गव्हाचे सत्त्व - ठुली

Submitted by मामी on 30 December, 2010 - 12:32

माझी आई आमच्या लहानपणी थंडीत हा पदार्थ हमखास करायची. निदान २-३ वेळा तरी व्हायचाच व्हायचा. हिवाळ्यातली निवांत अशी रविवारची गारेगार सकाळ.... स्वयंपाकघराच्या दारातून येणार्‍या कोवळ्या उन्हात किंवा त्या दाराबाहेरच असलेल्या पायर्‍यांवर आईबाबांबरोबर बसून बोटांनी हायहुय करत चाटून खालेल्ल्या गरमागरम ठुलीची आठवण तशीच गोडगोड राहिलेय. गेली कित्येक वर्षे मी ठुली केली नव्हती कारण माझ्याशिवाय तिला घरात कोणी वाली नाही. पण मागच्या महिन्यात महिन्याभराकरता म्हणून धाकटी बहिण अमेरीकेहून आली होती. त्या निमित्ताने आई-बाबाही इथेच होते. सो, मौका भी था और दस्तुर भी! लगेच ठुलीचा बेत आखला गेला. तिचीच कॄती माबोकरांबरोबर शेअर करावीशी वाटली म्हणून हा खटाटोप.

लागणारा वेळ :
३ दिवस (दचकू नका. ही ठरवून करण्याची गोष्ट आहे.)

लागणारे जिन्नस :
गहू, गूळ, दूध, तूप, जायफळ

लागणारी विशेष उपकरणी :
बारीक जाळीची मोठी गाळणी अथवा चाळणी, जाड बुडाचे भांडे

प्रमाण :
साधारण २ माणसांकरता एक वाटी गहू
गूळ चवीनुसार (किसून)
एक कप दूध
एक टेबलस्पून तूप
जायफळ पावडर

क्रमवार कॄती :
ठुली करण्याच्या तीन दिवस अगोदर गहू स्वच्छ धुऊन भिजत घालावेत. हे पाणी रोज बदलत जावे म्हणजे गहू फर्मेंट होणार नाहीत. रविवारी ठुली करायची तर गुरूवारी सकाळी भिजत घालावेत.

तिसर्‍या दिवशी रात्री ते पाणी काढून टाकून ताज्या पाण्यात मिक्सरवर अगदी बारीक वाटावेत. पाणी जितके लागेल तितके घालावे. नंतर हे पाणी काढूनच टाकायचे असते. वाटलेले मिक्श्चर बारीक जाळीच्या मोठ्या गाळणीतून/चाळणीतून गाळून घ्यावे. खाली येते ते गव्हाचे सत्त्व. हाताने पिळून वरचा चोथा पुन्हा मिक्सरमधून काढावा कारण यात बरंच सत्त्व राहिलेलं असतं. पुन्हा गाळावे. असे तीन-चार वेळा करावे लागते. शेवटी हाताला अगदी भुसा लागायला लागतो. तो टाकून द्यावा.

खाली उरलेले सत्त्व+पाणी भांड्यात रात्रभर झाकून ठेऊन द्यावे. सकाळी हलक्या हाताने झाकण उचलून वरचे पाणी काढून टाकावे. खालचा साका म्हणजे गव्हाचे सत्त्व हा आपल्या ठुलीचा बेस. त्यात दूध, गूळ, जायफळ घालून एकजीव करावे. जाड बुडाच्या भांड्याला तुपाचा सढळ हात लावून त्यात हे मिश्रण घालावे आणि गॅसवर ठेवावे. सतत ढवळत रहावे. सुरवातीला गॅस मध्यम ठेवला तरी चालेल पण जरा हे मिश्रण जड वाटायला लागले की लगेच गॅस बारीक करावा. लगेचच ठुली घट्ट व्हायला सुरवात होते. सगळा द्रवपदार्थ घट्ट झालेला पाहताच, भांड्याखाली तवा ठेऊन आणि वर झाकण ठेऊन, त्यावर वजन ठेऊन एक वाफ आणावी. एक-दोन मिनिटे पुरतात. पण लक्ष ठेऊन असावे, पटकन खालून करपण्याची शक्यता असते. खुप छान हलका सोनेरी रंग येतो.

ठुलीची कन्सिस्टन्सी साधारण घट्ट जेली सारखी असते - थुलथुलीत .... म्हणून ठुली. ही गरमागरम ठुली काचेच्या बशीत घालावी आणि चमच्याचे वगैरे सोपस्कार न ठेवता डायरेक्ट बोटांनी बाजूबाजूनी चाटून खावी.

अधिक टिपा:
१. हेच सत्त्व अशाच प्रकारे काढून त्यात मीठ घालून शिजवून कुरडया करतात.
२. एकावेळी जास्त करून दूध, गूळ, जायफळ मिसळून तयार बॅटर फ्रीजमध्ये ठेवता येते. ८-१० दिवस तरी काही होत नाही. (त्यापेक्षा जास्त ठेवण्याची वेळ येत नाही कारण तोवर पुन्हा आपल्याला ठुली खाण्याची हुक्की येतेच. विशेष म्हणजे तयार पीठ आहे म्हणून...)

माहितीचा स्त्रोत :
आई. आईचा माहितीचा स्त्रोत तिची आई .... हे असे बरेच पिढ्या मागे जाण्याचा संभव आहे. आई सांगते त्यानुसार त्यांच्याकडे थंडीत दर रविवारी ठुली होत असे. म्हणजे आजी तर पाट्यावर भिजलेले गहू वाटत असे. ते सुध्दा ८ जणांच्या कुटुंबाकरता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त प्रकार. आमच्याकडे पण पाट्यावरच गहू वाटत असत. असाच प्रकार नाचणीचा करता येतो (दोदोल) पण त्याला इतका खटाटोप नाही. नाचणी एक दिवस भिजवली तरी चालते.

मामी, माझी आई करयची ठुली. ही रेसिपी वाचताना सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. आमच्या कडे मिक्सर नव्हता तेव्हा हे गहू पाट्यावर वाटायला आईला मदतही केलेय.

आमच्याकडे करायची माझी आज्जी हा पदार्थ, आम्ही थुली म्हणतो याला.माझ्या मामाकडे अजूनही साग्रसंगीत थुली होते पण मी हा खटाटोप करत नाही दलीयाची करते मी थुली.

अरे आमच्याकडे पण करतात हा पदार्थ. आम्ही 'टोपातलं' म्हणतो. का ते माहित नाही. आजीला विचारले नाही. खिरीसारखा पण छान लागतो.

शक्ती वाटते प्याले की. जरासे सुंठ पण टाकायची आजी. मी गेल्यावर्षी केला होता. हो कारण तो पदार्थ आवडिने खाणारे लागतात केल्यावर. फोटो टाकू का?

दिनेशदा, हो, ठुशी दागिना तर असतोच. ठुली हा थुली चा अपभ्रंश असणार आणि वर मी म्हटल्याप्रमाणे तो थुलथुलीत पासून आला असणार. एकुणच ठ पासून सुरु होणारे शब्द मजेशीर वाटतात. आम्ही तर ठुली शब्दाला खुप हसायचो.

मामी मला तर हा ठुली शब्द युअर्स टृली सारखा वाट्ला.

खरच कधी ऐकला नव्हता हा पदार्थ.

दोदोल ची कृती मी लिहिली होती. तयार नाचणीचे सत्व वापरुनही करता येईल. त्या सत्वात तेवढेच नारळाचे दूध घालायचे. अर्धा (किंवा चवीप्रमाणे) गूळ घालायचा मग चमचाभर तूप घालून सतत ढवळत आटवायचे. मनासारखे घट्ट झाले कि ताटात ओतायचे. आणि वड्या पाडायच्या. यात काजू वगैरे पण घालतात. हा पदार्थ लहान मूलांना अवश्य द्यावा वरचा ठुली पण लहान मूलांसाठी चांगला पदार्थ आहे.
दोदोल, गोव्याला तयार मिळतो. तसाच बेबिंका पण. हा बेबिंका, भांड्याला वरुन उष्णता देऊन करतात. मैदा, अंडी, नारळाचे दूध आणि गूळ मिसळून, त्याचे थरावर थर देतात. नवा थर द्यायच्या आधी, पहिला थर वरुन शेकतात (झाकणावर नारळाचे सोडण पेटवून ठेवतात.) हा पदार्थ पण गोव्यात तयार मिळतो.

