आंग्लानुवाद

Submitted by Kiran.. on 3 January, 2011 - 00:52

कुणीतरी म्हटलंय आमच्या हिच्या हातच्या वरणाची सर कुणालाच यायची नाही या वाक्याचा इंग्लीशमधे अनुवाद करून दाखवा. बहुतेक पुलंचं काम असावं ..

समस्त माबोकर्स ,

माझं इंग्रजी कच्चं आहे हे मी आधीच स्पष्ट करतो. मला कित्येक वाक्यं इंग्रजीमधे कशी लिहावीत याचं ज्ञान नाही. ज्यांचं इंग्रजी अगदी उत्तम आहे त्यांना देखील ही समस्या आहे असं नवीनच ऐकलं. तसं असेल तर एकमेकांची मदर्त घ्यायला काय हरकत आहे ?

मला अडलेली काही वाक्य.. कुणीतरी भावानुवाद करावा ही नम्र विनंती.

लोचटच आहे मेला..

स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घातल्यावर नैवेद्याचं आचमन करीत नवस सोडावा.

तिकडे मॅडम शिंकल्या तरी इथं यांची धोतरं सुटतात हो..

अगदीच कसे हो तुम्ही हे ?

नंदीबैलासारखा झुलतोय नुसता.. अरे गधड्या ! शुंभासारखा मान हलवत उभा काय राहीलास ?

अहो ऐकलंत का ! सात नंबरची ती मैना ?.. कुठं शेण खाऊन आलीय देव जाणे ! दिवस गेलेले दिसतात बरं का तिला...

सध्या इतकंच.. मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू मधे मधे चोंबडेपणा करू नकोस...

याच्या आंग्लानुवादासाठी चोंबडा या शब्दाचा अर्थ कळायला पाहीजे..
कि नाक गळत असलेला कुणीतरी असा अर्थ घ्यायचा ?

>>>
चोंबडा आणि शेंबडा या दोन शब्दांमध्ये गल्लत करताय का??? Uhoh
दोघांचे अर्थ भिन्न आहेत. Wink

बेफामजी, उद्या बांगड्याचं मालवणी तिकलं ऑलिव्ह ऑईल व मेयोनेस वापरून करायला सांगाल तुम्ही ! जमणार नाही, साफ सांगतो !! Wink

माझा एक भाचा आहे. त्याला फार पॉश ठिकाणी गेलं की खूप गावरानपणा करायची हुक्की येते.
मल्टिप्लेक्समधे गेलं की हा हमखास विचारणार,....अगदी हेल बील काढून.... "गुळमाट लाह्या घ्यायच्या की टंबाटीच्या लाह्या?"
म्हणजे कॅरॅमल पॉप कॉर्न घायचं की टोमॅटॉ फ्लेवर्ड?
शेजारी एक सिंपलटन म्हणावा असा मुलगा रहातो. मी गेटपाशी दिसले की येऊन गप्पा मारतो.
त्याची आजी संधीवाताने आजारी आहे. मी तिची चौकशी केली. "कशी आहे आजीची तब्ब्येत? सध्या थंडीत अगदी तिला चालताही येते नाहीये."
तो म्हणाला, " हो ना सांधे आखडलेत. उठता बसता येत नाही....म्हणून आम्ही आता 'कंबोडीचा संडास" बसवून घेतोय तिच्या साठी. "
मला आधी काहीच कळेना की हा संडासाचा कंबोडीयन प्रकार कधी ऐकला नव्हता.
नंतर प्रकाश पडला. !!!!!!!!!!!!!!!!!! (ज्यांना कळणार नाही त्यांनी विचारावे.)
काही शब्दांचे अलगदच आपोआप आणि हळूहळू मराठीकरण होते. जसे- रिक्रूट - रंगरूट.

"गुळमाट लाह्या घ्यायच्या की टंबाटीच्या लाह्या?">> Lol
सो कॉल्ड पॉश जागी अस्ले प्रकार करायला मलाही फार आवडते उदा. भारी थेट्रात चालू सिनेमा एकदम बंद झाला तर, 'ए लाईssssssट', म्हणून वरडणे.
रच्याकने, वरच्या कुठल्याही वाक्याचे भावार्थासहित भाषांतर अशक्य आहे.

मी कुठेतरी वाचलेलं..जुन्या काळच्या"रेल्वे सिग्नल" चे भाषांतर असे केले आहे म्हणे.. (बहुदा सावरकरांचे असावे)
अग्निरथ गमनागमन सुचक ताम्र्-लोह पट्टीका.
ताम्र्-लोह पट्टीका म्हणन्याचे प्रयोजन, मला वाटते, 'थर्मोस्टेट' प्रमाणे काहीतरी असावे.(?)

हे काहीच नाही. सांगली येथे एक वल्ली होती. ती त्या काळी म्हणजे १९७०-७२ च्या आसपास इंग्लंड येथे इंग्रजी शिकायला गेली होती. शेवट्चे काही दिवस तिथल्या डाउन टाउन मधे राहून आला कारण काय तर अस्सल इंग्रजी 'गावरान' शिव्या शिकायच्या होत्या...

घड्याळ पुढे आहे किंवा मागे आहे हे कसं सांगायचं?>>> दीपकुल, क्लॉक इज बिहाईंड टाईम/ अहेड ऑफ टाईम असं सांगायचं...

झटकणे हा शब्द इंग्रजीत कसा "एक्सप्रेस" करायचा?

Happy धन्स परदेसाई... पण हाच शब्द मला दैनंदिन गोष्टींसाठी, जसे कपडे झटकून वाळत घालणे, बेडशीट झटकून गादीवर टाकणे, यासारख्या 'अ‍ॅक्टिविटीज' 'एक्सप्रेस' करण्यासाठी वापरायचा असेल, तर कसा वापरता येईल? हा माझा प्रश्न आहे.

शिवाय अगदी बेसिक म्हणजे गाडी उतारावरुन जाते, याला आपण स्लोप म्हणतो, तर चढावरुन जाण्याला काय म्हणायचे? अपवर्ड स्लोप पेक्षा वेगळा काही शब्द आहे का? Uhoh