली प्रकाशासी दारे उघडली हो ॥ अंतर्यामी....

मध माखले शब्द!
कान्हो-वनमाळीची भेट अशी इथे तिथे... पाणोठ्यावर, देउळी-रावळी नाही. तर भेट.... थेट अंतर्यामी आहे.
एका सुक्षणी, मनाच्या आंगणी, कर कटी घेऊन उभ्या ठाकल्या नीळ्या-सावळ्या नाथाचं हे अवचित आगमन आहे...

चांदण्याचा संग फुलांच्या केसरांना लाभतो तेव्हा असतो तो... गंधाला झळाळ लाभलेल्याचा सोहळा! गंधाला रंगाचा संग नाही हं... चांदण्याच्या शीतळ झिलमिल आभेचा संग!
त्याच्या गंध-आभेने मन नुसतं तृप्त होऊन... नव्हे नव्हे तर.... मन ओतप्रोत भरून उतू जाऊ लागतं, ओसंडून वाहू लागतं...

डोळे मिटून आतल्या आत पुंजाळलेल्या दृष्टीला त्याच निळ्यानाथाचं रूप आकाशही व्यापून उरलेलं दिसू लागतं... त्याच्या प्रीतीचा साक्षात्कार झाल्या मनाची दारे-कवाडे आता वाणीची बांधिल नाहीत...
"येथे भक्तिचा सूर्य उदेजला हो..." हे उद-घोषत स्वयंमेव त्याचीच आभा मनाचा कोपरान कोपरा उजळत बाहेर पडते.
हे गाणं निव्वळ सुरांचा प्रवाह नाही, ऐकणार्‍याच्या मनाचा हरेक अंधारला कोपरा उजळणारी ही एक दिवली... ’त्याच्या’च आभेचा हाही एक अविष्कार!
मी अन ते गाणं... असे तस्सेच तिथे किती काळ बसून होतो माहीत नाही. परत न हरवण्याच्या शपथा घेतल्याचं स्मरतं, मात्र.

*****************************************

थोडकं गाण्याबद्दल -
उत्कटता हा असा भाव आहे की त्याला शब्दात बांधणं म्हणजे वार्‍याला पदराच्या गाठीला बांधण्यासारखं. तरीही जेव्हा शब्दा-शब्दात तो असा जाणवतो आणि स्वरा-स्वरात असा व्यक्त होतो तेव्हा ती एक ’अजोड’ कलाकृती बनून सामोरी येते.

गाणं संपूर्णं जरूर ऐकून बघा. खळ्यांची ही चाल गाताना, उषाताईंनी नक्की श्वास कुठे कुठे घेतलाय तेच कळत नाही.
’आज’ ह्या शब्दाची ’आजं’ (’ज’ पूर्ण) आणि ’आऽऽज’ अस वेगवेगळा उच्च्चार करून वेगळी गंमत आणलीये. अर्थात त्याला तशी स्वरांची साथ आहे. त्या ’आज’ला असा काही स्वरसाज आहे आणि उषाताईनी तो असा काही गायलाय की माझ्यामते... डोळ्यातून सहज ओघळणार्‍या आनंदाश्रू सारखा तो ’आssज’ ओघळतो...
श्रीनिवास खळ्यांच्या चाली आधी इथे-तिथे गाऊन मग एक दिवस खुद्दं त्यांच्याकडेच त्या चाली शिकण्याचं भाग्यं लाभलेल्या एका प्रसिद्धं गायिकेनं व्यक्तं केलेलं मत - त्यांची चाल त्यांच्याकडून शिकल्यावर हे लक्षात आलं की आधी किती चुकीचं गात होतो आपण.

खळ्यांच्या चालीत र्‍हस्व-दीर्घ, संभाळत, श्वासाचा योग्यं तो उपयोग करणं, अन हे सगळं तालात करणं ही तारेवरली कसरत असते.
"मिटूनही डोळे दिसू लागले आकाश"!! मी मी म्हणणार्‍या गाणार्‍यांची सुरात-तालात फेफे उडेल अशी रचना आहे सुरांची, इथे. नुस्ती तालावर अन सुरावर हुकुमत असून उपयोग नाही. श्वासाचा नेमका उपयोग न झाल्यास कुठेतरी शब्दं, लकेर तुटून ह्या एकसंध रेशीम वस्त्राची दशा लोंबल्यासारखं होईल.

चाल ऐका. अन ’आssज’, ’अंतर्यामी’, ’कान्होवनमाळी’ हे शब्दं किती काळजीपूर्वक उच्चारलेत.... नव्हे "ठेवलेत" ते ऐका. "उच्चार" व्याकरणदृष्ट्या निर्दोष वगैरे पुरतो. शब्दांचं "ठेवणं"... सूर-तालाच्या कोंदणात ठेवलेल्या हिर्‍यासारखं हवं. त्यांची जागा जssरा हलल्यास, गाण्याचं हे आखीव रेखीव घडीव शिल्पं ढासळेल.

तबल्याचा नेहमीचा भजनी ठेकाच. पण तबला "ऐकणार्‍यांनी" ध्यान देऊन ऐका. एक जास्तीचा ठोका आहे नेहमीच्या "धींsधा धींधीं धा" मधे.
ठेका, "धींधिगदा धींधीं धा"... असा वाजतोय. किती छोटी गोष्टं पण केव्हढी सुरेख कुसर... त्या एका हरकतीने, मला भजनीच्या ह्या ठेक्याचं बासुंदीचं एक भांडं आहे आणि एकदम त्यात डुबकी मारल्यासारखं काहीतरी (मॅडकॅपच) वाटतं.

एकदा हरवून मग कडकडून भेटू आलेल्या गाण्याचं किमान इतकं कोड पुरवल्याविना राहवलं नाही... हे गाणं आहेच तसं गुणी.
समाप्तं.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दाद..

मी याआधी दृष्टी वाचलं होतं तेव्हाच जाणीव झालेली या प्रतिभेची. आणि आज हे गानभुली वाचताना स्तिमित झालो.. एकदम मनस्वी.. असं वाटलं मी मलाच बघतोय या लेखात. किती सुंदर उपमा, किती तरलता, किती प्रवाही आणि ओघवतं निवेदन. एखाद्या डौलदार हमरस्त्यावरून मर्सिडीज मधे जाताना रस्त्यात अगदी वळनावरही जरा म्हणून कुठेही एखादा खडा सुद्धा येऊ नये..... भर उन्हात आंब्याच्या झाडाखाली बसून आईसपॅकमधून कुल्फी आईस्क्रीमचा आस्वाद घ्यावा तस्स वाटलं अगदी !! लहानपणापासूनच्या आठवणींचा जागर कल्लोळला..

आणि ते गाणं मनात वाजणं वगैरे तर...!! अगदी अगदी ...सेम हिअर !!

मी काय म्हणू या लेखाला ?? थँक्स म्हणावंस वाटतंय फक्त !!!

- भिब्ररा ( किरण)

( तेरे बिना जिंदगी से कोई.. या गाण्यावर ऑर्कूटवर लिहीलेलं तीनेक वर्षांपूर्वी. ते लिखाण कित्येकांनी चोरलं. आपल्या नावावर खपवलं. या निमित्ताने ती आठवण ताजी झाली. आता माझंच अकाऊंट डिलीट झालंय्..पण आठवलं तर माबोवर लिहीन पुन्हा )

>> तो काळ माझ्या शाळेतला, म्हणजे खूप जुना. शाळेत जायची वेळ झालीये....
दप्तर भरण्याची घाई. जो काय चाललाय तो धंदा कितीही मस्तं असला तरी, बंद करून आधी दप्तर भरायला हवं. दप्तर भरेपर्यंत, कूकर उघडून वरणाचा दरवळ, आणि आईची हाक एकदमच येतात. अन त्यापाठोपाठ येतो गाण्यांचा गाव.
>>

वाह दाद! Happy सकाळी ६ पासून आमच्याकडंही रेडिओ चालू असतो. पूर्वीही असायचा. ते वर्णन करायचं म्हटलं, तर अगदी असंच करावं लागेल! एकदम परफेक्ट!
हे गाणं ऐकलेलं नव्हतं. पण मस्त वाटलं ऐकताना. तोच पहाटेचा फिल आला. मस्त! Happy संपूर्ण लेखच मस्त!!!

@ शशांक पुरंदरे,
>>> पुरंदरे शशांक
11 April, 2011 - 00:00
कृपया http://www.maayboli.com/node/24591 वाचणे व ऐकणे
>>>
धन्यवाद विपुबद्दल! Happy

सुनिल अगदी अगदी सेम हिअर !
सकाळी सकाळी सनई वादनाने चालू होणारी आकाशवाणी, भक्तीसंगीत, मग शेवटी एक समूहगान किंवा हिंदी भक्तीगीत, मराठी बातम्या, संस्कृत बातम्या, इ. सारे सारे आठवले. गेले ते दिन गेले !
काही भक्तीगीते तर अनेक वर्षे झाली ऐकलीच नाहीयेत.
"ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता, लक्ष द्या हो विनविते मराठी मी त्याची माता"
"अशोक चक्रांकिता ध्वजा ही राष्ट्राची देवता"
"टाळ मृदुंग दक्षिणेकडे, आम्ही जातो पश्चिमेकडे" हे गाणे निट आठवतच नाहीये.
"धम्मासी मानितो जो भगवान शाक्यपुत्रा"
या यादीत अजुन भर घाला कोणी तरी.

दाद, आज मला तुझी खूप खूप खूप आठवण आली. गेले तीन दिवस ईथे (पुण्यात) भारतातील पहिलाच असा वैशिष्ट्यपुर्ण कार्यक्रम झाला. तालवाद्यातील मोठमोठे दिग्गज एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्याचे काम प्रसिद्ध तबलावादक विजय घाटे यानी केले . एकूण चार सत्रात हा अविस्मरणीय असा कार्यक्रम झाला. तु पुण्यात असतीस तर एक मस्त लेख आम्हा माबोकरांना वाचता आला असता. मी चारही सत्रांना न चुकता हजेरी लावली.
पं. कुमार घोष, विजय घाटे, तौफिक कुरेशी, पं. भवानीशंकर, विद्वान विख्खु विनायक्राम (घट्ट्म), व्ही. सेल्वा गणेश, फजल कुरेशी, नितीन शंकर, श्रीधर पार्थसारथी, नवीन शर्मा, आणि शिवमणी.

दाद
काय दाद देवू या लिखाणास? शब्दच नाहियेत.
केवळ कट्यार काळजात घुसली.
हे गाणं तुमच्या रसग्रहणा आधी ऐकले होते पण आत्ता उमजले ते वाचून.
जियो!!
Happy

अतीव सुंदर गाण्याची तितकीच अपूर्व ओळख! हे गाणं ऐकताना खरोखरीच तो कान्होवनमाळी भेटल्याचा भास
होतो नेहमीच. आणि हा लेख वाचून तो अगदी सजीव झाला!

कामगार सभा थेट बालपणात घेऊन गेली.

अतीव सुंदर गाण्याची तितकीच अपूर्व ओळख! हे गाणं ऐकताना खरोखरीच तो कान्होवनमाळी भेटल्याचा भास
होतो नेहमीच. आणि हा लेख वाचून तो अगदी सजीव झाला!

कामगार सभा थेट बालपणात घेऊन गेली.

अतीव सुंदर गाण्याची तितकीच अपूर्व ओळख! हे गाणं ऐकताना खरोखरीच तो कान्होवनमाळी भेटल्याचा भास
होतो नेहमीच. आणि हा लेख वाचून तो अगदी सजीव झाला!

कामगार सभा थेट बालपणात घेऊन गेली.

