२९ डिसेंबर २०१० अश्विनीमामी गटग, पुणे

Submitted by आशूडी on 30 December, 2010 - 03:38

हैद्राबादहून मायबोलीकर अश्विनी खाडिलकर (अश्विनीमामी, अमा) पुण्यात येणार असल्याने चिनूक्सने २९ डिसेंबरला म्हात्रेपुलाजवळ मल्टिस्पाईस इथे संध्याकाळी गटग आयोजित केले. त्याबद्दल "सारखं सारखं मल्टिस्पाईसच का?" याचं उत्तर त्याने शिताफीने न देऊन गटग तेथेच होणार असल्याचे पक्के केले. थोर माणसांच्या यशाचे गमक नंतरच उमगते. उद्योजक गटग '५ ते ७' होऊन निरुद्योजक (!?) नको, उद्योजकांचे आधारस्तंभ (!) गटग मात्र '७ पासून पुढे' ठेवण्यात आले होते. या अमर्यादित वेळेवरुन नोकरदारांची मुस्कटदाबी कशी होत असेल हे सूज्ञांच्या लक्षात येईलच. तरी कुणीही तक्रार न करता दिलेल्या वेळेच्या पुढे मागे नोंदवलेले सारे उपस्थित राहीले. आपली तक्रार, सूचना कुणीही ऐकत नाही हे अंगवळणी पडल्याचे लक्षण.
प्रचंड मायबोलीसमुदाय जमलेला पाहून मल्टिस्पाईसच्या वेटर्सना धडकी भरली. आमचे आवाज ऐकून, आवेश पाहून ते एकमेकांशीही बोलत नव्हते म्हणून आमची ऑर्डर त्यांनी घेतली आहे का, कधी येणारे काही विचारायची सोय नव्हती. शेवटी ती धुरा आम्ही चिनूक्स व कार्याध्यक्ष मयूरेश यांच्या समर्थ खांद्यांवर सोपवली आणि आम्ही निश्चिंत झालो. सुरुवातीला नक्की किती कृपावान अवतीर्ण होणार आहेत याची खात्री नसल्याने चिनूक्स ऑर्डर द्यायला बिचकत होता. तो सारखा 'खूप लोक येणार आहेत' असे म्हणत असल्याने मला आणि साजिर्‍याला तो नजीकच्या भविष्यात श्याम मनोहरांचे 'खूप लोक आहेत' वाचणार असल्याची कुणकुण लागली. 'खूप लोक आले तरी आपण सूप प्यायला काय हरकत आहे?' असा रोकडा सवाल करुन मी कार्याध्यक्षांना सूपची ऑर्डर द्यायला लावली. तोपर्यंत सचिन, स्वाती, साजिरा, मी, चिनूक्स, देवा, शरद,मयूरेश, रुमा,अश्विनी,पल्ली, लिंबूटिंबू, ऋयाम यांच्या अंतरसापेक्ष गप्पा सुरु झाल्या. सचिनचे आगमन चिनूक्सने गुलदस्त्यात ठेवून आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला. पण आम्ही मात्र त्याला ओळख परेड करायला लावून त्याच्या मायबोली ज्ञानाचे अनेक धक्कादायक धक्के दिले. सर्वांचे फोटो काढत असतानाच नीरजा व संदीप आले. तिने मला मागून येऊन घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि पातालविजयम मधल्या राक्षसासारखी हॉ हॉ हॉ करुन हसत असतानाच मी तिचा फोटो काढला. खरंतर, तोच जास्त घाबरणेबल आहे असे वाटून तिला तो प्रोफाईलला लावण्याचे फु स मिळाले. रामाने मल्टिस्पाईसलोकी अवतार घेतला. आणि सर्वांना कॅडबरी वाटून दोन मिनिटे शांतता पाळून (ती श्रध्दांजली नसून 'नॉनव्हेज, रंपाविरहित गटगस्थान' यासाठी घेतलेलं मौनव्रत होतं हे नंतर कळाले.) अंतर्धान पावला. या सीतालक्ष्मणाविना रामाला पूर आलेला रस्ता पार करुन पलीकडे हार्वेस्ट क्लबात सोडणारा नाविक मिळाला का याबद्दल खात्रीलायक पुरावे अजून मिळायचेत.
