साधी सोपी रोजच्या वापरातील इंग्रजी भाषा

Submitted by रैना on 15 January, 2011 - 13:48

रोजच्या व्यवहारातील इंग्रजी साक्षरता या दृष्टीने आपण काही सल्ला देऊ शकाल?

काय हवे आहे.
कल्पना करा की भारतातील प्रौढ आणि प्राथमिक शिक्षण झालेल्या व्यक्तिला इंग्रजी शिकवायचे आहे. ते पुस्तकी नको. रोजच्या वापरातील इंग्रजी शब्द हवे. अगदी बेसिक चालेल. मग अ‍ॅडव्हान्स्डबाबत विचार करु.
इंग्रजी मराठीतून शिकवायचे आहे.

काय शिकवावे आणि कसे (मेथड) या दोन्ही बाबत कृपया लिहा.

सध्या एवढेच जमले आहे.
शब्दसंपदा : - २ अक्षरी शब्द, ३ अक्षरी शब्द, ४ अक्षरी शब्द शिकवून उच्चाराप्रमाणे त्याचे स्पेलिंग कसे येते हे शिकवणे. (Phonetics)
म्हणजे cat, bat, hat, mat, pat मग gate, plate, slate असे..
- मग अगदी सोप्या पण व्यवहारिक उपयोगाचा गोष्टी रचून लिहून द्यायचा इरादा आहे.
- मग रस्त्यांवरील पाट्यांवरील ईंग्रजी शब्द आणि त्यांचे अर्थं यावर काम करायचा इरादा आहे.
- विद्यार्थ्याची कुवत पाहून अव्यवहार्य पण क्रमिक अभ्यासक्रमात असलेले शब्द गाळायचे. उदा- urn, daisy वगैरे. जे काही शिकवू ते शब्द उपयोगी आणि सोपे हवेत, नाहीतर विद्यार्थी कंटाळतात.

व्याकरण
- अगदी ढोबळ व्याकरण (रेन अँड मार्टिन नाही. तसेही ते अगदीच छळवादी आहे. :फिदी:)
- त्यातही बोलीभाषेतील वाक्येच्या वाक्ये आधी शिकवणे आणि अशी शंभरएक वाक्य झाली की त्यामागील व्याकरण समजावणे.

रॅपिडेक्स वगैरे चाळले. ते नाही पटले. आणि तसाही त्याचा फोकस वेगळा आहे असे वाटले.

http://www.insightin.com/esl/1000.php इथे सर्वात जास्त वापरल्या जाणारे इंग्रजी शब्द आहेत. त्यातले पहिले १००० मला तरी ठिक वाटत आहेत. तुमचे मत सांगा.

(त.टी. - प्लीज स्तुत्य उपक्रम वगैरे लिहुन लाजवू नका. त्यात स्तुत्य काहीही नाही. नेटाने प्रयत्न केल्यास कोणालातरी मदत होऊ शकते. प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक व्यक्तिचा अधिकार आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरची फोनेटिक्स आणि सोपे शब्दवाली मेथड बर्‍यापैकी ठिक चालली आहे. पण त्याआधी दोन- तिन आयडिया फ्लॉप गेल्या.

रुढ मार्ग १- घोकंपट्टी.

रुढ मार्ग २- चित्रं आणि त्यावरून शब्द आणि शब्दार्थ आणि स्पेलिंग. लहान बाळांना अक्षरओळखीची पुस्तकं असतात ती. ही आयडिया सर्वात बेक्कार ठरली. कारण अजिबात सुसंगती नसलेले शब्द एकत्र कोंबलेले.
- a- apple, arrow, anchor असली महान जंत्री माझ्या तिन वर्षाच्या मुलीच्या गळी शाळेने उतरवली आहे. तिन वर्षांच्या बाळाला कसल्याही पूर्वचौकटी नसतात. शब्द म्हणजे फक्त नवीन उच्चार.
पण ही आयडिया मोठ्यांबाबत अतिशयच बेक्कार ठरली. कारण कदाचीत प्रौढ विद्यार्थ्यांना इंग्रजी नसेल येत, पण मराठी तर येते ना. त्यांच्या चौकटी तयार असतात. असल्या विसंगत शब्दजंत्र्या काही उपयोगी नाहीत.
६ अक्षरी शब्द आले की भीतीनेच विद्यार्थीनीची गाळण उडु लागली. लक्षात रहात नाही. समजत नाहीत अशा तक्रारी सुरु झाल्या.
काय करावे कळेना. मग वह्या तपासताना एक क्लु लागला की ३ अक्षरी शब्द बर्‍यापैकी समजतात. मग तिथुन ही आयडिया सुचली.

रुढ मार्ग ३- गोष्टींच्या पुस्तकांच्या आधारे शिकवणे. ही भयानक पुस्तकी आयडिया होती. त्याने फक्त माझे शीघ्रानुवाद कौशल्य वाढले. टोटलीच कुचकामी.

