ईतिहासात कुणी आणि का रमावं ?

Submitted by असो on 18 January, 2011 - 04:39

एक प्रश्न विचारतो..

खालीलपैकी कशासाठी आपण स्वेच्छेने वेळ द्याल ? किंवा कोणता विषय आपल्या विशेष आवडीचा आहे ?

१. छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरूषांच्या जन्माबाबत असलेल्या वादामधे योगदान देणे
२. रामजन्मभूमीच्या जागेवर मंदीर/मशीद/ बुद्धविहार यापैकी काय होते हे शोधून काढणे
३. आर्य भारतात कुठून आले यावर झगझगीत प्रकाश टाकणे
४. प्राचीन भाषा संस्कृत कि तमीळ कि प्राकृत याबाबत नवे पुरावे सादर करणे ..
५. इत्यादि इत्यादि

या प्रश्नाला जोडूनच एक उपप्रश्न स्वाभाविकरित्या विचारावासा वाटेल आणि तो म्हणजे

आपलं योगदानाचं स्वरूप काय राहील ?

१. मुलभूत संशोधन करणे, इतिहासाची साधनं, चिन्ह यांचा उपयोग करून कोडी सोडवणे
२. आधी झालेल्या संशोधनाचं विश्लेषण करणे
३. इतर ईतिहासकारांचे लेख, पुस्तके वाचून स्वतःला अपडेट ठेवणे..
४. नेटवर किंवा खुल्या मैदानात समोरासमोरच्या चर्चांमधे सहभाग घेऊन आपल्या ज्ञानाच्या जोरावर समोरच्यास अस्मान दाखवणे. माघार न घेता मुद्दे मांडत राहणे आणि वेगवेगळ्या लिंक्स देत गोंधळ घालणे..
५. इत्यादि इत्यादि..

एक आठवड्यापूर्वी माझ्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच स्नेहसंमेलन होतं. आम्ही खूप वर्षांनी जमत होतो. एकमेकांना ओळखूही येत नव्हतो. ज्या सरांनी पुढाकार घेऊन हे स्नेहसंमेलन घडवून आणल त्यांच्याकडे प्रत्येकाची अद्ययावत माहीतीही होती. कॉलेजमधून शिकलेल्या आणि जीवनात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची भाषणं ऐकणं हे एक भाग्यच असतं.

एक माजी विद्यार्थी खूप लांबून आलेले आणि आवर्जून भाषण करायचंय म्हणत होते. खूप साधे वाटत होते. त्यांनी स्वतःबद्दल सांगायला सुरूवात केली.
ते कॉलेजला लोणावळ्याजवळच्या एका खेड्यातून येत असत. डोंगरद-यांचा भाग. सकाळची पहिली लोकल गाठून कॉलेजला पोहोचले कि पावणेनऊ वाजलेले असायचे. पहिलं लेक्चर पावणेअकराला असायचं...

त्यांनी परवागी काढून ड्रॉईंग हॉल उघडून घेतला. सकाळच्या त्या वेळात ते तिथं जाऊन अभियांत्रिकी ड्रॉईंग्ज करीत बसत. याच पद्धतीनं इतरही विषयांचा अभ्यास ते करीत. ते म्हणतात मी हुषार कधीच नव्हतो. पण मेहनतीच्या जोरावर मी शिकलो.

नेहमी कान आणि डोळे उघडे ठेवण्यामुळं ते नोकरीत न रमता व्यवसायात पडले. आज महाराष्ट्रात इन्फास्ट्रक्चरच्या क्षेत्रात त्यांना मोठा मान आहे. एका प्रसिद्ध कंपनीचे ते मालक आहेत. त्यांच्या कंपनीच्या आयपीओ कडे खूप जणं डोळे लावून आहेत. त्यांचं नाव इथं देत नाही , इतकंच सांगतो दोन प्रमुख शहरांना जोडणा-या एका महामार्गाचं सहापदरीकरण करण्यासाठी आणि त्याच्या टोलसाठी त्यांनी शासनाला २१०० कोटी रूपयांचा एकरकमी चेक दिलाय. खेड्यातल्या या मुळाची ही झेप थक्क करणारी आहे. (मायबोली प्रशासनाची अनुमती मिळाल्यास त्यांची मुलाखत घेऊन इथं प्रसिद्ध करता येईल ).

दुसरं उदाहरण मित्राचं.

त्याच्या आईने रस्त्यावर भाजी विकली. एक भाकरी आठ जणात खाल्ली अशी परिस्थिती. भाऊ नोकरीला लागला. हा धाकटा. एकदा वाचलेलं लक्षात ठेवणारा.. पण पुस्तकी किडा नाही. सतत इंजिनियरिंग वर्कशॉप्स, कारखाने इथं त्याचा वावर असायचा.

एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीत नोकरीस लागला. त्या निमित्तानं खूप लोकांशी परिचय झाला. एका मारवाड्यानं त्याला नोकरी सोडण्याबाबत सुचवलं. तुझं डोकं आणि माझा पैसा अशी भन्नाट ऑफर दिली. तरी याणे चार वर्ष नोकरी करून व्यवसाय केला. या दरम्यान झोप केवळ चार तास. इतर वेळी फक्त काम ..!!!

पुढं ते वर्कशॉप फायद्यात आल. दोघांच्यात मतभेद झाले तरी याने नोकरी सोडून स्वतःच्या बळावर व्यवसाय केला. मायक्रोअलाईड स्टील मधे इआरडब्लू स्टीलच उत्पादन सुरू केलं. आज दोन हजार कोटीचा टर्न ओव्हर आहे. तो वाढणार आहे.. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्याच्या स्टील ट्यूबला मागणी आहे. अभिमानास्पद कामगिरी वाटली त्याची..

आणखी दोन मित्रं अभ्यासात मागे असायचे. कॉलेज संपल्यानंतर खूप खस्ता खाल्ल्या. कष्ट घेतले. आज पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपाला आलेत. जंगली महाराज रस्त्यावर एका स्वतंत्र आणि देखण्या इमारतीत त्यांच कार्यालय सुरू आहे..

असे खूप जण भेटले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाणारेही बरेच जण भेटले.

समाजाचा एक हिस्सा आज फक्त विकासाच्या मागे आहे. त्यातून स्वतःचा, कुटूंबाचा आणि समाजाचा आणि पर्यायाने देशाचाही विकास होतोय. या लोकांना इतिहासात रमायला वेळ नाही. आज आणि उद्या हेच त्यांचं ब्रीदवाक्य आहे. तर उर्वरीत समाजाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. त्यांच्यापुढं या विद्यार्थ्यांचा आदर्श असायला हवा आणि संधी मिळताच ते सिद्धही होत आहे. इतिहासातल्या ज्ञानाचं कुणालाच काही पडलेलं नाही. या यशस्वी लोकांची मानसिक जडणघडण या प्रकारची आहे. चुकांमधे अडकून पडण्यापेक्षा भविष्यात चुका होणार नाहीत याकडे त्यांचा कटाक्ष आहे.

