वारी - भाग ४ -

Submitted by टवणे सर on 15 June, 2008 - 03:50

दरवर्षी पांडवपंचमीला पहाटे भाउ मला घेउन तासगाववेशीच्या मारुतीला यायचे. वारीला पोचवायला. सकाळी मस्त थंडी असायची आणि मी छान स्वेटर आणि कानटोपी घालायचो आणि भाउंनी गळ्याभोवती मफलर गुंडाळलेला असायचा. मग तिथे पोचेपर्यंत ते मला खूप काय काय सांगायचे. पूर्वी कसे ते दरवर्षी पंढरपूरला चालत जायचे, तेव्हा इतके लोक नसायचे वारीला, शिधा आणि सामान स्वत: पाठीवर घेउन जायला लागायचे, कोण कोण त्यांच्याबरोबर असायचं, रोज बरोबर वीस मैल चालुन कसे मुक्काम करायचे, पहिला मुक्काम कुठे, दुसरा कुठे, तिसरा कुठे आणि मग चौथा मुक्काम पंढरपुरात, आमच्या इथुन पंढरपूर पर्यंत रस्ता कसा सरळ होता, कुठेच वळायला लागायचे नाही, बायकांची आठ दिवसाची वारी कधी सुरु झाली, आमच्या घरातून किती पिढ्या आणि कोण कोण वारीला जात आहेत. त्यामुळे मला भाउंच्या वडिलांचे, त्यांच्या वडिलांचे, त्यांच्या वडिलांचे, त्यांच्या वडिलांचे पूर्ण नाव माहिती होते. कोकणातून देशावर आलेल्या पहिल्या पुरुषापासूनची सगळ्यांची नावं, ते काय करायचे वगैरे मला भाउंनी सांगितले होते. आणि मग आम्ही तासगाववेशीच्या मारुतीच्या देवळात पोचलो की आरती आटपून थोडे दूरपर्यंत पालखीबरोबर चालत जायचो. पूल ओलांडला की दूरवर दंडोबाचा डोंगर दिसत असे. त्याच्याकडे बोट दाखवून भाउ मला म्हणायचे, 'एकदा घेउन जाईन मी तुला दंडोबावर'. मग पुढे वळणावर शमीच्या झाडाची थोडी पाने तोडून आम्ही मागे फिरायचो.

ह्यावेळी मी आपापलाच सकाळी लवकर उठलो आणि आंघोळ आटपून तासगाववेशीच्या मारुतीकडे निघालो. वाटेत बाबा, दादा आणि आत्या भेटले. आत्या ह्यावर्षी खास वारीला जायला म्हणुन पुण्याहून आली होती. काका आधीच त्यांच्या आणि आत्याच्या, बेडिंग आणि सामानाच्या पिशव्या घेउन, सामानाच्या ट्रक मध्ये चढवायला पुढे गेले होते. आत्यानं वारीच्या तयारीची कॅसेट लावली होती. ती कशी गेले चार महिने रोज सकाळी नेहेमीची बस न पकडता आधी कॉर्पोरेशनच्या स्टॉपपर्यंत चालत जात होती, आणि तिचे नवीन बूट कसे पायाला चावले, आणि मग त्याबद्दल डॉक्टर काय म्हणाले, आणि मग त्यांचे डॉक्टर कसे अचूक निदान करतात, शेवटी जुने कॅन्व्हासचे बूटच कसे चांगले आहेत आणि ती तेच घेउन आली आहे, मग मोजे विकत घ्यायला गेली असताना तिच्या मुलीच्या वर्गशिक्षीका तिला दुकानात भेटल्या आणि त्यांनी तिला तिच्या अभ्यासाबद्दल काय काय सांगितले वगैरे वगैरे वगैरे. ती काय बोलत आहे ह्याच्याकडे मी फार लक्ष देत नव्हतो. पण एकदम माझ्या कानावर आलं, 'सहामाहीचा निकाल कधी आहे रे? आणि तु म्हणे आजकाल सगळ्यांना त्रास देतोस, कुणाचं ऐकत नाहीस, अभ्यासाच्या नावनं पण शंख आहे. ते कळेलच म्हणा आता निकाल लागल्यावर. पण काय इतक्यात शिंगं फुटली का तुला?'
मी 'माहिती नाही' एव्हडंच उत्तर दिलं आणि भराभरा चालायला सुरुवात केली आणि सगळ्यांच्या पुढे निघुन गेलो.

