गानभुली - आये ना बालम

Submitted by दाद on 16 March, 2011 - 22:25

उ. बडे गुलाम अली खासाहेब - http://www.youtube.com/watch?v=huhf7xBCIU4
आये ना बालम
का करू सजनी
आये ना बालम
तरपत बीती मोरी उनबिन रतिया॥
रोवत रोवत कल नाही आवै
उनबिन मोरा जियरा जलावै
याद आवत है उनकी बतिया ॥

कनिका मित्रा - http://www.youtube.com/watch?v=lJiVU3aVKJA

बारा-तेरा वर्षं झालीत तरी ती संध्याकाळ अजून ताजी आहे. कलकत्त्याच्या कनिका मित्र म्हणुन एक गुणी गायिका सिडनीला भेट देऊन गेल्या. बडे गुलाम अली खान साहेबांच्या एका पट्टशिष्येची ती शिष्या. पतियाळा घराण्याचं गाणं गुरू घरी राहून शिकलेल्या. त्यांच्या सोबत दोन अख्ख्या संध्याकाळ घालवण्याची आणि दोन कार्यक्रमांना साथीची संधी मिळाली.

आधी कधी बघितलेही नाहीत असले साथिदार घेऊन कार्यक्रम करण्याची त्यांची हिम्मत मुळात दाद देण्यालायक. दुसर्‍याच संध्याकाळी माझ्या लाघवी ("आगाऊ") स्वभावानुसार गेल्या गेल्या मी माझ्या अवाक्याच्या बाहेरचा घास घेतला आणि त्यांना विनंती केली, ’दीदी, ’आये ना बालम’ सुनायेगी? प्लीज?’

घराण्याचं गाणं आयुष्यभर जोपासलेल्या कलाकाराकडून घराण्याची चीज ऐकणं हा दुर्लभ योग असतो.... आणि मी तो सोडत नाही. चीजेचं मूळ सौदर्य उलगडून दाखवण्याचं कौशल्य त्यांनाच जमतं. (हे पूर्णत: माझं मत).
पहिल्यांदा तर दीदी अवाक झाल्या.
’ना बाबा ना. मै तो ना गाऊंगी. मेरी गुरू दिदीभी इन्हे आम नही गाती. अरे, ये तो बडे गुरूजी की चीज है. ना! किछ्छू ना!.
त्यांच ते नाकारणंही किती लोभस होतं. पण इतक्यावर ऐकेन तर ती मी कसली. परत नेट लावला. शेवटी त्या ज्यांच्या कडे उतरल्या होत्या, त्या त्यांच्या गुरू भगिनी, त्यांनीही "बंगलात" आग्रह केला.

दीदी एका अटीवर तयार झाल्या, त्या गुरू दिदींना फोन करतिल आणि त्यांची परवानगी असल्यासच गातील. लगेच कलकत्त्याला फोन केला. बंगालीतलं भाषण कळलं नाही पण फोन ठेवताना दीदींनी तिथेच जमिनीला हात लावून आपल्या गुरूंना केलेलं वंदन बघून मात्रं माझ्या गळ्याशी दाटून आलं.

एव्हाना संध्याकाळ झाली होती. सूर्य डोंगराआड गेला होता. अगदी ’या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या....’तल्या सारखी व्याकूळ करणारी तिन्ही सांज. एकलेपाणाची तीव्रता या वेळी जितकी जाणवते तितकी इतर कोणत्याही वेळी नाही जाणवत.
गर्दीतही एकटं करणारी ती वेळा, स्वरात झणझणणारे तानपुरे, कनिकादींसारख्या समर्थं कलाकाराची संगत, आणि विरहाची वेदना अधिक उत्कट, अधिक तीव्र करणारा सिंधू भैरवीतला तो सुप्रसिद्ध दादरा- आये न बालम! नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा आला.

दीदी स्वत:शीच विचार करीत आल्या आणि बैठकीवर बसल्या. थोडावेळ नुसतच त्या दादर्‍याबद्दल बोलत राहिल्या. मग तानपुरा पुन्हा लावून त्यांनी कानावर हात ठेवून सा लावला. आणि मोत्यांच्या लडीसारखी ओळ घरंगळली....

आये न बालम....

ठेक्याचा अंदाज घेत त्यांनी दोनदा तीच ओळ म्हटली आणि पुढची ओळ न म्हणता....
तबल्यावर हात ठेवला. मला थांबायचा इशारा होता. माझं काही चुकलं की काय असं समजून मी त्यांच्याकडे बघितलं. माझ्या हातावरची त्यांची बोटं थरथरत होती.
माझ्याकडे एक रिकामी नजर टाकून त्यांनी नि:श्वास सोडला आणि डोळे मिटले. तानपुरा वाजतच राहिला.
एका संथ लयीत त्यांचा श्वास चालला होता. डावी भुवई किंचित उठली होती, ओठ, पापण्या सूक्ष्म थरथरत होते. चेहरा लाल झाला होता.