रैना, काही दिवस फक्त इंग्रजीतूनच बोलणे हा एक पर्याय आहे. ज्याच्याशी बोलणार त्याने चुका दुरूस्त करायच्या, योग्य शब्द सांगायचे वगैरे. इंग्रजी सिरीयल्स बघून सुद्धा फायदा होईल.

रोजच्या वापरातील म्हणजे "बोली" भाषा शिकायची आहे असे समजून हे सांगतोय. कारण शाळेत व्याकरणाच्या दृष्टीने अगदी अचूक लेखी इंग्रजी येउन सुद्धा प्रत्यक्ष बोलताना वेगळेच शब्द, वाक्ये माहीत असावी लागतात हे नंतर जाणवते.

फारेंड- अरे व्यक्तिला इंग्रजी येतच नाही. काहीच. रोमनलिपीतील अक्षरे गिरवण्यापासून सुरवात केली. फक्त इंग्रजीतून बोलुन समजेल?
तू इंटरमिडीयेट लेव्हलचे म्हणतो आहेस का?

ओह मग नाही चालणार. मला वाटले अक्षरे समजतात, काही काही वाक्ये बर्‍यापैकी समजतात पण एकूण इंग्रजी कच्चे असते अशांसाठी हवे आहे.

रैना, लेखन वाचन हा एक भाग, पण बोली भाषा समजणे , त्या भाषेतून साधे साधी वाक्य , दैनंदिन कामकाजातल्या इंटरअ‍ॅक्शन जमणे हाही महत्वाचा भाग - घड्याळाला चावी दे, फ्लिटचा पंप मार, अहो बाई जरा बाजूला सरका, दह्याला विरजण लावायचंय, गीजर लावून बादलीभर गरम पाणी भरून ठेव, कांदे बारीक चिरून हवेत हे कुठलंही पुस्तक वाचून येणार नाही.
माझा आवडतं भाषांतर प्रत्यक्ष ऐकलेलं ' हे, यू नो समथिंग ? मिस येवलेकर्स मॅरेज बिकेम लास्ट वीक '

मेधाताई,
मुद्दा मान्य. पण विद्यार्थ्यांची पातळी लक्षात घ्यावी लागेल का ?
माझ्यालेखी सर्वात महत्त्वाचे काहीतरी शिकावेसे वाटणे हे आहे. आज मुंबईत ज्या प्रमाणात इंग्रजी वापरले जाते त्या प्रमाणात निदान शालेय स्तराचे इंग्रजी येणे ही गरज (त्या व्यक्तिला) वाटते आहे. मला काय वाटते हा मुद्दाच नाही.
यात बोलीइंग्रजी भाषा आणि त्यातील संभाषणकौशल्य हे अगदी शेवटच्या स्तरावर येते का? की तुमच्या मते बोलीभाषा पहिले शिकवावी ?

घड्याळाला चावी दे, फ्लिटचा पंप मार, अहो बाई जरा बाजूला सरका, दह्याला विरजण लावायचंय, गीजर लावून बादलीभर गरम पाणी भरून ठेव, कांदे बारीक चिरून हवेत >>>
कॅन यु स्विच ऑन द गीझर प्लीज किंवा अनियन्स चॉप्ड फाईनली /ज्युलिएन्ड वगैरे..हे मव घरांतील मोलाच्या कामगारापर्यंत सूचनेमार्फत जायला आधी घरधनिणीला तर यायला हवेत. Happy

फारेंड,
होरे इंग्रजी ओळख आहे पण संभाषणकौशल्य हवे आहे यासाठी तू म्हणतोस ते उपयुक्त ठरेल.

रैना
ही पद्धत आम्हाला बेसिक जर्मन शिकवतांना वापरली होती ग्योथे इन्स्टिट्युट्मधे जी मला खूप आवडली. इथे तुला कदाचित वापरता येईल ते म्हणजे अगदी सावकाश बोलायचे आणि जे बोलतोय त्याची अ‍ॅक्शन करत बोलायचे. त्यामुळे सुरूवातीला भाषा जरी कळली नाही तरी त्या आवाजाची सवय होते आणि हळू हळू ती वाक्ये जशाला तशी लक्षात राहून बोलता येतात.
तू कोणाला शिकवत आहेस माहित नाही पण open the book, cutting vegetables, comb your hair, washing cloths, doing dishes, reading a book, cooking a meal, sweeping the floor, driving a car अश्या सारख्या सगळ्या गोष्टी अ‍ॅक्शन करून ती वाक्ये इंग्रजीत बोलून समजावून सांगता येतात. अजून म्हणजे जर्मन मध्ये आम्हाला ते कळले नाही तर आमची शिक्षिका ती अ‍ॅक्शन परत परत करुन दाखवायची आणि परत परत तेच वाक्य जर्मन मध्ये बोलायची पण काहीही झाले तरी तिने त्याचा अर्थ इंग्रजीत सांगितला नाही. तिचे म्हणणे होते की एकदा का दुसर्‍या भाषेत (तुझ्या केस मध्ये मराठी/हिन्दी) भाषांतर करून अर्थ सांगीतला की तुम्ही त्या भाषेच्या कुबड्या वापरायला लागता आणि मग जी भाषा शिकायची असते त्याकडे दुर्लक्ष होते. जे मला स्वतःला पटले. कारण आमच्या वर्गात ज्यांना इंग्रजी येत होते ते आमच्यासारखे लोक लगेच इंग्रजीत हे नक्की काय ते काय म्हणून विचारायचे. ज्यांना इंग्रजी येतच नव्हते ते लोक जर्मनमध्येच बोलायचा प्रयत्न करायचे कारण त्यांच्याकडे दुसर्‍या भाषेचा पर्याय नव्हता. त्यांची भाषा (रशियन/फ्रेंच/पोलीश/रोमेनीयन्/इटालीयन किंवा जी असेल ती) कोणाला कळत नसे. सहाजिकच आमच्यापेक्षा खूप लवकर ते सगळे लोक जर्मन शिकले.

