देशप्रेम आणि दुखावणार्‍या भावना

Submitted by चिनूक्स on 18 June, 2008 - 00:00

कारण शिवाजी, राम, भारतीय संस्कृती, अल्ला, आंबेडकर, भाषा यांच्या नावावर समाजात द्वेष पसरवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, हा माझ्या मते शुध्द हलकटपणा आहे. डोकं अधू असलं की अशा सारख्या भावना दुखावतात.
आणि 'मुंबई-बाँबे' हाच जर मुद्दा असेल तर 'जर्मन बेकरी', 'पॅरीस ड्रायक्लीनर्स', रफीचं 'जापान्..लव ईन टोकीयो', या सर्व गोष्टी आधी बाद व्हायला हव्यात.
मुळात शाळा, कोर्टाच्या बोर्डावर बाँबेऐवजी मुंबई केलं, किंवा मराठेशाही ब्राह्मणांमुळे बुडाली, तुकाराम हेच शिवाजीचे खरे गुरू, हे मान्य केलं, किंवा चौकाचौकात, समुद्रात, प्रत्येक नदीत, तलावात शिवाजी, आंबेडकरांचे पुतळे उभारले, किंवा कोकणस्थ चित्पावनांचं 'आम्ही बुवा सगळ्यांत हुश्शार आणि सर्वश्रेष्ठ' हे मान्य केलं, तरी मला, किंवा वैशालीबाहेर फुगे विकणार्‍या लहान मुलांना, महिनाभर पेन्शन पुरवणार्‍या माझ्या आजीला, एंड्रीन पिणार्‍या शेतकर्‍यांना काय फायदा? एखादं आंदोलन करण्याइतपत हे फालतू मुद्दे महत्त्वाचे वाटूच कसे शकतात? 'एकविसाव्या शतकात आपली जात, भाषा, धर्म आपल्या घरात ठेवून घराबाहेर केवळ एक भारतीय म्हणून वावरावे' ही अक्कल पुढार्‍यांना नाहीच, पण बहुसंख्य भारतीयांना पण असू नये?
मराठा महासंघ, कोकणस्थ/देशस्थ ब्राह्मण संघ, बसपा/रिपाईं, पतित पावन/सनातन, संभाजी ब्रिगेड यांपैकी एकाही टोळक्याच्या नेत्याने अथवा कार्यकर्त्याने १० दिवससुद्धा खरोखर समाजोपयोगी काम केल्याचे संभवत नाही. बंग, आमटे, लवटे ही आडनावं धारण केलेली काही मंडळी समाजासाठी राबत असतात, याचा गंधही या लोकांना नसणार. अन्यथा ग्रंथालयाची तोडफोड करायला, किंवा नाट्यगृहात बाँबस्फोट करायला वेळच मिळाला नसता.
आनंदवनातली १५० अपंग, मूकबधिर मुलं पुढच्या महिन्यात विदर्भातल्या शेतकर्‍यांसाठी मुंबई, पुण्यात ऑर्केस्ट्रा करणार आहेत. नसीमा हुरजूक अजूनही व्हीलचेयरवरून पैसा मागत हिंडतात. आणि आपले नेते क्रिकेट मॅच बघण्यात, शिकार करण्यात, लोकांना, पाट्यांना काळे फासण्यात मग्न असतात.
सिंधूताई सपकाळांच्या पायात अजून चप्पल नाही, याची एकाही भारतीयाला लाज वाटू नये?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तमाम भारतीय समाज हा फार मोठ्या प्रमाणावर आततायी आणि कांगावखोर बनला आहे>> तसे नाही भारतीय समाज फुकट जास्त इमोशनल होतो. सतत आमचा हां देव आणि तो देव त्याला कोणी काही बोलायचे नाही वगैरे

भारतामधे " मी समोरच्या पेक्षा कसा मोठा/श्रेष्ठ आहे, काय बिशाद त्याची मला असं बोलायची, अरे ह्ट अपुन किसिसे नही डरता, क्या कर लेगा कोइ" ह्या आणि अशा अनेक वृत्ती जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत अवघड आहे...

Pages