केल्याने भाषांतर - प्रवेशिका १३ (लालू)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 25 February, 2011 - 18:56

मूळ कथा - द लास्ट लीफ
लेखक - ओ. हेन्री
भाषा - इंग्रजी.

शेवटचं पान..

वॉशिंग्टन स्क्वेअरच्या पश्चिमेला असलेल्या भागात गुंतागुंतीच्या रस्त्यांमुळे विचित्र आकाराच्या जागा तयार झाल्या होत्या. एखादा रस्ता स्वतःलाच एक-दोन वेळा छेदत होता. एका कलाकाराच्या मनात या रस्त्याबद्दल एक फायदेशीर शक्यता लक्षात आली. समजा कोणी रंग, कागद, कॅनव्हासची किंमत वसूल करायला इथून मार्ग काढत आलाच तर त्याची स्वतःशीच भेट होऊन एकही पैसा वसूल न होता परत जावे लागेल.

त्यामुळं या विचित्र 'ग्रीनविच' गावात कलाकारांची गर्दी होऊ लागली. हे लोक कमी भाडं, पोटमाळे, उत्तरेला उघडणार्‍या खिडक्या आणि अठराव्या शतकातल्या कमानी यांच्या शोधात तिथं आले होते. नंतर त्यांनी सहाव्या रस्त्यावरुन कांशाचे मग, थाळ्या अश्या दोन-चार गोष्टी जमवून वसाहत केली.
एका विटांच्या, बसक्या तीन मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर सू आणि जॉन्सीचा स्टुडिओ होता. "जॉन्सी" हा "जोअॅना"चा अपभ्रंश. एक 'मेन' ची होती आणि दुसरी कॅलिफोर्नियाची. त्यांची भेट आठव्या रस्त्यावरच्या "डेल्मोनिको'ज" मध्ये झाली. त्यांची कलेची आवड तसंच खाण्यापिण्याची, फॅशनची आवड इतकी जुळली की त्याची परिणती दोघींनी एकत्र स्टुडिओ काढण्यात झाली.

ही झाली मे महिन्यातली गोष्ट. नोव्हेंबरच्या थंडीत कधी न पाहिलेल्या एका आगंतुकाने आपल्या थंडगार बोटांनी लोकांना स्पर्श करत दबकत वसाहतीत प्रवेश केला. डॉक्टर त्याला "न्यूमोनिया" म्हणत. पूर्वेकडच्या बाजूला त्या विध्वंसकाने अनेकांचे बळी घेत जोरात मुसंडी मारली. पण पश्चिमेला गुंतागुंतीच्या अरुंद जागांत मात्र त्याची चाल मंदावली.

मि. न्यूमोनिया म्हणजे काही स्त्रीदाक्षिण्य दाखवणारा सदगृहस्थ नव्हे. कॅलिफोर्नियातल्या वार्‍याच्या झुळूकांनी नाजूक बनलेल्या एका लहानश्या स्त्रीशी या बलवान राक्षसाची अजिबातच बरोबरी नव्हती. तरीही त्याने जॉन्सीवर हल्ला केला. ती आपल्या रंगवलेल्या लोखंडी पलंगावर फारशी न हलता पडून रहायची आणि डच पद्धतीच्या खिडकीतून पुढच्या विटेच्या घराची कोरी भिंत पहात बसायची.

एके दिवशी सकाळी म्हातार्‍या डॉक्टरांनी सूला व्हरांड्यात बोलावले आणि थर्मामीटरमधला पारा खाली झटकत म्हणाले, "तिची जगण्याची शक्यता दहा मध्ये एक आहे, आणि तीही तेव्हाच जेव्हा तिला स्वतःला जगावसं वाटेल. तुझ्या मैत्रिणीने ती बरी होणार नाही असा समज करुन घेतला आहे. अश्यावेळी औषधोपचारांचा काही उपयोग होत नाही. तिच्या मनात काही आहे का?"

"तिला.. एकदा नेपल्सच्या खाडीचं चित्र काढायचं होतं" सू म्हणाली.

"चित्र? छे! ती जगण्याबद्दल पुन्हा एकदा विचार करेल असं काही आहे का? एखादा पुरुष?

"पुरुष?" सू नाकात आवाज काढत कुत्सितपणे म्हणाली, "ज्याच्यासाठी जगावं वाटेल अश्या लायकीचा पुरुष...पण नाही डॉक्टर, तसं काही नाही."

