पुस्तक पारायण...

Submitted by हर्ट on 7 February, 2008 - 00:00

वाचन ही एक चांगली सवय आहे. मी वाचन करतो हे जर कुणाला सांगितले तर जनमानसात आपला सन्मान वाढतो. आपलेच कौतूक आपण करू नये म्हणतात पण ह्या बीबीला ही गोष्ट काही मानवणार नाही. ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांच्याकडे काही पुस्तकं संग्रही असतात. अधुनमधुन आपण ही पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचतो, निदान काही भाग तरी विरंगुळा म्हणून वाचतोच वाचतो. कधी कधी असे होते की आपण एखादे पुस्तक अनेकदा वाचून देखील आपले पोट भरत नाही. सुदैवाने खूप पाने खायची सवय मला जडली नाही. पण अलिकडे मी एका पुस्तकाचे २१ वेळा पारायण केले तेंव्हा माझे हे पुस्तक चोरीला गेले. जळी स्थळी काष्ठी पाषाणी हे पुस्तक माझ्या सोबत असायचे कारण ते छोटेखानी होते. वर त्या पुस्तकाचे अनेक पदर माझ्या लक्षात सातत्याने येत गेले. मग गोडी वाढत गेली. कधीकधी मीटींगला देखील ते पुस्तक डायरीच्या आत ठेवून मी वाचले आहे. अनेकदा एकच एक पुस्तक वाचून त्या पुस्तकाची धार जाते म्हणतात. पण माझ्याबाबतीत उलटच होत गेले. चोरीला गेलेले पुस्तक सापडले खरे पण ते पुस्तक एका कोकणी व्यक्तीने तिच्या घरी ठेवून दिले आहे. आता अगदी वर्षभरानंतरच परत मिळणार आहे म्हणाली. ते पुस्तक आहे 'आहे हे असे आहे'. लेखक कोण हे इथे सांगणे न लगे. सगळेच त्यांचे पंखे आहेत. मला ह्या पुस्तकाने प्रचंड वेड लावले. काही पुस्तके मी दोन किंवा फ़ार फ़ार तर तिन वेळा पारायण केलेली असतील पण २१ वेळा खूप झाले की नाही

आज मराठी भाषा दिवस आहे. साहित्य हे भाषा टिकवण्याचे, तिला वृद्धींगत करण्याचे एक उत्तम साधन मानले जाते. ह्या दिनानिमित्त आणि चिरंजीव तुषार ह्यांना खूष करण्यासाठी मी हा बीबी उघडला आहे. (मिस नंदीनीला राग येणार नाही अशी अपेक्षा.)

तर मंडळी, तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचे तुम्ही किती वेळा पारायण केले ते आधी लिहा, आणि का आवडले हे जर सांगता येत असेल तर तेही नक्की सांगा. कदाचित आम्ही देखील ते पुस्तक वाचून बघू.

या आधिची चर्चा या दुव्यावर वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स स्वरूप ..
काल सांगायचं राहून गेलं -- काही महिन्यांपूर्वी 'कोसला' वाचलं.
--------
कोसला, दुनियादारी आणि शाळा प्रत्येकाने जरूर वाचावी.
-------
साधारण १२+ वर्षांच्या मुलांनी आवर्जून वाचावं ते म्हणजे -- 'एक होता कार्व्हर' Happy

सिंड्रेला, नेगल म्हणजे प्रकाश आमटेंचे ना?

'एक होता कार्व्हर' - हो हो हे खरच वाचण्यासारखं आणि त्यातुन खुप काही शिकण्यासरखं पुस्तक आहे. मला आरतीने सुचवले होते वाचायला.
.
सिंड्रेला, नेगल म्हणजे प्रकाश आमटेंचे ना? >>> हो. नेगलच्या खोड्या वाचताना एव्हढी धमाल येते.

'नेगल' प्रकाश आमटे यांनी लिहीलेलं नाही. विलास मनोहर यांनी लिहिलं आहे. त्याचा दुसरा भाग २ वर्षांपूर्वी प्रकाशित झाला.

