वार्‍याची फजिती

Submitted by पुरंदरे शशांक on 7 March, 2011 - 02:46

झाड मजेत उभे उन्हात
पाखरांसोबत गाणे गात

आला वारा इकडून तिकडून
सळसळ वाजली पानातून

वारा हळूच काढी खोडी
झाडासोबत झिम्माफुगडी

गरगर गरगर झाडा फिरवून
पाने दिली की भिरकावून

वार्‍याला वाटे मोठी मौज
सोबतीला घेई ढगांची फौज

पाहून वार्‍याची घुसळणकुस्ती
गरजले ढग - "बास ही दंगामस्ती"

ओरडूनही ऐकत नाही बेटा
पाठीत बसला वीजेचा रट्टा

वीजेचा रट्टा गारांचा मारा
वार्‍याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा

रडत रडत पळाला वारा
झाड म्हणाले "उतरला का तोरा ?"

झाड भिजले पानापानात
आनंदले मनामनात......

गुलमोहर: