ये हृदयीचे ते हृदयी - प्रवेशिका २ (स्वाती_आंबोळे)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 25 February, 2011 - 19:01

कवी ई. ई. कमिंग्ज म्हणाला होता,
"The Symbol of all Art is the Prism. The goal is to break up the white light of objective realism into the secret glories it contains."

"वास्तवाच्या प्रकाशात दडलेल्या दैदिप्यमान रंगच्छटा दृग्गोचर करते ती कला!"

म्हणूनच एका कवितेत अर्थांच्या शेकडो शक्यता दडलेल्या असतात. भाषा अवगत असली की शब्दार्थ सर्वांना सारखेच माहीत असतात. परंतु कवितेच्या भावार्थाची जी छटा एकाला दिसेल, रुचेल, ती दुसर्‍याला दिसेलच असं नाही, दिसली तरी आवडेल असं नाही. कविता लिहून झाली की वाचकाच्या मालकीची होते म्हणतात ते त्याच अर्थी. जो अर्थ जितका खोलवर तुम्हांला भिडेल, तितकी ती तुमची!

'नक्षत्रांचे देणे' हा कविवर्य आरती प्रभूंचा अतिशय अनवट कवितांनी नटलेला काव्यसंग्रह. यातल्या 'लवलव करी पातं' या कवितेची मला दिसलेली भावच्छटा तुमच्यापर्यंत पोचवायचा हा एक प्रयत्न आहे.

पं. हृदयनाथ मंगेशकरांनी या कवितेतून फुलवलेलं गीत तुमच्या-माझ्या इतकं परिचयाचं आहे, की ते इथे पूर्ण उद्धृत करण्याची आवश्यकता नसावी.

ही कविता वाचताना / ऐकताना नेहमी मला नुकतीच वयात येऊ लागलेली - आपल्या तारुण्याची, रूपाची, आपल्या शरीरातल्या बदलांची नवीनच जाणीव होत चाललेली अल्लड मुलगी येते डोळ्यांसमोर. आत्तापर्यंतचं आयुष्य घरातली वडीलधारी मंडळी आणि फार तर एखादी मैत्रीण - या चौकटीत सुरक्षित गेलेलं. आता तिच्यात जागी होते आहे ती एक अनोळखी नवलाई, त्यातली हुरहूर, संकोच, लाज, आणि आता 'कुणीतरी' भेटावं, किंवा भेटलेलं कुणीतरी जवळचं व्हावं - हे सगळं त्याच्या नावे करावं ही ओढ. आपल्याला हे काय होतंय, हे असं काहीबाही वाटणं बरोबर आहे का, कुणाला कळलं तर काय म्हणतील.. या सगळ्या भावना खूप सुरेख व्यक्त झाल्या आहेत या कवितेत.

लवलव करी पातं .. लुकलुक तार्‍याला..

पापण्या भिरीभिरी करतात.. चित्त स्थिर म्हणून होत नाही.. सहज झुळूक यावी आणि हिरवळीच्या अंगावर शिरशिरी यावी तितक्या सहज हातातल्या कामातून लक्ष उडतं.. रात्री झोप चाळवते.. दूरातून काहीतरी, कुणीतरी पुकारतंय असं वाटत राहतं, पण त्याच्या रंगरूपाचा नीटसा अंदाज येत नाही.. दूर आकाशात लुकलुकणार्‍या तार्‍याचा येत नाही ना, तसाच..

चवचव .. धरू कसं पार्‍याला

मघाशी अंगाशी झोंबणारा, पदर उडवणारा वारा आता शांत झालाय खरा, पण तेव्हा मनात जे तरंग उठले, ते कुठे थांबतायत? आत्ता मुठीत होतं म्हणता म्हणता मन कुठे कुठे निसटून जातंय पार्‍यासारखं..

कुणी कुणी .. गाय उठे दाव्याची

नक्कीच कुणीतरी येऊ घातलंय.. नाहीतर उरात इतकं धडधडलं कशाला असतं? कोण जाणे.. हे सगळे माझ्याच मनाचे खेळ, की ..? पण मग एरवी या वेळी शांत रवंथ करत बसणारी गाय एकदम उठून उभी राहिली ती कुणाच्या चाहुलीने?

तटतट .. पारुबाई साठीची

आपल्या रूपरंगात होणारे बदल जाणवायला लागलेत आता.. आरशात बघताना नाही म्हटलं तरी हळूच लक्ष जातंच आपल्या खुलणार्‍या तारुण्याच्या खुणांकडे.. एकटी असले की एकेकदा काहीबाही आठवून हसू निसटतं ओठांच्या कोपर्‍यांतून, तर कधी अकारणच लाजून लाली चढते गालांवर.. इतर कुणाच्या नजरेत येत नसतीलही या गोष्टी अजून.. पण पारुबाई - बहुधा घरातली कुणीतरी वडीलधारी स्त्री - चार पावसाळे पाहिलेली, या सगळ्या 'बाईपणाच्या' अनुभवांतून गेलेली.. तिच्या नक्कीच लक्षात येईल.. जपून रहायला हवं..

उठे उठे चित्त उठे मधमाशी पोळ्याची
कायावाचामन सारं बागशाही माळ्याची

(ही द्विपदी गाण्यात नाही.)

मधमाश्यांचं मोहोळ उठावं तसं काहूर दाटतं मनात.. एकेकदा वाटतं, झुगारून द्यावीत सगळी बंधनं, सगळ्या चौकटी.. आणि...
पण नाही.. यातलं काहीच माझ्या हातांतलं नाहीये खरंतर.. ही घालमेल तेवढी माझी... बाकी .. बाबा म्हणतील तसं... शेवटी तेच हिताचं, नाही का?

-----

'निवडुंग' चित्रपटासाठी पं. हृदयनाथ मंगेशकरांनी याची बांधलेली चाल आणि दिलेलं संगीतही असंच अल्लड आणि हुरहूर लावणारं.. काव्याचा भाव जाणून उमलून आलेलं. त्यामुळे ही सुंदर कविता अजरामर झाली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वातीताई,
अफाट.. नेहमीप्रमाणेच... माझंही अत्यंत आवडतं गाणं. याचं रसग्रहण करायचं वय नव्हतं तेव्हापासुन त्यातल्या सुरांनी मनात घर करुन बसलेलं. इतक्या सुंदर रसग्रहणाबद्दल खूप खूप आभार... Happy

मला हे नेहमी नववधूचे हितगुज वाटते. सिनेम्याच्या प्रभावामुळेही असेल कदाचीत.>> मला पण.

बाईंचा अर्थ पण भावतोय.