उंबरातले किडे मकोडे - फोटोसहित

Submitted by दिनेश. on 24 February, 2011 - 07:00

मी यापुर्वी अनेकवेळा उंबराच्या झाडाबद्दल लिहिले होते. ते इथे एकत्र करतो. पण मी यापूर्वी
इतके सविस्तर लिहिले नव्हते. कारण हे सर्व अद्भूत तर आहेच शिवाय आपल्या कल्पनेपेक्षाही
क्लिष्ट आहे. पण ते सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो.

खरे तर उंबर ज्या कूळात येतो, ते सगळेच कूळ आपल्या परिचयाचे. वड, पिंपळ, रबर ही
सगळी याच कूळातली मंडळी. रबराचेही मूळ स्थान भारतच आहे.
वड, पिंपळ काय किंवा उंबर काय, या सर्व झाडांना आपण पवित्र मानतो. बहुतेक गावात एक
पूर्ण वाढलेले वडाचे नाहीतर पिंपळाचे झाड असतेच. गोव्याला तर बसथांब्यांची नावे, वडाकडे,
पिंपळाकडे अशी आहेत.

उंबराचेही झाडही आपण पवित्र मानतो. महाराष्ट्रातील बहुतेक एस टी स्टॅंड वर, खास करुन जिथे
त्यांचे वर्कशॉप असते तिथे, श्री दतगुरुंचे देऊळ असतेच. आणि त्या परिसरात एखादे उंबराचे
झाड असतेच. उंबराचे झाड कुणी मुद्दाम लावलेय असे दिसत नाही (इतरत्र उगवलेले आणलेले
असते.) आणि उंबर वा औदुंबर आणि श्री दत्तगुरु यांचे नाते एवढे अतूट मानतात, कि आपोआप
उगवलेल्या या झाडावर कधी कुर्‍हाड चालवली जात नाही.

उंबराचे लाकूड मजबूत असते. ते लवकर कूजत नाही. पुर्वी घराच्या दारात आवर्जून उंबराची फळी
ठोकली जात असे. म्हणून तर त्याला उंबरठा म्हणायचे.
उंबराच्या पूर्ण वाढलेल्या झाडाच्या मूळाशी पाण्याचा वाहता झरा असतो, असे आढळल्यामूळे, नवीन
विहिर खोदताना, हा निकष लावला जातो.उंबराची फांदी तोडल्यास, त्यातून बराच वेळ पाणी
येत राहते.

डॉ. राणी बंग यांच्या "गोईण" पुस्तकात असा उल्लेख आहे कि, आदीवासी लोकात, लेकीसाठी
सासर बघताना, त्या घराच्या आसपास उंबराचे झाड असल्याची खातरजमा केली जाते. हेतू
सरळ असतो, जर सासुने उपाशी तापाशी ठेवले तर लेक, उंबराची फळे खाऊन तग धरु शकेल.
उंबराच्या झाडाखालून जाताना, एकतरी उंबर खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ नये, असा संकेत आहे.
गडकिल्ले भटकताना, कुठेही उंबराचे झाड दिसले, तर आवर्जून ती फळे खाण्याचा सल्ला मी देत
असतो. अशी फळे खाल्य्यास बराच वेळ तहान वा भूक लागत नाही, असा अनुभव आहे.

इतक्या परिचयाच्या उंबराबाबत, एक गूढ मात्र आपल्या मनात कायम असते. आणि ते गूढ
असते, उंबराच्या फूलाबद्दल.

आशा भोसले आणि रेखा डावजेकर यांनी गायलेल्या, एका गाण्यात अशा काहिशा ओळी आहेत,

माझेच मी म्हणू कि, हे भाग्य या घराचे
दिसले मला कधीचे, हे फूल उंबराचे

खुप दिवसांनी भेटलेल्या व्यक्तीसाठी, किंवा क्वचितच भेटणार्‍या व्यक्तीसाठी हे रुपक वापरतात.
उंबराच्या फूलाबद्दल गावगप्पाच अधिक. कुणी म्हणते कि ते बैलगाडीच्या चाकाएवढे मोठे असते
तर कुणी म्हणते कि त्याच्या एका पाकळीत बसून माणूस नदी पार करु शकतो. शिवाय फक्त
भाग्यवान माणसांनाच ते दिसते, अशी मेख आहेच.

गदिमांनी मात्र, अचूक सत्य त्यांच्या एका चित्रपटगीतात लिहिले आहे.

उंबरातले किडेमकोडे, उंबरि करती लिला
जग हे बंदीशाला, जो आला तो रमला.

आणि त्याबाबतच आपण जरा विस्ताराने बोलू या.

माणसाशी असते का ते माहीत नाही, पण उंबराच्या झाडाची अनेकजणांशी घट्ट मैत्री असते. त्यापैकी
काही मित्र तर उंबरासाठी अक्षरश: प्राण पणाला लावतात. काही स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधतात
तर काही निव्वळ स्वार्थ साधतात.

काही किटकांना अंडी घालण्यासाठी एक खास अवयव असतो. त्याला ओव्हिपोझिटर असा शब्द आहे.
या अवयवाच्या मदतीने ते किटक पानांवर अंडी न घालता, थेट पानाच्या आत घालतात. (उंबराशिवाय
तूम्ही अशा गाठी, तमालपत्राच्या पानावर देखील बघितल्या असतील) असे अंडे घातल्यावर, उंबराचे झाड
पानांवर एक गाठ निर्माण करते. या गाठीत एक पोकळी निर्माण होते आणि त्यात त्या किटकाची पूर्ण
वाढ होते. या गाठी अलगद फ़ोडल्यास, त्यात एक जिवंत किडा दिसतो. हिरवट पिवळ्या रंगाचा हा किडा
पूर्ण वाढ झालेला असेल तर थोड्याच वेळात उडूनही जातो. छोटा असला तरी नजरेला सहज दिसू शकतो
तो. उंबराच्या काही झाडांवर या गाठी कमी दिसतात, तर काहिंवर या गाठी भरपूर दिसतात. असे
आदरातिथ्य करण्यात झाडाचा काही फायदा होतो का ते माहीत नाही. (हा फोटो जागू कडून साभार. मी मुद्दाम तिला या गाठी फोडून बघायला सांगितल्या होत्या. जर गाठी खालून उघडलेल्या नसतील, तर त्यात जिवंत किडा असतोच.)

umbarachya gathi.JPG

मी वर लिहिलेच आहे, कि उंबराच्या झाडाची लागवड केली जात नाही. पण ते बियांपासूनही सहज
उगवत नाही. तूम्ही निरिक्षण केले असेल, तर सहज जाणवेल कि मोठ्या वाढलेल्या झाडाखाली,
त्याची रोपे उगवलीत असेल उंबर (आणि वड, पिंपळ ) यांच्या बाबतीत होत नाही. पण काहिश्या
अवघड जागी मात्र याची रोपे दिसतात. दूसर्‍या झाडावर, देवळाच्या कळसावर, इमारतीच्या भिंतीतल्या
भेगांत, ड्रेनेज पाईप्सच्या बेचक्यात हि झाडे, उगवलेली असतात. तिथे ती कशी जातात ?

हे काम या झाडांचे काही मित्र करतात. हि फळ पिकली कि आकर्षक रंगाची होतात. खास करुन
लाल पिवळ्या रंगाची. या रंगाचे पक्ष्यांना आकर्षण असतेच. शिवाय आणखी एक उपाय म्हणून
या फळांना एक गोडूस वास पण येतो. त्याने वटवाघळे, माकडे येतात.

कावळे, धनेश (हॉर्नबील) आणि वटवाघळे आपल्या पोटातील उब या फळांतील बियाना देतात. अशी उब
मिळाल्यावरच त्या बियांवरचे कठीण आवरण जाते आणि त्या रुजू शकतात. या मंडळींची विष्ठा जिथे
जिथे पडू शकते, तिथे तिथे या उंबराची (आणि वडा पिंपळाची) रोपे उगवू शकतात.
यामधे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधला जातो. पक्ष्यांना गोड खाऊ मिळतो आणि झाडाचा बीजप्रसार
होतो.

पण मूळात बिया निर्माण होण्यासाठी परागीभवनाचे काम कोण करते ? तर हे काम केले जाते, उंबरासाठी
प्राण पणाला लावणार्‍या एका खास किटकांतर्फे. या किटकांच्या अनेक प्रजाती आहेत, आणि त्या वास्प
म्हणजेच गांधीलमाशीच्या कूळातल्या आहेत.

उंबराच्या झाडावर अचानक छोटी छोटी फळेच दिसू लागतात. खरे तर त्यांना तांत्रिकदृष्ट्या ना फळे म्हणता
येत ना फूले. जरी ती फळासारखी दिसत असली तरी त्यांना सायकोनिया, असा शब्द वापरतात.
त्या फूलांच्या आता, सूक्ष्म रुपात नर आणि मादी फूले असतात.

उंबराच्या झाडावर अशी फळे तयार झाली, कि त्या झाडापासून एक रासायनिक संदेश पाठवला जातो. त्या
संदेशाने त्या झाडाकडे काहि खास किटक आकर्षित होतात. त्या सर्व माद्याच असतात. (का ते पुढे
लिहितोच आहे) या माद्या उंबराला देठासमोर जे छिद्र असते त्यातून आत शिरतात.

हे आत शिरणे इतके सोपे नसते. या प्रयत्नात त्यांचे इवलेसे पंख आणि स्पर्शिका तूटून पडतात. पण
तरी त्या आत शिरतातच. आत शिरल्या शिरल्या आपल्याकडच्या परागकणांचा साठा त्या आतल्या
मादीफूलांपैकी काही फ़ूलांवर रिता करतात. या काळात आतली नरफूले सुप्तावस्थेत असतात.

आता त्या आतच आपल्या खास अवयवाने अंडी घालतात. हि अंडी अर्थातच किंचीत छिद्र पाडून घातली
जातात. आणि इथेच मादीचे जीवनकार्य संपते. पंख नाही, स्पर्शिका (अँटेना) नाही, परागीभवन करुन झाले, अंडी घातली. निसर्ग अशा अवस्थेत तिला जिवंत कसा राहू देईल ?

आपण वर बघितलेच आहे कि अशी जखम झाल्यावर, उंबराचे झाड त्याभोवती एक कवच
तयार करते. त्या कवचाच्या आत या अंड्यांचे फलन होते. (उंबर खाल्यावर त्यात काही पोकळ
बिया, तूमच्या दाताखाली येतात, ते हे कवच असते.)

हा फलनाचा कालावधी, तीन ते वीस आठवड्यांचा असू शकतो. उंबराच्या जातीवर ते अवलंबून असते.
या काळात, ते झाड त्यांची आपल्यापरीने काळजी घेते. म्हणजे या सायकोनामाचा रंग बदलत नाही
कि त्यापासून कुठलाही गंध सोडला जात नाही, कि जेणेकरुन फळांचे चाहते तिथे येतील.
यथावकाश ती अंडी फलून त्यातून नर व मादी किटक बाहेर येतात. काही जातीत नर आधी जन्माला
येतात. नर आणि मादी यांचे तिथेच मिलन होते. ज्या जातीत नर आधी जन्माला येतात, त्यांचे
मिलन सुप्तावस्थेतील माद्यांशी होते.

मग नरांचे आणखी एक काम सुरु होते ते म्हणजे, त्या फ़ळाला बाहेर जाण्यासाठी छिद्र पाडणे.
या कामासाठी त्यांच्याकडे मजबूत जबडे असतात. पण या छिद्रातून नर मात्र बाहेर पडू शकत नाहीत.
त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू होतो. आणि तसाही बाहेरच्या जगात त्यांचा निभाव लागणे अशक्य असते.
कारण त्यांना ना पंख असतात ना डोळे. मिलन आणि ही वाट खोदण्याची दोनच जीवितकार्ये आटपून
तो इवलासा जीव मरुन जातो.

या वरच्या फोटो तूम्हाला नीट दिसेल, कि केवळ पिवळ्या व लाल फळांनाच बाजूने छिद्र आहे. म्हणजे त्यातले किटक उडून गेले आहेत.

आता माद्या बाहेर जाण्यासाठी तयार असतात, आतली नरफूलेही आता विकसित झालेली असतात.
माद्यांकडे परागकणांचा ठेवा देऊन, झाड त्यांना निरोप देते. माद्या दुसर्‍या झाडाच्या शोधात बाहेर
पडतात.
हे सर्व कार्य पार पाडल्यानंतरच, फळ पिकायची प्रक्रिया सुरु होते. फळाचा रंग बदलतो आणि त्याला
सुगंध सुटतो.

या फायकस कुळांची फळे हा निसर्गचक्रातला एक महत्वाचा घटक आहे. वर्षभर कुठल्या ना कुठल्या
झाडाला फळे येतच असतात. असे झाले नसते तर तो इवलासा जीव एखादे वर्षभर कसा तग
धरेल. (मी इवलासा म्हणतोय ना तो जीव, साध्या सुईच्या छिद्रापेक्षाही लहान असतो.)

आणि हि अशी मैत्री आजकालची नव्हे तर किमान ७ कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहे. ज्या काळात
सर्व खंड एकत्र होते, त्याकाळातली अंजीराची फळेच नव्हेत तर असे किटकही अश्मीभूत झालेले
सापडलेले आहेत.

इतकी गुंतागुंतीची व्यवस्था लक्षात घेता, हे झाड आणि हे किटक, एकमेकांशिवाय जगूच शकणार
नाहीत हे तर उघड आहे. पण मला नेहमी आश्चर्य वाटत आलेय, कि हि व्यवस्था नेमक्या कश्या
पायर्‍यांनी निर्माण झाली असावी ? यात कुठेही जराही ढिलेपणा नाही.

नर आणि मादी फूले विकसित होण्याचा कालावधी वेगळा असल्याने, स्वपरागीकरण होणार नाही.
मादी ज्या छिद्रातून आत येते, तो एकदिशा मार्ग असतो. तिला त्यातून बाहेर जाता येणार नसतेच.
शिवाय तिचे पंखच छाटून टाकल्याने, तिला डांबून ठेवण्याची व्य्वस्थाही झालेली असते. नराची
केवळ दोनच कार्ये. त्याशिवाय त्याला काही करताच येणार नाही. तो फळाचे बाकी काही नुकसानही
करु शकत नाही. अंड्यातील जीवाला आणि मादिलाही, अन्नाची जी गरज असते ती, त्या फ़ळातील
साठ्याच्या मानाने नगण्य असते.

खरेच हि व्यवस्था पहिल्यांदा समजल्यावर मी जो अवाक झालो होतो, तोच भाव आजही कायम आहे.

गुलमोहर: 

शेवटचे वडाचे प्रचि पाहुन आठवले की मुंबैतील सर्वात जुना आणि मोठा वड कांजुरला क्रॉम्पटन ग्रिव्हज मध्ये आहे. वयवर्षे १७५ only.. Happy

खरच भारी आहे
घरी अंगणात उंबर आहे छान फ्ळे येतात, विविध पक्षी येतात
पण मला नाही सुचले, तरी माझ्याजवळ येवढा मेगा पिक्स्ल क्यामेरा नाही आहे.
असो शुभेच्छा

दिनेश
मस्त माहिती, धंन्यवाद
अशी गाठी असलेली पानं इतर ठिकाणी पडली की त्यातले किडे एतर झाडाना त्रास करतात का?

दिनेशदा सुंदर माहीती. माझ्या घरी उंबर आहे पण इतके निरिक्षण कधीच केले नव्हते.
त्या कच्च्या उंबराच्या मटणासारखी भाजी करतात हे माहीत आहे. कधी केली नाही.
ही झाडे जिथे असतील तिथे दत्तगुरुंचा वास असतो असे म्हणतात.

तो गाठिंचा फोटो लवकर टाका वर नाहीतर सगळे वाचुन मोकळे होतील.

दिनेशदा, काय मस्त माहिती दिलीत हो? उंबराची खूप झाडे व फळे पाहिली होती. आत्ताही आमच्या घरासमोरच झाड आहे. रात्री वटवाघुळे येतात फळे खातात व खाली टाकतात. पण हे काहीच माहित नव्हते. निसर्गाचे अगम्य कार्य असे चालू असते त्याचेच हे उदाहरण आहे.
<<<<खरच किती अतर्क्य आहे हे. हे असंच व्हायला हवं हे कस आणि कोणी ठरवलं. या झाडांना आणि त्या विशिष्ठ कीटकांना एकत्र येण्याची बुध्दी कशी झाली? सायकोनामाला बरोबर ठराविक ठिकाणी एक छिद्र कसे निर्माण झाले? अगम्य आहे. माहितीबद्दल खुप आभार.>>>>१०००००% अनुमोदन.

जो, या गाठिंचा फोटो आता टाकलाय. हे किडे फक्त याच झाडावर वाढतात. बाकि कुठल्या झाडांना त्रास देत नाहीत.
अशीच एक परिसंस्था असते, इंग्लीश ओक या झाडाची. मला कल्पना नव्हती पण हे झाड मुंबईलापण आहे (कमला नेहरु पार्क जवळ) आता त्याची माहीती आणि फोटो घेऊन, लवकरच येईन.

दिनेशदा काही दिवसांपूर्वी हे झाड दिसले होते. कुतुहल म्हणून उगाच फोटो घेतला होता. ह्याच कुळातले वाटतेय. उंबर अंजीर दोन्ही नाहिये. ह्या झाडाच्या खोडाला जमिनिपासून एक दिड फुट उंचिवरच हे असे फळांचे घोस लागले होते. पानं तर खूप मोठ्ठी होती.. सात आठ इंच लांब रुंद असावित. पानांचा फोटो हरवला.

fig_kay.JPG

धन्यवाद दिनेशदा...खुपच माहितीपूर्ण लेख.
तुम्ही खरंच मायबोलीवरचे डिस्कव्हरी चॅनेल आहात..>>>>१००% अनुमोदन

इतके दिवस मला वाटायचे की 'त्या' उंबराच्या झाडाला किड लागलय..!
अगदि नाविन्यपूर्ण माहिती .. धन्यवाद!

डॅफो, हे पण फिग च आहे. पारंब्या ही पण या झाडाची खासियत. इथे दोन्ही एकत्र झालेय.
कुठे आहे हे झाड ? मला बघायचेय.

इथे बंगळूर ला हॉलिडे विलेज म्हणून एक रिसॉर्ट आहे तिथे अशी दोन झाडं आहेत. मला आश्चर्य वाटले त्या झाडाची पानं आणि ही फळं बघुन म्हणून तिथे विचारले तर मॅनेजर म्हणाला ही पिकत नाहित फळं.. तो ७-८ वर्षे तिथेच काम करतोय.

मस्त माहिती.

दिनेशदा, आता अजुन १ सांगाल का? (आमची जाणुन घ्यायची ओढ तुम्हाला माहिती मिळवायला लावणार, कदाचित तुम्हाला हे माहित असेलही.) बाजारात आता लोक अंजिर म्हणुन जे विकतात हे अंजिरच का की उंबर? फरक कसा ओळखायचा?

मोनाली, बाजारात विकायला येतात ते अंजिरच. आपल्याकडे फक्त साल अंजिरी रंगाची आणि आत गुलाबी गर असलेली जातच विकायला असते. पण यात हिरव्या, पिवळ्या, काळ्या रंगाच्या साली असलेल्या जाती असतात.
अंजिराची पाने खूप मोठी असतात (आदम आणि इव्हने, ती लज्जारक्षणार्थ वापरली होती !!) आणि खूप खरखरीत असतात. उंबराची मात्र मऊ असतात. त्यावर केस नसतात.
अंजिराचे झाडही मोठे होऊ शकते पण तोडणी सोपी व्हावी म्हणून झाडाची कायम छाटणी केली जाते.
त्याला जास्त फळे लागावीत म्हणून, खोडांना जखमा केल्या जातात.
तात्पर्य, बाजारात विकायला येणारी अंजिरे बिंधास्त खा.
आपल्याकडे सुकी अंजिरे पण मिळतात. (गल्फ मधे त्याचा जाम, बिस्किटे पण मिळतात.) आपल्याकडे पण आता बर्फी, मिठाई, मिल्कशेक मिळतात.

दिनेशदा उंबराची एवढी शास्त्रिय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. उंबराच्या फळाबद्दल पतंजली योगपीठाच्या बालकृष्णांनी सांगितलेली आणखी एक माहिती ती म्हणजे की माकडांना जर विषबाधा झाली तर ते उंबराची फळे खातात्,त्यामुळे त्यांना विषबाधा होत नाही. हे खरे ह्याची परिक्षा कोण घेणार?

धन्स दिनेशदा, हो हो बहुतेक काळ्या सालीचीच येतात विकायला आता. ह्म्म्म्म अंजिर बर्फी हि खाते व न कंटाळ्ता तुपात भिजवलेले अंजिर पण थंडीत खायचे, कारण वडीलांसमोर कोणत्याही सबबिखाली आमची सुटका नसायची व सगळे खावेच लागायचे.

पण १-२ वेळा त्या बाजारातल्या अंजिरातुन उंबरात असतात तसे किडे निघाले होते (म्हणुनच वाटायचे की अंजिर व उंबर सारखे असतात व दोघांतही किडे असतात.), तेव्हापासुन अंजिर विकणार्‍याला २-२ वेळा विचारुन घेते, उंबर तर नाही ना. आणि उंबर तर पुर्वी फुकटात खुप खाल्ले आहेत. आम्ही रहायचो तेथे झाड होते मस्त मोठे.

कदाचित त्या १-२ दा अंजिरात (खर्‍या उंबरात) निघालेल्या किड्यांवरुन वाटले मला की अंजिरात पण किडे असतात. विकणार्‍याने गंडवले असणार नक्की तेव्हा Sad

समई, माकडांकडे वनस्पतिंबाबत उपजत ज्ञान असते. कुठली पाने खायची, कुठली नाहीत हे पण त्यांना बरोबर कळते. विषावरचा उतारा, हा प्रयोग एक प्रकारचे मोठे पोपट पण करतात. विषारी बिया ते खातात आणि मग नदीकाठची माती खातात. कुत्रे, मांजरी पण पोट बिघडल्यावर गवत खातात.

मोनाली मला नीट आठवत असेल, तर बायबल मधे देवाची देणगी म्हणून काहि फळांचा उल्लेख आहे. त्यात द्राक्षे आणि बहुतेक अंजिरे पण आहेत. या फळात म्हणे कधी किडे होत नाहीत. पण मला संदर्भ तपासावे लागतील. (कदाचित पवित्र कुराणात पण असेल !!)

हो बहुतेक अंजिरात नसतात किडे. कारण मी पण उंबराच्या अनुभवावरुन, वाळवलेले अंजिर काही दिवस तपासुन खायचि पण कधिच किडे मिळाले नाहित. मग आता नाही तपासत. आणले की सरळ गट्टम Happy

आणि आता तुम्ही म्हणता आहात तर अंजिर चेक करायची गरज नाही. फक्त ते अंजिर आहे ही खात्री करुन घेत जाईन. Happy

आमच्याकडे आहे ते झाड उंबराचं आहे की अंजिराचं हा प्रश्न सुटला आज एकदाचा...औदुंबर आहे हे छानच झाले. धन्स दिनेशदा खुपच छान माहीती..

अत्यंत सुंदर, पण उम्बरावरचा लेख वाचून असे वाटले कि किती सुरेख कोणी लिहू शकतो..खूपच सुरेख आहे हा लेख...असेच लिहित राहा..मी या पुढे प्रत्येक वेळी उम्बरच्या झाडा कडे जास्त लक्ष देऊन बघेल... खास त्या मधील फोटो तर इतके जिवंत कि मी पुढे वाचूच शकत नव्हतो
धन्यवाद...

समई,तुम्ही जे लिहिले आहे की माकडांना विषबाधेवर उपाय म्हणून उंबराचा उपयोग महिती आहे;ते तर खरच आहे.आणि आणखीन एक संदर्भ असाही आहे की,हिरणकश्यपूच्या वधा नंतर नॄसिंहाने आपली नखे उंबराच्या खोडात रुतवली होती;विषबाधा टाळण्यासाठी म्हणून! म्हणजे आपल्या पूर्वजांना किंवा वैद्यांना प्रत्येक झाडाचे नेमके औषधी गुणधर्म माहित होते.हे सर्वच खूप अभिमानास्पद आहे नाही?

खरोखर अद्भुत माहिती मिळाली. नेहमीप्रमाणेच लेखनशैली पण आवडली. आमच्या गावाकडे लग्नात उंबराच्या झाडाची पूजा का करतात आणि त्याला "उंबराचा मान" का म्हणतात ते आता समजले. Happy अंगणात तुळशीवृंदावनाशेजारी एक झाड होते पण त्याला फळे आलेली कधी पाहिली नाहित. अजुन अस्तित्वात असेल तर ह्यावेळी नक्की निरखून पाहीन. पुर्ण नविन दृष्टीकोनातून Happy

Pages