या उलट पुढच्या बाकड्यांवर बसणारी मुलं आज खूप चांगल्या हुद्यांवर निरनिराळ्या कंपन्यांत आहेत. गलेलठ्ठ पगार आहे. त्याचा त्यांना अभिमानही आहे. पण हे आयुष्य कुणालाच प्रेरणा देऊ शकत नाही. सगळे प्रश्न सुटलेले असल्यामुळं मग अशा वर्तुळात केवळ बुद्धीला खाद्य म्हणून ईतिहासात रमणं सुरू होतं. (हे विधान सरसकट सर्वच पुढच्या बाकड्यांवर बसणा-या विद्यार्थ्यांना उद्देशून नाही. तसं म्हणणं अन्यायकारकच आहे.. )

मागे एकदा आगाऊ यांना त्यांच्या पोस्टचे कॉपीराईटस मागितले होते. दिले असते तर कायदेशीर रित्या ती पोस्ट वापरता आली असती.. आता बेकायदेशीर रित्या वापरावी लागेल याच वाईट वाटतंय.

एक गोष्ट इथं स्पष्ट कराविशी वाटतेय.

सहजरित्या गप्पा म्हणून अशा विषयांबद्दल बोलणा-यांबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. माझा आक्षेप आहे तो आपला प्रोफेशन ईतिहास या विषयाशी संबंधित नसताना त्यावर अधिकाराने वाद घालण्याच्या वृत्तीला !! एखाद दुसरेवेळी ते ही ठीक आहे पण काही जण वारंवार त्याच त्याच विषयावर तेच तेच तुणतुणे वाजवताना दिसतात. ज्याच्या पोस्टस जास्त तो जिंकला असहि काहींना वाटत असावं किंवा एखाद्याने उत्तर देण्याचं टाळलं म्हणजे आपला युक्तीवाद बिनतोड होता असंही काहीजणांना वाटत असावं. ही सर्व मंडळी सुशिक्षित ..उच्चशिक्षित आहेत.

समाजाचा एक मोठा भाग असा आहे ज्याला या वादांमधे काडीचाही रस नाही. पूर्वी बेरोजरागार तरूणांच्या भावना भडकवण्यासाठी या वादांचा वापर होत असे. आता त्यांनाही त्यात रस वाटत नाही. स्वार्थ असेल तरच आजचा तरूण अशा तंबूंमधे दाखल होतो. स्वार्थ साधता येत नसेल तर सरळ दुस-या तंबूचा रस्ता धरतो.. महापुरूष / देव / धर्म यात सकारात्मक तेच घेण्याकड लोकांचा कल असतो. चांगल ते घ्या आणि कामाला चला हा त्यांचा साधा मंत्र आहे. असे लोक यशस्वी म्हणता येतील .. या लोकांना प्रॅक्टीकल लोक म्हटलं जातं.

नेटवर सर्वत्र चाललेले वाद हे बहुतकरून ऐतिहासिक विषयांवरच होतात आणि शेवटी जातीय वळणावर संपतात. प्रत्यक्ष जीवनात आपण इतके जातीयवादी असतो का ? पण हे वाद निष्कारण डोकं खराब करतात. ऑफीसच्या वेळेत, ऑफीसच्या खर्चात वाद घालून विविध प्रश्नांवर प्रशासन काय करतंय असा सवाल करणा-यांबद्दल तर बोलायलाच नको.
.
ईतिहासात कुणी आणि का रमावं ?

आज इतिहास म्हणजे काही संघटना आणि पक्ष यांचं दुकान आहे. ईतिहासकारांनी त्यात रमण्याबद्दल काहीच ना नाही. उलट फक्त त्यांनीच त्यात लुडबूड करावी असं माझं प्रामाणिक मत आहे. इतरांनी त्यात संशोधनपर भाष्य करण्याऐवजी स्वतःच्या क्षेत्रात इतिहास घडवावा.

विठठल कामत, डी एस कुलकर्णी, रतन टाटा इ . यांची आपल्या पहिल्या परिच्छेदातील प्रश्नांबाबत मतं कधीच ऐकण्यात / वाचनात आली नाहीत. या लोकांना कसलीच माहीती नाही किंवा त्यांचं वाचन नाही असा अर्थ कुणी काढू नये. मग माझ्यासारख्यांनाच या वादात आपलं मत जोरजोराने मांडावंस का वाटतं ? मला हा प्रश्न नेहमी सतावतो.

अर्थात, जी भूमिका इथं मांडलीये तिला दुसरीही बाजू असू शकते जी अल्पमतीच्या मर्यादेमुळं विचारात घेता आली नसावी. ती बाजूही समजून घ्यायला नक्कीच आवडेल..

धन्यवाद.

- अनिल सोनवणे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला.
याच विषयावर ईसकाळ मध्ये एक लेख आला होता. लिंक मिळाल्यास टाकेन.
अमेरिकेत फुटीरतावादी चळवळी नाहीत कारण अमेरिकेला जेमतेम चारशे वर्षाचा इतिहास आहे असे कुठे तरी वाचल्याचे स्मरते.

इथले लिखाण उडवले आहे. उगाच कुणाच्या भावना दुखावल्या तर माझ्याबरोबर मायबोलीला गोत्यात आणायचे नाहीये, म्हणून.
धन्यवाद.

चांगला लेख आहे पण पूर्ण सहमत नाही. ह्या दोन्ही गोष्टी स्वतंत्र आहेत असे माझे मत आहे. वरती ज्या तीन वर्गाबद्दल लिहीले आहे त्या तिन्ही वर्गात दोन्ही प्रकारचे लोक दिसतात.

लेख आवडला... क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे Happy हे तर आहेच...

इतिहासात डोकावण्याचे एक महत्वाचे कारणः मनाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे, हे आहे.

'मागच्यास'(इतिहासातला माणूस) ठेच पुढचा शहाणा हे दुसरे कारण आहे. इतिहास समजून घेणे, भविष्याची तरतूद करणे आणि वर्तमानात जगणे, ही महत्वाची सूत्रे लक्षात ठेवायलाच हवीत.

पण... इतिहासाचा दूरुपयोग मात्र जी मंडळी लोकांच्या भावना भडकवण्यासाठी करतात, त्यांच्याबद्दल आपण काय करु शकतो? आणि जे दुसर्‍यांच्या ज्ञानाच्या कुबड्यांवर जगतात, ते लोक भडकवण्यासाठी सगळ्यात सोपे असतात. सगळ्यात जास्त धोका त्यांच्याचपासून तर असतो. म्हणून जितके जास्त जाणून घेता येईल, त्यावर वाद-संवाद चर्चा होईल, तितकी ज्ञानात भरच पडेल आणि ते चांगलेच, नाही का?

