भिवाण्णाची काळी माय

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

भिवाण्णा पार सटपटून गेला होता....

गेल्या एक वर्षा दीड वर्षात आक्रीतच घडत चाललं होतं जणू, पार अगदी त्याच्या आवाक्याबाहेरचं! कसं नी काय, काय उमगायलाच तयार नव्हतं त्याला. विचार करकरून डोकं फुटायची वेळ आली होती आता! हताश असा, घरासमोरल्या अंगणातल्या बाजेवर बसून, शून्यात नजर लावून, परत एकदा आयुष्याची बेरीज वजाबाकी करण्यात, आणि कुठं न् काय चुकलं याचा मागोवा घेण्यात, भिवा गुंतला होता. एवढाच एक खेळ नियतीने त्याच्या नशीबात आता ठेवला होता जणू... मनातल्या मनात, घरच्या देव्हार्‍यातल्या तसबिरीतल्या देवाला त्याने प्रश्न विचारुन झालं होतं, की बाबा रे, आता उतरत्या वयात हे भोग का रे बाबा देतोस नशीबी?? पण तसबिरीतला देवही गप्पच राहिला होता...

उगाच मागचं, पार त्याच्या लहानपणचं काहीबाही आठवत राहिलं त्याला. पुरानं सुसाटणार्‍या नदीला लोंढे यावेत तशा आठवणी, एकीतून दुसरी, दुसरीतून तिसरी... मनावर काही धरबंदच राहिला नव्हता त्याचा.

... कसं छोटसंच गोजिरवाणं झोपडीवजा घर होतं त्याचं. हसरी माय, पहाडासारखा बाप आणि - आत्तासुद्धा बहिणीचा तेह्वाचा अवतार आठवून हसू आलं त्याला - नाक सुरसूर ओढणारी आणि परकर नेसून, इकडून तिकडे कोंबड्यांमागं नाचणारी, आणि शेळीशी गप्पा मारणारी झिपरी, शेंबडी छोटी बहीण. आत्ता सुद्धा तिच्या आठवणीने तो आत जरा हलला. कशी गोजीरवाणी बाय होती... चंद्रभागा नाव ठेवलेलं बानं आपल्या. बाच्या आईची -आपल्या आज्जीची आठवण म्हणून. दिसायलाही कशी चंद्रावाणी होती, गोरी गोमटी. चांगल्या घरात पडली. दाजीपण भला माणूस. बहिणीला सुखात ठेवलं आपल्या. भेटायला यायची माहेराला, तेह्वा कशी भरल्या मनानं, सुखानं तृप्त हसू ओठांवर लेवून यायची.... चंद्री पण आई बापाच्या नावाला जपून राहिली. पण कशी चिडायची लहानपणी!! आठवणीने आतापण भिवाण्णा गदगदत हसला.

रस्त्यावरून जाणार्‍या कोणी आश्चर्यानं नजर टाकली, काय झालयं हे भिवाण्णाचं, येवढा ताठ गडी, पार हेलपाटलाय, मधेच हसतोय, मधेच डोळ्यांतून टिपं गाळतोय, काय खरं नाही, ह्याअर्थी मान हलवत तो गडी आपल्या कामाला निघून गेला... भिवाण्णाला काहीच सोयरसुतक नव्हतं, तो आपला भूतकाळात रमला होता, चंद्रीच्या लहानपणची एक आठवण त्याच्या मनात रुंजी घालायला लागली होती.

"बा, ह्यो मला आक्का म्हनीत न्हाय बग!! ह्येला सांग, मला आक्काच म्हनायाचं...."

"आस्सं?? आक्का म्हनीत न्हायी?? मग काय म्हनीत्यो?? काय रं भिवा?? का तरास देतोयास रं माज्या चिमनीला??" मिशीतल्या मिशीत हसत बा कसा उगाच लटकं रागवायचा, आणि मग चंद्रीची समजूत काढायचा!! "अग पर सोन्ये, तू ल्हान हायेस त्येच्या परीस, तुजा त्यो मोठा भाव हे... तू त्येला दादा म्हनायाचं, व्हय का न्हाय? सांग बर..."

"मग त्यो मला शेंबडी, शेंबडी का चिडवायला लागलाय?? मला शेळीच्या शेजारी शेंबडी हाय, आसं म्हनतोया.... "

"अग चिमने, पर तू ये की नाक पुसून, आन् मंग त्येला इचार, काय रं, आसं का म्हनीतो म्हनून!! व्हय का न्हाय??"

चंद्राला लग्गेच पटायचं, लग्गेच धावायची घरात! आपण बाच्या संगतीने हसायचो.

सासरी पाठवणी करताना आपण म्हणालो होतो, "आक्के, चाललीस व्हय आमाला सोडून आता?" तेह्वा कशी उमाळ्याने आपल्या कुशीत येऊन रडली बाय माझी! मायाळू पोर अगदी.... कसबस ताठ राहिलो आपण, बाप्या माणसाने रडून कसं चालेल, म्हणत. परत एकदा भिवाण्णाच्या डोळयांत पाणी उभं राहिलं चंद्रीच्या आठवणीने... गेल्या सालीच गेली, ते एक बरं झालं, नाहीतर आपले भोग काय तिच्याच्यानं बघवले नसते, अस वाटत राहिलं त्याला.

मग असंच काय काय आठवत राहिलं त्याला, घरच्या आठवणी, माय आणि बाच्या आठवणी... बाच्या संगतीने मायही खपायची शेतात. भल्या पहाटेची उठून, झाडलोट करून, घरातली कामं आवरून, मुक्या जनावरांची काळजी घेऊन, त्यांच दाणापाणी, वैरण बघून ती शेतात जायला तयार व्हायची. किती कामाचा डोंगर पेलायची, पण कधी तिच्या कपाळी आठी नाही पाहिली, आपला बा ही तसाच. खूप धीराचा, मोठया मनाचा गडी, तितकाच मायाळू. असले आई बाप मिळायला नक्कीच आपण गेल्या जन्मी पुण्य केलं असलं पाहिजे... हसतमुख मायबाप त्याच्या डोळ्यांसमोर आले. परत एकदा लहान व्हावं आणि मायच्या पदरात तोंड लपवून पदरातला गारवा अनुभवावस वाटल त्याला. तिच्या मायाळू हाताचा स्पर्श आठवून आणखीनच सैरभैर झाला तो... कशी माय आपण थकूनभागून घरी आलो की मायेने चेहर्‍यावरुन आपला खडबडीत हात फिरवायची आणि पदराने चेहरा पुसायची हे आठवून त्याचं मन उगाच जडभारी झालं.

आणि बापाचा काळ्या आईवर किती जीव!! किती मानायचा तिला!! काही मनातलं सांगायच असल, तर तिची आण घ्यायचा!! बाने काळ्याईची आण घेतली की समजावं, प्रत्येक शब्द खरा अन् आता ती काळ्या दगडावरची रेघ. मग जरा मोठं झाल्यावर आपणही जाऊ लागलो बाच्या संगतीने शेतावर. बा सांगायचा, शिकवत रहायचा. किती तरी बारकावे... सुरुवातीला कंटाळा यायचा, मग हळूहळू जीव रमला. काळ्या आईची माया आपल्यालाही जडली, अन् तिचाही जीव जडला असणार आपल्यावर. आपल्या हाताला यशच देत गेली ती. बाच्या मनात एकच ध्यास होता, शेतजमिनीच्या तुकड्यात भर घालायचा. आपणही ठरवलं मनाशी, बासाठी एवढं करायचंच कधी ना कधी आयुष्यात. मनापासून मेहनत करत गेलो. काळ्या आईला सांगितलं मनातलं. "माय, तुजा आशिर्वाद र्‍हाऊ दे गं माज्यापाठी..." काळ्या आईच्या आठवणीने भिवा गलबलला.... परत एकदा त्याने देवाला मनातल्या मनात साद घातली, का रे बाबा देवा असा वागलास?? माझी मायही नेलीस तिची वेळ आली तशी, अन् तिची जागा भरून काढणारी काळी मायही तोडलीस!! मल तरी का ठेवतोस बाबा मागं? म्हातार्‍या, थकलेल्या डोळ्यांतून टिपं कशालाही न जुमानता सरसर ओघळली.....

