मासे २१) कोलिम

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 February, 2011 - 02:06
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोलिम तिन ते चार वाटे
दोन मध्यम आकाराचे कांदे चिरुन
७-८ लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
मसाला
कोकम किंवा आंबोशी
मिठ
एक हिरवी मिरची मोडून
थोडी कोथिंबीर चिरुन
तेल

क्रमवार पाककृती: 

पहिला कोलीम निवडून घ्यायचा. एक माचिसची/अगरबत्तीची काडी घेउन किंवा बोटाने थोडे थोडे कोलीम सारुन (तांदूळ निवडतो तसे) कोलीम निवडावा लागतो. त्यात कधी कधी पाखर असतात किंवा काही प्लास्टिक वगैरे मिक्स झालेले असतात म्हणून. ही पाखरे अगदी छोटी असतात. आता कशासारखी लिहीली तर तुम्ही इ.. करुन आणणार नाहीत किंवा किळस वाटेल पण तसे काही नाही ही पाखरे घाणेरडी नसतात. तांदळात पडलेल्या टोक्यांप्रमाणे ही काडीला चिकटून किंवा चिमटीत धरुन काढून टाकायची.

काही जण कोलिम धुवत नाहीत त्याची चव जाते म्हणून पण जर आपले मन साशंक असेल तर पिठाच्या चाळणीत किंवा रुमालात ठेउन हा कोलिम धुवावा.

आता तेलावर लसूणाची फोडणी द्यावी व त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत शिजवावा. मग त्यात हिंग, हळद मसाला हे नेहमीच जिन्नस घालून त्यावर कोलीम टाकावा. आता भांड्यावर झाकणात पानी ठेउन कोलिम वाफेवर शिजु द्या. मधुन मधुन झाकण काढून परतवा. ७-८ मिनीटांनी त्यात मिठ, मोडलेली मिरची, कोकम किंवा आंबोशी, कोथिंबीर टाका व परतुन परत एक वाफ येउ द्या. मग गॅस बंद करा. आणि भाकरी सोबत खा.

अधिक टिपा: 

कोलीम समुद्रात तसेच खाडीत मिळतो. समुद्रातील कोलीम पांढरट असतो तर खाडीतला काळा असतो. खाडीतल्या कोलमाला जास्त चव असते. कोलीम म्हणजे कोलंबीच्या जन्माची पहिली स्टेप. कोलिमाचे कालवण मी अजुन ऐकले नाही पण कोलिमाची वडी करतात. सुक्या कोलमाच्या पापडासारख्या पण थोड्या जाड वड्या बाजारात विकत मिळतात. त्या वड्या तव्यावर किंवा चुलीत भाजुन खायला मजा येते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू.फोटो टाक बघू.
मी उद्या टाकते.
माझी लय लय लय आवडती डिश.
सुक्या कोलिमाचे भाजुन ,कांदा लिंबू मीठ तिखट घातलेले सॅलड (!)भारी लागते नय.
मी सॅलडच्या बी.बी. वर देणार होते: Happy

अवल पुण्यात हे मिळ्णे जरा कठिणच!

जागुडे कोलिम च लोणच केल आहेस कधी सहि लागतं, मी केलं होत गेल्या वर्षी , आता मस्त मुरलं आहे !

जागु गेल्याच्या गेल्या शनिवारी च केला होता कोलीम , माझ्या नवर्र्याची आणी साबु चीआवडती डिश . पण मी कोकम च्या एवजी टोमॉटो टाकलेला आणी कांद्द्याची पात . खुप छान झाला होता ,अशी नवर्र्याची कमेंट होती . मी कधीच खात नाही ,कारण मला आवडत नाही .

जागू, मी पण कधी पाहिले नव्हते हे (भारतीय कॅव्हियर म्हणायचे का याला ?)
माझ्या आजोळी, सुकवलेल्या जवळ्यालाच कोलिम / गोलिम म्हणतात. आणि गंमत म्हणजे असा सुकवलेला जवळा, प्रत्येक घरी संग्रहात असतो. समुद्रापासून खूप दूर असलेल्या या गावात, हा कोलिम, अनेक वर्षांपासून खाल्ला जातोय (बाकिचे सुके मासे खाण्यात नसतात, फारसे.)

आमच्याकडे,नेरुळ्,करावे,सारसोळे इकडे पण मिळतं.

