निळ्या अंधारात ...

Submitted by ऋतुजा घाटगे on 29 January, 2011 - 10:37

धुकेजल्या निळ्या अंधारात एक कवडसा आठवणींचा तुझ्या स्पर्शला अस्तित्वाला माझ्या,
त्या उत्फुल्ल उषेच्या अन् धुंद निशेच्या स्मृती अजूनही आहेत रे ताज्या.

शब्दांचे बंध, कोवळे धागे; जुळवली होती एक एक तार,
विखुरले शब्द, धागे निसटले; माझे मीच हरवले सूर.

रात्र सोनेरी, चंदेरी प्रभात; इंद्रधनुष्यी दिवस होते,
सम्राज्ञी मी त्रिलोकाची, तुझ्या मनाची राज्ञी होते.

हास्य तुझे अन् हर्ष माझा; जलसरितेचे नाते होते,
तुझे नेत्र अन् माझी स्वप्ने युगांपूर्वीच गुंतले होते.

आज तुझ्या ओठी कडवट विखार; नजरेचे उत्तर नकारात,
घुमतो पारवा तुझ्या आठवणींचा धुकेजल्या निळ्या अंधारात !

गुलमोहर: 
शब्दखुणा: