आनंदाची वाट-भाग २

Submitted by रेव्यु on 22 March, 2011 - 06:22

आनंदाची वाट
भाग १ http://www.maayboli.com/node/24514#new
भाग२
विस्मय,कौतुक,लाज आनंद अशा अनेक संमिश्र भावना माझ्या चेहेर्‍यावर त्या क्षणी नाचत असाव्यात . निर्भेळ्,निगर्वी ,नि:स्वार्थी आनन्दासाठी एकाकी असूनही एकाकीपणाचा यत्किंचित लवलेशही नसणार्‍या माझ्या अर्धांगीच्या या आत्मोन्नतीचा मला अकारण की सकारण की दोन्ही मिळून अभिमान वाटावा हे साहजिक होते. ही वाट पराकोटीच्या कळकळीच्या भावनेने प्रेरित होवून ती चालत होती.आमच्या व्यवस्थापनाच्या वर्गात "अत्युत्कृष्टतेच्या शोधात-In search of excellence" मध्ये आपले स्वतःचे "अत्युत्कृष्टतेचे बेट-An island of excellence"निर्माण करणे कसे आवश्यक आहे हे शिकवले जाते.इथे त्याचे ज्वलंत उदाहरण होते.या संपूर्ण प्रवासात मी रतिमात्रही सहभागी नसूनही व अज्ञ असूनही "तुम्हाला कशाचं चीजच नाही "असं गार्‍हाणही कधी ऐकल्याचं मला आठवत नव्हतं.आता मात्र या प्रवासात शक्य तेवढी साथ देण्याची इच्छा व उत्कंठा मलाही होत होती.तिच्या स्वभावातील एकाग्र,एकचित्त धेयवेडेपणा माझ्या स्वभावात नाही -या उणिवेची जाणिव मला होती.तिच्या या वलयात तिला हवे तेवढेच लुडबुडायची संधी मिळावी अशी माझी इच्छा होती.त्यानंतर फरिदाबादच्या शाळेत पुस्तके नेणे,तेथील शिक्षकाना भेटणे ,कागद आणणे इ कामे मी केली.या सर्व प्रवासात पुढील वर्षेही कौटुंबिक व्यस्ततेत(मुलींची १० वी,१२ वी इ.इ) व्याप वाढत असूनही ब्रेलच्या पुस्तकांचे व्यापही वाढत गेले.
मग यथाक्रमाने व सवयीनुसार मी नोकरी बदलली.माझ्या रक्तातच होते हे.माझ्या या स्थानांतराचा तिच्या प्रिय अन जिव्हाळ्याच्या उपक्रमावर काय परिणाम होईल ह्याचा अंदाज घेण्याएवढी मी संवेदनशीलता दर्शविली नाही याची मला आज फार खंत वाटते.पण ती मात्र हा प्रवास अबाधित ठेवण्याबद्दल दृढ निश्चयी होती.
आम्ही नॉयडास आलो.अन आपला प्रण अन ध्येय पूर्तीस नेण्यास तिने प्रयत्न जारी ठेवले.फरिदाबादची शालेय मुले हिच्या साधरण ४५ पुस्तकांचा वापर करीत होती.
अन मग नॉयडाच्या एका झोपडीवजा सेक्टर मध्ये एका एन्.जी.ओ ने अंधांसाठी शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नाबद्दलची माहिती तिच्या कानी आली.तिने लगेच फोनवर संपर्क साधला.ठरलेल्या वेळी महत्प्रयासाने पत्ता शोधत शोधत संधिप्रकाशात पोहोचलो.आजूबाजूला वहाणारे ओपन ड्रेनेज,ओंगळवाणी इमारत्,पलिकडे " देसी दारूका ठेका " अन मधोमध एकुलती एक खोली असलेली झोपडीवजा शाळा.आत मिणमिणता टेंभा.दारावर टकटक केले अन आतून हसरा ,तरुण्,उत्साही आवाज आला.तरतरीत चेहेरा,ताठ शरीरयष्टी असलेले संचालकजी बाहेर आले आणि सविनय म्हणाले
