उंबरातले किडे मकोडे - फोटोसहित

Submitted by दिनेश. on 24 February, 2011 - 07:00

मी यापुर्वी अनेकवेळा उंबराच्या झाडाबद्दल लिहिले होते. ते इथे एकत्र करतो. पण मी यापूर्वी
इतके सविस्तर लिहिले नव्हते. कारण हे सर्व अद्भूत तर आहेच शिवाय आपल्या कल्पनेपेक्षाही
क्लिष्ट आहे. पण ते सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो.

खरे तर उंबर ज्या कूळात येतो, ते सगळेच कूळ आपल्या परिचयाचे. वड, पिंपळ, रबर ही
सगळी याच कूळातली मंडळी. रबराचेही मूळ स्थान भारतच आहे.
वड, पिंपळ काय किंवा उंबर काय, या सर्व झाडांना आपण पवित्र मानतो. बहुतेक गावात एक
पूर्ण वाढलेले वडाचे नाहीतर पिंपळाचे झाड असतेच. गोव्याला तर बसथांब्यांची नावे, वडाकडे,
पिंपळाकडे अशी आहेत.

उंबराचेही झाडही आपण पवित्र मानतो. महाराष्ट्रातील बहुतेक एस टी स्टॅंड वर, खास करुन जिथे
त्यांचे वर्कशॉप असते तिथे, श्री दतगुरुंचे देऊळ असतेच. आणि त्या परिसरात एखादे उंबराचे
झाड असतेच. उंबराचे झाड कुणी मुद्दाम लावलेय असे दिसत नाही (इतरत्र उगवलेले आणलेले
असते.) आणि उंबर वा औदुंबर आणि श्री दत्तगुरु यांचे नाते एवढे अतूट मानतात, कि आपोआप
उगवलेल्या या झाडावर कधी कुर्‍हाड चालवली जात नाही.

उंबराचे लाकूड मजबूत असते. ते लवकर कूजत नाही. पुर्वी घराच्या दारात आवर्जून उंबराची फळी
ठोकली जात असे. म्हणून तर त्याला उंबरठा म्हणायचे.
उंबराच्या पूर्ण वाढलेल्या झाडाच्या मूळाशी पाण्याचा वाहता झरा असतो, असे आढळल्यामूळे, नवीन
विहिर खोदताना, हा निकष लावला जातो.उंबराची फांदी तोडल्यास, त्यातून बराच वेळ पाणी
येत राहते.

डॉ. राणी बंग यांच्या "गोईण" पुस्तकात असा उल्लेख आहे कि, आदीवासी लोकात, लेकीसाठी
सासर बघताना, त्या घराच्या आसपास उंबराचे झाड असल्याची खातरजमा केली जाते. हेतू
सरळ असतो, जर सासुने उपाशी तापाशी ठेवले तर लेक, उंबराची फळे खाऊन तग धरु शकेल.
उंबराच्या झाडाखालून जाताना, एकतरी उंबर खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ नये, असा संकेत आहे.
गडकिल्ले भटकताना, कुठेही उंबराचे झाड दिसले, तर आवर्जून ती फळे खाण्याचा सल्ला मी देत
असतो. अशी फळे खाल्य्यास बराच वेळ तहान वा भूक लागत नाही, असा अनुभव आहे.

इतक्या परिचयाच्या उंबराबाबत, एक गूढ मात्र आपल्या मनात कायम असते. आणि ते गूढ
असते, उंबराच्या फूलाबद्दल.

आशा भोसले आणि रेखा डावजेकर यांनी गायलेल्या, एका गाण्यात अशा काहिशा ओळी आहेत,

माझेच मी म्हणू कि, हे भाग्य या घराचे
दिसले मला कधीचे, हे फूल उंबराचे

खुप दिवसांनी भेटलेल्या व्यक्तीसाठी, किंवा क्वचितच भेटणार्‍या व्यक्तीसाठी हे रुपक वापरतात.
उंबराच्या फूलाबद्दल गावगप्पाच अधिक. कुणी म्हणते कि ते बैलगाडीच्या चाकाएवढे मोठे असते
तर कुणी म्हणते कि त्याच्या एका पाकळीत बसून माणूस नदी पार करु शकतो. शिवाय फक्त
भाग्यवान माणसांनाच ते दिसते, अशी मेख आहेच.

गदिमांनी मात्र, अचूक सत्य त्यांच्या एका चित्रपटगीतात लिहिले आहे.

उंबरातले किडेमकोडे, उंबरि करती लिला
जग हे बंदीशाला, जो आला तो रमला.

आणि त्याबाबतच आपण जरा विस्ताराने बोलू या.

माणसाशी असते का ते माहीत नाही, पण उंबराच्या झाडाची अनेकजणांशी घट्ट मैत्री असते. त्यापैकी
काही मित्र तर उंबरासाठी अक्षरश: प्राण पणाला लावतात. काही स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधतात
तर काही निव्वळ स्वार्थ साधतात.

काही किटकांना अंडी घालण्यासाठी एक खास अवयव असतो. त्याला ओव्हिपोझिटर असा शब्द आहे.
या अवयवाच्या मदतीने ते किटक पानांवर अंडी न घालता, थेट पानाच्या आत घालतात. (उंबराशिवाय
तूम्ही अशा गाठी, तमालपत्राच्या पानावर देखील बघितल्या असतील) असे अंडे घातल्यावर, उंबराचे झाड
पानांवर एक गाठ निर्माण करते. या गाठीत एक पोकळी निर्माण होते आणि त्यात त्या किटकाची पूर्ण
वाढ होते. या गाठी अलगद फ़ोडल्यास, त्यात एक जिवंत किडा दिसतो. हिरवट पिवळ्या रंगाचा हा किडा
पूर्ण वाढ झालेला असेल तर थोड्याच वेळात उडूनही जातो. छोटा असला तरी नजरेला सहज दिसू शकतो
तो. उंबराच्या काही झाडांवर या गाठी कमी दिसतात, तर काहिंवर या गाठी भरपूर दिसतात. असे
आदरातिथ्य करण्यात झाडाचा काही फायदा होतो का ते माहीत नाही. (हा फोटो जागू कडून साभार. मी मुद्दाम तिला या गाठी फोडून बघायला सांगितल्या होत्या. जर गाठी खालून उघडलेल्या नसतील, तर त्यात जिवंत किडा असतोच.)

umbarachya gathi.JPG

मी वर लिहिलेच आहे, कि उंबराच्या झाडाची लागवड केली जात नाही. पण ते बियांपासूनही सहज
उगवत नाही. तूम्ही निरिक्षण केले असेल, तर सहज जाणवेल कि मोठ्या वाढलेल्या झाडाखाली,
त्याची रोपे उगवलीत असेल उंबर (आणि वड, पिंपळ ) यांच्या बाबतीत होत नाही. पण काहिश्या
अवघड जागी मात्र याची रोपे दिसतात. दूसर्‍या झाडावर, देवळाच्या कळसावर, इमारतीच्या भिंतीतल्या
भेगांत, ड्रेनेज पाईप्सच्या बेचक्यात हि झाडे, उगवलेली असतात. तिथे ती कशी जातात ?

हे काम या झाडांचे काही मित्र करतात. हि फळ पिकली कि आकर्षक रंगाची होतात. खास करुन
लाल पिवळ्या रंगाची. या रंगाचे पक्ष्यांना आकर्षण असतेच. शिवाय आणखी एक उपाय म्हणून
या फळांना एक गोडूस वास पण येतो. त्याने वटवाघळे, माकडे येतात.

कावळे, धनेश (हॉर्नबील) आणि वटवाघळे आपल्या पोटातील उब या फळांतील बियाना देतात. अशी उब
मिळाल्यावरच त्या बियांवरचे कठीण आवरण जाते आणि त्या रुजू शकतात. या मंडळींची विष्ठा जिथे
जिथे पडू शकते, तिथे तिथे या उंबराची (आणि वडा पिंपळाची) रोपे उगवू शकतात.
यामधे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधला जातो. पक्ष्यांना गोड खाऊ मिळतो आणि झाडाचा बीजप्रसार
होतो.

