पोथडी व तो

Submitted by राज जैन on 4 February, 2011 - 05:29

तंद्रीभंग पावल्यावर, त्यांने इकडे-तिकडे पाहिले. हातातील वही त्यांने बाजूला ठेवली, सर्वत्र एक प्रकारची निरव शांतता पसरली होती. निरवपेक्षा भयाण हा शब्द शोभेल. समोर समुद्र गरजत होता, दुपारभर तळपत असलेला सुर्य थोडा सुस्तावला होता. हलकेच हसला देखील असावा, त्यांने मान इकडे तिकडे हलकेच हलवली, हलका चेहरा दिसला पण ओळख पटली नाही. कितीवेळ बसला होता कोण जाणे, वेळेचा हिशोब करणे शक्यतो त्यांने सोडून दिले होते, फाटके चप्पल, अस्ताव्यस्त कपडे, वाढलेली दाढी, न विंचरलेले केस, समोर पडलेले विडीचे थुटके हे सर्व साक्ष देत होते. तसाच उठला, समोर मावळत्या सुर्याला त्यांने भक्तीभावाने नमस्कार केला व समोर चालू लागला, दिशाहीन.

तो जेथे बसला होता तेथे मी गेलो, समोर वाळूवर असंख्य रेघोट्या मारलेल्या दिसल्या, ज्या दगडाला तो टेकून बसला होता तेथेच अस्ताव्यस्त पडलेली एक, फाटकी, मळलेली व कधीतरी अशीच पाण्यात भिजलेली डायरी. डायरी, नाही शोधून शोधून मोकळ्या, रिकाम्या वहीच्या पानांना सुई-दोर्‍याने शिवलेली ती पोथडी. मी झटकन उचलली व त्याला शोधू लागलो. नजर भिरभिरली पण समोर समुद्र काठावर कोणीच दिसले नाही, मी थोडे पुढे जाऊन पहावे म्हणून चार-पाऊले पुढे गेलो, पण कुठे साधे चिटपाखरु देखील दिसले नाही. अरे हा सरळ समुद्रात तर चालत गेला नाही ना? स्वतःच हसलो. तसा ही हा समुद्र किनारा निर्मनुष्यच असतो. कधी कधी एखादा चुकून भटकत येतो, सौंदर्य पाहतो व निघून जातो, कोणास काही न बोलता. असाच कोणी तरी असावा वेडा तो. असा विचार करत मी पोथडीची काही पानं फिरवली, अक्षरे रेखीव, कोरीव अथवा सुंदर नव्हती पण वाचू शकत होतो.

थोडी ओळखीची देखील वाटली. पण होतं असे कधी कधी म्हणून डोक्यातून तो विचार काढला व पोथडी वाचायला घेतली. वाचू नये म्हणतात, इतरांची डायरी पण हव्यास म्हणा अथवा तो कोण हे जाणून घेण्याची अतीव उत्सुकता. मी ती वाचावयला घेतली, तेथेच बसलो जेथे तो बसला होता. खिश्यातील बिडी बंड्डल काढलं व एक बिडी शिलगावली.

जिवनाची गणिते चुकलेल्या माणसाची वणवण व स्वतःच्या चुकांचे अथवा इतरांच्या चुकांचे परिणाम स्वतः भोगलेल्या एका निष्पाप जिवाची ती पोथडी. निष्पाप ? हो, प्रत्येकाच्या नजरेने समोरचा कसा दिसत असेल हे कोण सांगू शकतं. जो मला निष्पाप वाटला, तो एखाद्याला निर्दयी वाटू शकतो अथवा जे मला पुण्य वाटतं ते एखाद्यासाठी पाप असू शकते ना. जाऊ दे, आपला विषय तो नाही. एखादी कोरीव मुर्तीमध्ये कोणला देव दिसेल व कोणाला दगड हे पाहणार्‍यावर सोडू आपण.

मी जसे जसे वाचू लागलो तसे तसे कळू लागले की खूपच साम्य आहे त्याच्यात व माझ्यात. तेच जगणे, तेच भोगणे व तीच अवस्था. सगळेच सारखे. ही पोथडी त्यांने लिहली की मी असा प्रश्न पडावा स्वतःला इतके साम्य. वाचता वाचता बाजूला पडलेली ती काडी हाती कधी आली व समोरच्या वाळूवर रेघोट्या कधी मारु लागलो कळलेच नाही. स्वतःशीच हसलो व पुन्हा वाचण्यात गुंग झालो.