"पधारिये दीदी".
अचानक लक्षात आले की ते नेत्रहीन होते.
"मै केशव"त्यांनी आपला परिचय करून दिला.
हिने केशवजी'न्चा हात आपल्या हातात घेतला.दोघांच्याही चेहेर्‍यावर चिरपरिचय असल्यासारख्या अभिव्यक्तीचा मी एकुलता एक साक्षिदार होतो.जणू काही एकमेकांच्या व्यथा ते उमजत होते,एकमेकांना दीर्घ काळापासून ओळखत होते.लौकिकार्थाने ही भेट निरर्थक होती कारण लौकिक परिमाणांप्रमाणे परिचय व सान्निध्य वाढण्यास खूप कालावधी लागतो.पण हा स्नेहबंध भौतिक नसून दैवी असावा,अध्यात्मिक असावा. अन्यथा ही व्यक्ती आपले सदोदित भले चिंतिते हे एका स्पर्शाने केशवजीना कसे कळले असावे?
"दीदी आप दिलकी बहुत अच्छी है-आपके स्पर्शसे हमे पूरा यकीन और एहसास हो रहा है.आप हमारे लिये बहुत कुछ करना चाहती है ना?"केशवजी म्हणत होते.
मोठा न्यारा माहौल होता तो.एक तरुण अन सकारात्मक अंध्,पडझड झालेली खोली,एक मिणमिणता लामण दिवा-त्याची उणीव त्याला मुळीच भासत्-दिसत नव्हती अन त्याच्या उत्साही हृदयात सदोदित तेवणारी उज्ज्वल ज्योत्-आता दीदीच्या परिचयाने पसरणारा आशावादी सूर्यप्रकाश.
"दीदी ,बडी कोशिश की जा रही है हम जैसे नेत्रहीन बच्चोंको यहां स्कूल लानेकी!लेकीन इनके माँ बाप मानते नही है,न उन्हे विश्वास है की ये पढ लिखकर आगे बढ सकते है.मै इन्हे दिलासा दिलाता हूं की हमने भी एम्.ए की है -इन हालातों के बावजूद. और अब तो लीडर लोग कोनशीला रख कर हमें मझधारमें छोडकर गायब हो गये है."
हिने त्या मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांचे नमूने केशवजीना दिले अन संगितले की मी रोज दुपारी ३ तास या मुलांना शिकविण्यास येईन.(त्या वातावरणातही-इती अस्मादिक)जाता जाता पुनः हीचा हात हातात घेऊन केशवजी म्हणाले
"दीदी आपकी लिखाई भी आपके मन जैसी सुंदर और साफ है"
अत्यंत भारावलेल्या मनःस्थितीत या शाळेसाठी पुस्तके व स्वतःचा वेळ देईन असा निश्चय करून ही माझ्या बरोबर घरी परतली.पुस्तकांचे लिखाण झपाट्याने सुरू झाले.
दुर्दैवाने अनेक भेटी,फोन व प्रयत्न करूनही शाळा सुरू झालीच नाही .काही दिवसानी केशवजींचा ही पत्ता लागला नाही.
एव्हाना-पुनःश्च हरि ओम्-मी नाशिकला स्थलांतरीत झालो!!
=क्रमशः
शेवटचा भाग्.-उद्या

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सर्व वाचकांना शतशः धन्यवाद्.आपल्या उत्स्फूर्त कौतुकाने आम्ही भारावले आहोत.
सौ रेव्यु व रेव्यु

छान

"दीदी आपकी लिखाई भी आपके मन जैसी सुंदर और साफ है" >>>>>> अग्दी अग्दी ....

खूपच सुंदर लिहिलंय .....

दुर्दैवाने अनेक भेटी,फोन व प्रयत्न करूनही शाळा सुरू झालीच नाही .काही दिवसानी केशवजींचा ही पत्ता लागला नाही.>>>> अरेरे ....