काही पुस्तकं माझ्याकडूनही. श्री. ना. पेंडसेंचं "लव्हाळी" . फार सुंदर. स्वातंत्र्यपूर्व काळातली एक डायरी आहे ही. खरंच रंजक आहे. साधूंचं "मुंबई दिनांक", व.पूं. च "पार्टनर" पारायणं करावी तितकी कमी आहेत. वर कुणी तरी सांगितल्या प्रमाणे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पुस्तकं बदलतात. शिरवळकर, मतकरी वाचायचं पण एक वय असतं. श्रीमान योगी तर चौथीच्या सुट्टीत झपाटल्या सारखं वाचून काढलं होतं स्वामी, म्रुत्युंजय, राधेय, राजा शिव छत्रपती असेच वेडावून गेले. चि. वी. ,पु.ल. तर एव्हरग्रीन.

"महोत्सव" पण व पुं च ना ? मी त्याची प्रत्येक सुट्टीत एकदा अशी अनेकदा पारायणं केली आहेत. पुस्तक खुप आवडले म्हणुन नाही तर माझ्या मावशीकडे तेव्हढं एकच वाचनीय पुस्तक होतं (नी मी जवळ-२ प्रत्येक सुट्टीत तिच्याकडे जायचे). बाकी सगळी पुराणावर, अद्ध्यात्मावर आधारीत होती. मी दहावीच्या सुट्टीत गेले तेव्हा मावस बहिणीने आणि मी वाचनालय join केले. तेव्हा "डेझर्टर" वाचले.

एकेकाळी वपुंचे लिखाण प्रचंड आवडायचे. त्यांची कथा गुंफण्याची हातोटी खुप आवडायची. पण गेल्या काही वर्षात अनिल अवचटांसारख्या लेखकांचे सरळ सोप्या भाषेतील वास्तववादी लिखाण वाचुन फार भावुक, फिलॉसॉफिकल, अलंकारीत लि़खाण अजिबात आवडेनासे झाले आहे. कदाचित ही एक फेजही असु शकते.

आपल्यापैकी कोणाचे असे झाले आहे का?

>> आपल्यापैकी कोणाचे असे झाले आहे का?
सहमत नात्या !
--
आधी मलाही वपु खूप आवडायचे.. विशेषतः त्यांचं 'पार्टनर' ...
नंतर नंतर डोक्याचं फारच भजं व्हायला लागलं !!!
-----------
सिंडरेला .. 'डेझर्टर्'चा अनुवाद विजय देवधरांनी केलाय तेच ना?
----------
कुणी अनिल बर्वेंचं 'अकरा कोटी गॅलन पाणी' वाचलंय का?
(अमिताभच्या 'काला पत्थर' सिनेमाची आठवण करून देतं किवा सिनेमा पुस्तकाची आठवण करून देतो !! )

सिंडरेला .. 'डेझर्टर्'चा अनुवाद विजय देवधरांनी केलाय तेच ना? >>> हो. इथे पहा.

<<आपल्यापैकी कोणाचे असे झाले आहे का?>>
हो.. शाळेत असताना वपुंची पुस्तकं वाचून काढली होती. आता तर अजिबात वाचवत नाहीत. पुलंचीसुद्धा काही पुस्तकं नंतर आवडेनाशी झाली. चौथीच्या सुट्टीत 'श्रीमान योगी' वाचलं होतं. नंतर तमाम ऐतिहासिक कादंबर्‍या वाचून काढल्या. त्याही काही वर्षांपूर्वी माझ्या आवडत्या पुस्तकांच्या यादीतून बाद झाल्या. ती भाषा अतिशय नाटकी, कृत्रिम वाटू लागली.
दहावीत सॉमरसेट मॉम आणि वुडहाऊसशी दोस्ती झाली, आणि मग मराठी जरा मागेच पडलं. Marquez, Hari Kunzru,KIngsley Amis,Iris Murdoch, Graham Greene, Kazuo Ishiguro, Naipaul,Anita Desai, Nadine Gordimer, Amitav Ghosh, Rohinton Mistry यांच्या कादंबर्‍या किंवा Roald Dahl यांच्या कथा वाचल्यावर खरंच काही चांगलं वाचल्याचं समाधान मिळतं. शांता गोखलेंचं 'रिटा वेलणकर' आणि सचिन कुंडलकरचं 'कोबाल्ट ब्लू' सोडलं तर अनेक वर्षांत बरी मराठी कादंबरी हाती नाही आली. आणि आता fiction एकंदरीत कंटाळवाणं वाटतं.
Dervla Murphy, William Dalrymple, Bill Bryson, Leila Hadley, Martha Gellhorn, Pankaj Mishra यांची प्रवासवर्णनं वाचली की लोकांना मीना प्रभू का आवडतात हा प्रश्न पडतो. केसरी/सचिन ट्रॅव्हल्सच्या जाहिराती आणि प्रभूंची पुस्तकं यात फारसा फरक नसतो. आणि प्रत्येक पुस्तकाचा तोच फॉर्मॅट.
ना.सी. फडके, ना.सं.इनामदार, गंगाधर गाडगीळ यांच्या आत्मचरित्रांनी वैतागच अधिक दिला होता. मॉमचं 'The summing up' वाचल्यावर आत्मचरित्रं माणसाला कसं जगायचं हे शिकवू शकतात, हे कळलं.
कधीही उघडून पुनःपुन्हा वाचू शकेन अशी मराठी पुस्तकं फार कमी.
सुनिताबाईंची सगळी, विशेषतः 'प्रिय जी. ए'
प्रकाश नारायण संतांची सगळी, म्हणजे चारही पुस्तकं
सुभाष अवचटांचं 'स्टुडियो'
आनंद नाडकर्णींचं 'गद्धेपंचविशी'
पद्मजा फाटकांची सगळी
कुसुमाग्रजांचा शांता शेळके यांनी संपादित केलेला कथासंग्रह (कुसुमाग्रज हे किती बिनीचे कथाकार, आणि विनोदकार होते, हे हा कथासंग्रह वाचल्यावर कळतं)
आनंद विनायक जातेगावकरांचं 'आनंदीबाईंची बखर'
पुलंचं 'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास', 'खिल्ली' आणि प्रवासवर्णनं
चि.वी. जोशींची सगळी
रामनगरी, आयदान, बंध-अनुबंध, पंचतारांकीत, स्मृतिचित्रे
तेरुओ, उत्खनन
नेगल
दुर्गाबाईंची सगळी..

>>आपल्यापैकी कोणाचे असे झाले आहे का?
खर म्हणजे थोड्या फार फरकानं सगळ्यांचच अस झाल असेल .... वपु वाचनाच वेड लावतात... अनघड वयातल्या अल्लड प्रेमाच जस आपल्याला मोठेपणी हसू येत तसच आहे ते.... पण त्या वयात त्या अल्लड प्रेमाने आपल जगण भारलेले असतं

वपु वाचनाच वेड लावतात...अनघड वयातल्या अल्लड प्रेमाच जस आपल्याला मोठेपणी हसू येत तसच आहे ते.... पण त्या वयात त्या अल्लड प्रेमाने आपल जगण भारलेले असतं >> अगदी अगदी!!
....
आणि आता मलाही त्या ऐतिहासिक पौराणिक कादंबर्‍या नको वाटतात.
....
मायकेल क्रायटन चे डिस्क्लोजर कुणी वाचलंय का?? अक्षयकुमारचा "ऐतराज" त्यावरच आहे. पण कुठे नामोल्लेख करण्याचे सौजन्य दाखवले नसेल!!

Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

आशू, तो पुस्तकावर बेतण्याएवढे ही श्रम घेतले नसतील त्यांनी, कारण त्याच नावाचा चित्रपट ही आहे. डिस्क्लोजर.

चिनूक्स, वूडहाउस ची पारायणे मी ही केली. त्याची ओळख मात्र पुलंच्या एका पुस्तकातील लेखामुळे झाली. पण वुडहाउस च्या अमुक एका पुस्तकाचे पारायण केले काय आणि कोणतेही पुस्तक वाचले काय मला सारखेच वाटते (चांगल्या अर्थाने).

बाकी मात्र बर्‍याच नवीन पुस्तकांची येथे माहिती झाली. आता आणतो.

नीरजा, स्लार्टी, सिंड्रेला, युगान्त खरचं फार छान पुस्तक आहे. कधीही वाचावं कुठुनही सुरुवात करावी... एरावतींचं परिपूर्ती ही खुप सुंदर आहे. त्यातला पुरीच्या बलराम, कृष्ण आणि सुभद्राचे मुखवटे बदलण्याच्या प्रथेवर आधारित लेख खुप छान आहे.
श्रीनांची सगळीच पुस्तकं अशीच खिळवून ठेवतात. विषेषतः तुंबाडचे खोत..
संताची चारी पुस्तकं अप्रतिम. मन ताजंतवानं करणारी.
गौरी देशपांड्यांची उत्खनन, गोफ, सानियाचं आवर्तन.. प्रत्येक वेळेस एक वेगळा पैलू डोळ्यासमोर येतो.
वपुंची जुनी पुस्तकं - पार्टनर, ठिकरी, सखी, तप्तपदी छान आहेत. पण नंतर नंतर वपुंचा एक पॅटर्न होउन गेला. मग त्याचा कंटाळा आला. पुलंचही काहीवेळा तसं झालं. पण एकुण पुलंचा कंटाळा कधी आला नाही.

वर् दिलेली कित्येक पुस्तके मीपण वाचली आहेत आणि काही तर परत परत...

वपुंबाबत खरंच झाले असे, एक पॅटर्न ठरुन गेला त्यामुळे कंटाळा आला. पण पुलंबाबत अजुनही नाही. मी १२ व्या वर्षापासुन वाचतेय, तीच तीच पुस्तके परत परत वाचली पण कधिच कंटाळा आला नाही. ऐतिहासिक पुस्तके मात्र वाचवत नाहित आता. आधी वेड्यासारखी वाचायचे.

(रंगीबेरंगीत दिनेश नि लिहिलेलं पिवळा ताप प्रकरण वाचुन परत एकदा पुल बाहेर काढले आणी त्यांचेही लसिकरण परत वाचले :))

पुलंनि वुडहाउस वर लिहिलेला लेख वाचुन वुडहाउस वाचायला घेतला. सुरवातीची एक-दोन पुस्तके वाचुन वाटले, काय उथळ आहे.... पण त्या माणसाने कधी ताबा घेतला माझा कळलंच नाही. त्याचे गोल्फ वरचे क्लिकींग ऑफ क्थ्बर्ट कितीदा वाचले त्याची गणतीच नाही. (अचानक गोल्फ आवडायला लागले मला ते फक्त वुडहाउसमुळेच). बाकिचची पुस्तके पण परत परत वाचलित. पुलंनि लिहिलेय कुठेतरी की त्यांच्यावर वुडहाउस चा प्रभाव आहे. मला दोघांची जातकुळी एकच वाटली... भाषीक विनोद अतिशय सुरेख आहेत दोघांचेही.

शेळक्यांचे चारचौघी हा अनुवाद पण वाचला. पण मला अगदी खुप आवडला असे झाले नाही.

प्रभाकर पेंढारकरांचे रारंग ढांग वाचले. खुप आवडले. गंमत म्हणजे एका दिवाळी अंकात मी त्या पुस्तक लिहिण्यामागची प्रक्रिया वाचली मग ते पुस्तक मिळवुन वाचले. पेंढारकरांनी आधी डॉकुमेंटरी बनवली मग त्यावर पुस्तक लिहिले तेही ब-याच वर्षांनी.

युगांतही खुप आवडले. हल्लीच पवनीकर यांचे महाभारतातील व्यक्तीरेखा वाचले, विषय तोच, अभ्यासही दांडगा दिसुन येतो पवनीकरांचा, पण जशी युगांत घेते तशी मनाची पकड घेतली नाही पुस्तकाने . परिपुर्ती वाचायचेय अजुन..

कालच जिएंच "एक अरबी कहाणि" वाचली... अल्केमिस्टची आठवण झाली वाचताना...