मारुतीच्या देवळात पोचलो तेव्हा आरत्या संपून मंत्रपुष्पांजली सुरु झाली होती. तशी वारी किल्ल्यातून सुरु व्हायची पण इथे आरती झाल्यावर ती खरी मिरजेतून बाहेर पडायची. देवळाच्या पटांगणात शंभर-दोनशे लोक होते. देवळाच्या मागे एक छोटेसं तळं होतं. बरेचवेळा मी भाउंबरोबर पहाटे फिरायला यायचो तेव्हा भाउ मला खंड्या दाखवायचे. मी हळुच खंड्या दिसतोय का ते बघितले पण आरत्यांच्या आणि माणसांच्या एव्हड्या आवाजात तो कुठे तिथे राहायला.
'ओम, राजाधिराजाय प्रसंय्य साहिने' असं बेंबीच्या देठापासून खच्चून ओरडत मी पण सगळ्यांबरोबर मंत्रपुष्पांजली म्हणु लागलो. मग शेवटी स्वत:भोवती तीन फेर्‍या मारुन, प्रसाद न घेताच, मी देवळाबाहेर धूम ठोकून रस्त्यावर आलो. काका सामान ट्रकमध्ये चढवून खाली उतरत होते. त्यांच्याबरोबर चिवटे अण्णा पण होते. त्यांचं मंगळवार पेठेत किराणा, धान्य, आयुर्वेदीक औषधं-जडीबुटी, गाडी भाड्याने देणे, सावकारी असे सगळ्याचे एकत्र दुकान होते. 'काय रे, कसायस?' असं माझ्या पाठीवर थाप मारुन विचारत, 'चला दादा, निघुया आता' असं ते काकांना म्हणाले. ते, त्यांची बायको, आणि मागल्या वर्षीपासून त्यांची मुलगी शिल्पा, दरवर्षी वारीला जायचे. शिल्पा माझ्याच वर्गात होती. मी खाली वाकुन काकांच्या आणि अण्णाच्या पाया पडलो आणि पुढे चौकाकडे निघालो.

चौकात माणसंच माणसं भरली होती. वारीला जाणार्‍या लोकांबरोबर त्यांच्या बायका, मुलं, आई-वडिल, रोज सकाळी पंढरपूररोडवर फिरायला येणारी जनता, आणि बरेच म्हातारे-म्हातार्‍यांची गर्दी जमली होती. एव्हाना पालखी पण चौकात आली होती. पालखी बरोबर चालणारे सगळे धोतर, सदरा, गळ्यात झांजा, अनवाणी पाय, कपाळावर भस्माचा पट्टा नाहीतर शेंदराचा टिळा आणि खांद्यावर भगवा झेंडा अश्या वेशात होते. अनेकांनी गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली होती. पालखीच्या पुढे एकजण गळ्यात वीणा अडकवून उभे होते. भाउ सांगायचे की पूर्वी सगळेच लोक पालखीबरोबर चालायचे कारण खूप कमी लोक असत. पण आता बरेच जण लवकर उठुन पालखीच्या पुढे चालायला लागायचे. पालखी बरोबर चालणारे सतत भजन म्हणत असायचे. त्यामुळे त्या ठेक्यात त्यांचा चालण्याचा वेग पण जास्ती असायचा. मी पालखीला नमस्कार करुन कोण कोण ओळखीचं दिसतय ते बघायला सुरुवात केली. ज्ञानू शिंप्याचा मुलगा आणि तिनही नातवंडं पालखीबरोबर होती. त्यातला मधला नातू माझ्याबरोबरच शाळेत होता. पण 'क' तुकडीत. हे तिघही भाउ एक नंबर भिकारचोट होते. भाउ म्हणायचे की ज्ञानू आणि त्याचा मुलगा पण अव्वल भिकारचोट आहेत. भिकारचोट, भोसडिच्या, च्यायला असल्या शिव्या दिल्या की आजी वस्सकन् भाउंच्या अंगावर खेसकायची, पण भाउ नुसतेच हसायचे आणि दिवसातून दहा-पंधरा वेळा तरी कुणालतरी भोसडिच्या म्हणायचे.

