उंबरातले किडे मकोडे - फोटोसहित

Submitted by दिनेश. on 24 February, 2011 - 07:00

मी यापुर्वी अनेकवेळा उंबराच्या झाडाबद्दल लिहिले होते. ते इथे एकत्र करतो. पण मी यापूर्वी
इतके सविस्तर लिहिले नव्हते. कारण हे सर्व अद्भूत तर आहेच शिवाय आपल्या कल्पनेपेक्षाही
क्लिष्ट आहे. पण ते सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो.

खरे तर उंबर ज्या कूळात येतो, ते सगळेच कूळ आपल्या परिचयाचे. वड, पिंपळ, रबर ही
सगळी याच कूळातली मंडळी. रबराचेही मूळ स्थान भारतच आहे.
वड, पिंपळ काय किंवा उंबर काय, या सर्व झाडांना आपण पवित्र मानतो. बहुतेक गावात एक
पूर्ण वाढलेले वडाचे नाहीतर पिंपळाचे झाड असतेच. गोव्याला तर बसथांब्यांची नावे, वडाकडे,
पिंपळाकडे अशी आहेत.

उंबराचेही झाडही आपण पवित्र मानतो. महाराष्ट्रातील बहुतेक एस टी स्टॅंड वर, खास करुन जिथे
त्यांचे वर्कशॉप असते तिथे, श्री दतगुरुंचे देऊळ असतेच. आणि त्या परिसरात एखादे उंबराचे
झाड असतेच. उंबराचे झाड कुणी मुद्दाम लावलेय असे दिसत नाही (इतरत्र उगवलेले आणलेले
असते.) आणि उंबर वा औदुंबर आणि श्री दत्तगुरु यांचे नाते एवढे अतूट मानतात, कि आपोआप
उगवलेल्या या झाडावर कधी कुर्‍हाड चालवली जात नाही.

उंबराचे लाकूड मजबूत असते. ते लवकर कूजत नाही. पुर्वी घराच्या दारात आवर्जून उंबराची फळी
ठोकली जात असे. म्हणून तर त्याला उंबरठा म्हणायचे.
उंबराच्या पूर्ण वाढलेल्या झाडाच्या मूळाशी पाण्याचा वाहता झरा असतो, असे आढळल्यामूळे, नवीन
विहिर खोदताना, हा निकष लावला जातो.उंबराची फांदी तोडल्यास, त्यातून बराच वेळ पाणी
येत राहते.

डॉ. राणी बंग यांच्या "गोईण" पुस्तकात असा उल्लेख आहे कि, आदीवासी लोकात, लेकीसाठी
सासर बघताना, त्या घराच्या आसपास उंबराचे झाड असल्याची खातरजमा केली जाते. हेतू
सरळ असतो, जर सासुने उपाशी तापाशी ठेवले तर लेक, उंबराची फळे खाऊन तग धरु शकेल.
उंबराच्या झाडाखालून जाताना, एकतरी उंबर खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ नये, असा संकेत आहे.
गडकिल्ले भटकताना, कुठेही उंबराचे झाड दिसले, तर आवर्जून ती फळे खाण्याचा सल्ला मी देत
असतो. अशी फळे खाल्य्यास बराच वेळ तहान वा भूक लागत नाही, असा अनुभव आहे.

इतक्या परिचयाच्या उंबराबाबत, एक गूढ मात्र आपल्या मनात कायम असते. आणि ते गूढ
असते, उंबराच्या फूलाबद्दल.

आशा भोसले आणि रेखा डावजेकर यांनी गायलेल्या, एका गाण्यात अशा काहिशा ओळी आहेत,

माझेच मी म्हणू कि, हे भाग्य या घराचे
दिसले मला कधीचे, हे फूल उंबराचे

खुप दिवसांनी भेटलेल्या व्यक्तीसाठी, किंवा क्वचितच भेटणार्‍या व्यक्तीसाठी हे रुपक वापरतात.
उंबराच्या फूलाबद्दल गावगप्पाच अधिक. कुणी म्हणते कि ते बैलगाडीच्या चाकाएवढे मोठे असते
तर कुणी म्हणते कि त्याच्या एका पाकळीत बसून माणूस नदी पार करु शकतो. शिवाय फक्त
भाग्यवान माणसांनाच ते दिसते, अशी मेख आहेच.

गदिमांनी मात्र, अचूक सत्य त्यांच्या एका चित्रपटगीतात लिहिले आहे.

उंबरातले किडेमकोडे, उंबरि करती लिला
जग हे बंदीशाला, जो आला तो रमला.

आणि त्याबाबतच आपण जरा विस्ताराने बोलू या.

माणसाशी असते का ते माहीत नाही, पण उंबराच्या झाडाची अनेकजणांशी घट्ट मैत्री असते. त्यापैकी
काही मित्र तर उंबरासाठी अक्षरश: प्राण पणाला लावतात. काही स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधतात
तर काही निव्वळ स्वार्थ साधतात.

काही किटकांना अंडी घालण्यासाठी एक खास अवयव असतो. त्याला ओव्हिपोझिटर असा शब्द आहे.
या अवयवाच्या मदतीने ते किटक पानांवर अंडी न घालता, थेट पानाच्या आत घालतात. (उंबराशिवाय
तूम्ही अशा गाठी, तमालपत्राच्या पानावर देखील बघितल्या असतील) असे अंडे घातल्यावर, उंबराचे झाड
पानांवर एक गाठ निर्माण करते. या गाठीत एक पोकळी निर्माण होते आणि त्यात त्या किटकाची पूर्ण
वाढ होते. या गाठी अलगद फ़ोडल्यास, त्यात एक जिवंत किडा दिसतो. हिरवट पिवळ्या रंगाचा हा किडा
पूर्ण वाढ झालेला असेल तर थोड्याच वेळात उडूनही जातो. छोटा असला तरी नजरेला सहज दिसू शकतो
तो. उंबराच्या काही झाडांवर या गाठी कमी दिसतात, तर काहिंवर या गाठी भरपूर दिसतात. असे
आदरातिथ्य करण्यात झाडाचा काही फायदा होतो का ते माहीत नाही. (हा फोटो जागू कडून साभार. मी मुद्दाम तिला या गाठी फोडून बघायला सांगितल्या होत्या. जर गाठी खालून उघडलेल्या नसतील, तर त्यात जिवंत किडा असतोच.)

umbarachya gathi.JPG

मी वर लिहिलेच आहे, कि उंबराच्या झाडाची लागवड केली जात नाही. पण ते बियांपासूनही सहज
उगवत नाही. तूम्ही निरिक्षण केले असेल, तर सहज जाणवेल कि मोठ्या वाढलेल्या झाडाखाली,
त्याची रोपे उगवलीत असेल उंबर (आणि वड, पिंपळ ) यांच्या बाबतीत होत नाही. पण काहिश्या
अवघड जागी मात्र याची रोपे दिसतात. दूसर्‍या झाडावर, देवळाच्या कळसावर, इमारतीच्या भिंतीतल्या
भेगांत, ड्रेनेज पाईप्सच्या बेचक्यात हि झाडे, उगवलेली असतात. तिथे ती कशी जातात ?

हे काम या झाडांचे काही मित्र करतात. हि फळ पिकली कि आकर्षक रंगाची होतात. खास करुन
लाल पिवळ्या रंगाची. या रंगाचे पक्ष्यांना आकर्षण असतेच. शिवाय आणखी एक उपाय म्हणून
या फळांना एक गोडूस वास पण येतो. त्याने वटवाघळे, माकडे येतात.

कावळे, धनेश (हॉर्नबील) आणि वटवाघळे आपल्या पोटातील उब या फळांतील बियाना देतात. अशी उब
मिळाल्यावरच त्या बियांवरचे कठीण आवरण जाते आणि त्या रुजू शकतात. या मंडळींची विष्ठा जिथे
जिथे पडू शकते, तिथे तिथे या उंबराची (आणि वडा पिंपळाची) रोपे उगवू शकतात.
यामधे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधला जातो. पक्ष्यांना गोड खाऊ मिळतो आणि झाडाचा बीजप्रसार
होतो.

पण मूळात बिया निर्माण होण्यासाठी परागीभवनाचे काम कोण करते ? तर हे काम केले जाते, उंबरासाठी
प्राण पणाला लावणार्‍या एका खास किटकांतर्फे. या किटकांच्या अनेक प्रजाती आहेत, आणि त्या वास्प
म्हणजेच गांधीलमाशीच्या कूळातल्या आहेत.

उंबराच्या झाडावर अचानक छोटी छोटी फळेच दिसू लागतात. खरे तर त्यांना तांत्रिकदृष्ट्या ना फळे म्हणता
येत ना फूले. जरी ती फळासारखी दिसत असली तरी त्यांना सायकोनिया, असा शब्द वापरतात.
त्या फूलांच्या आता, सूक्ष्म रुपात नर आणि मादी फूले असतात.

उंबराच्या झाडावर अशी फळे तयार झाली, कि त्या झाडापासून एक रासायनिक संदेश पाठवला जातो. त्या
संदेशाने त्या झाडाकडे काहि खास किटक आकर्षित होतात. त्या सर्व माद्याच असतात. (का ते पुढे
लिहितोच आहे) या माद्या उंबराला देठासमोर जे छिद्र असते त्यातून आत शिरतात.

हे आत शिरणे इतके सोपे नसते. या प्रयत्नात त्यांचे इवलेसे पंख आणि स्पर्शिका तूटून पडतात. पण
तरी त्या आत शिरतातच. आत शिरल्या शिरल्या आपल्याकडच्या परागकणांचा साठा त्या आतल्या
मादीफूलांपैकी काही फ़ूलांवर रिता करतात. या काळात आतली नरफूले सुप्तावस्थेत असतात.

आता त्या आतच आपल्या खास अवयवाने अंडी घालतात. हि अंडी अर्थातच किंचीत छिद्र पाडून घातली
जातात. आणि इथेच मादीचे जीवनकार्य संपते. पंख नाही, स्पर्शिका (अँटेना) नाही, परागीभवन करुन झाले, अंडी घातली. निसर्ग अशा अवस्थेत तिला जिवंत कसा राहू देईल ?

आपण वर बघितलेच आहे कि अशी जखम झाल्यावर, उंबराचे झाड त्याभोवती एक कवच
तयार करते. त्या कवचाच्या आत या अंड्यांचे फलन होते. (उंबर खाल्यावर त्यात काही पोकळ
बिया, तूमच्या दाताखाली येतात, ते हे कवच असते.)

हा फलनाचा कालावधी, तीन ते वीस आठवड्यांचा असू शकतो. उंबराच्या जातीवर ते अवलंबून असते.
या काळात, ते झाड त्यांची आपल्यापरीने काळजी घेते. म्हणजे या सायकोनामाचा रंग बदलत नाही
कि त्यापासून कुठलाही गंध सोडला जात नाही, कि जेणेकरुन फळांचे चाहते तिथे येतील.
यथावकाश ती अंडी फलून त्यातून नर व मादी किटक बाहेर येतात. काही जातीत नर आधी जन्माला
येतात. नर आणि मादी यांचे तिथेच मिलन होते. ज्या जातीत नर आधी जन्माला येतात, त्यांचे
मिलन सुप्तावस्थेतील माद्यांशी होते.

मग नरांचे आणखी एक काम सुरु होते ते म्हणजे, त्या फ़ळाला बाहेर जाण्यासाठी छिद्र पाडणे.
या कामासाठी त्यांच्याकडे मजबूत जबडे असतात. पण या छिद्रातून नर मात्र बाहेर पडू शकत नाहीत.
त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू होतो. आणि तसाही बाहेरच्या जगात त्यांचा निभाव लागणे अशक्य असते.
कारण त्यांना ना पंख असतात ना डोळे. मिलन आणि ही वाट खोदण्याची दोनच जीवितकार्ये आटपून
तो इवलासा जीव मरुन जातो.

या वरच्या फोटो तूम्हाला नीट दिसेल, कि केवळ पिवळ्या व लाल फळांनाच बाजूने छिद्र आहे. म्हणजे त्यातले किटक उडून गेले आहेत.

आता माद्या बाहेर जाण्यासाठी तयार असतात, आतली नरफूलेही आता विकसित झालेली असतात.
माद्यांकडे परागकणांचा ठेवा देऊन, झाड त्यांना निरोप देते. माद्या दुसर्‍या झाडाच्या शोधात बाहेर
पडतात.
हे सर्व कार्य पार पाडल्यानंतरच, फळ पिकायची प्रक्रिया सुरु होते. फळाचा रंग बदलतो आणि त्याला
सुगंध सुटतो.

या फायकस कुळांची फळे हा निसर्गचक्रातला एक महत्वाचा घटक आहे. वर्षभर कुठल्या ना कुठल्या
झाडाला फळे येतच असतात. असे झाले नसते तर तो इवलासा जीव एखादे वर्षभर कसा तग
धरेल. (मी इवलासा म्हणतोय ना तो जीव, साध्या सुईच्या छिद्रापेक्षाही लहान असतो.)

आणि हि अशी मैत्री आजकालची नव्हे तर किमान ७ कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहे. ज्या काळात
सर्व खंड एकत्र होते, त्याकाळातली अंजीराची फळेच नव्हेत तर असे किटकही अश्मीभूत झालेले
सापडलेले आहेत.

इतकी गुंतागुंतीची व्यवस्था लक्षात घेता, हे झाड आणि हे किटक, एकमेकांशिवाय जगूच शकणार
नाहीत हे तर उघड आहे. पण मला नेहमी आश्चर्य वाटत आलेय, कि हि व्यवस्था नेमक्या कश्या
पायर्‍यांनी निर्माण झाली असावी ? यात कुठेही जराही ढिलेपणा नाही.

नर आणि मादी फूले विकसित होण्याचा कालावधी वेगळा असल्याने, स्वपरागीकरण होणार नाही.
मादी ज्या छिद्रातून आत येते, तो एकदिशा मार्ग असतो. तिला त्यातून बाहेर जाता येणार नसतेच.
शिवाय तिचे पंखच छाटून टाकल्याने, तिला डांबून ठेवण्याची व्य्वस्थाही झालेली असते. नराची
केवळ दोनच कार्ये. त्याशिवाय त्याला काही करताच येणार नाही. तो फळाचे बाकी काही नुकसानही
करु शकत नाही. अंड्यातील जीवाला आणि मादिलाही, अन्नाची जी गरज असते ती, त्या फ़ळातील
साठ्याच्या मानाने नगण्य असते.

खरेच हि व्यवस्था पहिल्यांदा समजल्यावर मी जो अवाक झालो होतो, तोच भाव आजही कायम आहे.

गुलमोहर: 

Dineshaji, Tumhala ti goshta mahit aselach ki Hiranyakashyapucha Vadh kelyananatar Shri Nrusinhani aapali Nakhe Unbarachya mulat aani Khodat khupasali, karan tethil shant panyane tyanchya nakhanchi Aaag Thambali.

Hiranyakshyapuchya vadhanantar tyanchya botanchi aag hot hoti.

Baki lekh nehemiprmanech Utkrushhta.

अजुन एक माहीती : तोंड (मुह के छाले) आल्यावर उपाय म्हणून उंबराच्या पानावरच्या १०-१२ पिकलेल्या गाठी आणि खडीसाखर चावून चावून खावी. जर खडीसाखर उपलब्ध नसेल तर घरातली नेहमीची साखर पण चालेल. रामबाण उपाय आहे हा. (अनुभवाचे बोल )

दिनेशदा,
या सुंदर लेखाने किती जुन्या आठवणी जागृत केल्या. आमच्या घरातच उंबराचं झाड होतं. त्याझाडावर सतत किडे असायचे. लाल आणि काळ्या मुंग्या तर उच्छाद आणित असत. पक्षी नेहेमीच असायचे. कावळे पुष्कळ, पण मैना, पोपट, कोकीळ असे एक्झॉटिक पक्षीसुध्दा यायचे. माकडं यायची, ती का ते आता कळ्लं. घरात झाड होतं पण फळात किडे असतात म्ह्णून आम्हाला कधी कोणी खाऊ दिलं नाही. चव फार छान नसे म्हणून आम्हीही चोरून लपवून फारसं खाल्लं नाही. आता खावसं वाटतयं पण ते झाडही राहीलं नाही, आणि घरही राहीलं नाही. गाठीगाठीच्या त्या पानाचं चित्रं पाहिलं आणि क्षणभर गलबलून आलं. निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार डोळ्यासमोर घडत होता आणि आम्ही मात्र आंधळे.

दिनेश दा, अप्रतिम माहिती,वाचुन थक्क व्हायला झाल. हा लेख परत परत वाचते आहे.
खरच मी खुप लकी आहे तुमच्या सारख्या माहान लोकांच्या संपर्कात आले.

धन्यवाद शशंकजी.....

दिनेश दा, अप्रतिम माहिती,वाचुन थक्क व्हायला झाल. हा लेख परत परत वाचते आहे.
खरच मी खुप लकी आहे तुमच्या सारख्या माहान लोकांच्या संपर्कात आले.

धन्यवाद शशंकजी.....

उंबराचं कच्च फळ तोडून त्याच्या देठाकडे कावळा किंवा कबुतराचं एखादं मोठं पीस खोचायचं आणि ते वर हवेत उंच फेकायचं. पुन्हा खाली येताना पीस आणि उंबर मस्त गोल गोल फिरत येतं. कुठल्या आकाराचं फळ घ्यायचं हे थोड्या अनुभवाने कळतं. बेचकी ने खूप उंचावर उंबर फेकू शकतो. लहान असताना पीस मोडे पर्यंत असं खेळत राहायचो. यासाठी उम्बराचंच फळ लागायचं कारण पीस आत घुसू शकेल इतपत ते मउ असतं आणि त्याचा आकार व वजन हे देखील अगदी हवं तेवढंच असतं.

वा दिनेशदा खुप छान माहीती , ज्ञानात भर , लहानपणी उंबर खातांना 'जरा बघुन खा' 'हो हो' असे म्हणत गोड उंबरासोबत भरपुर किडेमकोडे खाल्ले आहेत आणी अजुन पण खाते गावी गेल्यावर.

दिनेश, इतकं मनापासून , जीवनाचा सर्वांगी रस घेत लिहिलंय म्हणून इतकं अप्रतिम झालंय हे लेखन, निव्वळ माहितीची जंत्री वाटत नाहीय ..अद्भुत शोधण्यासाठी पुराणं परीकथा कशाला धुंडाळत जायचं , ते तर पावलोपावली उभं असतं समोरच.
लेखावरचे प्रतिसादही तसेच मनस्वी,माहितीपूर्ण .

http://www.youtube.com/watch?v=OZoq8P68LqI

वरच्या लेखातलेच नाट्य नव्हे तर त्या झाडाभोवतालचेच सर्वच नाट्य बीबीसी ने इथे टिपलेले आहे अवश्य बघा.

दिनेशजी,
आपला लेख वाचताना खरोखर एका मायबोलीकरांनी म्हटल्याप्रमाणे डिस्कव्हरी चयानलचीच आठवण झाली.
उम्बरामध्ये अनेक औषधी गुणधर्म असावेत. सहा महिनान्पुर्वी मी एक पेशंटला रक्तातील हेमोग्लोबिन खूप कमी झाले म्हणून हॉस्पिटलात दाखल केले होते. शौचावाटे मुलाव्याधीमुळे सतत रक्तस्त्राव होत असल्यामुळे रक्त कमी झाले होते. ऑपरेशनसाठी पैसे नसल्यामुळे हा पेशंट सल्ल्याविरुद्ध घरी गेला. हा पेशंट दहा दिवसानंतर पुन्हा माझ्याकडे आला आणि म्हणाला की आता मला मुळव्याधीचा मुळीच त्रास होत नाही. मी दुसरे औषध घेतले आणि मी बरा झालो. मी आश्चर्याने आणि कुतूहलाने त्या औषधाची माहिती विचारली तेंव्हा त्याने सांगितलेली माहिती अशी ….
"उंबराची पाच फळे घ्या. रात्रभर २ कप पाण्यात ती फळे भिजू द्यात. सकाळी फळे काढून उरलेले पाणी निम्मे होईपर्यंत उकळून आटवा. थंड करून प्या. असे पाच दिवस करा. मी असे केले आणि माझा त्रास पूर्ण थांबला."
मी नेटवर शोधले असता उंबर पायील्ससाठी उपयोगी आहे असे समजले. येथे कोणी आयुर्वेद तज्ञांना काही माहिती असल्यास समजून घेण्यास आवडेल.
आपल्या माहितीपूर्ण लेखाबद्दल अभिनंदन !

Pages