आजी-माजी संमेलनाध्यक्षांची ग्रंथनगरीकडे पाठ..

Submitted by अ. अ. जोशी on 30 December, 2010 - 11:31

आजपर्यंत मराठी साहित्यिकाच्याच बाबतीत जे विधान केले जात होते ते आता संमेलनाध्यक्षांच्या बाबतीतही करावेसे वाटते. दिनांक २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६:३०वाजता ग्रंथदिंडी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये वेळेवर पोहोचली. त्यावेळी सपट परिवार लोकमानसचा चर्चेचा कार्यक्रम मुख्य मंडपात नुकताच संपला होता. चर्चेत डॉ. द.भि. कुलकर्णी हेही सहभागी होते. त्यामुळे ते त्याच मंडपात होते. ते ग्रंथप्रदर्शनासाठी येणार आहेत काय हे पहायला मी गेलो. तोपर्यंत त्यांना कोणी चहा दिला नव्हता. म्हणून चहाची ऑर्डर द्यायला मी मंडपाच्या बाहेर आलो खरा...! पण त्याचवेळेस श्री. उत्तम कांबळेसाहेब ग्रंथदिंडी घेऊन पोहोचले सुद्धा. द.भि. कुलकर्णींना बोलावले गेले. ते तसेच मंडपातून त्यास्थळी आले. कांबळे आणि कुलकर्णी मिळून लाल फीत सोडून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करणार होते. मिडियावाल्यांचे कॅमेरे सरसावले गेले. फीत सोडून उद्घाटन झाले. टाळ्या वाजल्या. पटापट शंभरएक फोटो निघाले. चला, आता दोघेही प्रथेप्रमाणे ग्रंथप्रदर्शनात येणार अशी माझी भावना होती. मात्र, बाहेरच असलेल्या एका स्टॉलवरच्या एका पुस्तकाचे प्रकाशन दभिंनी त्या स्टॉलवरच केले. १० फोटो झाले. त्यानंतर त्या गर्दीतून वाट काढत श्री. कांबळे कसेबसे त्या स्टॉलमध्ये पोहोचले. मात्र, सर्व फोटो झाल्यामुळे सर्वजण बाहेर पडले. चला, आता पुढील स्टॉलवर दोघे जातील असे वाटले. पण, झाले भलतेच!
महिला साहित्यिकांनी दभि आणि कांबळे यांना प्रकाशन मंचावर बोलावले. तेथे काही भाषणे झाली. पुन्हा फोटोसेशन. सर्वांनी आपापली हौस भागवून घेतली. आता त्यानंतर तरी ज्या ग्रंथनगरीचे उद्घाटन केले तेथे हे दोघे जातील असे वाटले. पण नाही. मंचावरून कांबळे खाली उतरले. मात्र दभि वरच होते. तेथे त्यांची मुलाखत सुरू झाली. एक चॅनल झाले कि दुसरे. दुसरीकडे कांबळे एक-दोन मिनिटे एकटेच दिसले. त्यामुळे त्यांना सांगण्यासाठी मी गेलो. तेवढ्यात एक चॅनलवाला पुन्हा आडवा आला. त्याने श्री. कांबळे यांना बाजूला बोलावले. कॅमेरा सरसावला. मुलाखत सुरू झाली. जशी मुलाखत सुरू झाली तसे गुळाभोवती मुंगळे जमा व्हावेत तसे लोक कांबळे यांच्या आजुबाजूला जमा झाले. अधून-मधून टाळ्याही पडत होत्या. त्या नेमक्या का पडत होत्या हे पहायला मी तेथे थांबलो नाही. कारण, पुढे काय होणार आहे हे मला माहीत होते. दभिंच्या मुलाबरोबर मी तेथेच पायरीवर गप्पा मारत बसलो. कांबळे यांची मुलाखत झाल्यावर ते निघून गेले. दभिंची मुलाखत झाल्यावर मी उठलो. आता दभि मोकळे झाले असे वाटले. पण पुन्हा ते कोणाबरोबरतरी निघाले. तोही चॅनलवालाच होता. त्याने मला सांगितले की दभिंची आता लाईव्ह मुलाखत आहे. त्यामुळे ते येऊ शकणार नाहीत. त्यावेळी साडेसात झाले होते. साडेनऊ वाजेपर्यंत सर्वजण सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेत होते की काय करीत होते माहीत नाही.
मात्र, ज्या ग्रंथनगरीचे उद्घाटन या (सा)मान्यवरांच्या हस्ते झाले ते फक्त आपल्या प्रसिद्धीशिवाय दुसरे काहीच बघू शकत नाहीत की काय असे वाटते. साहित्यिकांना आपली पुस्तके काढायला प्रकाशक लागतात. मात्र त्या प्रकाशकांसाठी थोडा वेळ द्यावासाही त्यांना वाटत नाही.
दुसरीकडे दुकान मांडून बसलेल्या प्रकाशकांना साहित्याशी काहीच देणेघेणे नसते. फक्त आपली पुस्तके कशी प्रसिद्ध होतील एवढेच त्यांना हवे असते असे दिसले. एकंदरीतच अशी संमेलने भरतातच कशाला? असे वाटल्याखेरीज राहिले नाही.
संमेलनात आणखी बर्‍याच उणीवा दिसल्या. त्या नंतर सांगेन.

गुलमोहर: 

मी रविवारी ग्रंथप्रदर्शनासाठीच साहित्य संमेलनाच्या ठिकाणी गेलो होतो. स्टॉल्सना क्रमांक दिलेले मला तरी कुठे दिसले नाहीत. त्यामुळे दिशानिर्देशनाच्या अभावी मी परत परत आधी भेट दिलेल्या स्टॉल्सशी पोचत होतो. परिणामी वेळेअभावी सगळे स्टॉल्स न पाहताच बाहेर पडावे लागले.
नामांकित प्रकाशकांच्या स्टॉल्सवर गर्दी आणि काही ठिकाणी अगदी माशी पण नाही असे चित्र होते.

काही मोजक्याच स्टॉल्स चे नंबर दिसण्याजोगे होते..... बाकी सगळा आनंदीआनंद होता.
सालाबाद प्रमाणे तीच ती पुस्तके मोठ्या प्रमाणात खपत होती... नवे साहित्य अपवादानेच खरीदले जात होते.

अजय,

सर्व मुद्यांशी व भावनेशी सहमत आहे. कंप्लीट भंकस प्रकार चालू झालेले आहेत.

(मुळात एक समीक्षक साहित्यसंमेलनचा अध्यक्ष होऊच कसा शकतो हा मला छळणारा प्रश्न आहे. - हे विधान कांबळेंबद्दल नाहीच. समीक्षक हा दुसर्‍याच्या लेखनावर लेखन करणारा माणूस! मूळ निर्मीती वेगळीच असते. मूळ निर्मीती करणार्‍याला अशा संमेलनांचे अध्यक्षपद मिळायला हवे व समीक्षकांना फार तर समोरच्या तिसर्‍या किंवा चौथ्या रांगेत बसवायला हवे. पण इथे उलटेच चाललेले आहे. समीक्षेचा दर्जा मूळ कलाकृतीइतका जरी होऊ शकला तरी आपल्याकडे मुळ कलाकृती रचणारे अस्तित्वात नाही आहेत का? त्यांचा का विचार केला जात नाही??)

-'बेफिकीर'!

एकंदरीत ह्यावर्षी विचकाच झाला म्हणायचा साहित्यसंमेलनाचा!!

सगळेच प्रसिद्धीच्या मागे पळताहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले...

ज्या ग्रंथनगरीचे उद्घाटन या (सा)मान्यवरांच्या हस्ते झाले ते फक्त आपल्या प्रसिद्धीशिवाय दुसरे काहीच बघू शकत नाहीत की काय असे वाटते.>>> अनुमोदन Happy

दिशानिर्देशनाच्या अभावी मी परत परत आधी भेट दिलेल्या स्टॉल्सशी पोचत होतो. परिणामी वेळेअभावी सगळे स्टॉल्स न पाहताच बाहेर पडावे लागले.
नामांकित प्रकाशकांच्या स्टॉल्सवर गर्दी आणि काही ठिकाणी अगदी माशी पण नाही असे चित्र होते. >>> अनुमोदन. मलाही अगदी असाच अनुभव आला. ग्रंथप्रदर्शनाच्या आत कुठेच दिशादर्शक फलक नव्हते. स्टॉल्सचे क्रमांक होते पण ते पटकन दिसतील असे ठळकपणे लावलेले नव्हते. मी गेले होते त्याच वेळात 'मराठी माध्यम नसल्याने काय कमावले? काय गमावले?' हा परिसंवाद होणार होता. विषय माझ्या जिव्हाळ्याचा होता. कार्यक्रमपत्रिकेत त्याची वेळ सं. ४.३० ते ६.३० लिहिलेली होती. मी ४.४५ला त्या मंडपात गेले तरीही तो कार्यक्रम सुरू झालेला नव्हता. व्यासपीठावरून परिसंवादात सहभागी होणार्‍यांपैकी २ मान्यवारांची नावं पुकारली जात होती. मी पुढे १०-१५ मिनिटे तिथे थांबले आणि शेवटी कार्यक्रम सुरू होत नाहीसा पाहून कंटाळून तिथून बाहेर पडले.
संमेलनाच्या ठिकाणी तीन प्रकारची फोटो/प्रकाशचित्र/अर्कचित्र प्रदर्शने पाहता येतील असं पेपरमधे वाचलं होतं. त्यातलं 'व्यक्ती आणि वल्ली'मधल्या ११ व्यक्तिमत्त्वांच्या अर्कचित्रांच्या प्रदर्शनाच्या उत्सुकतेनं माझा शाळकरी मुलगाही माझ्याबरोबर आला होता. पण आत शिरल्यावर प्रत्यक्षात ही प्रदर्शने नक्की कुठे पहायला मिळतील ते कुठेही लिहिलेलं नव्हतं. त्यानं ग्रंथप्रदर्शनात चक्कर मारली, इकडे तिकडे शोधलं आणि तो कंटाळून निघून गेला. ती सगळी अर्कचित्रं मुख्य मंडपाच्या एका कनातीच्या आतल्या बाजूला टाचून ठेवलेली होती हे दुसर्‍या दिवशीच्या पेपरमधल्या फोटोवरून समजलं Sad
एकंदर अत्यंत ढिसाळ नियोजन Sad