कुठलीही भाषा शिकायची असेल तर रुनी म्हणते तसं त्याच भाषेत बोलायला हवं. दुसर्‍या आपल्याला येणार्‍या भाषेचा आधार घेतला की नवीन भाषा शिकणं अवघड बनतं.

रुनी/ चिनूक्स - धन्यवाद.
पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा ती लिपी तुम्हाला येते.

रुनी- लकिली मीही मॅक्सम्युलर मध्ये जर्मन आणि जपानात जपानी शिकले. जिथे लिपीशी परिचयच नाही तिथे तुम्ही नुसत्या संभाषणाला सुरवात करु शकत नाही दुर्दैवाने. जर्मन शिकताना तुमचे डोळे तरी सवयीने शब्दांवर फिरतात, उच्चारानुसार शब्द हे अजिबात कठिण जात नाही. जपानी शिकताना पहिले वर्ष लिटरली हिरागाना काताकाना बेसिक कांज्यांमध्ये वाया जाते. Happy

हा वाद वगैरे नाही पण मराठी माध्यम ६वीत शिक्षण सोडलेल्या व्यक्तिला सुमारे १२ वर्षांनी इंग्रजी शिकणे डायरेक्ट इंग्रजीत हे फार अवघड आहे. तिला भीती वाटता कामा नये ही पहिली अट आहे.

रुनी- तू मला अजून अशी पन्नास एक सोपी वाक्य देऊ शकशील का प्लीज (मीही प्रयत्न करते इथे ५० वाक्य टाकायचा). आपण चेक करुयात. अ‍ॅक्शन करुन दाखवायचे जमेल. पण त्यात अवघड अक्षरे आणि शब्द नको. ते सर्व लिहायलाही सोपे हवे. की ही लिहायची अट शिथील करु म्हणतेस ?

६ अक्षरी शब्द येता कामा नये (सध्यापुरते). म्हणजे open the gate / peel the banana चालेल. washing clothes/ washing utensils जरा अवघड होईल. पहिली पन्नास वाक्य सोपी पाहिजेत.

सर्वात जास्त प्रॉब्लेम हा आहे की विद्यार्थीनीला दडपण येऊन तिने आता मला जमत नाही असे म्हणता कामा नये. कारण माझ्या अतिउत्साहा आणि पुस्तकी कल्पनांमुळे ती भाषा प्रचंड अवघड आहे असे इंप्रेशन नको व्हायला. नाहीतर पुन्हा कधी आयुष्यात ती इंग्रजी शिकायचे नाव काढणार नाही. त्यामुळे प्रयोग करताना फार सांभाळुन करावा लागतो.

त्यामुळेच सोपे सोपे म्हणजे किती सोपे याबाबत मार्गदर्शन हवे आहे.

मी २ वर्षे अकरावीबारावीतल्या मुलांना रुनीने लिहीलेल्याच डायरेक्ट मेथडने जर्मन शिकवले आहे. तिथे अडचण आली नाही. ती मुलं शिकतात पटापट. कारण ती मुलं तिथे शिकायला आलेली असतात हाही फरक असतो.

इथे दिवसाकाठी अर्धापाऊण तास एवढाच एफर्ट विद्यार्थीनी देऊ शकते.आणि मी आठवड्यातून एकदाच शिकवू शकते. Sad

तुमच्या आयडीया प्लीज येऊ द्या. पण कंस्ट्रेंट्स फार आहेत याची थोडीशी पूर्वपिठिका म्हणून सांगीतले.

रैना , फोनिक्स शाळेत शिकवताना ( साधारण चार वर्षाच्या पुढच्या मुलांना) आम्ही खालील पद्धतीने शिकवायचो. इथे मी फक्त तोंडओळख लिहिते.
सर्वप्रथम ,अल्फाबेट्स शिकवली नाहीत तर उत्तमच आहे. पण समजा A to Z येत असेलच(जे सहसा सगळ्या मुलांना येत असायचच ) तर ते थोड्या काळाकरता मुलांना बाजुला ठेवायला सांगायचा.
आता फोनिक्स मेथड ने अल्फाबेट्स शिकुया.
उच्चारः
A: हा 'ए' न म्हणता 'अ‍ॅ'
B: ब याचा उच्चार बअ असा न करता ब म्हटल्या म्हटल्या थांबता यायला पाहिजे
c: क आणि पुढे थोडा सायलेंट ख/ थोडक्यात घशातुन काढल्यासारखा (K मधला क आणि हा क यात डिफर्न्स आहे.)
D: ड
E: ए
o:ऑ
अशा प्रकारे पुढे झ पर्यंत शिकवाव. संपुर्ण अल्फाबेट्स न शिकवता मध्येच थांबुन आत्ता पर्यंत शिकवलेल्या अक्षरांमधुन आता शब्द तयार करायला शिकवावे. ते कसे तर त्यासाठी धडा २

धडा २:
सर्वप्रथम अ‍ॅ वर्डस शिकुया.
cat: क्+अ‍ॅ+ट = कॅट
man : म्+अ‍ॅ+न=मॅन
sam: स्+अ‍ॅ+म=सॅम
आत घरातील वस्तु दाखवुन स्पेलिंग तयार करायला म्हणजे थोडक्यात वाचायला आणि बोलायला शिकवावे.
उदा: fan :फ+अ‍ॅ+न

जसजशी प्रगती होइल तसे पुढचे शब्द
उदा: RIN : र+इ+न
मग nirma: न+इ+र+म+आ
Parle: प्+आ+र्+ल्+ए
इत्यादी.
थोडक्यात तुम्ही या मेथड ने उच्चारानुसार स्पेलिंग तयार करायला शिकता. म्हणजे मनात उच्चार करता, वाचता आणि मग लिहिता.
ही पद्धत योग्य वाटत असेल तर सांग मी यासाठी लागणारी आणखी माहिती देईन.

रैना,

ESL साठी रीसोर्सेस गूगलून पहा. अमेरिकेत, इंग्रजी शिकवण्याकरता अनेक प्रकारचं संशोधन चालतं, अनेक प्रोग्रॅम्स आहेत. बर्‍याचदा हे प्रोग्रॅम परदेशातून आलेल्या अ‍ॅडल्ट्ससाठी टार्गेटेड असतात. तुला त्याचा फायदा होईल. मला काही स्पेसिफिल साइट / माहिती मिळाली तर सांगेनच. इथे चायनीझ किंवा रशियन , अरेबिक, पर्शियन अशा भाषा शिकताना / शिकवताना आधीसंभाषणावर भर देतात . व

रैना, मी भाषा शिकवण्यात तज्ञ नाही पण मला काय वाटतं ते लिहिते.
बोली भाषा बोलणे, अक्षरे , शब्द वाचायला शिकणे आणि पुर्ण लिहायला शिकणे या गोष्टी "भाषा शिकणे" या एकाच सदराखाली येत असल्या तरी मला वाटतं त्या भिन्न आहेत . किंवा निदान त्यांना सुरुवातीला तरी भिन्न ठेवता आले तर ठेवावे. बोली भाषा शिकण्यासाठी लिहिता, वाचता यायला हवे ही अट नकोच. रुनी ने लिहिलेली पद्धत त्यासाठी योग्य आहे. काहीही लिहुन न घेता सुद्धा रोजच्या सरावाने (रुनी ने सांगितल्या प्रमाणे) बोली भाषा बोलता येऊ शकते. एकदा भाषा प्रयत्नाने बोलता आली की लिहिलेले शब्द वाचुन बघावे का हे वाटु शकते. आपण बोलतो ते शब्द कसे दिसतात , हे लिहिल आहे ते आपल्याला वाचता येईल का या उत्सुकतेने वाचन शिकण्यासाठी मोटिव्हेशन मिळु शकते. अशा वेळी वाचन आणि लिखाण शिकवल्यास त्यात खुप इंटरेस्ट येईल.
तु म्हणतेस त्या व्यक्तीने शाळा मधेच सोडली ना. मग त्याच व्यक्तीला लिहिण्यापासुन सुरुवात करायला लावुन कदाचित पुन्हा गिव्ह अप करायच्या वळणावर जायला लागेल असं वाटतं.
अशा व्यक्तीला आधी नुसतं बोलायाला शिकवल तरी तिचा आत्मविश्वास वाढु शकतो. लिखाणाची पायरी मग ती व्यक्ती स्वतःहुन चढेल.
(जपानी शिकताना सुद्धा जे तिन्ही लिप्या शिकवण्याचा वेळ घालवतात त्यापेक्षा प्रत्यक्ष बोलणे फायद्याचे होते, मी जपानी सुरुवातीला हिरागाना, कांज्या करायला गेले आणि जरा कंटाळा आला. मग असच बोलत बोलत शिकले. )

रैना, मलाही रूनिने सांगितलेली पद्धतच बोलीभाषा शिकण्यासाठी बेस्ट वाटते आहे. अक्षरओळख/लिपी शिकण्याची आवश्यकता तू सांगितलेल्या केसमधे नाहीये असं वाटतंय, उलट त्यामुळे विद्यार्थी घाबरून जायचीच शक्यता जास्त.

मिंग्लिश किंवा हिंग्लिश मधून सुरूवात केली तर? अर्धे मराठी अर्धी इंग्रजी? मग हळू हळू पूर्ण इंग्रजी.
इंग्रजी मालिका बघणे बातम्या ऐकणे यामुळे भाषा खूप कानावरून जाउन ओऴखीची ठरेल.
सोपी सोपी वाक्ये मी पण बनवू शकेन. पण इंग्रजीत सारखे प्लीज थँनक्यू म्हणतात ते पटेल ना.
जसे विल यू मेक टी प्लीज?
लेट्स इट, वगिरे.

"रोजच्या व्यवहारातील इंग्रजी साक्षरता" यावी एवढाच उद्देश असेल तर (आरंभी तरी)व्याकरण गुंडाळून बाजूला ठेवायला हरकत नसावी. व्याकरणाशिवायही तुमचे म्हणणे समोरच्याला आणि त्याचे म्हणणे तुम्हाला कळल्याशी कारण. यात आर्टिक्ल्स, काळविचार नाही घेतली तर अडेल का?
विल यू मेक टी प्लीज? याऐवजी आधी 'मेक टी=चहा कर' एवढे कळले तरी पुरे . मग बाकीची आभूषणे चढवायची असतील तर बघता येईल.अंक पण शिकायला लागतील.
हे बोलण्याबद्दल.
लिहिण्या/वाचण्याबाबत इंग्रजी अतिदुष्ट आहे.
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रौढांना मराठी वाचन शिकवण्यासाठी अक्षरओळख शब्दातून/वाक्यातून करून दिलेली पाहिली). म्हणजे 'बबन कमळ बघ' हे आधी वाचायला शिकले की 'बबन नळ बघ' ओळखता येईल्...असे काही तरी . पण हे विंग्रजीत नाही जमायचे.

फारएंड, रुनी, मेधा ताई, चिनूक्स, ईबा, सावली, अश्विनी मामी, भरत मयेकर, गजानन, सीमा - आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार. कुठे ना कुठे कोणाला ना कोणातरी या विचारांची काहीतरी मदत होईल हे नक्की.

सीमा- थँक्यु. थँक्यु. आम्ही बरोब्बर तिथपावेतो पोचलोत. पुढचे सांग ना कसे शिकवतात प्लीज. काहीनाहीतरी मी माझ्या मुलीच्या बाबतीत नक्कीच प्रयत्न करु शकते.
घरातील सर्व वापराच्या वस्तुंची नावे आणि words sounding like those words असे सोपे पडेल का?

मेधाताई- ESL पहाते.

मामी- थँक्यु.मिंग्लिश विल वर्क (बेस्ट) असे वाटते आहे. इथे प्लीज सोपी वाक्य टाकाल का तुम्हाला वेळ मिळत जाईल तसतशी ? प्लीज. थँक्यु सकट ही चालतील.

सावली- जपानी शिकणे खरेच कंटाळवाणे करुन ठेवतात. Happy पण त्यांचाही नाईलाज आहे असेच म्हणावे लागेल.

अजूनही मला थेट आणि नुसतेच इंग्रजी बोलायला शिकवणे ही पद्धत पटत नाहीये तितकीशी. यासाठी रोज जास्त वेळ द्यावा लागेल असे वाटते आहे. पण मी विचार नक्कीच करते आहे. ट्राय करुन पहाते एखाद्या महिन्यात आणि इथे लिहीते.
कोणी भारतीय प्रौढांना (फक्त प्राथमिक शिक्षण झालेल्या) इंग्रजी शिकवले आहे का असे डायरेक्टली? प्लीज अनुभव शेअर कराल का? आभारी आहे.

रैना, अजून एक.... जर त्यांना इंग्रजी मुळाक्षरे ओळखता / लिहिता येत असतील तर त्यांना रोज इंग्रजी वर्तमानपत्रातील ठळक मथळ्यांतील अक्षरे ओळखायला सांगणे. त्यांच्या इंटरेस्टच्या ज्या बातम्या असतील त्यांमधील अक्षरे/ शब्द/ विशेषनामे ओळखायला सांगणे.

इंग्रजीतून संभाषण हा तर उपाय सर्वात बेस्ट आहे! माझी आजी देखील आमचे ऐकून हळूहळू इंग्रजी शब्द बोलू लागली होती. फोनवर ''हॅलो, हू (इज) स्पीकिंग? व्हाट डू यू वॉन्ट?'' अशा तर्‍हेची वाक्ये ती बोलायची. वर्तमानपत्रातील इंग्रजी अक्षरे ओळखायची. आणि तेव्हा तिचे वय ७५ वर्षांच्या पुढचे होते. त्या व्यक्तीसमोर आपल्या आपापसात इंग्रजीतून बोलण्याचा ह्यासाठी चांगला उपयोग होतो. रूनीने सांगितलेली मेथड हमखास यशस्वी होणारी आहे. प्रत्येक अ‍ॅक्शन व त्यासोबत त्या अर्थीचे वाक्य / शब्द हे वारंवार करून दाखवले, त्यांची उजळणी केली की आपोआप त्या गोष्टी लक्षात राहू लागतात.

इंग्रजीतून बातम्या ऐकणे, खास करून वेदर रिपोर्ट बघणे.... त्यात त्यांना काय सांगत आहेत ह्याचा व्हिज्युअल क्लू ही मिळत असतो, ठिकाणांची नावेही परिचित असतात, त्यामुळे इंटरेस्ट वाढतो.
त्या व्यक्तीला ज्या विषयात रस आहे त्या विषयाच्या मदतीनेही इंग्रजी शिकवता येईल. मुळात ही भाषा सोपी आहे, आपण ती शिकू शकतो हा आत्मविश्वास त्या व्यक्तीमध्ये निर्माण झाला की पुढील काम ती आपण होऊनच करू लागते. रंगीत पिक्शनरी , पिक्शनरी गेम्स चा ही उपयोग होऊ शकेल.

रैना, किती जणांचा समुह आहे?
मराठी येतं ना वाचायला?
मग त्यांच्याच आवडीचे शब्द त्यांनाच विचार - उदा. आईस क्रीम - मग ते शब्द एका कार्डवर उच्चार मराठीत आणि आणि खाली अ‍ॅक्च्युअल इंग्रजीत लिहून दे कार्डस वर .. (कदाचित मी जरा लांबची उडी मारतेय का?)
पण जे शब्द त्यांच्याकरता महत्त्वाचे आहेत/त्यांच्या कुतुहलाचे आहेत त्यापासून सुरुवात केली तर त्यांचा रस टिकेल. त्यांनाच विचारायचं की कुठलं वाक्य इंग्लिश मधे बोलायचय.. किंवा कुठला शब्द इंग्लिश मधे बोलायचाय.
काही वाक्य:
," खूप कामं पडलीत", "कुठे चाल्लास", "काय करतेयस?"," कशी आहेस", "चला जाऊया", "कंटाळा आलाय", "मारामारी नका करू", "खूप महाग आहे", "आत्ता नको", "आज सोम(कुठलाही) वार आहे"
गाण्यांचा खूप उपयोग होऊ शकतो. आमच्या फ्रेंच क्लास मधले काहीकाथेला ही शब्द केवळ गाणी ऐकलेली म्हणून मला आठवताहेत Happy
तर सरळ उच्चारातली - पण छान ट्युन असलेली गाणी ऐकवू शकतेस.

रैना, रुनी आणि सावलीने लिहिलेले बरोबर आहे. कारण जेवढे ऐकू त्याच्या २५% बोलता येते त्यामुळे पुर्ण पाऊण तास इंग्रजीमध्ये बोल. तसेच एक अक्टिवहिटी घ्यायची. उदा चहा करणे मग त्यात त्या क्रिया येतात त्यांची छोटी वाक्य करायची आणि ती शिकवायची. सोबत अ‍ॅक्शन करायची म्हणजे कोणत्या अ‍ॅक्शन्ला काय म्हणायचे ते कळेल. ह्याचा रोज सराव करायला सांगायचे. तिला माहीत असलेले शब्द विचारुन त्या बरोबर जोडता येतील असे शब्द आधी घ्यायचे. उदा कलर काही माहीत असतील तर जे माहीत नाहीत ते घ्यायचे त्यातून आत्मविश्वास वाढेल. तसेच स्वतची माहीती I am a girl. my name is... I have.... अशी सोपी वाक्ये शिकवावीत. तसेच चित्रवाचन उपयोगी ठरेल. तू कोणत्या देशात/शहरात आहेस हे माहीत नाही. माधुरी पुरंदरे ह्यांचा एक सेट आहे. ज्योत्सना प्रकाशन चा तसेच सीएलाआर ( Centre for learning resources ) ह्यांचे माय वर्ल्ड माय वर्ड असे एक पुस्तक आहे. तसेच प्रगत शिक्षण संस्था फलटण हयांची एव्हरीडे इंग्लिश भाग १ आणि २ (जेन साही लेखिका) अशी पुस्तके आहेत त्याचा उपयोग होईल.
चित्रवाचनात आधी फक्त शब्द शिकवायचे मग छोटी वाक्य आणि मग गुंतागुंतीची वाक्ये
आठवड्यातून जे शिकवशील त्याचा सराव होणे आवश्यक आहे नाहीतर एक आठवडा ही गेप जास्त आहे.
एक नियम म्हणजे त्या तासात फक्त इंग्लिश बोलायचे जोवर कळ्त नाही तोवर अ‍ॅक्शन करायची पण मराठीत बोलायचे नाही. तसेच एकूण १०० शब्द शिकवणार असशील तर ३० ते ४० वाचता आले पाहीजेत आणि १५/२० चे स्पेलिंग आले पाहीजे. शब्द येत असतील तर हियर, देअर धीस देट ची वाक्ये शिकवायची.मग
here is a frog
here is a yellow frog
here is a small, yellow frog
here is a small, yellow frog sitting on the bag
here is a small yellow frog sitting on the big bag
here is a small yellow frog sitting on a big brown bag
here is a small yellow frog sitting on a big brown bag quietly .अशी काठिण्य पातळी वाढवत न्यायची.
कोणी येणार असेल तर पुस्तके आणि चित्रवाचन पाठवू शकेन. रोजच्या वापरातले लागणारे इंग्लिश आणि दुकानांच्या पाट्या, सुचना काही महत्वाचे फौम्स हा करिक्युलम ठेवला तरी चालेल. तसेच शिकलेलं रोजच्या जीवनात वापरले गेले पाहीजे रादर त्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न झाले तर उत्तम.
अजून एक,अग क्षिप्रा म्हटलेलं आवडेल. Happy