जागूने इथे दाखविलेल्या पाकृखेरिज कोलमाच्या पेंडी सुद्धा छान लागतात. Happy

दिनेश दा जवळ्या पेक्षा आणखीन लहान असतो हा, अगदी लहान!
नुतन साधारण सर्व समुद्र किनारी हा मिळतो (जागु समुद्र किनारा स्वछ हवा आणि कोलिम हि खात्रि च्या व्यक्ती कडुनच घ्यावा)

(भारतीय कॅव्हियर म्हणायचे का याला
नाही हो दिनेश.. कॅव्हीयर ही अंडी आहेत माशाची आणि ही अगदी बारीक कोलंबी आहे. (आता कोलंबी अंडी घालते का माहित नाही, पण फोटोत तरी कोलंबीचा आकार दिसतोय, अंडी नसावीत). आपल्याकडे भिंगीची वगैरे मिळतात तशी. फक्त आपल्याकडे करायची आणि खायची पद्धत वेगळी आहे, त्यामुळे भिंगीची अंडी आणि कॅव्हीअरची अंडी वेगळी दिसतात.

वाडीला बारीक कोलंबीच्या सुकटाला गोलंबो म्हणतात. अर्थात मी इथे लिहिलाय शब्द जसा लिहिलाय तसा त्याचा उच्चार नाहीय्...बोलीभाषेतल्या शब्दांचे उच्चार प्रमाण भाषेत पकडणे जाम कठिण.

डॉक्टर तुम्हालाही बरीच माहिती आहे माशांची. मागे मासे गटगबद्दल चर्चा झाली होती ती आठवली.
नेरूळमध्ये कुठे घेता मासे?? मी नेरुळमध्ये राहात होते तेव्हा हॉटेल रंगोलीच्या बाजुच्या मासेमार्केटात जायचे. तिथले दर ऐकुन कसेतरी स्वतःला सावरत बाहेर यायचे. तिथले लोक हातात रु.५०० ची नोट फडकावत कोळणीला दर विचारतात. Happy

डॉक्टर तुम्हालाही बरीच माहिती आहे माशांची. मागे मासे गटगबद्दल चर्चा झाली होती ती आठवली.
नेरूळमध्ये कुठे घेता मासे?? मी नेरुळमध्ये राहात होते तेव्हा हॉटेल रंगोलीच्या बाजुच्या मासेमार्केटात जायचे. तिथले दर ऐकुन कसेतरी स्वतःला सावरत बाहेर यायचे. तिथले लोक हातात रु.५०० ची नोट फडकावत कोळणीला दर विचारतात. >>>>>>>>

साधना,रंगोलीच्या जवळच्या मासेमार्केटमधे भलतंच महाग मिळतं. अर्थात मी गाववाला असल्याने तिथेही कमी दरात पदरात पाडून घेतोच... Happy

नेरुळमधे स्वस्त मासे मिळायचं ठिकाण म्हणजे,सारसोळे नाका. नेरुळ बस डेपोकडून रेल्वेलाईनच्या पलिकडे जे मासेमार्केट आहे तिथे,यशोदा,सुरेखा या दोघींकडे अगदी ताजी व बर्‍यापैकी स्वस्त मासळी मिळते. मात्र समोरची व्यक्ती बघून त्या सुद्धा भाव वाढवतात.:(

दुसरे एक ठिकाण आहे पाम बिच रोडवर किंग्स इलेक्ट्रॉनिक्स क्रॉस केल्यावर रस्त्याच्या कडेला संध्याकाळच्या वेळेस नुकतीच पकडलेली ताजी मासळी मिळते. भावात जरा घासाघीस करुन स्वस्तात पदरात पडते. अनंत मढवी म्हणून एकाकडे चांगली मासळी मिळते.

आणि या शिवाय नेरुळ गावातील बरेच जण खाडीत जावून मासे पकडतात व ते दारोदारी वाटे करुन विकतात...... हे गावात फार म्हणजे फार स्वस्त मिळतात. अगदी ३०/४० रुपयांना बाहेर २०० रु.त मिळणारी कोळंबी मिळते.

आणि टी.एस.चाणक्य जवळच्या खाडीत वाणा असतो...... म्हणजे अगदी पूर्ण होड्या भरुन मासे मिळतात..उधाण असताना.... इथे गेल्यास मोठी मासळी दादर मार्केट ला पाठवतात व लहान मासे तात्काळ स्वस्तात विकले जातात.

गटग कधी करु या? Happy

भरपूर जण आहेत ओळखीचे....... माझी ए.एन.एम. सुद्धा करावे गावातील आहे. मी विद्या प्रसारक हाय स्कूल बेलापूर इथे शिकलो त्यामुळे कराव्या तील वर्गातील बरीच मुले आहेत ज्यांच्याशी नेहमी बोलणं,येणं,जाणं,होतं.

शिवाय कराव्याच्या जत्रेला मी त्यांच्याकडे जातो व नेरुळच्या जत्रेला करावकर आमच्याकडे येतात. Happy

आपण कराव्याच्या आहात का नूतन?

डॉ. कैलास मी वरती लिहल आहे ना सुक्या कोलीमाच्या पापडासारख्या वड्या त्याच पेंडी.

साती, ह्या पेंडी कांद्यावर टाकुन पण सक्या करता येतात कुस्करुन.

सखी धन्स.

अवल अग इतके काही कठीण नाही. तांदुळ निवडण्यासारखेच आहे.

थंड रेसिपी टाक लोणच्याची.

साधना तु ये ग माझ्याकडे मी सगळे दाखवते तुला.

हो नुतन मी पण कधी कधी कांदे पात टाकते. जवळ्यात पण टाकते.

दिनेशदा जी बुटकी आणि काळी कोलंबि असते ती बहुधा खाडीत मिळते त्यात मी गाभोळी पाहीली आहे. पण ती त्यांच्या पायांच्या जागी असते. आणि जास्त करुन चिंबोर्‍यांची असते तशी लाखच दिसते ती त्यांचा जो काळा धागा असतो पाठीला त्या जागी असते. जास्त लाख डोक्यात जमा असते. म्हणून बर्‍याच वेळा डिक्याचा फक्त टोकेरी भाग काढून बाकी डोके तसेच ठेउन ती केली जाते.

नुतन अलिबागला नाही का ग मिळत ? मिळत असेल.

मासे- गटग ? वॉव ! मी एका पायावर तयार Proud
त्यातून जागूकडे असेल तर अगदी कोलिमाच्या एका पायावरही तयार Lol

डॉ. कैलास मी वरती लिहल आहे ना सुक्या कोलीमाच्या पापडासारख्या वड्या त्याच पेंडी.>>>

जागू,ओल्या कोलीमाची पण पेंड करता येते. Happy

नाही माहित ग , कारण माझ्या माहेरी कोणालाच हा प्रकार माहित नाही . मी सासरी येऊन शिकलेय , पण मला साफ करता नाही येत माझी कामवाली करुन देते. माझ्या माहेरचे उअलट याला नाव ठेवतात , ते इथे न सांगितलेलेच बरे .

डॉ कैलास हो त्यात बेसन-तांदळाचे पिठ घालुन करतात त्याच म्हणताय ना ? आम्ही त्याला वड्या म्हणतो. सुक्यांना पेंडी म्हणतो. तुमच्याकडे पालकं मिळतात का ?

अमी जवळ्यात आणि कोलिममध्ये फरक आहे. बरीच जणं जवळ्यालाच कोलिम म्हणतात. जवळा मोठा असतो. कोलिम म्हणजे अजुन त्याला धड कोलंबीचा आकार पण आलेला नसतो. जवळ्याच्या २०%च ह्याच आकारमान असत.

अवल कधी ठरवायचा तुम्ही सांगा.

ओह..येस बरोबर.... ओल्यांना वड्या आणि सुक्यांना पेंडी म्हणतात. Happy
पण ओल्यांत बेसन टाकतातच असं नाही. कधी कधी विदाऊट बेसन सुद्धा करतात. Happy

माझ्यासाठीही नविन आहे हा मासा Sad
जागुतै, मला "जवला" माहीत आहे पण...., ते काही असलं...तरी तु बनवलं आहेस्...म्हणुन डोळे बंद करुन उदरात घेईन Happy
चल 'फेडेक्स' कर..!

कसला घमघमाट सुट्लाय.. Sad
tongue0021.gif

चातक खाउन बघ जवळ्यापेक्षा जास्त टेस्टी असतो हा.
साधना खरच करुया. तारीख ठरवा.
डॉ. कैलास, दिनेशदा Happy

तोंपासु फोटो एकदम. इथे कोरियन दुकानात सुका जवळा मिळतो अन बाटलीत भरलेला ( बहुतेक वव्हिनेगर घातलेला) ओला जवळा पण असतो. मी तो ओला जवळा कधि आणला नाही. ताजा ओला जवळा खाल्ला नाही किति वर्षे झाली Sad

जी टी जी कधी करताय - मी तेवढया एका दिवसापुरती येईन मासे खायला म्हणुन Proud

Pages