निबंध - प्रवेशिका ६ (डुआय)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 25 February, 2011 - 20:27

मायबोली आयडी: डुआय

ह्या वर्षी मायबोलीच्या दुस र्या मराठी भाषा दिवसा निमित्त होणा र्या उपक्रमा अंतर्गत माझे आवडते पुस्तक / (पुस्तकं) ह्यावर निबंध लिहायचा हे नक्की केलं खरं. पण निबंध लिहायचा म्हणजे नक्की कुठल्या एका पुस्तकावर लिहू हा प्रश्न पडला. एकाच पुस्तकावर लिहणे बंधनकारक नसल्याने मी माझ्याकडे असलेली बरीचशी पुस्तकं तपासून पाहिली. त्यात नुकतीच वाचून संपवलेली भैरप्पांची पर्व किंवा गिरीश कुबेरांची दोन पुस्तकं - एका तेलियाने अन् हा तेल नावाचा इतिहास, तसेच कमलेश वालावलकरांच - बाकी शून्य, सुनिताबाईचं आहे मनोहर तरी, सोयरे सकळ, गौरीची, सानियेची, इरावती कर्व्यांची इथपासून ते मला फार भावणारी ALVIN TOFFLER, DANIEL GOLEMAN, AYN RAND, JACK WELCH, WILLIAM POUNDSTONE इत्यादींची पुस्तकं चाळली.

अन् शेवटी ठरवलं की आवर्तन (सानिया) मौज प्रकाशन, बहार (शुभा येरी) मेनका प्रकाशन, ह्यावर लिहायचं.

आवर्तन (सानिया) मौज प्रकाशन

२००३ सालची गोष्ट असावी. तेंव्हाच्या अल्फा टीव्ही मराठीवर 'पिंपळपान' मध्ये आवर्तनचे काही एपिसोड्स बघितले. अन् असंच केव्हातरी सानियेची आवर्तन कादंबरी हातात पडली. अल्फा टीव्हीवर बघून मे बी श्रीरंगची भुमिका साकारणारा संदेश कुलकर्णी कादंबरीत अगदी तसाच भासला. आवर्तन जर आधी बघितलं नसतं तर कदाचित ही अशी प्रतिमा उभी राहिली असती का असा राहून राहून प्रश्न पडला. कादंबरीची सुरूवातच होते श्रीरंगच्या मृत्यूने. सुरूची निनीकडे तिच्या आज्जीकडे परत येते. अन् हा मधला काळ निनी सहज पुसून टाकते. निनी एक आदर्श, करारी अन खंबीर व्यक्तीमत्व! आपल्या नातीला ती माफ केल्याच दाखवते. पण तिला खरं तर ते सहन नाही होत सुरूचीच असं वागणं. जन्मानंतर लगेच परदेशी गेलेल्या मुलीला ती निक्षून सांगते की नातीला इकडेच ठेव. मी सांभाळेन अन् तसं ती सांभाळतेही पण शिस्तीत!

सुरूची, निनी, स्वरूप अन् श्रीरंग ही मुख्य पात्र ह्या कांदबरीतली! निनी करारी खंबीर.(एखाद्या गोष्टीला अनेक बाजू असतात माणसालासुद्धा. कुणाचाही विचार करताना थोडीशी जागा ठेवावी असं म्हणणारी) स्वरूप लहान पण काय हवंय ते मोजून मापून घेणारी. सुरूची जे आहे ते हातात, मुठीत धरू पाहणारी अन् सर्वात शेवटी श्रीरंग कशातही न गुंतलेला! मुठीत न मावणारा, अत्यंत हुशार पण तितकाच स्वतंत्र! सुरूचीवर अतिशय प्रेम करत असलेला पण तिच्यात गुंतण्यास तयार नसलेला. खरं तर न गुंतलेला असं नाही म्हणता येणार. पण सुरूचीच्या मते तिच्याशिवाय राहू शकणारा, कोणतही बंधन न स्वीकारता राहू पहाणारा श्रीरंग. आपण कुणाला बांधील नसतो असं म्हणणारा श्रीरंग. तिला फारसा कळलाच नाही. जे आहे त्यात माणुस समाधानी नसतो हे खरं.
श्रीरंग बापाचा अतिशय तिरस्कार करणारा पण त्याच्या धंद्यात जीव ओतून काम करणारा. आईला बहिणीला वाचवू न शकलेला श्रीरंग लग्न, संसार न करता सुरूचीला वाचवू पहाणारा. एकीकडे लग्नसंस्थेची खिल्ली उडवणारा श्रीरंग आपल्या विचारांवर ठाम, पर्यायांचा मोहांचा विचारही नाकारणारा अन् त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली सुरूची.

बहार (शुभा येरी) मेनका प्रकाशन

एखादं पुस्तक आवडतं म्हणजे नक्की काय होतं? कथानक आवडतं, शैली आवडते का? की विचार पटतात? आपलेच वाटतात. विचारच पटत असावेत आपल्यालाही हेच म्हणायचं होतं असं वाटत असावं. सानियाची इतरही अनेक पुस्तकं वाचली पण ज्या ताकदीने आवर्तन मनाला भिडलं त्या ताकदीने इतर नाही भिडली हा दोष माझाच हे नक्की. कारण इतर प्रत्येक पुस्तकात मी श्रीरंगला शोधत होतो हे आत्ता आत्ता उमजतय. जे अर्थातच चुकीचं आहे. त्याच सुमारास शुभा येरीची 'बहार' मेनकात वाचली.

बहार पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध झाल्यावर पुन्हा एकदा वाचून काढली. perception is reality! म्हणणारा निरंजन पटला. आलम अली बेग म्हणजे आलम स्वामीनाथनही पट्ला. मिठू स्वामीनाथन म्हणजे मिठू बेग अन् अश्विन कार्तिकेयनच लग्न जरी पटलं नसलं तरी कादंबरीचा विचार करता ते तसं ठीक वाटलं. फॅक्टरी, सलोनी सगळंच हरवून बसलेला अश्विन कार्तिकेयन ही व्यक्तिरेखा जेवढी सशक्त आहे तेवढीच मेखला ही व्यक्तिरेखाही! स्वत:ची काहीही चूक नसताना, अश्विनचा रोष सहन करणारी मिठू एकदाही दुबळी वाटली नाही! बहारवर एक सॉल्लिड चित्रपट होऊ शकेल अर्थात तो तसा झाल्यास फारच चांगलं नाही तर निदान एखादी मालिका. पण जर पिक्चर झलाच तर तो टिपीकल बॉलिवूड स्टाईलने न होता P S I LOVE YOU सारखा व्हावा ही इच्छा आहे.

केवळ मी, माझं दु:ख ह्याचाच फक्त विचार न करता समोरची व्यक्ती काय विचार करते तिच्याही दृष्टीकोनातून विचार करण्याची गरज आहे. तशी ती कायमच असते फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं की आपण कायम असा दुस र्याचा विचार करू शकतो काय? तेवढी इच्छाशक्ती आपल्यात आहे काय? कठिण आहे असा त्रयस्थाच्या भुमिकेतून विचार When there are much stakes involved… पण शक्य आहे! भले समोरची व्यक्ती तिला हवी तीच कल्पना करून घेणार अन् तेच सत्य आहे असं समजून भांडत बसणार पण म्हणून मग आपणही जर तोल सोडला तर संपलंच सगळं. सुडाच्या आगीत , वैर भावनेने केलेले कृत्य हे कधीही मनाला शांती देऊ शकत नाही. सानियाने आवर्तनमध्ये म्हटल्याप्रमाणे एखाद्या गोष्टीला अनेक बाजू असतात माणसालासुद्धा. कुणाचाही विचार करताना थोडीशी जागा ठेवावी. अर्थात हे बोलणं खूप सोपं आहे हे मला माहित आहे. पण निदान तसा प्रयत्न करायला काय हरकत आहे?

मरणाला पर्याय नसतो असं म्हणणारा श्रीरंग अचानक एका कार अपघातात जातो. पण कायमचा जाताना, सुरूचीसाठी पैसे, आठवणी ठेवून जातो. त्याचं तिच्यावरचं प्रेम समाजाच्या आखीव रेखीव कल्पनात, फूटपट्टीत बसणारं नाही. पण ते तसं कधीतरी बसेल अश्या विचारांत असलेली सुरूची. त्याच्या आठवणीत, दुसरा पर्याय न स्वीकारता जगत रहाणारी, श्रीरंगच्या वडीलांबरोबर त्याच असलेलं वैर खुलेपणानं पुरं करायला तयार अशी सुरूची. बहारमध्येतरी वेगळं काय झालं? अश्विनचा अप्पांवर असलेला राग काळाबरोबर शांत होत गेला पण ह्यात जिवंत जळाली ती मेखला अन् आलम आणि त्या दोघांची कला! अन् किरीट. मरणाला पर्याय नसतोच! तसा तो अश्विनच्या सलोनीलाही नव्हता पण कंपनी वाचवायच्या निमित्ताने बनलेली मिसेस मेखला कार्तिकेयन ही अश्विन च्या सलोनीला एक पर्याय ठरली!

चार शब्द -

रूढार्थाने वरच्या ह्या लिखाणाला निबंध म्हणता येईल का ह्या बाबत मी जरी साशंक असलो तरी ही स्पर्धा / परिक्षा नसल्याने मनात जे जे आलं ते ते एडिट न करता झरझर (प्रथमच) लिहित गेलोय. आवर्तन अन् खरं तर बहार ह्यावर अजून खूप लिहिता येईल पण वेळेअभावी मला ते आत्ता करणं शक्य नाही. आवर्तन अन् बहार मध्ये एक समानता आहे ती ही की प्रियकर / प्रेयसीचा अपघाती मृत्यू! आपल्या नात्यातल्या एखाद्याच्या मृत्यूमुळे काही काळ जगणं थांबत, शॉक बसतो पण सवय होते. पण तो काही पर्याय नाही होत कायमचा. अशीही जगायची सवय होऊ शकते ह्याच गोष्टीचं आश्चर्य वाटलं होतं. काही काळ आपण आवर्तन प्रचंड म्हणजे प्रचंड आवडायची अशी एक फेज होती. तशीच ती बहारचीही असेल ह्या बाबत फार काही शंका नाही पण अजूनही आवडतं पुस्तक म्हटल्यावर माझ्या मनात हीच दोन पुस्तकं प्रकर्षानं आली. का माहित नाही. शुभा येरींच्या पुनर्जन्म, Past Life Regression बद्द्लही लिहायचं मनात होतं, पण एकतर तो कादंबरीचा विषय नाही अन्... असो पुन्हा केंव्हातरी...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'बहार' माझीही अत्यंत आवडती कादंबरी आहे डुआय. एक सुडाचा प्रवास, माणसातल्या माणूसपणाची पटणारी ओळख, एक हळूवारपणे उलगडत जाणारं, फुलत जाणारं प्रेम असं सगळं काही त्या कादंबरीत आहे. मिठूसाठी वाईट वाटतंच पण अश्विनसाठीही तितकंच किंवा जास्तच वाईट वाटतं. Man propses God disposes ची पुरेपूर प्रचिती ही कादंबरी वाचल्यावर येते.
फक्त तू त्यावर सिनेमा/मालिका व्हावी असं जे म्हणाला आहेस ते मला अजिबात पटलं नाहिये. ती एक तरल कादंबरी आहे, आणि ती कादंबरी स्वरुपातच रहावी असं माझं मत आहे.

रैना, मंजिरी धन्यवाद Happy स्वाती, आवडली का ही पुस्तकं?

मंजूडी, ठिके गं तुला नाही पटलं तर. जर पिक्चर केला तर मी तुला नाही सांगणार Proud

आता जर मालिका झालीच तर ती कशी होईल याची स्टोरी लिहू का? Wink