आजारपणात घेण्यायोग्य आहार

Submitted by प्रज्ञा९ on 12 February, 2011 - 12:04

गेल्या आठवड्यात माझा नवरा ताप, कॉन्स्टिपेशन आणि पित्त, घशाला इन्फेक्शन अशा त्रासाने आजारी पडला. २-३ रात्री सलग जागरण (पहाटेपर्यंत) करून केलेलं ऑफिसवर्क, सतत बदलणारी हवा, जेवणाच्या थोड्या बदललेल्या वेळा...
ऑफिसमधे गुरुवारी सकाळपासून अखंड उचकी, त्यामुळी जास्ती प्यायलं गेलेलं पाणी, मग भूक न लागणं आणि सन्ध्याकाळपर्यंत घसा खवखवणं, थोडी कणकण असं सगळं सुरु होऊन तो घरी आला तेव्हा प्रचंड थकलेला दिसत होता. शुक्रवारपासून तापच आला.

मग औषधं वगैरे होतीच, पण या काळात त्याला योग्य जेवण देणं महत्त्वाचं होतं. पित्तामुळे थोडं फिकं, घशाला आराम पडेल असं लिक्विड जास्त, आणि कॉन्स्टिपेशन वर उपाय होईल असं...
मी स्वयंपाकात आता अगदी नवशिकी नसले, तरी पूर्ण अनुभवी वगैरे नाही. त्यात लग्नानंतरच्या वर्षभरात हे पहिलंच आजरपण. त्यामुळे आजारी पडल्यावर नवर्‍याच्या खाण्याच्या सवयी आणि आजरपणात काय करू याबद्दल सासुबाईंनी फोनवरून खूप माहिती दिली. ती इथे शेअर करायची म्हणून हा लेखनप्रपंच. माझ्यासारख्या मुलींना उपयोगी होईल अशी आशा. शिवाय इथे अजून नवी भर पडेलच.

पचायला हलकं ही माझी पहिली अट होती. त्यानुसार..
१. मूडाखि आणि कमी आंबट सोलकढी. आमसुलं उकळत्या पाण्यात भिजवून त्याचा कोळ काढायचा. नारळांचं पातळ दूध (जास्त खोबर्‍यामुळे घशाला त्रास नको म्हणून पातळ) घेऊन त्यात तो कोळ घालायचा. चवीसाठी मीठ आणि साखर घालून ढवळायचं, आणि तूप-जिरं-कढीपत्ता-आणि मिरचीची फोडणी वरून द्यायची. नीट ढवळून मग एक उकळी आणायची.
२. मऊ गुरगुट्या भात आणि मिश्र डाळींची आमटी. मूग, मसूर आणि अगदी चवीसाठी १ चमचा तूरडाळ (पित्त वाढू नये म्हणून कमी तूरडाळ) असं शिजवून, लसूण घालून फोडणी. बाकी काळा मसाला वगैरे नेहेमीसारखं. हवं असेल तर कांदा, टोमॅटो, लाल भोपळा यातली एखादी भाजी.
३. कच्ची कोशिंबीर. टोमॅटो-कांदा, गाजर वगैरे काहीही. शक्यतो फोडणी, दाण्याचं कूट, दही न घालता. किंवा अगदी कमी कूट घालून.
४. फुलके आणि भाजी. पालेभाज्या, पत्ताकोबी, लाल भोपळा, दुधी भोपळा, फरसबी, पडवळ यातली कोणतीही भाजी. किंवा मूग उसळ, मूगडाळ भिजवून त्याची परतलेली डाळ इ.
५. मधल्या खाण्यात कमी दुधाची रव्याची किंवा शेवयांची खीर. घसा दुखत असल्यामुळे कमी दुधातली तवकीलाची कोमट पेज, वरून २ थेंब तूप टाकून, मऊ उपमा, ज्वारीच्या लाह्या थोडं तूप-मीठ-जिरं-हळद लाऊन गरम भाजून.
६. मुगाचं कढण. हिरवे मुग तपकिरी रंगावर भाजून घ्यायचे. मग ८ पट पाणी घेऊन शिजत ठेवायचे. शिजत आल्यावर जिरं घालायचं. थोडं जास्ती घातलं तरी छान लागतं. पूर्ण शिजले की गाळून घेऊन मीठ आणि अगदी चिमूटभर साखर घालायची. वर थोडं तूप घालून सूपसारखं प्यायचं. दाट हवं तर आरारूट लावायचं.
७. अनेक प्रकारचे धिरडी. मूगाच्याडाळीच्या पिठीची, अख्ख्या मुगाच्या पीठीची, तांदळाची, किंवा पिठांचं कॉम्बिनेशन करून वगैरे. (मी जास्त नाही केली धिरडी)

(या खाण्यापिण्याच्या बाबतीत मला घरून मार्गदर्शन होतंच. तवकीलाच्या बाबतीत दिनेशदा, आर्च यांनी माहिती दिली.)

कॉन्स्टिपेशन वर उपाय म्हणून-
१. मनुकांचं पाणी.
२. गरम पाण्यात किंवा दुधात तूप घालून ते पिणे.
३. भरपूर लिक्विड आणि भाज्या आहारात असणे.
४. Prunes चं ज्यूस किंवा नुसते २ Prunes गरम पाण्यातून घेणे.
५. गरज लागली तर इसबगोल, त्रिफळाचूर्ण, किंवा Laxatives.
मी कायमचूर्ण वगैरे दिलं नाही कारण अशक्तपणा असल्यामुळे ते खूप हेवी होऊ शकलं असतं.

घसा बरा होण्यासाठी-
गरम पाण्याने गुळण्या. त्यात मीठ, किंचीत हळद, थोडी जेष्ठमध पावडर.
आणि तूप, जे.म., खडीसाखर किंवा मध, तूप, खडीसाखर याचं चाटण.

तापातून उठल्यावर लवकर ताकद भरून निघावी म्हणून मूग लाडू उत्तम. शिवाय रोजचा आहार आहेच.

खरंतर हे आपल्या रोजच्या आहरातलेच पदार्थ आहेत. नवीन काही नाहिये यात. पण हे एकत्र कुठेतरी मिळावं, आणि अजून काही चांगले ऑप्शन्स मिळावेत म्हणून हा धागा उघडला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तूप मेतकुट भात आणि पापड. आत्ता आजारी पडलेले तेव्हा खाल्ला आणि खूप बर वाटल.
मूगाच्या डाळीची खिचडी नेह्मीच चांगली लागते.

दुधी, तांबडा भोपळा, पालक इ. ची सूप्स. जाडसरपणा येण्यासाठी थोडं तांदळाचं पीठ लावायचं. त्यात हवं असल्यास आले किसून, मीठ, मिरपूड.

हो अकु, मी पालक सूप केलं होतं.
आजच अख्ख्या मुगाच्या पिठात थोडं तांदळाचं पीठ मिसळून धिरडी घातली. त्यात तिखट, मीठ, किंचित धने-जिरे पूड, चिमूटभर काळा मसाला, वासापुरती थोडी लसूण किसून, ओवा, तीळ आणि कडकडीत तेलाचं मोहन. बरोबर लिंबू लोणचं. मस्त नाश्ता!!

कॉन्स्टिपेशन वर अजून एक उपाय सुचवते. किवी हे फळ कॉन्स्टिपेशन वर अतिशय उपयोगी आहे. फक्त पिकलेलं किवी खावं. कच्चं किवी अतिशय आंबट असतं.

कफ होणार नाही अशा बेताने खाता येतील अशी फळं कोणती?
पपई, सफरचंद वगैरे असतातच, अजून कोणतं फळ खाता येइल मधल्या वेळी?

पित्ताने पचनक्रियेवर सारखा ताण येत असेल तर पचायला हलके आणखी पर्याय सुचवा. मुडाखी आणि मुग एके मुग विथ दुधी,दोडका इ. खाऊन बोअर झालं आहे. टॉमेटो, लिंबु,मिरची हे काही महिने तरी झेपणार नाही.

पित्ताने ताण येऊ नये म्हणून खाऊ शकणाऱ्या पदार्थांत गोडाचा शिरा, जिरे - हिंगाची सौम्य फोडणी करून त्यात भाजलेला जाडा रवा - पाणी - मीठ - साखर घालून बनवलेला मिठाचा उपमा, दह्यांतली रायती (काकडी, दुधी, लाल भोपळा, पालक, चंदनबटवा, दोडका, पडवळ वगैरे) हे खाण्यासाठी. कढी, लिंबाचे सरबत, आवळा सरबत, आमसुलाचे वा कोकमाचे सार - सरबत, ताकात किंचित हिंग व चिमूटभर साखर घालून पिणे, हे पेयप्रकार.रसगुल्ले ट्राय करायला हरकत नाहीत, पण पचायला हलके नाहीत ते. आठपट किंवा बारापट पाण्यातला, तांदूळ भाजून व तूप जि.ऱ्याची फोडणी दिलेला भात. नाचणी सत्त्व पाण्यात शिजवून त्यात चवीनुसार मीठ, ताक, कोथिंबिर घालून. नुसते मीठ घालूनही शिजवलेली ही गंजी खातात लोक. चवीला आमसूलही घालता येते. भेंडीचे दह्यातले रायते. ताकातला पालक / चाकवत भाजी. ताकभात. श्रावण घेवडा चिरून, उकडून त्यांत मीठ, साखर, लिंबाचा रस व वरून किंचित फोडणी गार करून घालून कोशिंबिरीप्रमाणे.

लिंबू चालणार नाही हे आत्ताच वाचले. परंतु माझ्या अनुभवात लिंबू हे पित्तशामक आहे.

खिरीच्या कन्सिस्टन्सीची खिचडी किंवा लापशी (तिखट) करायला पाण्याचं प्रमाण काय ठेवायचं? मी काहीही केलं तरी शेवटी शिर्‍याची (फारतर अगदी मऊ , न चावता सरळ गिळावा असा शिरा) कन्सिस्टन्सीच येतेय.
गुजरात्यांत फाडा म्हणजे ब्रोकन व्हीटची गोड लापशी करतात, तशी तिखट कोणी करून पाहिलीय का?
आजारी व्यक्तीला कोरडं काहीही खाववत नाहीए. भात शक्यतो नकोय. नुसतं लिक्विड डाएट चालणार नाही कारण पोट भरत नाही. आमच्याकडची डाळही(वरण) घट्टच असते. ती चपातीशी खायला (रादर चपातीचे तुकडे तिच्यात टाकून खायला पातळ तरीही पुरेशी दाट कशी करायची? कुकरमधून काढल्यावर एका माणसापुरतं वेगळं काढून त्यात गरम पाणी घालून घोटून घेतोय. यात चवीला काय घालता येईल. वरणात हिंग, हळद, मिठाशिवाय काहीही नसतं.

कांदा- टॉमॅटो - आलं- लसणाची फोडणी चालत असल्यास तुपात करू शकता.
आमच्याकडे मुग- मसूर डाळ शिजवून तिला तुपात तडका देतात कां- टॉ- आलं- लसूण चिरून घालून. त्यात धण्याची पुड आणि हवे असल्यास किंचित गरम मसाला किंवा किचन किंग मसाला आणि वरून भरपूर कोथिंबीर.
यात चपाती कुस्करून छान लागते.
चवीत बदल हवा असल्यास वरणाला तुपात फक्त लसूण- खोबरं ठेचून त्याची फोडणी घालता येईल. हवे तर यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. मसाले चालत असतिल तर किंचीत गोडा मसाला आणि गुळ अमसूल घालता येईल.
पातळ करण्यासाठी नंतर हवे तितके गरम पाणी घालून उकळी आणायची.

तिखट पातळ दलिया करतात कि. तुपात हिंग- जीऱ्याची फोडणी घालून दलिया भाजायचा आणि शिजवायचा.
पाण्याचे प्रमाण मला पण जमत नाही. मी शिजल्यावर गरम पाणी घालून हवी तितकी कंसिस्टंसी ठेवते आणि उकळून घेते.
तुप- जीरे- हिंग आणि हिरवी मिरचीचे तुकडे घालून रव्याची लापशी पण छान लागते.

दलिया च्या खिचडीची पण एक रेसेपी इथे लिहिलिये मी.

थँक्स अल्पना.
आमच्याकडे दलिया कधी वापरलेला नाही. रेसिपी बघतो.

चपातीशी खायला (रादर चपातीचे तुकडे तिच्यात टाकून खायला पातळ तरीही पुरेशी दाट कशी करायची? >>>>> शिजलेल्या लापशीतील थोडी लापशी, मिक्सरमधून काढायची आणि परत सर्व एकत्र शिजवायचे.लापशी रव्याची खीर करताना मी असे करते.टेक्श्चर मस्त येते.
यात चवीला काय घालता येईल. वरणात हिंग, हळद, मिठाशिवाय काहीही नसतं.>>>>> अल्पनांनी म्हटल्याप्रमाणे फोड॑णी देऊन किंवा थोडे जिरे+थोडेसे ओल्या खोबर्‍याबरोबर वाटून मिक्स करणे.आमच्याकडे ,जिर्‍याखोबर्‍याचे वरण कधीतरी असते.

भरत,
डाळीला पंचफोडणची फोडणी देवून पण छान चव येते. मी तेलावर पंच फोडण, हिंग, हिरवी मिरची फोडणी करते आणि त्यात एक कप पाणी घालून उकळी आणते ( बडिशोप, कलौंजीचा स्वाद पाण्यात उतरतो). त्यातच हळद, बारीक चिरलेला टोमॅटोही घालते. उकळी आली की घोटलेली डाळ घालते. चवी नुसार मीठ. वरुन लिंबू पिळायचे. पोळीसोबत गरम गरम छान लागते. त्यातच आवडत असेल तर फरसबीच्या शेंगा, वाफवलेलादुधी,/लाल भोपळ्याचे तुकडे असे घालायचे.
भात नको असेल पण खयला मऊ हवे असेल नाचणीच्या इडल्या करता येतील. पौष्टीकही आणि अजिबात जळजळत नाहीत.
http://www.aayisrecipes.com/breakfast-or-snacks/ragi-idli/
सोबत बेल पेपरची चटणी , भरपूर अ‍ॅण्टीऑक्सिडंट मिळतील .

डाळ शिजवताना,त्यात थोडा कांदा,टॉमेटो घाला.तुपावर राईजिर्‍याची फोडणी करायची.त्यात २-३ लसूण,२ ओली मिरची,कोथिंबीर यांचे वाटण घालायचे.वरून लिंबू पिळायचे.

मसुरीच्या डाळीची आमटी अशीच करतो. कुकरमध्ये शिजवलेली डाळ फोडणी करून त्यात परतलेल्या कांदा टमाटोसोबत थोडी शिजवतो.
काल कन्सिस्टनी जमलीय. पण प्रमाण बरंच जास्त झालं. त्यामुळे आजार्‍यासाठी केलेला पदार्थ इतरांनाही खावा लागणार आहे.
लापसी रवा आणलाय. आज त्याच्यावर प्रयोग.
सगळ्यांचे आभार Happy

आल्याचा रस आणि लिम्बू पिळून केलेली आमटी सुरेख लागते. जिर्‍याची फोडणी दिलेल्या वरणात पण चांगले लागेल अस वाटतय.

कुकरमधून काढल्यावर एका माणसापुरतं वेगळं काढून त्यात गरम पाणी घालून घोटून घेतोय. यात चवीला काय घालता येईल. वरणात हिंग, हळद, मिठाशिवाय काहीही नसतं. >>

कोकणी मंडळी डाळी तोय ( डाळीचे पाणी )* नावाचा पदार्थ करतात. नेहमी डाळ शिजवायला जेवढं पाणी घालाल त्याच्या दुप्पट पाणी घालून डाळ शिजवायची . मग एका पातेल्यात डाळ, मीठ, उभी चिरलेली हि मिरची, थोडे आल्याचे तुकडे , आणि एक चमचा भर ओले खोबरे घालून, लागल्यास अजून थोडे पाणी घालून उकळायचे. मग तुपात मोहरी , कढीपत्ता, सुकी मिरची , हिंग, हळद याची फोडणी करायची लोखण्डी पळीत. ती फोडणी उकळत्या डाळीत ओतायची. पळी एक दोनदा बुडवायची - चांगला चुर्र आवाज आला पाहिजे. लगेच डाळीला झाकण लावायचे . गरम भात , उकड्या तांदळाची पेज याच्या बरोबर ओरपायचे.

खडा हिंङ असेल तर मुगाच्या डाळी एवढा तुकडा फोडणीत फुलवून घालता येतो. डाळीत घालायच्या आधी नीट चुरडून घ्यावा.
काही लोक टॉमेटो + कोथिंबीर पण डाळीबरोबर उकळून घेतात

* पहिल्या नॉन कोकणी जावयाने ' डाल कहते हैं. हमने छलांग तक लगा ली कटोरीमें, लेकिन डाल तो नजर नहीं आई' म्हणलेले. त्याचे किस्से अजून सांगतात ज्ये ना.

अजुन एक पदार्थ म्हणजे जिरं मिर्‍याची कढी. ओलं खोबरं जिरे आणि मिरे बारीक वाटायचे. थोडं पाणी आणि मीठ घालून मंड आचेवर उकळायचे. उकळी आली की तुपात जिर्‍याची फोडणी द्यायची. जास्त वेळ उकळायची नाही