पुढे काहीच न सुचता भिवा तसाच विमनस्क, दुपारच्या वार्‍याची झळ अंगावर घेत बसल्या जागीच लवंडला.... झोप तरी कुठे येत होती?? पडल्या ठिकाणावरुनच त्याने उगाच अंगणभर नजर फिरवली. पलिकडे कोपर्‍यात औत पडलं होत. औत बघून त्याला लाल्याची, त्याच्या बैलाची आठवण आली, अन घशात एकदम अडकल्यासारखंच झालं त्याच्या. दुनियेसाठी जनावर होतं ते, त्याच्यासाठी मात्र जिवाभावाचा सवंगडी होता लाल्या. तोही राहिला नाही, आपलं मन कसं कळायचं त्याला, कधी हिरमुसलो असलो की उगाच जवळ येऊन उभा रहायचा, खरबरीत जिभेने हात चाटायचा, कसा जीव लावलेला होता मुक्या प्राण्यानं... आठवणींच चाक फिरतच होतं....

अंगणाच्या मध्यभागी, त्याच्याच मायने हौसेने लावलेली, अन् पुढे तशीच निगुतीने काऴजी घेऊन त्याच्या बायकोने वाढवलेली तुळस आता फक्त काळया करड्या काटक्यांच्या रुपाने आपला जीव तगवून होती. बायकोच्या आठवणीने तो गलबलला. कशी लक्ष्मी होती भागिरथी... चंद्रीचं लग्न झालं आणि आपल्या मायने घरात मुलगी हवी म्हणून सून आणायचा हट्ट धरला!! बाने ही तिचीच री ओढली!! आपण तर कावलोच होतो, पण गेलोच मुलगी बघायला, अन व्हायच ते झालच!! जीवच अडकला की आपला तिच्या हसण्यात आणि लाजण्यात!! रीतसर भागिरथी घरात आली, ती इथलीच होऊन गेली. ढेकूळ पाण्यात विरघळाव, तशी विरघळली. कधी हट्ट नाही, मोठ्यांचा राग नाही, कामाचा कंटाळा नाही...घरात खपली, शेतात राबली. सासूसासर्‍यांची आवडती झाली.... कधी स्वतःसाठी हट्ट नसायचा तिचा. पण पोरगा झाला तसं मात्र तिने सांगितल, ह्याला शिकवायचं, कालिजात धाडायचं. त्यापायी पोरांचा लबेदाही वाढवला नाही... आणि पोरगा झाला त्याच वर्षी आपण अजून थोडी जमीन घेतली. बा किती किती हरकला होता काळ्या आईत चिमटीभर का होईना, भर पडली म्हणून !! हाडाचा शेतकरी तो, त्याची तीच पंढरी.... नातवाचा पायगुण म्हणाला!! पोराच्या नावावर त्याची जमीन केलीच, पण नव्याने घेतलेलीही कर म्हणाला!! आपणही खुळेच म्हणायचे!! करुन बसलो!! पोटच पोरगं म्हणूनच केली ना पण!!

पोरगा वाढत गेला, शिकत गेला... पोराच्या विचाराने त्याच तोंड एकदम कडू जार झालं. शहरात रहायला गेल्यापासून पोराला काळ्या मातीशी काय इमानच राहिलं नव्हतं. लहानपणी कसा रमायचा शेतावर... कानात वारं भरलेल्या खोंडासारखा धावायचा, काय काय गोळा करायचा.... आपण शिकवलेलं त्याला, ही काळी माय आपली.. तर दमला की काळी माय, काळी माय म्हणत तसाच पसरायचा मातीत! गार गार वाटत, म्हणायचा... मग, आता काय झालं याला? कसं विसरला सगळं?? ह्या काळ्या आईच्या जोरावरच ना ह्याचं शिक्षण केल? पण शिक्षण झालं अन शहरातली नोकरी त्याला आवडायला लागली. मातीने पाय घाण व्हायला लागले त्याचे! गावाकडे करमत नाही, नोकरीच बरी म्हणून शहरातच राहिला. मला कधी बोलली नाही , पण त्याची आईही खंतावली मनातून पोराचं वागण बघून. ह्याला जराही जाणीव नाही राहिली?? ह्याही आईची नाही अन त्याही आईची!! असलं कसलं पोरगं रे देवा, स्वत:च्या आईला विकणारं...... बिनपोराचा राहिलो असतो तरी चालल असत की!! भिवाण्णा पोराच्या आठवणीनेही चिडला अन पचकन् थुंकला. म्हातारपणाची, असहायतेची जाणीव होऊन चरफडला... संध्याकाळ होत आली होती. जिकडे तिकडे उगाच भकास काळोख भरून येत चालला होता. भागिरथीच्या तुळशीपाशी जाऊन भिवाण्णानी सुकलेल्या तुळशीवरून उगाच सुरकुतला हात फिरवला. भागिरथीच्या आठवणीने कसनुसा झाला. तुळशीला म्हणाला, "ती गेली सोडून, आन् मला ठिवलया मागं ह्ये सगळं सोसाया..."

पोरगा तरी कसला वैर्‍यासारखा निघाला!!

त्याला आठवलं, बरोब्बर दीड वर्षापूर्वी, गावात सांगावा आला होता, गाव खाली करायचा, धरण बांधायचं होतं म्हणे सरकारला!! जे काय नुकसान भरपाई असेल ते सरकारच ठरवणार आणि देणार होतं. गावातली जुनी नवी माणसं चक्रावली, नाराज झाली. कितीतरी सभा, पंचायती, वाद विवाद - खूप काय काय घडलं! लोक पार जेलातही जाऊन आले! आपणही गेलो होतो. म्हातारं हाड असल म्हणून काय झालं?

..... पण शेवटी सरकारी नांगर फिरायला हळूहळू सुरुवात झाली होती, आणि लोक आजपर्यंत जिथे रुजले, जगले तिथून विस्थापित म्हणून बाहेर पडायला लागले होते.... न राहवून आपणच लेकाला पत्र लिहून बोलावून घेतलं, शहरात शिकलेला आपला लेक या साहेब लोकांशी बोलेल अशी आपली भाबडी आशा. लेकही पोचला, साहेब लोकांबरोबर ३-४ बैठकी झाल्या अन् एक दिवस खालच्या वाडीतला व्यंकप्पा सांगत आला की लेकाने जमीन विकली.... ऐकलं आणि भागिरथी तिथेच कोसळली ती उठलीच नाही! आपल्याला वेड लागायच बाकी राहिलेलं! किती परीन समजावलं पोराला, पण त्याच्यावर ढिम्म परिणाम झाला नाही!! गावात छिथू झाली ती वेगळीच... आपल्या आईला विकणारा शेतकरी तो कसला? कसाब बरा रे बाबा त्यापेक्षा....

आणि आता पोरगं म्हणतय की चला शहरात. कशाला? तिथं कोण आहे माझं? हे पोरग काय माझं नाही. मी का जाऊ? नाही, नाही मी नाही जाणार, मी माझ्या काळ्या आईला नाही सोडणार....

"अण्णा कापडं भरली का तुमची बॅगेत?" पोराने आवाज दिला.

भिवाण्णाने उत्तरच दिलं नाही... तो घराबाहेर पडताना पाहून पोराने विचारलं, "कुठे चालला आता रात्रीचं?"

"शेतावर जाऊन येतो जरा....."

"आत्ता कुठे या वेळी, कुठे पडाल बिडाल... नसतं झेंगट होईल.... उद्या निघायचं आहे आपल्याला, मला सुट्टी नाही जास्त...."

"पडलोच, आन् जड झालो का टाकून दे शेतात आपल्याच..." भिवाण्णा तिरमिरीतच बाहेर पडला. पोराने वैतागून बापाचे कपडे एकत्र करायला सुरुवात केली.....

भिवाण्णा शेतात पोचला होता. घरी तगमगणारा त्याचा जीव निळया काळ्या लुकलुकणार्‍या आभाळा़खाली आणि काळ्याईच्या स्पर्शाने हळू हळू निवत गेला. " माय गं, न्हायी गं जावस वाटत तुला सोडून.. पर म्या काय करू गं, मला कायबी कळंना बग... समदी माजीच चूक हाय.... काळी माय, काळी माय, कधी काळी मापी करशीला का गं मला...." भिवाण्णा स्फुंदत स्फुंदत काळ्या मायेच्या कुशीत कधी विसावला, त्यालाही कळलं नाही.

सकाळी बाप घरात नाही म्हणून पोरगा, बापाला बघायला शेतावर पोचला...

बघतो तर काय, भिवाण्णा शांतपणे त्याच्या काळया मायच्या कुशीत पहुडला होता.

भिवाण्णाचं म्हणण शेवटी तसबिरीतल्या देवानं ऐकलं होत. भिवाण्णाच्या काळ्या मायशी त्याची ताटातूट टळली होती. त्याच्या मनासारखं झालं होतं......

विषय: 
प्रकार: 

छान. धरणग्रस्तांचे जीवन चांगले रेखाटले आहे.

छान. आवडली कथा. कथेचा ग्रामीण बाज चांगला ठेवला आहे. ग्रामीण भाषेतील संवाद व्यवस्थित जमले आहेत.

छानच लिहीलयस!!
भिवाण्णाची मनस्थिती सुरेख चितारली आहेस.

सुरेख. कसलं भावणारं लिहितेस तू. आवडलं...
-प्रिन्सेस...

predictable........
पण मांडणी , वाक्यरचना... संवाद अतीशय सुरेख आहेत ... छान लिहिलेय .

छान लिहिलेस. माडगुळकरांच्या माणदेशी माणसांची आठवण झाली.

छान आहे कथा....आवडली

छान आहे लिखाण!!

केदार, किशोर, चेरी, पन्ना, प्रिन्सेस, आश्विनी, लोपा, रमणी, अजय, स्वाती खूप धन्स कथा वाचून अभिप्राय दिल्याबद्दल Happy

लोपाला पुर्ण अनुमोदन!
छान आहे कथा!
Happy

सुंदर कथा, आयटे. अगदी साटप, भषेचा बाजही सुंदर. भिवण्णा आवडलाच.

खुपच छान!
वाचकाला अगदी शेवटपर्यंत कथेशी गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतेस. Keep it up.

छानच लिहिलंयस, शैलजा.
सदानंद देशमुखांचं "बारोमास" वाचलंयस का? नसेल तर जरूर वाच. धरणग्रस्तांवर नाहीये पण दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांवर आहे.
आपल्याला तर अंदाजही येत नाही की माणसं अशाही परिस्थितीर राहतात !

गोबूदा, दाद, अमोल अनघा, संदीप खूप खूप आभार तुम्हां सार्‍यांचे कथा वाचल्याबद्दल आणि ती आवडली हे सांगितल्याबद्दल.
.
खरय संदीप..

भिवाण्णा भिडला. छान आणि नेमक लिहीलयस.

शैलजा, फार छान लिहिले आहेस!

डोळ्यांत पाणी आणलंस वाचता वाचता! मन गलबलून गेलं...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...

खुपच छान आहे. बहिण भावाचे नाते खुप सुंदर सादर केले आहे.

क्या बात है, तुझी प्रतिभा तर दिवसेनदिवस बहरत चालली आहे.. अजुन एक कथेची मस्त मांडणी त्यातल्या त्यात तु भिवाण्णाच्या भावना खुपच छान प्रकारे व्यक्त करुन दाखवल्या आहेत. बाकी ईतरान्नीही योग्य अभिप्राय दिलाच आहे. तुझ्या पुढच्या लेखनाला शुभेछा:

अमिता, अमित, आशू, समीर, संकेत, दीपूर्झा तुम्हां सार्‍यांचे आभार Happy

शैलजा,
मला फार आवडली तुझी कथा. आणी भाषेचा बाजही चांगला राखला आहेस.
जियो!
अन्जलि

शैलजा. खुप छान लिहिलयेस. भिडलं अगदी..

अंजू आणि सरिविना (असच म्हणायच का तुमचं नाव?) धन्यवाद.