विकिपीडियाची रिक्षा

Submitted by संकल्प द्रविड on 17 March, 2011 - 03:14

यंदाच्या मराठी भाषा दिवसानिमित्त मराठी विकिपीडियावर पार पडलेल्या संपादनेथॉनेपासून बर्‍याच सदस्यांचा, आणि त्यातही मायबोलीकर सदस्यांचा विकिपीडियावरील सहभाग वाढला आहे. त्या सहभागाची खुद्द मायबोलीवर नोंद घेतली जावी आणि विकिपीडियावर चालू असलेल्या घडामोडींची, सध्या 'हॉट अ‍ॅक्टिव्हिटी' चालू असलेल्या लेखांची माहिती पोचवावी (आणि मायबोलीकरांचा सहभाग वाढावा Proud ), म्हणून ही 'विकिपीडियाची रिक्षा'.
wikipedia_riksha.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या तीन आठवड्यांमध्ये श्यामली, क्षिप्रा, श्रद्धा, मी आणि अभय नातू या मायबोलीकरांनी विकिपीडियावर विविध लेखांमधील माहितीत भर घातली. या अवधीत बर्‍यापैकी माहिती नोंदवलेले/ भर पडलेले लेख खाली नोंदवले आहेत. (अर्थात, हे लेख यापुढेही वाढत, बदलत जातील; त्यामुळे ही यादी केवळ गेल्या तीन आठवड्यांमधील लक्षणीय कामाच्या निकषावरच बेतलेली आहे. शिवाय ही यादी व्यक्तिश: माझ्या निरीक्षणावर आधारित असल्यामुळे या अवधीतले काही सक्रिय लेख नजरेतून निसटले असण्याचीही शक्यता आहे.)

अणुभट्टी
अपूर्वाई‎
अरुण म्हात्रे
अशोक नायगावकर‎‎
अशोक बागवे‎‎
अ‍ॅन बुलिन
आयन रँड
आंत्रपुच्छ
इ.स. २०११ जपान भूकंप आणि त्सुनामी
करवत
कार्ले
काळा समुद्र‎‎
किशोर कदम‎
कुर्‍हाड
कॉरल समुद्राची लढाई
कोयता
गदा
चंद्रपूर किल्ला
चौदावे दलाई लामा
जायफळ
जेम्स जॉइस
त्सुनामी
दयामरण
दुसरा चंद्रगुप्त
दुसरा वित्तोरियो इमानुएले, इटली
द्राविड विद्या
नलेश पाटील‎‎
निरंजन उजगरे‎‎
पूर्वरंग
फुकुशिमा
फुकुशिमा १ अणुऊर्जा प्रकल्प‎‎
बीटल्स
भाजे
मनोरमा श्रीधर रानडे‎‎
महेश केळुस्कर
मिठाचा सत्याग्रह
मुलाखत
मोडी‎
यकृत
लहान आतडे
शाळा (कादंबरी)
शाह जहान‎‎
श्रीधर बाळकृष्ण रानडे‎‎
साप्ताहिक विवेक
सिटी ऑफ लंडन‎‎
हिंदुकुश पर्वतरांग

कौतुकाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद! पण नुसतं त्यावर भागणार नाही - तुमच्याकडूनही मूठ-मूठभर माहितीची भर विकिपीडियावर पडू द्या. Happy

रैने, तुला साहित्याबद्दल रस आहे, तर मराठी साहित्यिक, पुस्तके, अन्य भाषांमधले साहित्यिक यांच्याबद्द्लच्या माहितीत भर घालू शकतेस.
नीधप, तू वेशभूषा व कपडेपट व्यवस्थापनाबद्द्ल इकडे व प्रहारातून लिहिले आहेस; तर कापडांचे प्रकार, कपड्यांचे प्रकार यांवरच्या लेखांमध्ये माहितीची भर घालू शकतेस.
वर्षू नील, तुम्ही चीन व चिनी शहरे/ प्रांत, खाद्यपदार्थ, संस्कॄती यांबद्दल माहिती नोंदवू शकता.

दान पावलं! Happy

संकल्प, हे कसं करायचं मला कळलं नाही Sad
तिथे जाऊन पाहिलं होतं. काम करायची इच्छा होती. सांगणार का?

