राग नियमन

Submitted by नरेंद्र गोळे on 10 March, 2011 - 06:56

आपल्याला राग का येतो? आपण स्वत:वर क्वचितच रागवतो. जास्ती करून आपल्याला दुसर्‍याच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा राग येतो. आता, आपल्याला दुसर्‍याचा राग का येतो? तर अहंकार दुखावला जाणे, घाई असणे, अपेक्षाभंग होणे आणि नकारात्मक विचारात तल्लीन असणे ह्यामुळे राग येतो. थोडक्यात हे चार प्रकार आहेत राग येण्याचे. म्हणजे तुमचा आमचा राग, ह्या चार प्रकारात मोडतो.

अहंकार

त्याने मला असे कसे म्हटले? मी एवढी त्याच्याहून मोठी आहे हे तो विसरला का? किंवा मी काय शिकलेला आणि तो काय शिकलेला? स्वत:ला माझा साहेब समजतो की काय? असे विचार आपल्या मनात येतात. म्हणजे कुठेतरी आपला अहंकार दुखावला गेलेला असतो. म्हणून आपल्याला त्या व्यक्तीच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा राग येतो.

घाई

एकाच वेळेला आपल्याला खूप गोष्टी करायच्या असतात. मग त्या ठराविक वेळात आवरल्या जात नाहीत. किंवा ते करताना कोणी विचलित केले तरी आपल्याला राग येतो. समजा आपल्याला कुठेतरी जायचे आहे. इतर काही कामामुळे उशीर झाला आणि रस्त्यात जाताना सगळे वाहतूक दिवे लाल लागले की आपली चिडचिड होते. कार्यालयामध्ये काम करताना त्या दिवशीच्या कामाची यादी चाललेली असते आणि त्यात आठवण होते, आपल्याला कोणाला तरी दूरध्वनी करायची. अशा वेळी फोन लागत नसला किंवा व्यस्त लागला की आपली परत चिडचिड. मग तो दूरध्वनी आपटला जातो किंवा हवी असलेली व्यक्ती भेटली नाही तरी राग येतो. फोनचा आणि त्या व्यक्तीचा. शिवाय बरेच काम अजून व्हायचे असते म्हणून त्या कामाचा.

अपेक्षा

आपण दुसर्‍याकडून अपेक्षा करतो आणि मग त्या पूर्ण झाल्या नाहीत की आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो. साधे म्हणजे आपण आपल्या मुलांकडून, आईवडिलांकडून, नातेवाईकांकडून, मित्रांकडून काही अपेक्षा करतो आणि ते जर आपल्या अपेक्षेनुसार वागले नाहीत की आपल्याला लगेच राग येतो. आपण विचारही करत नाही की आपल्या अपेक्षा योग्य होत्या की नाही? त्यांच्या दृष्टिकोनातून विचार न करताच आपण रागवतो.

नकारात्मक विचार

छे असे होणारच नाही. आपणच नेहेमी भोगणार. आपण कितीही झटा, पण आपल्याला ते मिळणारच नाही. मी सांगतो, आमचे नशीबच वाईट. आम्हाला लगेच अशी नोकरी मिळणारच नाही. आमच्या नशिबात नुसते कष्टच आणि परत ह्या कष्टाचे फळ मिळणार नाही, ते नाहीच. आम्ही मुलांसाठी एवढे कष्ट केले पण तुम्हाला वाटते का की, ती मोठेपणी आम्हाला विचारतील? मी दिसायला इतका चांगला, इतकी चांगली नोकरी, आणि एवढे चांगले शिक्षण, पण आम्हाला कुठली आली त्या क्ष सारखी बायको मिळायला?

विचार करून पहा. आता आजूबाजूचे जग बदलणे सोपे, का आपण स्वत: आपले विचार बदलणे सोपे आणि शक्य आहे? आपला राग आपण नियंत्रित करणे सोपे आहे, का आपण इतरांचे वागणे बदलू शकणे सोपे आहे? आपला राग नियंत्रित करणे जास्त शक्य आहे, कारण ते आपल्या हातात आहे.

आपल्याला येणारा राग हा सक्रिय प्रकारात मोडतो का निष्क्रिय प्रकारात मोडतो हेही आधी जाणून घेतल पाहिजे. आता सक्रिय राग म्हणजे काय? काहीतरी होते आणि आपल्याला राग येतो. म्हणजे आपली चांगली फुलदाणी कोणाच्या तरी हाताने फुटते मग आपल्याला त्याचा राग येतो. पण आपण जेंव्हा विचार करतो की, त्या माणसाने ती काही मुद्दाम फोडलेली नाही, तेंव्हा थोडया वेळाने तो राग शांत होतो. म्हणजे व्हायला हरकत नसते आणि अशावेळी जर सल राहिला नाही, तर तो सक्रिय राग झाला. माणूस चिडले आणि थोडया वेळाने शांत झाले.