पण मूळात बिया निर्माण होण्यासाठी परागीभवनाचे काम कोण करते ? तर हे काम केले जाते, उंबरासाठी
प्राण पणाला लावणार्‍या एका खास किटकांतर्फे. या किटकांच्या अनेक प्रजाती आहेत, आणि त्या वास्प
म्हणजेच गांधीलमाशीच्या कूळातल्या आहेत.

उंबराच्या झाडावर अचानक छोटी छोटी फळेच दिसू लागतात. खरे तर त्यांना तांत्रिकदृष्ट्या ना फळे म्हणता
येत ना फूले. जरी ती फळासारखी दिसत असली तरी त्यांना सायकोनिया, असा शब्द वापरतात.
त्या फूलांच्या आता, सूक्ष्म रुपात नर आणि मादी फूले असतात.

उंबराच्या झाडावर अशी फळे तयार झाली, कि त्या झाडापासून एक रासायनिक संदेश पाठवला जातो. त्या
संदेशाने त्या झाडाकडे काहि खास किटक आकर्षित होतात. त्या सर्व माद्याच असतात. (का ते पुढे
लिहितोच आहे) या माद्या उंबराला देठासमोर जे छिद्र असते त्यातून आत शिरतात.

हे आत शिरणे इतके सोपे नसते. या प्रयत्नात त्यांचे इवलेसे पंख आणि स्पर्शिका तूटून पडतात. पण
तरी त्या आत शिरतातच. आत शिरल्या शिरल्या आपल्याकडच्या परागकणांचा साठा त्या आतल्या
मादीफूलांपैकी काही फ़ूलांवर रिता करतात. या काळात आतली नरफूले सुप्तावस्थेत असतात.

आता त्या आतच आपल्या खास अवयवाने अंडी घालतात. हि अंडी अर्थातच किंचीत छिद्र पाडून घातली
जातात. आणि इथेच मादीचे जीवनकार्य संपते. पंख नाही, स्पर्शिका (अँटेना) नाही, परागीभवन करुन झाले, अंडी घातली. निसर्ग अशा अवस्थेत तिला जिवंत कसा राहू देईल ?

आपण वर बघितलेच आहे कि अशी जखम झाल्यावर, उंबराचे झाड त्याभोवती एक कवच
तयार करते. त्या कवचाच्या आत या अंड्यांचे फलन होते. (उंबर खाल्यावर त्यात काही पोकळ
बिया, तूमच्या दाताखाली येतात, ते हे कवच असते.)

हा फलनाचा कालावधी, तीन ते वीस आठवड्यांचा असू शकतो. उंबराच्या जातीवर ते अवलंबून असते.
या काळात, ते झाड त्यांची आपल्यापरीने काळजी घेते. म्हणजे या सायकोनामाचा रंग बदलत नाही
कि त्यापासून कुठलाही गंध सोडला जात नाही, कि जेणेकरुन फळांचे चाहते तिथे येतील.
यथावकाश ती अंडी फलून त्यातून नर व मादी किटक बाहेर येतात. काही जातीत नर आधी जन्माला
येतात. नर आणि मादी यांचे तिथेच मिलन होते. ज्या जातीत नर आधी जन्माला येतात, त्यांचे
मिलन सुप्तावस्थेतील माद्यांशी होते.

मग नरांचे आणखी एक काम सुरु होते ते म्हणजे, त्या फ़ळाला बाहेर जाण्यासाठी छिद्र पाडणे.
या कामासाठी त्यांच्याकडे मजबूत जबडे असतात. पण या छिद्रातून नर मात्र बाहेर पडू शकत नाहीत.
त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू होतो. आणि तसाही बाहेरच्या जगात त्यांचा निभाव लागणे अशक्य असते.
कारण त्यांना ना पंख असतात ना डोळे. मिलन आणि ही वाट खोदण्याची दोनच जीवितकार्ये आटपून
तो इवलासा जीव मरुन जातो.

या वरच्या फोटो तूम्हाला नीट दिसेल, कि केवळ पिवळ्या व लाल फळांनाच बाजूने छिद्र आहे. म्हणजे त्यातले किटक उडून गेले आहेत.