लेख आवडला.
दृष्टीकोनातला फरक कदाचित दूरदृष्टीतून येत असावा. ज्यान्ना 'बिग पिक्चर' बघता येईल ते वांझोट्या वादात पडणार नाहीत. (आणि ज्यांना वादातून मिळणार्‍या फायद्याचे पिक्चर दिसेल ते हिरिरीने पडतील!) असे मला वाटते.

तुम्ही उदाहरणे दिलेली उद्योगी माणसे कदाचित इतिहासाच्या वादात पडत नसावीत कारण काय केल्याने सकारात्मक फरक पडतो हे त्यांना समजलेले आहे. (वाद घालणार्‍यांनाही वादाने सकारात्मक फरक पडेल असे वाटत असणार हेही आहेच.)

बाकी ईतिहासाचा इतिहास करता आला तर चांगले. Happy

चांगला लेख. लेखातील भावना पोहोचल्या.

इतिहास हा त्यापासुन बोध आणि स्फूर्ती घेण्यासाठी आहे. आपल्या आधीच्या लोकानी काय चुका केल्या आणि त्या कशा टाळता येतील तसेच आपल्या आधीच्या काही लोकानी किती गौरवास्पद कार्य केलेय आणि त्याचे अनुकरण करुन आपल्याला आपले वैयक्तीक आणि सामाजिक जीवन अधिक् चांगले कसे करता येइल यासाठी इतिहास माहित असणे आवश्यक आहे. त्यामुळे इतिहास माहित असणे काहीच उपयोगाचे नाही हे म्हणणे तितकेसे बरोबर होणार नाही.

मायबोलीवरच "केदार" यांच्या काही अभ्यासपुर्णे इतिहासावर आधारीत लेखांची मालिका आली होती. आणि मायबोलीवरच एका बिनडोक माणसाची शेंडा बुडखा नसलेली लोकांच्या भावना दुखावणारी इतिहासाशी संबंधीत लेखांची मालिका आली होती. यावरुन मला तरी वाटते हा वैयक्तीक दृष्टीकोनाचा प्रश्न आहे.
इतिहासाशी संबंधित विधायक गोष्टींचा स्वीकार करावा आणि इतर जे "गार्बेज" आहे त्याकडे दुर्लक्ष करावे हाच उत्तम उपाय.

मोजक्याच पण उत्तम प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार ..

काही मुद्दे विस्तारभयास्तव / द्विरूक्तीदोषास्तव टाळले होते.

मला असं म्हणायचं होतं जे लोक या वादात पडत नाहीत त्यांच्याकडे आपल्याहीपेक्षा अद्ययावत माहीती असू शकते. ज्ञान म्हणूच शकत नाही. ते डेक्कन कॉलेजचं पुरातत्व खातं, कै राजवाडे, केंद्र सरकारचं पुरातत्व खातं यांच्याकडे असावं. डायनोसॉरचे ठसे मी पाहीले नाहीत. ज्यांनी त्यांचा अभ्यास केला त्यांच्या निरीक्षणांवर, अहवालावर आधारीत काहींनी पुस्तकं लिहीली. त्या पुस्तकांचा हवाला देत जे लेख, वेबसाईटस अपडेट झाल्या, वाहीन्यांवर कार्यक्रम झाले तो माझ्या माहीतीचा स्त्रोत.. ही तिस-या फळीची माहीती झाली.. अशा कित्येक पाय-या असू शकतील. या सामुग्रीवर आधारीत वाद झडतात ती सर्वात शेवटची पायरी..

पहिल्या पायरीपर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीची उपस्थिती मला या नेटवरील वादात आढळून आली नाही. कदाचित हा माझा दोष असू शकेल. एखादी व्यक्ती असूही शकेल.. पण अप्वादात्मकच म्हणावी लागेल. पहील्या फळीच्या संशोधनाच्या विश्लेषणात झालेल्या चुकांमुळेही मोठे घोटाळे होऊ शकतात हे आपण पाहीलेलं आहे.

अशा परिस्थितीत तिस-या /चौथ्या पायरीवरील माहीतीवर आधारीत आपल्या मतांचा आग्रह धरणे हे कितपत योग्य आहे ? सहमतीच्या पोस्टस तर विरळाच. ( माबोचा अनुभव नसल्याने माझी निरीक्षणं इथं लागू होतात किंवा कसं हे माहीत नाही ). माझा जो फोकस आहे तो या प्रकारच्या वितंडवादावर आहे. या वितंडवादात भाग घेणा-यांची निरीक्षणं इथं मांडली आहेत.

स्वतःला अपडेट ठेवणे आणि परस्परसंवादाने अचूकता वाढवणे याला आक्षेप असण्याचं कारण नसावं आणि नाहीच.

अशा परिस्थितीत तिस-या /चौथ्या पायरीवरील माहीतीवर आधारीत आपल्या मतांचा आग्रह धरणे हे कितपत योग्य आहे >>>
खरेतर कशाचाच आग्रह धरणे योग्य नाही.
.
लेखातील उदाहरणे आणि इतिहासाचा संबंध काय तो कळला नाही. लेख व उदाहरण दोन्ही नाही पटले. पण तुमची कळकळ मात्र कळाली.
.

"पुढच्या बाकड्यांवर बसणारी मुलं आज खूप चांगल्या हुद्यांवर निरनिराळ्या कंपन्यांत आहेत. गलेलठ्ठ पगार आहे. त्याचा त्यांना अभिमानही आहे. पण हे आयुष्य कुणालाच प्रेरणा देऊ शकत नाही. सगळे प्रश्न सुटलेले असल्यामुळं मग अशा वर्तुळात केवळ बुद्धीला खाद्य म्हणून ईतिहासात रमणं सुरू होतं " >>

हे फारच जनरलाइझ्ड व विरोधी वाक्य आहे असे मला वाटते. गल्लेलठ्ठ पगार असलेल्या प्रत्येकाने आपला प्रभाव पाडावा (प्रेरणा) द्यावी, ह्याचा आग्रह का? अशा प्रत्येकानेच प्रेरणा द्यावी हा आग्रहच मला थोडा जास्ती वाटतो. उलट लेखात ह्याची गरज नसताना ओढलेला हा ताशेराच वाटला. गरज नसताना हा मुद्दा इथे आला हे सांगावे वाटले.

