केरळ डायरी - भाग ७

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

भाग १ - http://www.maayboli.com/node/22402
भाग २ - http://www.maayboli.com/node/25445
भाग ३ - http://www.maayboli.com/node/25476
मधले भाग अजुन लिहायचे आहेत.

मुक्काम थेक्कडी.

थेक्कडी कोट्टयम पासुन ११५ कि.मी. अंतरावर आहे. माझा मुळ प्लान दुपारी ३-३:३० ला निघुन ६ ते ७ च्या दरम्यान पोचायचा होता. पण माझी राहण्याची व्यवस्था अभयारण्यातच असलेल्या अरण्यनिवास या ठिकाणी केली होती आणि संध्याकाळी ६ ते सकाळी ६ त्यांचा कर्फ्यु असतो. ६ नंतर पोचलात तर प्रवेशाला मनाई. आणि केरळच्या या 'हाय-रेंज' मध्ये ताशी ३० कि.मी. वर अपेक्षा करायची नाही - रस्ते चिंचोळे, वळणावळणांचे व वरखाली. म्हणुन मग १:३० वाजता या भारतवारी पुरता कोट्टयमला शेवटचा रामराम ठोकुन निघालो टॅक्सीने. मजल-दरमजल करत त्या घाटाच्या रस्त्याने गाडी ५:१५ ला क्युमिलीला पोचली. केरळी लोक क्युमिली, थेक्कडी व पेरीअर/पेरीयर ही तिन्ही नावे या प्रदेशाकरता वापरतात. क्युमिली छोटेसे गाव आहे अभयारण्याच्या वेशीवर. पेरीयर हे अभयारण्याचे तसेच ब्रिटिशांनी बांधलेल्या तिथल्या तलावाचे नाव आहे, तर थेक्कडी जिथुन तलावावर विहाराकरता बोटी सुटतात त्या भागाचे.
sP1281926.jpg

क्युमिलीला, थेक्कडीच्या रस्त्यावर ईको-टुरिझमचे कार्यालय आहे जंगलातील विविध अॅक्टिविटीज ची तिकिटे येथुनच घ्यावी लागतात. मला पक्षिनिरिक्षणात स्वारस्य असल्याने दुसऱ्या दिवशीचे सकाळचे बुकींग मी केले. ७-१०, ८०० रुपये (५ लोकांना जाता येते, पुर्ण ग्रुपचे ८०० रुपये). मला माहीत असलेल्या गाईड बद्दल विचारता तो उपलब्ध असल्याचे कळले. तसे हे सर्वच गाईड्स आसपासच्या आदिवासी जमातींचे असतात व आपल्या कामात तज्ञ असतात. त्या कार्यालयापासुन थोड्याच अंतरावर अभयारण्याचे प्रवेशद्वार आहे. तिथे आमचे व गाडीचे (व एनव्हॉयरनमेंट टॅक्स का तसेच काही) पैसे भरुन ६ च्या किंचीत आधी शिरलो आम्ही आत. (तुमच्या प्रवेशाची रिसीट सांभाळुन ठेवा - बोट-ट्रीप करता ती दाखवणे अनिवार्य आहे). लगेच 'वाघांची टेरिटरी', 'वाहने हळु हाका' व त्याचबरोबर 'नो हॉर्न' या धर्तीच्या पाट्या सुरु झाल्या. वेशीवर मात्र एका मंदिराच्या मोट्ठ्या हॉर्नमधुन केवळ बहिऱ्यांना किंवा देवालाच कर्णमधुर वाटु शकेल असे काहितरी ऐकु येत होते.

अरण्यनिवासात शिरता शिरता अरण्याची घनता जाणवत होती. चेक-ईन करतांना व्यु वाली खोली मागायला विसरलो नाही. १० खोल्यांना जंगलाच्या दिशेने एक-एक काचेची भिंत आहे. त्यातली एक मिळाली (या खोल्यांचे क्रमांक बहुदा १०९, १११, ..., ११७, २०९, ..., २१७ असे आहेत). त्या काचेतुन बाहेर बागडणारी मोठी काळी माकडे दिसत होती (lion-tailed Macaques). अजुन थोडावेळच संधीप्रकाश टिकणार असल्याने त्यांना बाहेर जाऊनच पाहु असे ठरवुन पटकन बाहेर पडलो. अरण्यनिवासाभोवती एक गोलाकार रस्ता आहे. त्याभोवती एक मोठा खंदक आहे ज्यामुळे हत्ती, वाघ वगैरे आत शिरु शकत नाहीत. पण जंगली डुकरे मात्र आरामात फीरत असतात. बाहेर पडताच एक कळप दिसल्यावर मी खुश झालो. अॅस्टेरिक्स लगेच आठवला. पण यांना पळवायला ओबेलिक्सची आवश्यकता नसते. दुसऱ्या दिवशीपर्यंत मात्र मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलो होतो. पक्षांचे आवाज येत होते, पण या डुकरांप्रमाणेच ती माकडे पण आसपास सततच असतात हे माहीत नसल्याने मी आधी त्यांच्यामागे गेलो. अंधार असल्याने फोटो काही निट घेता नाही आले, पण त्यांच्या लिलांचा आनंद घेता आला.

sP1010287.jpgsP1010130.jpg

चक्कर पुर्ण करुन परततो तर अरण्यनिवासजवळ पन्नाशीतील एक ब्रिटीश जोडपे भेटले. सुर्यास्त झालेला होता आणि हे दोघे एका झाडाकडे टक लावुन पहात होते. उडणाऱ्या खारीची ते वाट पहात होते. त्या झाडावर ती राहते असे त्यांना सांगण्यात आले होते. मी ही थांबलो थोडावेळ. आत अभयारण्यावरील चित्रफितीची मात्र नांदी होताच मी आत गेलो. अमेरिकेतील राष्ट्रीय उद्यानांना भेटी देतो तेंव्हा अशा चित्रफिती आवर्जुन पाहतो. त्यातुन बरेच काही कळते. ही पण चांगली होती, पण काही सिक्वेन्सेस जरा अर्धवट वाटले. ती संपता संपता ते जोडपे हात हलवत परतले. (दुसर्या दिवशी इतर गोष्टी आटोपल्यावर सुर्यास्ताच्यावेळेस खास काही करायचे नसल्याने मी ही पुन्हा एक चक्कर मारुन त्या झाडाजवळ घुटमळत थांबलो. अनेक वर्षांपुर्वी अशा खारींनी भिमाशंकरला आम्हाला हुलकावणी दिली होती. कॅमेरा व दुर्बीण ही अवजारे बरोबर होतीच, पण नाहिशा होणाऱ्या प्रकाशात त्यांचा फार उपयोग होणार नव्हता. जंगली मैना लहान मुलांच्या रडण्यासारखे आवाज काढुन काय साधत होत्या कुणास ठाऊक. साधारण अर्ध्यातासाने त्या झाडावर थोडी हालचाल दिसली. काहितरी अवर्णनीय दोन-एक फुट वर सरकले, मग पुन्हा शांतता. आसपासची वर्दळ कमी झालेली होती. एक शिपायी आणि गप्पा मारणारे एक-दोघे. १० मिनिटांनी पुन्हा थोडी हालचाल. माझी उत्कंठा वाढली होती. आणि आणखीन पाच मिनिटांनी अचानक हात व पायंमधील वेबींग पसरवत ती खार ग्लाईड करत दुसर्या झाडाकडे निघाली! लक्ष नसलेल्या आजुबाजुच्या लोकांनाही कळावे म्हणुन वर बोट दाखवत मी 'फ्लाईग स्क्वीरल' असे ओरडत जरी नाही तरी जोरात म्हणालो. तिथेच रहात असलेल्या शिपायाला ते फार काही नवे नसावे. तेंव्हाच बाहेरून परतत असलेल्या प्रेमी युगलाला माझ्या तासाभाराच्या तपश्चर्येची कल्पना नव्हती आणि आत शिरता-शिरताच ती खार दिसल्याने त्यांनाही ती नेहमीचीच असावी असे वाटले असल्यास नवल नाही. या मोठ्या उडत्या खारीव्यतिरीक्त या विभागात नामशेष होत आलेली छोटी त्रवणकोर उडती खार पण राहते, पण ती अर्थातच दिसायला अजुनच दुर्मीळ आहे. फक्त रात्री दिसणारा तो प्राणी पाहुन मी मात्र खुष झालो. खार ज्या झाडाकडे गेली होती तिकडे गेलो आणि जिथे गेली असे वाटले तिथला अंधारातच एक फोटो काढला आणि चक्क दोन मिनिटांनी तिथुन ती ग्लाईड होत नाहिशी झालेली पुन्हा पाहता आली. पाहणे पुरेसे नसते. फोटोही नव्हता. परत जाऊन केवळ लॉबीत असलेल्या ईटरनेटवर मेल चेक करत आधी ती खार दिसल्याचे मार्क झुकरबर्गच्या पुस्तकी नोंदवले.)

sP1010136.jpg
मैना

sP1010140.jpg
उडत्या खारीचा येवढाच अंधुक पुरावा माझ्याजवळ आहे.

भाग ८: http://www.maayboli.com/node/23702
भाग ९: http://www.maayboli.com/node/23781

विषय: 

छान!
अरण्यनिवासात इंटरनेट!!
भिमाशंकरला flying squirrel असते की Giant Squirrel ? का दोन्ही एकच?
मी भिमाशंकरला बाईकवर गेलो होतो तेंव्हा रस्त्याच्या एका बाजुच्या झाडावरुन दुसरीकडे काहितरी गेलेलं दिसलं तर ही शेकरु होती... ती उडत गेली की उडी मारुन ते मला कळलं नाही!! पण अंदाजे फोटो काढला (हेलमेट काढायला वेळ नव्हता)...

अरण्य निवास जबरी दिसतो.
पण नाहिशा होणाऱ्या प्रकाशात त्यांचा फार उपयोग होणार नव्हता. जंगली मैना लहान मुलांच्या रडण्यासारखे आवाज काढुन काय साधत होत्या कुणास ठाऊक. साधारण अर्ध्यातासाने त्या झाडावर थोडी हालचाल दिसली. काहितरी अवर्णनीय दोन-एक फुट वर सरकले, मग पुन्हा शांतता. आसपासची वर्दळ कमी झालेली होती. एक शिपायी आणि गप्पा मारणारे एक-दोघे. १० मिनिटांनी पुन्हा थोडी हालचाल. माझी उत्कंठा वाढली होती.>>ते संध्याकाळीचे वर्णन अगदी नारायण धारप स्टाइल झाले आहे. दिवे घ्या हं

अश्या ठिकाणी हिरवाईचा एक वास काय मस्त येतो नाहीका.