लोकं वारीला निघालेल्यांच्या पाया पडत होते. अगदी मोठी माणसे, म्हातारे-म्हातार्‍या, तरुण मुलांच्या पाया पडत होते. वारीला जाणार्‍याच्या पाया पडले की पांडुरंगाच्या पायांना हात लावुन नमस्कार केल्यासारखे असते असे भाउंनी सांगितले होते. जर एखादा मोठा माणुस पाया पडत असेल, तर वारीला जाणारा पटकन पाय चपलातुन बाहेर काढुन, खाली वाकलेल्याचा खांद्याला हात लावून नमस्कार परत करायचा. मी आमच्या घरात सगळ्या आत्ये-चुलत भावंडात लहान होतो. त्यामुळे आजवर कुणीच माझ्या पाया पडले नव्हते. मला एकदम वाटले की कुणीतरी माझ्यापण पाया पडावे. पण कुणालाही माझ्याकडे बघुन लक्षात आले असते मी वारीला निघलो नाहिये.

हळुहळु गर्दी पुढे पुढे सरकत विरळ होवू लागली. वारीला जाणार्‍यांनी वेग पकडला. इकडे पालखीच्या आजुबाजुची गर्दी देखील पांगु लागली. काका कधीचेच, कमरेला मफलर बांधून, लांब ढांगा टाकत पुढे निघुन गेले होते. चिवटे अण्णा पण काकांच्या वेगाशी वेग राखायचा प्रयत्न करत, जोरात चालायचा प्रयत्न करत पुढे निघाले होते. मीदेखील पटापट पुढे जाउ लागलो. बायकांच्या घोळक्यात मला चिवटे काकु, शिल्पा दिसल्या. शिल्पाबरोबर आमच्या वर्गातली काळी-किडमिडीत आरती जोशी पण वारीला निघाली होती. मुलींच्या शाळेच्या कजाग उपमुख्याध्यापिका यार्दी बाई, गावात मोठं हॉस्पिटल असलेल्या आणि तीन कार असलेल्या पानसे डॉक्टरांची बायको अश्या अनेक ओळखीच्या बायका त्या गर्दीत होत्या. त्या घोळक्यातून, एखादा कावळा मेल्यावर जसे बाकीचे कावळे झाडावर वर बसून कलकलाट करतात तसा आवाज येत होता. आमच्या आत्याबाई पण त्या घोळक्यात चालत निघाल्या होत्या. तिने एक-दोघींना पकडून काहीतरी कॅसेटपण लावलेली दिसत होती.

पुढे जाताजाता मला बँकेतले करमकर, मराठे बोळातले मराठे, गुळवणी आजोबा, रोज सकाळी फिरायला जाणार्‍यातले कोकाटे, काका नेहेमी लोचट-हरामखोर म्हणतात ते इंजिनियर गोडबोले, माझा एक मोठा चुलत-चुलत भाउ, पुर्वी मिलमध्ये काम करणारे आणि आता श्राद्धाला भिक्षुकी करणारे काळे, कधितरी शाखेत येणारे मोठी दाढीवाले वाटवे, मंगळवार पेठेतली एक मोठी भजनवाल्यांची गँग असे बरेच ओळखीचे लोक दिसले. मागे पालखीच्या बाजुने झांजांचा, अभंगांचा आवाज येउ लागला. पालखी पण निघाली होती म्हणजे. सगळी़कडे भगवे झेंडे, अभंग, झांजा, नमस्कार भरून राहिले होते. भाउंच्या बरोबर रोज फिरायला जाणारे अभ्यंकर मास्तर त्यांच्या नेहेमीच्या जोरदार वेगात आणि त्यापेक्षाही मोठ्या आवाजात 'हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी' असं म्हणत सगळ्यांना मागे टाकुन पुढे निघुन गेले. एव्हडे म्हातारे असुन देखील ते दरवर्षी पंढरपूरला जात होते.

पूल ओलांडला तरी मी पुढे चालत राहिलो. दूर दंडोबाचा डोंगर रस्त्याला समांतर पसरलेला दिसत होता. पूलाखालच्या ओढ्यात मेलेली जनावरं फाडत कावळे कलकलत होते. मधेच एखादा कावळा आतड्याचा तुकडा चोचीत पकडून एकदम खालुन उडत होता नाहीतर एखादा कुत्रा मासांचा तुकडा तोंडात पकडून पळत होता. मी पुढे गेलो तसा मेलेल्या जनावरांचा कुजका वास कमी कमी होत गेला. नेहेमीप्रमाणे माझ्या खिशात क्रिकेटचा रबरी बॉल होता. तो माझ्याबरोबर नेहेमी असायचा. शाळेत, जेवताना, झोपताना, अभ्यास करताना. तसं मला क्रिकेट खेळायला काही फार चांगलं यायचं नाही. बरेचदा मी दोन-चार बॉल मध्येच आउट व्हायचो. आणि प्रत्येक चांगल्या बॉल नंतर एक वाईड बॉल टाकायचो. वाईडला रन असली तर माझ्या ओव्हरमध्ये किमान सहा रन तरी जायच्यात. त्यामुळे मला मॅचच्या वेळी कुणी टीममध्ये खेळायला घेत नसत. फार तर फार फिल्डींग करायला देत असत. पण मी एकटाच बॉल घेउन भरपूर खेळत असे. म्हणजे पळत येउन बॉल टाकायची ऍक्शन करायची, मग लगेच वळुन बॅट्समन व्हायचे आणि शॉट मारायची ऍक्शन करायचो. कधी कधी फिल्डर होवून कॅचपण घ्यायचो. त्यामुळे मी कधी फास्ट बॉलर, कधी लेग स्पिनर, कधी ऑफ स्पिनर, कधी सचिन तेंडुलकर असं सगळं करायचो. आजी भयानक चिडायची मी बॉल घेउन नुसतं अश्या ऍक्शन करत बसलो की. ती म्हणायची, 'भिकेची लक्षणं आहेत'. पण मी तसही तिच्याकडे फार लक्ष द्यायचो नाही. बॉल थोडासा पुढे टाकायचा आणि मग चार पावलं पळत जाउन तो पकडायचा असं करत मी पुढे निघालो.

वीस-एक मिनीटांनी मी फाट्यावर पोचलो. तिथे बाबा आणि दादा टपरीवर चहा पित होते. मी पोचल्यावर दादाने मला पण एक कप चहा आणि पार्लेची बिस्किटं दिली. तसं मला चहा खूप आवडायचा पण घरात मला आजी आणि आई चहा द्यायच्या नाहीत. बाबा कधीकधी रविवारी चहा करायचे सकाळी तेव्हा मला द्यायचे. चहा संपल्यावर आम्ही उठलो. बाबा आणि दादा परत निघाले. मी क्षणभर तिथेच थांबलो आणि बाबांना म्हणालो, 'मला पंढरपूरपर्यंत जायचय वारीबरोबर'. दादा जोरात हसला आणि म्हणाला, "चल घरी. काय टाइमपास आहे काय पंढरपूरपर्यंत जायचं म्हणजे. भोश्याच्या ओढ्याशी जाईपर्यंत दमशील आणि मग रडायला लागशील परत जायचय म्हणुन." मी त्याला काही न बोलता फक्त बाबांकडं एकदा बघितलं आणि म्हणालो, "नाही परतणार मधुन". बाबा एक मिनीट तसेच काही न बोलता उभे राहिले आणि मग एकदम म्हणाले, "ठिक आहे. जा. मी संध्याकाळी पहिल्या मुक्कामाला तुझे कपडे घेउन येतो. जा तू." मी एकदम हुर्रे असं म्हणत उडी मारली आणि दुसर्‍या दिशेला वळुन पळत सुटलो. मागनं मला बाबांचा आवाज ऐकु आला, "कपड्यांशिवाय अजुन काही आणायचं आहे का तुझं?" मी सकाळी नुसत्या स्लीपर घालुन निघालो होतो. स्लीपरवर पंढरपूर गाठणं अवघड होतं. मी मागे न वळताच ओरडलो, "माझे बूट पण घेउन या".

गुलमोहर: 

टण्या,
बर्‍याच दिवसांपासुन तू वारी कधी पुर्ण करतोस याची आतुरतेने वाट पहात (पक्षी- तू ती लवकर पुर्ण करत नाहीस म्हणुन तुला मनातल्या मनात शिव्या देत :-)) होते. वारीचे पहिले २ भाग मला खुपच आवडले होते आणि ते मी अगदी अधाश्यासारखे वाचुन काढले होते, शेवटी केलीस एकदाची पुर्ण त्याबद्दल धन्स. आता मग सगळी परत एकदा सलग वाचुन काढली. छानच जमली आहे आणि आवडली पण खुप. वारी वाचतांना मला मध्ये मध्ये मिलिंद बोकिलांच्या 'शाळा' ची आठवत होत होती.
त.टी. पुढच्या वेळी कथा/कादंबरी पुर्ण करायला एवढा वेळ लावलास तर ते अsज्जिsबात खपवुन घेतले जाणार नाही Proud
नविन त.टी. : ओह टण्या असे आहे का, म्हणजे नायक पुर्ण वारी करणार आहे तर. तु आधीच्या भागाला पुर्वार्ध अंतिम नाव दिलस म्हणुन मला वाटले संपली इथेच कादंबरी. अजुन आहे म्हणजे मजा येईल वाचायला. टण्या वरची तळटीप या वेळी पण लागु आहे बरका :-).

