किती दिवस झाले माहेराला गेले नाही

Submitted by पाषाणभेद on 17 February, 2011 - 00:51

मंडळी, आज वेळ मिळाला म्हणून लगोलग दोन कविता डोक्याला दोन कवीता सुचवू दिल्यात. (आपल्यावर होणार्‍या अन्यायाबद्दल क्षमस्व.)

किती दिवस झाले माहेराला गेले नाही

किती दिवस झाले माहेराला गेले नाही
किती वेळ करू सासराची सरबराई ||धृ||

तो नदीचा काठ अन आंबा मोहरलेला
हाळात जनावरं येती पाणी प्यायला
धुनं धुतल्यानंतर सावलीला तेथेच जाई
किती दिवस झाले माहेराला गेले नाही ||१||

ते उतारावरचं सटूबाईचं मंदीर
त्याच्याबाजूलाच मातीची गाढंवं
जनू कुंभाराकडे माठ पणती घ्यायला जाई
किती दिवस झाले माहेराला गेले नाही ||२||

शाळेसाठी चार मैल नेहमीच चालायचे
येताजाता नदीकाठी मन रेंगाळायचे
त्या रस्त्यावरच मैत्रींणींच्या खोड्या होई
किती दिवस झाले माहेराला गेले नाही ||३||

सासरच्या घरी चांगलचुंगल खाते
इथल्या देवळांत देवदर्शनाला जाते
पण माहेराच्या आसरांना नैवेद्य कधीचा गेला नाही
किती दिवस झाले माहेराला गेले नाही ||४||

आईबापाची लाडाची लेक झाली मायेला पारखी
माहेराची आठवण मनामध्ये येई सारखी
तोंडावर हसू ठेवून, मन आठवात रेंगाळत राही
किती दिवस झाले माहेराला गेले नाही ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१७/०२/२०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: