आनंदाची वाट-भाग ३

Submitted by रेव्यु on 22 March, 2011 - 07:33

आनंदाची वाट
भाग ३

भाग १ http://www.maayboli.com/node/24514#new
भाग २ http://www.maayboli.com/node/24533
आम्ही सप्टेंबर मध्ये नाशिकला आलो.आल्याबरोबर पहिल्या प्रथम नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंडशी संपर्क साधला.त्या शाळेत गेलो.त्यांना वरचेवर भेट दिली व परिचय वाढवला .त्यांना मराठी पुस्तके हवी होती. हिची मातृभाषा कानडी -त्यामुळे शुध्द्लेखनाचा व व्याकरणाचा मोठा प्रश्न होता.मराठीचा अभ्यास करून व गरज पडेल तिथे माझी मदत घेऊन तो अडसरही दूर केला.इथेही पुस्तके देण्यास सुरुवात झाली.फरिदाबाद चालूच होते/आहे.त्या मुलांबद्दलची आस्था एक आकांत,पॅशन झाली होती.
एके दिवशी सायंकाळी अचानक फोन वाजला.आवाजावरून व उच्चारा वरून वयस्क वाटणारे एक दक्षिण भारतिय सद्गृहस्थ हिला भेटू इच्छित होते.प्रत्यक्ष भेटीतच हेतू सविस्तरपणे सांगणार होते.
ठरल्या वेळेस रात्री ८ वा मध्यमवयीन पण अकाली वार्धक्य आलेले ते गृहस्थ घरी आले.वार्धक्या कडे झुकलेले दिसत असूनही त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रसन्नता अन दुर्दम्य सकारात्मकता अन आशा वाद जाणवत होता.ते नाशिकच्या एका खूप मोठ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट होते,आय आय टी मधून एम टेक झाले होते,त्याना दोन अपत्ये.एक मुलगा व एक मुलगी,२० व २२ वर्षांची. वयाच्या दहाव्या वर्षी एका पाठोपाठ "ट्युब व्हिजन" नावाच्या एका दुर्धर व्याधीने या मुलाना अंधत्व आले होते.या मुलांना स्वावलंबी करण्यास शिक्षण हा एकच पर्याय आहे याची त्यांची खात्री पटली होती-नव्हे निग्रह होता.त्यांच्या डोळ्यासमोर हेलन कीलर्,मोझर्ट्,मिल्टन अन वेद मेह्ता यांच्या सारख्या दि:गजांचे आदर्श होते अन या लोकांचा आदर्श ठेवून त्यांना आपल्या मुलाना ज्ञानदानातून दृष्टीदान करायचे होते,
त्यांच्या या ध्येयवादास साथ देणारी,तेवढीच अट्टाहासी,ताकदीची,निग्रही,ब्रेल जाणणारी व त्या मुलांच्या व्यथा जाणणारी शिक्षिका त्यांना हवी होती.त्याना मदतीचा नेतृत्वाचा हात हवा होता.
त्यांची मुले मॅट्रिक झाली होती अन आता बी ए ला प्रवेश घेऊ इच्छित होती करेस्पाँडन्स कोर्स द्वारा.
त्यांच्या घरचे वातावरण देव देव करीत "तोच तारणारा,त्याच्याच मनात हे होते तर आपण काय करणार्"असे अन्ध विश्वासाने अन हताशेने भरले अन भारलेले होते.ताईत्,गंडे,अन प्राक्तन यांचे वर्चस्व मानणारे घरातील बाकीचे होते.
याच्या विपरित शिक्षण हा एकमेव उपाय्,आत्मविश्वास अन स्वावलंबन ही एकच या मुलांचे उर्वरीत जीवन संपन्न करण्याची गुरुकिल्ली आहे असा संकल्प सोडणारे वडील होते.
या सर्व प्रस्तावाचा अर्थ अन परिणाम काय ,आपणही फक्त बी ए च आहोत्,तेही १९७६ सालच्या -याचा यत्किंचित विचार न करता,हा एक इश्वरी संकेत अन आपल्या ध्येयास नवीन दिशा देण्याची संधी आहे एवढाच विश्वास ठेवून हीने हो म्हटले.अंतर्मनाच्या एका सकारात्मक सादेस तिने तितकाच प्रामाणिक प्रतिसाद दिला होता.
एका कठिण अन तितक्याच संपन्न प्रवासाची सुरुवात इथून झाली. आता आयुष्य एक नवे वळण घेत होते.
सर्व पुस्तके घरी आणली.इंग्रजी,इतिहास्,राजकीय विज्ञान यांचा २५ वर्षापूर्वीचा अभ्यासक्रम्,शिकविण्याची पध्दत यात जमीन आसमानाचा फरक होता.त्यात हे सर्व त्या अंध मुलाना शिकवायचे होते श्राव्य माध्यमातून्.वयाच्या ५१ व्या वर्षी बी ए च्या पहिल्या वर्षाचा अभ्यास करायचा होता.अख्खा कोर्स डोळस मुलांसाठी तयार केला होत IGNOUने.
नवीन कोर्स्,वयाची पन्नाशी,त्या विषयाच्या सर्व धड्यांचे श्राव्य ध्वनी फितीमध्ये परिवर्तन करणे(म्हणजे धडा वाचून टेप्रेकॉर्ड करणे),त्या टेपवर ब्रेल मध्ये विषयाची पट्टी डकवीणे,त्या मुलांना ऐकविणे,ते जे बघू शकत नाहीत वा समजू शकत नाहीत ते समजाविणे ,उत्तरे त्यांच्याकडून ब्रेलमध्ये लिहून घेणे,असाईनमेंट मंडळाकडे पाठविणे इ असंख्य नवीन गोष्टी ती उत्साहाने करीत होती.याच बरोबर ही सर्व वाटचाल त्यांच्या घरातील अंधश्रध्देची निराशादायी वातावरण असूनही चालू ठेवायची होती.सामान्य व्यक्तिस हताश करणार्‍या या बाबी ती दुर्लक्षित होती,दुर्दम्य उत्साहाने हसत होती,त्या मुलांना हसवत होती.त्यांना अवगत नसलेले अनेक अनुभव त्याना समजावत होती.त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक ती बनली होती.ती त्या मुलाना रागवायची,रमवायची.
घरातील कामे उरकल्यावर रात्री ९-३० ते १२ पर्यन्त सातत्याने नोट्स काढायची,रेकॉर्डिंग करायची-उत्साहाने,नियमितपणे,कंटाळा न करता.सतत ३ वर्षे!!!
या सर्व मेहेनतीचे गोड फळ मिळाले आहे .दोन्ही मुले दुसर्‍या श्रेणीत बी,ए झालीत्.आता कंप्युटर शिकताहेत्,आईचा अन्ध विश्वास कमी झालाय्,बाबा कृत कृत्य झालेत्.अन या मार्गावर आनंदाने ही मार्गस्थ आहे.तिच्या म्हणण्याप्रमाणे "मन्जिले और भी है"

