स्वरसूर्य मौनस्थ जाहला

Submitted by kaljayee on 25 January, 2011 - 01:11

स्वरसूर्य मौनस्थ जाहला
भीमसेन जोशी गेले. पण जातांना त्यांच्या कंठातली अमृतमयी स्वर संजीवनी समस्तांना देऊन गेले. गेली साठ वर्षं हा स्वरमेघ वर्षत होता, अविरत, ज्यात सचैल न्हाऊन निघत होते देशोदेशीचे स्वर-भूकेले रसिक, टिपत होते रंध्रारंध्रात ते चांदणस्वर अधीर, आतूर होऊन. हे आता पुन्हा होणे नाही. स्वर-पंढरीचा हा वारकरी आता त्याच्या माहेरी गेला आहे, कायमचा.
जग बदलणारी माणसं वेडी असतात. ती आधी स्वतः वेडी होतात आणि मग जगाला वेड लावतात. स्वरांचं वेड लागून छोटा भीमसेनही नकळत्या वयातंच घर सोडून स्वरांच्या शोधात दाहीदीशा भटकला. तपस्या एका जागी मांड ठोकूनच केली जावू शकत नाही, पायाला भिंगरी लावून, इतस्तत फिरत, ज्ञानकण वेचतही केली जाऊ शकते. स्वर तपस्या. कंठातून हवा तो स्वर, हवा तेव्हा निघण्याची किमया आणि तो स्वर डोळ्यांनी प्रत्यक्ष बघता येण्याची तपस्या. कठोर परिश्रमांती भीमसेनांनी ही किमया साध्य केलीच.
ह्या नशिबाच्या गोष्टी असतात का? असाव्यात. अन्यथा असलं सुरेल वेड प्रत्येकाला कुठं लागतं? आणि मग या वेडात सर्वांनाच सामील करून घेण्याचं त्यांचं कसब. जे त्यांच्या सोबत वेडे झाले ते धन्य झाले. हे सुख, हा मान आता इतरांना कधीच मिळणार नाही. एका काळाचा हा अस्त आहे.
आमचं भाग्य की आम्ही त्यांना पाहिलं, ऐकलं. ह्या आठवणीही अत्यंत गर्भश्रीमंत अशा आहेत. स्वर गंधानं पुनीत आहेत. आणि सुदैवानं त्यांना कधीच मरण असणार नाही. भीमसेनांचा पहाडी स्वर यानंतरही आमच्या ह्रदयात मेघगर्जनेसारखा घुमत राहील. त्यांच्या धीरगंभीर चपल बोल-ताना आणि वीजेसारखे कडाडते आलाप यापुढेही आम्हाला रोमांचीत करतील. कारण स्वरांना मरण नसतं. ते अमर असतात. आणि हे भाग्य ज्यांच्या हातून आमच्या भाळावर रेखलं गेलं त्या भीमसेनजींनाही आमच्या लेखी कधीही मरण नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

<<<<<स्वरांना मरण नसतं. ते अमर असतात. आणि हे भाग्य ज्यांच्या हातून आमच्या भाळावर रेखलं गेलं त्या भीमसेनजींनाही आमच्या लेखी कधीही मरण नाही.>>>>>>>>>.अगदी खर. ते अमर आहेत. आपल्या हॄदयातील त्यांचे स्थान अढळ आहे. ते स्वरनभातील ध्रुव तारा आहेत. आपल्या मनावर असलेल त्याच्या स्वरांची मोहीनी कधीच कमी होणार नाही.