गानभुली - आये ना बालम

Submitted by दाद on 16 March, 2011 - 22:25

उ. बडे गुलाम अली खासाहेब - http://www.youtube.com/watch?v=huhf7xBCIU4
आये ना बालम
का करू सजनी
आये ना बालम
तरपत बीती मोरी उनबिन रतिया॥
रोवत रोवत कल नाही आवै
उनबिन मोरा जियरा जलावै
याद आवत है उनकी बतिया ॥

कनिका मित्रा - http://www.youtube.com/watch?v=lJiVU3aVKJA

बारा-तेरा वर्षं झालीत तरी ती संध्याकाळ अजून ताजी आहे. कलकत्त्याच्या कनिका मित्र म्हणुन एक गुणी गायिका सिडनीला भेट देऊन गेल्या. बडे गुलाम अली खान साहेबांच्या एका पट्टशिष्येची ती शिष्या. पतियाळा घराण्याचं गाणं गुरू घरी राहून शिकलेल्या. त्यांच्या सोबत दोन अख्ख्या संध्याकाळ घालवण्याची आणि दोन कार्यक्रमांना साथीची संधी मिळाली.

आधी कधी बघितलेही नाहीत असले साथिदार घेऊन कार्यक्रम करण्याची त्यांची हिम्मत मुळात दाद देण्यालायक. दुसर्‍याच संध्याकाळी माझ्या लाघवी ("आगाऊ") स्वभावानुसार गेल्या गेल्या मी माझ्या अवाक्याच्या बाहेरचा घास घेतला आणि त्यांना विनंती केली, ’दीदी, ’आये ना बालम’ सुनायेगी? प्लीज?’

घराण्याचं गाणं आयुष्यभर जोपासलेल्या कलाकाराकडून घराण्याची चीज ऐकणं हा दुर्लभ योग असतो.... आणि मी तो सोडत नाही. चीजेचं मूळ सौदर्य उलगडून दाखवण्याचं कौशल्य त्यांनाच जमतं. (हे पूर्णत: माझं मत).
पहिल्यांदा तर दीदी अवाक झाल्या.
’ना बाबा ना. मै तो ना गाऊंगी. मेरी गुरू दिदीभी इन्हे आम नही गाती. अरे, ये तो बडे गुरूजी की चीज है. ना! किछ्छू ना!.
त्यांच ते नाकारणंही किती लोभस होतं. पण इतक्यावर ऐकेन तर ती मी कसली. परत नेट लावला. शेवटी त्या ज्यांच्या कडे उतरल्या होत्या, त्या त्यांच्या गुरू भगिनी, त्यांनीही "बंगलात" आग्रह केला.

दीदी एका अटीवर तयार झाल्या, त्या गुरू दिदींना फोन करतिल आणि त्यांची परवानगी असल्यासच गातील. लगेच कलकत्त्याला फोन केला. बंगालीतलं भाषण कळलं नाही पण फोन ठेवताना दीदींनी तिथेच जमिनीला हात लावून आपल्या गुरूंना केलेलं वंदन बघून मात्रं माझ्या गळ्याशी दाटून आलं.

एव्हाना संध्याकाळ झाली होती. सूर्य डोंगराआड गेला होता. अगदी ’या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या....’तल्या सारखी व्याकूळ करणारी तिन्ही सांज. एकलेपाणाची तीव्रता या वेळी जितकी जाणवते तितकी इतर कोणत्याही वेळी नाही जाणवत.
गर्दीतही एकटं करणारी ती वेळा, स्वरात झणझणणारे तानपुरे, कनिकादींसारख्या समर्थं कलाकाराची संगत, आणि विरहाची वेदना अधिक उत्कट, अधिक तीव्र करणारा सिंधू भैरवीतला तो सुप्रसिद्ध दादरा- आये न बालम! नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा आला.

दीदी स्वत:शीच विचार करीत आल्या आणि बैठकीवर बसल्या. थोडावेळ नुसतच त्या दादर्‍याबद्दल बोलत राहिल्या. मग तानपुरा पुन्हा लावून त्यांनी कानावर हात ठेवून सा लावला. आणि मोत्यांच्या लडीसारखी ओळ घरंगळली....

आये न बालम....

ठेक्याचा अंदाज घेत त्यांनी दोनदा तीच ओळ म्हटली आणि पुढची ओळ न म्हणता....
तबल्यावर हात ठेवला. मला थांबायचा इशारा होता. माझं काही चुकलं की काय असं समजून मी त्यांच्याकडे बघितलं. माझ्या हातावरची त्यांची बोटं थरथरत होती.
माझ्याकडे एक रिकामी नजर टाकून त्यांनी नि:श्वास सोडला आणि डोळे मिटले. तानपुरा वाजतच राहिला.
एका संथ लयीत त्यांचा श्वास चालला होता. डावी भुवई किंचित उठली होती, ओठ, पापण्या सूक्ष्म थरथरत होते. चेहरा लाल झाला होता.

ती घराण्याची चीज, तिचे शब्दं तिचे स्वर,.... ह्या सार्‍याला एक दैवी, पवित्र झळाळ होता. गुरूंच्या गुरूंनी प्रत्यक्षात आणलेली ती अतीव विरहाची वेदना, तिला आपल्या स्वरांनी, श्वासानेही स्पर्श करण्यापूर्वी ही गुणी कलाकार नतमस्तक होऊन थांबली होती.
त्या देवदत्त देण्याचं ओझं उचलण्याआधी, किंबहुना त्याला स्पर्शही करण्याआधी त्या विनम्र झाल्या होत्या. त्या गाभार्‍यात शिरण्यापूर्वी, दारातच पायरीशी झुकल्या होत्या.
कुठेतरी आपल्याच आत त्या दादर्‍याचं, त्यांच्या गुरूंनी ’ह्या हृदयीचे त्या हृदयी’ घातलेलं मूर्त रूप आठवत, निरखत, त्याची पूजा बांधण्यासाठी बळ शोधत राहिल्या.

काही क्षणातच त्यांनी मिटल्या डोळ्यांनीच परत सा लावला.
आये न बालम....
का करू सजनी, आये न बालम

ती संपूर्ण संध्याकाळ तीन-चार तास फक्तं ’आये न बालम’ ची आळवणी झाली.

तरपत बिती मोरी, तुमबिन रतिया....

एका एका शब्दाच्या उच्चाराला, उचलण्याला, स्वरांच्या हेलकाव्यांना, आलापांना, आणि दोन आलापांच्या मधल्या शांततेला, मुरक्यांना, झटक्यांना, तानांना.... या सार्‍या सार्‍याला झालेल्या परतत्व स्पर्शाचं भान राखत गात होत्या. त्यांच्या गुरूंनी कधी काळी शिकवलेली, साकार केलेली मूर्त डोळ्यांआड दिसत होती. तिला आता आपल्या श्वासाची फुंकर घालीत प्राण चेतवीत होत्या. त्या दादर्‍याच्या मूळ रूपाशी एकरूप होण्यासाठी त्यांची स्वरांनी बांधू घातली ती पूजा, ती विनवणी, ते आर्जवं, ती प्रार्थना संपूर्ण संध्याकाळभर माझ्या आजूबाजूला वावरत राहिली.

मुद्दाम त्यांची अन उस्तादांची ठुमरी ऐकून पहा... कितीतरी साम्यं आहे. नुस्ती चाल अन ठुमरीच्या चलनाचीच नाही. पण शब्दोच्चारही.
उदा. "आये" ह्या शब्दाचा उच्चार. तो "ये" फारफार ठरवून जवळ जवळ प्रत्येकवेळी तसाच उच्चारलाय... जसा त्यांच्या गुरूंनी त्यांना शिकवलाय तस्सा.
घराण्याची शुचिता जपण्याचं काम कितीतरी गायक ह्या इतक्या सचोटीनं अन संयमानं करतात.