"मग हीच तर कमजोरी आहे." डॉक्टर म्हणाले. "मी माझ्या शास्त्रातले माझ्या परीने होऊ शकतील ते सगळे प्रयत्न करेन. पण जेव्हा रोगी स्वतःच्या अंत्ययात्रेतले लोक मोजू लागतो तेव्हा मी औषधाची परिणामकारकता निम्म्याने कमी धरतो. तू तिला थंडीतल्या कोटांच्या फॅशनबद्दल बोलायला लावलंस तर मी तिची जगण्याची शक्यता दहा पैकी एक वरुन दहा पैकी पाच वर आणेन."

डॉक्टर गेल्यावर सू तिच्या कामाच्या खोलीत गेली आणि जपानी रुमालाचा लगदा होईपर्यंत रडली. मग तोर्‍यात शीळेवर गाणे वाजवत जॉन्सीच्या रुममध्ये गेली.

जॉन्सी चादरीखाली क्वचितच हालचाल करत, चेहरा खिडकीच्या दिशेला वळवून पडली होती. सूला वाटलं ती झोपली आहे म्हणून तिने शीळ घालणं थांबवलं.

तिने फळ्यावर शाई-लेखणी वापरुन एका नियतकालिकाच्या कथेसाठी रेखाचित्रं काढायला सुरुवात केली. तरूण लेखकांना नियतकालिकांत कथा लिहूनच आपला साहित्यातले ध्येय गाठण्यासाठी मार्ग तयार करावा लागतो तसंच चित्रकारांनाही त्या कथांसाठी रेखाचित्रं काढून आपल्या कलेच्या ध्येयाचा मार्ग सुकर करावा लागतो.

सू घोडेस्वाराचा पायजमा आणि एका काचेचा चष्मा घातलेल्या आयडाहो काऊबॉयचे चित्र काढू लागली तेव्हा तिला एका क्षीण आवाजातले बोलणे वारंवार ऐकायला येऊ लागले. ती पटकन पलंगाकडे गेली.
"बारा" जॉन्सी म्हणाली. नंतर काही वेळाने "अकरा", मग "दहा", "नऊ" आणि मग "आठ" आणि "सात" जवळपास एकाच वेळी.

सूने काळजीनंच खिडकीतून बाहेर पाहिलं. मोजण्यासारखं होतंच काय तिथं? मागचं एक मोकळं, ओसाड मैदान आणि वीस फुटांवर विटांच्या घराची रिकामी भिंत. मुळांशी गाठी झालेली आणि कुजत चाललेली एक वेल त्या विटांच्या भिंतीवर अर्ध्यापर्यंत गेली होती. पानगळीच्या मोसमातल्या थंडीने तिची पानं झडून गेली होती आणि फांद्यांचा रिकामा सापळा तुकडे पडणार्‍या विटांना धरुन राहिला होता.

"काय आहे गं?" सूने विचारलं.

"सहा" जॉन्सी कुजबुजत म्हणाली. "आता ती वेगाने पडतायत. तीन दिवसांपूर्वी तिथे जवळपास शंभर होती. मोजताना माझं डोकं दुखलं, पण आता ते सोपं आहे. ते बघ अजून एक गेलं! आता फक्त पाच राहिली.

"अगं, पण पाच काय? तुझ्या सूडीला सांगाणार नाहीस का?

"पानं. वेलीवरची पानं. जेव्हा शेवटचं पडेल तेव्हा मलाही गेलं पाहिजे. हे मला गेल्या तीन दिवसांपासून माहीत आहे. तुला डॉक्टरांनी सांगितलं नाही का?"

"असलं निरर्थक बोलणं मी कधी ऐकलं नव्हतं!" सू रागाने तक्रारीच्य सुरात म्हणाली. एका जुन्या वेलीच्या पानांचा आणि तुझ्या बरे होण्याच्या काय संबंध? तुला ती वेल आवडत होती म्हणून? वेडगळपणा करु नकोस. डॉक्टर आज सकाळी मला म्हणाले की तू बरी होण्याची शक्यता -- नक्की या शब्दात म्हणाले, की दहा मध्ये एक एवढी शक्यता आहे. म्हणजे आपण न्यूयॉर्कच्या ट्रॅममध्ये बसतो किंवा तिथल्या नवीन इमारतीच्या बाजूने चालत जातो तेव्हा जेवढी जगण्याची शक्यता असते तेवढीच. आता थोडं सूप पी आणि तुझ्या सूडीला तिच्या चित्राकडे वळूदे म्हणजे तिला ते संपादकाला विकून या आजारी मुलीसाठी पोर्ट वाईन आणि स्वतःसाठी पोर्क आणता येईल.

"तुला आणखी वाईन आणण्याची काही गरज नाही." डोळे खिडकीवर खिळवून ठेवत जॉन्सी म्हणाली. "अजून एक गेलं.... मला सूप नको आहे, आता चारच उरली. अंधार पडण्यापूर्वी मला शेवटचं पडताना पहायचं आहे. मग मीसुद्धा जाईन."

सू पलंगाजवळ वाकून म्हणाली, 'जॉन्सी तू मला एक वचन देशील का? माझं काम होईपर्यंत डोळे मिटून घे आणि खिडकीबाहेर अजिबात पाहू नको. मला ही चित्रं उद्यापर्यंत दिलीच पाहिजेत. मला उजेड हवा आहे नाहीतर मी खिडकी झाकली असती."

"तुला दुसर्‍या खोलीत नाही का चित्र काढता येणार?" जॉन्सीने थंडपणे विचारले.

"त्यापेक्षा मी थांबेन तुझ्याजवळच." सू म्हणाली. "शिवाय, तू त्या वेड्या वेलीकडे बघत बसशील जे मला नको आहे."

"तुझं काम संपलं की लगेच मला सांग." जॉन्सी एका पडक्या पुतळ्यासारखी डोळे मिटून पडून राहिली. "मला शेवटचं पान पडताना पहायचं आहे. वाट बघायचा कंटाळा आलाय. मला सगळ्या गोष्टींमधून मन काढून घ्यायचं आहे आणि त्या गरीब बिचार्‍या पानांसारखं तरंगत खाली खाली जायचं आहे..."

सू म्हणाली, "तू झोपायचा प्रयत्न कर. मला बेहरमनना वर बोलावलंच पाहिजे. खाण कामगाराच्या चित्रासाठी मॉडेल व्हायला. एक मिनिटसुद्धा लागणार नाही. मी येईपर्यंत हलायचा प्रयत्न करु नकोस."

म्हातारा बेहरमन त्यांच्या खालच्या मजल्यावर रहाणारा चित्रकार होता. त्याने साठी पार केली होती. त्याची दाढी मायकेल एंजेलोच्या 'मोझेस' दाढीसारखी होती आणि जणू एका पशूच्या डोक्यापासून भुताच्या शरीरावर रुळत असलेली दिसे. बेहरमन एक अयशस्वी चित्रकार होता. चाळीस वर्षं ब्रश हातात धरुनसुद्धा कलेच्या जवळपासही पोचला नव्हता. तो नेहमीच एक सर्वोत्तम कलाकृती, "मास्टरपीस" काढण्याच्या तयारीत असे पण त्याची सुरुवात कधीच केली नव्हती. वसाहतीतल्या तरुण कलाकारांना व्यावसायिक मॉडेल परवडत नसे त्यांच्यासाठी तो मॉडेल म्हणून काम करुन पैसे मिळवायचा. खूप जिन प्यायचा आणि आपल्या आगामी सर्वोत्तम कलाकृतीबद्दल बोलायचा. बाकीच्यांना तो रागीट म्हातारा वाटे. मृदू स्वभावाच्या लोकांची तो टर उडवायचा आणि स्वतःला वरच्या मजल्यावर रहाणार्‍या दोन तरुण चित्रकारांचा रखवालदार समजायचा.

सूला बेहरमन त्याच्या ज्युनिपर फळांचा उग्र वास असलेल्या अंधार्‍या खोलीत बसलेला दिसला. एका कोपर्‍यात चित्र ठेवायच्या घोड्यावर रिकामा कॅन्व्हास होता जो गेली पंचवीस वर्षं पहिली रेघ उमटण्याची वाट पहात होता. सूने त्याला जॉन्सीच्या समजुतीबद्दल सांगितलं. तिला कशी भीती वाटत आहे की जॉन्सीची या जगावरची पकड ढिली झाल्यावर ती खरंच त्या हलक्या नाजूक पानासारखी अलगद निघून जाईल...

असली मूर्खपणाची कल्पना ऐकून बेहरमनचे डोळे रागाने आणि उपहासाने लाल झाले.

"काय?" बेहरमन ओरडला, "एका मरतुकड्या वेलीची पाने गळल्यामुळे मरण येणार, असला वेडपट विचार करणारे लोक या जगात आहेत? मी आधी असलं काहीही ऐकलेलं नव्हतं. नाही, मी काही मॉडेल म्हणून काम करणार नाही. तिच्या डोक्यात अश्या खुळचट कल्पना येऊच कशी देतेस तू? गरीब बिचारी जॉन्सी!"

"ती खूप आजारी आहे आणि कमजोर झाली आहे. तापामुळे तिला भीती बसली आहे आणि तिच्या डोक्यात विचित्र कल्पना येतात. ठीक आहे, तुला मॉडेल व्हायचे नसेल तर नको होऊ. पण मला वाटतं तू एक भयंकर कजाग म्हातारा आहेस!

"तू अगदी बायकी वागतेस! कोण म्हणालं मी मॉडेल होणार नाही? चल, मी येतो तुझ्याबरोबर. अर्धा तास झाला मी हेच सांगतोय की मी तयार आहे. देवा! पण ही जागा काही जॉन्सीसारख्या चांगल्या मुलीने आजारात पडून रहावं अशी नाही आहे. एक दिवस मी माझा मास्टरपीस पूर्ण करेन मग आपण सगळेच इथून निघून जाऊ. तेच बरं होईल!

ते दोघे वर गेले तेव्हा जॉन्सीला झोप लागली होती. सूने खिडकी ओढून घेतली आणि बेहरमनला दुसर्‍या खोलीत नेलं. तिथून त्यांनी घाबरतच खिडकीबाहेर वेलीकडे पाहिलं. मग काही न बोलता एकमेकांकडे पाहिलं. थंड पावसाची संततधार लागली होती. मधूनच बर्फ पडत होतं. गडद निळा, जुनाट शर्ट घातलेला बेहरमन दगडाऐवजी उपड्या टाकलेल्या किटलीवर खाण-कामगार म्हणून बसला.

तासाभराच्या झोपेतून सू दुसर्‍या दिवशी सकाळी उठली तेव्हा जॉन्सी उघड्या डोळ्यांनी खिडकीच्या ओढून घेतलेल्या हिरव्या पडद्याकडे बघत होती.

"बाजूला कर तो, मला पहायचं आहे." तिने आज्ञा केली. सूने काळजीतच ती पाळली.

पण काय आश्चर्य! रात्रभर जोराचा वारा आणि पावसाचा मारा झेलूनसुद्धा वेलीचं एक पान त्या विटांच्या भिंतीवर उभं होतं. ते शेवटचंच होतं. देठाजवळ अजूनही गर्द हिरवं. करवतीसारख्या कडा झिजून, शेवट जवळ आल्यानं पिवळ्या पडलेल्या. ते पान जमिनीपासून वीसेक फुटांवर धाडसानं लटकत होतं.

"हे शेवटचंच आहे", जॉन्सी म्हणाली. "मला वाटत होतं की रात्री ते नक्कीच गळणार. मी वार्‍याचा आवाज ऐकला होता. ते आज पडेल, मीसुद्धा त्याचवेळी मरेन."

"अगं, स्वतःचा नाही तर निदान माझातरी विचार कर. मी काय करु?" सू आपल कष्टी चेहरा उशीवर टेकवत म्हणाली.

पण जॉन्सीनं उत्तर दिलं नाही. एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःच्या शेवटच्या गूढ प्रवासाची तयारी करु लागते तेव्हा ती सर्वांत एकाकी असते. तिला या जगाशी, मैत्रीशी जोडणारे धागे जसे एकेक करुन सैल होऊ लागले तसं तिला मृत्यूच्या कल्पनेनं जास्तच पछाडलं.

दिवस संपला आणि संधिप्रकाशातही त्यांना ते भिंतीवर वेलीला चिकटून राहिलेलं पान दिसत होतं. आणि मग रात्री पुन्हा उत्तरेकडून वारा सुटला. खिडकीवर पाऊस मारा करु लागला आणि वळचणीतून वाहू लागला...

**

पुरेसं उजाडल्यावर दुष्ट जॉन्सीनं पुन्हा पडदा सरकवायला सांगितलं.

वेलीचं पान मात्र अजूनही तिथं होतं.

जॉन्सी खूपवेळ त्याच्याकडे पहात राहिली. मग तिने सूला हाक मारली. सू स्वयंपाकघरात शेगडीवर चिकन सूप ढवळत होती.

"सूडी, मी अलिकडे अगदी वाईट मुलीसारखी वागते आहे!" जॉन्सी म्हणाली, "मी किती दुष्ट आहे याची मला जाणीव व्हावी म्हणूनच त्या पानाला कोणीतरी तिथे राहू दिलं आहे. मरण्याची इच्छा बाळगणं हे पाप आहे. तू माझ्यासाठी आता थोडं सूप घेऊन ये. पोर्ट घालून दूधही आण. आणि.. नाही, मला आधी आरसा आणून दे आणि माझ्या आजूबाजूला उश्यांचा आधार दे म्हणजे मी बसून तुला स्वयंपाक करताना पाहीन.
मग तासाभराने ती म्हणाली, "सूडी, मला एके दिवशी नेपल्सच्या खाडीचं चित्र काढायचं आहे.."

