पाऊस

Submitted by फुले नेत्रा on 3 March, 2011 - 13:21

पाऊस...
किती सांगू याच्याबद्दल,
कविताही कितीतरी झाल्या या पावसावर
पण तरी तो ऐकेचना
सोबत एक आठवण घेऊन येतो
आणि म्हणतो, कर ना एखादी कविता माझ्यावर

किती सांगितलं त्याला
बाबा रे निघून जा, निघून जा आणि येऊ नकोस परत
आणि कोण तू..? मी का करू कविता तुझ्यावर..?
पण तरी तो ऐकेचना
सोबत एक आठवण घेऊन येतो
आणि म्हणतो, कर ना एखादी कविता माझ्यावर

शेवटी मलाच राहवेना,
घेतला पेन बसले लिहायला
तर शब्दच सुचेना
मग उठले,
म्हटलं किती वेळ वाया घालवू कविता करण्यात या पावसावर
पण तरी तो ऐकेचना
सोबत एक आठवण घेऊन येतो
आणि म्हणतो, कर ना एखादी कविता माझ्यावर

पेन बंद करुन मी चटकन उठले
त्या क्षणी मनात पावसाळी काव्यांचे थेंब उमटले
मग म्हटलं त्याला मी रागवल्यावर
इतका वेळ काही सुचलं नाही आणि मग आता का छळतोएस मला आल्यावर
पण तरी तो ऐकेचना
सोबत एक आठवण घेऊन येतो
आणि म्हणतो, कर ना एखादी कविता माझ्यावर

तेव्हाच उमजले, हा पाऊस इतका अगाऊ आणि खट्याळ
कि नाही म्हटलं तर सारखाच येतो आणि
वाट पाहिली तर आभाळात गुड्डुप्प होऊन जातो

तसा हा दर वर्षीच आपल्याला त्रास द्यायला येतो
पण त्यात तो एक थेंब काही निराळाच असतो

कधी हा त्याचा तिरस्कार वाटेल असा चिंब भिजवून जातो
तर आता, चिंब भिजूनही पुन्हा पुन्हा भिजण्याची आस देऊन जातो

कधी हा चिख्खल आणि चिकचिक याचा वैताग देऊन जातो
तर आता, दुसर्‍यांच्या अंगावर चिख्खल उडविण्याची मजा देऊन जातो

कधी हा नको तेव्हा येऊन, क्लास बुडवण्याची आयडिया देऊन जातो
तर आता, रोमॅन्टिक मुड मध्ये असतानाही वाट पाहण्याचे तासंतास देऊन जातो

कधी हा भर पावसाळ्यात, कितीही खरेखुरे पैसे दिले तरीही रुसून बसतो
तर आता, भर उन्हातही तो एक थेंब मात्र अलगद स्पर्श करत राहतो

अशी ही कविता, दिली त्याला वाचायला
दिली त्याला आणि म्हटलं आता जाऊ दे मला
तर निघताच म्हणाला, अगं अगं थांब जरा
थांब जरा आणि कवितेवर प्रतिक्रिया तरी ऐक जरा

म्हणाला, आधी नको नको म्हणत किती छान कविता केलीस माझ्यावर
ए मग आता पुन्हा...?
पुन्हा..! म्हटलं नको रे बाबा, आता पुन्हा नाही कविता करणार तुझ्यावर
पण तरी तो ऐकेचना
म्हणाला थांब, सोबत अजून एक आठवण घेऊन येतो
आणि मग बघू कशी नाही कविता करत तू माझ्यावर
आणि मग बघू.............!

गुलमोहर: 
शब्दखुणा: