सुखनवर बहुत अच्छे - ३ - फिराक गोरखपुरी

Submitted by बेफ़िकीर on 29 January, 2011 - 05:26

मुंबईच्या त्या मुशायर्‍यात त्या दिवशी एकाहून एक गाजलेले शायर उपस्थितीत झालेले होते. एकेकाची नावे ऐकूनच किती गर्दी असेल याचा अंदाज यावा.

जां निसार अख्तर, साहिर लुधियानवी, कैफी आजमी आणि स्वतः सरदार जाफरी!

पण या सर्वांपेक्षाच काय तर कोणत्याही काळातील बहुतेक कवींच्यापेक्षाही प्रतिभेने श्रेष्ठ ठरेल असा एक शायर आपला मतला, म्हणजे गझलेचा पहिला शेर ऐकवू लागला.

मौत इक गीत रात गाती थी
जिन्दगी झूम झूम जाती थी

वरवर वाटायला असा अर्थ वाटावा, मरणात आणि जीवनात कुणीच अधिक श्रेष्ठ नाही, दोघेही एकाच पातळीचे आहेत, किंबहुना जीवन जरा अधिकच श्रेष्ठ म्हणावे लागेल, कारण जीवन 'झूम झूम' जाते तर मरण फक्त एकच गीत गाते.

परिणाम व्हायचा तसा झाला! शायरीतील धुरंधर मानल्या गेलेल्यांना 'आपल्या नजरेत हा मतला अतीसामान्य आहे' हे दाखवून देण्याची इच्छा झाली. इतक्या मातब्बर शायराने इतका सामान्य मतला कसा ऐकवला हे दाखवून देण्याची इच्छा झाली.

आणि सरदार जाफरी भर मुशायर्‍यात ओरडले...

"फिराक साहब, गुस्ताखी मुआफ हो.. मगर आप हमे शेर सुनाईये.. बकवास मत कीजिये"

अत्यंत क्रोधीत झालेल्या फिराक साहेबांनी तिथल्यातिथे उत्तर दिले.

"मै तो शेरही सुनारहा हूं... बकवास तो आप कर रहे है"

मतल्याचा अर्थ वेगळा होता. मरण रात्री एखादे गीत गाते, 'त्यामुळे' जीवन दिवसभर / जीवनभर नाचते असा तो अर्थ होता. गझलेचा शेर ऐकण्याचीही काबिलीयत असावी लागते.

पहिल्या ओळीचा दुसर्‍या ओळीत 'समारोपच व्हायला पाहिजे' आणि 'समारोपच होतो' या दृष्टीने जर शेर ऐकला नाही तर त्या दोन्ही ओळी स्वतंत्र वर्णने वाटू शकतात. नवोदीत गझलेच्छुंनी शिकण्यासारखी ही बाब! मात्र सरदार जाफरींनी स्वतःचा अपमान तितका करून घेतला. मरणाच्या तालावर , संगीतावर जीवन नाचते असा त्या मतल्याचा अर्थ असेल हे त्यांच्या ध्यानात न येऊनही त्यांनी ज्या महान शायराचा अपमान करण्याचा अपयशी प्रयत्न केला...

... त्या खर्‍याखुर्‍या अर्थाने महान असलेल्या शायराचा आज आपण परिचय करून घेणार आहोत.

डॉ. रघुपती सहाय.... उर्फ.... फिराक गोरखपुरी... !

आत्तापर्यंत आपण डॉ सर मुहम्मद इक्बाल आणि साहिर लुधियानवी यांचा परिचय करून घेतला. पण जोश मलीहाबादींच्य मते मीर आणि गालिबनंतर खर्‍या अर्थाने त्या दर्जाचा एकच शायर झाला, तो म्हणजे फिराक गोरखपुरी!

१८९६ साली उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे जन्माला आलेले फिराक हे जात्याच अती बुद्धीमान होते. त्यांच्या घरी काही पंडितांचा राबता असल्याने ती बीजे त्यांच्या मनात पुर्वीपासूनच पेरली गेलेली होती. आपल्या कॉलेज जीवनात त्यांनी वर्डस्वर्थ, टेनीसन, तुलसी, कबीर, मीरा यांच्या साहित्याचा प्रगाढ अभ्यास केला. स्वामी रामतीर्थ यांचे वेदान्तावरील, विवेकानंदांची अनेक भाषणे यांचा अभ्यास केला. तत्वज्ञान व अध्यात्म हे त्यांचे मुख्य विषय! या सर्वाचा परिणाम म्हणजे बीए ची परिक्षा पास होताना जेव्हा झाकिर हुसेन उत्तर प्रदेशात तिसरे आले तेव्हा फिराक गोरखपुरी चवथे आलेले होते. त्यांचा दबदबा तर होताच, पण वरील सर्व अभ्यास झाल्यानंतर त्यांची स्वतःची अशी जी कविता निर्माण होऊ लागली होती तिच्यामधील विचार पाहून घरचे, आजूबाजूचे, सहाध्यायी इतकेच काय तर प्रोफेसर्सही अवाक होऊ लागले होते.

मात्र, महान व्यक्तीमत्वांचे वैयक्तीक आयुष्य जसे बहुतेकवेळा दु:खीच असते तसे फिराकसाहेबांचेही होतेच!

१९१८ साली बीए पास होऊन सार्‍या उत्तर प्रदेशात गाजलेल्या फिराक साहेबांचे १९१४ सालीच लग्न झालेले होते. आणि त्यांची पत्नी हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे विदारक दु:ख होते. मध्यस्थाने फसवून हे स्थळ आणलेले होते. पत्नी काहीशी वेडीच म्हणावी लागेल. तिला लिहिता वाचता तर यायचे नाहीच, पण ती अत्यंत कुरुपही होती व काहीही न करता नुसती बसून राहायची. याहीपेक्षा अधिक म्हणजे तिचा चेहरा पाहून जणू काही येथे कुणाचा तरी आत्ताच मृत्यू झाला असावा की काय असे वाटावे इतके अभद्र भाव चेहर्‍यावर घेऊन ती सतत वावरायची.

आपण फसवले गेलो आहोत हे फिराक यांना समजलेलेच होते. तिला त्यांनी हाकलून देण्याचाही प्रयत्न केला. काही जणांच्या मध्यस्थीमुळे व करुणा आल्यामुळे तो निर्णय मागे घेतला. त्यांना एक मुलगा झाला. हा मुलगा दिसण्यात व बुद्धीमध्येही अगदी आईवर गेला. इतका, की वर्गात त्याला मुले चिडवून हैराण करायची. इतक्या मोठ्या विद्वानाचा मुलगा इतका मागासबुद्धीचा कसा असे म्हणून! शेवटी त्या मुलाने वैतागून अठराव्या वर्षी आत्महत्या केली. दरम्यान फिराक यांना दोन मुलीही झाल्या.

मात्र, त्यांचे व्यक्तीगत आयुष्य ही त्यांच्यासाठी नेहमीच एक अत्यंत दु:खद आणि काळजी देणारीच बाब राहिली.

अचानक एक दिवस ते आपल्या जन्मगावी म्हणजे गोरखपूरला आलेले असताना त्यांना कुठेतरी तो मध्यस्थ भेटला. मध्यस्थाने कबूल केले की पैशाच्या लोभाने त्याने ते स्थळ त्यांच्या गळ्यात मारलेले होते व त्याला व्यवस्थित माहीत होते की ती स्त्री कुणाच्याही घरात देणे योग्य नाही. फिराक साहेबांना त्याने सांगीतले की आपण मला केवळ माफच करा व पाहिजे तर दुसरा विवाह करा. पण आता, इतक्या वर्षांनंतर दुसरा विवाह करणे शक्यच नव्हते. त्यांचे वयच पन्नास होते.

या पत्नीमुळे फिराक साहेबांच्या मनावर इतका परिणाम झालेला होता की त्यांचे कॉलेजचे एक वर्षही वाया गेलेले होते. त्या वर्षी ते एक रात्रही शांततेने झोपू शकले नाहीत. तब्येतीवर झालेला परिणाम पाहून त्यांना बनारसच्या त्र्यंबक शास्त्रींचे उपचार करून घ्यायची वेळ आली. जीवावरचे संकट टळले.

बीए मध्ये संपूर्ण यु पी मध्ये विख्यात झाल्याचे सुख नशीबात येत तोच वडिलांचे निधन झाले. मोठे भाऊ या नात्याने त्यांना सर्वच भावंडांची जबाबदारी घ्यावी लागली. त्यात अनेक अडचणि आल्या. पन्नास हजार रुपयांचे कर्ज त्या जमान्यात फिटवावे लागले.

मात्र हे सगळे करत असताना दोन गोष्टी सातत्याने घडत होत्या. एक म्हणजे त्यांची शायरी असीम बहरत होती, गाजत होती आणि दुसरे म्हणजे फिराक साहेबांचा स्वभाव अत्यंत परखड, स्पष्ट असा होऊ लागला होता. ते आता प्रत्येक माणसाशी स्पष्टच बोलू लागलेले होते.

याचाच परिणाम असा झाला की १९४८ साली एक कवीसंमेलन आयोजीत केले गेले होते. ते एका राजकारणी माणसाने आयोजीत केलेले होते व त्या मागची भूमिका अशी होती की उर्दू ही देशाबाहेरील भाषा असून तिचे उच्चाटन केले जावे व हिंदीमध्ये अधिकाधिक शायरी रचली जावी. त्या संमेलनाला फिराक यांना बोलावण्यात आले. फिराक यांच्याकडे नेमका तेव्हाच एक उर्दू शायर आला. ते त्यालाही चल म्हणाले. तो घाबरला व म्हणाला 'तेथे तर माझी उर्दू शायरी पाहून मला हाकलूनच देतील'! पण फिराकसाहेबांना त्याची शायरी व तिचा दर्जा ज्ञात होता. ते त्याला घेऊनच गेले.

फिराक साहेबांची वेळ आली तशी त्यांनी आपली एक हिंदी कविता ऐकवली व अचानक प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आपल्या त्या मित्राचा उल्लेख केला व त्याला स्टेजवर पाचारण केले.

आता आला का प्रॉब्लेम्? अनेकांना माहीत होते की हा उर्दू शायर आहे. इतकेच काय तो राजकारणीनेता स्वतःच स्टेजवर बसून प्रमुख पाहुणा झालेला होता. तो उर्दू शायर बिचकत बिचकत वर आला व फिराक साहेबांनी त्याच्या हातात माईक देऊन त्याला फर्माईश केली. सगळेच चुळबुळू लागले. त्या माणसाने ज्या क्षणी त्याची शायरी सादर करायला सुरुवात केली... सुरुवातीला सन्नाटाच पसरला... आणि क्षणार्धातच...

वाहवा .. वाहवा... अशी दाद मिळू लागली. सभागृह दणाणून गेले. काही वेळाने तो शायर आभार मानून उतरत असतानाच राजकारणी माईक हातात घेऊन म्हणाला...

'हिंदी कवींसाठी तुम्हा लोकांच्या मुखातून एकही प्रशंसोद्गार निघत नाही... आणि या उर्दू शायराला मात्र इतकी दाद???"?

त्याबरोबर फिराक साहेबांनी तो माईक चक्क स्वतःच्या हातात ओढून घेतला आणि म्हणाले..

"त्या हिंदी कविता सुमार होत्या... त्यांना दाद मिळणेच शक्य नव्हते... ही उर्दू शायरी उच्च दर्जाची आहे.. याला दाद मिळालीच पाहिजे.. कवितेच्या क्षेत्रात राजकारण आणणार्‍यांचा निषेध करून मी सभात्याग करत आहे"

असे होते फिराक गोरखपुरी! जवाहरलाल नेहरुंचा निकटचा सहवास लाभलेल्या फिराक साहेबांकडे अद्भुत प्रतिभा होती. तिची तितकीच अद्भुत प्रशंसाही भारत सरकारने व विविध व्यासपीठांनी केलेली आहे.

१. उर्दू भाषेसाठीचे पहिलावहिले ज्ञानपीठ पारितोषिक

२. गालिब अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड

३. उर्दू साहित्य अकादमी अ‍ॅवॉर्ड

४. पद्मभूषण अ‍ॅवॉर्ड

५. सोविएत लॅन्ड नेहरू अ‍ॅवॉर्ड

इंग्रजांनी तुरुंगात घातले तेथे यांना (चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद है वाले) हसरत मोहानी व मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा सहवास मिळाला.

फिराक गोरखपुरींचे काव्य श्रेष्ठ आहे हे दाखवणारे १६ मुद्दे एका लेखकाने लिहिले आहेत. १६ घटक, जे काव्याचे श्रेष्ठत्व ठरवतात. हे घटक कुणीही तपासून घ्यावेत व त्यावरून स्वतःचेही काव्य कसे आहे हे ठरवावे.

१. पारंपारिक उर्दू शायरीच्या नजाकतीला कुठेही धक्का न पोहोचवता देखील फिराक यांनी त्यात स्वतःचे असे नवीन रंग भरलेले आहेत.

२. विचारांमधील ते नावीन्य, जे आजवर पारंपारिक उर्दू शायरीत आले नाही. जणू याच नावीन्याची समाजाला गरज असावी इतक्या सहज पद्धतीने ते स्वीकारलेही गेले.

३. जन्मदात्या धरतीची संस्कृती इतक्या सहजपणे शायरीत आलेली आहे की जणू गझल म्हणजे एखादी सोळा शृंगार केलेली देवीच बनलेली असून ती आपल्या दु:खांवर स्वतःच्या सांत्वनेचे पांघरुण घालते. करुण रस आणि शांत-रस या दोहोंचे इतके सुंदर मिश्रण उर्दूतही कमीच दिसते. आपली संस्कृती ही जणू आपली आईच आहे असा भास ही शायरी वाचताना व्हावा. त्यांना ज्ञानपीठ पारितोषिक दिले गेले तेव्हा हा मुद्दा त्यात अनेकदा लिहीला गेला.

४. मात्र हे होत असतानाच त्यांच्या शायरीत वैश्विक संस्कृतीचीही इतकी रुपे पाहायला मिळतात की युरोप व अमेरिकेतील लोकांनी त्यांच्याकाव्याचा अनुवाद करून तो डोक्यावर घेतला. किती अष्टपैलुत्व असावे!

५. गझलेत प्रामुख्याने जीवनरस असतो व त्या जीवनरसाचा प्रमुख घटक असते प्रेम! असे म्हंटले गेलेले आहे की फिराक यांनी रचलेली प्रेमावरील शायरी ही प्रेमवीरांच्याच नव्हे तर कोणत्याही माणसाच्या मानसिक जखमांवर फुंकर मारणारी आहे. सच्ची आहे. याला हीलिंग पॉवर असे म्हणतात.

६. फिराक यांना खरेखुरे युगप्रवर्तक कवी मानले जाते कारण त्यांच्या काव्याचे लाखो प्रतिध्वनी जगभरातून आले. त्यांचे काव्य हा जगातील साहित्यिकांचा व रसिकांचा एक मोठा ठेवाच होता. त्यांनी कुनालाही शागीर्द केलेले नसले तरीही त्यांचे अनुकरण प्रचंड प्रमाणावर झाले.

७. फिराक यांच्या शायरीतील प्रेम हे केवळ आणि केवळ उच्च दर्जाचेच होते. त्यात कधीही स्वस्तता आली नाही. वासना आली नाही. जणू अमृताचा वर्षाव व्हावा असे प्रेमविषयक शेर होते त्यांचे!

८. गांभीर्य, सुगमता, सरळपणा, नैसर्गीकता आणि सहजता यांचा अनोखा संगम त्यांच्या शायरीत दिसतो. हे उर्दू शायरीतही बोटावर मोजण्याइतक्या कवींनाच जमल्याचे जाणकार मानतात. मीर, गालिब आणि इक्बाल! यामुळेच फिराक यांच्या गझलांच्या आणि नज्मांच्या विक्रमी कॅसेट्स निघाल्या.

९. फिराक यांचे उर्दू शायरीला असलेले सर्वात मोठे योगदान जे मानले जाते ते हे की त्यांनी लहानात लहान, सुक्ष्म विचारांना, बाबींना फुलवले. इतके, की जणू ती देववाणीच वाटावी.

१०. मीर जसा गझलचा बादशहा होता तो तसा मिर्झा सौदा कसीद्यांचा! मात्र गझल, नझ्म, रुबाई, कसीदे व इतर अशा सर्व काव्यप्रकारात श्रेष्ठ असण्याचे भाग्य काहींचेच! त्यात फिराक एक!

११. मानवता हे त्यांच्या काव्याचे प्रमुख लक्षण होते. गंभीर तरीही सहज काव्य, ज्यातून मानवता हीजणू दिव्यताच वाटावी इतकी शायरी श्रेष्ठ होती त्यांची!

१२. फिराक यांचे काव्य 'दिल की धडकन' बनण्यास सर्वात अधिक पात्र आहे याचे कारण म्हणजे लय आणि गेयता यावर त्यांचे असलेले वादातीत प्रभुत्व! असे म्हणतात की त्यांचे शेरच जणू गातात.

१३. प्रेम या दोन अक्षरी शब्दात ढोबळ मानाने जे जे येते ते सर्व शायरीत कुणीही आणू शकेल. मात्र त्यातील सुक्ष्माहून सुक्ष्म पदर फिराक यांच्या शायरीत उलगडतात असे म्हणतात. अशी काबीलीयत बहुतांशी श्रेष्ठ शायर मोमीन खां मोमीन यांची होती व काही प्रमाणात हसरत मोहानी यांची!

१४. खरेपणाच्या ज्या बिंदूला त्यांची शायरी पोहोचलेली आहे तेही दुर्मिळच! 'सच्चाईचाही एक्सरे' असे गंमतीने म्हंटले जाते.

१५. फिराक यांच्या काव्यात संस्कृतीचे चित्रण अत्यंत महत्वाचे व लोभस आहे. तिचे शेकडो पैलू त्यांनी उलगडवून दाखवलेले आहेत.

१६. निसर्गचित्रण त्यांच्या काव्यात बहरलेले आहे.

त्यांनी गझल, नझ्म व समीक्षा असे मिळून एकंदर ९ पुस्तके लिहीली.

प्रदीर्घ आजाराने १९८२ साली फिराक गोरखपुरी यांचे निधन झाले.

४०,००० हूनही अधिक शेर लिहिणार्‍या फिराक यांच्या काही ओळी आस्वादासाठी पुढे देत आहे.

(माझ्याकडे असलेल्या एका पुस्तकात त्यांच्या काही नझ्मही आहेत, पण येथे गझलेचे शेर देत आहे.)

==========================================

मौत इक गीत रात गाती थी
जिन्दगी झूम झूम जाती थी

कभी दीवाने रो भी पडते थे
कभी तेरी भी याद आती थी

========================

बहुत पहलेसे उन कदमोंकी आहट जान लेते है
तुझे ऐ जिन्दगी हम दूरसे पहचान लेते है

जिसे कहती है दुनिया कामयाबी वाए नादानी (वाए - अफसोस)
उसे किन कीमतोंपर कामयाब इन्सान लेते है

तबीयत अपनी घबराती है जब सुनसान राहोंमे
हम ऐसे मे तेरी यादोंकी चादर तान लेते है

रफीके-जिन्दगी थी अब अनीसे-वक्ते-आखिर है (आधी जीवन मित्र होते, आता अंतीम समय मित्र आहे)
तेरा ऐ मौत हम ये दूसरा अहसान लेते है

जमाना वारिदाते-कल्ब सुनने को तरसता है (वारिदाते-कल्ब - मानसिक दुर्घटना, यातना)
उसीसे तो सर आखोंपे मेरा दीवान लेते है (म्हणूनच माझे काव्य डोक्यावर घेतले जाते)

'फिराक' अक्सर बदलकर भेंस मिलता है कोई काफिर (काफिर - अधर्मी, मूर्तीपूजक, सौंदर्यपूजक)
कभी हम जान लेते है कभी पहचान लेते है

====================================

वो रूठना तेरा आज आ रहा याद मुझे
कहा था मैने नही तेरा ऐतिमाद मुझे (ऐतिमाद - विश्वास)

पकड लिया सरे-महशर किसीने हाथ मेरा (सरे महशर - प्रलयकाळी, खुदाच्या समोर सगळे असताना)
बस आज मिलगयी अपनी वफा की दाद मुझे

====================================

तुम हो जहांके शायद मै भी वही रहा हूं
कुछ तुमभी भुलते हो कुछ मै भी भूलता हूं

मिटता भी जा रहा हूं पूरा भी हो रहा हूं
मै किसकी आरझू हूं मै किसका मुद्दआ हूं (आरझू - कामना, मुद्दआ - विषय)

कैफे-फना भी मुझमे शाने-बका भी मुझमे (कैफे-फना = मृत्यूचा उन्माद, शाने-बका = जीवनाची शान)
मै किसकी इब्तिदा हूं मै किसका इन्तिहा हूं (इब्तिदा - आरंभ, इन्तिहा - अंत)

जिससे शजर हजर मे इक रूह दौड जाये (शजर हजर - झाडे व दगड)
उस साजे-सर्मदी को गजलोंमे छेडता हूं (साजे सर्मदी - अमर साज)

===================================

किसीका युं तो हुवा कौन उम्रभर ... फिरभी
ये हुस्नो-इश्क तो धोका है सब.. मगर.. फिरभी

हजार बार जमाना इधरसे गुजरा है
नयीनयीसी है कुछ तेरी रहगुजर फिर भी

खुशा इशारा-ए-पैहम जहे-सुकूते-नजर
दराज हो के फसाना है मुख्तसर फिर भी

(वा रे वा, काय पण हे मौनात असलेले डोळे, इतकी लांबलचक कथा असूनही अल्पशीच होत आहे)

शबे-फिराकसे आगे है आज मेरी नजर
कि कटही जायेगी ये शामे-बेसहर फिरभी

(या विरहाच्या रात्रीचे दु:ख कितीवेळा सोसायचे? माझी नजर आज त्याही पुढे पोचली आहे. ही 'कधीच सकाळ न होणारी' रात्र काय, संपेलच एखाददिवशी)

पलट रहे है गरीबुल-वतन, पलटना था
वो कूचा रूकशे-जन्नत हो, घर है घर फिर भी

(हे परदेशी लोक आता आपल्या देशाला निघाले, निघणारच होते. तिची गल्ली स्वर्गाप्रमाणे का असेना, घर ते घर शेवटीच!)

अगरचे बेखुदी-ए-इश्कको जमाना हुवा
'फिराक' करती रही काम वो नजर फिर भी

(प्रेमात प्रेमालाच आणि स्वतःलाही विसरण्याची मानसिकता जाऊन एक युग लोटलं असलं तरी काय झालं फिराक? नजर आजवर तेच काम करत होती.)

=====================================

या महान शायराच्या शेकडो गझला आहेत. कोणत्या द्याव्यात हेही ठरवता येत नाही. येथेच थांबतो.

पण त्यांचाच एक मक्ता लिहून!

'फिराक' ए काश सुननेवालोंके सीने मे दिल होता
हकीकत होती है अशआर मे, बाते नही होती

(फिराक, या ऐकणार्‍यांच्या छातीत हृदय असतं तर बरं झालं असतं नाही? आपल्या शेरांमध्ये वास्तव आहे, नुसती बडबड नाही.)

========================================

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

===============================

http://www.maayboli.com/node/22554 - सुखनवर बहुत अच्छे - भाग १

http://www.maayboli.com/node/22651 - सुखनवर बहुत अच्छे - भाग २

गुलमोहर: 

अप्रतिम झालाय हा भाग. वाचायला सुरुवात केल्यावर हे वाचन संपले कधी? हे सुद्धा भान रहात नाही.

मात्र एक बाब माझ्या मते अधोरेखीत होतेय्,की शायरी/शेरांमध्ये ओतप्रोत गझलियत असणार्‍या या अवलियांचे खाजगी आयुष्य दु:खाने भरलेले होते. दर्जेदार शायरीचे मूळ हा ''दर्द का एहसास'' तर नाही?

पुढील भागाच्या प्रतीक्षेत. Happy

अप्रतिम लेख!!!

डॉ. रघुपती सहाय 'फिराक' ह्यांच्याबद्दल लिहील्याबद्दल मनापासून धन्यवाद भूषणजी!!! Happy इतक्या उच्च अभिरूचीचे लिहीणार्‍या बोटांवर मोजता येतील अशा हिंदू शायरांपैकी ते एक होत.

अप्रतिम लेख ! वानगीदाखल दिलेल्या काही रचना खुप काही सांगुन जातात. असो.
इतका सुंदर माहितीपुर्ण लेख, आणि फक्त दोन प्रतिक्रिया ! बहोत नाइन्साफी है !

बहुत पहलेसे उन कदमोंकी आहट जान लेते है
तुझे ऐ जिन्दगी हम दूरसे पहचान लेते है

बरेच वेळा ऐकली आहे , पण फिराक साहेबांची रचना आहे हे माहित नव्हते.
बेफिकीरजी , धन्यवाद तुमच्यामुळे बरिच भर पडते आहे.

आयुष्याची अभावग्रस्तता हे सौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या कविता पोसणारे खत असावे.
'मुझे हादसोंने सजा-सजाके बहुत हसीन बना दिया
मेरा दिल हैं जैसे दुल्हनका हाथ मेहेंदियोंसे रंगा हुआ '
(असेच ना शब्द? चु.भू.द्या.घ्या.)

धन्यवाद बेफिकीर..