ईतिहासात कुणी आणि का रमावं ?

Submitted by असो on 18 January, 2011 - 04:39

एक प्रश्न विचारतो..

खालीलपैकी कशासाठी आपण स्वेच्छेने वेळ द्याल ? किंवा कोणता विषय आपल्या विशेष आवडीचा आहे ?

१. छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरूषांच्या जन्माबाबत असलेल्या वादामधे योगदान देणे
२. रामजन्मभूमीच्या जागेवर मंदीर/मशीद/ बुद्धविहार यापैकी काय होते हे शोधून काढणे
३. आर्य भारतात कुठून आले यावर झगझगीत प्रकाश टाकणे
४. प्राचीन भाषा संस्कृत कि तमीळ कि प्राकृत याबाबत नवे पुरावे सादर करणे ..
५. इत्यादि इत्यादि

या प्रश्नाला जोडूनच एक उपप्रश्न स्वाभाविकरित्या विचारावासा वाटेल आणि तो म्हणजे

आपलं योगदानाचं स्वरूप काय राहील ?

१. मुलभूत संशोधन करणे, इतिहासाची साधनं, चिन्ह यांचा उपयोग करून कोडी सोडवणे
२. आधी झालेल्या संशोधनाचं विश्लेषण करणे
३. इतर ईतिहासकारांचे लेख, पुस्तके वाचून स्वतःला अपडेट ठेवणे..
४. नेटवर किंवा खुल्या मैदानात समोरासमोरच्या चर्चांमधे सहभाग घेऊन आपल्या ज्ञानाच्या जोरावर समोरच्यास अस्मान दाखवणे. माघार न घेता मुद्दे मांडत राहणे आणि वेगवेगळ्या लिंक्स देत गोंधळ घालणे..
५. इत्यादि इत्यादि..

एक आठवड्यापूर्वी माझ्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच स्नेहसंमेलन होतं. आम्ही खूप वर्षांनी जमत होतो. एकमेकांना ओळखूही येत नव्हतो. ज्या सरांनी पुढाकार घेऊन हे स्नेहसंमेलन घडवून आणल त्यांच्याकडे प्रत्येकाची अद्ययावत माहीतीही होती. कॉलेजमधून शिकलेल्या आणि जीवनात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची भाषणं ऐकणं हे एक भाग्यच असतं.

एक माजी विद्यार्थी खूप लांबून आलेले आणि आवर्जून भाषण करायचंय म्हणत होते. खूप साधे वाटत होते. त्यांनी स्वतःबद्दल सांगायला सुरूवात केली.
ते कॉलेजला लोणावळ्याजवळच्या एका खेड्यातून येत असत. डोंगरद-यांचा भाग. सकाळची पहिली लोकल गाठून कॉलेजला पोहोचले कि पावणेनऊ वाजलेले असायचे. पहिलं लेक्चर पावणेअकराला असायचं...

त्यांनी परवागी काढून ड्रॉईंग हॉल उघडून घेतला. सकाळच्या त्या वेळात ते तिथं जाऊन अभियांत्रिकी ड्रॉईंग्ज करीत बसत. याच पद्धतीनं इतरही विषयांचा अभ्यास ते करीत. ते म्हणतात मी हुषार कधीच नव्हतो. पण मेहनतीच्या जोरावर मी शिकलो.

नेहमी कान आणि डोळे उघडे ठेवण्यामुळं ते नोकरीत न रमता व्यवसायात पडले. आज महाराष्ट्रात इन्फास्ट्रक्चरच्या क्षेत्रात त्यांना मोठा मान आहे. एका प्रसिद्ध कंपनीचे ते मालक आहेत. त्यांच्या कंपनीच्या आयपीओ कडे खूप जणं डोळे लावून आहेत. त्यांचं नाव इथं देत नाही , इतकंच सांगतो दोन प्रमुख शहरांना जोडणा-या एका महामार्गाचं सहापदरीकरण करण्यासाठी आणि त्याच्या टोलसाठी त्यांनी शासनाला २१०० कोटी रूपयांचा एकरकमी चेक दिलाय. खेड्यातल्या या मुळाची ही झेप थक्क करणारी आहे. (मायबोली प्रशासनाची अनुमती मिळाल्यास त्यांची मुलाखत घेऊन इथं प्रसिद्ध करता येईल ).

दुसरं उदाहरण मित्राचं.

त्याच्या आईने रस्त्यावर भाजी विकली. एक भाकरी आठ जणात खाल्ली अशी परिस्थिती. भाऊ नोकरीला लागला. हा धाकटा. एकदा वाचलेलं लक्षात ठेवणारा.. पण पुस्तकी किडा नाही. सतत इंजिनियरिंग वर्कशॉप्स, कारखाने इथं त्याचा वावर असायचा.

एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीत नोकरीस लागला. त्या निमित्तानं खूप लोकांशी परिचय झाला. एका मारवाड्यानं त्याला नोकरी सोडण्याबाबत सुचवलं. तुझं डोकं आणि माझा पैसा अशी भन्नाट ऑफर दिली. तरी याणे चार वर्ष नोकरी करून व्यवसाय केला. या दरम्यान झोप केवळ चार तास. इतर वेळी फक्त काम ..!!!

पुढं ते वर्कशॉप फायद्यात आल. दोघांच्यात मतभेद झाले तरी याने नोकरी सोडून स्वतःच्या बळावर व्यवसाय केला. मायक्रोअलाईड स्टील मधे इआरडब्लू स्टीलच उत्पादन सुरू केलं. आज दोन हजार कोटीचा टर्न ओव्हर आहे. तो वाढणार आहे.. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्याच्या स्टील ट्यूबला मागणी आहे. अभिमानास्पद कामगिरी वाटली त्याची..

आणखी दोन मित्रं अभ्यासात मागे असायचे. कॉलेज संपल्यानंतर खूप खस्ता खाल्ल्या. कष्ट घेतले. आज पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपाला आलेत. जंगली महाराज रस्त्यावर एका स्वतंत्र आणि देखण्या इमारतीत त्यांच कार्यालय सुरू आहे..

असे खूप जण भेटले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाणारेही बरेच जण भेटले.

समाजाचा एक हिस्सा आज फक्त विकासाच्या मागे आहे. त्यातून स्वतःचा, कुटूंबाचा आणि समाजाचा आणि पर्यायाने देशाचाही विकास होतोय. या लोकांना इतिहासात रमायला वेळ नाही. आज आणि उद्या हेच त्यांचं ब्रीदवाक्य आहे. तर उर्वरीत समाजाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. त्यांच्यापुढं या विद्यार्थ्यांचा आदर्श असायला हवा आणि संधी मिळताच ते सिद्धही होत आहे. इतिहासातल्या ज्ञानाचं कुणालाच काही पडलेलं नाही. या यशस्वी लोकांची मानसिक जडणघडण या प्रकारची आहे. चुकांमधे अडकून पडण्यापेक्षा भविष्यात चुका होणार नाहीत याकडे त्यांचा कटाक्ष आहे.

या उलट पुढच्या बाकड्यांवर बसणारी मुलं आज खूप चांगल्या हुद्यांवर निरनिराळ्या कंपन्यांत आहेत. गलेलठ्ठ पगार आहे. त्याचा त्यांना अभिमानही आहे. पण हे आयुष्य कुणालाच प्रेरणा देऊ शकत नाही. सगळे प्रश्न सुटलेले असल्यामुळं मग अशा वर्तुळात केवळ बुद्धीला खाद्य म्हणून ईतिहासात रमणं सुरू होतं. (हे विधान सरसकट सर्वच पुढच्या बाकड्यांवर बसणा-या विद्यार्थ्यांना उद्देशून नाही. तसं म्हणणं अन्यायकारकच आहे.. )

मागे एकदा आगाऊ यांना त्यांच्या पोस्टचे कॉपीराईटस मागितले होते. दिले असते तर कायदेशीर रित्या ती पोस्ट वापरता आली असती.. आता बेकायदेशीर रित्या वापरावी लागेल याच वाईट वाटतंय.

एक गोष्ट इथं स्पष्ट कराविशी वाटतेय.

सहजरित्या गप्पा म्हणून अशा विषयांबद्दल बोलणा-यांबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. माझा आक्षेप आहे तो आपला प्रोफेशन ईतिहास या विषयाशी संबंधित नसताना त्यावर अधिकाराने वाद घालण्याच्या वृत्तीला !! एखाद दुसरेवेळी ते ही ठीक आहे पण काही जण वारंवार त्याच त्याच विषयावर तेच तेच तुणतुणे वाजवताना दिसतात. ज्याच्या पोस्टस जास्त तो जिंकला असहि काहींना वाटत असावं किंवा एखाद्याने उत्तर देण्याचं टाळलं म्हणजे आपला युक्तीवाद बिनतोड होता असंही काहीजणांना वाटत असावं. ही सर्व मंडळी सुशिक्षित ..उच्चशिक्षित आहेत.

समाजाचा एक मोठा भाग असा आहे ज्याला या वादांमधे काडीचाही रस नाही. पूर्वी बेरोजरागार तरूणांच्या भावना भडकवण्यासाठी या वादांचा वापर होत असे. आता त्यांनाही त्यात रस वाटत नाही. स्वार्थ असेल तरच आजचा तरूण अशा तंबूंमधे दाखल होतो. स्वार्थ साधता येत नसेल तर सरळ दुस-या तंबूचा रस्ता धरतो.. महापुरूष / देव / धर्म यात सकारात्मक तेच घेण्याकड लोकांचा कल असतो. चांगल ते घ्या आणि कामाला चला हा त्यांचा साधा मंत्र आहे. असे लोक यशस्वी म्हणता येतील .. या लोकांना प्रॅक्टीकल लोक म्हटलं जातं.

नेटवर सर्वत्र चाललेले वाद हे बहुतकरून ऐतिहासिक विषयांवरच होतात आणि शेवटी जातीय वळणावर संपतात. प्रत्यक्ष जीवनात आपण इतके जातीयवादी असतो का ? पण हे वाद निष्कारण डोकं खराब करतात. ऑफीसच्या वेळेत, ऑफीसच्या खर्चात वाद घालून विविध प्रश्नांवर प्रशासन काय करतंय असा सवाल करणा-यांबद्दल तर बोलायलाच नको.
.
ईतिहासात कुणी आणि का रमावं ?

आज इतिहास म्हणजे काही संघटना आणि पक्ष यांचं दुकान आहे. ईतिहासकारांनी त्यात रमण्याबद्दल काहीच ना नाही. उलट फक्त त्यांनीच त्यात लुडबूड करावी असं माझं प्रामाणिक मत आहे. इतरांनी त्यात संशोधनपर भाष्य करण्याऐवजी स्वतःच्या क्षेत्रात इतिहास घडवावा.

विठठल कामत, डी एस कुलकर्णी, रतन टाटा इ . यांची आपल्या पहिल्या परिच्छेदातील प्रश्नांबाबत मतं कधीच ऐकण्यात / वाचनात आली नाहीत. या लोकांना कसलीच माहीती नाही किंवा त्यांचं वाचन नाही असा अर्थ कुणी काढू नये. मग माझ्यासारख्यांनाच या वादात आपलं मत जोरजोराने मांडावंस का वाटतं ? मला हा प्रश्न नेहमी सतावतो.

अर्थात, जी भूमिका इथं मांडलीये तिला दुसरीही बाजू असू शकते जी अल्पमतीच्या मर्यादेमुळं विचारात घेता आली नसावी. ती बाजूही समजून घ्यायला नक्कीच आवडेल..

धन्यवाद.

- अनिल सोनवणे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभाकर करंदीकरजी..

मस्त लिहीलत.

इतिहासात 'रमावे' का असा प्रश्न उपस्थित केला तर त्या 'रमण्या'ची नेमकी कोणती अर्थछटा आपल्याला अभिप्रेत आहे ते आधी प्रश्नकर्त्याला स्पष्ट करावे लागेल. मग पुढची चर्चा!

हा प्रश्न माझ्यासाठी आहे का ? एव्हढ्यासाठीच विचारल कारण लेखात माझं म्हणणं मांडून झालेलं आहे. आणि तुम्ही रोखठोक भाषेत पुरेस स्पष्ट केलं आहे. विशेषतः इतिहास संशोधक ही अल्पसंख्यांक जमात .. वगैरे खूप मस्त लिहीलय.

प्रभाकर [बापू] करंदीकर

छान लिहिले आहे.

आपल्या घराच्या व्हरांड्यात बसून किंवा चहाच्या टपरीत बसून ते आपली 'एक्स्पर्ट कॉमेंट्री' येइल-जाइल त्याला ऐकवतात >>>

हे फक्त आता थोडे बदलता येइल ते असे - आपल्या घराच्या व्हरांड्यात बसून किंवा चहाच्या टपरीत बसून किंवा मायबोली अथवा तत्सम मायाजालातील स्थानावर ते आपली 'एक्स्पर्ट कॉमेंट्री' येइल-जाइल त्याला ऐकवतात. (असे येथे मायबोलीवर बरेच आहेत Wink )

प्रभाकर बापू करंदीकर
एकदम भन्नाट पोस्ट.. तुमच्या पोस्टमुळे इथं पुन्हा उपस्थिती लावायचा मोह आवरला नाही. किमान तुम्हाला दाद तर द्यायलाच हवी.

तुमचा २(अ) हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. त्याबाबत अनास्था दाखवली गेली तर निव्वळ लोकप्रिय अथवा झुंडशाहीला मान्य असा इतिहास उरेल. माझे एक मैत्र (कै.) घनःशाम पोटभरे जे अहं ब्रह्मास्मि या नावाने परिचित आहेत त्यांनी सत्य म्हणजे काय याबद्दल थोडक्यात असं लिहीलं होतं

सत्याचे पदर -
माझं सत्य
तुमचं सत्य
त्यांच सत्य
आणि
निखळ सत्य

यातल शेवटचं निखळ सत्य जे आहे ते इतिहासात डोकावून संपूर्णपणे शोधणं हे अत्यंत अवघड आहे.
उदा. एकाने सांगितलं होतं आर्य चाणक्य नावाची व्यक्तीच झाली नाही. चंद्रगुप्ताच्या वेळीच उपस्थित असलेल्या ग्रीक वकिलाने इंडिका नावाचा ग्रंथ लिहीलाय त्यात अनेक व्यक्तींचे उल्लेख येतात पण आर्य चाणक्याचं जे महत्त्व आहे त्याप्रमाणे त्याचा उल्लेख एकदाही नाही असं का ?

त्यावर मी इंडिकाबद्दल माहीती घेतली असता असं आढळून आलं कि इंडिका हा ग्रंथ आज पूर्ण स्वरूपात उपलब्ध नाही. त्यातली निम्म्याहून अधिक पानं नाहीशी झालेली आहेत. अशा परिस्थितीत आर्य चाणक्याच्या अस्तित्वाबाबत इंडिकाचा हवाला देऊन ठाम विधान करणं हे इतिहासाच्या मुलभूत नियमात बसतं का ?

आता इथं प्रश्न असाही उपस्थित होऊ शकेल कि मग आर्य चाणक्य होऊन गेले हे तुम्ही सिद्ध करा.
याला वादासाठी वाद असं म्हणता येतं..

सर्वात आधी जे विधान केलं गेलं आहे त्याच्याबद्दल आणि ते ज्या साधनांचा वापर करून गेलं आहे त्याचा निकाल काय आहे हे पाहीलं गेलं पाहीजे त्यानंतर दुस-या प्रश्नाकडे वळता येईल. यासाठी आर्य चाणक्य इतिहासात कसे आले इथून सुरूवात करून त्यातली संदर्भ सूची धुंडाळावी लागेल. त्यातले संदर्भ तपासून मगच त्याबद्दल काही निश्चित स्वरूपाचं विधान करणं योग्य होईल.