झिरपत गेलं सर्व. पाउस पडून गेल्यागत टवटवीत वाटलं वाचून.
अप्रतिम लेखन.

शंतनू
सुंदर!!!!! कोणीतरी पूर्वी प्रतिसादमध्ये विचारले होते त्याची प्रकर्षाने आठवण झाली. सगळे बेडेकर कोणत्या गिरणीचं पीठ(किस चक्कीका आटा )खातात? खरंच मी सहमत आहे.अप्रतीम कथा. किल्ल्याचं वर्णन ......दळ्प हा शब्द.....सगळं अगदी आमच्या सांगली मिरजेकडचं. तुला माहिती नसेल पण फक्त त्याच भागात हा शब्द वापरतात. बाकी बर्याच भागात दळण ..
असो फार दळण दळत नाही.
वारी चालू राहू दे. आणि लहान मुलाची भाषा...त्याची विचार करण्याची पद्धत .....अप्रतीम.

@रुनी,
वारी पूर्ण नाही केली अजुन. आत्ताशी तर कुठे वारीला सुरुवात झाली आहे..

@एमएमएम३३३, हे दळपाचं माझ्या लक्षात नव्हतं आलं.. माझ्या तोंडात दळप हाच शद्ब आहे.. दळपाचा डबा Happy आणि आमच्या सांगली-मिरजेकडचं नाही, "आपल्या" सांगली-मिरजे कडचं.. Happy

मस्त चालू आहे, आम्ही वाचत आहोत, लिहीत रहा.

टण्या,
झकास लिहिलेस रे! पुढील भाग लवकर टाक आता!

टण्या - तुला शि. सा. न. मस्त लिहितोस. पण लवकर पूर्ण कर बाबा.
रुनि - मलाही मध्येमध्ये (विशेषतः आधीचा भाग वाचताना) 'शाळा' आठवत होतं.

शंतनू, सुंदर. शब्दचित्र म्हणणार होते, पण नुसतं चित्र किंवा चलतचित्रसुद्धा नाही हे. आपण तिथं आहोत, प्रत्यक्ष या घटना, ही दृष्यं, ह्या व्यक्ती पाहतोय, अनुभवतोय असं वाटतंय वाचताना.
लवकर लिही आता पुढचे भाग. Happy
('वारी' चा नुसताच teaser झाला की हा!!) Happy
.
.
जाता जाता: तिसर्‍या भागातला स्लार्ती यांनी उधृत केलेला उतारा वाचून मीही विचारांत पडले होते. इतका अलिप्तपणा - नव्हे, तुटलेपणा, पटकन टोकाला जाणारे विचार, हा ह्याच्या वयाचा परिणाम म्हणायचा की मुळातच स्वभावही असा असेल? की भाऊ (दीर्घ - दीर्घ ऊ! Happy ) हा एकच धागा होता ह्याला 'माणसांच्या जगाशी' बांधून ठेवणारा? का?
- हे अर्थातच कथेवर / पात्रावर judgement नाही. नवीन ओळख झालेल्या माणसाबाबतचं निरीक्षण आणि कुतुहल आहे. Happy
.
.
मॉड्स, या कादंबरीच्या मागच्या पुढच्या भागांची लिंक द्या ना प्रत्येक भागासोबत. म्हणजे ज्याला पहिल्यापासून सलग वाचायचं असेल त्याला सोपं पडेल.

टण्या, सुरेख प्रारंभ आहे, बाकी प्रतिक्रिया आता कादंबरी संपल्यावरच. लवकर लिहा.

नेमस्तक, धन्यवाद.. सगळ्या भागांचा मागचा-पुढचा दुवा दिल्याबद्दल...

@स्वाती, दीर्घ ऊ च बरोबर आहे ग! पण सुरुवातीला दोन-चार परिच्छेदांमध्ये ह्रस्व उ दिला गेला.. आणि ह्या एडिटर मध्ये ctrl+h (शोधा आणि बदला) हा पर्याय नाहिये ना.. म्हणुन मग सगळीकडे ह्रस्वच ठेवले.. बदलतो वेळ मिळाला की...

>>>>>>जाता जाता: तिसर्‍या भागातला स्लार्ती यांनी उधृत केलेला उतारा वाचून मीही विचारांत पडले होते. इतका अलिप्तपणा - नव्हे, तुटलेपणा, पटकन टोकाला जाणारे विचार, हा ह्याच्या वयाचा परिणाम म्हणायचा की मुळातच स्वभावही असा असेल? की भाऊ (दीर्घ - दीर्घ ऊ! ) हा एकच धागा होता ह्याला 'माणसांच्या जगाशी' बांधून ठेवणारा>>>>>>>>>>>
माहिती नाही. कदाचित भाऊंमुळे त्याचा मूळ स्वभावाविरुद्ध तो सगळ्यांशी बांधला गेला होता, आणि आता ते गेल्यावर मूळ स्वभावाने उचल खाल्ली.. किंवा भाऊ जाणे ही घटना अधिक खोलवर परिणाम करुन गेली आहे.. पण मला माहिती नाही नक्की

सही आहे .... सर्व भागान्मधे हा खुपच भावला....!
विकि

फारच सुंदर, सहज, समर्पक,original लिहीताय!! जबरी आवडलं !!!

स्वाती /स्लार्ती- तुमच्या प्रतिक्रिया ही एकदम विचार करायला लावणा-या- मुलांच (मुलग्यांच)वय मोठं अडनिडं असतं खरंच, एकदम "लंपन " चा "उंदिर मारणारा पांडुरंग सांगवीकर" करून टाकतं नाही ?!!!..

अतिशय सुरेख! स्लार्टी/स्वातीला अनुमोदन.

"लंपन " चा "उंदिर मारणारा पांडुरंग सांगवीकर"
>>>>>>>
हे आवडलं रैना Happy
ताकदीचे लेखक, सांगवीकरचा चांगदेव पाटील पण बनवतात पुढे (आठवा बिढार, जरीला, झूल)

मायबोलीवर अजुनही सांगवीकरला आठवणारे लोक आहेत हे वाचुन मनापासून आनंद झाला.. एकेकाळी साहित्यिक-कवींचा बीबी ओसंडून वाहात असायचा.. आजकाल तिथे स्मशानशांतता असते..

टण्या .. झकास ..फार फार फार आवडलं .. बरेच दिवस वाट पाहिल्यावर अचानक २ नविन भाग .. मस्त वाटलं वाचायला

टण्या,
खूपच छान ...बरेच दिवस वाट पाहिल्याच सार्थक झाल!

टण्ण्या,
मस्तच छान लिहीतोस.
खुप आवडलं, अगदी पहिल्यापासुन.
अनघा

शंतनू, अरे वारी उद्या पूण्यात येतेय. तू अजुन मिरजेतच.. लवकर निघुदे पंढरपूरच्या दिशेने... खुप छान लिहितोयेस..

Lol हेहेहे.. मी कर्तिकीच्या वारीबद्दल लिहितोय.. तिला वेळ आहे अजुन Happy उद्या आषाढीची वारी येतेय पुण्यात...

म्हणजे पहा, कार्तिकी होउन गेली आणि आता आषाढी आली. आता येऊ दे की राव पुढचे.... जरा गम्मत हं.. लवकर लिही...

टण्या..
अगदी मला आवडतं तसं साधं, सोपं, सुटसुटीत तरीही आतपर्यंत पोचणारं लिखाण.. लगे रहो.. आम्ही वाचत आहोतच..

अरेच्च्या... इथे पहिल्यांदाच आलो... पण सगळे भाग एकदम वाचुन काढले... सुरेख रे टण्या, आपल्या मिरजेचे नाव राखलेस... Happy

छान लिहिलय, पुढच येवुद्यात!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

मस्तच लिहीलय!!

तुझ्या वारी चा हा भाग तर फारच छान झालाय.
मी या भागात एकदमच रन्गून गेलो.
अप्रतिम.

मस्त! आपणच वारीला निघाल्यासारखं वाटतं.

शरद
.............................
"मैं क्यों उसको फोन करूं?
उसके भी तो इल्म में होगा; कल शब, मौसमकी पहली बारिश थी!" 'परवीन शाकर'
............................