ती घराण्याची चीज, तिचे शब्दं तिचे स्वर,.... ह्या सार्‍याला एक दैवी, पवित्र झळाळ होता. गुरूंच्या गुरूंनी प्रत्यक्षात आणलेली ती अतीव विरहाची वेदना, तिला आपल्या स्वरांनी, श्वासानेही स्पर्श करण्यापूर्वी ही गुणी कलाकार नतमस्तक होऊन थांबली होती.
त्या देवदत्त देण्याचं ओझं उचलण्याआधी, किंबहुना त्याला स्पर्शही करण्याआधी त्या विनम्र झाल्या होत्या. त्या गाभार्‍यात शिरण्यापूर्वी, दारातच पायरीशी झुकल्या होत्या.
कुठेतरी आपल्याच आत त्या दादर्‍याचं, त्यांच्या गुरूंनी ’ह्या हृदयीचे त्या हृदयी’ घातलेलं मूर्त रूप आठवत, निरखत, त्याची पूजा बांधण्यासाठी बळ शोधत राहिल्या.

काही क्षणातच त्यांनी मिटल्या डोळ्यांनीच परत सा लावला.
आये न बालम....
का करू सजनी, आये न बालम

ती संपूर्ण संध्याकाळ तीन-चार तास फक्तं ’आये न बालम’ ची आळवणी झाली.

तरपत बिती मोरी, तुमबिन रतिया....

एका एका शब्दाच्या उच्चाराला, उचलण्याला, स्वरांच्या हेलकाव्यांना, आलापांना, आणि दोन आलापांच्या मधल्या शांततेला, मुरक्यांना, झटक्यांना, तानांना.... या सार्‍या सार्‍याला झालेल्या परतत्व स्पर्शाचं भान राखत गात होत्या. त्यांच्या गुरूंनी कधी काळी शिकवलेली, साकार केलेली मूर्त डोळ्यांआड दिसत होती. तिला आता आपल्या श्वासाची फुंकर घालीत प्राण चेतवीत होत्या. त्या दादर्‍याच्या मूळ रूपाशी एकरूप होण्यासाठी त्यांची स्वरांनी बांधू घातली ती पूजा, ती विनवणी, ते आर्जवं, ती प्रार्थना संपूर्ण संध्याकाळभर माझ्या आजूबाजूला वावरत राहिली.

मुद्दाम त्यांची अन उस्तादांची ठुमरी ऐकून पहा... कितीतरी साम्यं आहे. नुस्ती चाल अन ठुमरीच्या चलनाचीच नाही. पण शब्दोच्चारही.
उदा. "आये" ह्या शब्दाचा उच्चार. तो "ये" फारफार ठरवून जवळ जवळ प्रत्येकवेळी तसाच उच्चारलाय... जसा त्यांच्या गुरूंनी त्यांना शिकवलाय तस्सा.
घराण्याची शुचिता जपण्याचं काम कितीतरी गायक ह्या इतक्या सचोटीनं अन संयमानं करतात.

मुळात भैरवी जरी शेवटी मैफिलीला पूर्णविराम देण्यासाठी गायली जाण्याची रीत असली तरी, ज्या पद्धतीनं गावा तशा भावनेचं अवगुंठन घेऊन, हा राग उभा रहातो. म्हटलं तर भक्तिरस, म्हटलं तर शृंगार किंवा ह्या दादर्‍यात साकारलेली अतीव विरहाची वेदना.

मुळात ह्याला "दादरा" म्हणायचं की नाही हा प्रश्नच आहे. "दादरा" ही गायनप्रकार दादरा तालात (सहा मात्रा) किंवा दादर्‍याच्या ठेक्यात म्हटला जातो. माझ्या ऐकण्यात ही ठुमरी केहरव्यात किंवा केहरव्याच्या ठेक्यात (आठ मात्रा) च आहे. पण त्यांनी आवर्जून हा दादरा असल्याचं सांगितलं.... अन तरीही केहरव्याच्या तालात म्हटली. बडे उस्तादांनी अन खाली दिलेल्या दुव्यात, पद्माताईंनीही केहरव्यातच म्हटलीये. कुणी जाणकार भेटतात तेव्हा हा प्रश्नं विचारण्याची आठवण ठेवायला उपरण्याला गाठ मारून ठेवायला हवी.

पद्मा तळवलकर - http://www.youtube.com/watch?v=b9z9Ms2LhqA&feature=related
पद्माताईंनी गायलेल्या ह्याच ठुमरीचं चलन किंचित वेगळं आहे... पण तितकच मोहक.

कनिकादींना साथ केलेला हा कार्यक्रम किमान बारा-तेरा वर्षंतरी जुना आहे. पण अजूनही कधीतरी ’आये ना बालम’ चे स्वर ऐकू आले तरी अवचिता परीमळू लागते, ती संध्याकाळ, अन माझ्या समोर साकारली ती त्यांची पूजा, त्यांची विनवणी, त्यांची प्रार्थना!

समाप्तं

गुलमोहर: 

हा लेख जुन्या मायबोलीवर किंचित वेगळ्या रूपात होता. कनिकादींच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग हातात आल्यावर इथे गानभुलीमधे तो लेख बदलून टाकतेय.
त्या कार्यक्रमाचं शूटिंग सिडनीतल्या, स्थानिक कलाकारांवर किंचित अधिक (?), अन त्यातही माझ्यावर अधिक लोभ असलेल्या एकांनी केल्यानं, तबल्यावर बराचकाळ फोकस आहे. तेव्हढं सोडून देऊया Happy

वा, सुंदर, सुरेख ...... हे आणि आणखी कितीतरी! किती छान लिहिता हो तुम्ही. अगदी मैफिलीत ऐकायला बसल्यासारखंच वाटतं.

लिंक्सबद्दल आभार.

व्वा, दाद. थोर भाग्यच म्हणावं कि. किती छान शब्दात मांडलंस. 'आये न बालम' इतका सुंदर फिल ते ही फक्त शब्दात मांडणं तुम्हालाच जमतं.

लिंक्स बद्दल आभार.

आये ना बालम बद्दल लिहिणं आणि ते वाचणं हाच एक वेगळ अनुभव असतो.. खरच गानभुली आहे ही.. खू.....प सुंदर...! आपणच लिहु शकता... Happy

सुरेख अनुभव! कसलं ग्रेट लिहलंय.

रच्याकने, त्या तबला वाजवणार्‍या आपणच का?
लईच ऐंजॉय करताय गाणं! Happy

ज्या पद्धतीनं गावा तशा भावनेचं अवगुंठन घेऊन, हा राग उभा रहातो>>> अनुमोदन. अनुमोदन.
मला कित्येकदा भैरवीमध्ये आनंदही दिसलेला आहे. विशेषत: मालिनीताईंच्या २-३ भैरवी सादरीकरणांमध्ये बंदिशींनुसार भैरवीचा टोन बदलताना पाहिला आहे.

दाद, नेहमीप्रमाणेच मैफील उभी राहिली डोळ्यासमोर.
इथे थेट परंपरा लाभलेल्या कलाकाराने दाखवलेला विनय बघता, कमी तालिम मिळालेले काही कलाकार, या चीजेला हात घालायचे धाडस करतात, त्याचे आणखी सखेद आश्चर्य वाटले.

सुंदर.... ती मैफलच अनुभवली तुमच्या शब्दांच्या साथीने! यूट्यूब लिंक्स बद्दल धन्यवाद. Happy

छान.. लग्गी मस्त.. तोडीही छान घेतल्यास.

>>सिंधू भैरवीतला तो सुप्रसिद्ध दादरा- आये न बालम!
तुला "केहरवा" म्हणायचे आहे का?

रच्याकने, त्या तबला वाजवणार्‍या आपणच का?
लईच ऐंजॉय करताय गाणं!

दाद

तुमचे तबलावादन ही अप्रतिम. मला जास्त काही कळत नाही, पण अगदी सुंदर लय बांधता तुम्ही.

ती घराण्याची चीज, तिचे शब्दं तिचे स्वर,.... ह्या सार्‍याला एक दैवी, पवित्र झळाळ होता. गुरूंच्या गुरूंनी प्रत्यक्षात आणलेली ती अतीव विरहाची वेदना, तिला आपल्या स्वरांनी, श्वासानेही स्पर्श करण्यापूर्वी ही गुणी कलाकार नतमस्तक होऊन थांबली होती. <<<

दाद, शिष्येच्या मनातल्या भावना व्यवस्थित पोचल्या.

सकाळी प्रतिक्रिया द्यायचा मोह होत होता. म्हंटल घरी जावुन व्हिडीओ बघुया मग देवुया.
तर.. सगळा वेळ आम्ही आपले तुझ्या हाताकडे आणि त्या हाताच्या स्पर्शाने मोहरुन जावुन निरनिराळे आवाज काढणार्‍या तबला आणि डग्या कडे बघत होतो. Happy

धन्यवाद... आभारी आहे, सगळ्यांची.
ट्यागो, होय. मी वाजवतेय, तबला. मी गाणार्‍यांपेक्षाही गाणं एंजॉय करते असा माझ्यवर आरोप आहे Happy
योग, ठेका केहरव्याचा आहे... बरोबर. पण ह्या गायन प्रकाराला दादरा म्हणतात.
अनिलभाई, Happy
गाणं ऐका हो... हा दादरा ऐकवला तेव्हा आधीच अडीज तास गाऊन झालं होतं. लोक उठायला तयार नाहीत... दीदी मनापासून ऐकवत होत्या.

रैना, काही काही रागांचं असं माझ्यासाठी अवघड आहे. लिहिताना, हातात किती आलं त्यापेक्षा किती सांडून गेलय अन दरवळतय तेच अधिक जाणवतं मग काही लिहूच नये असं होतं.

दाद, नेहमीप्रमाणेच अप्रतिम!!!

मैफल डोळ्यासमोर उभी केलिस Happy दोन्ही लिंक्स बद्दल धन्यवाद Happy

मी पण घरी जाऊन ऐकली क्लिप. Happy दाद, दुव्यासाठी धन्यवाद. गायन, वादन आणि लेखन - सगळ्यालाच मनापासून दाद!

दाद,
माझ्या माहितीनुसार आणि ईतर जाणकारांकडून ऐकले त्यानुसार "दादरा गायन" हे मुळात दादरा तालात बसवलेले असते. पण कदाचित तसे नसेलही.
आये ना बालम ही प्रसिध्ध "ठुमरी" आहे हे माहित होते. असो ज्ञानात भर पडली. Happy
(पं. अजय चक्रवर्ती यांनी हीच ठुमरी एका मैफिलीत गायलेली त्याचे लाइव्ह रेकॉर्ड आहे... अपलोड करेन.. काहीच्या काही ऊंचीवर नेवून ठवेलय..पब्लिक ने डोक्यावर घेतलय ऑडी.)

शलकातै, मला कुण्णी़ कुण्णीदेखील दिसलं नै. फक्त तबला आणि तुमी दिसत होत्या. अन कधी कधी गाणं पन ऐकायला येत होतं. Happy

<<<<दाद, नेहमीप्रमाणेच मैफील उभी राहिली डोळ्यासमोर.>>>>>दिनेशदांना १००% अनुमोदन!
दाद, तुमच्या लेखांनी आम्हाला अक्षरक्षः भूल घातली. Happy
हे झालं तुमच्या लेखाविषयी. आता तुम्ही दिलेल्या लिंक्स बघते.

पुन्हा एकदा आभार सगळ्यांचे.
योग, तुझं १००% खरं आहे तेव्हा एव्हढ्यातच त्यावर बोळा फिरवू नकोस. हा प्रश्नं मलाही होताच. हे लेखात यायला हवं होतं.
प्रॅक्टीसला सुरुवातीला, त्यांनी हा दादरा आहे म्हटल्यावर मी चकले. कारण मी ह्या ठुमरीला लावलेले ऐकलेले ठेके चारच्या पटीतलेच होते. तरीही दादर्‍याचा ठेका लावला पहिल्यांदा... तेव्हा त्यांना ठेका केहरव्यात बदलायला सांगितला.
फक्तं हा काय घोळ आहे तेव्हढं विचारायचं राहिलं ते राहिलच.
इथे जाणकार ह्याबद्दल चर्चा करतिल अशी आशा आहे. मी लेख जमेल तितक्या लवकर बदलतेय.
खूप आभारी आहे, तुझी. आता लेख अधिक स्पष्टं होईल.
गंमत म्हणजे (ज्यांनी ही ठुमरी ऐकलेली नाही त्यांना) ह्या मूळ कवित्तात तीनाच्या पटीत लय दिसण्याची शक्यता अधिक आहे. उ. बडे गुलाम अली साहेबांना चाराच्या पटीत दिसली म्हणून ठुमरी?
माहीत नाही... खरच इथे चर्चा व्हायला हवी.

गायनाची तांत्रीकता फारशी समजली नाही तरीही लेख छानच वाटला. अगदी वर म्हणल्याप्रमाणे त्या बैठकी असल्याचा फील आला.

दाद, छान लेख Happy
>>"दादरा गायन" हे मुळात दादरा तालात बसवलेले असते
योग.. हे बहुधा पूर्णपणे बरोबर नाही. माझ्या माहितीप्रमाणे दादरा हा मुळात लाईट तालात गायला हाणारा प्रकार आहे, साधारणतः दादरा, केहरवा वगैरे.
चु.भू. द्या.घ्या.

Pages