तो कोण होता?(तरही)

Submitted by रामकुमार on 10 March, 2011 - 16:18

आज माझ्या मुलीचा(श्रेया) चौथा वाढदिवस आहे.
आपल्याला कविता आवडली नाही तर सगळा दोष माझा,
आणि आवडली तर सारे श्रेय तिला भेट!
====================================
प्रेमवेडा आरशा, तो कोण होता?
थेट माझ्यासारखा तो कोण होता?...१

ही कुणाच्या सोबती नियती निघाली?
ध्येयपंथी चालला तो कोण होता?...२

उंच आकाशी उडाला स्वप्नपक्षी
काल होता पेटला तो कोण होता?...३

तो पुढे, मागे तयाच्या कारवा हा
मार्ग ज्याचा एकला तो कोण होता?...४

काल ज्याने दाविलेली गोड स्वप्ने
तू नव्हे तो_नायका, तो कोण होता?...५

मज घरातुन काढले बाहेर रात्री
अन् पहाटे झोंबला तो कोण होता?...६

जाळली रागात त्याने कोवळी ती !
"प्रेम माझे", बोलला तो कोण होता?...७

काल ज्याचे तूच दैवत, तूच सारे
आज आई, बायला तो कोण होता?...८

आज त्याने फोडली मूर्ती म्हणे ती
पाच वेळा वाकला तो कोण होता?...९

संकटे नाना तरीही हास्य ओठी
शांत ज्याचा चेहरा तो कोण होता?...१०

स्नेहलेपाने भरे हा घाव सुहृदा,
बाण ज्याचा गौतमा, तो कोण होता?...११

दाटला हा कंठ, नयनी प्राण आला
गीत ज्याचे_गायका, तो कोण होता?...१२

मानिले कुसुमाग्रजांना दीप ज्याने,
त्याच तेजे चेतला तो कोण होता?...१३

रामकुमार

गुलमोहर: 

रामकुमार्,आपल्या मुलीला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद.

आणि हो,गझल चांगली झाली आहे..

काल ज्याचे तूच दैवत, तूच सारे
आज आई, बायला तो कोण होता?...८

हा आवडला.

रामकुमार,

माझ्याही शुभेच्छा आपल्या कन्येला!

संकटे नाना तरीही हास्य ओठी
शांत ज्याचा चेहरा तो कोण होता?>>

हा शेर आवडला.

(अवांतर - द्विपदींना क्रमांक देऊ नयेत अशी विनंती!)

-'बेफिकीर'!

रामकुमारजी श्रेयाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा Happy

आवडली गझल, खासकरून ...४,९ आणि १० आवडले .