पुस्तक परिचय - 'आवा'

Submitted by ललिता-प्रीति on 22 February, 2011 - 02:29

लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला (रविवार, दि. २० फेब्रुवारी २०११) माझा पुस्तक-परिचयपर लेख.
मूळ लेख इथे वाचता येईल.

----------

चित्रा मुद्‌गल या हिंदीतील नावाजलेल्या लेखिका. विद्यार्थीदशेपासूनच त्यांचा कामगार चळवळींशी अगदी जवळून संबंध आला. कामगारांच्या आणि विशेषतः त्या समाजातील स्त्रियांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिल्या; अनुभवल्या. त्या सर्व अनुभवांचा परिपाक म्हणजे त्यांची ‘आवा’ ही कादंबरी.
आवा - म्हणजे कुंभाराची भट्टी. कादंबरीत ही भट्टी प्रतिक बनून निरनिराळ्या रूपांत वाचकांसमोर येते. कामगारांच्या दैनंदिन जीवनात परिस्थितीचे चटके देणारी भट्टी, चंगळवादी समाजाची जणू खाजगी मालमत्ता भासणारी पैश्यांची ऊब देणारी भट्टी, आपल्याला निव्वळ उपभोग्य वस्तू मानणार्‍या समाजाला खडसावू पाहणारी स्त्री-क्षमतेची भट्टी आणि भविष्याची स्वप्ने पाहणार्‍या तरुणवर्गाच्या मानसिकतेची भट्टी.
नायिका नमिता पांडेय ही विशीतील तरूणी. कामगार चळवळीतील आघाडीचे नेते असलेले तिचे वडील पक्षाघातामुळे अंथरुणाला खिळले आहेत. घरची अर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे पाच जणांच्या कुटुंबासाठीच्या अर्थार्जनाची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली आहे. त्यासाठी तिला आपले महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडावे लागले आहे. ध्यानीमनी नसताना उद्भवलेल्या या परिस्थितीशी दोन हात करताना नमिता गोंधळून जाते, बावचळते; प्रसंगी हबकते; तारुण्यसुलभ, निर्व्याज प्रेमाच्या शोधात काही काळ भरकटते, चुकीचे निर्णय घेते. एकीकडे स्वतःमधील स्त्रीत्वाची जाणीव होत असतानाच त्या निर्णयांची जबरी किंमतही तिला चुकवावी लागते. त्यापायी ती एकटी पडते.
स्वतःबद्दल ‘... माझ्याकडे अशी काही ठिणगी नाहीये, जिची ज्वाळा बनण्यासाठी काहीही करायला तयार व्हावं.’ असा विचार करणारी नमिता. तिला नायिका म्हणावे लागते ते लौकिकार्थाने. कारण निरनिराळ्या पात्रांवर ओढवणारी परिस्थिती हीच खरी या कादंबरीची नायिका आहे. त्यामुळेच असेल कदाचित, पण या कादंबरीतील कुठलेच पात्र निव्वळ काळ्या अथवा पांढर्‍या रंगात रंगवलेले नाही. व्यक्‍तिचित्रणांपेक्षा पात्रा-पात्रांतील नातेसंबंधांवर लेखिकेने जास्त भर दिला आहे. कादंबरीत काही काळासाठी येणारी कुणी एक सुनंदा किंवा नीलम्मा वाचकाला नकळत लळा लावून जातात त्या त्यामुळेच.
अगतिकतेचे, असाहाय्यतेचे आवरण त्यागून, नमिता स्वतःच नव्याने ठरवलेल्या मार्गावर वाटचाल करण्यास मनाने सज्ज होते. नियतीच्या भट्टीत तावून, सुलाखून निघाल्यावरच तिच्या लक्षात येते की, ‘जमिनीवर जर कुदळ चालवली नाही तर खालच्या थरातली जमीन कशी आहे ते कसं कळणार?’
तिच्या या निर्णयाचा आनंद मानायचा की हळहळ व्यक्‍त करायची असा संभ्रम एक क्षण वाचकाला पडू शकतो. कारण तिने निवडलेल्या मार्गावर तिची सोबत करणार असतो वंचितांचा तोच समाज ज्याच्यापासून मुळात ती दूर पळू पाहत असते.

