मराठेशाही - धामधुमीचा काळ - महाराणी ताराबाई

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || "

कवि गोविंद

मी ताराबाईबर लिहीन्याची गरज आहे का? वरच्या कवितेत तत्कालिन कवि गोविंद यांनी ताराबाईचे जे वर्णन केले आहे ते बढवुन चढवुन नाही तर त्यातील शब्दनशब्द खरा आहे. केवळ २४ ते २५ वर्षाची एक विधवा बाई, औरंगजेबासारख्या मुत्सदी सम्राटाशी लढा देन्यास उभी राहते आणि सलग साडेसात वर्षे त्याचाशी लढा देते व त्या लढ्यात स्वतः पराजित होत नाही ही घटनाच तिच्या कर्तूत्वाबद्दल सगळे काही सांगुन जाते.

मराठी स्वराज्याचे शिवाजी महाराजांनंतर तिन स्वतंत्र कालखंड आहेत. प्रत्येक कालखंडाला एक विशिष्ट महत्व आहे. येनारा प्रत्येक राजा वा राणी हे एका वेगळ्याच लढ्यातुन गेलेले आहेत. त्यांचा लढ्यातुन महाराष्ट्र तावुन सुलाखुन निघाला. प्रत्येक पुढार्याने ( संभाजी, राजाराम, ताराबाई ) अनेक कर्त्तत्ववान पुरुषांना निर्मान केले आहे. हा काळच मोठ्या धामधुमीचा होता. छत्रपती संभाजींनी औरंगजेबाला थोपवुन धरले त्यामुळे संभाजीच्या काळात औरंगजेबाला मराठा राज्य सोडुन विजापुर व गोवळकोंडा राज्य घ्यावे लागले. राजारामचा कालावधी आपण गेल्या लेखात पाहीला. आज ह्या भद्रकालीचा कालखंड पाहु.

मराठेशाही सन १७०० ते १७०७

भद्रकाली खरी कोपली होती ती राजाराम ह्ययात असतानाच. पति जिंवत असतना ही बाई स्वतंत्र मोहीमा चालवायची व मोगलांना सळो की पळो करुन सोडायची. मोगली सरदार खाफीखानाने औरगंजेबाला एक पत्र लिहीले आहे. त्याचा थोडक्यात गोषवारा असा " ताराबाई ही राजारामाची थोरली बायको आहे. ती बुध्दीमान आणि शहानी आहे. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवर्याच्या ह्ययातीतच तिचा लौकीक झाला आहे."
राजारामाच्या मृत्यू नंतर ताराबाईने आपल्या सावत्र मुलाला संभाजीला गादीवर बसवले व राज्याची सर्व सुत्रे हातात घेतली. धामधुमीच्या काळात राज्यातच असल्यामुळे सर्व सरदार, हुकुमत्पन्हा, प्रतिनिधी हे तीचा सल्ला घेऊन चालायचे. गेली १८ वर्षे ( संभाजी गादीवर आल्या पासुन) सतत चालनारा मोगली, विजापुरी संघर्ष मराठ्यांचा जणू अंगीच पडला होता. १७०० ते १७०७ या कालखंडात शेकड्याने लढाया मराठी भुमीवर झाल्या पण त्याला समर्थपणे तोंड देऊन ताराबाईने राज्य जिंवत ठेवले ईतकेच नाही तर वाढविले सुध्दा.

राजाराम जायच्या आधीच मोगलांनी सातार्याला वेढा घातला होता. सात्यार्यासोबत पन्हाळा, विशाळगड, पावनगड अश्या अनेक गडांवर वेढे पडले होते. ताराराणी सर्व वेढ्यांना एकाच वेळेस तोंड देत होती. ज्यांना सातारा, विशाळगड, परळी, पन्हाळा हा महाराष्ट्रातला भाग फिरुन माहीती आहे त्यांना कळेल की अवघ्या १५० किलोमिटर मध्ये हे सर्व प्रदेश येतात व स्वत ओरंगजेबासोबत १५०००० सैन्य या भागात वावरत होते. सर जदुनाथ सरकार लिहीतात " किल्ल्याला संपुर्णपणे वेढा घालनेही मोगलांना जमले नाही. शेवटपर्यंत मराठे त्यांना हवे तेव्हा आत बाहेर करु शकत होते. ऊलट मोगलाचेंच सैन्य कोंडल्या सारखे झाले, मराठी सैन्य बाहेरुन घिरट्या घालत व मोगलांची रसद तोडत. येन्याजान्याचे सर्व मार्ग मराठ्यांनी व्यापले होते. कुणालाच संरक्षनासाठी मोठ्या तुकडी शिवाय बाहेर पडता येने अशक्य झाले होते." बघा म्हणजे मराठ्यांनीच मोगलांना घेरले अशी परिस्तिथी निर्मान झाली. हे धैर्य, ही जिद्द कुठन पैदा झाली?
विशाळगडच्या वेढ्यात बादशहाचे फार मोठे नुकसान् झाले. मराठ्यांसोबत, सह्याद्री व पाऊस ह्यांनी त्याला हैरान केले. शेवटी बेदारबख्तच्या मध्यस्थीने मराठ्यांना २ लाख रुपये दिले व किल्ला ताब्यात घेतला. अनेक किल्ले मरठ्यांनी मोगलांकडुन पैसे घेऊन सोडुन दिले व त्या पैशातुन फौज भरती सुरु केली. विशाळगडच्या मोहीमेत बादशहाची ६००० माणसे कामास आली ह्यावरुन मराठ्यांनी केवढा प्रतिकार केला हे लक्षात येऊ शकते. ह्या लढ्यामुळे हैरान होऊन बादशहा बहादुरगडास गेला पण तिथे त्याला नेमाजी शिंद्याने गाठले. बादशहाला बगल देऊन नेमाजी शिंदे माळव्यात घुसला. ३०००० मराठ्यांनी खुद्द बादशहा दक्षिनेते असताना उत्तरेत हल्ला केला. भोपाळच्या उत्तरेला मोठी गडबड नेमाजीने ऊडवली. उत्तरेत घुसन्याचा पहीला मान ह्या नेमाजीला.
माळव्यात गडबड उडवुन दिल्यावर बाद्शाहाने रागात येऊन आणखी सैन्य आणले व एकाच वेळेस सिंहगड, तोरणा व राजगडला वेढा घातला. सिंहगडाने ३ महीने तोंड दिले. पण मराठ्यांनी नंतर ५०००० रु घेऊन किल्ला सोडला. बादशहाने किल्याचे नामकरन केले व "बक्षिंदाबक्ष" हे नाव सिंहगडास दिले. पातशाहा पुण्यास आला व तिथे सहा ते आठ महीने राहीला. फेब, मार्च, ऐप्रील १७०३ मध्ये अनुक्रमे वरिल किल्ले बादशहाकडे गेले. अनेक किल्ले लढत होते, जिथे माणूसबळ कमी पडत होते ते किल्ले पैसे घेऊन मोगलांना दिले जात होते.

तिकडे धनाजी जाधव आपल्या १५००० खड्या फौजेस घेऊन गुजरातेत गेला व त्यांने बादशहाच्या हंगामी सुभेदारास (अब्दुल हमीद) कैद केले. भले शाब्बस. मोगली सैन्याची दाणादाण उडवुन प्रंचड लुट घेऊन तो स्वराज्यात वापस आला. (१७०६)

१५०००० फौज, तोफा, हत्ती, घोडे काय वाट्टेल ते सोबत असुनही औरंगजेबास हार पत्कारावी लागत होती. ह्या सर्व गोष्टीमुळे तो अंत्यत निराश झाला होता. अल्लाकडे जास्त मदत होता पण अल्ला सध्या भद्रकालीच्या बाजुने होता त्यामुळे त्याला यश हाती येत न्हवते. मोगली लश्करातील एक आख्खी पिढी ( २५ वर्षे) त्याने दक्षिनेत राबविली पण कोरडाच राहीला. निराश होऊन तो २० फेब १७०७ रोजी वारला. तो वारल्या बरोबर राणीने अनेक चढाया मारत अवघ्या तिन महिन्यात सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, सातारा, परळी हे व असे अनेक किल्ले जिंकुन घेतले व स्वराज्यात आणले.
बादशहा १३ नोव्हेंबर १६८१ ला दक्षिनेत आला. तेव्हा पासुन ते १७०७ ह्या २८ वर्षात मोगली नेतृत्वात एकदाही बदल झाला नाही. तो स्वत दक्षिनेत राहुन स्वार्या करत होता तर स्वराज्याचा नेतृत्वात तिन वेळेस बदल झाला. आधी संभाजी नंतर राजाराम व पुढे ताराबाई. एवढे बदल होऊनही त्या सम्राटाला स्वराज्य घेता आले नाही.

ताराबाईने महाराष्ट्रातील सर्वांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले. कवि विठ्ठलदास लिहीतो
" पाटील सेटे कुणबी जुलाई
चांभार कुंभार परीट न्हावी
सोनार कोळी उदिमी फुलारी
या वेगळे लोक किती बेगारी"

ह्या लढाईत फार मोठी बाजु गनिमी काव्याने लढविली आहे. मराठे यायचे, हल्ला चढवायचे व पळुन जायचे, मोगल सरदार खुश होऊन बादशहाला कळवायचे के मराठे हारले. एका पत्रात मराठ्यांनी काय करावे हे लिहीले आहे व त्यानी काय केल आहे हे मल्हाररावाने मांडले त्या पत्रातील काही भाग देतो.
" आपले सैन्य थोडे. यास्तव मनुष्य राखून जाया होऊ न देता, मसलतीने त्यांचा सैन्यासभोवते हिंडोन, फिरोन त्यांस लांडगेतोड करावी; रयतेची मात्र वैरण राखुन रानातील वैरण जाळुन टाकावी: रसद चालु देऊ नये; आपल्या फौजेत मनाची धारन, त्यांचा लषकरात शेराची; अशा तर्हेने करीत मराथी फौज किती आहे हा अदमास ध्यानात येऊ देऊ नये .. मोगलांचे घोडे पाण्यावर आले असता पाणी न पीत त्यास मोगली लोकांनी म्हणावे जे पाण्यामध्ये धनाजी व संताजी दिसतो की काय? रात्री दिवसा कोणीकडुन येतील, काय करतील, असे केले. मोगलाई फौजेत आष्टो प्रह भय बाळगीत. पादशाही बहुत आश्चर्य जाहले की, " मराठी फौज बळावत आहे. अकस्मात यावे, बक मच्छ उचलुन नेतो तस्स घाला घालावा, शिपाईगिरिची शर्त करावी, प्रसंग पडल्यास माघारीपळुन जावे; खाण्यापिन्यास दरकार बाळगीत नाही. पाऊस, ऊन, थंडी, अंधारी काही न पाहता घोड्यावरच हरभरे व भाकरी, चटनी, कांदे खाऊन धावतात. त्यांस कसे जिंकावे? एक्या मुलकात फौज आली म्हणोन त्याजवर रवानगी करावी तो दुसरेकडे जाउन ठाणे घेतात; मुलूख मारीतात; हे आदमी न्हवत, भुतखाना आहे"

स्वतः ताराराणीने अनेक चढाया मारलेल्या आहेत. सैन्याची व्यवस्था, राज्यकारभाराची व्यवस्था, पैसा, गुजरात व माळव्यातील स्वारीची आखनी, किल्ले लढविने ह्या सर्व गोष्टींचा तिने निट मेळ घातला. वैध्यव्याचा नावाखाली रडत बसन्यापेक्षा तिने मराठी सैन्याच्या रक्तात जान फुकांयचे काम केले. १७०० ते १७०७ ह्या कालावधीत तिने स्वतंत्रपणे राज्यकारभार पाहीला व धामधुमीच्या काळात मराठा राज्याची निट व्यवस्था लावली.

औरंगजेब मेल्यावर स्वस्त बसतील ते मोगल कसले. माळव्याच्या सुभेदारीवर आलेल्या आज्जम शहाने स्वतःला बादशहा घोषीत केले पण तिकडे शहा आलमचा विरोध मोडन्यासाठी तो लगबगीने उत्तरेत गेला. त्याने व झुल्फीकार खानाने ( जो गेली २० वर्षे दक्षिनेत होता) सल्लामसलत करुन शाहूला कैदेतुन मुक्त केले. ( ८ मे १७०७). शाहूला मुक्त करन्यामागे मराठेशाहीत फूट पडनार हे दिर्ध राजकारण त्या दोघांनी खेळले. शाहु हा संभाजीचा पुत्र असल्यामुळे तो दक्षिनेत जाऊन राज्य वापस मागेल व त्याला जिवत सोडल्याच्या उपकाराला जागुन तो मोगलांचा सांगन्यात राहील हे झुल्फीकाराला वाटले. ऑगस्ट २००७ ला शाहु अहमदनगर ला आला व त्याने तोच राज्याच्या खरा वारस असल्याचे घोषीत केले. मराठी राज्यात ठिनगी पडली. नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर, परसोजी भोसला , रुस्तुमराव जाधव असे मातब्बर सरदार शाहुला येऊन मिळाले.

ताराबाईला हे मान्य न्हवते. तिचे असे म्हणने होते की संभाजीच्या काळातील स्वराज्य आता नाही, ते आधी राजारामने राखले व सात वर्षे आपले छोटेस राज्य तिने स्वतः औरंगजेबाशी झुंज देऊन राखले. आज्जमशहाने टाकलेला डाव यशस्वी झाला. बरेच सरदार शाहु कडुन तर धनाजी जाधवांसारखे मातब्बर सरसेनापती ताराबाई कडुन झाले. शाहुच्या म्हणन्यानुसार राजारामास राज्य राखन्या साठी दिले होते व राज्य राखने ऐवढेच त्याचे काम होत. स्वत राजाराम देखील तसेच माणत होता. पण जे राज्य ताराबाईने पुन्हा निर्मान केले त्यावर ताराबाई हक्क सोडायला तयार न्हवती. दोन्ही बाजुने प्रश्न सुटेना. सामोपचाराचा मार्गाने शाहुला आपल्याला राज्य मिळेल असे वाटले नाही व त्याने युध्दाची सुरुवात केली. धनाजी जाधव जो पर्यंत शाहुच्या पक्षात येनार नाही तो पर्यंत आपली जित नाही हे शाहूला उमजले. त्याने बाळाजी विश्वनाथला (पहीला पेशवा) धनाजीस आपल्या बाजुस वळवायला पाठविले. बाळाजी ते कार्य सफल केले. धनाजी शाहुला मिळाला. खेडला उर्वरित सैन्यात चकमक ऊडाली पण त्यात शाहू विजयी झाला. या विजयामूळे त्याचे धैर्य वाढले. सेना ही वाढली.
कान्होजी आंग्रेने बंडावा करुन स्वराज्यातले काही किल्ल्यांवर कब्जा केला व प्रतिनिधीस अटक केली. शाहुने ते बंड मोडन्यासाठी बाळाजी विश्वनाथला पेशवेपद देऊन पाठविले व पेशवा ते कार्य यशस्वी करुन आला.
सर्व मोठे सरदार, महत्वाचे किल्ले शाहू कडे आल्यामुळे ताराबाईची बाजु लंगडी पडली. तिने वारंवार शाहूशी भांडन मांडले पण ते पुर्ण झाले नाही. होता होता शाहूच बळकट झाला. १२ फेंब १७०८ रोजी शाहूने राज्याभिषेक केला तो स्वतः छत्रपती असल्याची द्वाही फिरवली.

इकडे ही धामधुम चालत असताना तिकडे उत्तरेत आज्जमशाहा व शहा आलमचे युध्द झाले त्यात शहा आलम विजयी झाला. त्याने बहादुरशहा ही पदवी धारण करुन तो पातशाह बनला. पण कामबक्षाला तो बादशहा म्हणुन मान्य न्हवते, त्याला स्वतःला बादशहा व्हायचे होते. बहादुरशहाने कामबक्षा विरुध्द शाहूची मदत मागीतली. नेमाजी शिंदे बहादुरशहाकडुन लढला. ही मदत देन्यामागे शाहूला असे वाटत होते की आज्जम शहा ने जे कागदपत्र त्याला दिले त्यावर ह्या नविन बादशहाची मोहर लावता येईल. १७०९ मध्ये बहादुरशहाने कामबक्षाला पकडुन ठार मारले. अहमदनगच्या मुक्कामात त्याला मरठ्यांकडुन गदादर प्रल्हाद भेटायला गेला व त्याने बादशहास दक्षिनेची चौथाई मागीतली. झुल्फीकारखाणाने ही मागनी उचलून धरली. त्याला परत युध्द नको होते. याच सुमारात कोल्हापुरहून ताराबाईची लोक बादशहाला भेटायला आली व त्यांनीही चौथ मागीतली. ही मागणी झुल्फीकारखाणाचा प्रतिस्पर्धी पण बादशहाचा वजीर मुनीमखान याने उचलुन धरली. बादशाहाने निर्णय दिला की आधी वारसा हक्काचा निकाल लावा मग मी सनदा देतो. सनदांचे कार्य अपुरेच राहीले. शाहू आणि ताराबाई यांनी आपसात युध्दाला सुरु केली. १७०९ साली तो वापस दिल्लीला गेला व २६ वर्षांनंतर थोडीफार शांतता मराठी राज्यास लाभली.

सत्ता शाहूकडे न जाता ताराबाईकडे राहीली असती तर वेगळे काही घडले असते का ह्याचे उत्तर मात्र मिळनार नाही कारण ईतिहास फक्त घडलेल्या घटनांचाच विचार करतो. जर, तर ची मात्रा ईथे उपयोगी नाही. शाहूने शक्यतो सांभाळुन राहन्याचा प्रयत्न केला. तो एक व्यक्ती म्हणून निश्चीतच फार मोठा होता. त्याने कोल्हापुर व सातारा ह्या दोन्ही गाद्या एकत्र आणन्याचा विफल प्रयत्न केला पण ते जमले नाही.
पुढे महाराणी ताराबाईचे तिच्या सावत्र मुलाशी पटेना झाले. कोल्हापुरकर संभाजी तिचे ऐकेनासे झाला. शाहू ने त्याला मात दिली व ताराराणीस घेऊन तो सातार्यास आला. मध्ये तिने आणखी एक औरस वारस पैदा करन्याचे नाटक केले पण ते उघडे पडले. १७०० ते १७०७ मराठी राज्यावर सत्ता गाजविनार्या ताराबाईला नंतर घरकैदेत राहावे लागले. तिचा मृत्यू सातार्यास शाहू कडेच झाला. एका शुर बाईचा दुर्दैवी अंत झाला. तिने मराठी राज्यासाठी जे केले ते आधी शिवाजी महाराजांनी नंतर संभाजी व त्यांनंतर राजारामाने केले. तिच्या सोबतच भोसले घरान्यातील मर्द लोक संपले असे खेदाने मला नमुद करावे वाटते. तिचे व तिच्या नवर्याचे कार्य मराठी राज्यासाठी फार मोलाचे होते.

विषय: 
प्रकार: 

वा! माहिती नव्हतं हे खरचं. केदार सुंदर लिहितो आहेस इतिहास.

एकदम सुरेख लिहिलय केदार... ताराबाई इतकी कर्तबगार होती, तरी वारसाबाद्दल इतकी संकुचित वृत्ती तिने ठेवली नसती तर, आणि मराठे शाहीच्या २ वेगळ्या गाद्या झाल्या नसत्या, तर कदचित काही अधिक चांगले चित्र दिसले असते का??

सुरेख लिहितो आहेस रे. Happy
ह्या ताराबाई म्हणजेच प्रतापराव गुजर यांची मुलगी ना??
इतिहासात कुठे कोणाच्या स्वैराचाराबद्दल लिहिल नाहिये विशेष पण राजाराम महाराज हे व्य्सनी होते अस काहि ठिकाणी वाचलय मी. अर्थात ती खरिखुरी ऐतिहासिक पुस्तके नव्हेत.
पण ह्याच कारणाने ताराराणी यानी राजकारणात लक्ष घातले अस प्रथम दर्शनी वाटते.
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

आपापसात लढण्याचा मराठी लोकान्चा स्वभाव कधी बदलणार??

मस्त रे!!!सुंदर लेख लिहिलाय!!!

झक्कास हो तीच. (त्यामुळे तिचा लग्नाचा ओझरता उल्लेख राजारामाच्या लेखात केला)

मराठे शाहीच्या २ वेगळ्या गाद्या झाल्या नसत्या, तर कदचित काही अधिक चांगले चित्र दिसले असते का?? >>
सांगन फार अवघड आहे कारण यात जर तर चा भाग येतो. पण एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. एकतर राणी किंवा शाहू दोंघापैकी एकाला माघार घ्यावी लागली असती. शाहू तलवार बहाद्दुर कधीही न्हवता तर उलट राणी तलवार व राज्यववस्था या दोन्हीचा अनुभव तिला होता. कधी कधी मला राणीची बाजु जास्त न्याय वाटते कारण तिने व तिच्या नवर्यानेच १६८९ ते १७०७ पर्यंत राज्य लढविले, वाचविले. शाहूने तिला मान्यता दिली असती तर नंतरच्या काळात ती जे वाईट वागली हे झाले नसते. पण ती शेवटी एक स्त्री होती त्यामुळे त्याकाळात फक्त ती रिमोट कंट्रोल म्हणुनच ती राहु शकत होती, राजा म्हणुन नाही. नंतरच्या काळात तर तिचा राजा (संभाजी) देखील तिचे ऐकत न्हवता. शाहूचे तिने जर ऐकले असते व राज्य त्याचा हवाली करुन सत्ता आपल्या हातात ठेवली असती तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. पण शाहूने तसे कदाचित केले नसते.

आपापसात लढण्याचा मराठी लोकान्चा स्वभाव कधी बदलणार?? >>>>. कधीही नाही अशी माझी खात्री झालेली आहे.

सर्वांना परत एकदा मनापासुन धन्यवाद.

केदार, छान माहिती दिलीस.
धन्यवाद.

काय जबरदस्त बाई होती ही.
>>> तिच्या सोबतच भोसले घरान्यातील मर्द लोक संपले असे खेदाने मला नमुद करावे वाटते..... अगदी अगदी.

  ***
  असेच काही द्यावे घ्यावे
  दिला एकदा ताजा मरवा
  देता घेता त्यात मिसळला
  गंध मनातील त्याहून हिरवा
  - इंदिरा

  केदार फारच सुरेख आणि माहितीपूर्ण लिहिले आहे.
  माझ्या मते प्रतापराव गुजरांची मुलगी जानकी ही राजारामाची पहिली पत्नी. ही ताराबाई मोहित्यांच्या घरातली होती. That explains..सेनापती हंबीरराव मोहित्यांचं झुंजार रक्त तिच्या धमन्यांमधून वाहात होतं.

  अश्विनी तुझ बरोबर आहे. खरेतर मी आधीच्या लेखात जानकी (कुडतोजी गुजरांची मुलगी) म्हणून उल्लेख केला, पण ईथे प्रतिक्रिया देताना सेनापतीच्या नावात माझा घोळ झाला.

  खरेतर सेनापती हंबीरराववर एखादे चांगले पुस्तक यायला पाहीजे. पण तितके संशोधन अजुन् झालेले दिसत नाही. शिवाजी महाराज, नंतर संभाजी महाराज ( सख्खा भाचा नसताना देखील ते संभाजीच्या पक्षात होते) यांचा पराक्रमात हंबीररावांची फार मोठी साथ आहे. प्रतापगडावर भवानीच्या मंदीरात हंबीररांवांची तलवार ठेवली आहे.

  >>> ( सख्खा भाचा नसताना देखील ते संभाजीच्या पक्षात होते)...
  हां, मी हेच विचारणार होतो तुला. सोयराबाईला साथ न देता हा माणूस संभाजीच्या पक्षात होता. म्हणजे 'स्वत:ची निष्ठा कुठे असावी' याबाबत त्याचा विचार केवढा स्पष्ट असेल !!

   ***
   असेच काही द्यावे घ्यावे
   दिला एकदा ताजा मरवा
   देता घेता त्यात मिसळला
   गंध मनातील त्याहून हिरवा
   - इंदिरा

   केदार .. मस्त लिहिले आहेत सगळे लेख.
   बर्‍याच दिवसांनी ऐतिहासिक काही चांगलं वाचायला मिळालं.

   केदार, अगदि इतिहास डोळ्यासमोर उभा केलास. अतिशय अभ्यासपुर्ण लेख. तेवढिच ओघवती लेखणशैली.
   वरती लिखाणात एक संदर्भ दिलाय कि ऑगस्ट २००७ ला शाहु अहमदनगरला आला. तेवढ जरा दुरुस्त कर ना.

   केदार तुम्ही छान लिहिताय यात वाद्च नाहि पन माझ्या मते तुम्हि हे लिखाण रंगीबेरंगी वर न करता एखादा वेगळा बिबि करुन करा म्हणजे कधीही वाचायचे झाल्यास सोप्पे पडेल आणि कोणालाहि लवकर सापडेल आणि वाहुन जाणार नाही.

   जी काहि माहिती तुमच्या लिखाणातुन मिळत आहे त्याबद्द्ल धन्यवाद.

   केदार.. खुपच सुरेख लेख मालिका.... सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर 'रणभाग्य ' नावाचे सचिन कानिटकरांचे पुस्तक आहे. या हंबिररावांचे मुळ नाव हंसाजी ते कर्‍हाड जवळील तळबिड या गावचे देशमुख.. या घरातील तीन मुली भोसले घराण्याच्या सुना झाल्या.. पहिली तुकाबाई , ही हंबीररावांची आत्या जिचे शहाजीराजांशी लग्न झाले होते.( व्यंकोजी राजांच्या आई)... दुसर्‍या सोयराबाई आणी तिसर्‍या ताराबाई....

   बाळाजी विश्वनाथ हा आधी धनाजी जाधवचा मुख्य कारकून होता. त्याचे धनाजी जाधव यांच्यावर खूप वजन होते. खेडच्या लढाईच्या वेळी त्यांनी जाधवांचे मन वळवले आणि लढाईचे पारडेच फिरले. पण पुढे १७११ मध्ये धनाजी यांचे निधन झाले आणि त्यांचा मुलगा चंद्रसेन याचे बालाजी बरोबर काही कारणाने भांडण होऊन तो पुन्हा ताराबाईकडे निघून गेला.

   शाहूचा पेशवा बहिरोपंत पिंगळे कान्होजी आंग्रेवर हल्ला करायला लोणावळा येथे पोचले तेंव्हा आंग्र्यान्नी खुद्द पेशव्याला कैदेत घातले. नशीब बाळाजी विश्वनाथ याने कान्होजी यांना पत्र पाठवून बोलणी करायला बोलवून घेतले आणि पुन्हा एकदा पारडे फिरले... बाळाजी भले नसेल लढाईमध्ये कर्तबगार पण तो पक्का मुत्सद्दी होता हे नक्की.. शाहू साठी त्यानेच सर्व उभे केले आणि स्वतःसाठी सुद्धा उत्कर्ष साधला...

   आणि ताराबाईनंतर तर खरच कोणी थोर भोसला राहिला नाही.. खुद्द आजचे सातारा आणि कोल्हापूरचे स्वतःला छत्रपती म्हणवणारे राजांचे मूळ वंशज नाहीत.. कारण कोल्हापूर संभाजी आणि सातारा शाहू यां दोघांनाही थेट पुत्र नव्हता... ह्या दोन्ही गाद्यांवर असलेले वंशज हे दत्तक आहेत...

   लेख आवडला... उत्तम... Happy

   'राजारामाच्या मृत्यूनंतर ताराबाईने आपल्या सावत्र मुलाला संभाजीला गादीवर बसवले व राज्याची सर्व सुत्रे हातात घेतली.'

   - केदार मला वाटतंय इकडे त्रुटी होते आहे??? त्यांनी संभाजी नाही तर शिवाजी (दुसरा) याला गादीवर बसवून त्याच्या नावाने राज्य कारभार सुरु केला. संभाजी हा राजसबाईचा पुत्र.. तिने ताराबाई आणि शिवाजीला कैदेत घालून त्याला गादीवर बसवला आणि कोल्हापूर गादी निर्माण झाली.

   कसली गम्मत होती... पावसाळ्याआधी मराठे पैसे घेऊन मुघलांना गड-किल्ले मोकळे करून द्यायचे. आणि मग मुघलांनी दाणा-गोटा भरला की भर पावसात त्यावर पुन्हा कब्जा करायचे... अक्षरश: खेळ सुरु होता. फौजेमधली नोकरी हे उत्पन्नाचे एक महत्वाचे साधन बनले होते. मुघलांनी मराठी घोडेस्वार आणि सैन्य ह्यांची धास्त घेतली होती.

   शेवटी आपले युद्धतंत्र तेच होते... 'मति कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई.' याला दिले गेलेले नाव म्हणजे 'गनिमी कावा.'

   असे म्हणतात की मृत्युपूर्वी औरंगजेबाने शाहूकडून वचन घेतले होते की तो मुघालांवर कधीही आक्रमण करणार नाही. त्याला सोडायचा निर्णय हा पूर्णपणे औरंगजेबाने घेतला होता.. फक्त सोडायचे कधी हा प्रश्न होता.. अर्थात शाहूनंतर फिरू नये म्हणून त्याची आई (संभाजी राजांची पत्नी) येसूबाई हिला दिल्लीत पुढची १० वर्षे घरकैदेत ठेवले होते. पुढे तिची सुटका शाहूने केली.. पुढे मृत्यूपूर्वी सातारा आणि कोल्हापूर गादी मध्ये तिने वारणेचा महत्वाचा तह घडवून आणला...

   पक्का भटक्या,

   बाळाजी विश्वनाथ पक्का मुत्सद्दी होता हे तुमचं निरीक्षण एकदम समर्पक आहे. शिवाय त्याचे आणि कान्होजी आंग्र्यांचे अध्यात्मिक गुरु एकच होते. ब्रह्मेंद्रस्वामी असे काहीसे नाव होते त्यांचे. या जवळीकीमुळे कान्होजी आणि बाळाजी एक झाले.

   मला १ गोष्ट कळत नहीं की शाहुना सोडविन्यसाठी ताराबाई ने तह केला अणि मग गादीवर पुत्र बसवा असे तिला का वाटले ?
   अणि १ गोष्ट म्हणजे राजा शिवाजीन सारखा शुर फ़क्त अणि फ़क्त संभाजी असताना शाहू हा वेद्पट कसा निघाला ?
   शिवाजी महाराजांच्या मृत्यूची अनेक करने येतात पण मूल कारन ???????????

   पुढे मृत्यूपूर्वी सातारा आणि कोल्हापूर गादी मध्ये येसुबाईंनी वारणेचा महत्वाचा तह घडवून आणला... >>> बरोबर , त्यामुळे असे वाटते की जर ह्या दोन्ही स्त्रियांची एकी झाली असती तर....
   मोहिते आणि शिर्के घराण्यातील चांगले गुण खर तर ह्या दोघेंमधे होते आणि ते स्वतः शिवाजी महाराजांनी ओळखले होते.

   म्हणूनच संभाजी महाराज असतानाही शिक्के कट्यार येसुबाईंच्या ताब्यात होती.

   मराठे शाहीच्या २ वेगळ्या गाद्या झाल्या नसत्या, तर कदचित काही अधिक चांगले चित्र दिसले असते का?? >>
   सांगणे फार अवघड आहे कारण यात जर तर चा भाग येतो >>>> हेच खर, पण तरीही ह्या दोघीही आपापल्या परीने श्रेष्ठ्च

   एकीने स्वराज्याचा छत्रपती (वाचवून स्वतः कैद स्विकारली) वाचवला
   दुसरीने स्वराज्य वाचवले

   ------^------

   अणि १ गोष्ट म्हणजे राजा शिवाजीन सारखा शुर फ़क्त अणि फ़क्त संभाजी असताना शाहू हा वेद्पट कसा निघाला ? >>>

   कदाचित... अगदी लहानपणापासुन औरंगजेबाच्या कैदेत राहिल्यामुळे असेल्....जाणिवपूर्वक औरंगजेबाने त्याला तसे बनवले असेल्....संभाजीचा अनुभव घेतल्यावर..

   लेख आवड्ला... मराठेशाहीतला अजून एक पैलू कळला..

   खूप छान! मरठ्याचा इतिहास अैकायला बरे वाटते. परंतु आज मराठी माणसाची महाराष्ट्रातील अवस्था बघून खूप वाईट ही वाटते. महाराष्ट्र चा अर्थ व्यहवार परप्रातीयांच्या हातात आहे. मराठी भाषेवर प्रतक्षात व अप्रत्यश्यात हिंदी चे आक्रमक होत आहे. सर्वच उद्योग व दुकानदारी परप्रातीय कब्जा करत आहेत. आता आपण मराठी माणसांनी आपला अभिमानास्पद इतिहास आठवत भविष्याची नवीन वाटचाल ही अर्थ वेवसायात लक्ष द्यावे.

   माझा जरा घोळ होतो आहे राजरामाची पत्नी ही गुजरांची कन्या जानकी ना आणि ताराबाई हंबीरराव मोहिते ची कन्या मग ती राजरामाची बायको कशी? त्याचं दुसरं लग्न होतं काय?