आपल्या या उदाहरणात आर्य चाणक्य नव्हतेच असं ठाम विधान केलं गेलंय.. त्याबद्दलच आधी बोलल गेलं पाहीजे. त्याचा निकाल लागला कि चर्चा संपली पाहीजे. आर्य चाणक्य होते हा दुस-या चर्चेचा विषय होऊ शकतो.. ही शिस्त पाळली गेली आणि एकमेकांच्या मतांचा आदर केला गेला तर वादात न उतरणारे देखील त्यात आपलं योगदान देऊ शकतील.

सध्या होतं काय कुठल्यातरी अभ्यासवर्गात जाऊन कधी कानावर न पडलेलं ज्ञान कधी दुस-यांना दाखवतो अशी घाई झालेली मंडळी सर्वत्र उच्छाद मांडत आहेत. एक आपल्यालाच आता ब्रह्मज्ञान झालेलं आहे आणि इतर सर्व अज्ञानी पामर आहेत या अविर्भावात मग गरज नसताना त्या बिच्चा-या मेकॉलेचा उद्धार करूनच चर्चेत उडी घेतली जाते. मेकॉलेला इतकं झोडपलं जातं कि बस्स !

मेकॉले, त्याची शिक्षणपद्धती यांचा उद्धार केला कि आपण बुद्धिजीवी आहोत हे इतरांना पटतं असा काहीतरी समज या लोकांचा झालेला दिसतो. बरं मेकॉले चुकीचा होता तर त्या काळात काय करायला हवं हवं होतं या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नसतं. मग पुन्हा अभ्यासवर्ग किंवा वरिष्ठांकडे शंकासमाधान आणि पुन्हा युद्धात उडी असं चालतं.

आणि मग त्यांचं हळूहळू इतिहासात रमणं सुरू होतं.. या सर्व मंडळींबाबतचं माझं निरीक्षण अगदी ठाम आहे. ही मंडळी प्रचारकी इतिहासावर विश्वास ठेवतात. सत्याबाबत त्यांचा आग्रह नसतो. सोयीचा असा इतिहासच त्यांना आवडतो आणि त्याला विरोध चालत नाही. बरं, ज्या संघटनेमधे हे शिक्षण मिळतं त्या संघटनेशीही दूरान्वयेच संबंध असतो. एखाद दुसरा अभ्यासवर्ग करून मंडळी चार्ज झालेली असतात. बसल्या बसल्या झालेत आपल्या हातून संघटनकार्य तर करावे हा हेतू यामागे असतो. तेव्हढाच आपला हातभार म्हणून या अशा ठिणग्या पडत असतात. ही स्वतःची आणि पर्यायाने ज्या ज्या विचारसरणीचे ते पाईक म्हणवतात त्या विचारसरणीचीही शुद्ध फसवणूक आहे. अशा मार्गाने कुणी तयार होत नाही.

खरे कार्यकर्ते मात्र निष्ठेने फील्डमधे चिवटपणे काम करत असतात. लोकांशी संपर्क साधत असतात. त्यांच्याच कडून कार्य होत असतं. अद्ययावत माहीती / ज्ञान देखील त्यांच्याकडेच असते. त्यांच्याशी चर्चा करताना असे विचित्र अनुभव येत नाहीत.

हे सर्वच प्रकारच्या विचारसरणींनी प्रभावित लोकांना उद्देशून आहे जे निव्वळ ऐकीव / अर्धवट माहीतीने चार्ज झालेले आहेत. कुणी एकाने स्वतःवर ओढवून घ्यायची गरज नाही.

कंरदीकर आपले पोस्ट आवडले.

कंरदीकरांनी लिहिल्यासारखे "रमणे" ह्या शब्दात घोळ आहे. संशोधक (सगळ्याच विषयातील) नेहमीच अल्पसंख्य असतात. बाकी म्हणायचे तर उदाहरणार्थ पुण्यातील रिक्षावाला पण अमेरिकन इकॉनॉमीवर ठाम मत बाळगुन असतो. Happy बायदवे संशोधकही इम्युचर सारखे भांडत असतात. स्पेशली इतिहास विषयात. ( उदा रोमिला थापर - बी बी लाल भांडण, रोमीला थापर विरुद्ध सरस्वती आहे म्हणणारे इतिहासकार इ इ)

बेफाम : तुमचे वरचे पोस्टही आवडले.
सध्या होतं काय कुठल्यातरी अभ्यासवर्गात जाऊन कधी कानावर न पडलेलं ज्ञान कधी दुस-यांना दाखवतो अशी घाई झालेली मंडळी सर्वत्र उच्छाद मांडत आहेत. एक आपल्यालाच आता ब्रह्मज्ञान झालेलं आहे आणि इतर सर्व अज्ञानी पामर आहेत या अविर्भावात >>

अनुमोदन्! शिवाय इंटरनेट मुळे सगळेच आता पंडित होऊ पाहत आहेत. अपडेट ठेवणारा व्यक्ती निदान १० पुस्तक वाचतो, पण ज्यांना पटकन प्रभाव टाकायचा आहे ते सगळेच कुठल्याश्या "लिंक" वरुन मत बणवून मांडत फिरतात. शिवाय जातीय विभागणीमुळे ह्याला जातीय धार येऊ घातली आहे, नव्हे आली आहे. म्हणून मग प्रत्यक्षात जसे तुकाराम, शिवाजी, दादोजी, लेन ह्यावरून भांडण होते तेच इथे अशा साईटवर पण होते. परत त्यात काही स्वतःला हुशार समजणारे आडनाव पाहून त्याला गरज नसताना जातीय रंग देण्याचा प्रयत्न करतात. हे दुर्दैव आहे पण मग स्वतःची न्युसन्स व्हॅल्यू इतरांना कशी कळेल? आणि म्हणून सोनवने म्हणतात ती भांडणे नेट वर उदभवतात.

पहिल्या पोस्ट मध्ये मी मांडले की दोष ह्या अशा लोकांचा आहे, इतिहासाचा नाही.

इतिहास या विषयात रमण्यासाठी जी प्रगल्भता आवश्यक आहे ती ज्यांच्याकडे आहे त्यांनी इतिहासात रमण्याला काहीच हरकत नसावी. यामुळं कटुता, द्वेष वाढीस लागणार नाही या नोटवर या चर्चेचा समारोप व्हावा असं मला वाटतं..

धन्यवाद.

लेख आवडला आणि बापू करंदीकरांची पोस्टही.
इतिहासाचे विश्लेषन करताना ते नि:पक्श्पणे न करता झालेल्या गोष्टी कोणत्यातरी 'कॉनस्पिरसी'चा भाग होत्या आणि ती आम्ही उघडकीला आणून तुमचे डोळे उघडत आहोत हा अ‍ॅप्रोच सगळ्या वादाला कारणीभूत आहे.
माझ्या त्या 'अनकॉपिराईटेड' पोस्टचा वापर कधीच करायला लागू नये हीच इच्छा!

वाद कोणी कोणत्या विषयावर घालावे याला खुप मह्त्व आहे .....
( म्हणजे माझ्या सारख्याने पुराणे , वेद , स्त्रोत्र ,गीता ,महाभारत , रामायण , ईतिहास, प्रकाशचित्र , डिजटल आर्ट , परदेशातील अनुभव , या वर उगीचच मुक्ताफळे उधळने )
उगीच पुस्तके वाचुन , ईतिहास , संदर्भ ग्रंथ , यांचे संदर्भ देउन काय उपयोग मला नेहमी आसे वाटते की त्याने तसे लिहले ,याने आसे म्हटले , आणी हा पुरवा म्हणुन आम्हाला सांगत सुटलाय मला नेहमी असा प्रश्र पडतो की आरे बाबा तुझ काय ?
मी मध्ये कुठेतरी वाचले की एखाद्या पुस्ताकाला वाळवी लागुन ती पुस्तक पुर्ण भस्म करते म्हणुन काय पुस्तकातील ज्ञान तीच्या डोक्यात उतरत नाही .

इतिहासाचे विश्लेषन करताना ते नि:पक्श्पणे न करता झालेल्या गोष्टी कोणत्यातरी 'कॉनस्पिरसी'चा भाग होत्या आणि ती आम्ही उघडकीला आणून तुमचे डोळे उघडत आहोत हा अ‍ॅप्रोच सगळ्या वादाला कारणीभूत आहे.>>>>

अनुमोदन. पण हे करणार्या व्यक्तीला वादच तर हवा असतो. मग कुठुन तरि लिंकवरुन नाहितर पुस्तकातुन शोधुन कोपी करुन नाहितर अनुवादित करुन लिहिले जाते आणी मग आपण कसे भारी लिहिले आहे ह्याबद्दल आपल्या कंपुला आणुन त्यांच्याकडुन पहिल्या काहि पोस्ट लिहुन उदो उदो करुन घेतेले कि मग खरे काय आणी खोटे काय! मग सगळा मनसे आणी बिग्रेडी स्टाइल कारभार.

मी खूप नियमितपणे इथे येत नसल्याने हा धागा आज वाचनात आला...
वरती उल्लेख केलेल्या पहिल्या/दुसर्‍या पायरीवरची व्यक्ती या नात्याने इथे थोडंसं लिहावसं वाटतंय..
मी स्वतः संशोधक आहे आणि इथे फारशी वादविवादात भाग घेत नसते.. माझ्यासारखेच आणखीही काही जण निश्चित असतील इथे.
स्वतःला फार शहाणी समजते म्हणून नाही पण खरंचच इथल्या वादांमधे भाग घ्यायला वेळ नसतो. इथले बहुतेक वाद हे बर्‍याचदा अर्धवट आणि न पडताळलेल्या माहितीवर, पूर्वग्रहांवर, काही सामाजिक राजकीय विचारसरणीची ठाम भूमिका घेऊन घातलेले असतात. शिवाय शिवाजी, आर्यप्रश्न आणि रामजन्मभूमीवाद याच्या पलिकडे काही भरीव इतिहास आहे याचा विचारसुद्धा फारसा कुणाला करायचा नसतो.
मुळात इतिहास वगैरे बाबी सखोलपणे अभ्यासायच्या तर इतर शास्त्रशाखांप्रमाणेच त्याला किमान काही वर्षांचं पदव्युत्तर प्रशिक्षण लागतं, उपलब्ध, प्रकाशित पुराव्यातही सत्यासत्याता पडताळून घ्यावी लागते इ. गोष्टी बर्‍याच जणांच्या लक्षात येत नसाव्यात. इतिहास ही इतिहासकाराची एकट्याची मक्तेदारी नव्हे पण कुणीही उठावं आणि स्वतःला जी माहिती (ज्ञान नव्हे) आहे ती अंतिम सत्य आहे अशा थाटात अभिनिवेशात विधानं करावीत हेही उचित नव्हे...
सॉरी टु से, ५-७ पुस्तकं पाहून/वाचून आणि नेटवरची माहिती वाचून हिरीरीने वाद घालणं तसं तुलनेने सोपं असतं पण आम्हा संशोधकांची एक अडचण असते. एकतर आम्ही सगळेजण स्वतःच्या स्पेशलायझेशन मधे काम करतो त्यामुळे सगळा इतिहास आपल्याला माहितीये असा भ्रम अजिबात नसतो. मग ज्या विषयावरचा वाद चालू आहे त्यातल्या मूळ पुराव्यांची पडताळणी करून, सत्यासत्यतेची शहानिशा करून त्यावरचे ऑथेंटिक संदर्भ पाहून मग मतप्रदर्शित करायचं हे जरा वेळखाऊ काम असतं आणि मग त्यापेक्षा स्वतःचं संशोधन, प्रोफेशनल डेडलाईन्स खुणावत असतात. संशोधन हे खरंचच दिवसातले २४ तास खाणारं काम असतं. जितका वेळ मिळेल तेवढा कमीच असं वाटतं. अशा कारणांमुळे नेटवरच्या वादात अभावानेच पहिल्या-दुसर्‍या पायरीवरची लोकं उतरतात.
यातनं माझ्यापुरता मी काढलेला उपाय म्हणजे माझ्या कामासंबंधी काही लेखन करून ते इथे टाकायचं. ज्यांना रस आहे ते वाचतील, नवी माहिती जाणून घेतील. आत्तापर्यंत खूप लिहू शकले नाहीये पण जशी जमेल तशी हळूहळू लेखनसामग्रीची जमवाजमव चालू आहे.

यात कुणालाही दुखवण्याचा हेतू नाही अथवा कमी लेखण्याचा उद्देश नाही. मी मायबोलीवर गेली १० वर्षं येऊन जाऊन आहे. (अगदी सुरुवातीला आर्य-बिर्य वादातही लांबलचक पोस्ट्स लिहिल्यात. पण जसं प्रोफेशनल प्रेशर वाढत गेलं तसं हे सगळं बंद झालं.) मला प्रामाणिकपणे जे वाटतं ते लिहिलंय..

वरदा,
एकदम मस्त पोस्ट आणि तुझ्या पुढील संशोधनाची वाट पण पहात आहे.
मागे महाराष्ट्राचा पुर्व इतिहास लिहिताना तु काही गोष्टी लिहिल्या होत्यास की
गुडघ्यापासुन पाय कापुन पुरलेले लोक मिळाले. गोल आकाराची घरे मिळाली.
वाचताना असे जाणवले की इतिहास संशोधक असल्यामुळे तु फक्त माहिती दिलीस
पण इन्फरन्सेस पुरेशा पुराव्या अभावामुळे लिहिले नाहीस.
मागे कुठल्याश्या मासिकाने स्पर्धा ठेवलेली
"Things You Believe But Cannot Prove"
अशी मोकळिक असल्यास तु या लोकांबद्दल काय लिहीशील.

तुझा असा लेख वाचायची उत्सुकता आहे.

वरदा उत्तम पोस्ट !हापण जे लिहितो त्याची जोपर्यंत जबाबदारी आपल्यावर नसते तो पर्यंत असे अर्ध्या हळकुंडाचे वाद होतात. जेंव्हा एक प्रोफेशनल म्हणुन तुम्ही लिहिता तेंव्हा एक जबाबदारी असते व त्यामुळे आपल्या मर्यादा व ज्ञान (नुसती माहीती नव्हे) ह्यांच्य कक्षेतच लिहीले जाते.

इथल्या बर्याच वादांचा उद्देश ज्ञान वाढवणे सत्य पडताळणे हा कधिच नसतो... एक वेळा घालवायचे व मनोरंजनाचे साधन म्हणुन इथले वाद असतात असे म्या पामराला वाटते Happy

वरदा उत्तम पोस्ट.
पेशव्याला अनुमोदन, माबोच्या रचनेमुळे जिथे भांडणे तिथे टाचा उंचावून गंमत बघणार्‍यांची संख्या वाढली की धागा हीट!!!

वरदा
छान पोस्ट. नेमके लिहीले आहे. मायबोली वर मी नविन आहे. तुमच्या जुन्या पोस्टि कुठे वाचायला मिळतिल?

वरदा, चांगला लेख.
पेशव्यांना अनुमोदन.
एक वेळा घालवायचे व मनोरंजनाचे साधन म्हणुन इथले वाद असतात असे म्या पामराला वाटते

यात माझा नंबर पहिला. कश्शातले काही माहित नाही, पण 'जिथे भांडणे तिथे टाचा उंचावून गंमत' बघण्यासाठी नि जाळ कमी झाला तर थोडे तेल ओतून, फुंकर मारून तो अधिक भडकवायचा हे माझे 'अमोल' वरदान या मायबोलीला.

वरदा, तुम्ही कितीहि पुरावे दिले तरी इथले काही लोक स्वतःचे मत सोडणार नाहीत!
असे म्हणतात, ज्ञानाच्या एका पणतीने अज्ञानाचा अंधार दूर होतो. पण दिसली रे दिसली पणती की जिवाचा आटापिटा करून, स्वार्थापायी, ती विझविण्याचे काम करणारे लोक फार फार फार वाढले आहेत.

झक्की, म्हणून तर मी इथल्या कुठल्याही इतिहास, संस्कृती, धर्म अशा विषयांवरच्या वादात फारफारफार क्वचित जाते Happy

पण इथे तुमच्या सारखे, ज्ञानी, अभ्यासू, हुषार लोक येतात अधून मधून. त्यांच्याशी वैयक्तिक पत्रव्यवहार करून सर्वांनी मिळून जगाचे कल्याण होईल असे काहीतरी करावे असे वाटते.
सार्वजनिक वाद विवाद आमच्या सारख्या रिकामटेकड्या लोकांवर सोपवा.
आम्हाला संस्कृती, धर्म, इतिहास, भूगोल, राजकारण, साहित्य, कला, आणखीहि बर्‍याचश्या गोष्टी यातले काही म्हणता काहीहि माहित नाही, पण त्याबाबतची आमची जेव्हढी मूर्खासारखी मते आहेत त्यावर आम्ही ठाम आहोत. तुम्ही कितीहि प्रयत्न केलात तरी ऐकणार नाही!

झक्की, मला माझं ज्ञान, अभ्यास किती तोकडा आहे याची पूर्ण कल्पना आहे तेव्हा मला या विद्वान कॅटेगरीत बसवू नका.
मीही इतरांसारखीच एक मायबोली सदस्य आहे. माझा पेशा वेगळा आहे एवढंच.. जसे लोक संगणकतज्ज्ञ, इंजिनीअर, डॉक्टर असतात तशी मी पुरातत्त्वशास्त्रज्ञ आहे, जे सहसा फारजण करिअर म्हणून निवडत नाहीत. म्हणून लोकांना वेगळेपण जाणवत असेल. मला काही तसं वाटत नाही.. हां, मला इतर बहुतेकांपेक्षा धर्म, इतिहास, संस्कृती यातली जास्त समज, माहिती, ज्ञान आहे - कारण माझा पेशाच तो आहे. जसं माझं संगणकाविषयीचं ज्ञान आणि एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनीअरचे ज्ञान यात जमीन-अस्मानाचा फरक असणारच की हो.. तसंच काहीसं आणि काय Happy

>>>> मला एका राजकीय कार्यकर्त्याने सांगीतले की, "त्या दादोजी कोंडदेवाने आमची चांगलीच पंचाईत करून ठेवलीय. तो जातीने बामण होता असं समजून संभाजी ब्रिगेड्ने एव्हढं आंदोलन उभारलं, आपल्यामागे राष्ट्रवादीला फरपटत नेलं; तर आता कोणी म्हणतंय की तो बामण नव्हताच. त्याची जात सीकेपी होती म्हणे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना कधी नव्हे ते एकत्र आलेत आणि संभाजी ब्रिगेड-राष्ट्रवादीच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत. कोकणीत यालाच 'केले तुका झाले माका' असं म्हणतात." आता कोणत्याही वस्तुनिष्ठ इतिहास-संशोधकाने दादोजी कोंडदेव कोणत्या जातीचा होता यावर काही माहिती देण्याची सोय राहिलेली नाही. तो जर म्हणाला की दादोजी ब्राम्हणच होता तर त्याला मनसे-शिवसेना खेटारणार आणि तो सीकेपी होता असं सांगीतलं तर ब्रिगेड - राष्ट्रवादी त्याच्या अंगावर धावून जाणार. कदाचित यामुळेच खरे इतिहास संशोधक तोंडात मीठाची गुळणी धरून गप्प बसले असावेत! <<<<
नशिब, अजुन कोणी "दादोजी कोंडदेव हा दादा कोंडके यांचा पूर्वज होता असे नाही म्हणालय, नै? राजकारणात काय बोवा? काहीही होऊ शकते.! Proud

वरदा, पोस्ट आवडली! स्वाती - "माहिती (ज्ञान नव्हे)" याचे तिच्या लेखातून उत्खनन केल्याबद्दल्ही धन्यवाद. निसटले होते ते Happy

बर्‍याच वेळा आपण एखादी डॉक्युमेंटरी पाहतो, एखादे पुस्तक वाचतो आणि (कोणत्याही) इतिहासाबद्दल आपल्याला तोपर्यंत असलेली माहिती बरीच चुकीची होती असे एकदम वाटू लागते. असे झाले की इतके दिवस "दिसेल त्याला पकडून" मग ते ऐकवले जायचे. आता माबो सारख्या ठिकाणी ते शेअर करावे आणि इतरांची त्याबद्दल मते वाचावीत असे वाटू लागते आणि त्याबद्दल लिहायची प्रचंड खुमखुमी (टण्याच्या भाषेत "खाज" Happy ) निर्माण होते. बर्‍याच वेळा माबोवर मग आपल्या मताच्या विरोधात लिहीलेली पण योग्यपणे मांडलेली मते वाचायला मिळतात - खरे म्हणजे पूर्वी "V&C" वर दोन्ही बाजू चांगल्या मांडल्या जात, त्या प्रमाणात आजकाल बर्‍याच बाफवर एकच बाजू खूप जोरात असते किंवा मग एकदम वैयक्तिक पातळीवरच चर्चा चालू होते.

पण माझ्या मते असे लिहीण्यात काहीच चूक नाही. फक्त आपण जे वाचले तेवढेच एक खरे किंवा त्याबाजूचीच मते खरी आणि बाकी सगळी खोटी असे न मानणे फार महत्त्वाचे आहे आणे ते फार थोडे लोक करतात. आणि हेतूही फक्त आपले "नवीन" मत मांडणे आणि त्यावर इतरांची मते वाचायची इच्छा असणे, आणि त्यातून आपली मते बदलायची तयारी/उदारता असणे एवढाच असला तर त्यात काहीच गैर नाही.

वरदा. कृपया उत्तम माहितीपर लेख लिहिणे. वादविवादासाठी इतर लोक सक्षम आहेत Happy

हल्ली तर मायबोलीवर धागा उघडायचा आनि त्यावर संबंध नसलेले (स्वतःचा काहीही अभ्यास अथवा वाचन नसताना गूगल अथवा विकीच्या सहाय्याने) कसलेही पोस्ट्स टाकायची एक विकृती आलेली आहे. या तथाकथित सुधारणावाद्याचे काही महिन्यापूर्वीचे वर्षभरापूर्वीचे पोस्ट बघितल्यास त्यामधे वेगळेच काहीतरी लिहिलेले असते तो भाग अलाहिदा.

फारेंड, अरे वाद, चर्चा, दोन्ही बाजूची मतं अभिनिवेशाने मांडणे यात चूक काहीच नाहीये.. पण सध्या माबोवरचे वाद फार निरर्थक होत चाललेत.
मी या वादांपासून कटाक्षाने दूरच रहाते, पण या बाफवर खुद्द संशोधक मंडळी नेटवरच्या वादात उतरत नाहीत असा एक मुद्दा/निरीक्षण २-३ लोकांनी व्यक्त केलेलं वाचनात आलं म्हणून मी ही पोस्ट लिहिली... (स्वसमर्थनार्थ??)

नंदिनी, आपकी सलाह सर आंखोंपर.. Happy

वरदा
धन्यवाद. तुम्ही लिहीलत तर आम्ही वाचूच कि हो. उलट तुमच्यासारख्यांनीच लिहावं आणि आम्ही हाताची घडी तोंडावर बोट असं बसून ऐकावं हेच खरं...

एकदा लिप्किनी या पदार्थाबद्दल एका आंतरजालीय फोरमवर बरेच दिवस चर्चा चालली होती. हा पदार्थ चिनी आहे चिनी नाही असे दोन गट पडले होते. कालांतराने एक विद्वान त्या चर्चेत उतरून हा पदार्थ भारतीयच कसा आहे हे तावातावाने पटवून देऊ लागले. एकाने तर त्याची रेसिपीच फोरममधे दिली. एकीने मग लिप्किनी बनवतानचा स्वतःचा व्हिडीओ टाकला त्यात तो पदार्थ कसा आहे चवीला हे तर सांगितलच आणि रेसिपी कुठल्या लिंकवरून घेतली हे ही सांगितलं. त्यावर असहमत होत आणखी तिघांनी व्हिडीओज अपलोड केले. प्रत्येकाचा लिप्किनी वेगळा होता.

एका गरीब दिसणा-या माणसाने मग व्हिडीओ अपलोड केला. त्यात दिलेला लिप्किनी भलताच दिसत होता. त्याला तावातावाने कुठून रेसिपी घेतलीस लिंक दे असा धोषा सर्वांनी लावला.. एकाने तर हा लिप्किनीच नाही. माफी माग असा तगदा सुरू केला.

शेवटी तो गरीब माणूस म्हणाला कि मी एका नावाजलेल्या हॉटेलात कूक आहे. मी हा पदार्थ दोन वर्षांपूर्वी सर्वात पहिल्यांदा बनवला होता आणि त्याची रेसिपी नेटवर लिहीली होती. नाव काय द्यावं हे न सुचल्यानं एका चिनी महिलेचे ओठ पाहून लिप चिनी असं नाव दिलेलं त्याचा अपभ्रंश होऊन आजचं हे नाव झाल आणि मधल्या काळात लिप्किनी बद्दल बरीच चर्चा झाली. लिप्चिनीबद्दलचं माझं पुस्तक हवं असेल तर पाठवतो.

इतिहास संशोधक किंवा पुरातत्व शास्त्रज्ञांची गत अशा चर्चेत त्या कूक सारखी होऊ नये असं मात्र वाटतं. Happy

अनिल,
<<इतिहास संशोधक किंवा पुरातत्व शास्त्रज्ञांची गत अशा चर्चेत त्या कूक सारखी होऊ नये असं मात्र वाटतं.>>
तुमची कळकळ समजतेय मला..
पण तुम्ही माझी पहिली पोस्ट प्लीज परत वाचलीत तर कळेल की मी किंवा इतर संशोधक इथल्या वादात शक्यतो का उतरत नाही ते. आणि त्या अर्ध्याकच्च्या वादांमधे - जिथे कुणालाच शांतपणे विचार करायचा नसतो - डोकं घालण्यापेक्षा मी माझं स्वतंत्र लिखाण करून लोकांपुढे मांडणं जास्त बरं नाही का? वाचकांनी ठरवायचं माझ्या लिखाणाला स्वीकारायचं की वादांमधले इतरांचे मुद्दे स्वीकारायचे! तेवढे स्वातंत्र्य वाचकाला असलंच पाहिजे असं मला वाटतं. माझी विद्वत्ता (??) / विषयातलं कौशल्य सिद्ध करण्यासाठी इथे लिहित नाही मी..(ते सिद्ध करायची व्यासपीठं वेगळी असतात आणि ती अत्यंत कसोटीची असतात हे तुम्हाला मी नव्याने सांगायची गरज नाही..).
तेव्हा जसं जमेल तसं लिहित राहीनच..
कळावे, लोभ असावा ही विनंती Happy

Pages