बेसिक करिक्युलम
numbers
colours
days
months
family - relationships
friends
ourselves
house/kitchen
office
shop
hospital
time
body parts
animals/birds असा ठेवून ह्यातले किमान शब्द/वाक्य तू काढू शकतेस.

अमा म्ह्णतात तसे मिंग्लीश बरे पडेल. माझा नवरा जपानी शिकायला जायचा तेव्हा सुरवातीला सगळे इंग्रजी लिपी वाचून चालायचे. आलेल्या लोकांशी झटपट संवाद साधणे महत्वाचे होते त्यामुळे हिरागाना, काताकाना एकीकडे गोगलगाईच्या गतीने आणि त्याच वेळी संभाषण झटपट शिकायला चक्क 'Hajimemashite. Sam Desu.' असे चालायचे. कांजी पर्यंत तर माझा नवरा पोहोचलाच नाही. आता सराव नसल्याने हिरागाना वगैरेही विसरलाय पण कामचलाऊ बोलतो. दोघे जपानी आपसात बोलत असले तर काय बोलतायत ते समजते. मला आठवते शाळेत असताना स्पेलिंग, व्याकरण वगैरे जमत नाही म्हणून बरेचजण इंग्रजीची धास्ती घ्यायचे. लहान गावात दहावीला इंग्रजीत नापास वाले बरेचजण असायचे. अगदी बीजगणित, भूमितीत पास पण इंग्रजीत नापास अशी अवस्था असायची. अक्षर ओळख असेल तर फोनिक्स वापरुन लिहा-वाचायला हळू हळू शिकवता येइल. इथे माझ्या मुलाला फोनिक्स शिकवले ते असे. vowels आणि consonants शी रिलेटेड साउंड. यात vowels मधे शॉर्ट आणि लाँग साउंड. जोडीला चित्र. एका आठवड्याला एक लेटर. त्याच्या जोडीला त्या आवाजाची चित्रे आणि शब्द. हा प्रकार जवळ जवळ सहा महिने चालला. त्या नंतर ch,sh,th वगैरे आवाज. c चा क कधी आणि स कधी या सारखे रुल्स. हे सगळे वर्षभर चालले. पुढील वर्षी फोनिक्सचे नियम वापरून कोडिंग. हे वर्षभर चालले. २ री पर्यंत ग्रामर या गोष्टीचा विचार नव्हता. २ रीत ग्रामर म्हणजे योग्य ठिकाणी a,an, the वापरणे, विराम चिन्हांचा वापर, कॅपिटल लेटरचा वापर वगैरे. तिसरी पासून शर्ली ग्रामर. यात व्याकरणाचे नियम असलेल्या जिंगल्स होत्या. त्यामुळे लक्षात ठेवणे सोपे झाले. http://www.englishclub.com/

http://www.eslsite.com/

या सारख्या बर्‍याच साईट्स आहेत. त्या फ्री आहेत. त्यांचा वापर करता येइल. मी जमेल ती मदत करायला तयार आहे. वरती क्षिप्राने अभ्यासक्रम दिला आहेच तसा क्रम ठेवला तर बर्‍याच बेसिक गोष्टी कव्हर होतील.

गजानन, जपानी भाषेत लेखन हे चायनिज अक्षरे (कांजी) आणि दोन प्रकारचे फोनेटिक अक्षरे यांचे मिश्रण असते. यातील कांजी ला अर्थ आणि साउंड असतो. प्रत्येक कांजीचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक अर्थ येतात. हिरागाना ला साउंड असतो. कांजीत जो भाग लिहिता येत नाही तो हिरागानात लिहितात. काताकानात पण साऊंड असतो. परक्या भाषेतील शब्दांसाठी काताकाना वापरतात. मला इतपतच ढोबळ माहिती आहे. Happy

काही वर्षांपूर्वी सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस (http://www.clrindia.net/) यांच्या तर्फे 'आम्ही इंग्रजी शिकतो' या नावाखाली एक रेडिओ प्रोग्रॅम पुणे केंद्रावरून प्रकाशित व्हायचा. त्याचा मुख्य उद्देश खेड्यातील तसेच मराठी मिडियम मधील मुलामुलींची इंग्रजी भाषेबद्दलची भीति घालवणे हाच होता. त्या साईटवर तुला बरच साहित्य मिळेल. तसेच त्यांच्याशी संपर्क साधलास तर कदाचित ते रेकॉर्डिंग पण मिळेल.

