लता मंगेशकरांवरील लेखन साहित्य

Submitted by शर्मिला फडके on 7 January, 2011 - 01:44

लता मंगेशकरांवर आजपर्यंत एकुण किती साहित्य (गाण्यांविषयक पुस्तके, चरित्रात्मक लेख, संकलीत लेख, आठवणी इत्यादी) लिहिले गेले आहे याची माहिती ज्यांना कुणाला आहे त्यांनी ती कृपया इथे द्यावी. पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकाशकाचे नाव, प्रकाशनाचं वर्ष इत्यादी सहित ही माहिती देता आली तर जास्त चांगलं पण नुसती पुस्तकांची नावं जरी सांगितली तरी चालेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला माहित असणारी काही नावं:

'लता इन हर ओन व्हॉइस' - नसरीन मुन्नी कबिर
फुले वेचिता- लता मंगेशकरांनी लिहिलेलं पुस्तक
लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन
लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९)- संपादन:विश्वास नेरुरकर
इन सर्च ऑफ लता मंगेशकर- हरिश भिमाणी. प्रकाशक- हार्पर कॉलिन्स
गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन

फार पूर्वी १९६७-६८ दरम्यान 'रसरंग ' मध्ये 'लता मंगेशकर यांची संगीतमय दुनिया ' अशी एक लेख माला प्रसिद्ध होत होती त्यात प्रत्येक लेखात वेगवेगळ्या संगीतकारांच्या गाण्याचा आढावा असे. तसे विश्लेषण फार डीप नसे पण लताजींच्या करीअरचा पद्धतशीर लेखाजोखा ठेवण्याचा तो एक पहिलाच प्रयत्न असावा.... लेखक बहुधा कुणी दिलीप कुलकर्णी असावेत. दिलीप होते आडनावाबद्दल खात्री नाही.

'स्वरांचे देणे' असं मंगेशकर कुटुंबियांवर नवीन पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. लेखक आठवत नाही.
माई मंगेशकरांचं शिरीष पै यांनी शब्दबद्ध केलेलं आत्मचरित्र - स्वरांच्या सावलीत
श्रीमती रेखा चौरे यांनी लिहिलेलं पुस्तक. पुस्तकाचं नाव आठवत नाही. मुखपृष्ठावर लताचं मोहन वाघांनी काढलेला डोक्यावर पदर घेतलेला फोटो आहे.
इसाक मुजावर यांनी लतावर पुस्तक लिहिलं आहे. नाव आठवत नाही. नवचेतना प्रकाशनाचं हे पुस्तक आहे.

लता मंगेशकर यांच्या गायन कारकीर्दीला २५ वर्षे झाली त्यानिमित्त वेविध मान्यवरांनी खास लिहिलेल्या लेखांचे 'लता' हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्याच्या संपादक सरोजिनी वैद्य, शान्ता शेळके आणि वृंदा लिमये या होत्या.(मी ते पुस्तक वाचल्याला पण २५ वर्षे होतील आता!). यात आशा भोसले यांनी लिहिलेल्या लेखाचे शीर्षक आहे - 'आमचे छोटे बाबा'. यातला कुमार गंधर्वांनी लिहिलेला लेख ११/१२व्याच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासाला होता.
(अवांतर : यातला आशाचा तो लेख राम पटवर्धनांनी सत्यकथेत आवर्जून पुनर्मुद्रित केला आणि आशाबाईंनी सत्यकथेकडून आलेला छोटासा चेक 'लेखनाचा मोबदला' म्हणून मोठ्या अभिमानाने जपून ठेवला : वडिलधारी माणसे - शान्ताबाई )

भरत मयेकरांनी उल्लेखलेल्या या पुस्तकात भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, पु. ल. देशपांडे अशा अनेकांचे लेख आहेत. श्री. प्रकाश भोंडे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. पुण्याच्या एनएफएआयच्या ग्रंथालयात हे पुस्तक आहे.

मला वाटतं तेंडुलकरांच्या 'हे सर्व कोठुन येते' मध्ये ' एक मुलगी गाते' नावाचं एक स्फुट आहे लताबाईंवर.
राजहंस प्रकाशन.

तसेच मागच्या मौजेच्या दिवाळी अंकात अशोक रानड्यांचा एक बंडल लेख होता. त्यात कदाचीत अजून पुस्तकांचे संदर्भ मिळतील.

राजू भारतन यांचे पुस्तकात रुना लैला लताबाईंना कॉम्पिटिशन वगैरे असे कायकाय आहे... कुठल्या अँगलने रुना लैला लताबाईंना सि री य स काँम्पीटीशन हे कळलेच नाही. असो.

लताबाईंवर असंख्य लेख लिहिले गेले आहेत. वपुंनी एक लेख लिहिला आहे. शांताबाईंनी लिहिलेला लेख मायबोलीवर आहे. शिरीष कणेकरांनी लताबद्दल बरंच लिहून ठेवलं आहे. मन्ना डेंनी त्यांच्या आत्मचरित्रात लता-आशाबद्दल लिहिलं आहे.

रैना हिंदी चित्रपट संगीतात वेगवेगळे कँप्स होते आणि काही पत्रकारही अशा कँप्सचा भाग असायचे. त्याचाच परिपाक म्हणून अशी वाक्य आली असतील.
अभिजीत देसाईंनी लोकप्रभामध्ये लिहिलेला एक(किंवा अनेकही) सुंदर लेख .
वडिलधारी माणसे (शान्ताबाई) यात लता, आशा, हृदयनाथ यांच्यावर लेख आहेत.

माई मंगेशकरांवरील किंवा इतर मंगेशकरांवरील पुस्तकांची माहिती नको आहे.
बाळू जोशी रसरंग मधल्या त्या लेखांचे संकलन झालं आहे का? रसरंग मासिक अजून निघतं का? निघत असेल तर तिथे चौकशी करीन मी.कणेकर आणि अभिजीत देसाईच्या लेखांचं संकलन नाहीये. अर्थात
चिनूक्स रेखा चौरेंच्या पुस्तकाबद्दल अजून काही तपशील नाही मिळू शकणार? शांताबाईंच्या लेखाच्या लिंकबद्दल आभार. सुरेख!!
इसाक मुजावरांच्या आणि सरोजिनी वैद्य संपादित 'लता' पुस्तकाचे तपशील मला लोकमान्य टिळक संदर्भ ग्रंथालयातून मिळाले. धन्यवाद.
मधुवंती सप्रेंचं स्वरयोगिनी म्हणून लताबाईंच्या मराठी गाण्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारं नवं पुस्तक पाहिलं. परममित्र ने प्रकाशित केलं आहे. बरं आहे.