दिनेशदा, ते गोव्यात सर्रास मिळणारे बेबिंका मी बरेचदा खाल्ले पण ठीकच वाटले. मग एकदा मुंबईतच एकदम वॉव बेबिंका मिळाले. माहिमच्या 'ओह फिश' रेस्टॉरंटमध्ये.

कोकणात नाचणीच्या अशा प्रकाराला सतु म्हणायचे. काजू वगेरे घालून केलं जायचं. हाताला एकदम मऊ लुसलुशीत लागायचं.
नाचणी थंड असते म्हणून हमखास उन्हाळ्यात करायचे. किती वर्ष झाली खाऊन सुद्धा. आता ठुली करून पहिली पाहिजे. इथे युके मध्ये जबर थंडी आहे.मस्त वाटेल ठुली खायला. धन्स हो मामी रेसिपी बद्दल.

हा तर कुरडयांचा चिक ना ? आमच्या घरी करतात दरवर्षी साधारण मार्च एप्रिल मध्ये.. ते गहू दळताना फार घाण वास येतो..! पण तयार प्रॉडक्टची चव भारी लागते !
आम्ही तेल तिखट मिठ किंवा दुध साखर घालून खातो. ब्रेकफास्टला खाल्ला की संध्याकाळपर्यंत काही खायची गरज पडत नाही. Happy

भारी पदार्थ ! अतिशय पौष्टिक! माहिमचा हलवा अस्साच करतात बहुदा!
असाच कुर्डयांसाठी चीक करतात, त्यातला थोडा ( वाटीभर) घेउन त्यात मीठ हींग, जीरे घालून शिजवायचा आणि वरून कच्चे तेल घालून खायचा..मजा येते. त्याला "खारी ठुली" म्हणा, हवंतर! Happy

>>>शेवटी हाताला अगदी भुसा लागायला लागतो. तो टाकून द्यावा.>>>
नाही, तो भुसा टाकून नाही द्यायचा, त्यात भरपूर फायबर असतात, त्यात कांदा घालून भाजी करतात, भाजणी/ बेसन घालून थालीपीठ करतात. किंवा, जास्त प्रमाणात असेल तर (म्हण्जे घरी कुरडया केल्यानंतर) त्यात ज्वारी/ तांदूळाच्या कण्या, तिखट, मीठ घालून शिजवतात आणि पापड्या थापून वाळवतात. नंतर भाजून/ तळून खातात. या पापड्यांना भूसवड्या, खारोड्या म्हणतात.
(बर्‍याच जणांना माहित असणार बहुदा)! कोंड्याचा मांडा करणे म्हणतात ना? तो असा..!

हो,हो .... माझा नवरा पण म्हणत होता की, तुम्ही मैदा खाता आणि फायबर टाकता... मी गमतीनं त्याला म्हटल पण की पाहिजे तर तुला त्या भुश्श्याची भाजी करून खायला घालते म्हणून. मला नव्हतं माहित की पुढे त्याचे असे उपयोग आहेत. धन्स.

थोडा कमि त्रासाचा पर्याय म्हणुन रवा वापरुन पण करता येतो हा प्रकार. आम्हि तर कुरडया पण केल्या होत्या एकदा. मिक्सर चे काम फार सोपे होते. बारिक रवा वापरणे. गव्हापेक्शा १ दिवस कमि भिजवला तरि चालतो. चविला थोडा कमी लागतो गव्हापेक्शा.

अशाच प्रकारे केलेला गव्हाचा चीक मला जाम आवडतो. फक्त तो मीठ आणि तेल घालून करतात. आनि गव्हाचे असे ३ दिवस भिजत घालून केलेले सत्व आंबट होते ना?? मग दूध्+गूळ घालून चव कशी लागेत असेल??? Uhoh

Pages