बीड्यावर बिड्या फुकत होतो, एका हातात ती पोतडी ! बिडी संपली की, समोर वाळूवर रेघोट्या मारनं सुरु. कितीतरी वेळ गेला. समुद्र गर्जनेचा आवाज वाढत चालला होता, समोर अंधार पडायला सुरवात झालेली आहे हे बोचर्‍या वार्‍यामुळे कळत होते. पोथडी बंद करावी असे वाटतं नव्हतं, पण अंधारात वाचण्यासाठी माझे डोळे सरावलेले नव्हते. जेथे होतो तेथेच पोथडी बंद केली व जेथे पर्यंत होतो तेथे तेथे हातातील तीच काडी ठेवून पोथडी बंद केली. पोथडी बाजूला ठेवली व तेथेच डोळे मिटून शांत पडून राहिलो.

दोघांच्या जिवनामध्ये एवढे साम्य कसे असू शकते, हा विचार सारखा सारखा तरळत होता. आपल्या सारखी सामान्य माणसं, ठरवून जगत नाहीत, किंवा दोन चेहरे घेऊन वावरत नाहीत. शब्दाला शब्द देताना देखील एकादं क्षण विचार करतात. येथे तर जिवन प्रवास सरळ चालू होता, दोघांचा एकसारखाचं ! जसे माझे जिवन तो आधी जगला व आता मी जगत आहे. तेच क्षण, तोच आनंद, तेच दुखः, तोच दुरावा व तीच मुक्तीची आस !

असे कसे शक्य आहे ? भास होत असतील मला. मी कुठे एवढा शिकला सवरलेला, उच्चभ्रु नसलो तरीपण लवकरच उच्चभ्रु मध्ये नक्की गणला जाणारा, माझे घर, माझी गाडी, माझे सर्वकाही ह्यांची साक्ष देत आहेत. तो कोण कुठला, व मी एवढा मोठा अभियंता कुठे दैव व देवामध्ये फसु लागलो आहे ते पण एका भिकार्‍यासाठी ? असल्या चार गोष्टीत साम्य म्हणून काय झाले, कष्टावर पुढे आलो आहे मी, पण कष्ट करुनच तो देखील पुढ आलेला होता, तो देखील आपल्या सारखंच घरदार गाडी बाळगून होता, त्यांची पोथडी ह्यांची साक्ष देत होतीच ना ? डोके सुन्न होत होते.

छ्या, कुठे अवदसा झाली व डायरी वाचायला घेतली त्या भिकार्‍याची. संध्याकाळ बेक्कार झाली, मस्तपैकी शिवास नाहीतर गेला बाजार सिग्नेचर, रॉयल स्टॅग मारत मस्तपैकी टिव्ही पाहत बसलो असतो पण आलो येथे समुद्र किनार्‍यावर. माझे अनेक मित्र मला म्हणायचे तु समुद्र वेडा झाला आहेस, तुला समुद्राचा खोलपणा, उथळपणा व वेडेपणा प्रमाणाबाहेर आवडतो. जिवानात झालेल्या काही गोंधळामुळे, ती गेल्यामुळे व मुलांनी वाळीत टाकल्यामुळे, समुद्राचा एकलं कोंडेपणा मला खुपच आवडू लागला होता. मला चार वर्षापुर्वीच डॉक्टरकडे घेऊन गेले होते. डॉक्टरपण म्हणाले, जगणाच्या अमर्यादित उतार-चढावामुळे असे होत आहे, सगळे ठीक होईल, आपण ट्रिटमेंट व्यवस्थित केल्यावर. पण मी वेडा आहे हेच मला मान्य नाही, रोजची कामे रोज करत होतो ना मी? मग, ट्रिटमेंट कसली ? मी काय वेडा आहे ? पळालो, दिशाही भटकत भटकत, ह्या निसर्गाच्या कुशीत आलो व त्यांचाच होऊन राहिलो.

इकडे तिकडे पाहिले सगळे विचार पाहून हलकेच हसलो व मान डोलावली, पोथडी तेथेच बाजूला ठेवली, हातातील बिडी तेथेच बिडांच्या ढिगार्‍यात विजवली. व आपल्या फाटक्या चपला पायात चढवून उभा राहिलो, मागे कोणीतरी पाहते आहे असा भास झाल पण मी दुर्लक्ष करुन, समोर समुद्राला नकळत हात जोडले व सरळ समोर निघालो.. समुदाकडे ! हो आज त्यांची व माझी गळाभेट होणार आहे, आज तो व मी एकत्र होणार आहोत... मोक्ष समोर दिसत होता.. मुक्त होण्याचा क्षण जवळ आला होता....

गुलमोहर: 
शब्दखुणा: