अनुदिनी परिचय-१: आहार आणि आरोग्य

Submitted by नरेंद्र गोळे on 14 March, 2011 - 07:13

मी मायबोलीवर आलो त्याला आता आठ वर्षे होत आहेत. या आठ वर्षांत मला मायबोलीने भरभरून ज्ञान. मनोरंजन, विरंगुळा आणि मायबोलीचे व्यसन दिले. आता त्याची किमान आंशिक भरपाई करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते. म्हणून मी ही "अनुदिनी परिचयां"ची मालिका सुरू करत आहे. गेल्या काही वर्षांत महाजालावर अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण शुद्ध मराठीतून केले गेले. त्यांची दखल घ्यावी आणि मायबोलीकरांच्या नजरेस ते लिखाण आणून द्यावे हाच उद्देश या मागे आहे. महाजालावरील अनुदिनी लेखनाची सुरूवात मायबोलीवरील "रंगीबेरंगी"नेच झालेली होती. ते लिखाण आपल्या परिचयाचेच आहे. मायबोलीवर नसलेल्या अनुदिन्यांवरील लिखाण हे पुस्तकस्वरूपच समजून, पुस्तक परिचय करून द्यावा, त्याचप्रमाणे अनुदिन्यांचा परिचय करून द्यावा असा मानस आहे. आशा आहे की हा उपक्रम आपल्याला आवडेल.

अनुदिनीचा दुवा

आहार आणि आरोग्य http://knowaboutyourfood.blogspot.com/

अनुदिनी लेखिकेची ओळख

कन्सल्टिंग फिजिशियन आणि प्रोफेसर ऑफ मेडिसिन असलेल्या जाणकार लेखिकेने “लाईफ गोज ऑन” ह्या छद्म नावाने ही अनुदिनी लिहिलेली आहे.

अनुदिनीचे ब्रीदवाक्य

"लेट युअर फूड बी युअर मेडिसिन अँड लेट युअर मेडिसिन बी युअर फूड" या हिप्पोक्रॅटसच्या वचनानेच या अनुदिनीची सुरूवात होते.

अनुदिनीची सांख्यिकी

ही पूर्णतः मराठी अनुदिनी २००७ (२२ नोंदी) आणि २००८ (१२ नोंदी) या दोन वर्षांत लिहून काढलेली आहे. सुरूवात मे २००७ मध्ये झालेली आहे. लेखिकेची 'कॉर्पोरे सानो' नावाची आणखी एक पूर्णतः इंग्रजी अनुदिनी आहे. 'कॉर्पोरे सानो'म्हणजे ’निरोगी शरीरात निरोगी मन’ या अर्थाची एक लॅटिन म्हण आहे. तसेच 'हायजिया' या नावाचीही एक पूर्णपणे इंग्रजी अनुदिनी त्यांनी लिहीली आहे. 'हायजिया'म्हणजे आरोग्य व स्वच्छतेची देवता. मात्र या दोन्हीही इंग्रजी अनुदिन्या मराठी अनुदिनीच्या मनाने खूपच लहान आहेत. ही अनुदिनी 'इंडिब्लॉगर', 'इंडिमेडिक', 'इंडिरँक', 'न्यू ब्लॉग अड्डा' या अनुदिनी नोंदसंस्थळांवर नोंदलेली आहे. मला हिचा पत्ता 'मराठी ब्लॉग विश्व' वरील नोंदीमुळे वाचायला मिळाला. 'शायनी स्टॅट' वर या अनुदिनीस आजवर १८,००० हून अधिक वाचक मिळाल्याची नोंद आहे. तर 'फ्लॅग काऊंटर' ३,५०० हून अधिक अभ्यागत नोंदवतांना दिसतो.

अनुदिनीचा स्वागतसंदेश

लेखनाचे उद्दिष्टाबाबत लेखिका लिहिते, "माझा मुलगा जेव्हा शाळकरी होता तेव्हा त्याला आहारातील प्रत्येक घटक, जीवनसत्वे, खनिजे व इतर पोषक तत्वे यांविषयीची शास्त्रीय माहीती आणि त्या घटकांचे आरोग्यासाठी काय महत्व याबद्दल माहीती देऊन; चांगल्या आहाराबद्दल त्याच्यात जागरूकता निर्माण करावी या उद्देशाने मी आहाराबद्दल लिहायला सुरवात केली. मी स्वत: फिजिशियन असल्याने शास्त्रीय माहिती होतीच. त्याचप्रमाने इतरही वाचन केले. मग त्यात खूपच आवड निर्माण झाली. आपले अन्न व आहार, त्यातील मूलभूत घटकाची शास्त्रीय माहीती इत्यादीविषयी मग मी माझ्या शाळकरी मुलाला समजावे यासाठी सोप्या भाषेत लिहायला सुरवात केली. लिहिलेली माहीती खूप जास्त होती. म्हणून मग ही सर्व माहिती व्यवस्थित लिहुन मुलांसाठी / मोठयांसाठी 'शास्त्रीय माहितीसह आहाराविषयी मार्गदर्शन' असे पुस्तक प्रसिध्द करावे या उद्देशाने संगणकावर ’लोकसत्ता फॉन्टफ्रिडम’ चा उपयोग करून स्वत: लिहून काढले. ही सर्व प्रक्रिया दोन तीन वर्षे चालली. त्यानंतर मात्र माझे मणक्याचे दुखणे चालू झाले. माझ्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली त्यामुळे संगणकावर साठवून ठेवलेल्या फाईल्स तेथेच राहिल्या. त्यानंतर कार्यबाहुल्य व एकापाठोपाठ आलेल्या काही कौटुंबिक तशाच वैयक्तीक अडचणीं यामुळे हे सर्व लिखाण मी आजपर्यंत पुस्तकरुपाने प्रसिध्द करू शकले नाही. ज्या मुलासाठी मी हे लिहिले त्यानेच या माहीतीचा उपयोग इतरांनाही व्हावा यादृष्टीने ब्लॉगच्या माध्यमातून हे लिखाण प्रसिध्द करण्याची कल्पना दिली. म्हणून मी आता माझे सर्व लिखाण 'आहार व आरोग्य' या मराठी ब्लॉगवर प्रसिध्द करीत आहे. मुळात मी हे लिखाण शाळकरी मुलांना नजरेसमोर ठेवून लिहिले आहे त्यामुळे ते अतिशय सोप्या भाषेत, सोपी उदाहरणे देऊन लिहिले आहे तसेच मुलांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने ते त्यांना संबोधीत करून लिहिले आहे. त्यामुळे ते अतिशय बाळबोध वाटण्याची शक्यता आहे."

अनुदिनी कशासाठी वाचनीय आहे?

जलसंजीवनी, पौष्टिक पेये, अपायकारक पेये, अन्नसंस्कृतीचा इतिहास, आहारातील निरनिराळ्या अन्नघटकांची शास्त्रीय ओळख, त्यांची कार्ये, त्यांची उपलब्धता ह्याविषयी लेखिकेने संदर्भांसहित केलेले विवेचन मराठीतील अशाप्रकारचे कदाचित पहिलेच, सर्वसमावेशक विवेचन असेल. लेखिकेची भाषाशैली सोपी आणि स्पष्ट आहे. मजकूर वाचनीय आणि आचरणीय आहे. एके ठिकाणी लेखिका म्हणते, "शंभर वर्षापुर्वी माणूस साधारण वर्षाला दोन किलो साखर खात असे. आता त्याचे प्रमाण पन्नास किलो झालेले आहे. तुमच्या घरात माणसी किती साखर वापरली जाते हे एकदा पहा. कदाचित तुम्ही एकटेच आठवड्याला अर्धाकिलो साखर खात असाल. तर मात्र हे प्रमाण खूपच जास्त आहे." तर दुसर्‍या एका ठिकाणी लेखिका म्हणते, "जास्त प्रमाणात मिळालेली साखर तुमचे शरीर साठवून ठेवते. हा साठा केला जातो चरबीच्या स्वरुपात. म्हणजेच जितकी जास्त साखर तुम्ही खाल तितकी जास्त चरबी तुमच्या शरीरात साठत जाईल." यासारखी उद्बोधक वाक्ये अनुदिनीत सर्वत्र विखुरलेली आहेत. निरनिराळी नत्राम्ले, त्यांचे आहारातील महात्म्य आणि त्यांची उपलब्धता यांबाबतही सुरेख मार्गदर्शन या अनुदिनीत सापडेल. चौतीस लेखांत लिहिलेली ही माहिती सलग व्यवस्थित उतरवली तर ए-४ आकाराच्या ७० पानांचे सुरेख पुस्तक तयार होऊ शकते. अनुदिनीवरील लिखाण आता थांबलेले दिसत असले तरी, ते पुन्हा सुरू व्हावे अशीच सदिच्छा आपण या परिचयाच्या निमित्ताने करू या!

अनुदिनीची आधारसूची

१. या लिखाणात बरेच ठिकाणी अन्नपदार्थातील मूलभूत घटकांचे जे प्रमाण दिले आहे ते बहुतांशी, सी.गोपालन, बी.व्ही.राम शास्त्री, आणि डी.सी.बालसुब्रमण्यन यांच्या 'न्युट्रिशन व्हॅल्यू ऑफ इंडियन फूडस' या हैद्राबादेतील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्युट्रिशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकावर आधारीत आहे.

२. एफ.पी.अनिता आणि फिलिफ अब्राहम यांच्या 'क्लिनिकल डायेटिटिक्स अँड न्युट्रिशन' या पुस्तकाची चौथी आवृत्ती.

३. वैद्यकशास्त्रावरील निरनिराळी पाठ्यपुस्तके.

४. लिखाण समजण्यास सोपे व्हावे यासाठी ठिकठिकाणी वापरलेल्या आकृत्या व फोटो महाजालावरुन घेतलेले आहेत.

अनुदिनीतील श्रेय अव्हेर

१. ’आहार व आरोग्य’ या लेखमालेचा उद्देश समाजात ज्ञानप्रसार व्हावा हा आहे.

२. इथे फक्त शास्त्रीय माहीती दिली असून ही लेखमाला कोणत्याही आहार उपचार पध्दतीचे समर्थन करणारी नाही.

३. ही माहिती वाचणाrर्‍या कोणाही व्यक्तीने अगर रुग्णाने आपल्या विशिष्ट आजारावर योग्य आहार कोणता याविषयी तज्ञ डॉक्टर/आहारतज्ञ यांचा सल्ला घ्यावा.

४. इथे दिलेली माहीती वाचून कोणी स्वत: प्रयोग केले तर त्यास प्रस्तुत लेखक वा संदर्भित ग्रंथ जबाबदार नाहीत याची नोंद घ्यावी.

अनुदिनीतील प्रतमहात्म्य विषयक विनंती

‘आहार व आरोग्य’ या लेखमालेतील लिखाणासाठी प्रस्तुत लेखकाने आपल्या शिक्षणाचा व बुध्दीचा वापर केला आहे तसेच हे लिखाण करण्यासाठी, ते संगणकावर मराठीत टाईप करण्यासाठी बरीच मेहनत घेतली असून त्यासाठी बराच वेळही खर्च केला आहे. त्यामुळे ज्ञानार्जानाव्यतिरिक्त वाचकांनी या लेखांची परवानगीशिवाय प्रत काढणे किंवा येथील माहितीचा इतरत्र वापर करणे या गोष्टी करू नयेत अशी अपेक्षा व विनंती आहे.
.
http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त उपक्रम. ती अनुदिनी पण वाचनीय आहे. तुमचा परिचय असल्यास त्यांना परत लिहायला प्रवृत्त कराल का ?

कृत्रिम, संस्कारित ,गोडगोड,मऊ,स्निग्ध असे पदार्थ खाऊन मोठी झालेली पिढी आता आइवडलांच्या भुमिकेत आले आहेत. अथवा अचूक सांगायचे तर अशा पालकांचे प्रमाण वाढले आहे. आता हे आइबाप छानछान दिसणार निरुपयोगी खाऊन मुलांना मात्र असे करू नये बाळा,पालेभाज्या दुध खात जा सांगेल तर ते शक्य नाही. जे साखरेचं उदाहरण दिले आहे ते इतर अन्नपदार्थांनाही लागू आहे. इतिहास पाहिला तर तैमुरलंगचे सैन्य कच्चेच धान्य ,मास खायचे आणि घोड्यावरच झोपायचे. उन्हात फिरायचे. कणखरपणा होता तो नंतरच्या शिजवलेल अन्न खाणाय्रांत कसा येणार? थोडक्यात कळतं पण चटक लागल्याने वळत नाही. उपक्रमातून फायदा होईल पण कदान्न खायची सवय करायला सांगणे सोपे करणे अवघड आहे. पाण्यातल्या भाज्या आता कोणी खात नाही. फक्त तुपातेलात थपथपलेल्या हव्यात.

http://www.loksatta.com/lekha-news/western-food-harmful-or-healthy-1364078/ अतीशय उत्तम व डोळ्यात अंजन घालणारा लेख! प्रत्येकाने जरुर वाचा. आधी वाचला असल्यास ठीक आहे.

धन्यवद रश्मि. खूप उद्बोधक लेख आहे.