दुपारी डॉक्टर आले. ते जाताना सूडी काहीतरी कारण काढून व्हरांड्यात गेली. डॉक्टर सूचा थरथरता हात आपल्या हातात घेत म्हणाले, " पन्नास - पन्नास टक्के शक्यता आहे. चांगली शुश्रूषा केलीस तर तू जिंकशील. मला आता दुसरा रोगी पहायला खालच्या मजल्यावर जायचं आहे. त्याचं नाव बेहरमन. कोणी चित्रकार आहे. त्यालाही न्यूमोनियाच झालाय. तो एक कमजोर म्हातारा आहे आणि रोगाचा हल्ला अगदी तीव्र आहे. त्याच्या बाबतीत अजिबातच आशा नाही पण थोडा आराम पडावा म्हणून आज हॉस्पिटलमध्ये नेलं जाईल."

दुसर्‍या दिवशी डॉक्टर सूला म्हणाले, "धोका टळलेला आहे. तू जिंकलीस. आता पौष्टिक आहार आणि काळजी घेणं, एवढंच!"

त्या दिवशी दुपारी सू जॉन्सीच्या पलंगाजवळ आली. जॉन्सी एक गर्द निळा, लोकरीचा, अगदी निरुपयोगी स्कार्फ विणत होती. सूने आपला एक हात तिच्याभोवती टाकला.

"मला तुला काही सांगायचं आहे." सू म्हणाली. "मि. बेहरमन आज न्यूमोनियाने मरण पावले. फक्त दोनच दिवस आजारी होते. पहिल्या दिवशी सकाळी एका कामगाराला ते असहाय्य अवस्थेत वेदनेने तळमळताना दिसले. त्यांचे कपडे आणि बूट पूर्ण भिजून बर्फासारखे थंडगार झाले होते. एक जळता कंदीलही सापडला. एक ओढत आणलेली शिडी, काही कुंचले आणि रंग बनवायच्या बशीत मिसळलेले हिरवे-पिवळे रंग. आणि - खिडकीतून बाहेर बघ, त्या वेलीच्या शेवटच्या पानाकडं.. ते कधी वार्‍यानं फडफडलं किंवा हललं नाही याचं तुला आश्चर्य वाटलं नाही का? अगं मुली, ती बेहरमनची सर्वोत्तम कलाकृती आहे, त्यांचा मास्टरपीस! ज्या रात्री शेवटचं पान पडलं त्या रात्री त्यांनी ते तिथं रंगवलं.."

http://www.classicshorts.com/stories/lastleaf.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लालू, मस्त झालंय भाषांतर! ओ हेन्रीच्या आतापर्यंत वाचलेल्या गोष्टींमधली ही लक्षात राहिलेली गोष्ट.... पुन्हा एकदा मनात ताजी झाली. भाषेची लयही छान जमली आहे. Happy

तो नेहमीच एक सर्वोत्तम कलाकृती, "मास्टरपीस" काढण्याच्या तयारीत असे पण त्याची सुरुवात कधीच केली नव्हती. Lol

शेवटाचा अंदाज आधीच आला होताच... Happy

खुप सुंदर अनुवाद आहे, लालू... Happy

खूप आवडली!
मूळ कथा माहितीच नव्हती, पण भाषांतर वाचतानाही कुठे वेगळं नाही वाटलं.
इतकी छान कथा निवडून इथे दिल्याबद्दल थँक्स! Happy

अप्रतिम कथा आहे ही.
लालू हि कथा भाषांतरीत केल्याबद्दल खुप आभार.
अनेक वर्षापूर्वी जेव्हा दुरदर्शन वर खरोखर चांगले आणि मोजके कार्यक्रम लागत त्यावेळी त्यातल्या एका कार्यक्रमात बहुतेक "कथा" का "कथाकथी" का असच काहीतरी नाव असलेल्या सिरियल मधे दर आठवड्याला एक नवी कथा असायची. त्यात हि कथा आली होती. तेव्हापासुन हि कथा मनात आहे. तशीच्या तशी.
मस्त. Happy

छान जमलाय अनुवाद लालू!! पहिल्या परीच्छेदातला अनुवाद थोडा तांत्रिक वाटतोय पण चलता है Happy

मी अनुवादित कथा वाचली आहे, पण आता तो अनुवाद कोणी केला होता, कुठल्या पुस्तकात वगैरे लक्षात नाही.