मुळात भैरवी जरी शेवटी मैफिलीला पूर्णविराम देण्यासाठी गायली जाण्याची रीत असली तरी, ज्या पद्धतीनं गावा तशा भावनेचं अवगुंठन घेऊन, हा राग उभा रहातो. म्हटलं तर भक्तिरस, म्हटलं तर शृंगार किंवा ह्या दादर्‍यात साकारलेली अतीव विरहाची वेदना.

मुळात ह्याला "दादरा" म्हणायचं की नाही हा प्रश्नच आहे. "दादरा" ही गायनप्रकार दादरा तालात (सहा मात्रा) किंवा दादर्‍याच्या ठेक्यात म्हटला जातो. माझ्या ऐकण्यात ही ठुमरी केहरव्यात किंवा केहरव्याच्या ठेक्यात (आठ मात्रा) च आहे. पण त्यांनी आवर्जून हा दादरा असल्याचं सांगितलं.... अन तरीही केहरव्याच्या तालात म्हटली. बडे उस्तादांनी अन खाली दिलेल्या दुव्यात, पद्माताईंनीही केहरव्यातच म्हटलीये. कुणी जाणकार भेटतात तेव्हा हा प्रश्नं विचारण्याची आठवण ठेवायला उपरण्याला गाठ मारून ठेवायला हवी.

पद्मा तळवलकर - http://www.youtube.com/watch?v=b9z9Ms2LhqA&feature=related
पद्माताईंनी गायलेल्या ह्याच ठुमरीचं चलन किंचित वेगळं आहे... पण तितकच मोहक.

कनिकादींना साथ केलेला हा कार्यक्रम किमान बारा-तेरा वर्षंतरी जुना आहे. पण अजूनही कधीतरी ’आये ना बालम’ चे स्वर ऐकू आले तरी अवचिता परीमळू लागते, ती संध्याकाळ, अन माझ्या समोर साकारली ती त्यांची पूजा, त्यांची विनवणी, त्यांची प्रार्थना!

समाप्तं

गुलमोहर: 

wikipedia :
In this context dadra is a light classical vocal form in Hindustani classical music, mostly performed in Agra and in Bundelkhand region. It was originally accompanied by dadra tala (from where the term for the genre was borrowed), but later dadra compositions are often found in other light talas (such as kaharva).

__/\__

दाद, हा लेख कसा नजरेतून सुटला कुणास ठाऊक ! ... किती रसीलं, उत्कट गायलंय कनिका मित्रांनी. शब्दच नाहीत. मनःपूर्वक धन्यवाद इथे लिंक दिल्याबद्दल Happy पद्माताईंनी गायलेलं अगदी समोर बसून तीनचारदा तरी ऐकलंय. त्यांचं गाणं ऐकताना नेहेमीच एक भारावलेपण असतं.

दाद, अप्रतिम लेख आणि कनिकादींचा दादराही. उस्ताद बडे गुलाम अलीखां साहेबांच्या मुश्कील पण रसिल्या गायकीचा पुनःप्रत्यय आला. आणि अंगावर शहारा आला. त्यांनी गायलेलं काहीही गाण्याची हिंमत करणं यालाच पहिली दाद द्यायला हवी. त्यांचे ते उच्चार आणि पंजाबी अंगाच्या मुश्कील हरकती गळ्यातून त्यांच्यासारख्या आल्या नाहीत तर तो कोणी गाऊच नये.
आमच्या गुरुमाता पद्माताईपण ब-याचदा हा दादरा गाऊन मैफिलीचा शेवट करतात. त्या खांसाहेबांचा ढंग तसाच ठेऊन, त्यांची याद येईल अशा आणि स्वत:ला स्फुरलेल्या हरकतींनी त्यात रंग भरतात.
पुनःश्च धन्यवाद.

खाँसाहेबांच्या मुळ रेकार्डीची अनेक प्रवासांत एकटां असतांना फुल व्हॉल्युमवर असंख्य वेळा पारायणं झाल्येत. तरी अजुन मन भरत नाही. वेड चीज आहे!!

काय सुंदर लिहीलय! आणि वाचताना ऐकत होतो त्यामुळे गानभुल अनुभवली! Happy
का बंद केलंस लिहायच? गानभुली पडायच्या बंद झाल्या नसणार!

Pages