शिरिष कणेकरांनी नसरीन मुन्नी कबीरच्या पुस्तकावर टीका केली आहे की यात नवं काय आहे? मी जे किस्से माझ्या इतक्या वर्षांमधे लिहिलेल्या लेखांमधून लिहिलेत तेच बहुतेक रिपिट केलेत लतानी तिच्याशी बोलताना. नसरीनबरोबर लताने पुस्तक केलं याची जळजळ कणेकरांना तीव्रतेने वाटतेय असं त्यांनीच त्यात म्हटलं आहे. मला ही टीका अजिबातच पटली नाही. कणेकरांचे लता-आशा बरोबर घरगुती जिव्हाळ्याचं नात जडलं आहे आणि त्यांनी त्यांच्याकडे अशा असंख्य किश्शांचं, माहितीचं भंडार खुलं केलं आहे तर मग कणेकरांना कधी का वाटलं नाही की नसरीनच्या पुस्तकासारखं सचित्र, सुंदर पुस्तक जे समग्र लता उलगडून दाखवायचा प्रयत्न करेल असं, तिच्या गाण्यांचं रसग्रहण करणारं, तिच्या आणि संगीतकारांच्या, गीतकारांच्या, अभिनेता-अभिनेत्रींबरोबरच्या, निर्माता, दिग्दर्शकांबरोबरच्या व्यावसायिक-वैयक्तिक संबंधांवर प्रकाश पाडणारं, तिच्या इतक्या प्रदीर्घ कारकिर्दीचं, छायाचित्रांचं डॉक्युमेन्टेशन करणारं (जे नसरीनच्या पुस्तकात वीस टक्के जेमतेम झालय) पुस्तक किंवा ग्रंथ आपणच लिहावा म्हणून? कणेकर म्हणतात नसरीनचं पुस्तक इंग्रजीत आहे आणि ती एन्.आर.आय. आहे म्हणून लताने तिच्याबरोबर पुस्तक केलं. हेही मला पटत नाही. डॉक्यूमेन्टेशन करण्याइतका पेशन्स आणि कळकळ कणेकर काय इतर कोणाच मराठी पत्रकारांना-लेखकांना इतकी वर्षं वाटली नाही (त्यांनी तसे प्रयत्न केले आणि लताने नकार दिला असंही कोणी आजवर म्हणाल्याच मी तरी ऐकलेलं नाही) त्यापेक्षा फुटकळ लेख ज्यात फक्त गाण्यांच्या, किश्शांच्या नोंदींच एकत्रीकरण आहे असेच लिहिणं त्यांना जास्त सोपं वाटलं हेच खरं. वरच्या पुस्तकांच्या यादीतून तरी हेच जाणवतय.
असो.

माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. अजून काही माहिती कुणाला देता आली तर जरुर द्यावी.

शर्मिला,
नसरीन मुन्नी कबीरनं लतावर चॅनेल फोरसाठी सहा भागांचे लघुपट तयार केले होते. ते खूप चांगले आहेत, असं ऐकलं होतं. १९९१ साली चॅनेल फोरवर ते प्रसारित करण्यात आले होते.
रेखा चौरे यांचा दूरध्वनी क्रमांक माझ्याकडे आहे. तो शोधून एकदोन दिवसांत देतो.
रसरंग आता बंद झालं. पण इसाक मुजावरांकडून या लेखांबद्दल माहिती मिळू शकेल. त्यांचा रसरंगशी संबंध होता. एनएफएआयच्या ग्रंथालयात रसरंगचे जुने अंक मिळू शकतील.
गोनीदांच्या 'त्रिपदी'मध्ये लताबाईंवर एक लेख आहे. इतर लेखांपेक्षा हा लेख वेगळा आहे कारण यात लताबाईंच्या आध्यात्मिक जाणिवांबद्दल भाष्य आहे. काही काळ त्या 'शिवदासी' अशी सही करत असत, त्याबद्दलही गोनीदांनी लिहिलं आहे.
कुसुमाग्रजांनी लतावर कविता केली होती. ती सापडली तर बघतो.

शर्मिला,
रेखा चवरेंच्या पुस्तकाचं नाव 'हे रत्न भारताचे' असं आहे. प्रकाशक - परचुरे प्रकाशन.

'अपूर्व, अलौकिक, एकमेव' या यशोधरा भोसल्यांच्या पुस्तकात लता मंगेशकरांवर लेख आहे.

दिनकर पाटील यांचं 'पाटलाचे पोर' नावाचं आत्मचरित्र आहे. यात लताच्या असंख्य आठवणी सांगितल्या आहेत. दिनकर पाटील मा. विनायकांचे साहाय्यक होते, आणि तेव्हा त्यांचा लतासी स्नेह जुळला. लताने अनेक कठीण प्रसंगी त्यांना मदत केली, आणि या सगळ्या घटना त्यांच्या आत्मचरित्रात आहेत.