माझे सुदैव म्हणजे माझ्या मुलीलाही वाचनाची अतिशय आवड आहे.. अजुन लहान आहे ती पण पुस्तकी किड्यासारखी सतत वाचत असते. मग दोघी मिळुन चर्चा करत बसतो वाचलेल्या पुस्तकाची...

खालील दुवा पहा. मी बरिच पुस्तके डाउन्लोड केलित इथुन.

http://www.gutenberg.org/wiki/Main_Page

______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

तू खरच सुदैवी आहेस हं साधना. की ह्या टीव्हीच्या कचट्यातून मुलीला सोडवू शकलीस. अन्यथा सध्या टीव्ही अगदी दुश्मन झालाय वाचनाचा. अर्थात पुढच्या पिढीत वाचनाची आवड असलेले मीही खुप जण पाहिलेत. म्हणून मी आवर्जुन नात्यातल्या सगळ्या छोट्यांना पुस्तकं देते. मात्र आपण योग्य संस्कार न करता त्यांना चांगल्या आवडी नाहीत म्हणणे हेच आज बर्‍याच ठिकाणी दिसते.
वुडहाउसचं मी एकच पुस्तक वाचलं. नाव आठवत नाही. एक शिकारी आणि सिंह ह्यांचा मजेशीर किस्सा आहे त्यात. आता नक्की वाचेन त्याची आणखी पुस्तकं.
रारंगढंग पुर्वी वाचले आहे आणि आवडले ही होते. आमच्या गावच्या कलापिनी ह्या संस्थेने मागच्या वर्षी त्याच्यावर आधारित नाटक केले. पेंढारकरांनाही ते आवडले होते.
कविता महाजनची ब्र आणि भिन्न दोन्ही छान आहेत. भिन्नने तर मी सुन्न होऊन गेले.
सध्या पुण्यात प्रिय जीए हा मोहत्सव चालू आहे. पण सगळे कार्यक्रम ६लाच सुरु होतात. त्यामुळे जाता येणार नाही..

चिनूक्स
प्रवास वर्णनांमधे थेरो राहिला ना? मीना प्रभूंची पुस्तकं मला लोनली हार्ट किंवा तत्सम गाईडस सारखी वाटतात. इथे लिहिणार्‍या कोणाच्याही आईने, सासूने प्रवास केला तर त्या अशीच वर्णनं लिहितील. त्यांच्या पुस्तकातून ग्रीस, चीन, तुर्कस्थान दिसण्या पेक्षा त्याच जास्त दिसतात. परदेशातील प्रवासवर्णन करणारी पुस्तकं कमीच आहेत मराठीत - त्यामुळे आहे त्या पुस्तकांमधे त्यांच्या पुस्तकांचा बोलबाला जास्त आहे.

गौरी देशपांडेंची एक दोनच पुस्तकं वाचली आहेत मी. आता बाकीची मिळवून वाचीन म्हणते. (असामी, लालू, स्वाती बघताय ना इथे? )

shonoo,
<प्रवास वर्णनांमधे थेरो राहिला ना<>
माफ करा, मला संदर्भ नाही कळला..
मीना प्रभू lonely planet पुढ्यात ठेवून पुस्तकं लिहितात असंच वाटतं. उगीच ओढून ताणून आणलेली ऐतिहासिक माहिती, आणि साधारण स्वरूप सगळ्या पुस्तकांचं सारखंच. मराठीत बरी प्रवासवर्णनं नाहीत, म्हणून त्यांचा बोलबाला आहे..
पण पद्मजा फाटकांचं 'आवजो', आणि मृणालिनी जोगळेकरांचं 'प्रवासिनी', आणि 'रंग अमेरिकेचे' मस्त आहे..
तसंच शोभा चित्रेंचे अनुभवकथनांचे ३ भाग, आणि शोभा बोंद्रे यांचं 'लेगोसचे दिवस'..
अरुणा ढेरे यांनी पण काही प्रवासवर्णनपर लेख लिहिले आहेत..खूप छान आहेत ते.. पुस्तकाचं नाव विसरलो.