आता माद्या बाहेर जाण्यासाठी तयार असतात, आतली नरफूलेही आता विकसित झालेली असतात.
माद्यांकडे परागकणांचा ठेवा देऊन, झाड त्यांना निरोप देते. माद्या दुसर्‍या झाडाच्या शोधात बाहेर
पडतात.
हे सर्व कार्य पार पाडल्यानंतरच, फळ पिकायची प्रक्रिया सुरु होते. फळाचा रंग बदलतो आणि त्याला
सुगंध सुटतो.

या फायकस कुळांची फळे हा निसर्गचक्रातला एक महत्वाचा घटक आहे. वर्षभर कुठल्या ना कुठल्या
झाडाला फळे येतच असतात. असे झाले नसते तर तो इवलासा जीव एखादे वर्षभर कसा तग
धरेल. (मी इवलासा म्हणतोय ना तो जीव, साध्या सुईच्या छिद्रापेक्षाही लहान असतो.)

आणि हि अशी मैत्री आजकालची नव्हे तर किमान ७ कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहे. ज्या काळात
सर्व खंड एकत्र होते, त्याकाळातली अंजीराची फळेच नव्हेत तर असे किटकही अश्मीभूत झालेले
सापडलेले आहेत.

इतकी गुंतागुंतीची व्यवस्था लक्षात घेता, हे झाड आणि हे किटक, एकमेकांशिवाय जगूच शकणार
नाहीत हे तर उघड आहे. पण मला नेहमी आश्चर्य वाटत आलेय, कि हि व्यवस्था नेमक्या कश्या
पायर्‍यांनी निर्माण झाली असावी ? यात कुठेही जराही ढिलेपणा नाही.

नर आणि मादी फूले विकसित होण्याचा कालावधी वेगळा असल्याने, स्वपरागीकरण होणार नाही.
मादी ज्या छिद्रातून आत येते, तो एकदिशा मार्ग असतो. तिला त्यातून बाहेर जाता येणार नसतेच.
शिवाय तिचे पंखच छाटून टाकल्याने, तिला डांबून ठेवण्याची व्य्वस्थाही झालेली असते. नराची
केवळ दोनच कार्ये. त्याशिवाय त्याला काही करताच येणार नाही. तो फळाचे बाकी काही नुकसानही
करु शकत नाही. अंड्यातील जीवाला आणि मादिलाही, अन्नाची जी गरज असते ती, त्या फ़ळातील
साठ्याच्या मानाने नगण्य असते.

खरेच हि व्यवस्था पहिल्यांदा समजल्यावर मी जो अवाक झालो होतो, तोच भाव आजही कायम आहे.

गुलमोहर: 

दिनेशदा,
वाह ! मस्त माहितीपुर्ण लेख !
लहानपणी खालेल्ली ती सगळे उंबरे,झाडे आठवली ...
Happy

विस्मयकारक... दिनेशदा, खरच सानीशी सहमत. तुमचा लेख म्हणजे मायबोलीवरला डिस्कव्हरी चॅनेल!
उंबराचं फळ खाल्ल्यानंतर वर ओरडाहे खाल्ल्याचं आठवतय... ते किडे, फुंकर्-बिंकर ह्यासाठीच असणार... मल फक्तं ओरडाच आठवतोय Happy
मस्तं.

दिनेशदा अप्रतिम माहिति देवाचि खरच किति अगाध लिला आहे ना ?आपले जिवन एवड्च आहे हे माहित आसुन हि लहान किट्क आपले कर्म करत असतात अनि आपण मानव जरा त्रास झाला किति रडत असतो मानव जन्म मिला म्हणुन ( हे वाचल्या वर मात्र मि माझि सवय नककि मोड्नार)

दिनेशदा,
फारच सुंदर व अभ्यासपुर्ण लेख. फारच आवडला. लहानपणी उंबराची फळे खायचो पण त्याच्या मागची कहाणी एव्हडी विस्मयचकित असेल असे वाटले नव्हते...

मुजरा सरकार...

दिनेशदा खुप ग्रेट आहात तुम्ही!किती छान लेख आहे हा!
अवाक! अवाक झाले मी हे सगळं वाचून!

दिनेशदा ,
खूपच अप्रतिम माहीती ,
माझ्या गावी रस्त्याला खूपच झाडे आहेत.पण इतका कधी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला नाही
पुन्हा एकदा धन्यवाद...

दा, अतिशय उपयुक्त आणि वाखाणण्याजोगी माहीती पुरवलित. ऊंबराच्या झाडाला हा असा काही इतिहास असेल असं वाट्लंसुद्ध्हा नव्हतं. धन्यवाद इतकी सुंदर माहीती इथे मांडल्याबद्दल... Happy

छान आहे. उंबराचे एक तरी फळ खावेच, हा नियम आता कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करीन.

माझ्या शेजारी एक बंगाली कुटुंब होते. एकदा त्यानी कच्च्या उंबराची भाजी केली होती. कच्चे उंबर चिरुन दोन भाग करुन आतल्याबिया खरव्डून टाकुन देने. मग उरलेल्या फळाचे तुकडे करुन नेहमीप्रमाणे परतुन भाजी करावी.. खोबर्ञाचा कीस घालावा. अप्रतिम झाली होती.

दिनेशदा, आताच लेख वाचला, नेहमीप्रमाणेच अप्रतिम, आणि अभ्यासपुर्ण. खूप छान माहिती मिळाली.

दिनेशदा,
..एकदम जबरदस्त!!!
उंबराची फळे कशी खावीत? (म्हणजे आतील किडे साफ करण्याचा काही शॉर्टकट..)
उंबराच्या फळांपासून बनवता येणार्‍या रेसिपीज तज्ञांनी टाकाव्यात (उदा. वर एका प्रतिसादात लिहीलेली कच्च्या उंबराची भाजी..) मग हा अप्रतिम धागा 'उंबरकोश' म्हणून जपता येईल.

हेम, पिकलेले उंबर हाताने फोडून (उघडून घ्यायचे ) त्यावर फूंकर मारायची आणि खायचे.
कच्च्या उंबराची भाजी करतात. ते पाट्यावर वाटून मटणाचा मसाला घालून खिम्यासारखी भाजी करतात. पण कच्च्या उंबरात काय चाललेले असते, ते माहीत असल्याने, मी ही भाजी खात नाही !!

आश, फायकस कूळातलंच दिसतय. पण देठासमोर छिद्र दिसत नाहिये.
इथे आफ्रिकेत पण मला उंबर, वड सारखी दिसणारी झाडे दिसतात. पण पानांचा आकार वगैरे वेगळाच असतो.

अतिशय अप्र्तिम लेख . खरच माय्बोलि मुले किति सुरेख महिति मिलत आहे फोतो पन अतिशय सुन्देर आहेत. दिनेश ला मनापासुन ध्यनवाद .असेच लेख्नन करित रह.

खुप छान माहीतीचा लेख्.आम्ही पुर्वी जीथे रहायचो तीथे उंबराचे झाड होते. अग्दी घराच्या बाजुला.लहानपणी आम्ही झाडा खाली खुप खेळ खेळायचो आणि उंबर पण खुप खाल्ले आहेत्.ते हळुच फोडुन फुंकर मारुन मग खायचो.दिनेशदा हे वाचताना मधेमधे त्या आठवणी येत होत्या.पण खरच खुप छान माहिती. पानावरच्या गाठीनां सुकल्यावर आम्ही त्यांना मटकी म्हणायचो पण ते काय आहे ते कधीच माहीती नव्हत्.धन्यवाद दिनेशदा.

सॉलीड !
अतिशय माहितीपुर्ण लेख ! ती झाडावर लगडलेली उंबरं पाहून तोंडाला पाणी सुटलं. गावाकडे आमच्या शेतात विहीरीवर असाच प्रचंड उंबर आहे. त्याचा अर्द्याच्यावर शाखा संभार विहीरीच्या तोंडावर आलेला आहे. गावाकडे गेलो की आमचा हाच उद्योग असतो. उंबरावर चढून भरपुर उंबरं खायची आणि तिथुनच थेट विहीरीत मुटका मारायचा ! Happy

वा दिनेश खुप छान माहीती , उंबरठा हा शब्द उंबरापासुन आला . ज्ञानात भर , लहानपणी उंबर खातांना 'अरे जरा बघुन खा' 'हो हो' असे म्हणत गोड उंबरासोबत भरपुर किडेमकोडे खाल्ले Happy

Pages