मन माझं गोगलगाय !

Submitted by मितान on 16 January, 2011 - 16:50

मन माझं गोगलगाय
खुट्टं वाजता शंखात जाय ॥

प्राजक्ताचा दरवळ घेऊन
रांगत पहाटवारा आला
शिंका येतील ! आल्या शिंका !!
नाक हाती शंखात पाय !
मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय ॥

खुणावताना हिरव्या वाटा
मनास दिसतो केवळ काटा
काटा टोचेल ! टोचला काटा !!
मान फिरवून शंखात जाय
मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय ॥

समोर फुटली लाट अनावर
सरसरून ये नभ धरणीवर
थेंब उडतिल ! कपडे भिजतिल
भिजेल डोकं ! भिजतिल पाय !!
मन माझं गोगलगाय । खुट्टं होता शंखात जाय ॥

घुसुन बसावे शंखी आपुल्या
हळु काढावी बाहेर मान
इकडुन तिकडे सरपटताना
टवकारावे दोन्ही कान

विजा नि लाटा, झुळुक नि वाटा
बघुन नाचतो एकच पाय
उपयोग नाय
दुसरा पाय शंखात चिकटुन
पाय नाचरा ओढू जाय
मन माझं गोगलगाय
खुट्टं होता शंखात जाय ॥

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मितान खुप आवडली कविता. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसं हे होत असेल का? वाढत्या वयातही बालपणातलं कुतुहल आणि तारुण्यातली 'लाथ मारीन तिथं पाणी काढीन' ही रग ज्याच्यात असेल त्याला आयुष्य अधिक भरभरून जगता येईल नाही का?

मितान, सुरेख कविता. बर्‍याद दिवसानंतर कविता विभागात ( ? ). नॉर्वेच्या दरीखोर्‍यात दिसलेली गोगलगाय काय?

शांतीनाथ, पराग, नोरा, श्री, उल्हासभिडे धन्यवाद Happy

मामी खरं आहे तुझं म्हणनं. जसजसे मोठे होत जातो तसतसे आपल्या कम्फर्ट झोन मध्ये जास्त रुतत जातो.आणि मग हळुहळू नव्या अनुभवांना नाकारण्यातच सुख वाटू लागतं !

सुकी, कविता हा माझा प्रांत नाही. पण ही खळबळ कवितेतूनच बाहेर आली Proud

मस्तच..

सुरेख Happy

मितान मी ही कविता तिसर्‍यांदा वाचतेय. मला ही खुपच आवडलीये.

एक सुचना करू का? 'समोर फुटती लाट अनावर' या ओळीत 'फुटती' च्या ऐवजी 'फुटली' घातलस तर? फुटती अनेकवचनाकरता वापरतात. आणि इथे तर एकच लाट आहे म्हणून.