दुसरा असतो निष्क्रिय राग. असा माणूस बाहेरून थंड असतो, पण आत मध्ये अगदी धुमसत असतो. अगदी सगळ्या बाबतीत त्याला लोकांचा द्वेष, राग, तिरस्कार सगळेच असते, पण बाहेरून अगदी शांत असतो. त्याच्या मनात सूडाची भावनापण असते. तर असा राग फारच महाभयंकर असतो. आधी बघा तुमचा राग कशा प्रकारात बसतो ते. निष्क्रिय राग नियंत्रित करणे कठीण असते.

खालील गोष्टी करून काही फायदा होतो का ते बघा.

१. अंतर-तपास: दिवसभराचा आढावा घ्या आणि बघा आपला राग सक्रिय होता का निष्क्रिय? आपण तो नियंत्रित केला की नाही? कशामुळे आपल्याला राग आला होता? तो योग्य होता का? आणि मग आपण आपली कृती सुधारण्याचा प्रयत्न करा.

२. सखोल श्वसन: राग आल्यावर हे जरूर करून बघा. राग कमी तरी होईल. आतताईपणाने निर्णय घेतला जाणार नाही. ताबडतोब तोंडाला आले ते बोलून टाकले जाणार नाही.

३. नकारात्मक स्थितीचा अस्वीकार: नकारात्मक स्थितीचा स्वीकार करू नका, किंवा तिच्याकडे दुर्लक्षही करू नका. दुसरा रागावला असला आणि तो राग तुम्ही स्वीकारलाच नाही, तर तो राग त्याच्याजवळच राहील. म्हणजे कोणी रागावले असले आणि आपण त्यामुळे रागावलो नाही, शांतच राहिलो, तर आपल्याला त्या रागाचा त्रास होणार नाही. म्हणजे कोणी म्हटले की ह्या साध्या गोष्टी तुला करता येत नाहीत, तुला काही समजतच नाही. आता ह्या नकारात्मक गोष्टी आपण स्वीकारच केल्या नाहीत की राग येणारच नाही. ओरडणे, रागावणे त्या दुसर्‍याजवळच राहतील.

४. जागा सोडा: जागेचा त्याग करा. एखादा खूप रागावला आहे. खूप आरडाओरडा चालला आहे. तुम्ही तिथून निघून जाऊ शकता. त्याला तुम्ही बदलू शकत नाही, पण स्वत:ला परिस्थितीप्रमाणे जुळवून घेणे तुमच्या हातात आहे.

५. सौम्यपणे आणि सावकाश बोला: जे लोक सगळ्या गोष्टी घाईघाईने करतात किंवा जोरजोरात बोलतात, असे लोक लवकर रागवतात. लवकर संतापतात. आणि तसे पाहिले तर, आजूबाजूच्या लोकांना पण संतापवतात. आपण जर आपला निषेध किंवा आपला विरोध, आरडाओरडा न करता दाखवला, तर समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला सकारात्मक प्रतिसाद पण मिळू शकतो किंवा आपण दुसर्‍याला पण पटवून देऊ शकतो. बघा पुढच्या खेपेला तुम्हाला कोणाचा राग आला आणि तुम्ही आरडाओरडा न करता तुमचा मुद्दा सांगितलात की समोरच्याला पटतो की नाही ते.

६. खाली बसा किंवा चक्क आडवे व्हा: रागावले असताना जर खाली बसले तर रागाचा आवेश कमी होतो. माणूस जेंव्हा उभा असतो तेंव्हा रागावून जास्त तावातावाने बोलत असतो असे लक्षात येईल. जरा खाली बसला, की रागाचा आवेश उतरतो.

७. जरा थंड पाणी पिऊन बघा. राग आलेला असताना जर दोन घास पोटात गेले तर राग नाटयमयरीत्या कमी होतो असा अनुभव आहे.

८. दुसर्‍या बाजुनी विचार करून बघा: कोणावर रागवण्याआधी त्याच्या दृष्टीकोनातून विचार करून बघा. दुसरी व्यक्ती का रागावली असेल किंवा त्या व्यक्तीचे असे वागण्याचे कारण काय असेल?