अगदी शेवटच्या परिच्छेदापर्यंत वाचकांना खिळवून ठेवणारी ही कादंबरी एखाद्या प्रदीर्घ धारावाहिकाप्रमाणे भासते. ठराविक काळानंतर तीत नवीन नवीन पात्रे येत राहतात. पण कथानकाच्या गाभ्याशी असलेली निवेदनाची नाळ कुठेही तुटत नाही. नेमक्या आणि अत्यंत भेदक शब्दयोजनेद्वारे प्रत्येक प्रसंगात लेखिका वाचकाला बोट धरून आपल्यासोबत घेऊन जाते. ते करत असताना ‘फ्लॅशबॅक’ तंत्राचा उत्कृष्ट वापर करते.
काही ठिकाणी पात्रांमधील संवाद जरासे बोजड वाटतात; विशेषतः पवार किंवा गौतमीबरोबरचे नमिताचे संवाद. पण त्यामुळेच त्यांची व्यक्‍तिमत्त्वेही ठाशीव स्वरूपात वाचकांसमोर येतात हे ही तितकेच खरे. मात्र या सगळ्यांत ‘संजय कनोई’ ही एक महत्त्वाची व्यक्‍तिरेखा काहीशी दुर्लक्षित राहून गेली आहे असेही वाटून जाते.

‘कामगार नेते दत्ता सामंत’ आणि ‘कामगार चळवळ’ हे ब्लर्बमधील उल्लेख वाचून अठ्ठावीस वर्षांपूर्वीच्या मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रदीर्घ संपाच्या आठवणी जाग्या होतात. पण या कादंबरीचे कथानक त्यानंतरच्या दशकात बेतलेले आहे. तेव्हाच्या मुंबईतील काही महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक घडामोडींचे उल्लेख कथानकाची अस्सलता अधोरेखित करतात. कामगार चळवळीची पार्श्वभूमी संपूर्ण कथानकाला व्यापून राहतेच. पण कथानकाच्या केंद्रस्थानी आहे तो मुख्यत्त्वे स्त्रियांचा संघर्ष.
लेखिकेच्याच शब्दांत सांगायचे तर एक वेळ अशी येते की स्त्रीच्या क्षमतेचा तिच्या शरीरापलिकडे जाऊन स्वीकार न करणार्‍या रूढ आणि विकृत समाजाला कोणी तरी समजावणं आवश्यक होऊन बसतं.
त्याच प्रबळ इच्छेतून साकारते ही ‘आवा’सारखी जवळजवळ सहाशे पानी विलक्षण कादंबरी!

***********

आवा, चित्रा मुद्‌गल, अनुवाद - वसुधा सहस्त्रबुध्दे.
पद्मगंधा प्रकाशन. पृष्ठे ५८३. मूल्य ४५० रुपये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. हा लेख सार्वजनिक केला तर वाचू आनंदे मधे सामील नसलेल्या मायबोलीकरांना पण दिसेल.

छान ओळ्कस करून दिलीस...
लोकसत्तेत आल्याबद्दल अभिनंदन आणि इथे दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

हे मागच्या पानांवर वाहून गेलं होतं. आज वाचलं. छान ओळख करुन दिली आहे पुस्तकाची. धन्यवाद Happy

मायबोली खरेदीवर उपलब्ध आहे का हे पुस्तक ? शोधलं पाहिजे.

चांगल्या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद ललिता. परिचय छान लिहिला आहे.
मेधाने सांगितल्याप्रमाणे हरकत नसल्यास धागा सार्वजनिक कर.