हे किंवा खरं तर बरीचशी गाणी मीही लहानपणापासुन रेडिओवरच ऐकलीत.. उषाताईंच "कान्हु घेऊन जाय" ऐकलं असणार तुम्ही .. काहीवेळा त्यांच्या आवाजातलं वैविध्य त्याकाळातल्या प्रिफर्ड गायिकांपुढे थोडं झाकोळ्लं गेलं असणार असं मला उगीच वाट्तं...
लेखाबद्द्ल असं वाटतं ़की फक्त ललित ठेवलं असतं तर जास्त मजा आली असती आणि तांत्रिक किंवा दुसरा भाग हा एक वेगळा लेख झाला असता म्हण्जे मला फार छान उपमा येत नाहीत पण लग्नात तिखट जेवण एका दिवशी आणि बासुंदी पुरी ज्या दिवशी त्या दिवशी त्याच मेन्युवर ताव मारायचा तसं... म्हण़जे दोन्ही जेवणं आपल्या ठिकाणी उत्तमच तसं काहीसं.... Happy

_/\_

अवर्णनीय झालाय हा लेख, तू निवडलेलं गाणंही मनात रुतून बसलेल्यांपैकी एक. केवळ अप्रतिमच. किती जणांना हळवं करून सोडतेस अगं तू. तुझे लेख वाचताना सतत गो. नि. दांडेकरांच्या शैलीची आठवण येते. स्वतःचं भारावलेपण तंतोतंत दुसर्‍यापाशी पोचतं होतं! शिवाय त्या त्या भावाला साजेशा रम्य शब्दांचा नुसता सडा असतो Happy

लेख वाचताना उषाबाईंची 'थांब रे घना जा निरोप घेऊनी सांग मोहना', 'साजणी सई ग', 'ना ना ना नाही नाही नाही रे', 'आता लावा लावा शिळा', 'जाऊ देवाचिया गावा', 'पालखी हाले डोले' अशी खुप सारी अविट गोड गाणी आठवली. ही सारी रेडिओवर ऐकणे म्हणजे पर्वणी कारण अनपेक्षितपणे ऐकायला मिळतात. रेडिओबद्दलही पुन्हा तू म्हणतेस तसंच, तो आजही सखा आहे. आकाशवाणी आणि विविधभारती दोन्ही आम्ही मनोभावे ऐकतो आणि घराची वेळापत्रकेही रेडिओप्रमाणेच चालतात. प्रभातवंदन् - संस्कृत बातम्यांपासून ते नभोनाट्यापर्यंत आणि संगित सरिता ते हवामहल. कार्यक्रमांचा दर्जा आजही उत्कृष्ट असतो हे विशेष.

महेश, 'टाळ मृदुंग पश्चिमेकडे'चा अभंग 'प्रेम पिसे भरले अंगी, गीते संगे नाचो रंगी, नाचो रंगी'. वाणी जयरामांचा. तुमच्यामुळे त्यांचं 'काय माझा आता पाहतोसी अंत'ही आठवलं, खुप खुप धन्यवाद.

दाद, मीही एक फर्माईश करू का? आशाच्या सर्वसाक्षीतल्या 'बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले'वर लिही ना असंच. इंदिरा संताची अनोखी कविता, भास्कर चंदावरकरांची बुद्धिमान चाल आणि पडद्यावर साक्षात स्मिता! अति दुर्मिळ आणि उत्कट कॉम्बिनेशन्स्पैकी एक. तुलाही आवडत असावं कदाचित.

सई, खूप छान आहे तुझा प्रतिसाद. तू सुचवलेलं गाणं मला ऐकल्याचं आठवत नाहीये. पण आत्ता जरूर ऐकेन.
गाणं कडकडून भेटलं तरच त्यावर काही लिहिता येतं. तेव्हा तू भेटवते आहेस त्या गाण्यानं गळामिठी घालावी अशी इच्छा आहे Happy
गोनीदा.. माझी खूप खूप जवळचे आहेत.

आ हाह!

कसं काय सुचतं तुम्हाला असं देव जाणो.
अगदी खोलं जाऊन बसलं गाणं.

सकाळी डोळे उघडण्याआधी दादांनी लावलेलं 'प्रभातवंदन' आठवलं

अंतरंगी तो प्रभाती छेडीतो स्वर बासरी ... ती बासरी जिथे आजही जपलेली आहे तिथे जाऊन बसला हा लेख.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,शाम

Pages