ह्यातील काही गोष्टी पटतील, काही पटणार नाहीत. सगळेच उपाय प्रत्येक वेळेला लागू होतीलच असे नाही. राग संपूर्णपणे निघून जाईलच असेही नाही. पण निदान नियंत्रणात राहील किंवा थोडासा कमी होणे पण शक्य आहे. काही गोष्टी अंमलात आणणे शक्य आहे आणि काही फरक पडतो का ते बघता येण्यासारखे आहे.

संतापाचा ताबडतोब निचरा करावा. ओरडा आरडा करून वगैरे. म्हणजे मन स्वच्छ राहतं, याउलट तो साठत राहिला तर त्याचं रूपांतर विद्वेषात होतं. हे सगळं रागवल्यावर आठवायला पण पाहिजे. यातला गमतीचा भाग सोडून दिला तरी, एक गोष्ट खरी की, रागाचा सामना करण्यासाठी आपल्या मनाला तयार करावं लागतं.

सखोल श्वसन केल्यानंतर मन स्थिर झाल्याचा जो एक क्षण आपल्याला मिळतो, त्या एका क्षणात सगळा राग पचवून टाकण्याचं सामर्थ्य असते. ह्यानंतर बाकीचे उपाय करताना आपल्या जीवाचा तळतळाटपण होत नाही. विपश्यना, कोणत्याही प्रकारचं ध्यान, प्राणायाम अशा गोष्टींनी तयार केलेलं मन कुठल्याही रागाचा सामना करू शकतं आणि एखाद्या कमलपत्राप्रमाणे त्या वैफल्याच्या भावना त्याच्यावर न साठता निघून जातात आणि त्याची परिणती विद्वेषात होत नाही.

राग आला की १ ते १०० अंक मोजा. त्याचे २ फायदे आहेत. राग हळूहळू नाहीसा होतो व आपल्याला १ ते १०० अंक नीट मोजता येतात याचा आनंद वाटतो.

नियमांचं पालन न करणारे लोक पाहून खूप राग येतो. बसमधे, सरकारी कार्यालयांमधे, बँकेत, अगदी कुठेही असे लोक आणि त्यांना निमूटपणे सहन करणारे लोक बघून खूप राग येतो. नियमांचा अंमल ज्यांचे हातात असतो त्यांनी तो रुजू केल्यास बेशिस्त लगेच नियंत्रणात येते.

एकदा एक रेल्वेचा तिकिट कारकून, घोळक्यानी समोर येणार्‍या लोकांना पाहून बराच रागावलेला होता. त्यानी काम थांबविले आणि जाहीर केले की रांगेत उभे राहाल तरच तिकिटे देईन. लगेच लोक रांगेत उभे राहिले. तो प्रयोग जादूच्या कांडी सारखाच वाटला.

स्वयंसुधारणेबद्दलच्या निरनिराळ्या व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीरांना उपस्थिती लावल्यावर असा अनुभव येतो की असल्या मानसशास्त्रीय विश्लेषणांत काही राहून गेले आहे असे सहसा नसतेच. जर आपल्याला ते दिसले नाही तर आपणच नीट पाहावे म्हणजे दिसते. आणि राग वैफल्य वगैरे दोषही आपलेच असतात आणि त्यांवर उपायही आपणच, आपल्यावरच करायचा असतो. अपेक्षाभंगाचे दु:ख दारूण असते. तशीच अतृप्तीची बोचही. कुठल्याही प्रकारच्या अतृप्तीमुळे राग चटकन येतो.

रागावर सगळ्यात चांगला उपाय `मौनं सर्वार्थ साधनं'. दुसर्‍याचे दोष दाखवताना मुठीची तीन बोटे आपल्याकडे वळत असतात. रामदासांचे `मनाचे श्लोक' सुद्धा, जर कोणी अर्थ समजून त्याप्रमाणे वागेल, तर तोही एक चांगला उपाय ठरावा. मानसोपचाराचे बरेच उपाय त्यात दिसतात.

श्रेयनिर्देशः खूप पूर्वी मायबोलीवरच रंगलेल्या चर्चेचा हा सारांश आहे. त्यामुळे काही वाक्ये, काही जणांना आपली वाटली तर त्यात काहीच वावगे असणार नाही.
.
http://aarogyasvasthata.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला आहे लेख. याची सतत पुनरावृत्ती करायला हवी म्हणजे रागावर नियंत्रण रहाण्यास मदत होईल.

आपले लेख फारच छान भाषेत लिहिलेले असतात. अतिशय उपयोगी अशी ही माहिती इतक्या सुंदर पध्दतीने मांडलेली असते.

मोहाचा जसा एक क्षण असतो तसा रागाचाही असतो. तो तेवढा नेमका जिंकता आला की झालच. पण मुदलात हेच तर कठीण पडतं ना!