शोनू, अगदी मी हेच लिहिणार होतो.. पॉल थेरॉ राहिला की प्रवासवर्णनांच्या यादीत.. तसेच इंग्रजी मध्ये भन्नाट प्रवास केलेल्यांच्या अनुभवांवरची पुस्तके पण भरपूर आहेत.. जसे मार्क शँड..

ओके, paul theraux.. त्याचं dark star safari वाचलं होतं.. आणि एक anthology..
टण्या,
mark shand चं travels on my elephant मी वाचलं आहे..
samit sawhneyचं all the world is a spittoon एकदम भन्नाट आहे..
kaveri nambisanचं the pilgrimage पण मस्त.. dervla murphy, martha gellhorn यांची सगळी पुस्तकं वाचली आहेत..
आणि हो, विक्रम सेठचं From heavens lake...

परिपुर्ती म्हणजे "कर्व्याची आई" ना ? इरावती कर्व्यांवर पु ल देशपांडेंनी फार छान लिहिले आहे. आणि उत्खनन गौरींचे आहे की त्यांच्या आईचे ?
.
बाप रे इथे येउन रोज अजुन किती वाचायचे राहिले आहे असे वाटते. वुडहाउसचे मी काहीच नाही वाचले. सुरुवात करायला आधी काय वाचु ?
.
तोत्तोचान कुणी वाचले आहे का ? खुप छान आहे.

सिंडरेला सुरूवात नावात Bertie Wooster किंवा Jeeves यापैकी काही असलेले कोणतेही पुस्तक चालेल, पण किमान ४-५ वाचल्याशिवाय मत बनवू नकोस. माझे आवडते - 'Thank You, Jeeves', 'Jeeves in the offing','Much obliged Jeeves' etc etc. यातील काही छोट्या कथा असलेली आहेत ती चांगली सुरूवातीला.

सिंड्रेला,
मागच्याच महिन्यात वाचले मी तोत्तोचान. मला खुपच आवडले. आजकालची शिक्षणाची (खरतर विद्यार्थ्यांची) अवस्था बघितल्यावर तर तोत्तोचान सारख्या सृजनशील शाळांची किती गरज आहे असे वाटत रहातं.
याच धर्तीवर कोल्हापुर जवळ कोणीतरी पाटील नावाच्या बाई पहिली ते चौथी पर्यंत शाळा चालवतात असे मी मागे पेपरात वाचले होते. पण तो या बीबी चा विषय नाहीये Happy
बाकी मी वाचनात एकदमच गयी गुजरी आहे की काय असे मला इथली पुस्तकांची यादी बघुन वाटायला लागलय. १०-२० टक्के पण वाचली नाहीयेत. Sad

उत्खनन गौरी देशपांड्यांचं आहे. खुप छान आहे ते. तोत्तोचानही मस्त आहे. रुनी, कोल्हापुरला लीला पाटलांची शाळा सृजन आनंद विद्या मंदिर ह्याच धर्तीवर आहे. लीला पाटील म्हणजे ना.सी. फडक्यांची मुलगी. पूर्वी सा. सकाळ्मधे त्यांची लेखमाला आली होती - ह्या शाळेसंदर्भात. पुण्यातली अक्षरनंदन शाळाही अशीच वेगळी शाळा आहे. शंतनू, तू म्हणतोस तशी भन्नाट प्रवासावरची काही पुस्तकं सुचव ना मार्क शँड किंवा इतरांची...
नुकतचं गंगाधर गाडगीळांचं एका मुंगीचे महाभारत वाचलं. छान आहे. त्यांच्या लेखनप्रक्रियेबद्दल डिटेल लिहिलं आहे. मात्र पुलं बद्दल जरा आकस होता कि काय असं कधी कधी वाटतं.

एका मुंगीचे महाभारत मलाही आवडले होते.. कदाचित पुल मला फारसे आवडत नसल्यामुळे असेल Happy

चिनॉक्स, धन्स. डीटेल उत्तर देतेच नंतर.. शंतनू, तुलाही..