इति-अजून इति नाही
Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रेव्यू ~ हॅट्स ऑफ टु बोथ ऑफ यू !
आय.आय.टी.मधून एम.टेक. झालेला गृहस्थ हताश होतो (आणि आम्ही तर असे म्हणत असतो तिन्ही त्रिकाळ की, एम.टेक.म्हणजे बुध्दीमत्तेचे क्रीम आणि यांच्यासाठी 'अशक्य' असे काहीच नसते) पण १९७६ साली बी.ए. झालेली एक स्त्री आव्हान समजून त्या दोन निष्पाप जीवांना आपले विद्यार्थी समजते आणि 'अशक्य' हा शब्द त्यांच्या कोशात नाही हे सिद्ध करते. मी इथे जाणीवपूर्वक त्या बहीणभावांना दुर्दैवी म्हणणार नाही, कारण त्याना जर अशी शिक्षिका मिळते तर ते सुदैवीच आहेत.

का कोण जाणे पण मला इथे अनुताई वाघ यांची प्रकर्षाने आठवण होत आहे. पदवी परीक्षेच्या वेळी अनुताईंचं वय एक्कावन्न वर्षांचं होतं आणि त्यांना मोतीबिंदू झाला होता. डोळ्याला नीट दिसत नसतानाही, दुसरा वाचक घेऊन अनुताईंनी अभ्यास केला आणि परीक्षा दिली. ही परीक्षाही त्या चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाल्या. तुमचा लेख वाचल्यावर असे वाटत आहे की अनुताईंनादेखील त्या वयात या दोन मुलांना मिळालेले अनुभवसंपन्न असे मार्गदर्शन लाभले असेल.

"मन्जिले और भी है" ~ असे शेवटी म्हटले आहे. खरे आहे अगदी. असे दीपस्तंभ असतील तर मंझिलचा रास्ता कधीच अशक्य वाटणार नाही.

प्रतिक जी
धन्यवाद
ते कधीही हताश नव्हते .
मी ही असा उल्लेख केला नाहिये.
इन फॅक्ट ते एकटे लढत होते मुलाना हाताशी धरून

रेव्यू ~ हॅट्स ऑफ टु बोथ ऑफ यू ! मनापासून अनुमोदन.

तुमचे प्रयत्न खुप स्तुत्य आहेत. एव्हढी चिकाटी आणि परिश्रम, क्वचितच पाहायला मिळते.

तुम्ही NAB ला संपर्क करून पहाल का? त्यांनाही तुमच्या मदतीची गरज भासू शकते. आणि वाटते की कुठेतरी तुमच्या कर्तुत्वाची दखल घेतली गेली पाहीजे

नाही, तुम्ही तसा उल्लेख केलेला नाही हे मान्य. माझे स्वतःचे अनुमान असे की त्या मुलांना त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षीच अंधत्व येते आणि त्यातही दाक्षिणात्य घरात असलेला अंधश्रद्धेचा जबरा प्रभाव विचारात घेता मुले २०-२२ ची होईतोपर्यंतच्या वाटचालीत त्याना (व्हा.प्रेसिडेंटना) हताश वाटावे असे प्रसंग निश्चितच आले असणार.

शिवाय लेखात तुम्ही म्हटलेले आहेच, "त्यांच्या घरचे वातावरण देव देव करीत "तोच तारणारा,त्याच्याच मनात हे होते तर आपण काय करणार्"असे अन्ध विश्वासाने अन हताशेने भरले अन भारलेले होते." ते हताशपणाचे वातावरण कुठे ना कुठे तरी त्यांच्या हृदयीही झिरपत गेले असणारच यात संदेह नाही.

तरीही त्यानी तुमचा पत्ता शोधून काढून मुलांची किमान शिक्षणाच्याबाबतीत तरी एक जिद्द पूर्ण केली, जी तुम्हा दोघांच्या सक्रीय सहभागाशिवाय पूर्ण होऊच शकली नसती.

प्रफुल्लजी
NAB साठी पुस्तके (मराठीत) लिहिणे चालू आहे.त्यांच्या संपर्कात ही आहोत.
कौतुकाबद्दल आभार
स्नेह असू द्या!!
Happy

तूमचा आदर्श आम्हा सर्वांसमोर कायम राहिल. त्या दोन विद्यार्थ्यांप्रमाणेच अनेकांना असे मार्गदर्शन लाभो, हि सदिच्छा.

अगदी अशक्य कोटीतील वाटणारी गोष्ट तुम्ही पुर्ण केलीत. रेव्यू ~ हॅट्स ऑफ टु बोथ ऑफ यू.

<<<आपली वाटचाल अतिशय प्रेरणादायी आहे. मला खूप काही शिकवून गेली.>>> मनापासून अनुमोदन.

अतिशय प्रेरणादायी वाटचाल. तुमची लेखमाला वाचून मनात कुठेतरी अशा कार्याचं बीज रूजायला मदत होतेय.
धन्यवाद.....आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !

Hats off to you Mam.. Happy

पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..!

सर्व वाचकांना शतशः धन्यवाद्.आपल्या उत्स्फूर्त कौतुकाने आम्ही भारावले आहोत.
सौ रेव्यु व रेव्यु

आज तिन्ही लेख एका दमात वाचले. एकदम प्रेरणा देणारा लेख. खूप कौतुक वाटले तुमच्या पत्नीचे.
मागे चिनूक्सने एक लेख लिहीला होता ना पुण्यातल्या अंध शाळांना ब्रेलमध्ये पुस्तके लिहून देण्याबद्दल. कदाचित पुण्यातल्या शाळांनापण तुमच्या मदतीची गरज असेल.

खूप कठिण असतं स्वतःचं मनोबल उंच ठेवून परिस्थितीशी दोन हात करणं,तुम्हां दोघांचं अगदी मनापासून कौतुक वाटलं.जमेल तशी मदत करत रहाणं म्हणजे काय हे सोदाहरण दाखवून दिलंत आणि ते ही कसलीही अपेक्षा न ठेवता,खरोखर अभिनंदन..

मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक.
मला देखील मराठी साहित्यातील उत्क्रुष्ठ लेखन टेप द्वारे अथवा ब्रेल लिपीत रुपांतर करायची इच्छा आहे. पुण्यात कुठे सपर्क साधू ? मला टायपिंग येते त्याचा उपयोग होईल का?

भाग २ आणि ३ आज वाचले. तुमच्या पत्नीचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. पण तुमचंही करावंसं वाटतं कारण बायको करते त्या कामाला पाठिंबा देणं तर सोडाच पण त्याची चेष्टा करणारे महाभाग कमी नाहीत. ह्या कामाबद्दल खरं तर तुम्ही एखाद्या पेपरात लेख लिहायला हवा. म्हणजे नुस्तं बसून वेळ घालवणार्‍यांना आणि "आता आमचं काय, अर्धे गेले, अर्धे राहिले" असा सूर आळवणार्‍यांना दिशा मिळेल. आजकाल पेपरात सगळं नकारात्मकच छापून येतं. असं सकारात्मक काम लोकांसमोर यायलाच हवं तरच आणखी लोक ह्यासाठी पुढे येतील.

स्वप्ना व रैना ला अनुमोदन!
रेव्यू दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा!! Happy

सर्व स्नेह्यांचे पुनःश्च आभार ,धन्यवाद.
खूप छान वाटले.
खरं सांगू? आम्ही असं काही फारसं नेत्रदीपक केले नाहिये.अनेकांचे ऋण आम्ही फेडत आहोत .
आम्हा उभयतांचे हे मत आहे.

असे लोकविलक्षण काम बघून आपल्यातल्या खुजेपणाची जाणीव होते.
तुम्हा दोघांना नमस्कार व या कार्यासाठी शुभेच्छा.

Pages