रैना
इथे बर्‍याच जाणांनी आधीच लिहीलेले आहे त्यामुळे मी परत तेच लिहीत नाही. मला वाटते तू भाषा बोलायला शिकणे आणि लिहायला वाचायला शिकणे यात थोडी गल्लत करत आहेस. या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत आणि त्या शिकवण्याचे तंत्र वेगळे आहे. तू हेडरमध्ये लिहीलयस त्याप्रमाणे मला कळलेला उद्देश हा की त्या व्यक्तीला कामचलाऊ इंग्रजी बोलता यायला हवे. अस्खलित बोलता येणे ही त्यानंतरची पायरी झाली. भाषा बोलण्याचा आणि ती लिहीता वाचता येण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. तो नसावा. सगळीकडे निरक्षर लोक असतील जे त्यांची भाषा नीट बोलू शकतात. ते कसे शिकले असतील? लहान मुले कुठलीही भाषा बोलायला कसे शिकतात? तर आजूबाजुला ऐकुण, सतत कानावर पडल्यामुळे. आपण नाही का शेजारी दुसर्‍या भाषेत बोलणारे कोणी आले की त्यांच्या भाषेतले काही शब्द, वाक्ये शिकतो. ती भाषा शिकण्याची पहिली पायरी.
इथे काही लोकांनी लिहीलय की दुसर्‍या एखाद्या भाषेचा आधार घ्यायला हवा, माझ्या अनुभवानुसार हे सुरूवातीला खूप चांगले वाटते कारण त्यामुळे शिकण्यातली प्रगती पटपट होतेय असे वाटते आणि भाषा बोलता न आल्यामुळे होणारी चिडचिड कमी होते. पण खर तर लॉंग रन मध्ये ही पद्धत तुम्हाला मारक ठरते, तुमचा भाषा शिकण्याचा वेग कमी होतो मुख्य म्हणजे शब्दसंपदा हवी तेवढी वाढत नाही. मग आपण ती चूक करायला नको होती असे वाटते. पण एकदा का तुम्ही शिकवायला २ भाषा वापरायला सुरूवात केल्या की नंतर तुम्हाला फक्त एकाच भाषेत स्विच (मराठी शब्द?) होणे अवघड जाते.
त्यामुळे माझ्या मते इंग्रजी बोलतांना सुरूवातीला चुकीच व्याकरण बोलले तरी चालेल पण त्याच भाषेत बोलायचे असे ठरवायला हवे. I go office, you eat rice, I sleep, I talk mother, I work, she not go school today अश्या पद्धतीची वाक्ये आली तरी चालतील हळू हळू योग्य काळ, क्रियापद त्यात टाकायला शिकवता येईल.

विषय चान्गलाच "जिव्हाळ्याचा" आहे Happy
याचे सूत्र उलगडले, तर इये मराठीचिये पुण्यनगरी बालकान्ना हगारीबिगारी पासुन जे इन्ग्रजी माध्यमात घालुन पालक मराठीचा घात करतात त्यास काही प्रमाणात नक्कीच आवर बसेल, शिवाय ज्यांस इन्ग्रजी नीट येत नसल्याबद्दल खन्त असेल तर ती अभ्यासा(नेच) दूर करता येईल.

माझे कॉलेज शिक्षण चालु होते तरी इन्ग्रजीमधे मी अगदी "ढ" च होतो (आजही फार फरक पडला नाहीये, पण त्याबाबतचा न्युनगन्ड मात्र कमालिचा घटलाहे - त्यास अनेक कारणे!) मात्र जेव्हा त्याच काळी मला सन्धी मिळाली तेव्हा, कॉमिक्स पुस्तके वाचून मी माझे इन्ग्रजी "बर्‍यापैकी" सुधरवुन घेतले. कॉमिक्सची आवड, चित्रान्मुळे विषयाबाबत उत्सुकता निर्माण होणे, तो समजण्यासाठी तरी "डिक्शनरी" हातात घेणे वा कुणाला विचारणे अशी मन्द गतीने प्रगती होत गेली. नशिबाने त्याकाळीच १८८० पासुन प्रसिद्ध झालेल्या न्याशनल जिओग्राफिकचे सर्व अन्क चाळायला मिळाले.
असे वाटते की मातृभाषेत ज्ञात असलेल्या गोष्टीच जर परक्या भाषेत वाचायला मिळाल्या तर त्या त्या भाषेचे शिक्षण सोपे होईल.
बाकी वर बर्‍याच जाणकार मण्डळीन्नी मते नोन्दवली आहेतच, त्याहुन वेगळे मी काय सान्गणार?

Pages