स्वाती अन रुनी दोघींना अनुमोदन. स्वातीकडनं अन असामी कडनं आलेली पुस्तकंच वाचुन होत नाहीयेत अस्जून. शिवाय मग घरातली, लायब्ररीतली आणलेली पुस्तकं आहेतच. आता त्यात ही भर. पण हे आनंददायी ओझं, अभिमानास्पद ओझं! पुस्तकांबद्दल अशी धावती माहिती लिहिलिच आहे , आता सविस्तर परिक्षणं पण येऊ द्यात!
अल बेरुनी'स इंडीया वाचलंय का?

चिनूक्ष, तूला कसे आणि किती धन्यवाद देऊ? प्रवासवर्णनामधे काय वाचावं ह्याचा इतका गोंधळ उडतो. इंग्रजी प्रवासवर्णनांच्या वाटेला अजुन मी गेलेच नव्हते. आता यादी करुन ठेवली आहे. अफाट वाचन आहे तुझे... ग्रेट..
शंतनू, तुझा पॉईंट कळला, पटला. पुल एकमेव ग्रेट लेखक वगैरे मलाही पटत नाही. त्यानी ही बर्‍याच वेळा पाट्या टाकल्या आहेत - रटाळ लिहिलं आहे. पण का कोण जाणे गाडगीळांची भाषा मला जरा आकसाची वाटली.
अरे, इकडे कोणी गाडगीळांचं गोपुरांच्या प्रदेशात वाचलं आहे का? खुप सुंदर आहे असं ऐकलंय. पण सध्या आउट ऑफ प्रिंट आहे...
चला आता चिनूक्षने सांगितलेली पुस्तके शोधायच्या मोहिमेवर निघावे...

चिनूक्स, वपु आणि मीना प्रभूंबद्दल... डिट्टो!!
वपु पहिल्यांदा हातात घेतले ते ११वी १२वी मधे. आणि तेव्हाच कंटाळा आला. हल्ली तर डोक्यात जातं ते सगळं. कसलं खोटं आणि भंपक तत्वज्ञान तयार करतात ते. असो..
मीना प्रभूंचा प्रवासवर्णन लिहिणे हा व्यवसाय आहे, त्यासाठीच त्या फिरतात आणि नोंदी ठेवतात असं वाटतं. पण मराठीत इतक्या वेगवेगळ्या देशांबद्दल कुणी लिहिलं नसल्यामुळे त्यांच्या पुस्तकातली थोडीफार माहिती उपयोगी पडू शकते.
पुस्तकांची लिस्ट शॉलेट्ट!

उत्खनन गौरीचंच. मला तिच्या कादंबर्‍यातली पात्रांची नावं फार आवडतात. वेगळीच किंवा अनेकदा जुनी पण असतात पण त्या त्या माणसाला कशी ती अगदी फिट्ट बसतात.

भैरप्पांच्या कादंबर्‍यांचे अनुवाद वाचलेत का कुणी? उमा कुलकर्णींनी केलेले? त्यातल्या काही बर्‍या आहेत. अनुवाद म्हणून उमाताईंच कौशल्य खरंच छान पण मूळ गाभा सगळ्यावेळेलाच ठाव घेत नाही.

उमा कुलकर्णींवरून आठवलं.. त्यांच्या मातोश्रींच्यावर लिहिलेलं 'केतकर वहिनी' हे पुस्तक कुणी वाचलंय का? मला लेखिकेचं नाव पटकन आठवत नाहीये. फार सहज साधं सोपं वर्णन आणि कमालीच्या धडाडीच्या व्यक्तिमत्वाचा जीवनप्रवास.. छान आहे.

मी कालच शांता गोखल्यांचं 'रिटा वेलिणकर' संपवलं. एकदा वाचावं असं नक्की आहे. जुन्या मुंबईचं वातावरणाचं वर्णन ही छान आहे.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

टण्या यादी सेव्ह करायला librarything.com चा वापर कर. मला ती साईट फार आवडते. शिवाय पुस्तकांवर चर्चाही करता येते. आणखी काय वाचायला हवे ते ही कळते. पण यावर मराठी पुस्तक जास्त नाहीत.

http://www.randomhouse.com/modernlibrary/100bestnovels.html ईथे १०० मस्ट वाचनिय पुस्तकांची नावे आहेत. ती नॉव्हेल्स आहेत.

Pages