स्वप्ना, रूनी, सावली, मामी, अनु ३ आणि आर्च प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

आर्च,
हो. तुमचे बरोबर आहे. इथे दुवा दिल्याखातर धन्यवाद. त्याच चर्चेचा हा सारांश आहे. यानिमित्ताने, त्या चर्चेत आपापले मौल्यवान मुद्दे मांडणार्‍या त्या चर्चेतील सर्व सहभागी सुसंवादकांचे मनःपूर्वक धन्यवाद! विशेषतः तुमचे!!

मात्र, जुन्या मायबोलीतून नव्या मायबोलीत येतांना मी माझ्या नावाचे देवनागरी स्वरूप पत्करल्याने असेल कदाचित, पण माझा स्वतःचाच त्या चर्चेतील सहभाग नाहीसा झालेला दिसत आहे.

चांगला लेख आहे नरेंद्रजी. वरच्या उपायांमध्ये अजून काही आजवर वाचलेल्या उपायांची भर घालावीशी वाटते.

राग येतो तेव्हा

१. स्वतःला भरपूर शारीरिक श्रमांच्या कामात गुंतवा. त्या कामात जशी अतिरिक्त ऊर्जा खर्च होते त्याच प्रमाणे त्या कामात मन गुंतवले की राग शांत व्हायला मदत होते.

२. (हा उपाय काहींना विनोदी वाटायची शक्यता आहे, पण त्याची परिणामकारकता नक्कीच आहे) जेव्हा रागामुळे खूप आरडाओरडा करावासा वाटतो तेव्हा एखाद्या खोलीत स्वतःला बंद करून घ्या, तोंडावर उशी ठेवा आणि खच्चून ओरडून घ्या. ह्या उपायात घशावर ताण यायची शक्यता आहे.

३. चेहरा, मान, हात, पाय, डोळे थंडगार पाण्याने धुवा. थंड पाणी प्या. रागाची तीव्रता कमी होते.

४. श्वसनाकडे लक्ष द्या. आत जाणारा श्वास, बाहेर येणारा श्वास, त्याचा नासिकेतील प्रवास....

छान आहे लेख. माझा रागाचा पारा एका क्षणात वर जातो. नंतर स्वतःचा राग येतो की इतके रागवायचे कारण होते का म्हणुन.... वरचे नियमनाचे नियम लक्षात ठेवीन आता.

नरेंद्रजी,
आजकालच्या जीवनात तर खुप उपयोगी लेख!

उपाय वाचले, छान आहेत, पण राग आल्यानंतर फक्त रागच असतो ...
हे सगळे उपाय लक्षात तर आले पाहिजे ना !!
Happy

खरच खुप गरज होती या नियमाची मला,तुम्ही म्हणता तस जे लोक सगळ्या गोष्टी घाईघाईने करतात किंवा जोरजोरात बोलतात, असे लोक लवकर रागवतात हे मला लागु होते. नंतर स्वतःचा राग येतो की इतके रागवायची गरज होती, खुप प्रयत्न करते राग नियतत्र्नात आणयला, तुम्हची मदत होणार मला हे नक्की...खुप खुप धन्यवाद

खूपच छान लेख आहे. सतत उपयोगी पडेल.
गोळेकाका, सगळे लेख वाचते मी. प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देत नाही, पण आचरणात आणायचा जरूर प्रयत्न करत असते.

(आता एक गंमत...मी राग नियमन च्या ऐवजी "राग यमन" वाचलं होतं. माफ करा, पण यमन खरंच खूप लाडका राग आहे...त्यामुळे पटकन वाचताना जरा गोंधळ झाला! Happy )

खुप छान अहे, मला गरज होति यचि,खुप लव्कर सगल्या चा राग येतो, अनि राग बाहेर पन काधता येत नाहि, धन्यवाद

मोहाचा जसा एक क्षण असतो तसा रागाचाही असतो. तो तेवढा नेमका जिंकता आला की झालच. पण मुदलात हेच तर कठीण पडतं ना!>>सहमत.
छान लेख.

चांगल लिहिलंय.
मी लेखातले राग कमी करण्यासाठी 3 प्रकार माझ्या नकळत करत होते.
1 जागा सोडा.
2 सौम्यपणे बोला.[या प्रकारासाठी समोरचा माणुस ऐकुण घेण्यालायक असावा लागतो. Proud ]
3 दुसर्या बाजुने विचार करा.[या प्रकाराचा खुप फायदा होतो. आपली चुक असली तर समजुन दुरुस्त करता येते. Happy ]