मला असं म्हणायचं होतं जे लोक या वादात पडत नाहीत त्यांच्याकडे आपल्याहीपेक्षा अद्ययावत माहीती असू शकते >>> हो जरूर. पण तुम्हाला माहिती असली आणि तुम्ही चुकीची माहिती लिहिलेली दिसताना खरी माहिती केवळ वादास्तव सांगीतली नाही, तर एकतर तुम्ही " जाऊदे मुर्ख लोकं आहेत असा स्टॅन्ड घेता, किंवा मरूदेत आपल्याल्या काय गरज, मला तर खरी माहिती आहे" असे म्हणून चांगली माहिती न वाटण्याच्या स्टॅन्ड घेता. दोन्ही स्टॅन्ड माझ्यामते चुक आहेत. (परत हे माझ्यामतेच, जसे लेख तुमच्या मते तसेच)

मुळात तुमची कळकळ मला समजते की समाजाला अन्नाची गरज आहे वगैरे. पण हे म्हणजे अरे चित्रकला उपयोगी नाही, पोट भरत नाही असे आहे. शिवाय समाज म्हणाले की काही मुलभूत माहिती माहिती नसू नये का? माहिती नाही म्हणूनच तर इतिहासाच्या नावाखाली भांडणे तर कोणी काढत नाही ना? मला तरी अगदी तुम्ही म्हणता त्याच्या उलट चित्र दिसते. इतिहास माहिती झाला की आपोआपच ही जी फुटकळ भांडणे शिवाजी महाराजांच्या नावाखाली राजकारणी लोकं करत आहेत ती बंद होतील कारण जास्त लोकांना माहिती मिळेल. ज्ञानाचा फायदा सर्वांना!
अनुभव असा की एखाद लेख (अगदी साध्या वाटणार्‍या गोष्टी बद्दलपण) लिहिला की लोकं प्रतिक्रियेत "अरे हे माहितीच नव्हतं, हा असं होतं का? अश्या प्रतिक्रिया देताना मी पाहिल्या. त्यातल्या बर्‍याच गोष्टी अगदी साध्या उदा भारत देश हा देश होता का? झेंड्यावरचे चक्र कश्याचे प्रतिक आहे वगैरे. ह्या गोष्टी एक समाज म्हणून माहिती असायला काय हरकत आहे? पण ह्याच माहिती नसतात आणि हे सामान्य ज्ञान कमी असल्या कारणाने (जर खूप शिकलो नसेल तर) एखाद्या गोष्टीत वाहवत जाणे होऊ शकते म्हणून ढोबळ इतिहास माहिती असला तर ते समाजाला लाभदायक ठरेल असे मला वाटते.

इतिहासावर दोन गोष्टी, चार लेख लिहले म्हणजे माणूस इतिहासात रममाण होतो का? किंवा इतिहासावर दहा लेख वाचले म्हणजे रममाण होतो का? रममाण होणे म्हणजे नक्की काय? तो अभ्यास, छंद म्हणून बघता येणे अशक्य वगैरे आहे की काय?

जाताजाता एक आठवण द्यावी वाटते, मायबोलीवरच चिनुक्स म्हणून एक आयडी आहेत. त्यांनी भारताचा खाद्येइतिहास मांडला आहे, जो वाचल्यावर अनेक नवीन गोष्टी कळतात. जर कोणी ह्यावर अभ्यासच केला नसता किंवा इतिहासातून काही शिकायचे कशाला हा स्टॅन्ड घेतला असता तर ते अन्न प्रकार, त्यांचा इतिहास आपल्याला कळले नसते. मी देखील आर्यन इन्वेजन वर लिहिले आहे. सरस्वतीचा शोध लागला नसता तर ते आर्यन इन्वेजन खरेच असेच समजून बसलो असतो आपण! हे उदाहरण इथे द्यायचे कारण : इतिहास वाईट नसतो, त्याच्याशी खेळणारे लोक वाईट असतात.

आणि तुम्ही त्याच्याशी खेळणाऱ्या लोकांवरून गल्लत करून इतिहास नको म्हणत आहात.

केदार,

आपला प्रतिसाद वाचला. मला काही म्हणावेसे वाटते.

१. इतिहासाचा किमान अभ्यास असायला हवा व 'अभ्यास असायला हरकत नसावी' ही आपली दोन्ही मते पटण्यासारखीच आहेत.

२. मूळ लेखाचा हेतू माझ्यामते असा आहे की 'आज त्या विषयावरून भांडणारे' (भांडणारे म्हणजे बहुधा आंतरजालीय लेखक असे अभिप्रेत असावे असा माझा अंदाज) बेसिकली त्या विषयावर कशाला भांडण्यात वेळ घालवतात. मला वाटते की हा मुद्दा योग्य आहे. उदाहरणार्थः

दादोजींचा पुतळा हालवला या विषयावरून 'ज्ञानेश्वर हा एक मूर्ख तरुण होता' इथपर्यंत मते देण्यापर्यंत काहींची मजल गेली. त्यावर प्रचंड वादही झाले. 'आमच्या श्रद्धास्थानांबाबत असे बोलल्यावर पुरावे द्या अन्यथा शब्द मागे घ्या' अशा आंतरजालीय धमक्याही देऊन झाल्या. पण परिणाम काहीही होऊ शकत नाही. (गृहीत धरा की) आज मायबोलीवर ब्राह्मण सदस्य जास्त आहेत, तसे असल्यास 'असे' वाद नेहमी ब्राह्मणांना हवे तसेच सोडवले जातील. (मी ब्राह्मणच आहे हेही नमूद करतो). पण वास्तव जगात या फोरमला काहीही महत्व नसेल. मूळ लेखात बहुधा असे म्हणायचे असावे असे मला वाटते.

चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

प्रत्येक लिहिणारा ब्राह्मण असतो हे एक मोठे गृहितक आहे. शिवाय सर्व ब्राह्मण सारखे नसतात. मी पण ब्राह्मण आहे, पण जात पाती शी मला घेणे देणे नाही, मग एखाद मूर्ख माझे आडनाव पाहून ते वादात ओढतो. आणि आंतरजालावर सगळे गुडी गुडीच असायला हवे का? Happy

पण वास्तव जगात या फोरमला काहीही महत्व नसेल. मूळ लेखात बहुधा असे म्हणायचे असावे असे मला वाटते. >>> जग झपाट्याने आंतरजालीय होऊ पाहत आहे. उदा. मधुकर सारखा माणूस त्यामूळेच कसेलेसे अंतरजालीय फालतू पुरावे आणून इथे छापत होता. थोडक्यात उद्या इंटरनेटला आजपेक्षा जास्त महत्व आहे असे मला वाटते. भविष्याकडे पाहण्याच्या माझा दृष्टिकोण थोडा वेगळा आहे असे म्हणा. आज ना उद्या हे सर्व (जे आज आंतरजालीय नाही) ते आंतरजालीय होईल. तो समाज तयार होताना भांडण, तंटे हे इतर समाजासारखेच त्यालाही लागू होणार.

शक्य आहे.

'आंतरजालाला तितकेसे महत्व नाही' हा माझ्या प्रतिसादातील केंद्रविषय नव्हता. मला असे म्हणायचे होते की इतिहासावरून आज भांडणे कितपत योग्य आहे असे मूळ लेखात म्हणायचे असावे. तसेच, लेखकाने असेही म्हंटले आहे की प्रत्यक्षात आज कोण जातीयवाद पाळतो?

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

गैरसमज नसावा.

-'बेफिकीर'!

नाही हो गैरसमज काही नाही. Happy

इतिहासावरून आज भांडणे कितपत योग्य आहे असे मूळ लेखात म्हणायचे असावे. >> हो ते अगदी बरोबर आणि सहमत. पण भांडण का होतात? तर अर्धवट ज्ञानामुळे म्हणूनच तुकारामाच्या पुस्तकावर भांडणे किंवा. मग कोणी शिवाजी कसा मराठाच आहे हे मांडत बसतो. जर मुळावर घाव (इथे इतिहास न माहिती असणे) घातला तर हे नाहीसे व्हायला मदत होईल असे मला वाटते. ऑफकोर्स माझे वाटने हे वैयक्तीक असल्यामुळे नक्कीच चुकीचे असू शकते.
थोडक्यात मच्छर आहेत तर त्रास होणारच, वास्तवात जशी भांडण आहेत तशीच मग आंतरजालावर पण. कारण वास्तवातील व्यक्तीच आंतरजालावर (अलूफ होऊन ) जास्त तिव्र मत मांडतो. अगदी वास्तवात तो तसा असेलच असे नाही. पण ते अलुफ होणे इथे जमते म्हणून इथे भांडणं जास्त असे मी म्हणत आहे. त्याचा दोष इतिहासाला देता येणार नाही.

केदारजी धन्यवाद आपल्या मतांबद्दल..

आपण हा लेख पुन्हा एकदा बारकाईने वाचून पहावा ही विनंती.

इथले लिखाण उडवले आहे. उगाच कुणाच्या भावना दुखावल्या तर माझ्याबरोबर मायबोलीला गोत्यात आणायचे नाहीये, म्हणून.
धन्यवाद.

अनिल... लेख आवडला आणि पटलाही... पहिल्या पायरीवर केलेल्या चुका सुधारल्या जात असतात आणि त्याचप्रमाणे खालच्या पायरीवर असलेल्या माझ्या सारख्यांना देखील ते बदल अनेकदा मान्य करावे लागतात. पण संपूर्ण शहनिशा केल्याशिवाय नाही. प्रत्येकाची माहितीची काही स्त्रोत असतात आणि त्यात बदल झाले की आपल्या माहितीत बदल होतोच..

पण म्हणून इतिहास ही कोणा विशिष्ट समाजाची किंवा लोकांची मक्तेदारी नाही... आपण आपला वाटा उचलायला हवाच की..

तू म्हणतोस ... पहिल्या पायरीपर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीची उपस्थिती मला या नेटवरील वादात आढळून आली नाही... अरे अश्या लोकांना कुठल्याही ब्लॉग/सं.ळावर वाद घालत वेळ घालवून कसे चालेल? ते आपले काम करीत राहतात आणि त्यांना उपयुक्त अश्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया देखील देत राहतात..

जे लोक या वादात पडत नाहीत त्यांच्याकडे आपल्याहीपेक्षा अद्ययावत माहीती असू शकते.
>>> अरे त्यांच्याकडेच उपयुक्त माहिती असते.. Happy पण त्यांना वाद घालत बसायला वेळ नसतो.. आता नावे घेत नाही.. असो..

मी बेफिकीर आणि झक्की यांच्याशी सहमत आहे.

केदार
मी पूर्वी या अशा वादात हिरीरीने भाग घ्यायचो. त्याचा परिणाम म्हणून रात्रीची जागरणं, फुक्कटचा अभ्यास डोक्यात चक्रं यात झाला. मी वाहवत गेलो. त्याचा परिणाम जेव्हा व्यवसायावर झाला तेव्हा थांबलो. एकदा एक प्रोफेशन स्विकारलं कि त्याच्याशी प्रामाणिक रहावं. इतिहासावर बोला कि.. मग पार्ट टाईम पाट्या नका टाकू.

तुम्ही तुमचा अनुभव दिलात तो असा..

अनुभव असा की एखाद लेख (अगदी साध्या वाटणार्‍या गोष्टी बद्दलपण) लिहिला की लोकं प्रतिक्रियेत "अरे हे माहितीच नव्हतं, हा असं होतं का? अश्या प्रतिक्रिया देताना मी पाहिल्या. त्यातल्या बर्‍याच गोष्टी अगदी साध्या उदा भारत देश हा देश होता का? झेंड्यावरचे चक्र कश्याचे प्रतिक आहे वगैरे.

आता याचा अर्थ मी असा लावतो..

ज्याला झेंड्यावरचं चित्र काय होतं याची माहीती नाही त्याचं त्या माहीतीवाचून काय अडलं होतं ? काहीच नाही. तुम्ही सांगताय म्हणून त्यांना कळतंय. असं किती जणांना तुम्ही शहाणे करून सोडणार आहात ? आणि हाच उद्देश असेल तर पुस्तक लिहावं. पण ते तरी किती जण वाचतील ? प्रत्येकाच शिकायच एक वय असत आणि ती संधी त्यांना मिळालेली असते. त्या वेळी त्याला हवं तो ते शिकलेला असतो. पुढच्या आयुष्यात त्यांना एज्युकेट करणं ही आपल्या शिरावरची जबाबदारी आहे का ? त्याला नाही का काळजी ?
तुम्ही नसतं सांगितलत तरी त्याचं रूटीन चालणारच होतं आणि सांगितल्यावरही तेच रूटीन चालणार आहे. मग टेन्शन काय को लेनेका ?

माझं तरी मत झालय लोक्स ऐकतात आणि सोडून देतात. तुम्ही उगाच नेटवर पोस्ट लिहीण्यासाठी नाही नाही तो अभ्यास करत बसता. या सर्वाची सुरूवात एका वाक्यापासून होते आणि ते म्हणजे...
ज्यांना आपला इतिहास ठाऊक नाही ते आपलं भविष्य घडवू शकत नाहीत. !

कसला डोंबल्याचा संबंध आहे कुणास ठाऊक. इतिहास माहीत नसला तरी इतिहास घडवता येतो हे या लेखातल्या उदाहरणांवरून दिसतच कि. वर्तमानातल्या या लोकांपासून आदर्श घ्यायचा सोडून इतिहासातले दाखले काय द्यायचे ?

आणि इतिहासातून आदर्श घेतात वगैरे बकवास मला मान्य नाही. सध्या तरी भांडणांसाठीच इतिहासात डोकवलं जातं. जे शहाणे आहेत ते स्वतःला अपडेट ठेवून वादापासून लांब रहातात हा या लेखाचा अर्थ असावा ..
.............................
तुमचा आणखी एक मुद्दा.. मला खोडून वगैरे नाही काढायचा.

>>>>>पुढच्या बाकड्यांवर बसणारी मुलं आज खूप चांगल्या हुद्यांवर निरनिराळ्या कंपन्यांत आहेत. गलेलठ्ठ पगार आहे. त्याचा त्यांना अभिमानही आहे. पण हे आयुष्य कुणालाच प्रेरणा देऊ शकत नाही. सगळे प्रश्न सुटलेले असल्यामुळं मग अशा वर्तुळात केवळ बुद्धीला खाद्य म्हणून ईतिहासात रमणं सुरू होतं " >>

हे फारच जनरलाइझ्ड व विरोधी वाक्य आहे असे मला वाटते. गल्लेलठ्ठ पगार असलेल्या प्रत्येकाने आपला प्रभाव पाडावा (प्रेरणा) द्यावी, ह्याचा आग्रह का?
जिथं तुम्ही अवतरण संपवलंत त्यापुढेच ही खालची ओळ आहे कंसात दिलेली.
(हे विधान सरसकट सर्वच पुढच्या बाकड्यांवर बसणा-या विद्यार्थ्यांना उद्देशून नाही. तसं म्हणणं अन्यायकारकच आहे.. )

ही ओळ का सुटलीय तुमच्याकडून ? तस असेल तर मी तुमचं तिकडे लक्ष वेधतोय. असो.

तसंच इतिहासात रमण म्हणजे काय ? त्याची मोजदाद कशी करायची हा प्रश्न तुम्ही इथं उपस्थित केलाय.
बायका जेव्हा जेवणात मीठ चवीपुरतं असं सांगतात तेव्हा दोन्ही पक्षांना कळालेल असत ते. अशा ब-याच गोष्टी आहेत ज्याची मोजदाद करण्याची गरज नाही. चहा / दारू/ सिगरेट / ऑर्कूटच व्यसन लागण म्हणजे काय असेही प्रश्न उपस्थित करता येतील ज्याची खरच काही गरज नसते.

आता मला सांगा.. ज्या लोकांना इतिहास माहीत नाही त्यांना इतिहास शिकवण्याबद्दल तुमची काही मत आहेत. मी त्यांना कमी लेखत नाही किंवा त्याचं खंडन करीत नाही. पण मग लोकांना हाच एक विषय का शिकवावा ? भूगोल आहे, गणित आहे, विज्ञान आहे.. उलट लोक या विषयात तयार झाले तर फायदाच आहे कि ! काय म्हणता ?

ही पोस्ट केवळ टाईमपास म्हणून टंकली आहे. वादविवादांची सवय सुटली नाही अजून ..!! Happy

माझ्ञाकडून समाप्त

अमेरिकेला जेमतेम चारशे वर्षाचा इतिहास आहे असे कुठे तरी वाचल्याचे स्मरते.>> नाही हो. अमेरीकेचा इतिहास ४०० चा म्हणु नका. हा ४०० वर्षाचा इतिहास स्पॅनिश लोकांच्या आगमनानंतरचा आहे. कोलंबसनी अमेरीकेत पाय ठेवण्या आधीचा त्यांचा मोठा इतिहास आहे.
मोंटेझुमाची मेक्सिको नगरी म्हणे सोन्याची होती. जनरल स्कॉर्टस (की कॉर्टस ?) नी मोंटेझुमा नावाचा शेवटचा अ‍ॅझेटिक राजा संपविला. आपण त्या नंतरचा कालच लक्षात धरतो. त्या आधिची अझेटीक संस्कृती ही एक महान संस्कृती होती. त्यांनी बांधलेले पिरॅमिडस जगप्रसिद्ध आहेत. अ‍ॅझेटीक लोकांची नगर वसविण्याची पद्धत अगदी आजच्या आधुनिक पद्धती प्रमाणे होती याचे पुरावे आहेत. ड्रेनेज सिस्टम व रस्त्यामधले चौक आजही त्यांच्या प्रगतीच्या टप्प्याचा पुरावा देतात. पुढे जाऊन ती संस्कृती कशी नष्ट झाली याचा अद्याप उलगडा झालेला नाही. इतिहासकारांचे दोन गट पडतात.
१) अ‍ॅझेटीक संकृतीत हे आधुनिक शहर चालविण्याचे ज्ञान फक्त उच्चवर्णीयांकडे होते. इतर समाज मागासलेला होता. या मागासलेल्या समाजाने क्रांती केली. शहरं ताब्यात घेतली, पण ते आधुनिक शहरं चालविण्याचा ज्ञान नसल्यामुळे या मागास लोकानी स्थलांतर केले.
२) अ‍ॅझेटीक संस्कृतीत गुलामांचा वापर करुन भव्य ईमारती बांधताना प्रचंड प्रमाणात निसर्गाची नासधुस झाली. दोन अ‍ॅझेटीक गटांमधे उंच पिरॅमिड बांधण्याची जणु स्पर्धा चाले. यामुळे कालांतराणे तिथली नैसर्गिक हानी या स्थराला पोहचली की, तिथे मानवाला राहण्यासाठी अनुकुल वातावरण उरले नव्हते. म्हणुन अ‍ॅझेटील लोकानी स्थलांतर केले. ईजिप्तचे पिरॅमिड हे या अ‍ॅझेटीक स्थलांतरितांचेच काम आहे असा पण कयास आहे.
आता या पुढील माहिती अमेरीका, मेक्सिकोत राहणा-यानी टाकावी. जमल्यास् ते पिरॅमिडचे फोटो टाकावे.

(अपुनका ग्यान ईत्ताच है! ईसके आगे मालुम नै)

केदार साहेब.
तुमची पोस्ट आवडली.
अमेरीकेच्या इतिहासाबद्दल बरेच समज गैरसमज आहेत. तुम्ही जमल्यास एक स्वतंत्र लेख लिहाल का.

अ‍ॅझेटीक संकृती

बकासुर छान आणि रंजक माहीती आहे. तुम्ही लेख लिहीलात तर वाचायला आवडेल या विषयावर.

मिना प्रभु यांचे "मेक्सिको पर्व" छान वाटले. मेक्सिकोचा बराचसा इतिहास त्यांनी उलगडून दाखवला आहे.
अवांतर: US डॉलर वरील जे पिरामिडचे चित्र आहे तो पिरामिड मेक्सिकोमधला आहे. आणि तो जगातील दोन नंबरचा सर्वात उंच पिरामिड आहे. (इजिप्तचा गीझाचा सर्वात उंच आहे)
अ‍ॅझटेक संकृतीपेक्षा मायण संस्कृती जास्त पुढारलेली होती. पण मायण लोक नरभक्षी होती. ह्या लोकांचे कालमापन अतिशय अचूक असे. हीच ती लोक ज्यांनी २०१२ चा जगसंहार वर्तवला होता. मायण लोकांनीच तो पिरामिड बांधला होता. जर कोणी एपोकॅलीप्टो पहिला असेल, त्यामधे ह्या संस्कृतीचे चित्रण होते.

धर्म म्हणजेच इतिहास...........
तुम्ही जे काही करतात...सकाळ पासुन ते रात्री पर्यंत....सणवार साजरे जसे करतात...ते सगळे इतिहासच आहे...जर हे कोणी जुन्या काळात केले नसते तर आपण लोक या काळात करु शकलो असतो का.....??

इतिहास हा महत्वाचा भाग आपल्या जिवनाचा आहे.....फक्त तो कितपत महत्वाचा आहे तो प्रत्येकाने ठरवायला हवा..!! उगाच कोणी हि उठसुट कुणाचा ही इतिहास ओरखडत बसने योग्य नाही...

कोण तो फडतुस जेम्स लेन म्हणाला म्हणुन आपण भारतीय बिथरलो.....?? हा तर शुध्द मुर्खपणा......

समजा रस्त्याने मुलगा- मुलगी चालत असेल तर ....काहींच्या मनात ते जोडपे असेल.....काहींच्या मनात बहीन-भाउ असेल....या अजुन काही असेल.....याचा फरक काय पडतो....?? जे सत्य असते ते सत्यच असते ना..!! जर कोणी त्यांना जोडपे समजत असेल आणि ते नसतील तर ?? आपण आपल्या इतिहासावर विश्वास ठेवायला हवा..

मला वाटते की इतिहास म्हणजे तुमच्या मनात पूर्वी भारतात होऊन गेलेले राजेराजवाडे आहेत. इतिहास हा फक्त राजांचा नसतो. कोणालाही इतिहास विसरून चालत नाही. इतिहासातल्या निर्णयांचा काही कालानंतर आढावा घेणे, चुका शोधणे व भविष्यात त्या होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे यासाठी इतिहास विसरून चालत नाही.

उदा. भारताला १९६२ साली चीनने मैत्रीचे नाटक करून सपाटून मार दिला व भारताचा मोठा भूभाग गिळंकृत केला. तो भाग आपल्याला अजूनही परत मिळविता आलेला नाही. गेली काही वर्षे चीन भारताच्या अरूणाचल प्रदेशावर हक्क सांगतो आहे. आपण चीनचा मागील इतिहास विसरलो व गाफील राहिलो तर अरूणाचाल प्रदेश सुध्दा गमवावा लागेल. त्यासाठी भारताने स्वतःच्या व चीनच्या इतिहासाचा अभ्यास करून पूर्वीच्या चुका शोधून त्यावर उपाय योजून सावध राहिले पाहिजे.

इतिहासावर वाद घालू नका हे म्हणणे ठीक आहे, पण इतिहासात डोकावून न बघता फक्त वर्तमान व भविष्याचाच विचार करा ही भूमिका फारशी योग्य वाटत नाही.

प्रतिसाद वाचले. समजून घेत आहे. माझं मत आधीच मांडलेलं आहे..

अजून एकदा स्पष्ट करतो जाता जाता..

ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थित चर्चा चालतात, जिथे समोरच्या पक्षालाच माहीती हवीये म्हणून तो चर्चेत भाग घेतो त्याबद्दल माझा आक्षेप असण्याचं कारणच नाही. उलट या प्रकारच्या चर्चा हा या लेखचा विषय नाही. मी पुन्हा सांगतो माबोचा मला अनुभव नाही.

यापूर्वी अशा दर्जेदार चर्चा उपक्रम मधे पाहील्या होत्या.....इतरत्र मला असे चित्र दिसले नाही. त्यामुळं हा लेखप्रपंच. अर्थात वितंडा या वादप्रकाराने बदनाम झालेल्या चर्चांमधे इतिहास हाच विषय बहुतकरून असल्याने इतिहासाबद्दल लिहीले. पण वितंडवादासाठी इतिहास हाच विषय असायला हवा असे नाही आणि नुकतेच ते सिद्धही झालेल आहे.

लेख छान आहे. माझ्याहि याच भावना आहेत या सर्व गोष्टीबद्द्ल. मायबोलीवर logically चर्चा होउच शकत नाहि हे पहिल्या काहि पोस्ट नंतर लक्षात आल्यामुळे मी तो प्रयत्न पहिल्या काहि पोस्ट नंतर सोडुन दिला. शिवाय तुमच्यात पेशन्स हि आहे माझ्यात नाहि. त्यामूळे कोणी बाष्कळ उत्तर दिले की मी त्याची चांगलीच काढतो!

बेफाम तुमची पोस्ट तर तुफानच आहे. जोरदार अनुमोदन!
केदारसाहेबांचा problem हा आहे की ते selective पुस्तकातुन त्यांना आवडेल असा इतिहास शोधुन त्याची इथे कोपी (translate म्हणा हवे तर) करतात. त्यानी अजुनहि स्वदेशी या त्यांच्या लेखावर उत्तर दिले नाहि. सर्व लेख खोटा किंवा अर्धवट माहितितुन लिहिल्याबद्दल चुक कबुल करण्याएवढाही त्यांच्याकडे इतिहासाबद्दल आदर नाहि. असो. ज्यांना अशीच स्वताला पटेल अशी माहिती वाचायला आवडते ते मग अशा लेखांना टाळ्या वाजवतात. त्यामुळे त्यांच्यात, या टाळ्या वाजवणार्यात किवा बिग्रेडि मधे काहि फारसा फरक नाहि.

विजय कुलकर्णी -- तुम्हि म्हणताय तो लेख - http://www.esakal.com/esakal/20110116/5393639747976005772.htm
हा लेखही सुंदर आहे. माझ्या 'हरवलेला भारतीय" यालेखात ही तसेच मी लिहिले होते. आनंद हाच होतो कि सकाळ च्या प्रतिक्रिया मधे बरेच लोकाच्या प्रतिक्रियाही चांगल्या आहेत. माबोवर जातियवादी मंडळीच जास्त आहे

आपण आपल्या इतिहासावर विश्वास ठेवायला हवा.... >>>

काय जोक करता राव ?

आपण कोण ? बौद्ध ? ब्राह्मण ? मराठा ? ते आधी स्पष्ट करा. या "आपल्या" चा प्रत्येकाचा त्याला आवडेल असा इतिहास आहे हो. आणी नंतर मग त्यात हिंदु, मुस्लिम असे अजुन टाका.

जे सत्य असते ते सत्यच असते ना >>> सत्य हे सत्यच असते हो. पण सत्य काय आहे ह्यावरच तर प्रश्न आहे ना.

लेख चांगलाच आहे, फक्त 'रमणे या शब्दावरून काही प्रतिक्रिया वेगळ्या ' ट्रॅक' वर गेल्या सारख्या वाटतात.
[१] एक छंद म्हणून इतिहासाचा अभ्यास किंवा वाचन करणे, अगदी व्यासंगही वाढवणे याला कोणाचीच हरकत असणार नाही. व्यवसायाने बिल्डर किंवा उद्योगपती किंवा चाकरमान्या असणार्‍या व्यक्ती अशी एखादी आवड जोपासू शकतात - जसे, साहित्य, संगीत किंवा चित्रकला किंवा ट्रेकींग. मला वाटते की लेखाचा रोख अशा छंद किंवा व्यासंगांकडे नव्हता. 'रमावे' या शब्दामुळे कुणाला तसा भास झाला असावा.
[२] इतिहासाकडे पाहण्याचे दृष्टिकोण भिन्न असू शकतात.
[अ] काही जण निव्वळ, निखळ आणि वस्तुनिष्ठ दृष्टीने इतिहास वाचतात. त्यांच्या मनात कोणतेही पूर्वग्रह नसतात. उलट, पाठ्यपुस्तकातून, कथा-कादंबर्‍यातून, नाटक-चित्रपटातून किंवा सांगोवांगीच्या गोष्टी यामुळे बनलेली आपली मते तपासून पहाण्याचा हेतू त्यामागे असतो. एखाद्या वस्तुनिष्ठ इतिहास संशोधकाने [ही जमात नेहमीच अल्पसंख्यांक होती पण आता हळू हळू नाहीशी होत चालली आहे] अभ्यासपूर्वक अशी काही मते किंवा निरीक्षणे मांडली तर त्यांचा मान राखण्याकडे त्यांच्या मनाचा कल असतो.
[ब] काही जण तथाकथित 'गौरवशाली' आणि 'वैभवशाली' इतिहासात रमून गेलेले असतात. आजची स्थिती काहीही असो, आमचे पूर्वज किती थोर होते, शूर-वीर होते याची शेखी मिरवण्यातच त्यांना धन्यता वाटते. पुराणे, दंतकथा आणि पोवाडे-बखरीतून वर्णन केलेला इतिहास त्यांना रम्य आणि 'खरा' वाटतो. 'वस्तुनिष्ठ' इतिहास एखाद्या संशोधकाने मांडण्याचा प्रयत्न केलाच तर त्याची अवहेलना करण्याकडे किंवा टर उडवण्याकडे त्यांचा कल असतो. पण त्यापैकी सगळेच काही राजकारणात किंवा समाजकारणात क्रियाशील नसतात. आपल्या घराच्या व्हरांड्यात बसून किंवा चहाच्या टपरीत बसून ते आपली 'एक्स्पर्ट कॉमेंट्री' येइल-जाइल त्याला ऐकवतात. विशेषतः नव्या पिढीला त्यांच्या कडून काही विधायक आणि सकारात्मक विचार ऐकायला मिळत नाहीत. उलट, 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' ही वृत्ती जोपासली जाते.
[क] काही जणांचे वाचन- व्यासंग वगैरे काहीच नसते, तर एक राजकीय हेतु साधण्यापुरता त्यांना इतिहासाचा 'वापर' करावयाचा असतो. लोकमत भडकावून देणे आणि कोणत्याही मार्गाने आपला 'अजेंडा' पुढे रेटणे एव्हढाच काय तो त्यांचा इतिहासाशी संबंध असतो. त्यामुळे त्यांनाही नवीन संशोधन किंवा वस्तुनिष्ठ इतिहास नकोच असतो. त्यांच्या राजकीय / सामाजिक 'अजेंड्या'ला पूरक आणि पोषक असा 'इतिहास' एखाद्या स्वयंघोषित संशोधकाने मांडला तर त्याचे निष्कर्ष आणि मते यांची शास्त्रीय तपासणी होऊ दिली जात नाही उलट त्याचा उदो उदो करून, सरकारी समित्यांवर त्याला 'तज्ञ' म्हणून नेमले जाते! अशा बोगस आणि मतलबी 'तज्ञां'चे उदंड पीक सध्या महाराष्ट्रात आले आहे. मला एका राजकीय कार्यकर्त्याने सांगीतले की, "त्या दादोजी कोंडदेवाने आमची चांगलीच पंचाईत करून ठेवलीय. तो जातीने बामण होता असं समजून संभाजी ब्रिगेड्ने एव्हढं आंदोलन उभारलं, आपल्यामागे राष्ट्रवादीला फरपटत नेलं; तर आता कोणी म्हणतंय की तो बामण नव्हताच. त्याची जात सीकेपी होती म्हणे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना कधी नव्हे ते एकत्र आलेत आणि संभाजी ब्रिगेड-राष्ट्रवादीच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत. कोकणीत यालाच 'केले तुका झाले माका' असं म्हणतात." आता कोणत्याही वस्तुनिष्ठ इतिहास-संशोधकाने दादोजी कोंडदेव कोणत्या जातीचा होता यावर काही माहिती देण्याची सोय राहिलेली नाही. तो जर म्हणाला की दादोजी ब्राम्हणच होता तर त्याला मनसे-शिवसेना खेटारणार आणि तो सीकेपी होता असं सांगीतलं तर ब्रिगेड - राष्ट्रवादी त्याच्या अंगावर धावून जाणार. कदाचित यामुळेच खरे इतिहास संशोधक तोंडात मीठाची गुळणी धरून गप्प बसले असावेत!
[३] पुणे शहरातल्या नागरी समस्या दिवसेंदिवस उग्र आणि असह्य होत चालल्या आहेत. त्यावर काही ठोस उपाय योजण्याचे राहिले बाजूला ; राजकीय पक्ष आणि लोक-प्रतिनिधी दादोजी-प्रश्नातच अडकून पडले आहेत. त्यांच्यासाठी इतिहास म्हणजे एक 'जड ओझे' झाले आहे. पण त्यांचे हे इतिहास-रंजन शहरवासीयांना मात्र चांगलेच महागात पडते आहे.
[४] इतिहासात 'रमावे' का असा प्रश्न उपस्थित केला तर त्या 'रमण्या'ची नेमकी कोणती अर्थछटा आपल्याला अभिप्रेत आहे ते आधी प्रश्नकर्त्याला स्पष्ट करावे लागेल. मग पुढची चर्चा!
प्रभाकर [बापू] करंदीकर

Pages