बॉम्ब !

Submitted by vaiddya on 3 January, 2011 - 14:23

( इतिहास, धर्म, जात यांचा आधार घेऊन होणार्‍या अपप्रचाराला / विचित्र आंदोलनांच्या आवाहनांना / जुन्या गोष्टींच्या आधारे नवीन जातीय शेगड्या पेटवणार्‍यांच्या भाषणांना बळी पडणार्‍या माझ्या बंधूंना ...)

आम्हाला फक्त भडकायचे आहे ...
कोणावर, कशावर हे नक्की नाही ..
नक्की असायची गरज नाही ..
पण कोणावर तरी भडकायचे आहे !

भडकवणारा कोणी असेल
तेव्हढाच आम्हाला प्रिय आहे
भडकण्यातच मौज आहे
भडकण्याची सर्व मजा आहे !

सूड भावना असलीच पाहिजे
जहरी जीभ सुटलीच पाहिजे
कोणालातरी मारण्या-जाळण्याची
फुर-फुरी तर उठलीच पाहिजे

सूड घेता आला तर
जीवनाला अर्थ आहे
चूड लावला नाही तर
जीवन सारे व्यर्थ आहे

कोणाकडे आहे का तेल ?
पेट्रोल नाही, डिझेल नाही
कानामधे हवंय आम्हाला
भावना भडकण्याचं तेल !

आम्ही भडकून पेटू शकतो
आम्ही भडकलो की पेटवू शकतो
आमच्या डोक्यात राख आहे
काहीही जाळून टाकू शकतो

आम्हाला दुसरा उद्योग नाही
असायची काही गरज नाही
ज्याला जिकडे हवे तिकडे
आमच्या रागाची आग जाई !

आम्ही आहोत तरूण
राहू तुम्हाला धरून
आमच्या खाण्या 'पिण्याची'
ठेवा सोय करून !

एखादी सेना, एखादी ब्रिगेड
बघा सुरू करून ..
आम्ही लगेच येऊ
तिचे मेंबर म्हणून ..

खरं-खोटं तुम्ही पाहा
आम्ही फक्त काढू जाळ
आम्हाला उद्योग देत राहा
अन तुम्ही व्हा मालामाल !

अहो, धंदाच तर करायचा आहे
लोकशाही ही मंडईच आहे
जाती-पातीच्या दुकानामधे
काड्यापेट्यांचा माल आहे !

आम्ही आहोत सुरूंग
दारू आहोत आम्ही
देश नावाचा एक बॉम्ब येथे
तयार करतोय नामी ..

एक दिवस फोडायचा आहे
बॉम्ब असा धडामकन
इतिहास नको भूगोल नको
खपून जाऊ सगळेजण

गावात शेती, छोटी नोकरी
कोणाला आहे हवी आता
पेटून उठण्याची शक्ती
जाणवते जर आम्हाला ?

आम्ही फक्त पेटत राहू
पेटत राहू पेटवत राहू !
सगळं काही राख करू
त्याच्यामधेच आम्ही मरू !

riot.jpg

गुलमोहर: 

हो ना ... वाटलं नव्हतं .. पण आजही बरीच जनता आपल्यासारखी चर्चा न करणारीच आहे .. बाजू घेणं म्हणजे बॉम्ब या कवितेतल्या प्रमाणेच असतं आणि असायला हवं असंच वाटणारी बरीच जनता आहे .. आणि महाराष्ट्रच नाही तर सर्वत्र या किंवा अशाच एखाद्या ना एखाद्या सुरुंगावर आपण सगळेच बसलो आहोत हे सतत जाणवत राहातं ..

अशा भावनिक मुद्द्यांवर खेळवल्या जाणार्‍या आंदोलनांना सर्वसामान्यांचा खरेच पाठिंबा असतो का? त्यांना शेवटी आपल्या पोटापाण्याचेच प्रश्न म्हत्त्वाचे वाटतात.
पण अशा आंदोलनांना (मग ती कोणीही/कोणत्याही मुद्द्यावर केलेली असोत) लोक आपला विरोध दर्शवतील, तो दिवस दूर नाही.
अजून किती काळ आम्ही भूतकाळातच जगत राहणार? इथे वर्तमान पोळतंय आणि भविष्याचा पत्ता नाही, अशांचा आवाज कधीतरी उठेलच.

खरंय भरत .. अजून कितीतरी मूलभूत प्रश्न आहेत .. वर्तमानाची फळी पायाखालून सटकते आहे .. भविष्याचा पत्ता नाहीच .. अश्या अधांतरी अवस्थेतच तर दिशाभूल सोप्पी असते ना .. संभ्रमावस्थेतल्या यात्रेकरूला कोणत्याही मार्गाला घेऊन जावे, लुटावे हाच तर लुटारूंचा डाव असतो !