एव्हाना पूनम,मिल्या, मीनू, अतुल, केपी, नेहा आणि मुले (मीनूला आणिनंतर वाचले तरी चालेल.)आले. पौर्णिमा(पूनम), मी आणि मीनू हा बर्म्युडा ट्रँगल बनण्यापासून वाचवता वाचवता पूनम, मी ,नीधप आणि मीनू असा चौकस चौरस तयार झालेला पाहून साजिरा आणि देवा यांचे चेहरे चौकोनी झाले. एव्हाना सूप, मिक्स पकोडे, फ्रेंच फ्राईज, मसाला पापड अशी 'दमदार' कॅलरीड सुरुवात झालेली होती. अश्विनीमामींनी खास आणलेले अत्तर सर्वांच्या हातावर लावून मल्टिस्पाईसचे विश्व सुगंधी करुन दिले. इकडे पूनमने शरद यांची 'सीएस : एक आव्हान' याविषयी मुलाखत घेतली. ती झाल्यावर मी 'सीएस: एक व्यापक क्षेत्र' अशी तिची मुलाखत घेतली. यात तिने सांगितलेली कंपनी व बाहेरील जग यांच्या मधला दुवा म्हणजे कंपनी सेक्रेटरी अशी व्याख्या आम्ही लिहून घेत असतानाच नचिकेतने "आई, सूप कधी येणारे?" विचारताच "थांब हा विचारुन सांगते" असे तत्पर उत्तर देताच, पूनम तिची सीएस ही भूमिका अक्षरशः जगते आहे अशी ग्वाही मी दिली. याबद्दल तिने माझे शक्य तेवढे धन्यवाद मानले आहेत.
तोवर जीएस, मयुरेश चव्हाण, बेफिकीर व त्यांची पत्नी यांनीही हजेरी लावली. येथील वेटर्सच्या ड्रेसवर मागे मसाल्याच्या पदार्थांची नावे लिहीली आहेत, हे मीनूने निदर्शनास आणताच तसेच त्यांचे अर्थही सांगताच तिची सूक्ष्मनिरीक्षणशक्ती पाहून व अन्नं वै प्राणा: ची आठवण येऊन मी तिला 'मिनूक्ष' म्हणायचे ठरवले आहे. सचिनची कार्यालयीन (होतकरु वाले नाही ओ, कामगार वर्गवाले (हे पण पांशायुक्त. पर्यायी शब्द सुचवा)) चौकशी, अश्विनीमामी यांच्या दौर्‍याविषयी विचारपूस झाली. माहीत असलेल्या गोष्टी सांगताच सचिन 'तुला कसे माहीत?' असे विचारायचा व माहित नसलेल्या गोष्टी विचारताच 'तुला माहीत कसे नाही?' असे विचारायचा. याबद्दल त्याला पूनम, स्वाती व मी अशांसमोर (तिघींना वर्णन करु शकणारे विशेषण शोधू शकत नाही. कृपया थोड्या वेळाने डायल करा. ) इंटरव्ह्यू द्यावा लागला. तोवर 'गरीबांना अन्नवाटप' सुरु झाले होते. मी अमांना प्रश्न विचारला, की तुम्हाला आम्हाला भेटून कसे वाटले? यावर त्यांनी खूप छान हसून खूप छान असेही सांगितले. मायबोलीवरची प्रतिमा व प्रत्यक्ष भेट यात फरक वाटतो का? असे विचारता त्यांनी 'तुझ्याबद्दल अजिबात नाही' असे सांगताच मी (बाकीच्यांबाबत) पुढचे ऐकू शकले नाही. पण तेवढ्यात सचिनने 'तू आजकाल फार भावनिक लिहीतेस म्हणे' असे आठवून देऊन हसता हसता माझ्या डोळ्यात 'टचकन पाणी आणून' 'रडवलं हो'.
तिकडे अरभाट, नी, मीनू, श्रेयस, चिनूक्स यांची जोरदार बॅटिंग सुरु होती. पांशा असावी बहुधा कारण मीनू आणि नी बेफाम हसत होत्या आणि बाकी सारे 'वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे' आठवत होते. मीनूला किती हाका मारल्या तरी कळेना तेव्हा 'मीनू बोलत असताना तिचे कान बंद असतात' हे माझे वाक्य देवाने विकीपेडियावर 'तुम्हाला माहित आहे का?' या सदरात द्यायचे कबूल केले. एव्हाना 'माहेर' चा अंक सगळीकडे फिरत होता, कौतुक होत होते. पण साजिर्‍याच्या फोटोवरुन झालेली चर्चा पाहून तू माहेरकडून वाढीव खपाचे कमिशन घ्यायला हवेस असे मी त्याला सुचवले. इतक्या दंगामस्तीत केपीचे लक्ष मात्र टीव्हीमधल्या कॉग्निझंटच्या बिल्डींगीकडे असल्याचे कळताच मी आणि पूनमने 'कुठं म्हणून न्यायची सोय नाही' वाला जगप्रसिध्द तुक फेकला.
कॅमेर्‍यावर यथेच्छ ताव मारुन व जेवणावर हास्य, बडबडीचा क्लिकक्लिकाट करुन एकदाचे बिल आले. हुशार कार्याध्यक्षांनी हिशोब करुन पर हेड खर्च सांगताच 'पर हेड म्हणजे पर फॅमिली का? ' असा कठीण कठीण प्रश्न किती अर्थातच मीन्वाज्जींनी विचारला. यावर फॅमिलीला एकच हेड असतो/ते हे सत्य अधोरेखित झाले. उठून बाहेर पडताना, हसता हसता साजिरा शेजारच्या टेबलावरच्या काकांच्या अंगावर पडणार तेवढयात नीरजाने त्याला 'आपली (झालेली, केलेली)माती , आपली (झालेली, केलेली)माणसं इकडे आहेत' असे सांगितले त्याच त्या 'कु म्ह न्या सो ना' वा ज तु क सह! बिल देऊन बाहेर आल्यावर हृद्य हसत एकमेकांचा निरोप समारंभ सुरु झाला. तेव्हा सर्वांचा एक ग्रुप फोटो काढण्यासाठी एकमेकांना ढकलत सावरत सारे गोळा झाले. केपीकाका फोटो काढायला धावल्यावर मी त्यांना 'हे उद्या प्रचि१, प्रचि२ असे टाकू नका ओ' 'फोटो आहिस्ता निकालो के सारे बडे भावुक हुए है' असे निक्षून सांगितले. त्यावरचे बघण्यालायक चेहरे त्यांनी फ्रेमीत बंदिस्त केले आहेतच. आज पारण फिटण्यानिमित्त निमंत्रितांना त्याचे प्रसादवाटप केले जाईल.
थोडक्यात, सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे गटग म्हणजे नुसती धमाल. अश्विनीमामी, तुम्हाला भेटून खूप छान वाटले. पुढच्या वर्षी लवकर या.
***
तटी : टेबलाच्या उजव्या बाजूस मी असल्याने साहजिकच डाव्या बाजूचा वृ मला लिहीता आला नाही. ती जबाबदारी ऋयामवर आहे. यात काही डावेउजवे डावपेच नाहीत. वृत्तांत लिहायचा असेल तर जेवणभत्ता मिळेल का? असा नम्र प्रश्न कार्याध्यक्ष व इतर मान्यवरांना विचारुन मी माझे घरंगळणारे शब्द आवरते. काय राहिलंय ते सांगत बसण्यापेक्षा स्वतः लिहा. आधी करावे, मग सांगावे.
Proud Light 1

गुलमोहर: 

ते एक प्रचंडच गटग होतं! मला अनेकजण माहीत नव्हते. चिनुक्स यांनी नावे सांगीतली. मला ते गटग व त्यातील उत्साह पाहून फार आनंद झाला. तसेच, त्या निमित्ताने मिलिंद आणि शरद यांचीही भेट झाली.

अश्विनीमामी या एक हसर्‍या व उत्साही व्यक्ती आहेत हे लक्षात आले.

चिनूक्स यांचे नेहमीप्रमाणेच उत्तम आयोजनाबद्दल अभिनंदन!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Pages