तिथे लॉग इन करा, विकी चाळा, अर्धवट असलेले कितीतरी लेख आहेत, भर घालायचेपण लेख आहेत. इथे दिलेल्या धूळपाटीवर लिहून बघा, तुमचे इंटरेस्टस शोधा, त्यातले लेख पूर्ण करायचे आहेत का? अपूर्ण दिसेल ते पूर्ण करा. Happy
उदा: शैलजा तू गोवा शोध आणि त्यासंदर्भात तिथे तुला काय काय सापडतय ते बघ. अपूर्ण लेख मिळाले की पूर्ण करायला घे.
मी पण चाचपडतेच आहे अजून, पण थोड थोड जमतय.

सविस्तर माहिती संकल्प देईलच.

धन्यवाद! Happy
>> म्हणजे विकी फॉर डमीज टाइप <<
चांगली सूचना आहे. त्या अनुषंगाने इथे काही थोडक्या गोष्टी सुचवतो :

* विकिपीडिया काय आहे ? त्याचा मला काय उपयोग ?
सोप्या भाषेत सांगायचं तर विकिपीडिया मुक्त ज्ञानकोश प्रकल्प आहे. त्यातली माहिती तुम्ही मोफत वाचू शकता (टोल फ्री Happy ) आणि त्यात भर घालण्यास, माहिती/दर्जा सुधारण्यासही सर्वांना मोकळीक असते. मराठीसह इंग्लिश व जगभरातील २६०+ भाषांमध्ये विकिपीडिया प्रकल्प चालू आहेत. इंग्लिश विकिपीडिया हा सध्याच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक मोठा व आशयसंपन्न ज्ञानकोश असून त्यात ३५ लाखांहून अधिक लेख उपलब्ध आहेत. मराठी विकिपीडिया तुलनेने बाल्यावस्थेत असून त्यात सध्या ३२,०००+ लेख आहेत.

विकिपीडियाचा उपयोग सुचेल तेवढ्या अनंत मार्गांनी होऊ शकतो. समजा, तुम्हांला वळू या मराठी चित्रपटाविषयी किंवा शाळा या मराठी कादंबरीविषयी माहिती हवी असेल, तर ती तुम्ही विकिपीडियावर शोधू शकता. किंवा इजिप्तातल्या घडामोडींविषयी काही माहिती जाणून घेताना/ लेख लिहिताना संदर्भ म्हणून माहिती शोधायला मला होस्नी मुबारक या लेखाचा उपयोग होऊ शकतो. एखाद्याला चंगीझ खानाविषयी एकाच ठिकाणी सर्वंकष, तरीही वाचण्याच्या दृष्टीने आटोपशीर विस्ताराची माहिती हवी असेल. तर अशी माहिती विकिपीडियावर मिळायची शक्यता दाट असते.

* विकिपीडियावर मी कोणत्या प्रकारे सहभाग घेऊ शकतो/शकते ? मला कोणत्या मार्गांनी या उपक्रमास मदत करता येईल ?
मराठी विकिपीडियाला मदत करण्याचा सर्वांत परिणामकारक आणि सोपा मार्ग म्हणजे आवडेल त्या विषयावर, जमेल तेवढी आणि जमेल तशी माहिती भरत राहणे. Happy

पहिली पायरी, म्हणजे मराठी विकिपीडियावर साइनप करून एक सदस्य खाते उघडायचे. त्यानंतर लॉगिन होऊन पाहिजे त्या विषयावर माहिती भरायला तुम्ही मोकळे! म्हणजे, समजा तुम्हांला तोक्यो शहराविषयी किंवा नऊवारी साडीविषयी माहिती भरायची असेल, तर मराठी विकिपीडियाच्या कोणत्याही पानावर वरच्या भागात उजवीकडे जी शोधपेटी दिसते, त्यात त्या विषयाचे कीवर्ड टाकून लेख शोधायचा. लेख सापडला की त्या लेखाच्या पानावर माथ्यावरच्या रांगेत "चर्चा, "संपादन", "इतिहास" असे टॅब दिसतील, त्यातल्या "संपादन" टॅबावर जाऊन लेखातील माहिती एडिट करायची. लेख संपादून झाल्यावर त्याची झलक पाहायची आणि जतन करायची मायबोलीवरील एडिट विंडोप्रमाणेच सोय आहे.

संपादन टॅबाखेरीज अन्य टॅबांवर टिचक्या मारून बागडून पाहिलंत, तर त्यांच्याबद्दलही माहिती आपसूक उमगेल. उदाहरणार्थ, "इतिहास" टॅबावर गेलात तर त्या लेखाच्या आजवरच्या सर्व आवृत्त्यांचे आर्काइव्ह दिसतील. आणि "चर्चा" पानावर गेलात, तर त्या लेखाच्या अनुषंगाने सदस्यांनी विविध पैलूंवर केलेला उहापोह, टिप्पण्या, वाद-विवाद रंगलेले दिसू शकतील.

* छे! हे प्रकरण भलतंच काँप्लेक्स दिसतंय. मला मोठमोठाले लेख लिहिण्याइतपत माहिती लिहिता यायची नाही... जाऊ दे, हे कार्य नव्हे मजजोगे
नवागत सदस्यांना काही वेळा नवीन-नवीन गोष्टी पाहताना बिचकायला होते, आणि वर लिहिल्यासारखा विचार मनात येऊ शकतो. पण, थांबा! विकिपीडियावर तुम्ही एखाद्या गोष्टीतले "तज्ज्ञ" असायला हवे, अशी पूर्वअट नाहीच्चे मुळी. तुमच्याकडे दोन-तीन वाक्ये लिहिण्याएवढीच माहिती आहे का ? नो प्रॉब्ज. तेवढीशी माहितीदेखील इतर वाचकांना "काहीतरी नवीन कळल्याचं समाधान" देऊ शकते. त्यामुळे बिनधास्त लिहा. फक्य एक-दोनच पथ्ये तेवढी पाळायची :

  1. माहिती मराठीत आणि देवनागरी लिपीतच भरायची - कारण मराठी विकिपीडियाच्या स्थापनेमागचे उद्दिष्टच असे आहे, की विविध विषयांवरील माहिती मराठी भाषेत संकलित केली जावी. खेरीज माहिती भरताना "प्रमाण मराठी" भाषेच्या ढंगातच माहिती लिहावी, असा संकेत आहे. म्हणजे "त्यानं/तिनं लिहिलं" वगैरे बोली ढंगाची शैली टाळून "त्याने/तिने लिहिले" अशी प्रमाण व्याकरण/शुद्धलेखननियमांनुसार वाक्यरचना योजावी.
  2. विकिपीडियावरील लेखात आपण माहिती भरलीत, की ती सेव्ह करताना, त्यात स्वत:चे नाव, मोबाइल क्रमा़ंक, ईमेल-बिमेल गोष्टी लिहू नयेत. विकिपीडिया हा लोकसहभागातून घडत असलेला प्रकल्प असल्यामुळे त्यावर कुणा एका व्यक्तीची मक्तेदारी नाही. त्यामुळे तुम्ही तेथील माहितीत टाकलेली भर चिरस्मरणीय ठरेल अशी खूण तिथे सोडणे अपेक्षित नाही. :फिदी:. अर्थात, तुम्हांला कशाचंच कधीही क्रेडिट मिळणार नाही, असा याचा अर्थ नाही - कारण प्रत्येक लेखाच्या "इतिहास" टॅबावर अगोदरच्या आवृत्त्यांमध्ये तुमचा लॉगिन आयडी, व तुम्ही केलेले बदल यांची फूटप्रिंट सदैव उपलब्ध असते. Happy खेरीज, तुमचे योगदान जसजसे दर्जेदार आणि लक्षणीय प्रमाणात वाढेल, तसतसे मराठी विकिपीडियन समुदायातर्फे तुम्हांला बार्नस्टार नावाची स्पेशल पदके देऊन गौरवलेही जाईल. Wink
  3. माहिती भरताना ती तटस्थ व व्यक्तिगत टिप्पण्या वगळून, "विश्वकोशीय" (एन्सायक्लोपेडिक) निकषात बसेल अश्या पद्धतीने लिहावी. म्हणजे एखाद्या पुस्तकाविषयी माहिती भरताना "मला या पुस्तकातील अमुकतमुक शैली खूपच भावली" वगैरे व्यक्तिगत मते/टिप्पण्या टाळाव्यात - कारण या वाक्यात इतरांसाठी कोणतीही "विश्वकोशीय माहिती" नाही! तसेच, माहिती लिहिताना हा ज्ञानकोश जागतिक स्तरावरचा आणि जगभर पसरलेल्या मराठी भाषकांसाठी आहे, हे ध्यानात ठेवून स्कोप नोंदवावा. उदाहरणार्थ, "खेड" या गावाबद्दलचा लेख लिहिताना, त्याच्या मजकुरात, ते कुठल्या देशातल्या कुठल्या प्रांतातले गाव आहे, याची नोंद अवश्य करावी.

* ते सारं ठीक आहे. पण सुरुवात कुठून करू ?!

  1. मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर थोडेसे खाली, मध्यभागी "संक्षिप्त सूची" नावाचे एक टेबल आहे. त्यात "समाजशास्त्र", "कला आणि संस्कॄती", "अभियांत्रिकी", "भाषा आणि साहित्य", "व्यक्ती", "भूगोल", "विश्वास", "विज्ञान आणि आरोग्य", "मनोरंजन आणि क्रीडा", "इतिहास" असे विभाग आणि त्यांतील मुख्य उपविभागांचे दुवे नोंदवले आहेत - ते एंट्रीपॉइंट म्हणून उपयुक्त ठरू शकतील. त्यांवर टिचकून गेलात, तर तुम्हांला त्या-त्या विभागात किंवा उपविभागात कोणकोणते लेख आहेत, ते दिसतील. मग त्यातल्या आवडत्या लेखावर जाऊन संपाद्न करू शकता.
  2. किंवा मराठी विकिपीडियाच्या कोणत्याही पानाच्या वरच्या भागात उजवीकडे एक "शोधपेटी" आहे, त्यात तुम्हांला हव्या असलेल्या विषयाचे कीवर्ड टाकून लेखांचा शोध घ्या. त्यात लेख आढळल्यास, लेखाचे पान उघडून संपादन करायला घ्या
  3. समजा, वरील दोन्ही मार्गांनी लेख आढळलाच नाही, तर बह्वंशी तो लेख अजून बनवलाच गेला नसावा, अशी शक्यता अधिक आहे. तसं असेल, तर तुम्ही तो लेख बनवणारे पहिले योगदानकर्ते बना. Happy काम अवघड नाही, सोपंच आहे तसं. वर लिहिल्याप्रमाणे शोधपेटी शोधून लेख सापडला नाही, तर तुम्हांला "मराठी विकिपीडियावर "अबक" हा लेख लिहा!" असा संदेश दिसेल, त्यातला "अबक" हा दुवा लाल रंगात असेल, त्यावर टिचकी देऊन नवीन लेख लिहायला घ्या. त्याची झलक बघून, मग तो सुपूर्त (= जतन) करा.
  4. नवीन लेख बनवण्याचा अजून एक शॉर्टकट आहे - इकडे पाहा.

बाकी, मागे झालेल्या मराठी भाषा दिनाच्या संपादनेथॉनेसंबंधाने दिलेल्या काही उपयुक्त सहाय्य पानांचे दुवे पुन्हा देतो. (टाळाटाळ न करता Wink ) जरूर वाचा :

* विकिपीडिया:परिचय
* विकिपीडिया:सफर
* सहाय्य:संपादन
* विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे
* विकिपीडिया:टाचण (चीटशीट :फिदी:)

आणिक काही, मदत लागल्यास मला इथे कळवा. किंवा विकिपीडियाच्या चावडीवर (= कट्ट्यावर) कळवा.

श्यामले, रिक्षा फिरवायला मदत करतेस, हाडाची प्रचारक झालीस गो तू. Proud Happy

कांद्या, जपानावर सूट तू. Happy
चिमणराव, शैलजा, तुम्हीदेखील वर लिहिलेल्या सूचनांनुसार आपापल्या पसंतीच्या विषयांवरील लेख शोधून दोन-चार शब्द लिहू शकता.

एका वेळेस तुम्ही शब्दश: दोन-चार मोलाची माहिती सांगणारे शब्द किंवा एखादे वाक्य भरूनदेखील ते सेव्ह केले, तरीही हरकत नाही. दिवसातून पाच मिनिटे काढून दोन वाक्ये भरलीत, तरीही हरकत नाही. मूठभर, चिमूटभर, आपल्या सर्वांसाठी आपणच दान द्यायचं, आणि आपणच त्यावर ताव मारायचा.

दान पावलं म्हणा. Happy

सुरेख माहिती संकल्प.
मला एक प्रश्न असा आहे - समजा मला एखाद्याविषयावरची इंग्रजी विकिपिडियावर असलेली माहिती मराठीत भाषांतरित करायची असेल तर मी ते करू शकते का ? यात कॉपीराईट वा इतर काही मालकी हक्काची अडचण येऊ शकते का ?

नाही, कारण विकिपीडियावरील माहिती मुक्त आहे, त्यामुळे तुम्ही श्रेयोल्लेख (क्रेडिट देऊन) देऊन कुठेही त्या माहितीचा वापर करू शकता (संदर्भ : विकिपीडियाच्या प्रत्येक पानावर "Text is available under the Creative Commons Attribution/Share-Alike License; additional terms may apply. See Terms of Use for details." अशी सूचना लिहिलेली असते.) . इंग्लिश विकिपीडियावरची माहिती मराठी विकिपीडियावर अनुवादित करून आणायची असल्यास, काहीही अडचण येणार नाही - कारण हे दोन्ही व अन्य भाषांतले विकिपीडिया प्रकल्प विकिमीडिया फाउंडेशन या सार्वजनिक प्रतिष्ठानामार्फत चालवले जातात.

व्यक्तिश। माझे मत विचारशील, तर थेट अनुवाद करण्याऐवजी ढोबळ मानाने इंग्लिश विकिपीडियावरील माहिती संदर्भ म्हणून बघून त्यातून महत्त्वाचे मुद्दे/टिपणे आपली आपण नोंदवून घेऊन त्यावरून मराठी विकिपीडियावर माहिती भरणे अधिक जैविक (= ऑर्गॅनिक) प्रक्रिया ठरेल.

धन्यवाद संकल्प. सध्यातरी इंग्रजी विकिपिडियामधली माहिती वाचून त्याआधाराने मराठीत माहिती भरता येईल असं वाटतंय. आवडत्या विषयांपासून सुरुवात करायची कल्पना पण छानच.

संकल्प द्रविड ... छान उपक्रम व माहिती.
मी सुमारे ४ वर्षापुर्वी एक-दोन पाने विकिवर मराठीत लिहिल्याचे आठवते.
तुमचे काम पाहुन आणखी भर घालेन.

बादवे, विकिपीडियाची उपयुक्तता दर्शवणारा एक अनुभव नुकताच विकिपीडियावरील एका लेखाच्या निमित्ताने कळला : 'रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - बोरगाव खुर्द' या विषयावर एक लेख एका नवागताने बनवला. त्या लेखात माहिती नोंदवायचा प्रामाणिक प्रयत्न होता, मात्र त्या लेखाच्या विषयाची - अर्थात त्या विशिष्ट शाळेची - उल्लेखनीयता स्वतंत्र लेख बनवण्याइतपत आहे का, या मुद्द्यावरून विकिपीडियन समुदायात चर्चा चालू झाली. त्यावेळेस लेखनकर्त्या सदस्यांकडून असे कळले, की "ग्नॉलेज लॅब" (इंग्लिश: Gnowledge Lab), होमी भाभा ‌वि‌ज्ञान शिक्षण केंद्र, या संस्थेतील लोकांनी रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यात असलेल्या बोरगाव खुर्द गावात काही मुक्तस्रोत सॉफ्टवेअरांच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांना शिक्षणोपयोगी माहिती पुरवण्याचा उपक्रम आरंभला आहे. त्यांनी विकिपीडियावरील माहिती शाळेतल्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना दाखवली, तेव्हा ते लोक माहिती वाचून खूप आनंदित झाले. त्यांनीदेखील या प्रयत्नांत आपला वाटा उचलण्यासाठी आपल्या भौगोलिकतेबद्दल, परिसराबद्दल काही माहिती भरायचे ठरवून त्यानुसार लेखाचा मसुदा बनवला. या शाळेतल्या शिक्षकांनी इंटरनेट फारसे वापरले नसल्यामुळे त्यांच्याकडे ईमेल आयडीही नव्हते; मात्र तरीही विकिपीडियाच्या उपक्रमात आपला खारीचा वाटा उचलण्याचा उत्साह आणि त्यासाठी माहितीची जुळवाजुळव करण्याची इच्छा वाखाणण्याजोगी होती. त्यांचा हा अनुभव त्यांच्याच लेखणीतून इकडे वाचा : चर्चा:रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - बोरगाव खुर्द

असेच अनुभव मागेही काही मंडळींकडून ऐकायला मिळाले. होते. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शाळांमधून अजूनही मराठी माध्यमाची पाठराखण होत असल्यामुळे तेथील शाळांकडून, विद्यार्थ्यांकडून मराठी विकिपीडियाचा वापर घडताना दिसतो. असले अनुभव आले, की कामाचा हुरूप वाढतो.. आणि उपक्रमाचं आपल्या लोकांच्या दृष्टीने काहीएक "मोल" आहे, हे जाणवतं. Happy

मला माहितीत जरूर भर घालायची आहे आणि मी सदस्यत्व पण घेतलेलं आहे. पण मी 'माहिती मराठीत आणि देवनागरी लिपीतच भरायची' या सूचनेवरच अडलो. कितीतरी इंग्रजी शब्द असे आहेत की जे आपण मराठीत जसेच्या तसे वापरतो.. ज्याला मराठी प्रतिशब्द असतीलही पण वापर इंग्रजी शब्दांचाच जास्त होतो. उदा. टेबल, बँक वगैरे. अशा वेळेला मला जे शब्द वापरात आहेत तेच लिखाणात घ्यायला आवडतील. जेव्हा प्रतिशब्द उपलब्धच नसतील तेव्हा मला ते तयार करून वापरण्यात काहीही अर्थ दिसत नाही.

कारण, (१) या सर्व उपक्रमाचा उद्देश लोकांना माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी असा आहे. (२) माहिती सहजपणे समजावी असाही आहे.

जितके आपण बोली भाषेतले शब्द वापरू तितकं दोन नंबरच्या उद्दिष्टाजवळ जाऊ. यावर तुझं म्हणणं काय आहे ते सांग. उदाहरण म्हणून तूच लिहीलेला एक वरचा पॅरा खाली टाकतो.. अगदी इतकं जरी नाही तरी साधारण असं लिहीलेलं चालेल का असा प्रश्न आहे.

अर्थात, तुम्हांला कशाचंच कधीही क्रेडिट मिळणार नाही, असा याचा अर्थ नाही - कारण प्रत्येक लेखाच्या "इतिहास" टॅबावर अगोदरच्या आवृत्त्यांमध्ये तुमचा लॉगिन आयडी, व तुम्ही केलेले बदल यांची फूटप्रिंट सदैव उपलब्ध असते.

चिमणराव, लिहा तर खरं आधी (शंका अन प्रश्नांमध्येच फार अडून राहू नका Happy ).
>> टेबल, बँक <<
हे शब्द मराठीतील व्याकरणनियमांप्रमाणे चालतात, याचाच अर्थ त्यांचा बाप्तिस्मा झाला आहे. Happy

बाकी, तुम्हांला शक्य असेल, तितकी माहिती भरायला लागा. हळूहळू सराव होईल. प्रश्न असतील, तर चावडीवर मांडू शकता.

क्रेडिट ला श्रेय, लॉगिन आयडी ला सदस्य नाम, अन फूट प्रिंट ला पाउलखुणा हे सहज समजणारे , बर्‍याच संस्थळावर वापरता येणारे शब्द आहेत.
टेबलला सुद्धा (माहितीचा ) तक्ता शब्द चालू शकेल Happy

यात श्रेय असे नाही (विकीवरच्या लेखांचे कसले श्रेय?) पण विकिवर अतिशय अ‍ॅक्टीव्ह असलेले आणि विकीचे खंदे पुरस्कर्ते सदस्य निनादचा उल्लेख तुमच्या यादीत नसलेला पाहून आश्चर्य वाटले. वरील सुमारे ४६ लेखात ९ लेख तर पहिल्यापासून निनादने लिहिलेले आहेत असे कळते. निनाद मायबोलीचा सदस्यही आहे, पण तुमच्या लेखकांत उल्लेख दिसला नाही म्हणून हा प्रतिसाद प्रपंच केला.

Pages